रुणझुणत्या पाखरा/समुद्र आणि समुद्र

विकिस्रोत कडून



 सेंट जॉनचा किनारा. दिवसभलेही मे महिन्यातले असले तरी संध्याकाळीही काकडवणारी थंडी होती. न्यू फाऊंडलंड हा उत्तर कॅनडातला चिमुकला प्रांत. अटलांटिक महासागरातील भरतीच्या लाटांत अंग भिजवून नव्या समुद्राचे वेगळेपण अनुभवीत होते. इतक्यात 'मावशी शार्क..' अशी मधुश्रीने साद घातली. प्रचंड आवाढव्य असे माशाच्या आकारचे धूड वेलांटी उडी घेत क्षणभर पाण्याबाहेर हवेत उडून परत समुद्रात गडप झाले. सात वर्षात मधुश्रीला सेंटजॉनमध्ये राहून शार्कचे दर्शन झाले नव्हते. मला ते अनोखे अभूतपूर्व दर्शन पहिल्या दिवशीच झाले. अटलांटिक महासागराची ओळख पक्की झाली.
 सेंटजॉन हे मासेमारीचा व्यवसाय करणारे शहर, अटलांटिक महासागरात पाय सोडून निवान्तपणे बसले आहे. इंग्लंडच्या मार्कोनीने पहिला ट्रान्सॲटलांटिक संदेश इथेच पाठविला होता. या देखण्या शहराच्या किनाऱ्यावर कॉड माशांची भरपूर पैदास होत असे. या शहराजवळच पेटी हर्बर नावाचे चिमुकले खेडे आहे. गेली तीन साडेतीनशे वर्षे हे खेडे याच व्यवसायावर जगते. प्रत्येक घरासमोर रंगीतबोट बांधलेली असते. पुरूष ऊफाळत्या सागरात बोटी फेकून चंदेरी माशांची दौलत घरी आणतात. त्यांची साफसफाई, काटे काढून, त्यावर प्रक्रिया करण्याचे काम त्यांच्या घरधनिणी करतात. उधाणलेल्या सागरातून घरधनी सुखरूपणे परत येण्याची वाट पहाणाऱ्या त्यांच्या राण्यांनी एक उमाठ्याची जागा निवडली होती. तिला 'सी लुक आऊट'... दूरवरचा समुद्र न्याहाळता येतो असे ठिकाण म्हणतात. आम्ही ते आवर्जुन पाहिले. चढती संध्याकाळी. मला त्या कोळिणींचे आतुर डोळे, कातर मन दिसलेच. अन् लता दिदींचे सूर आठवले-
माझ्या सारंगा.. राजा सारंगा
डोलकरारं..धाकल्या दिरा रं
चल जाऊया घरा...
 व्यवसायाशी जोडलेल्या वेदना.. भावना कुठेही गेलात तरी सारख्याच ना?
 ...१९९३ च्या भूकंपात सकाळी नऊलाच मानवलोकचे कार्यकर्ते मूव्ही कॅमेरा घेऊन किल्लारीत पोचले. पहिला फोन डॉ. जगन्नाथ वाणींचा कॅलगरी - कॅनडातून आला. मग फोनच फोन. मानवलोकच्या माध्यमातून जो निधी जमा झाला त्याचा दरमहा अहवाल, हिशेब पाठवला जाई. प्रत्येक दिवस नवे प्रश्न.. नवे आव्हान उभे करणारा. आमची दोन केन्द्रे पारधेवाडी (लातूर) व सालेगाव (उस्मानाबाद) इथे तंबू ठोकून उभी राहीली. फेब्रुवारी १९९४ मध्ये आम्हा दोघांना कॅनडा व अमेरिकेतील मित्रांनी आम्ही तयार केलेल्या माहितीच्या चित्रफितीसह तिथे येण्याचे निमंत्रण दिले. अर्थातच आम्ही गेलो. उभय देशांतल्या २३ गावांना भेटी दिल्या. तिथल्या भारतीयांशी संवाद केला. आणि अटलांटिक महासागराप्रमाणे पॅसिफिक महासागराचेही प्रत्यक्ष दर्शन घडले.
 व्हँकुव्हर हे पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावरचे गाव. अशोक कोतवाल त्यांची पत्नी ट्रुस यांच्यासह त्या किनाऱ्यावर गेलो. भरतीची वेळ. समोर भरतीच्या लाटांनी उधाणलेला समुद्र आणि नव्या सागर स्पर्श-दर्शनाच्या ओढीने उफाणलेला आमचा उत्साह. गाडी पार्क करतांना मशिनमध्ये नाणे टाकून नोंदवायला अशोक विसरले. जेमतेम पंचवीस पावले पुढे गेलो असू. लक्षात आले आणि ते गाडीकडे धावले. पण नियमाचे उल्लंघन केल्याबद्दलच्या दंडाची रक्कम नोंद करून उद्या सकाळी १० पर्यंत रक्कम जमा करण्याची सूचना गाडीला चिटकवलेली होती. अशोक दोन मिनिटात येतो सांगून गेले आणि दंड भरून हुश्श करीत आमच्यात सामिल झाले आणि पॅसिफिक सागरही मनात नोंदवला गेला.
 १९९५ मध्य बीजिंगच्या जागतिक महिला परिषदेला जाण्याचा योग आला. येतांना बँकॉक आणि स्त्री देहाचा बाजार मांडून बसणारी, पटाया नगरी यांनाही भेट दिली. पटायाच्या बीचवरची संध्याकाळ प्रत्यक्ष पाहिली. मेणबत्ती सारखे मिणमिणते दिवे. अंधारलेली कॉफी, दारूची दुकाने. टेबला शेजारी नटूनथटून बसलेल्या. खुणा करीत.. अंगप्रदर्शन करणाऱ्या सर्व वयाच्या स्त्रिया. बीचवरून हिंडणारे गोरे.. परदेशी म्हातारे. लगटून चालणारी १२/१४ ची उमलती कळी. म्हातारे हात तिच्या अंगाशी खेळणारे आजही आठवण झाली तरी तो किनारा 'बाई' असण्याचे दुःख जागे करून अशांत... अस्वस्थ करतो आणि करीत राहील. थायलंडमध्ये जागोजागी मर्दन केन्द्रे (मसाज सेंटर्स) आहेत. आणि ही कला शिकवणारी 'विद्यापीठे' आहेत. 'विद्यापीठे' या शब्दाचा वेगळा अर्थ कळला. हा स्त्रियांचा महत्वाचा व्यवसाय आहे. तीन शिफ्टमध्ये.. एकावेळी ६० ते ८० महिला हा व्यवसाय करतात. या चिमुकल्या, तीनही बाजूंनी सागराने वेढलेल्या देशातील जमीन परदेशी लोकांनी विकत घेतली. पुरूष मजूरी करतात. बस चालवण्यापासून ते क्रेन ओढण्यापर्यन्त सर्वत्र स्त्रियाच पुढे असतात. भाषेवर संस्कृत.. भारतीय भाषांचा प्रभाव जाणवतो. तर मर्दन केन्द्रातील स्त्रियांशी संवाद साधतांना कळले की त्या हा घरंदाज मानला जाणारा व्यवसाय मुलांचे शिक्षण, चरितार्थासाठी आणि 'डॉवरी' ची .. हुंड्याची रक्कम जमा करण्यासाठी करतात. मर्दन करून घेणारे मात्र पुरूषच असतात. पण तेथे अश्लिलता कुठेही न येऊ देण्याचे बंधन पाळले जाते. तेलाचा वापर न करता मर्दन केले जाते. या कलेला दूषित वा अप्रतिष्ठित मानले जात नाही. म्हणून ही 'कला' नव्हे तर 'विद्या' मानली जाते.
 ...पटाया किनाऱ्यावर गेलो. लांबच लांब किनारा, कडेला बैठी.. दारे नसलेली हॉटेल्स. तरूणाईत पाऊल टाकणाऱ्या ॲडोलसन्ट.. अधमुऱ्या दह्यासारख्या गोंडसमुली. पण डोळे निष्णात. चेहेरे रंगवलेले. मंद दिव्यांच्या उजेडात एकेक टेबल पकडून हवे असलेले भरघोस खिसा भरलेले भक्ष धांडोळणाऱ्या त्या मुली. लोभस भक्ष शोधणारे प्रौढ.. वृद्ध आंबटशौकीन परदेशी पुरूष....
 लहानपणी वाचलेल्या कवितेतली गौळण म्हणाली होती
 माय फेस इज माय फॉरच्यून... अगदी २१ व्या शतकात प्रवेश करतांनाही आमच्या देहाला, चेहऱ्यालाच महत्व? आम्हाला भवितव्य नाहीच? आमच्या उज्वल भवितव्याला शक्ती देणारा आमचा चेहेराच? आता अगदी चित्रातला समुद्र पाहिला तरी मनात येते पटायाचा किनारा २१ वे शतक सुरू होऊन सातवर्षे झाली तरी तसाच असेल का? उमलत्या कलिकांच्या मनातले स्वप्नांचे गर्भ खुडून त्यांच्या देहांचा मांडलेला बाजार रात्रंदिवस पाहणारा हा समुद्र आतल्या आत गुदमरत नसेल ?..?