रुणझुणत्या पाखरा/आपणच लिहूया नवी कहाणी!
Appearance
"शरे, वादविवाद स्पर्धेत एकत्र कुटुंब पद्धतीच कशी श्रेष्ठ आहे. वृद्ध आणि लहान मुलांना सुरक्षितता दिलासा देणारी आहे हे विविध दाखले देऊन पटवून देणारी तू. वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धेत सतत जिंकणारी तू. आणि आता. अरूण सत्तरीला टेकलाय. तू पासष्टी पार केलीस. आपल्या काळात 'हम दो हमारे दा' चा नारा नव्हता, त्रिकोणाची रित होती. तू तर दोन मुलानंतरच पूर्ण विरामाची इच्छा व्यक्त केलीस अरूणने मात्र लेकीशिवाय पूर्णत्व नाही हा हट्ट धरला. तो पूर्ण झाला. तुझी धाकटी नीरासुद्धा पस्तिशीची आहे. शैलेश, नवीन गावातच रहातात. पण तरीही तू नि अरूण एवढ्या मोठ्या घरात दोघेच का रहाता?"नीलाने आपल्या मनातली खळखळ शरयुजवळ भडाभडा मोकळी केली. शरयूला ही गोष्ट तशी नवी नव्हती. तिच्या आणि अरूणच्या अनेक मित्र मैत्रिणींना हा प्रश्न सलत असे.
"नीले, चार दिवसांपूर्वी तुझा फोन आला. की तुझ्या मनात खूप... खूप साठलंय. ते मोकळं करायला आलीस ना? मग आधी तू बोलती हो. तुला आवडणारी हळद मिठाची मऊ खिचडी कुकरमध्ये लावते. मधला नवीन माडीवर रहातो. तिला बाजरीच्या तीन भाकरी, वरून तीळ लावलेल्या... आणि वांग्याचं भरित आणायला सांगितलंय, शैलेशचा दवाखाना जवळच आहे. त्याने गेल्यावर्षी घर बांधलय त्याची पत्नी अनिता फिजिओथेरपिस्ट आहे. तिने कालच लोणचं पाठवलंय. आणि ती फ्रुटसॅलड पाठवणारेय. आज आपणं गप्पा मारत जेवू. उद्या माझी स्वयंपाक करणारी आशा येईल. त्या सगळ्यांना उद्या इथेच जेवायला बोलावलय. आणि नीरा, रमाकान्तही येतील. नीरा सिडकोतल्या गृहविज्ञान महाविद्यालयात शिकवते. तर चल व्हरांड्यात बसू. मस्त गप्पा मारत. बराच ताण देऊन तो बाबाही... पाऊस चार दिवसांपासून रोज हजेरी लावतोय. जाई आकंठ झुंबरलीय. तिचा मंद मधुर सुवास घेत गप्पा नक्कीच रंगतील."
शरयू नि नीला पाच सहा वर्षानंतर भेटत होत्या. नीलाने लातूर सारख्या तेव्हाच्या छोट्या गावात मांड मांडलाय. आता मात्र ते वाकडं तिकडं वाढतंय. अर्थात सगळीच शहर वाकडी तिकडी ऑक्टोपस सारखी वाढत असतात. नीला मोहनने ऐसपैस मोठं घर बांधलय. तीनही मुलांना तीन मोठ्या खोल्या. त्या खोल्यात, त्यांच्या मुलांना लागेल म्हणून अजून एक खोली. प्रत्येकीत अत्याधुनिक संडास, न्हाणीघर वगैरे. मुलांच्या खोल्या मजल्यावर. आणि नीला मोहनची खोली, अभ्यासाची खोली, स्वयंपाक घर वगैरे तळमजल्यावर. कसं छान, आदर्श. पण तरीही मनात काय साचलयं...?
"शरे, आपण दोघींनीही एकत्र कुटुंबाचा आग्रह धरला. मी नि मोहनने त्या दृष्टीकोनातून तीस वर्षापूर्वी घर बांधलं. तिघी सुना शिकलेल्या आहेत. धाकटी बारावी झालेली. सचिनचा प्रेमविवाह. ती चांभार समाजातली आहे. देखणी आहे. सुस्वभावी आहे. मधल्या सौरभची पत्नी अस्मिता संस्कृतची अध्यापक. गावातल्या महाविद्यालयात नोकरी करते. ती दशग्रंथी ब्राह्मण घरातून आमच्या सारख्या मराठीने केला गुजराथी भ्रतार अशा घरात आलीय. माझ्या घरात देव नाही. निसर्ग हाच ईश्वर, मानणारी मी. पण तिने हौशीने देवघर मांडले. त्यात देवी. लंगडा बाळकृष्ण यांच्या मूर्ती ठेवल्या. मी विरोध अर्थातच कशाला करू. ती तिची इच्छा. ती घरातली सदस्या. पण एक मात्र सांगितले. मी अंधश्रद्धा निर्मूलनाची पाईक आहे. तू मला पूजा करण्याचा आग्रह करू नकोस. मोठ्या सुधीरने एमआयडीसीत लोखंडाच्या कॉटस्, कपाटे वगैरेचा छोटा कारखाना टाकलाय. त्याची पत्नी वसू बी. एड. आहे. तीही नोकरी करते. पोळ्यांना दोन्ही वेळेला बाई आहेत. मोठी सकाळचा स्वयंपाक भाजी... वरणभात वगैरे पाहते. धाकटी सकाळचा नाष्टा आणि कोरडया चटण्या वगैरे पाहते. मधली संध्याकाळचे पाहते. पहिली पाच सहा वर्षे गाडी कशी डौलात नि रूळावर चालत होती. मग नातवंडांच आगमन. मोठीला एकच मुलगा. मधलीला दोन मुलगे. धाकटीला दोन्ही मुली. मुलं वाढू लागली. त्यांच्या मनात प्रश्नांची बेटं उगवायला लागली. ... "दादी, दादू गुजराथी आहेत. आपलं आडनाव शहा आहे आणि तुझी आई माझी पंजीमा देशपांडे कशी ग?"
"दादी, मंगेशच्या आजी आल्या होत्या ना? त्या काकीला म्हणत होत्या. तुझ्या धाकट्या जावेच्या मुली चित्रासारख्या देखण्या आहेत. पण शेवटी चांभारणीच्या पोरी. लग्न कशी व्हायची. तू आपली वेगळी रहा. पोरं मोठी व्हायच्या आत काय ते ठरवा."
शरू हे माझ्या वाढणाऱ्या नातवंडांचे प्रश्न. घरात कुरबुरींचा पाढा. आपण चाळिसबेचाळिस वर्षापूर्वी 'जातपातके बंधन तोडो' चा नारा देत विवाह केला. अरूणचे 'माळीपण' तुला कधी बोचलं नाही. तुझ्या मुलांना बोचलं नसेल; पण नातवंड?"
"नीलू, घरात देवघर नसलं तरी सकाळी अंघोळ केल्यावर मी समई लावून मुलांना श्लोक म्हणायला शिकवी. अगदी 'सं गच्छध्वं संवदध्वं' सर्व जण एकमेकांची मनं जाणून घेऊ, एका विचाराने राहूया ही वेदातली प्रार्थना ते 'असतो मा सद्गमय... पासून ते मृत्योर्मा अमृत गमय' पर्यन्त ! 'अमृत' चा अर्थ सांगतांना अरूण मुलांना सांगे की असे काम करा जे अनेकांना उपयोगी होईल. सानेगुरूजी, रविन्द्रनाथ टागोर आपल्यात नसले तरी त्यांचे विचार अमर म्हणजेच चिरंतन आहेत ना? म्हणजेच ते मृत नाहीत 'अमृत' आहेत. संध्याकाळी 'शुभंकरोती' होई. तीच सवय नातवंडांनाही दिली. एकदा शैलूचा मोठा विचारत होता 'आजी आपण माळी आहोत का? गरूजी म्हाणाले माळी जात ओबीसीत येते. त्यांना सरकारकडून फी व कपडे पुस्तकांसाठी पैसे मिळतात. आम्ही अर्ज करू?' प्रश्न मला अस्वस्थ करून गेला. शरू सांगू लागली. पण लगेच उत्तर सुचले. "साहिल तुझा बाबा डॉक्टर आहे. आई त्याला मदत करते. तुम्हाला पुस्तके छान कपडे, खेळणी सगळं मिळतं ना? मग कशाला आपण अर्ज करायचा? आणि हे बघ बाळ जन्माला येतं तेव्हा त्याची जात हाता कपाळावर लिहिलेली असते का? बेटा आपण माणूस आहोत. माणसाचे रंग वेगळे असले तरी ती माणसंच असतात ना? आपण प्राणी नाही. हजारो वर्षापूर्वी माणसांनी माणसांच्या उद्योग... व्यवसायावरून जाती तयार केल्या. पण आपण माणसंच. महाराष्ट्रात राहतो म्हणून मराठी. मोहन दादूचे वडील गुजराथ प्रान्तात होते म्हणून गुजराथी, कळले? असे सांगताच त्याला पटले नि पळाला खेळायला" शरयू सांगत होती.
"नीलू तुझ्या मुलांचे व्यवसाय वेगळे. मुलासुनांनाही त्यांची स्वप्नं असतात. घराच्या, दैनंदिन जगण्याच्या त्यांच्या म्हणून कल्पना असतात. कळत नकळत मोठ्यांचं त्यांना दडपण वाटतं. मुलांना सुनांना एकत्र बोलाव. नाहीतरी प्रत्येकाच्या वेगळ्या मोठ्या खोल्या आहेत. मुलांची स्टडी-अभ्यासाची खोली गच्चीत तुम्हीच बांधून द्या, मुलांना प्रेमाने वेगळे राहू द्या. उद्या ती घरंही बांधतील." शरू सांगू लागली.
"अग शरीराने एकत्र राहणं म्हणजे 'संयुक्त कुटुंब' नाही ग. मनात संवाद.. आपुलकी हवी. एका गावात राहून एकमेकांना मदत करणे, वेळप्रसंगी आपण त्यांच्याकडे राहायला जाऊन नातवंडांना सांभाळणे, सून मुलांना त्यांच्या कामात सहकार्य करणे, एखादा वार ठरवून एकत्र जेवणे, एकत्र प्रवासाला जाणे... यातून मनं नेहमीच जवळ राहातात गं. आस्था वाढते. एकविसाव्या शतकातल्या 'संयुक्त कुटुंबाची' नवी कहाणी आपण नाही तर कोणी लिहायची?"
□