रुणझुणत्या पाखरा/कुल्लई खोरे : देवभूमी
Appearance
रोहतांगच्या खिंडीतून मन खाली उतरायला तयार नव्हतं. हवामान चांगले असल्याने श्वास घेण्यास त्रास झाला नाही. बाकी सगळे बर्फात खेळण्यात धुंद होते. आमच्या छोट्या इंडिकाने लवकर काढता पाय घेतला. कोठीहून ज्या महिलांकडून फरचे कोट व बूट घेतले, त्यांच्याशी गप्पा मारायच्या होत्या. आईचे नाव होते माधुरी. ती असेल चाळिशी ओलांडलेली आणि तिची मुलगी इंद्रावती. ती बाविशीची. तिचा पती बॉर्डरवर खबरेगिरी करी. अतिरेक्यांच्या हल्ल्यात तो ठार झाला. दोन मुलांना घेऊन इंद्रावती आईच्या आधाराने वेगळे घर करून राहते. माधुरीचा नवरा सफरचंदाच्या बागेत काम करतो.सोलांग व्हॅली हा एक देखणा परिसर. याची उंची दोन हजार चारशे ऐंशी मीटर आहे. येथे गाड्या ठेवण्यासाठी मोकळी जागा आहे. तिथे गाडी थांबवली आणि एका विशाल वृक्षाखाली बांधलेल्या चौथऱ्यावर आम्ही थोडे विसावलो. आम्हाला पाहून दोन कुलूस्त्रिया आमच्याजवळ आल्या. येताना एका मैदानात स्त्री पुरुष पारंपारिक गीतावर नृत्य करीत होते. आम्ही तिथे पोचण्या आधीच कार्यक्रम संपला. मनाला रूखरूख लागली. या महिला आम्हाला गाणी आणि नृत्य शिकवायला तयार झाल्या आणि आम्हीही त्यांच्या सोबत नाचू लागलो. अनुष्का आणि रेवती दोघी भरतनाट्यम् शिकतात. त्यांना पावली (स्टेपिंग) लक्षात ठेवायला सांगितले. कुल्लई भाषेतले गीत गात त्या नृत्य करू लागल्या.
कुल्लूरिये पठवाडी ये, नामा शिमले जाना
जेची संग नही तोलना, जेचिये इलायची दाना
कुलूहून मला शिमल्याला घेऊन जा. मी जणू तुझ्या जीवनातला वेलचीचा दाणा आहे. मला छान पट्टू ...शाल आण. ही शाल सुंदर फुलांनी विणलेली आणि लांब रूंद असते. महिला ती विशिष्ट पद्धतीने पांघरतात. माथ्यावरच्या रूमालाला टिकल्या लावलेल्या असतात. त्या कपाळावर येतील असा रूमाल महिला बांधतात. दागिनेही खूप घालतात. मंगळसूत्राला 'काच' म्हणतात. काळ्या रंगाच्या मण्यांचे १५/२० सर एकत्र गुंफतात. मध्यात रिठ्याच्या बीजाच्या आकाराचे तीन सोन्यांचे मणी असतात. सवाष्णीच्या मृत्यूपर्यंत ती ते गळ्यात घालते.जेची संग नही तोलना, जेचिये इलायची दाना
आम्हाला नृत्य शिकविणाऱ्या महिलांनी त्यांचे पोषाख व दागिने आणले होते. ते घालून आम्ही फोटो काढले.
डोलमा मॅडमा चाल घरपे, झांजकी बेला (सांज की) चाल घरपे ।
डोलमा शोरी शोरे सजधजके निकले, बेटी का बापूनी लागी डरे
झांज की बेला चाल घरपे...
(शोरा म्हणजे छोरा. शोरी म्हणजे छोरी.)
या गीताची चाल पहाडी धुनमध्ये होती. भारतीय संगीतात 'पहाडी' ही स्वतंत्र, अनवट अंगाने गायली जाणारी मधुर रागिणी आहे. नृत्याची लय आणि पावले लोकनृत्याची होती. आम्ही सगळ्याजणी वय विसरून मुक्तपणे नाचलो.डोलमा शोरी शोरे सजधजके निकले, बेटी का बापूनी लागी डरे
झांज की बेला चाल घरपे...
(शोरा म्हणजे छोरा. शोरी म्हणजे छोरी.)
कुलूच्या टोप्या आणि शाली ही त्यांची खासियत. मण्यांची कशिदाकारी केलेल्या सुंदर पर्सेस, लिची, चेरी... ही खरेदी हवीच. कुलू परिसरातील सुमारे तीस हजार महिला या कामातून रोजीरोटी मिळवतात. त्रिशला या विणकर केंद्रातून जाकिटे व शालींची खरेदी केली. मणीकर्णला भेट दिल्याशिवाय कुलू मनाली प्रवासाची सांगता होत नाही. मणिकर्ण कुलूहून ४५ किलोमीटर्स दूर आहे. पार्वती नदीच्या तीरावर मणीकर्ण आहे. एक दिवस जगन्माता पार्वती जलक्रीडा करीत होती. तिच्या कानातला मणी पडला. तो मणी काय साधा सुधा? साक्षात् रत्नमणी. तो तेजाच्या प्रभावाने थेट शेषनाग. जो रत्नांचा स्वामी त्याच्याकडे जाऊन पोचला. शंकररावांनी आपल्या गणांना तो मणी शोधण्याचा आदेश दिला होता. पण त्यांना तो कसा सापडणार? शिवजी चिडले आणि तिसरा डोळा उघडला. मग काय? प्रलय सरू झाला. नागराजांनी घाबरून तो मणी फुत्कार टाकून पृथ्वीवर फेकला. त्या फुत्कारामुळे गरम पाण्याचे झरे मणीकर्णमध्ये वाहू लागले. या गरम पाण्यात न्हाले तर सांधेदुखी, पोटाचे आजार कमी होतात असे म्हणतात. मात्र तांदुळ कापडात गुंडाळून २० मिनिटे पाण्यात ठेवले तर त्याचा भात तयार होतो. पाण्यात डाळभात, पातेल्यात टाकून ठेवतात. झाकण लावून तर दगड ठेवतात. अर्ध्या तासात डाळभात तयार होतो. येथे एक राममंदीर आहे. कुलूचा राजा जगसिंह याने सतराव्या शतकात ते बांधले.
इथून जवळच हडिंबाचे मंदिर आहे. हडिंबा म्हणजे पंडुपुत्रापैकी महाकाय भीमाची प्रेयसी हिडिंबा. वनवासात असताना पांडव हिमालयातही गेले होते. तेथील आदिवासी राजाची कन्या हिडिंबा त्याच्या प्रेमात पडली. तिने भीमाजवळ बलवान् पुत्र मागितला. ही जमात मातृसत्ताक असल्याने ती भीमाबरोबर गेली नाही. तिने भीमाला वचन दिले की त्याला गरज पडेल तेव्हा त्याने पुत्र घेऊन जावा. तो पुत्र म्हणजे घटोत्कच. येथे आईमुलाच्या नावाचे मंदिर आहे. त्याला ढुंगरी मंदिर म्हणतात. जवळच एक गुंफा आहे. तेथे लामांना धर्मप्रचाराचे प्रशिक्षण दिले जाते. मनाली जवळच मनुचे मंदिर आहे. सामाजिक आचरणाचे नियम सांगणारी मनुस्मृती इथे लिहिली. आज मनुस्मृती सर्वसामान्य समाजाला न्याय न देणारी म्हणून आपण ती नाकारतो. पण समाजाच्या शिस्तशीर चलनासाठी नियम बनवले पाहिजेत. ह्या जाणीवेने टाकलेले हे पहिले पाऊल. इतकेच त्याचे ऐतिहासिक महत्त्व आज उरले आहे. वसिष्ठमुनींनी तपाचरण केले ते मंदिर इथे आहे. राजा जनमेजयाने पिता परिक्षितच्या स्मृती प्रित्यर्थ ४००० वर्षांपूर्वी ते बनवले असे मानले जाते. गंधक व सिल्का मिश्रित गरम पाण्याचे झरे तिथे आहेत.
वेदपूर्वकालीन, वेदकालीन काळाचे अवशेष स्मृती रूपाने विखुरले आहेत. भारतात आर्य नैऋत्यकडून आले असे काही प्राग्इतिहास तज्ज्ञांचे मत आहे.
...त्या खोलात फारसे न शिरता या भूमीला देवभूमी म्हटले जाते हे महत्त्वाचे. कारण इथली भूमी अत्यंत सुपीक, पेराल त्याला भरभरून उगवण शक्ती देणारी. अथक श्रम करून डोंगरात मक्याची कणसे, गहू, तांदुळ, तऱ्हेतऱ्हेची कडधान्ये, भाजीपाला पिकवून समृद्ध जीवन जगणाऱ्या कष्टकऱ्यांची भूमी आहे. म्हणून देवभूमी आहे.
□