रुणझुणत्या पाखरा/हे रचनात्मक वादळ जागवायला हव

विकिस्रोत कडून



 सर्वांनी आचारावयाच्या, जीवनाला सकारात्मक आकार देणाऱ्या कृतींचा आलेख म्हणजे संस्कार. असे म्हणणे फारसे वावगे होऊ नये. 'सं' या शब्दातच समूहभावना आहे. समूहाने करावयाच्या कृती सर्वांना सुखाच्या, भाग्याच्या, प्रकाशाच्या दिशेने नेणाऱ्या असाव्यात. समाज ही संकल्पना समूहात्मक आहे. समूहात राहणाऱ्यांनी असे वागावे की एकाच्या कृतीचा इतरांना उपद्रव होऊ नये. संघटनात शक्ती असते. ती नेहमी संतुलित रहावी. संपूर्ण समाजात शांती आणि समृद्धी नांदावी अशा तऱ्हेचे व्यक्तीने करावयाचे आचरण आणि अशा आचराणाचे धडे देणे म्हणजे संस्कार. असे संस्कार करणारी तीन महत्त्वाची माध्यमे म्हणजे आई, शिक्षक आणि कुटुंब. व्यक्तीची पहिली शिक्षिका आईच असते. भवतालच्या निसर्गाची ओळख करून देणारी, काऊ, चिऊ, उंदिरमामा आदींच्या गोष्टीतून समाजात कसे वागावे, कसे वावरावे याची ओळख करून देणारी असते आई. कुटुंबातील व्यक्ती म्हणजे आजी, आजोबा, काक, काकू, वडील, आत्या, भावंडे वगैरे. त्यांची एकमेकांशी वागण्याची पद्धत यांतून घरातील मुलांवर समाजात कसे वागावे, कुटुंगात कसे वागावे याबाबत अलिखित नियमांचे संस्कार होत असतात. शाळेतील शिक्षकाची भूमिका अत्यन्त महत्त्वाची असते. माणूस आणि निसर्ग यांच्यातील नेमके नाते कोणते, मुलांसमोर उलगडून ठेवण्याचे, कोणत्याही घटनेमागील कारण शोधण्यासाठी विद्यार्थ्याला प्रवृत्त करण्याचे कार्य शिक्षकाने करायचे असते. त्यातून मुलांवर विज्ञाननिष्ठा आणि तर्कशुद्ध विचारसरणीचे संस्कार होतात.
 पूर्वी संस्कार केवळ धर्माशी... धार्मिक आचारांशी निगडित असत. धर्माने सांगितलेल्या मूल्यांशी त्या त्या धर्माचे गट धर्मातील मुलांवर, धर्मगुरूंद्वारे धार्मिक आचार, विचारांचे संस्कार करण्यावरच भर देत. परंतु गेल्या शंभर दिडशे वर्षात धर्माची, त्याद्वारे केल्या जाणाऱ्या संस्काराची चिकित्सा करण्याची परंपरा निर्माण झाली. तशी ती पूर्वी पासूनच आहे. चार्वाकाचे लोकायतिक विचार, जैन-बौद्ध धर्म विचार धर्म चिकित्सेतूनच निर्माण झाले.
 १९४७ साली भारतीय गणराज्याची घोषणा करतांना आपण सर्वधर्मसमभाव, विज्ञान निष्ठा, आर्थिक-सामाजिक-स्त्रीपुरूष समतेचा विचार स्वीकारला. परंतु जी मूल्ये आम्ही घटनेद्वारे अंगिकारली त्यांचे संस्कार करण्याची क्षमता शिक्षक, पालक, माता या महत्वाच्या माध्यमांत निर्माण करण्याची बांधिलकी मात्र स्वीकारली नाही.
 काळाच्या ओघात संपर्काची अनेक माध्यमे निर्माण झाली. वृत्तपत्रे, नियतकालिके, आकाशवाणी, दूरदर्शन यासारख्या माध्यमांचा मुलांवर संस्कार करण्यात लक्षणीय प्रभाव वाढला. किंबहुना आई, कुटुंब आणि शिक्षक या तीनही माध्यमांवर दूरदर्शनसारख्या दृकश्राव्य माध्यमाने कुरघोडी केली. ह्या नवलनयनोत्सवी माध्यमाने भारतीयांना पुरते भारून टाकले आहे. लहानशा खेड्यात जा, शहरातील झोपडपट्टीत जा तिथेही टी.व्ही. च्या ॲन्टेनाची शिंगे घराघरावर खोचलेली दिसतील. घरात धड नहाणी नसेल, संडास तर नसेलच. घरातील स्त्रिया मात्र गाऊन घालून हातात डबा घेऊन झाडाझुडपांचा आडोसा शोधतांना दिसतील.
 शामची आई फारशी शिकलेली नव्हती. परंतु माणूस म्हणून जगतांना पाळावयाची धर्मापलिकडची मूल्ये तिला परंपरेने माहित होती. त्या काळात अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या जातीची म्हातारी रस्त्यात पडली. शामच्या आईने शामला तिला आधार देऊन उठविण्यास सांगितले. तिच्या भुकेल्या पोटात दोन घास प्रेमाने घातले. आणि शामला मोळी नीट बांधून देण्यास सांगितले. धर्माच्या धाकामुळे कदाचित् शामला आंघोळही करावी लागली असेल. परंतु माणुसकीचा संस्कार धर्मातील नियमांना बाजूला ठेवून केला गेला. देशप्रेम, अहिंसा, सत्य, दया, क्षमा, शान्ती, नम्रता यांसारखी मूल्ये गैरसोयीची ठरतात. काळानुरूप संस्काराचे रूप बदलतेच अशी भलावण केली जाते. 'राखील तो चाखील' 'सहकारात थोडा स्वाहाकार होणारच' अशा नव्या म्हणीही तोंडावर फेकल्या जातात. पण तो स्वार्थाला वैध रूप देण्याचा कांगावा असतो. काही मूल्ये, जी धार्मिक रूढी, पंरपरा यांवर बेतलेली असतात ती मात्र काळानुरूप बदलणे आवश्यकच असते. एकेकाळी 'जात', 'धर्म' यांचे कठोर पालन हे अपरिवर्तनीय मूल्य होते. त्यानुरूप संस्कार केले जात. आज ते बदलत आहेत. संस्कार हे अगदी बालपणापासून होतात. त्यामुळे ते अगदी हाडीमाशी भिनतात. ते खरवडून काढणे अवघड जाते. मी महाविद्यालयात होते तेव्हाची गोष्ट. वक्तृत्व स्पर्धेसाठी वर्गातील दोन विद्यार्थी व एका सहअध्यापका सोबत आम्ही डबे घेऊन परगावी गेलो. तिथे तीन वर्षांनी आमच्या पुढे असलेला प्राध्यापक म्हणून महाविद्यालयात रूजू झालेला एक कॉलेजमेट भेटला. त्याने आग्रहाने घरी नेले. पत्नीस शिरापुरीचे जेवण बनवायला लावले. पण वर्गातील मित्राने उपवास असल्याचा बहाणा करून जेवण घेतले नाही. कारण प्राध्यापक मित्र दलित होता. खरे तर बुधवारी सहसा उपवास नसतो.
 मनाला, बुद्धीला पटले तरी प्रत्यक्ष कृती करतांना मन कचरते. संस्कार पाटीवरच्या अक्षरांसारखे पुसता येत नाहीत. परतीच्या प्रवासात स्वतःचा डबा खातांना त्याने कबूली दिली.
 संस्कार देणारे पहिले माध्यम आई. तीच अडाणी, अंधश्रद्ध, वस्तूंचा हव्यासांना विशेष प्राधान्य देणारी असेल तर मुलावर कोणते संस्कार होणार?
 आज भारतातील सुमारे ५२ टक्के स्त्रिया निरक्षर आहेत. ४८ टक्के साक्षरांपैकी ८० टक्के स्त्रियांना सही येते वा थोडेफार लिहिता वाचता येते. दारिद्रय रेषेखालील लोकसंख्येत ७० टक्के स्त्रिया आहेत. अजूनही ३२ टक्के लोकांना दोन वेळचे जेवण मिळत नाही. संस्काराची बात मध्यमवर्गीयांतच छेडली जाते. आर्थिक दृष्ट्या निम्नवर्गात दोन वेळची भाकरी शोधण्यात घरदार भोवंडत असते. प्रत्येक घरातल्या मुलांना संस्काराचे लेणे मिळायलाच हवे हे खरे. पण ती जबाबदारी सरकार इतकीच प्रत्येक सुजाण नागरिकांची नाही?
 सत्य-पावित्र्य-सौंदर्य यांबद्दल आस्था, वडीलधाऱ्यांबद्दल आदर, संकटग्रस्तांना मदत करण्याची वृत्ती... सामाजिक न्याय, पारदर्शी आर्थिक व्यवहार, स्त्री पुरूष समभाव, वैज्ञानिक दृष्टिकोन, परस्परांचा आदर ठेवून वैचारिक विरोध दृढपणे मांडण्याची स्पष्टता, कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याचे धाडस, व्यक्तिगत स्वार्थापेक्षा देशप्रेम मोठे, एक नाही तर हजारो संस्कार. हे संस्कार देणारी आई, कुटुंब, शिक्षक ही माध्यमे सुजाण, सकस केली पाहिजेत. त्या साठी इतर माध्यमांचा वापर अत्यन्त कुशलतेने, मनस्वीपणे आणि कठोरपणे केला पाहिजे. आज टी. व्ही. वरची शेकडो चॅनेलस् तसेच चित्रपट अत्यन्त विकृत असे संस्कार समाजावर, अल्पवयीन मुलांवर करीत असतात. आमचे सेन्सॉर बोर्ड अत्यन्त विकलांग आणि विकृत मनोवृत्तीचे तर नाही ना अशी शंका येते. या सर्वांवर मात करायची तर मुलांमध्ये वाचनाची आवड वाढवायला हवी. चित्र काढणे... गोष्टी ऐकणे... पुस्तके वाचणे, गाणी गाणे, सहलीला नेणे यांची 'झुंबड' निर्माण करून सुसंस्कारांची पेरणी फवारणी करण्याचे आव्हान शिक्षक पालक पेलू शकतात. पालक शिक्षक यांच्यातील संवाद, अनुबंध अधिक प्रभावी व्हायला हवा. तसेच घर फक्त आई वा बाईचे किंवा दोन वेळच्या जेवणासाठीचे, ही संकल्पना बदलायला हवी. घरातील कामात पुरूषांचाही सहयोग हवा. कुटुंबाचा सांगाडा न राहता ते ज्येष्ठांना लहानांना आधार नि संस्कार देणारे 'घर' व्हावे. ज्येष्ठ नागरिकांनी या कामात विशेष रस घ्यायला हवा. हे रचनात्मक वादळ जागवले तरच आजचे २१ वे शतक प्रकाशमय शांतीचे जाईल.