रुणझुणत्या पाखरा/जखती झाडांच्या साक्षी ऐकतांना (२८-२९ जानेवारी १९९५)
Appearance
व्यक्त होणाऱ्या व्यथा वेदनांची गाथा सुजाणपणे ऐकून, त्यांना न्याय व लढण्याचे बळ देण्यासाठी पंच म्हणून, विविध देशातील मान्यवर कृतीशील व्यक्तीं 'हाजीर' होत्या. सामाजिक न्यायाची बांधिलकी ज्यांच्या कृतीतून सतत जाणवली ते भारताच्या उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश श्री. कृष्णा अय्यर, स्त्रियांच्याच नव्हे तर सामान्यांच्या प्रश्नांवर स्पष्ट भूमिका घेणाऱ्या झुंजार वकील ॲड. इंदिरा जयसिंग, दिल्लीचे प्रा. आशिष नंदी, या भारतीयांसोबत फिलिपिनच्या सुप्रसिद्ध ग्रॅब्रियेला स्त्री संघटनेच्या रचनाकार निलिआ सॅचो, चीनच्या महिला संघटनेच्या प्रमुख बाई विलान होत्या. व्यवसायाने इंजिनिअर पण आफ्रिकन नॅशनल कॉन्फरन्सच्या महिला विभागाच्या संघटक थेंबोसिली माजीला, आणि इंडोनेशियातील न्यू साऊथ वॅर्लस विद्यापीठात काम करणाऱ्या डॉ. ऐलिन पिहावे आणि अरबस्तानातील स्त्रियांचे प्रश्न मांडणाऱ्या, ट्यूनिस विद्यापीठातील खादिजा शेरिफ याही ज्यूरी म्हणून रंगमंचावर होत्या.
लोकसाक्षीचा कार्यक्रम ५ सत्रांतून झाला. स्त्री ही निसर्गाचे रूप आहे. निर्मितीसाठी लागणारा काळ... वेदना... भावबंध यांचा प्रत्यक्ष अनुभव ती घेत असते. म्हणूनच स्त्री आई असते. अग्नीत जणू ती उभी. म्हणून ती अग्निघटिका. ते पचवून ती सर्वांना फुलवणारी चैतन्यमयी 'आई' होते. आपण नदीला लोकमाता म्हणतो म्हणून ती जलघटिका... पाण वेळ माती, दशदिशा यांतील सुगंध जगभर पसरवणारी लोकमातात नदी असते. जगभर सुगंध पसरवणारी वाऱ्याची लहर असते. सुख... दुःख, चांगले वाईट, जे जे कवेत येईल ते ते उरात सामावून घेणारी, सारे भलेबुरे हिरव्या अंकुरातून जन्माला घालणारी 'भूमाता' असते. दहा दिशातून येणाऱ्या अनुभवांना पचवून ठामपणे उभी राहणारी साक्षात् 'ज्ञानदा' असते. तिच्या या पंचरूपाचे प्रतीक जणू ही पाच सत्रे होती. प्रत्येक सत्रापूर्वी २ ते ४ मिनिटांच्या संगीतबद्ध चित्रफितींच्या दृश्यसाक्षी झाल्या. भोपाळ गॅसपीडित, पुरांत वाहणारी गांवे, दुष्काळाने दुभंगलेली घरे... निसर्गाचे सौंदर्य, त्याचा सुखद आस्वाद घेणाऱ्या जमाती... अशा हजारो संदर्भ देणाऱ्या चलचित्रांचे ते 'कॉकटेल', पाहणाऱ्याला अस्वस्थ करणारे होते.
पहिल्या सत्राचे नाव होते अग्निघटिका. त्यांत हुंडाबळी, परित्यक्ता बुद्धिमान स्त्रिया, चेटकिणी ठरवून मारण्याची प्रथा, देवदासी प्रथा, मुली जन्मत:च मारण्याची प्रथा आणि पर्यटन व्यवसायातून वाढलेला वेशाव्यवसाय या प्रश्नांवर, त्या प्रश्नांना प्रत्यक्ष तोंड देणाऱ्या... त्या आगीत होरपळणाऱ्या, महिलांनी साक्षी दिल्या.
तामिळनाडूच्या उसलामपट्टी जिल्ह्यात आजही, मुलगी जन्मताच तिला मारून टाकण्याची रित आहे. या भागातील काही जमातीतील आयांना फक्त एकच मुलगी जिवंत ठेवता येते. तिने विरोध केला तर नवरा बायकोला टाकून देतो. मुलगा व्हावा म्हणून नाजूक अंगाला सुई टोचण्याचा विधी बायकांना करवून घ्यावा लागतो. या भयानक परंपरेला इंडियाटुडेने १९८६ साली वाचा फोडली. परंतु कल्लार समाजातील ही विषारी प्रथा केवळ शासकीय प्रयत्नांनी कशी जाईल. त्यासाठी शासनाने गेल्या १३ वर्षांत काही केलेय का? काय केले? आणि परिणाम?
स्त्रियांना चेटकी ठरवून मारण्याची प्रथा युरोपातही होती. या प्रथेचा धागा 'स्त्री' च्या बुद्धिमत्तेशी जोडलेला आहे. झारखंडात अशा अनेक स्त्रिया मारल्या गेल्या. अजूनही कधीतरी असे घडू शकते. समाजाला नको असलेल्या अडचणीच्या वाटणाऱ्या स्त्रियांना 'चेटकीण' ठरविले जाते. प्रश्न विचारणाऱ्या वा प्रश्न निर्माण करणाऱ्या स्त्रिया समाजाला कुठे परवडतात? हल्यानी ही महिला चेटकीण नव्हती. नवऱ्याचाही तिच्यावर विश्वास होता. पण शेजाऱ्यांपासून ते गावातल्या ओझापर्यंत सर्वांनी तिला चेटकीण ठरवले. महिला संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे ती वाचली.
बेकारीचे संकट स्त्रियांवर अधिक. मग नोकरीकरता पर्यटन व्यवसायात शिरकाव झाला पण तिथे वेगळेच वाढून ठेवलेले होते आणि आहे. आशियायी देशातील थोडेफार शिकलेल्या मुलींना 'मदतनीस' म्हणून अरबदेशात पाठवले जाते. भरपूर पगार आणि परदेशगमनाचे आकर्षण. मुली या जाळ्यांत सहजपणे अडकतात. तिथे गेल्यावर एकाकी होतात. ना भाषा येत ना जनसंपर्क, त्यामुळे लैंगिक शोषण होते. विकसनशील आशियायी देशातील वाढते दारिद्रय, वाढती लोकसंख्या, कुटुंबात व समाजात स्त्रियांना नसलेली किंमत, यांचा फायदा उठवला जातो. दहा बारा वर्षांच्या कोवळ्या कळ्या लैंगिक व्यवसायात गुंतवून अकाली खुरडल्या जातात. या प्रश्नावर अनेक संघटना आशियायी देशांत काम करीत आहेत. नेपाळच्या संध्या श्रेष्ठ व मीना या दोघींनी हे प्रश्न मांडले.
देवदासींच्या व्यथा मीना सेशूने दुर्गाच्या रूपाने मांडल्या. सांगली परिसरात मीना, उज्ज्वला या स्त्रियांच्या प्रश्नांवर अत्यंत धडाडीने काम करतात.
"ताई, तुमच्यापाशी बुद्धी आहे. डोकं आहे ते इकून तुमी चार पैशे कमावता. आमाला शिक्षन मिळालं न्हाई. हयेच शिक्षन मिळालं. माज्यापाशी... सुंदर...डौलदार शरीर हाये. पुरुषांना आवडतं तसं वागण्याची कला आहे. ते इकून मी चार पैशे कमावते. मग तुमच्या माझ्यात फरक का?" दुर्गाने समोर टाकलेला प्रश्न. सर्वांना अस्वस्थ करणारा अंगावरचे संस्कृती... रित... शक्ती वगैरेचे रेशमी, बांधीव कपडे झरकन फेडणारा प्रश्न. अगीनवेळ असे कपडे सोलणारी आणि ऐकणाऱ्यालाही होरपळवणारी. माझ्या मनात मात्र प्रश्नांचे शोभादर्शक गरगरत होते.
शरीर विकण्यातून शरीराच्या आरोग्यावर, नैसर्गिक सुदृढतेवर होणाऱ्या परिणामांचे काय? दुर्गाला श्रम करून चार पैसे सन्मानाने मिळाले असते. तर तिने हा 'व्यवसाय' स्वीकारला असता का? की शॉर्टकट मनीला महत्त्व? इंग्रजी कवितेतील गवळण म्हणायची की, 'माय फेस इज माय फॉरच्यून ... माझं भाग्य म्हणजे माझा चेहरा. तो सुंदर तर माझं नशीब सुंदर!" हे खरंच का? या व्यवसायातील स्त्रियांत आरोग्याविषयी जागरूकता निर्माण केली पाहिजे. त्यांना समाजात मोकळेपणाने जगता आले पाहिजे. परंतु हाही एक व्यवसाय आहे. त्यांत आरोग्य सांभाळून पारंगतता मिळवायला काय हरकत आहे? तो व्यवसाय का निवडू नये?" अशी भूमिका विशाल मानवतेच्या दृष्टीतून योग्य होईल? एका परिषदेत एका कार्यकर्तीने अशी भूमिका मांडली. खेड्यातील महिला तिथे होत्या. त्यातील एकीने प्रश्न विचारला, "ताई, तुमची लेक ह्यो वेवसाय मला करायचा असं म्हनली तर तुमी काय सांगाल तिला?"
डॉ. बाबासाहेब आंबडेकरांनी बहिष्कृत भारतात नोंदवले आहे की, 'जेथे स्त्रीला पोटाची खळगी भरण्यासाठी स्वत:चे शरीर... शील विकावे लागते, तिथे लोकशाही निर्माणच होऊ शकत नाही.
दुसऱ्या सत्राचे नांव होते 'पाण-वेळ' नर्मदा विस्थापितांचे दुःख बुडीबेन आणि लताने मांडले. मोठ्या शहरातील झोपडपट्ट्यात राहणाऱ्या स्त्रियांचे प्रश्न आणि फुटपाथवर राहणाऱ्या कुटुंबातील स्त्रियांच्या भयानक जिण्याचे वास्तव चित्र मांडले कौसल्या आणि नसरीनने. तसेच चन्द्रा आणि रूथ मनोरमा या कर्नाटकातल्या झुंजार महिला कार्यकर्तीने, परदेशी नोकरीच्या लोभाने स्थलांतर करणाऱ्या कुटुंबातील स्त्रियांचे प्रश्न मांडले. जकार्ताच्या सुप्रहातीन आणि ताती कृष्णवती यांनी सांगितले की, स्थलांतराचा लोभ दाखवून तरूण मुलींना, स्त्रियांना फसवणाऱ्या अनेक एजन्सीज आशियाई देशात वाढत आहेत. आपल्या घराला पैसा पुरविण्यासाठी देहाचे हाल सोसणारी स्त्री स्वत:च्या शब्दात दुःख सांगू लागते तेव्हा क्षणभर काळाचा प्रवाहसुद्धा गोठून जातो. ती मैत्रिण सांगत होती. ज्या काम करणाऱ्या स्त्रिया निर्घृण प्रकारांना विरोध करतात. अशांची नांवे काळ्या यादीत जमा होतात. काम करणाऱ्या स्त्रियांची काळीयादी हाँगकाँगमध्ये तयार होते पण वाईट वागवणाऱ्या, लैंगिक शोषण करणाऱ्या, कामासाठी मारहाण करणाऱ्या मालकांची काळीयादी का केली जात नाही?
अलिकडे सर्वच देशांत विविध प्रकारच्या अणुसाधनांचा, शस्त्रांचा वापर होतो. त्यासाठी सतत प्रयोग सुरू असतात. अतिरिक्त रसायनांचा वापर सुरू आहे. या साऱ्यामुळे 'बंजरभूमी'चे वेगवेगळे प्रकार वाढू लागले आहेत. केरळमध्ये दक्षिण भागात युरेनियम खूप सापडते. १९५७ साली 'युनो'ने या भागात लोकवस्ती करू नये असे बजावले होते. पण... वाढती लोकसंख्या वगैरे. या सर्वांचा परिणाम तेथील लोकांच्या जननशक्तीवर झाला आहे. चल्लम्माला ९ मुले झाली पण एकही सर्वसामान्य (नॉर्मल) नव्हते. आज एकही जिवंत नाही. अमेरिकेने केलेल्या संशोधनातून लक्षात येत आहे की याचा वाईट परिणाम पुरूषांच्या स्पर्मवर... वीर्यावर झाला आहे.
भोपाळची शोकान्तिका तर आजही अस्वस्थ करते. गॅस घटनेत मृत्यू पावलेल्या २००० विधवा, एकाकी महिलांना शिलाईकाम पुरवणारे केंद्र शासनाने अशात बंद केले. रझियांबीचा सांगताना गळा दाटतो पण डोळ्यातून संघर्षाच्या ठिणग्या चेतत असतात. या कहाण्या होत्या, 'कातरवाऱ्याची वेळ' या सत्रातल्या.
चौथे सत्र 'भूमी'चे. 'सीतावेळ' म्हणायचे का? झारखंडातल्या आदिवासी स्त्रियांचे प्रश्न म्हणजे 'विकासा'च्या कृतीतून निर्माण झालेल्या समस्या. बिहार म्हणजे दारिद्रयाचे भयानक दर्शन. बिहारमधून अनेक कार्यकर्त्या आल्या होत्या. विकासाची मांडणी करताना त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांचा विचार केलाच गेला नाही. त्यातून भरडले गेले दोन गट. स्त्रिया आणि मूले त्यांचे माणूस म्हणून स्वतंत्र अस्तित्व लक्षात घेतले नाही. ऑस्ट्रेलियातील मूळ रहिवाशांचे प्रश्न मांडले गेले.
दुपारी विविध क्षेत्रात झोकून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले. या सत्राचे नाव होते 'ज्ञानवेळ' गडवालच्या चिपको आंदोलनाच्या वंदना शिवांनी स्त्री आणि पर्यावरण यांतील घट्ट अनुबंध उकलून दाखवला. हाँगकाँगच्या मायाम बिलेवानी आशियातील स्थलांतरित महिलांचे प्रश्न मांडले. मलेशियाच्या इव्लेलिन हॉगने, मोठमोठी धरणे बांधल्यामुळे आदिवासी, परिसरातील लोक, जंगल, प्राणी यांच्या जीवनावर होणाऱ्या आघातांचे चित्र रेखाटले. शेवटी हे सारे ऐकताना काष्ठवत् झालेल्या ज्यूरींच्या प्रतिक्रिया. कृष्णा अय्यरांनी बजावले, "पुरुषी आश्वासनांवर कणभरही विश्वास ठेवू नका. संघटित व्हा (हुंडाबंदी कायदा मृत झाला आहे. पण हुंडा मात्र जिवंत आहे. हुंडाबळींची संख्या वाढते आहे.) स्त्रियांनो, समाजाला हलवा... थोड्या अतिरेकी झालात तरी चालेल. ही प्रचंड धरणे कोणासाठी बांधायची? कंत्राटदारांसाठी? न्याय म्हणजे काय? अन्यायाला कायदेशीर करणे म्हणजे न्याय? आम्ही पुरुषांनी आता स्त्रियांच्यासाठी उभे राहिले पाहिजे. त्यांच्यासाठी... त्यांच्या प्रश्नासाठी बरोबरीने लढले पाहिजे त्या पुढ्यात रहातील आम्ही त्यांना अनुसरु. संपूर्ण आशियाने एकत्र येऊन आपल्या विकासाची विनाशकारी दिशा बदलण्यासाठी संघर्ष दिला पाहिजे.
ट्यूनिशियाच्या खालिदा शेरीफ आपल्या कणखर आवाजात बजावत होत्या. विकास केवळ आर्थिक बाबींशी निगडित नसतो. विकासाच्या कल्पनेतून आम्हा स्त्रियांना आणि आमच्या भावी पिढीला... मुलांना वगळले आहे. मुलांच्या विकासाच्या कल्पनेचे स्वप्न पाहणारे... त्यासाठी कष्टणारे 'बाप' आज हरवले आहेत. आपण 'विकासा'च्या कल्पनेला माणूस केंद्री बनवूया. इंदिरा जयसिंगाकडून भोपाळ गॅस प्रकरणातील निवेदन ऐकण्याची इच्छा सर्वांनी प्रदर्शित केली. त्या त्यावर बोलल्या.
जनसुनवाईचा कार्यक्रम संपला होता. आता प्रत्येकींच्या देहात 'मनसुनवाई' सुरू होती.
२७,२८,२९ जानेवारी १९९५ विमोचना... आशिया महिला मानवी हक्क अभियान. बंगलोर. आयुष्यभर चेतवीत राहणारे दिवस, मैत्रिणी, संस्था आणि आठवणी...
आज १३ वर्षांनी मनात येतेय. आज ती चेतना, प्रेरणा देणारी माध्यमे, घनतमात क्षितीजावर तळपणारी शुक्राची चांदणी जपण्यासाठी किमान महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील स्वयंसेवी संघटना एकत्र येणार ना? हा निश्चय निर्धार करूया.
□