रुणझुणत्या पाखरा/प्रेम, धर्म, बांधिलकी

विकिस्रोत कडून

 'प्रेम' म्हणजे नेमके काय? या विचारावर गेली हजारो, शेकडोवर्षे कवींनी कथा, कविता, नाटके लिहिली. आपापले विचार... मते मांडली. तरीही ते कधीच शिळे झालेले नाही. प्रेमात पडायला वय, धर्म, जात काहीही आडवे येत नाही. प्रेम सततच्या सहवासामुळे निर्माण होते की 'प्रथम तुज पाहता जीव वेडावला' या प्रकारचे असते? ती ओढ दोन मनांच्यात असते की तनांच्यात? ती दोन भिन्नलिंगी जीवांची संवेदनशील बांधिलकी असते असे आजवर ठामपणे सांगितले जाई. पण गेल्या पंचवीस वर्षात समलिंगी आकर्षणालाही समाज सामावून घेऊ लागला आहे. १९८७ मध्ये तेव्हाच्या पश्चिम जर्मनीत मौलोफला आंतरराष्ट्रीय महिला परिषदेस जाण्याची संधी मिळाली. परिषदेनंतर दोन दिवस ब्रेमनला तिथल्या महिला विभागाची कार्यकर्ता ख्रिस्ता डुरकडे रहाण्याचा योग आला. तिथे 'लेस्बियन' या शब्दाची ओळख झाली. जर्मनीतील शेतकरीण, आठवडे बाजार, संकटग्रस्त स्त्रियांचे दिलासाघर यांना भेट द्यायचे ठरले होते. खिस्टा आणि ऊलाने एका कॉफी हाऊसमध्ये नेले. आणि सांगितले ते एका समलिंगी जोडप्याने सुरू केले आहे. तिथे अशी जोडपी दिसतील. 'डोन्ट गेट ऐक्साइटेड' असेही बजावून सांगितले. एका वेगळ्या प्रेमाची ओळख झाली. अशा व्यक्तींना लेस्बियन म्हणतात.
 मुळात प्रश्न पडतो प्रेम दोन जीवांचे, मनांचे की त्या जीवांनी धारण केलेल्या देहांचे. म्हणूनच प्रेमाच्या आड धर्म, जात येत नाही. पण परंपरेने देहाला मात्र धर्म दिला आहे आणि जातही चिटकवली आहे. आणि मग समस्या... अडचणी सुरू होतात. मंग तो दोन जीवांच्या... मनांच्या बांधिलकीचा मुद्दा रहात नाही! कुठे नि कुणाच्या घरी... पोटी जन्माला यायचे ते जन्मणाऱ्या व्यक्तीच्या हाती कुठे असते? त्यांत जीव... मन हे पिकातलं ढोर.

किती हाकला हाकला
फिरी येतं पिकावर...
 दोन मनाजीवांची ओढ धर्म, जातीला गिमत ...मोजत नाही. मग वर्तमानपत्रांतून बातम्या... 'आंतरजातीय विवाहीत जोडप्याला जाळून टाकले.' 'भिन्न धर्मीय प्रेमी युगुलाची आत्महत्या' वगैरे वगैरे.
 परदेशात तर सत्तरीचा 'तरूण' तिशी पंचविशीच्या पोरीच्या प्रेमात पडून विवाह करतो. आपल्याकडे असे पूर्वी होई. तो 'प्रेमात' पडून नसे तर जबरदस्तीने केलेला जरठकुमारी विवाह असे. अलिकडे मात्र असे क्वचित् होते. पण त्यामागे बापाची लालसा असते. प्रितीची फलश्रुती विवाहात होण्याचा संकेत आहे. पुढच्या पिढीला ... त्यांच्या पोटी जन्मणाऱ्या लेकरांना समाजमान्यता मिळणाच्या दृष्टीने ते सोयीचे असते. हा संकेत काहीजण पाळत नाहीत. विवाहाचा उपचार बाजूला ठेवून बांधिलकी मानून एकत्र राहतात.
 मग पुन्हा प्रश्न. प्रेमात देहाची एकरूपता हवीच का? त्याशिवाय प्रेमाला परिपूर्णता येतच नाही का? अशारितीने प्रेम हे अधिक सकस ...श्रेष्ठ म्हणायचे का?
 मध्यंतरी अगदी जवळचे स्नेही घरी आले. त्यांना कन्येने परधर्मीय मुलाशी लग्न ठरवले. ते दोघे उच्चशिक्षित. दोघांच्या व्यावसायिक पदव्या पूरक. एक ॲनेस्थेटिक मधली उच्च पदवी धारक तर दुसरी व्यक्ती निष्णात शल्य चिकित्सक. लेकीने सांगितले मी लग्न याच्याशीच करणार. तुमचे आशिर्वादही हवेत. ते मिळणार नसतील तर विवाहाचा उपचार करणार नाही. पण बांधिलकी रहाणारच. मायबाप दोघही उच्चशिक्षित. वडिलांची भूमिका, धर्म कोणीच बदलू नये. आणि ही कोंडी भारतीय संविधानाचे रचनाकार ज्ञानतपस्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सोडवली आहे. नोंदणीकृत विवाहात जात धर्म काहीच आडवे येत नाही.
 प्रेम हे दोन जीवांचे... मनांचे असते, ते डोळ्यातून वाचता येते. बांधिलकी या शब्दातच दृढता असते. माया, ममता, करूणा या शब्दांतून वात्सल्य प्रतीत होते. प्रेम त्या वेगळे असते. प्रेमात 'दर्द' ... 'आर्तता' असते. ज्ञानदेवांनाही विठ्ठलाच्या सायुज्यतेची ओढ विराणीतून व्यक्त करावी लागली.
दर्पणी पाहता रूप न दिसे वो आपुले
बाप रखुमादेवीवरे मज ऐसे केले
 श्रीकृष्णा बद्दलची एक कथा सांगितली जाते. विवाहानंतर सत्यभामा रूक्मिीणीला वाटते एकदा बघावे तरी त्या राधेला. तिचेच नाव श्रीकृष्णाशी अजूनही का जोडले जाते? राधेला त्या सन्मानाने बोलावतात. सन्मानपूर्वक वागवतात. निघतांना तिचे पाय धुवून, त्यावर चंदन कुंकुम रेखून, वस्त्र देऊन पाठवायचे. दासीला पाणी आणायला सांगतात. पाणी इतके गरम की पाय बुडवताच पाय पोळतात. पायाला फोड येतात. राधा आनंदाने तृप्त होऊन गोकुळात परतते.
 ...रात्री श्रीकृष्ण घरी येतो. सत्यभामेच्या महालात प्रवेश करतो ते लंगडत. भामा पाय चेपायला जाते तर तळपायावर मोठे फोड आलेले...
 सायुज्यत्व सर्वात्मक आणि शब्दांत न मावणारे असते.