रुणझुणत्या पाखरा/त्र्याण्णव वर्षाच्या तरुणाकडून उर्जा चेतवून घेतांना

विकिस्रोत कडून

 तो परिसर बहुदा तरूणाईने भारलेला असावा. सगळेच तरूण. नजरेत नवनव्या कृतिशील स्वप्नांचे उंचवटे. हात सतत काही नवे करण्यात गुंतलेले. टमाटे, वांगी, मिरच्या, काकड्या, मुळे, गाजरे, पालक, मेथी, कोबी.. अशा तऱ्हेतऱ्हेच्या भाज्या हळुवार हातांनी खुडून बांबूच्या टोपल्यात टाकणारे उत्फुल्ल हात. दुसऱ्या परिसरात बाया.. पुरूषांचे. काही जण चिंध्यांचे रंगानुसार ढीग घालणारे तर काही जण यंत्रावर त्यांना पिंजणारे, त्यांची पोती भरणारे. परिसरातील प्रत्येकाच्या चेहेऱ्यावर निरोगी.. निरामय हास्य. आणि स्वागतशील हात. जवळजवळ पाचसाडेपाचशे एकरांच्या परिसरात पडणाऱ्या पावसाचा एक एक थेंब साठवून तयार केलेले पाण्याचे साठे. त्यावर पिकणारे गहू, ज्वारी, हरबरा, भुईमूग, सूर्यफूल, करडई, साळ, सोयाबिन.. यांची लहरती शेते. भाताची कापणी, मळणी झालेली. तरुणाईचे हात जेव्हा श्रममग्न असतात तेव्हा समृद्धी शेजारी येऊन उभी रहातेच. ही सारी त्या हातांची किमया.
 त्या परिसरातील हजारो हातांना उर्जा देणारा ब्याण्णव संपून त्र्याण्णवात पदार्पण करणारा हा तरुण गेली अनेकवर्षे आडवाच... झोपूनच आहे. पाठीला पट्टा बांधून तास्-नतास उभे राहून अनेकांना उभे करण्यास उद्युक्त करणारा. जीवनरस गेली अनेकवर्षे देणारे बाबा आता मात्र आडवे झोपून तेच काम करीत आहेत. पहाटे पाचला तयार होऊन एका हातगाडीवर झोपून तो युवा अडिच तीन किलोमिटर्स परिसराला वळसा घालतो. सारेजण कसे नव्या दमाने, उत्साहाने उभे आहेत ते डोळाभरून पहातो. सारेजण त्याची वाट पहात असतात. त्याची ढकलगाडी पुन्हा त्याच्या घरी पोचते तेव्हा तृप्तीने त्याचे डोळे मिटलेले असतात.
 त्याची परमप्रिया सखी, साक्षात् साधना. या विद्यालंकृत भणंग फकीरासोबत प्रवास करतांना ती 'समिधा' झाली. कुसुमाग्रजांच्या ओळी मला आठवल्या -

समिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा
तव अंतर अग्नी, क्षणभर तरी फुलवावा...

 पण साधनारूपी समिधांनी या तपस्व्याचा अंतरअग्नी गेल्या पाच तपांहुन अधिकवर्षे फुलवत ठेवला आहे.
 बाबा आमटे गेल्या सव्वीस डिसेंबरला ब्याण्णव वर्षांचे झाले. २५ डिसेंबरला त्यांना शुभेच्छा देणारे आम्हीच खुळे ठरलो. ते हसून म्हणाले 'एक वर्ष जवळ गेलो. कबीराचा दोहा आठवा.

पशुपक्षी भोजन करे, देह बने भांडार...

 बाबांनी निर्माण केलेल्या आनंदवनातले 'स्मृतीवन' पशु पक्षांना आहार पुरवणारे विविध झाडांचे 'भांडार' बनले आहे. या रोगांने त्रस्त रोग्यांच्या जखमा धुतल्याने किंवा त्यांच्या जवळ गेल्याने हा रोग होत नाही हे समाजाच्या मनात ठसवले. नवनिर्मितीत मग्न असणाऱ्या श्रमस्वी समुदायापैकी अनेकांच्या हातापायांची बोटे झडलेली आहेत. पायांनी धड चालणे जमत नाही. कोणाचे नाक झडलेले. कोणाचे कान म्हणजे भोकच. कोणी अपंग झालेले. पण सर्वांचे हसरे आणि स्वागतशील डोळे.
 गेली शेकडोवर्षे 'महारोगा’ बद्दलची घृणा समाजमनात अदिबंधा सारखी पेरली गेली आहे. विज्ञानाच्या भक्कम पुराव्यांना सिद्ध करण्यासाठी बाबांनी आपले शरीर वापरण्यास दिले. आनंदवनात असलेल्या व्यक्तींना स्मृतीवनातील मातीत खोल पुरून निरोप दिला जातो. त्यांच्या भक्तियुक्त प्रेम करणाऱ्या सर्वांनाच माहित आहे की बाबाही आपल्या देहाचे दान पशु पक्षांसाठीच करणार आहेत. बाबांनी या रोगाचे जंतू स्वतःच्या शरीरात टोचून घेतले. मात्र त्यांना रोगाची बाधा झाली नाही. मग नवनव्या प्रयोगांना सुरूवात. या रोगाने ग्रस्त झालेले चार रोगी, स्वतःची पत्नी, दोन छोटे मुलगे, यांच्यासह भर जंगलात त्यांनी तळ ठोकला. झोपडी बांधून वाघ, अस्वल, साप यांच्याशी दोस्ती करत तर कधी सामना देत आनंदवनात स्थिर झाले.
 या भुवनतळी फुललेले हे आनंदवन गेली अनेक वर्षे सतत फुलते आहे. स्वप्नांची बीजे मातीत पेरून त्यांची दिगंताला भिडणारी झाड निर्माण करणाऱ्या त्या त्र्याण्णव वर्षांच्या तरुणाच्या हाताला स्पर्शकरून मीही माझ्या तनामनात उर्जा चेतवून घेतली आहे. अशीच नवनवी स्वप्ने मातीत पेरण्यासाठी.. त्यांचे अंकुर सबल करण्यासाठी...