रामरक्षा

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग
aum symbol
वेद
ऋग्वेद · यजुर्वेद
सामवेद · अथर्ववेद
वेद-विभाग
संहिता · ब्राह्मणे
आरण्यके  · उपनिषदे
उपनिषदे
ऐतरेय  · बृहदारण्यक
ईश  · तैत्तरिय · छांदोग्य
केन  · मुंडक
मांडुक्य  ·प्रश्न
श्वेतश्वतार  ·नारायण
वेदांग
शिक्षा · चंड
व्याकरण · निरुक्त
ज्योतिष · कल्प
इतिहास
रामायण · महाभारत
इतर ग्रंथ
स्मृती · पुराणे
भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई
पंचतंत्र · तंत्र
स्तोत्रे
मनाचे श्लोक · रामचरितमानस
शिक्षापत्री · वचनामृत

ध्यान

ॐ श्रीगणेशाय नमः ।
अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य ।
बुधकौशिकऋषिः ।
श्रीसीतारामचन्द्रो देवता ।
अनुष्टुप् छ्न्दः । सीता शक्तिः ।
श्रीमद्‍हनुमान् कीलकम् । श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः ।

अथ ध्यानम् ।
ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थम्‌ ।
पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम् ।
वामाङ्कारूढसीता-मुखकमल-मिलल्लोचनं नीरदाभम्‌ ।
नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचन्द्रम् ॥
इति ध्यानम् ।

ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत व ज्याने धनुष्य-बाण (हातात) धारण केली आहेत, जो बद्धपद्मासनात बसला आहे, ज्याने पिवळे वस्त्र, (पीतांबर) परिधान केले आहे, ज्याचे डोळे ताज्या कमळाच्या पाकळीप्रमाणे सुंदर आहेत व जो प्रसन्न असून डाव्या मांडीवर बसलेल्या सीतेच्या मुखकमलाकडे ज्याची दृष्टी लागलेली आहे, पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे (श्यामवर्णाची) ज्याची कांती आहे, जो अनेक प्रकारच्या अलंकारांनी सुशोभित आहे, जो मोठे जटामंडळ धारण करणारा आहे, त्या प्रभू श्रीरामचंद्राचे (प्रारंभी) ध्यान करावे.

स्तोत्र

चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् । एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥१॥
ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम् । जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितम् ॥२॥
सासीतूणधनुर्बाणं पाणिं नक्तं चरान्तकम् । स्वलीलया जगत्‌त्रातुम आविर्भूतमजं विभुम् ॥३॥

श्रीरघुनाथाचे (रामचंद्राचे) चरित्र शंभर कोटी श्लोकाइतके विस्तृत आहे व त्यातील एकेक अक्षर सुद्धा मनुष्याच्या मोठमोठ्या पापांचा नाश करणारे असे आहे.॥१॥

नीलकमलाप्रमाणे ज्याचा श्यामवर्ण आहे व कमलासारखे दीर्घ आणि प्रफुल्ल असे ज्याचे डोळे आहेत, ज्याच्या सन्निध सीता व लक्ष्मण आहे, जटांच्या मुकुटामुळे जो सुशोभित दिसत आहे, ज्याच्या एका हाती खड्ग, पाठीला बाणांचा भाता व दुसऱ्या हाती धनुष्यबाण आहे व जो राक्षसांचा नाश करणारा आहे; खरोखर जन्मरहित व व्यापक असूनही जो परमेश्वर जगाचे रक्षण करण्याकरिता सहज लीलेने रामरूपाने अवतीर्ण झालेला आहे, अशा प्रभूचे ध्यान करून पातकांचा नाश करणाऱ्या व सर्व कामना पुरविणाऱ्या या रामरक्षास्तोत्राचे सुज्ञ माणसाने पठण करावे. ॥२,३॥

रामरक्षां पठेत् प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम् । शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥४॥
कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती । घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥५॥
जिव्हां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः । स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः ॥६॥

सुविख्यात रघुराजाच्या वंशांत जन्मलेला राम माझ्या मस्तकाचे रक्षण करो. दशरथराजाचा पुत्र राम माझ्या कपाळाचे रक्षण करो. ॥४॥

कौसल्याराणीचा पुत्र राम माझ्या दोन्ही डोळ्यांचे रक्षण करो. विश्वामित्र ऋषींचा आवडता शिष्य असा राम माझ्या दोन्ही कानांचे रक्षण करो. (विश्वामित्राच्या) यज्ञाचे रक्षण करणारा राम माझ्या नाकाचे रक्षण करो. बंधू लक्ष्मणावर प्रेम करणारा राम माझ्या मुखाचे रक्षण करो. ॥५॥

सर्व विद्या धारण करणारा राम माझ्या जिभेचे रक्षण करो. भरताने ज्याला वंदन केले आहे असा राम माझ्या कंठाचे रक्षण करो. दिव्य अशी शस्त्रे ज्याच्यापाशी आहेत असा राम माझ्या दोन्ही खांद्यांचे रक्षण करो. शिवधनुष्याचा (सीतास्वयंवरप्रसंगी) ज्याने भंग केला आहे असा राम माझ्या दोन्ही बाहूंचे रक्षण करो. ॥६॥

करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित् । मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥७॥
सुग्रीवेशः कटि: पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः । ऊरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत् ॥८॥
जानुनी सेतुकृत् पातु जंघे दशमुखान्तकः । पादौ बिभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ॥९॥

सीतेचा पती राम माझ्या हातांचे रक्षण करो. परशुरामाला जिंकणारा राम माझ्या हृदयाचे रक्षण करो. खर नावाच्या राक्षसाचा नाश करणारा राम माझ्या शरीराच्या मध्य भागाचे रक्षण करो. जांबुवानाला आश्रय देणारा राम माझ्या नाभीचे - बेंबीचे रक्षण करो. ||७॥

सुग्रीवाचा स्वामी राम माझ्या कमरेचे रक्षण करो. हनुमंताचा प्रभू राम माझ्या दोन्ही जांघांचे रक्षण करो. राक्षसकुलाचा विनाश करणारा रघुकुलश्रेष्ठ राम माझ्या दोन्ही मांड्यांचे रक्षण करो. ॥८॥

समुद्रावर सेतू बांधणारा राम माझ्या दोन्ही गुडघ्यांचे रक्षण करो. दशमुखी रावणाचा नाश करणारा राम माझ्या दोन्ही पायांच्या पोटऱ्यांचे रक्षण करो. बिभीषणाला राजलक्ष्मी देणारा राम माझ्या दोन्ही पावलांचे रक्षण करो आणि सर्वांना आनंद देणारा श्रीराम प्रभू माझ्या सर्व शरीराचे रक्षण करो. ॥९॥

एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् । स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ॥१०॥
पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः । न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥११॥
रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् । नरो न लिप्यते पापैर् भुक्तिं मुक्तिं च विन्दति ॥१२॥

फ़लश्रुति - याप्रमाणे रामाच्या सामर्थ्याने युक्त असलेल्या या रामरक्षेचे जो पुण्यवान् मनुष्य पठण करील, तो दीर्घायुषी, सुखी, पुत्रवान्, सर्व कार्यात विजय मिळविणारा आणि विनयसंपन्न असा होईल. ॥१०॥

या रामनामांनी रक्षण केलेल्या मनुष्याला पाताळ, भूमी किंवा आकाशात संचार करणारे कपटी लोक डोळ्यांनी पाहूही शकत नाहीत. ॥११॥

राम, रामभद्र किंवा रामचंद्र अशा नावांनी श्रीरामाचे स्मरण करणारा माणूस केव्हाही पापांनी लिप्त होत नाही व त्याला अनेक सुखोपभाग मिळून शेवटी मोक्ष मिळतो. ॥१२॥

जगज्जेत्रैकमन्त्रेण रामनामाभिरक्षितम् । यः कण्ठे धारयेत् तस्य करस्थाः सर्वसिद्धयः ॥१३॥
वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् । अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमण्ङ्लम् ॥१४॥
आदिष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षांमिमां हरः । तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः ॥१५॥
आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् । अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् स नः प्रभुः ॥१६॥

सर्व जगाला जिंकणारा मुख्य मंत्र जो रामनाम, त्या मंत्राने अभिरक्षित - मंतरलेला पदार्थ (ताईत इत्यादी) जो आपल्या गळ्यात धारण करतो, त्याला सर्व सिद्धी सहज हस्तगत होतात. ||13||

इंद्राच्या वज्राचा पिंजरा जसा अत्यंत संरक्षक, तसे हे रामकवच - रामरक्षास्तोत्र असल्यामुळे यालाही वज्रपंजर असे नाव आहे. याचे जो स्मरण करतो, त्याची आज्ञा अबाधित, सर्वत्र मानली जाते आणि त्याला सर्व ठिकाणी जय मिळून नेहमी त्याचे कल्याण होते. ||14||

अशी ही रामरक्षा भगवान् शंकरांनी बुधकौशिक ऋषींना स्वप्नात जशी सांगितली, तशीच ती सकाळी जागे झाल्यावर त्यांनी लिहून ठेविली. ||15||

रामस्तुति - श्रीराम हा कल्पवृक्षांचा जणू सुंदर बगीचाच आहे. सर्व आपत्ती घालविणारा व त्रैलोक्यात मनोहर असा तो श्रीमान् राम आमचा प्रभू आहे. ||16||

तरुणौ रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ । पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ ॥१७॥
फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रम्हचारिणौ । पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥१८॥
शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् । रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघूत्तमौ ॥१९॥
आत्तसज्यधनुषाविषुस्पृशा वक्षयाशुगनिषङ्गसङ्गिनौ । रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम् ॥२०॥

वयाने तरुण, रूपवान्, सुकुमार, अतिशय बलवान्, कमलपत्राप्रमाणे विस्तृत नेत्र असलेले, वल्कले आणि कृष्णाजिन हीच वस्त्रांप्रमाणे परिधान करणारे, कंदमूळफळे भक्षण करणारे, सर्व धनुर्धरांमध्ये श्रेष्ठ, राक्षसांच्या कुलाचा संहार करणारे व रघुकुलातील प्रमुख असे दशरथाचे पुत्र, राम-लक्ष्मण हे दोघे बंधू आमचे रक्षण करोत. ॥१७-१८-१९॥

सज्ज धनुष्ये धारण करणारे बाणांना हस्तस्पर्श करणारे, व अक्षय बाणांचे भाते बाळगणारे राम-लक्ष्मण माझ्या रक्षणाकरिता मार्गामध्ये नेहमी पुढे चालोत. ॥२०॥

संनद्धः कवची खड्गी चापबाणोधरो युवा । गच्छ्न् मनोरथोऽस्माकं रामः पातु सलक्ष्मणः ॥२१॥
रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली । काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघूत्तमः ॥२२॥
वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः | जानकीवल्लभः श्रीमानप्रमेयपराक्रमः ॥२३॥
इत्येतानि जपेन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः । अश्वमेधाधिकं पुण्यं संप्राप्नोति न संशयः ॥२४॥

निरंतर सज्ज असलेला, अंगात कवच (चिलखत) घातलेला, हाती खड्ग आणि धनुष्यबाण धारण करणारा, आमचा मूर्तिमंत मनोरथच की काय असा, लक्ष्मणासह गमन करणारा तरुण राम आमचे रक्षण करो. ॥२१॥

आनंद देणारा, दशरथाचा पुत्र, शूर लक्ष्मण ज्याचा सेवक आहे असा, बलवान्, ककुत्स्थकुलोत्पन्न, महापुरुष, पूर्णब्रह्म, कौसल्यातनय, रघूत्तम, वेदांतशास्त्राने ज्ञेय, यज्ञांचा स्वामी, पुराणपुरुषोत्तम, जानकीचा प्रिय, वैभव संपन्न, अतुल पराक्रमी, अशा या नावांचा श्राद्धपूर्वक नेहमी जप करणाऱ्या माझ्या भक्ताला अश्वमेध यज्ञाच्या पुण्याहून अधिक पुण्य लाभते, यात संशय नाही. (असे शंकराचे अभिवचन आहे). ॥२२-२३-२४॥।

रामं दूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससम् । स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर् न ते संसारिणो नरः ॥२५॥
रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं ।
काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम् ।
राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथनयं श्यामलं शान्तमूर्तिं ।
वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम् ॥२६॥

दूर्वेच्या पानाप्रमाणे श्यामवर्णाचा, कमलनेत्र आणि पीतांबर परिधान करणाऱ्या अशा रामाची, या दिव्य नावांनी जी मनुष्ये स्तुती करितात, ती जन्ममरणाच्या संसारातून सुटतात. ||२५||

लक्ष्मणाचा ज्येष्ठ भ्राता, रघुकुलश्रेष्ठ, सीतेचा पती सुंदर, ककुत्स्थकुलोत्पन्न, दयासागर, सद्गुणांचा निधी ब्राह्मण ज्याला प्रिय आहेत असा, धार्मिक, राजेंद्र, सत्यप्रतिज्ञ दशरथपुत्र, सावळ्या वर्णाचा, शांतमूर्ति, लोकांना आनंद देणारा, रघुकुलाला तिलकाप्रमाणे शोभणारा आणि रावणाचा शत्रू जो राघव श्रीराम, त्याला मी वंदन करतो. ||२६||

रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे । रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ॥२७॥

श्रीराम राम रघुनन्दन राम राम । श्रीराम राम भरताग्रज राम राम ।
श्रीराम राम रणकर्कश राम राम । श्रीराम राम शरणं भव राम राम ॥२८॥

श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि । श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि । श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि । श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥२९॥

राम, रामभद्र, रामचंद्र, वेधस्, रघुनाथ, नाथ, अशी ज्याची नावे आहेत त्या सीतापतीला माझा नमस्कार असो. ||२७||

हे रघुकुलनंदन श्रीरामा, हे भरताच्या ज्येष्ठ बंधू श्रीरामा, हे रणांगणांत कठोरपणा करणाऱ्या श्रीरामा, रामा, तू आमचा रक्षणकर्ता हो ! ||२८||

मी श्रीरामचंद्राच्या चरणांचे मनाने स्मरण करतो. मी श्रीरामचंद्राच्या चरणांचे वाणीने स्तवन करतो. मी श्रीरामचंद्राच्या चरणांचे मस्तकाने नमन करतो. मी श्रीरामचंद्राच्या चरणी शरण आलो आहे. ||२९||

माता रामो मत्पिता रामचन्द्रः । स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः ।
सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यं जाने नैव जाने न जाने ॥३०॥
दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा । पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम् ॥३१॥
लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम् । कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये ||३२॥

माझी माता व माझा पिता रामचंद्र आहे. माझा स्वामी व माझा मित्र रामचंद्र आहे. फ़ार काय, माझे सर्वस्व हा दयाळू रामचंद्र आहे. दुसऱ्या कोणाला मी जाणत नाही; मुळीच जाणत नाही; अगदी जाणत नाही. ||३०||

ज्याच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आहे आणि डाव्या बाजूला जनकतनया सीतादेवी आहे व ज्याच्या पुढे मारुती उभा आहे, त्या रघुनंदनाला मी वंदन करतो. ||३१||

लोकांना आनंद देणारा, रणांगणांत धैर्य धरणारा, कमलाप्रमाणे नेत्र असलेला, रघुवंशाचा अधिपती व दयेची मूर्ती असा जो करुणासागर श्रीरामचंद्र त्याला मी शरण आलो आहे. ||३२||

मनोजवं मारुततुल्यवेगं । जितेद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं ।
वातात्मजं वानरयूथमुख्यं । श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥३३॥
कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् ॥३४॥
आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम् । लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ॥३५॥
भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदाम् । तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम् ॥३६॥

मारुतिस्तुति - मनाप्रमाणे वेगाने गमन करणारा, वाऱ्याप्रमाणे वेगवान् आपली इंद्रिये जिंकून स्वाधीन ठेवणारा, बुद्धिमंतांत श्रेष्ठ आणि वानरसमुदायाचा मुख्य अशा वायुपुत्र श्रीरामदूत हनुमंताला मी शरण आलो आहे. ||३३||

वाल्मीकिवंदन - कवितेच्या फांदीवर बसून, "राम राम" अशा गोड गोड अक्षरांचे मधुर गुंजन करणाऱ्या वाल्मीकिरूपी कोकिळाला मी वंदन करतो. ||३४||

रामवंदन - आपत्तींचा नाश करणारा, सर्व संपत्ती देणारा, व लोकांना आनंद देणारा, असा जो श्रीराम त्याला मी पुनः पुनः नमस्कार करतो. ||३५||

राम, राम, अशी रामनामाची गर्जना ही संसाराची बीजे भर्जन करणारी (भाजून टाकणारी), सुखसंपत्तीचे अर्जन (प्राप्ती) करणारी, आणि यमाच्या दूतांचे तर्जन करणारी (दूतांना भीती दाखवणारी) अशी आहे. ||३६||

रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे । रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः ।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम् । रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥३७॥
रामरामेति रामेति रमे रामे मनोरमे । सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ॥३८॥
इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं संपूर्णम् ।

राजश्रेष्ठ 'राम' नेहमी विजय पावतो. त्या रमापती (सीतापती) 'रामास' मी भजतो. 'रामाने' राक्षसांची सेना मारली, त्या 'रामाला' माझा नमस्कार असो. मला 'रामाहून' दुसरा कोणी श्रेष्ठ वाटत नाही. मी 'रामाचा' दास आहे. माझ्या चित्ताचा लय नेहमी 'रामाच्या ठायी' होवो. हे 'रामा', माझा तू उद्धार कर ! ||३७||

शिव पार्वतीला सांगतात - हे सुवदने, राम, राम, राम, राम, अशा नामोच्चाराने मी मनाला आनंद देणाऱ्या श्रीरामाच्या ठायी रममाण होतो. श्रीरामाचे नाव हे (विष्णूच्या) सहस्रनामाशी बरोबरी करणारे आहे. ||३८||

याप्रमाणे बुधकौशिक ऋषींनी रचिलेले श्रीरामरक्षास्तोत्र समाप्त झाले.

बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.