रुणझुणत्या पाखरा/सात बहिणींच्या तनामनापर्यन्त
Appearance
अरुणाचलचे जिल्हे म्हणजे हाताची बोटे. कोणत्याही एका बोटाकडून दुसऱ्याकडे जायचे तर तळ्यावर उतरावेच लागते. पूर्वी पाच जिल्हे होते. आता ती संख्या तेरावर पोचली आहे. या सात बहिणींच्या जीवनरितीतही खूप सारखेपणा आहे. प्रत्येक घरात वजनाने हलका हातमाग असणारच. प्रत्येकाला वस्त्र विणता येते. त्यातही स्त्रिया विशेष निपुण. पाऊस चाळीस ते अडिचशे इंचापर्यन्त कोसळणारा. त्यामुळे घनदाट जंगलांचा प्रदेश तऱ्हेतऱ्हेच्या वनस्पतींनी आंगोपांगी बहरलेले डोंगर. नजर टाकावी तिथे झरे, पाणी... वेगाने धावत, उड्या घेत उताराकडे झेपावणारे. आदिवासींच्या जमाती गटागटाने राहणाऱ्या. मग त्यांची भाषा, जमातीचे नांव वेगळे. पण घरे, पोषाख यांत नितान्त सारखेपणा.
झीरो हे आपातनी पठारावरचे, लोअर सुबनसरी जिल्ह्याचे महत्त्वाचे गाव. इटानगर ही राजधानी नेहरलॅगून या जिल्ह्यात येते. झीरोला जातांना जंगलांच्या मध्यात, डोंगर माथ्यावर, उतारावर रहाणाऱ्या आदिवासींची घरे दिसली, लाकूड आणि बांबूंचा, झुलती घरे बांधण्यासाठी खूप छान उपयोग करून घेतला आहे. झाडांचे बुंधे, दणकट बांबूंचे पुंजके जमिनीत रोवून, त्यांच्या आधाराने जमिनीपासून आठ दहा फूट उंचावर, उतरत्या छपरांच्या झोपड्या बांधून लोक रहातात. जंगलाच्या मध्यात चिखल, वाहणारे पाणी, सरपटणारे प्राणी या पासून रक्षण करणारी ही चिमुकली घरे. वर जायला शिडी. अर्थात अशी घरे शहरात नाहीत.
चढणीचा पहाडी रस्ता, भवताली अगदी... अगदी घनगर्द झाडी. गहूभर पुढे आणि तिळभर मागे असे करीत डोंगर चढायचा. आलो एकदांचे माथ्यावर असे म्हणून निःश्वास टाकावा तर पुढे अधिक उंच डोंगर दत्त म्हणून पुढे उभा ठाकलेला. उंच उंच कडे एकापुढे एक उभे. दुसऱ्या कड्यावर जायचे तर डोंगर उतरून परत चढणे अशक्यच. अनेक ठिकाणी दोन कड्यांमध्ये लोखंडाच्या जाड, रूंद, भक्कम पत्र्यांचे पूल टाकलेले आहेत. सतत पस्तीसं... पंचवीस अंशाच्या कोनातून वळणाऱ्या अरुंद रस्त्यांवरून आणि लोखंडी पत्र्यांच्या पुलावरून मोठ्या बसेस जाणे अशक्यच. अरुणाचलमध्ये सुमो, ट्रॅक्स अशा गाड्या प्रवाशांसाठी असतात. पुलावरून जातांना येणारा कर्कश असा खड्डम आवाज. कालच्या झोपेत ऐकलेल्या आवाजाचे रहस्य झीरोकडे जातांना उलगडले. आणि खोल खोल दरीतून दगड गोट्यांतून फेसाळत वाहणाऱ्या बेधुंद झऱ्यांनाही अनुभवले. ते रस्ते, ते पूल, पर्वतरांगाची डोळे फिरवणारी उंची, हिरवाईच्या लाखो छटा, फुलांचे तऱ्हेतऱ्हेचे रंग, कुठे हिरव्यात जांभुळी नाहीतर उगवतीची लाल रेशमी छटा. तर कुठे पिवळ्यावर हिरवा मुलामा द्यावा अशा रंगाची, दुरूनही जाड आणि घट्ट पोत जाणवावा, अशा पानांची झाडे. उत्तुंग वृक्षांचे गगनभेदी जंगल एका कडेला आणि दुसऱ्याकडे पिवळ्या.. निळ्या.. लालगुलाबी रेशीम फुलांची बेटे. वसती आली की बांबूच्या झोपड्या लागत. पाठीवरचे ओझे सहजपणे वागवीत चढ उतारावरून वावरणाऱ्या स्त्रिया, भाताच्या शेतीचे उतरते तुकडे, दिसू लागले की समजावे गांव आले. सततच्या साडेतीन चार तासांच्या चढणीच्या प्रवासानंतर 'झीरो' आले. थंडी आणखीनच वाढली. अरुणाचलमध्ये प्रत्येक जिल्ह्यात विवेकानंद केन्द्र आहेच. रामकृष्ण मिशनच्या मुलांच्या आणि माँ शारदा मिशनच्या मुलींच्या शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. केन्द्राच्या विशाल हॉलमध्ये बैठक होती.
आसपासच्या वस्त्यांमधून सुमारे साठसत्तर महिला आल्या होत्या. पंजाबी ड्रेस, साडीत फक्त आम्हीच होतो. या भागात मातृसत्ता अजूनही आहे. अनेक एकाकी महिला मुलांसह आल्या होत्या. नागा बंडखोर, उल्फा, बॉर्डर सिक्युरिटीचे जवान यांच्याशी झालेल्या चकमकींमध्ये पुष्कळदा पुरूष मारले जातात. परंतु स्त्रिया कष्ट करून मुलांना वाढवतात. असे चौकशीअंती कळले. परित्यक्तांचा प्रश्न इथे नसावा. कारण वयात आलेली स्त्री घरावर बोझ.. बोजा बनत नाही. शेती, बांबूपासून बनवलेल्या कलात्मक वस्तू, वस्त्र विणणे यांत ती वाकबगार बनते. या प्रदेशात हिंडतांना मला दोन गोष्टींची आठवण आली.
अंबाजोगाईचे ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले होते. त्रिपुरा, नागालँड, अंदमान निकोबार वगैरे भारतीय प्रदेशातील विद्यार्थ्यांसाठी काही जागा राखीव असत. माझ्या मुलांबरोबर ही मुले घरी येत. नवरात्रात एक दिवस आमच्या छोट्याशा गावातील परप्रान्तीय मुलांना अल्पोहारासाठी मी बोलावत असे. तो होतकरू डॉक्टर नागालँडचा होता. आपले भारतीयत्व यावर गप्पा सुरू होत्या. या भावी डॉक्टरने, आपल्या पाणीदार चिमुकल्या डोळ्यात गंभीर भाव आणीत सांगितले होते. "माफ करा. मी प्रथम ख्रिश्चन आणि मग भारतीय आहे. माझे पणजोबांचे आजोबा माणसाची शिकार करून, भाजून मांस खात...ख्रिश्चन मिशनरीजनी स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता, अनेकांनी मरण स्वीकारून आम्हाला माणसांत आणले. हे सारे भलेही धर्मप्रचारासाठी असेल!! पण आज आम्ही त्यांच्यामुळेच माणूस म्हणून जगत आहोत."
...दुसरी आठवण मणिपूरच्या छोबी देवीची. १९९५ च्या आंतरराष्ट्रीय बीजिंग महिला परिषदेत सादर करावयाच्या संगीतिकेची तालिम दिल्लीत सुरू होती. प्रत्येक प्रांतातल्या एकदोन अशा कार्यकर्त्या त्यासाठी दिल्लीत जमल्या होत्या. त्यात मणिपूरची छोनी देवी होती. ती नुपी समाज महिला पाईपीची अध्यक्षा होती. ती इम्फाळहून आली होती. त्यांची समस्या अशीच. नक्षलवादी, समजून अनेक तरूणांना बॉर्डर सिक्युरिटीचे पोलिस घरात येऊन पकडून नेतात. गोळ्या घालून ठार मारतात. त्या विरूद्ध या महिला पाइपी लढत होत्या. मणिपुरी नृत्याची आगळी परंपरा आहे. महाभारतातील अर्जुनाची पत्नी चित्रांगदा मणिपूरची राजकन्या होती...भारतीयत्वाच्या अतिप्राचीन खूणा आजही नैऋत्येत जाणवतात.
भारतीय स्वातंत्र्य साठवर्षाचे होते आहे. त्या सात चिमण्या बहिणींच्या हृदय मनापर्यन्त पोचण्याचे प्रयत्न केवळ शासकीय पातळीवरून करून चालणार आहे?असा प्रश्न मनात येतच राहतो...
□