रुणझुणत्या पाखरा/पापड कुर्डयांचे दिवस आणि नवी दिशा

विकिस्रोत कडून



 "खारोड्या, पापड्या कांही आहे का घरात? या तापलेल्या दुपारी भाजलेले शेंगदाणे, गूळ नि खारोड्या हव्याच!" मराठवाडा नाहीतर खानदेश वा कोल्हापूरचे मुंबईत स्थायिक झालेले पुरूष पावसाने जोरदार हजेरी दिली की हा प्रश्न विचारणारच!
 ग्रामीण भागातून शहरात गेलेल्या कुटुंबातील पुरूषांना हा खास मेवा हवाच असतो. भलेही मग ते मुंबई पुण्यात स्थायिक झालेले असोत. राजस्थानी घरातून जेवणाच्या शेवटी पापड हवाच. त्याशिवाय जेवण झालंय, पोट भरलंय असं वाटतच नाही. तर कोकणात ज्यांच्या पूर्वजांची नाळ पुरली होती ते देशावर येऊन राहिल्याला शंभरवर्षे झाली तरी जेवणाच्या शेवटी सुपारी एवढा का होईना दही, दूधभात खाल्ल्याशिवाय मन तृप्त होत नाही.
 फेब्रुवारीच्या मध्यातच ऊन चढू लागते. उन्हाळ्याची चाहूल लागते. लहानपणी पपांचे पक्षकार मोराण्याचे जिभाऊ, भलामोठा कोहळा घरात आणून देत. नि सांगत 'बाई, आबईनं कोहळा दिलाय' पापडासाठी. कोहळ्याच्या पाण्यात केलेले पापाड निके म्हणजे पवित्र असतात. वैधव्य आलेल्या, पूर्वी लाल लुगड्यात असणाऱ्या बायांनी लाटले तरी सोवळ्यातल्या स्वयंपाकासाठी ते चालंत. मरेस्तो कष्टाशिवाय त्यांच्या जगण्यात होते काय? ज्या शेतकऱ्याच्या शेतात कोहळ्याचा वेल असे तो आवर्जुन कोहळा ओळखीच्या घरांतून देई. कोहळा विकत नसत. आमच्या घरात सोवळ्याओवळ्याची भानगड नव्हती. उलट कोहळा आला की पापडापेक्षा आग्र्याचा पारदर्शी पेठा तयार करण्यासाठी मी नि पपा आईजवळ भुणभुण लावीत असू.
 त्या काळात शेजारपाजारच्या मैतरणी दुपारच्या चहाला एकीच्या घरी जमत. नि मग हातावरच्या शेवया कधी आणि कुणाकडे करायला जमायचे याची आखणी होई. घाणेकरकाकूंना प्रचंड डिमांड असे. गहू ओलवून त्याचे मऊसुत पीठ काढून वळलेल्या, मुठीच्या अंदाजाने त्यात मीठ घालून शेवयांचे पीठ भिजवण्यात त्यांच्याइतके तज्ज्ञ कोणीच नसे. नऊलाच काकू हजर होत पीठ भिजवून, पांढरीशुभ्र फडकी तयार ठेवून एका फडक्यात ती भिजवलेली कणिक गुंडाळून डब्यात ठेवून काकू जाई. पुन्हा बारा वाजता नऊवारीतली, रूंद हाडाबांध्याची, कोसांच्या वेण्यांचे रेखीव चक्कर बांधून, त्यावर गजरा माळून काकू हजर.
 तो कृती-व्यवहाराच देखणा, पहाण्या सारखा. आधी जाड दोरा काढून त्याची वेटोळी केळीच्या पानावर ठेवून त्यावर शुभ्र ओला मलमली कपडा घालायचा. थोड्या वेळाने ते दोरे लांबवत जायचे. आम्हा पोरासोरांचे काम काठ्या स्वच्छ धुवून आणायच्या आणि उंच डबे एकावर एक ठेवून त्यावर आडव्या ठेवायच्या. खाली धुतलेली पातळ साडी. त्यावर त्या सुतासारख्या बारिक शेवया बायका टाकत. त्या लांबत जात. अचानक घड्याळाकडे पहात काकू फर्मान सोडत. बाई चहा करा लवकर. स्वयंपाक उरकून सहा वाजता नाटकाची तालीम सुरू होणारेय. पन्नाशी ओलांडलेली ही बाई धुळ्याच्या मनोरंजन संस्थेच्या 'देवाच्या काठीला आवाज नाही' या नाटकात ठसक्यात काम करी.
 उन्हाळ्याची चाहूल लागताच घराघरातून पापड लाटणाऱ्यांचे अड्डे जमत. एकीकडे हात सरासरा चालत तर दुसरीकडे उखाळ्यापाखाळ्यांसह गप्पांना ऊत येई. गटातली प्रत्येकजण हजर राहीच; न गेलो तर आजचा नारळ आपल्याच नावाने फुटणार या भितीने!
 मी या घरी आले. पापडांची रित बदलली. तरी अड्डे नि गप्पा त्याच. मूग उडदाचे पीठ एकत्र करून, हिंग, मिरी घालून पीठ भिजवायचे. पापड पोळपाट भरून मोठ्ठा आणि पातळ लाटायचा. लाटणे रेघाळ असते. प्रत्येक महिला आपले लाटणे घेऊन येई.
 कुर्डया पापड्यांची धांदलही याच काळातली. गहू सुद्धा ठराविक प्रतीचे हवेत. मग ते चार दिवस पाण्यात घालून भिजवा. पाचव्या दिवशी गहू दळून चिक काढा. दुसऱ्या दिवशी तो शिजवायचा. नि सोऱ्याने स्वच्छ धुतलेल्या लुगड्यावर गोल आकाराच्या सुरेख कुर्डया घालायच्या.
 ज्वारी, तांदुळ, गव्हाच्या पापड्या मिश्र डाळींचे सांडगे, पोह्याचे, तांदुळाचे, नागलीचे पापड, राजस्थानी पापंडं चवींचे अनेक प्रकार. खायला चटकदार. पण करण्यासाठी लागणारे श्रम, मनाची एकाग्रता याचे मोजमाप कोणी काढलेय का? अन्न निर्मितीसाठी स्त्रीला घ्यावे लागणारे कष्ट, श्रम हे नेहमीच अदृष्य राहिले आहेत. त्यांची दखलही आजवर घेतली गेली नाही. तिला 'अन्नपूर्णा' म्हटले की संपले.
 पुणे तेथे काय उणे? असा वाक्प्रचार आहे. तो खराच आहे. मी फर्ग्युसनच्या होस्टेलला असतांना एक मावशी सायकलवरून गरम साबुदाणा वडा, बटाटेवडा विकायला येई. हा हा म्हणता डबा संपे. तीन रूपयाला मोठे दोन वडे नि चटणी मिळे. त्याच पुण्यात गेल्या ३०/३५ वर्षापासून पापड कुर्डयांची पॅकबंद पाकिटे मिळू लागली. पण अजून छोट्या गावात हे लोण पोचलेले नाही. उलट औरंगाबाद, अकोला सारख्या शहरातल्या काही स्वयंसेवी संस्था गरजू महिलांना कच्चा माल पुरवून हे उन्हाळी पदार्थ करवून घेतात. स्वतःचे नाव देऊन पॅकींग करून त्यांना मार्केट मिळवून देतात. महिलांना चांगला रोजगार मिळतो. आमच्या सावित्री महिला उद्योगाने हे काम सुरू केले. मी कुठेही गेले तरी दोन मोठ्या पिशव्यात पापड, शेवया, बोटवे, खारोड्या, मसाला यांची पाकिटे असत. माझी मुंबईची मैत्रिण त्यावरून मला छेडत असे.
 'काय ग शेवटी बायकांना मसाले पापडांत बुडवून हातावर दोन टिकल्या देणार तू?'
 'बाई ग बिन शिकलेल्या बाईला परंपरेने, आई सासूकडून मिळालेले कौशल्य तिला दोन दिडक्या नाही, स्वत:ची कमाई देते. ती नवऱ्याच्या नजरेपासून बिन मिळवती बेकार बाई या टोमण्यापासून झाकली रहाते. पण तिला आम्ही जरूर सांगतो. बाई ग पोरीला मात्र शिक्षण दे. काहीतरी नवे कौशल्य शिकव.'
 स्त्रीला आर्थिक सबलते सोबतच स्वतःचे निर्णय घेण्याचे धाडसही यायला हवे. अलिकडे काही बचत गट पापड मसाल्याच्या उद्योगातून महिलांना आर्थिक सबळते बरोबरच निर्भयही बनवतात. काळ बदलला तरी जिभेची चटक तीच रहाते. शेवटी पिझ्झाला खमंग थालीपीठाची चव कशी येणार?