रुणझुणत्या पाखरा/रोहतांगच्या खिंडीत

विकिस्रोत कडून



 ४० वर्षांपूर्वी आम्ही जोशात दिलेल्या 'हिंदी चिनी भाई भाई' या घोषणा हवेत विरताहेत तोच चिन्यांनी आमचा हिमालय बळकावण्याचा घाट घातला. हिमालयात घुसखोरी केली. पुन्हा आम्ही बुलंद आवाजात सांगू लागलो... गाऊ लागलो... म्हणू लागलो,
 उत्तुंग आमुची उत्तर सीमा, इंच इंच लढवू!
 पण आमच्या शासनाजवळ ना बर्फ तुडवू शकणारे उत्तम बूट होते, ना आवश्यक ती शस्त्रे, स्वेटर्स. तरीही जीवाची बाजी लावून आमचे जवान लढले. आजही,
 ऐ मेरे वतन के लोगो, जरा आँखमें भरलो पानी
 जो शहीद हुवे है उनकी, जरा याद करो कुर्बानी -
 ह्या लतादिदींनी गायलेल्या प्रदीपजींच्या गीताचे स्वर ऐकले की मन गलबलतं. डोळे वाहू लागतात. तो हिमालय प्रत्यक्ष अनुभवण्याची लालसा गेली पन्नास वर्षे मनात जपून ठेवली होती आणि वयाची सत्तरी जवळ आल्यावर तो योग अंगणात आला. ही उत्सुकता अधिक ताणली गेली, नेपाळला गेलो तेव्हा. हिंदू धर्मः त्यातील स्त्रिया व मुलांचे स्थान या विषयावर मी टिपण वाचणार होते. पाकिस्तान सिलोन, बांगलादेश, दक्षिण आफ्रिकेतील काही देश सहभागी होणार होते. ख्रिस्तवासी डॉ. मेबल आरोळे व डॉ. रजनीकांत आरोळेंमुळे ही संधी मला मिळाली होती, काठमांडू ते दिल्ली हा संपूर्ण प्रवास हिमालयाच्या काठाने होता. उंच उंच बर्फाळ हिमशिखरे, त्यावर पडणारे ऊन, त्या शुभ्रतेवर सोनसळी झळाळी. डोळे तृप्तीने तहानले होते. तेव्हाच ठरवलं या जन्मी हिमालयाच्या कुशीत एकदातरी विसावयाचेच!...
 मनालीला पोचलो आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी साडेसात वाजता रोहतांग पासला निघालो. पुन्हा निरूंद रस्ते. डोंगर फोडून जेमतेम एक गाडी येऊ जाऊ शकेल असे. हा रस्ता बॉर्डर सिक्युरिटी फोर्स - सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी... जवानांनी तयार केला आहे. त्याची निगा तेच राखतात ठराविक अंतरावर रायफलधारी जवान येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचे बारकाईने निरीक्षण करीत असतात. शंका येताच गाडी थांबवतांत. गाडीची कागदपत्रे, परवाना इत्यादीची कसून पाहणी करतात. कोठीपासून जेमतेम २७/२८ किलोमीटर्स अंतर. पण पंधरा ते वीस अंशाच्या कोनात वळणारे रस्ते... हेअरपिन ड्राइव्हज्. चढणीचा रस्ता. ज्या रस्त्यावरून आपण आलो ते रस्ते खेळातल्या नागमोडी रेषांसारखे नि त्या वरून धावणाऱ्या गाड्या आगपेट्यांच्या. आकाराच्या, दिसत होत्या. आम्ही हिमगिरी बर्फाच्छादित रांगांमधून प्रवास करीत होतो.
 रोहतांग पासला बर्फात खेळण्यासाठी जाड वुलनचे... फरचे कोट, बुट घ्यावे लागतात. ते ७० ते १०० रुपये भाड्याने मिळतात. त्या दुकानांना नंबर्स असतात. आम्ही पंधराजण होतो ७० व १७१ या दुकानांतून कोट घेतले. दुकानातील सर्व व्यवहार महिलाच पाहतात. यांचे पती सफरचंद, लिचीच्या बागांतून मजुरी करतात. ते स्वतःला राजपूत मानतात. कोठी हे रोहतांगच्या अलिकडचे गाव. तिथेच ही दुकाने आहेत.
 पाहता पाहता आम्ही इतके उंचावर आलो नि लक्षात आले की काही बर्फाळ शिखरांपेक्षाही आम्ही उंचावर होतो. गोठलेले झऱ्यांचे प्रवाह ऊन पडल्यामुळे मधूनच वितळून झुळझुळती बारीकशी पाणरेषा उड्या घेत वाहात होती. इतक्यात एक विलक्षण दृष्य दिसले भला मोठा प्रवाह गोठून बर्फाचा पांढरा रूंदबंद दगड पायथ्याशी येऊन थांबला होता आणि त्या दगडाच्या खालून वितळलेले पाणी झुळझुळत होते. डोंगराच्या बाजूने खणून प्रवाहाला वाट करून दिलेली आहे. त्यामुळे पाणी रस्त्यावर येत नाही आणि एका अतिउंच टप्प्यावर गाडी थांबली.
 आता आम्ही समुद्र किनाऱ्यापासून सुमारे १३५०० फूट (३९३४ मीटर) उंचीवरच्या भारताच्या शेवटच्या बिंदूवर रोहतांग पासवर पोचलो होतो. समोर दाट बर्फाच्या चुऱ्याचे लांब रूंद मैदान. किंचित चढणीचे. रोहतांगचा अर्थ मुडद्यांचे गाव. इथून लेहकडे जाता येते. इथले हवामान नेहमी बदलत असते. हिमवृष्टी, वादळे यांनी वेढलेले. त्यामुळे इथून सीमा ओलांडताना अनेकदा जीव गमवावा लागे. आता शासनाने खूप सुधारणा, सोयी केल्या आहेत. मनालीच्या दिशेने नजर टाकली की घनघोर जर्द, गर्द हिरवाई दिसते आणि दुसरीकडे वनस्पती विहीन हिमपहाड. इथे झीरोपॉईंटवर व्यास नदीचा उगम आहे. लोकभाषेत तिलाच बियास म्हणतात. इथून तिबेट व चीनमध्ये घुसता येते...
 ...आणि मला वयाची मर्यादा इथे जाणवली. भरपूर चालण्याची. धावण्याची शारीरिक क्षमता असेपर्यंत इथे यायला हवे. बर्फावरून ढकलत नेणाऱ्या लाकडी गाड्या होत्या. झिरो पॉईंटपर्यंत, व्यास नदीच्या उगमापर्यंत नेऊन आणायचे पाचशे रुपये. थोडी घासाघीस केली. त्या ढकलगाडीत दोन जण बसू शकतात. मी आणि माझा मुलगा अभिजीत आम्ही दोघे बसलो. चढावावर तीन जण ढकलत होते. भवताली मुले, नातवंडे बर्फातून उंडारत होती. एकमेकांच्या अंगावर गोळे करून फेकत होती. मी तो आनंद तीसवर्षे मागे जाऊन मनानेच झेलत होते. पण नंतर खाली उतरलेच. बर्फाचे गोळे फेकण्याचा, बर्फाच्या चुऱ्यावर जाड कोट, लोकरी टोपी घालून फतकल मारून बसण्याची धम्माल अनुभवली. अशा वेळी 'त्या'ची याद आलीच. मी हिंडण भवरी तव हा मातीत पाय घट्टपणे रोवून समर्थपणे उभा असलेला स्वयंसेवी सैनिक. पण त्याने माझ्या हिंडण्याला कधीही अडसर घातला नाही. शेवटी साथ त्याचीच!