रुणझुणत्या पाखरा/आमच्यातलं माणूसपण कमी होतेय का?

विकिस्रोत कडून
 १०/१२ वर्षांपूर्वीचा प्रसंग. व्याख्यानाच्या निमित्ताने गोव्याला जाण्याचा योग आला. गोव्यातील छोट्या गावांतून फिरतांना लक्षात आले एखाद्या विशाल झाडाच्या तळाशी मारूतीचे चिमुकले अर्धगोलाकार देऊळ असावे तशी अनेक अर्धगोलाकृती देवळे दिसली. संध्याकाळी तिथे कोणीतरी दिवा चेतवून जाई. माझी उत्सुकता उंचावली. जवळ जाऊन पाहिले तर तिथे शेंदूर फासलेल्या दगडा ऐवजी चिमुकला क्रूस होता...
 दुर्गेच्या मंदिरातला पुजारी समाजवादी विचारांचा युवा कार्यकर्ता. आम्ही त्याला भेटायला गेलो तेंव्हा जांभळ्या रंगाचा रेशमी कद नेसून तो देवळात पूजा करायला निघाला होता. "बसा, नारळाच्या दुधातले पोहे चाखून पहा. आय म्हाका फ्रेंड आयला गो.. पाहुणचार करां. मी येतोच. ताई बसा " असे म्हणत तो गेलाही. माझी उत्सुकता पार शिगेला पोचली.
 "... ताई, गेल्या कित्येक पिढ्यांपासून आमच्या घराण्यातल्या मोठ्या मुलाकडे या दुर्गेचे पुजारीपण आमच्या घरात चालत आले आहे. या आवारात रहायला साधेसे घर आहे. ते तुम्ही पहातच आहात. मी मोठा मुलगा म्हणून मजकडे आलेला हा व्यवसाय आणि जबाबदारी आहे. ती मी इमाने इतबारे करतोय. मी देवीकडे काय मागत नाय. देवी माझ्याकडे काय मागत नाय. माजा बापुस दहावी झाला होता. मी बी.ए. झालो. कॉलेजमध्ये असतांनाच युवक क्रान्ती दलात गेलो. मला तिथं कोनी सांगितलं नाय की तुजा व्यवसाय खोटा आहे. देवीची पूजा करू नाय. एकच सांगितलं जात पात मानू नका. जन्माला येतांना धर्माचा शिक्का कपाळावर ठोकलेला नसतो. आपण फक्त माणूस असतो. बाई पुरूष सगळे सारखे.. आन् मला ते पटलं."
 "ताई आज इथंच या दुपारच्याला. जेवायला नक्की या." असे म्हणत त्याने समोरची केळीची पानं उचलली. नारळाच्या दुधात भिजवलेले पोहे, लिंबाचं लोणचं. नारळाच्या वड्या. असा रूचकर नाश्ता. तोही केळीच्या ताज्या पानावर. दुर्गेचे दर्शन झाले होतेच. तिच्यातली तृप्त शांती आत अंगभर पसरली होती. शांतादुर्गेच्या मंदिरातून बाहेर पडतांना मला जोगाईचे, योगेश्वरीचे मंदिर आठवले. माझे नातलग योगेश्वरीच्या निमित्ताने माझ्याकडे नेहमी येत. त्यांना मंदिरात नेणे, माझ्या लाडक्या विद्यार्थ्याला, अरूणला माझ्या पाहुण्यांना यथासांग दर्शन घडव हे सांगणे होईच. मी मात्र आत जाण्याऐवजी बाहेरच्या विशाल, उंचचउंच, लाकडी खांबावर लाकडी फळ्यांनी तक्तपोशी जोडलेल्या भक्कमपणे बांधलेल्या मंडपातल्या दगडी ओवरीवर बसे.
 'शैला, अग ये ना आत देवीला काय फक्त काही मागायलाच येतो का आम्ही? किती सुरेख हेमाडपंथी बांधणी आहे या मंदिराची. चपटे दगडी चिरे एकमेंकावर विशिष्ट कोनात बसवले आहेत. ते वर चढतांना आपोआप निमुळते होत वर जातात. तिथे सुंदर कलशाकार घुमट बांधलाय ये. बघ तरी.' माझी मावशी आवर्जून म्हणाली. मी आत गेले. देवीचा लांब रूंद तांदळा होता. माथ्यावर चांदीचा इथून तिथवर मोगरीच्या कळ्यांचा आकाराचा चांदीचा गजरा माळलेला होता. कपाळावर चांदीची रेखीव चन्द्रकोर होती. तांदळा असला की ती देवी खूप आदिम... शेकडो वर्षांपूर्वीची आहे असा संकेत असतो. मी हात जोडले. त्या कोंदटलेल्या गाभाऱ्यात - गर्भगृहात क्षणभर श्वास घुसमटले. बाहेरची हवाच यायला जागा नाही. मग असे होणारच. माझ्या नास्तिक मनाला आपण काही गैर केलेय असे मात्र क्षणभरही जाणवले नाही. एकदा अशीच मी गेले असता दोन तीन मुस्लिम स्त्रिया पलिकडच्या दुकानात बुरखे ठेवून आत जातांना दिसल्या पुन्हा मनात उत्सुकता. मग प्रश्न विचारणे आलेच.
 "भाभी, अरूणभैय्या हमारे वॉर्डमेसेही चुनके आये है, उनकी बहोत मदद होती है. हम हमेशा आते है. यहाँ आते तो अम्माको देवी माँ को नमस्कार करके जाते है.." तिचे उत्तर.
 .. दुपार होऊन गेलेली. मला दुर्गेच्या सुरेश पुजाऱ्याचे निमंत्रण आठवले. आम्ही तिकडे गेलो. वाटेत ताशा वाजंत्रीच्या तालावर नाचत येणारा, ख्रिस्ती गोंओकर मंडळीचा स्त्री पुरुषांचा जत्था दिसला. सुरेश सांगत होता दरवर्षी ही मंडळी एक दिवस फुलांचा झेला... शेला घेऊन दुर्गादेवीला अर्पण करण्यासाठी वाजत गाजत येतात. एका नाचणाऱ्या मध्यमवयीन पुरंध्रीला मी विचारलेच.
 'ताई आमी मुळची याच मातीतून जन्मलेली आणि याच मातीत मिसळून जाणारी माणसे. शेकडों वर्षांखालील काही पोर्तुगीज.. फ्रेंचांनी इथे तळ ठोकला. राज्य केले. लोकांना किरिस्ताव करण्यासाठी विहिरीत पाव टाकला, त्याचं पाणी जो पी तो झाला किरिस्ताव. त्यांच्या पुढच्या पिढ्यांतली माणसं आमी पन किरिस्ताव. पन ही दुर्गामायच आमची आई. माज्या आज्या पंजापासून आमी किरिस्ताव गाववाले हिला शेला चढीवतो...
 माझ्या सासूजी सांगायच्या. ममदापून पाटोद्यात मुस्लिमांचे डोले बसवण्यात, ते तयार करण्यात, त्या समोर धुंद होऊन नाचण्यात हिंदूंचा सहजपणे सहभाग असायचा. तर होळी धुळवडीत मुस्लिम सामिल व्हायचे. रझाकारांचा बिमोड झाला तेंव्हा काही संतापलेले हिंदू आमच्या गावात लपलेल्या मुस्लिमांना मारायला धावून आले. पाटोद्यातल्या सर्व हिंदुंनी त्यांना अडवले. आणि ताठपणे सांगितले "आमच्या गावची माणसं आमची आहेत ही. आम्ही त्यांना हात लावू देणार नाही. आधी आम्हाला हात लावा... हिंमत असेल तर.' असे ठणकावून सांगितले. त्या काळात हे असे मराठवाड्यात जागोजागी घडत होते. असे जुनी माणसे सांगतात. मराठवाड्यात स्वातंत्र्य थोडे उशीरा मिळाले. निजामाच्या दडपणाखाली त्यावेळचे पाच जिल्हे असल्याने हा भाग सर्वार्थाने मागासलेलाच होता.
 आज आम्ही आझाद होऊन साठ वर्षे होताहेत. क्षणाक्षणाला आमची वैज्ञानिक, शैक्षणिक, कृषीसंबंधीत झेप उंचावतेय. सामाजिक जाणीवा मात्र बोथटताहेत. धर्मजातीच्या अंध अहंगंडातून दंगे, धोपे, शिरकाण घेत होत आहे. हे असे का? आमचे 'माणूसपण' कमी होतेय का?