Jump to content

रुणझुणत्या पाखरा/साद हिमशिखरांची... उंच उंच चढताना

विकिस्रोत कडून



 मेहमुद रफी आणि त्यांची हिंदू पत्नी मीना उर्फ अमीना यांच्या कुटुंबात जोपासलेल्या मराठी माणसांविषयीच्या तुडुंब आपुलकीने भरलेला पाहुणचार घेऊन रात्री साडेबारानंतर आम्ही पंचफुला हे हरियाना... पंजाबच्या सीमेवरचे गाव सोडले. रफीजी महाडचे तर अमीना नागपूरची. त्यांना एक गोड मुलगी आहे. शबाना नावाची. रफीजींनीच आम्हाला एक टेम्पो ट्रॅव्हलर आणि एक इंडिका अशा दोन गाड्या ठरवून दिल्या होत्या. कुलू खोरे इथून सुमारे २८३ किलोमीटर्स होते. रात्रीच्या झोपेचा झपका डोळ्यावरून दूर झाला तेव्हा बाहेर चांगलेच उजाडले होते. घड्याळात पाहिले तर लहान काटा पाचावर नि मोठा बारावर. अत्यंत निरूंद रस्त्यावरून आमच्या गाड्या वेगाने धावत होत्या. आपण किती उंच चढून आलो आहोत हे जाणवून क्षणभर हृदयात लकलकलेच आणि आमचे निष्णात चक्रधर राजेश आणि हरिओम् यांना थ्री हॅटस् ऑफ म्हणत सलामी द्यावीशी वाटली. मनात आले. त्यांची नजर क्षणभरही विचलित होऊन ढळली असती तर?
 रस्त्याच्या एका बाजूला खोल...खोल...खोल... दरी. हिरवाईने बहरलेली. तर दुसऱ्या बाजूला चढता डोंगर चिनार, सुरू, देवदार या उंचउंच निमुळत्या वृक्षांनी वेढलेला. अधून-मधून सफरचंद, लिची, चेरी, स्ट्रॉबेरी या फळांच्या बागा. पाठीला निमुळत्या आकाराच्या बांबूच्या टोपल्या बांधून, माथावर कपाळावर येणारी, टिकल्यांची... माळांची झालर लावलेली ओढणी बांधून मागे तिचा शेव... पदर सोडलेला, अशा वेशातल्या महिला गटागटाने फळबागांमध्ये फळे गोळा करायला जाताना दिसल्या. सगळ्यांचे चेहेरे तरतरीत. ताजेतवाने. गोरी झळझळीत कान्ती. त्यांची घरे डोंगरातच. घरापासून मुख्य रस्त्यावर यायला चिमुरड्या उतरत्या पायवाटा आणि आमच्या गाड्या थांबल्या. "कुल्लू प्रदेशमें हम आपका स्वागत करते है" असा बोर्ड होता आणि लगेच बोगदा.
कशासाठी पोटासाठी
खंडाळ्याच्या घाटासाठी
 असे म्हणत लहानपणी आम्ही मुंबई पुणे प्रवासातले बोगदे पार करीत असू. त्याची आठवण झाली पण हा बोगदा खूपच लांबलचक... चक्क तीन किलोमीटर्स लांबीचा होता.
 ...अचानक रेशमी उन्हाच्या कवडशांनी आमचे सुनहरी स्वागत केले. आम्ही कुलू खोऱ्यात होतो. चमचमणारी शुभ्रांकित हिमशिखरे आम्हाला खुणावत होती.
 बोगदा येण्याआधी एक सुंदर चिमुकले धरण लागले. ते पंच नद्यांपैकी बियास या अवखळ नदीचे होते. आमचा पुढचा प्रवास तिच्या साथीने सुरू झाला. कुल्लू ते मनाली हे एकावन्न किलोमीटर्सचे अंतर. पण ते कापायला तीन तास लागले. चढणीचा निरूंद रस्ता. एका खालचे एक असे दहा बारा रस्ते सहजपणे दिसत होते. एकामागे एक उभ्या असलेल्या डोंगर रांगा. त्या पार करीत हिमशिखरांचा पल्ला आम्हाला गाठायचा होता. इतक्यात एक गौरांगना चेरी आणि स्ट्रॉबेरीचे द्रोण घेऊन उभी होती. अर्थात सगळ्यांनीच ते द्रोण विकत घेतले. लिची हे, बोर आणि करवंद यांच्या मध्यातले देखण्या लाल... पिवळट रंगाचे चकचकित फळ. चव अत्यंत मधुर. आंबट आणि गोड यांच्यातले माधुर्य त्यात साठलेले असते. बीजही मऊ. स्ट्रॉबेरीचे आवरण काहीसे खडबडीत फणसाची बाळआवृत्ती. वरचे आवरण काढले की आतला मगज कोकणातल्या ताडगोळ्यासारखा आरस्पानी. चव मात्र गोड... मधुर.
 एका बाजूने सतत खोल दरी असणारा घाट तो पाहून मला धुळ्याला जाताना लागणारा कन्नडचा औट्रमचा घाट आठवला. त्यांची लांबी ७ किलोमीटर्स आहे. तो पार करतानाही छातीचा ठोका चुकतो. चक्रधराची (ड्रायव्हरची) हात चलाखी महत्त्वाची ठरते. पण हा तर औट्रम पेक्षा पन्नास पटीने मोठा घाट आणि त्याहून अवघड आणि दुपारी एक वाजून गेल्यावर आम्ही एकदाचे मनालीत पोचलो. भलीमोठी ताजी जांभळी वांगी, दीडदोन फूट लांबीचे रसदार शुभ्र मुळे, तोंडात पाणी आणणारी लांब सडक केशरी रंगाकडे झुकणारी गाजरे, लालबुंद टोमॅटो, काकड्या, हिरवाकंच पालक, कोथिंबीर, ढब्बू मिरच्या यांनी सजलेली भाजीची दुकाने दिसू लागली. मनात खूणगाठ बांधली. आज दालफ्राय आणि छोले सोडून चमचमीत भाजीही खायला मिळणार.
 ...आमची गाडी दुपारी दीड वाजता मनालीच्या हॉटेल विंटेज कॉटेज समोर थांबली. खोलीत प्रवेश केला आणि डोळ्यांचे पारणे फिटले. खोलीच्या काचेरी खिडकीतून बर्फाने व्यापलेली शुभ्रांकित हिमशिखरे. त्यांना वेढून असलेले हिरवेजर्द उंच डोंगर, त्यातून वेगाने धावत खाली येणारे फेसाळ... खळाळते पांढरे शुभ्र झरे साद घालत होते. मी चित्रातल्या नव्हे तर खऱ्याखुऱ्या हिमालयाला नजरेत साठवीत होते. उद्या तर हिमालयाच्या कुशीत खेळायला जायचे होते...