माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो.../दुसऱ्या गणराज्याचा अर्थात, बळिराज्याचा ओनामा

विकिस्रोत कडून


दुसऱ्या गणराज्याचा अर्थात, बळिराज्याचा ओनामा

 माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो,
 भाषणाची सुरुवात मी 'माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो' ने करतो आहे आणि माझं भाषण संपायच्या आधी मी तुम्हाला 'भारताच्या दुसऱ्या गणराज्याच्या पहिल्या नागरिकांनो' म्हणून हाक घालणार आहे.
 या मेळाव्याच्या समोरापाचे भाषण करायला मी उभा राहिलो आहे. तरी वर्ध्याकडून येणाऱ्या रस्त्याने अजूनही मायबहिणी डोक्यावर गाठोडी आणि शेतकरी भाऊ हातात पिशव्या घेऊन मोठ्या संख्येने येतच आहेत. सगळं मैदान भरून गेलं आहे. या सर्व भावाबहिणींना किती लांबून यावं लागलं असेल, गाडीत काय काय अडचणींना तोंड द्यावं लागलं असेल, वर्ध्यात उतरलं म्हणजे जवळच सभा असेल अशी कल्पना करत आलेल्या या भावाबहिणींना वर्ध्यापासून इथं आठ किलोमीटरवर चालत यायला किती कष्ट पडले असतील आणि तरीही निदान शेवटचं भाषणतरी ऐकायला मिळावं म्हणून ही माणसं ओझी सांभाळत लगाबगा येत आहेत हे सगळे विचार मनात येऊन मन भरून येत आहे. आज हा समोरचा समुदाय बघून मला धन्य वाटत आहे.
 दोनदा अपशकून?
 सहा डिसेंबरला अयोध्येत आक्रित घडलं. सात डिसेंबरपासून आजपर्यंत मी अगदी बेचैन होतो. शेतकऱ्यांचं एक संघटन तयार व्हावे, त्यांच्या घामाला दाम मिळावा म्हणून मी आणि माझे सहकारी गेली दहाबारा वर्षे वणवण फिरलो. नाही नाही ती वाईटसाईट माणसं यशस्वी होताना दिसतात आणि आम्ही मुंबईला जमायचं ठरवलं, त्यावेळी अयोध्येमध्ये ते प्रकरण घडलं आणि मुंबईमध्ये आम्हाला जमता येईनासं झालं. काय घडलं आमच्या हातून की आम्हाला अशी शिक्षा व्हावी? पुन्हा हिम्मत बांधली, नऊ डिसेंबरच्या ऐवजी सव्वीस जानेवारीला कार्यक्रम ठरवला. जेव्हा हा कार्यक्रम ठरला तेव्हा माझ्या कार्यकर्त्या भावांनी मला प्रश्न विचारला, "साहेब, पुन्हा काही गडबड व्हायची नाही ना?" मी म्हटलं, "आता कशी गडबड होईल? झालं ते अयोध्याबियोध्या; संपलं."
 पण पुन्हा फसलो मी आणि सहा जानेवारीला पुन्हा मुंबईमध्ये दंगल घडली. ती दंगल काही हिंदूची नाही की मुसलमानांची नाही. मुंबईमध्ये दंगल कुणी घडवून आणली? सगळ्या वर्तमानपत्रांनी आता स्पष्टच लिहिले आहे, "तिथले गुंड, तिथेल पुढारी आणि जागेचे दलाल यांनी ही दंगल घडवून आणली." पण, परिणाम आमच्यावर झाला. दंगलीने कुणाला काय मिळालं असेल ते असो, पण, त्या प्रकरणाची धग आम्हाला लागली आणि शेतकरी संघटनेने आखलेला कार्यक्रम दुसऱ्यांदा पुढे ढकलावा लागला.
 शेतकरी संघटना जिवंत प्रवाह
  मला अशी भीती वाटली होती की तिसऱ्यावेळी लोकांना जमा म्हणून सांगितलं तर लोक 'लांडगा आला रे आला' गोष्टीतल्याप्रमाणे कदाचित जमायचे नाहीत. कोणी सांगावं, याही वेळा कार्यक्रम पुढे ढकलला गेला तर? पण आज ज्या गतीनं हे विस्तीर्ण मैदान तुम्ही भरून टाकलं त्यामुळे गेल्या दोन महिन्यांतल्या माझ्या सगळ्या चिंता निघून गेल्या. ही शेतकरी संघटनेची गाडी म्हणजे काही इंडियातील कारखान्यात तयार झालेली गाडी नाही. किल्ली कितीही फिरवली तरी चालू होत नाही. आमची गाडी सेल्फ स्टार्टरची आहे. किल्ली फिरवली की लगेच चालू होते. नको असेल तेव्हा बंद करून ठेवता येते, पुन्हा हवी तेव्हा चालू करण्यात काहीच अडचण नाही.
 नऊ डिसेंबरचा मुंबईचा कार्यक्रम रद्द झाला, सव्वीस जानेवारीचाही मुंबईचा कार्यक्रम रद्द झाला. मला असं वाटत होतं, की हे आमचा कार्यक्रम रद्द झाला ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे.
 आज इथं सेवाग्रामला आल्यावर माझ्या असं लक्षात आलं की, "अरे नाही, घडली ती आपल्या भाग्याची गोष्ट घडली आहे."
 मुंबईचा अपशकून भाग्याचा
 आपण मुंबईला कशा करता जाणार होतो? मुंबईला जाणार होतो आम्ही चांगल्याच कामाकरिता. गव्हाची आयात थांबवावी म्हणून जाणार होतो. 'बंदर न्हेरू, गद्दार गेहूँ, रोकेंगे।' म्हणून जाणार होतो. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काय दुसऱ्या काही चिंता नाहीत? खूप आहेत. महाराष्ट्रातला शेतकरी यंदा सगळ्या पिकांच्या बाबतीत पार नागवला गेला आहे. कापूस शेतकरी नागवला गेला आहे, ज्वारीच्या शेतकऱ्याची ज्वारी काळी पडली, ज्वारी विकत घ्यायला कुणी तयार नाही. आमची दुःखं आम्हाला खूप आहेत आणि तरीसुद्धा मुंबईला आम्ही जमा होणार होतो, पंजाबमधल्या शेतकऱ्याच्या गव्हाचं दुःख, हरयाणामधल्या शेतकऱ्याच्या गव्हाचं दुःख पुढे मांडण्यासाठी. कारण, आम्ही म्हणतो 'सगळे शेतकरी भाऊ भाऊ' आमचं स्वप्न आहे की पंजाबहरयाणातल्या गव्हाच्या शेतकऱ्यावर संकट आलं तर ते निवारण्याकरिता महाराष्ट्रातला शेतकरी पुढे व्हावा आणि ज्वारीकापसावर संकट आलं तर ते निवारण्यासाठी तितक्याच हक्काने पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनीसुद्धा उठून दिल्लीला उतरावं. मुंबईला आपण याकरिता जाणार होतो.
 त्याचबरोबर, आपण असं म्हटलं की गव्हाची आयात हा काही साधा प्रश्न नाही. सबंध नेहरू-व्यवस्था ही याला जबाबदार आहे. हे धोरण नेहरूंनी चालवलं. शेगाव मेळाव्याच्या वेळी आपल्याला असं वाटलं होतं की, आता हे नेहरूंचं धोरण संपत आलं; पण नाही. ते नेहरूनीतीचं भूत पुन्हा एकदा आपल्या मानगुटीवर बसत आहे. हे भूत मानगुटीला बसायला नको असेल तर काय करायला पाहिजे? सगळ्या महाराष्ट्रात नेहरूनीतीच्या पुतळ्यांचं दहन करण्याचा कार्यक्रम आपण हाती घेतला आणि महराष्ट्रात जवळजवळ अडीच हजार पुतळे जाळले गेले. काही लोकांनी माझ्यावर टीका केली. ते विचारायला लागले की, "तुम्ही नेहरूंचे पुतळे का जाळता?" मी म्हटले, "माझा नेहरूंवर व्यक्तिशः राग नाही आणि मला जाहीररीत्या कबूल करायलाही काही हरकत वाटत नाही की मी एका काळी आकाशात परमेश्वर, हिंदुस्थानात पंडित जवाहरलाल नेहरू आणि महाराष्ट्रात एसेम जोशी ही तीन दैवतं मानत होतो; पण, ज्याला एका काळी मानलं, त्याच्या धोरणांचा काही भयानक परिणाम झाला, तो डोळ्यासमोर आला, तरीसुद्धा मी माझं मत बदललं नाही तर मी मोठी चूक केली असं होईल." रशियामध्ये मार्क्सचे एंगल्सचे, स्टॅलिनचे, लेनिनचे पुतळे होते; पण मार्क्स, एंगल्स, स्टॅलिन, लेनिन यांचं म्हणणं ऐकलं आणि आपल्या पोरांच्या हाती भिक्षापात्र आलं असं जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा रशियामधल्या लोकांनी एका रात्रीच्या आत मार्क्स, एंगल्स, स्टॅलिन, लेनिन यांचे पुतळे खाली खेचून काढले आणि नवीन प्रगती करायला ते मोकळे झाले.
 मुडदा जाळायलाच हवा
 जुने मुडदे किती दिवस सांभाळणार? नेहरूनीतीच्या दहनाचं कारण काय? एकदा घरातला माणूस मेला की, तो कितीही आवडता असो, मेला म्हणजे त्याचा दहनविधी करणं आवश्यक आहे. घरात मेलेल्या माणसाचा मुडदा ठेवून काही मिळत नाही आणि नेहरूनीती मेलेली आहे हे सांगायला माझ्याकडे दोन डॉक्टरांची सर्टिफिकेट्स आहेत. एका डॉक्टरचं नाव आहे पी.व्ही. नरसिंह राव आणि दुसऱ्याचं डॉ. मनमोहन सिंग. यांनी जागतिक बँकेमध्ये जाऊन सांगितलं आहे की, "आता ही जुनी नेहरूनीती संपली, आता पुन्हा आम्ही चूक करणार नाही." आता आम्ही बळिराज्याकडे जाणार आहोत. या दोन डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा मी म्हटलं, "हा मुडदा आता जाळून टाका."
 घराण्याचीच पूजा
 तिकडे मार्क्स एंगल्स्चे पुतळे खाली ओढले. आमच्याकडे काय दिसतं? मुंबईच्या त्या बंदराला नेहरूंचं नाव दिलं आहे. नेहरूंचा बंदराशी काय संबंध आहे? सबंध देशामध्ये परिस्थिती अशीच. बंदरावर उतरलं तर बंदराचं नाव जवाहरलाल नेहरू, विमानतळावर उतरलं तर विमानतळाचं नाव इंदिरा गांधी, तिथून कोणत्या रस्त्यानं निघालो तर त्याचं नाव राजीव गांधी पथ, तिथून खेळ बघायला जावं तर त्या खेळाच्या स्टेडियमचं नाव संजय गांधी आणि तिथं ज्या काही खेळाचा सामना चालला असेल, मग तो फुटबॉलचा असो क्रिकेटचा असो, त्याच्या चषकाचं नावसुद्धा पुन्हा इंदिरा गांधी सुवर्णचषक! या देशात दुसरी नावं काही नाहीत? या देशामध्ये चांगलं काम करणारे दुसरे कुणी झालेच नाहीत?
 सरखेल कान्होजी आंग्रे बंदर
 मुंबईच्या या न्हावा-शेवा बंदराजवळ पंडित नेहरूंनी काय मोठी कामगिरी गाजवली? त्या जागी कामगिरी केली कुणी? छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांनी तिथे ऐतिहासिक कामगिरी बजावली. त्या बंदराला कुणाचं नाव शोभेल तर ते सरखेल कान्होजी आंग्रे यांचं. आपण मुंबईत जाणार होतो ते या बंदराचं नेहरू नाव बदलून ते 'सरखेल कान्होजी आंग्रे' द्यायला जाणार होतो. आपण मुंबईला गेलो असतो तर नाव बदलण्याचा हा कार्यक्रम प्रत्यक्षात पार पडला असता; पण आज आपल्याला इथं सेवाग्रामला हा मेळावा भरवायला लागला आहे. आज आपण मुंबईला जरी नसलो तरी आज मी जाहीर करतो की न्हावा-शेवाच्या या बंदराचं नाव यापुढे 'सरखेल कान्होजी आंग्रे बंदर' करण्यात आले आहे. यापुढे 'नेहरू बंदर' हे नाव कुणीही वापरू नये. इतकंच नव्हे तर त्या भागातील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मी आदेश देतो की ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी त्या बंदराजवळील 'जवाहरलाल नेहरू' हे नाव खोडून त्याऐवजी 'सरखेल कान्होजी आंग्रे बंदर' असे नाव लिहा. पोलिस जो काही खटला भरतील त्याची जबाबदारी मी घेतो.
 बस. मुंबईला गेलो असतो तर एवढंच काम झालं असतं. आपण गव्हाच्या आयातीचा निषेध केला असता, दोन तीन दिवस गहू थांबवला असता. त्या बंदराचं नाव बदललं असतं आणि परत आलो असतो.
 पण, हा कार्यक्रम स्थगित करावा लागला, २६ जानेवारीला दुसऱ्यांदा स्थगित करावा लागला; एकदा अयोध्येच्या दंगलीमुळे, दुसऱ्यांदा मुंबईच्या दंगलीमुळे. आता मला प्रामाणिकपणे असं वाटतं की, आपल्याला काही वेगळ्या हेतूने हा कार्यक्रम स्थगित करणं भाग पडलं. कार्यक्रम बदलून इथं सेवाग्रामला आपण जमलो यामागे काही हेतू आहे असं मला वाटतं. तुम्हा सगळ्यांना सेवाग्रामचा इतिहास माहीत आहे.
 महात्माजींचे अपूर्ण स्वप्न
 गांधीजी आफ्रिकेतून आले, तेव्हा त्यांनी अहमदाबादजवळ साबरमतीला आश्रम काढला. तिथून त्यांचं कार्य चालू होतं. म. गांधी साबरमतीच्या आश्रमातून दांडीला मिठाचा सत्याग्रह करायला निघाले. आश्रमातून पाऊल बाहेर टाकताना त्यांनी म्हटलं, "आता या आश्रमात हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यानंतरच परत येईन. परतंत्र हिंदुस्थान असेतो येणार नाही." त्यावेळी त्यांनी एक घोषणा दिली होती, "माझ्या सगळ्या भारतवासीयांनो, इंग्रज सरकारला काढून टाकायचे आहे तर यात कठीण काय आहे? पहिल्यांदा, तुमच्या मनातली भीती काढून टाका. इंग्रज राज्य आम्ही मानत नाही असं एकदा तुम्ही स्वतःला सांगा, इंग्रजांशी कोणतंही सहकार्य करणार नाही असं ठरवा. विद्यार्थ्यांनो, शाळा सोडून द्या. नोकरदारांनो, नोकऱ्या सोडून द्या. इंग्रज सरकार जणू इथं नाहीच असं वागा." महात्मा गांधींनी सांगितलं, "तुम्ही एवढं करा, मी तुम्हाला एका वर्षात स्वराज्य मिळवून देतो." जमलं नाही. कारण, लोकांनी विश्वास ठेवला नाही. लोकांनी जो काही आंदोलनामध्ये भाग घ्यायला पाहिजे होता तो घेतला नाही. एक वर्ष होऊन गेलं, स्वातंत्र्य मिळालं नाही. साबरमतीला परत जायचं नाही. अशा निराश अवस्थेमध्ये त्या महात्म्यानं शेवटी इथं सेवाग्रामला येऊन मुक्काम केला. तुम्ही आता येताना बापूंची कुटी पाहिली. प्रत्येकवेळी ती कुटी पाहताना १९३० सालापासून १९४७ सालापर्यंत या कुटीमध्ये बसल्या बसल्या बापूजींच्या मनामध्ये काय काय विचार आले असतील याची कल्पना करून माझ्या पोटामध्ये गोळा उठतो.
 या सेवाग्रामचं आणखी एक महत्त्व आहे. महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू हे एकमेकांना अत्यंत प्यारे होते; पण त्यांच्यामध्ये एक मोठा मतभेद होता. गांधींचं म्हणणं असं की सगळ्या देशाचा विकास व्हायचा असेल, गरिबी हटायची असेल तर ती खेड्याच्या विकासातून हटेल. खेडं मोठं करा, खेडं श्रीमंत करा म्हणजे देश आपोआप श्रीमंत होतो, असं गांधीजींचं म्हणणं होतं. पंडित नेहरूंचं म्हणणं उलटं होतं. त्यांचं म्हणणं होतं, की गावं नाही, शहरं मोठी करा; कारखाने बांधा. शहरं मोठी झाली, कारखाने आले म्हणजे देशाचा विकास होतो.
 दोघांनी एकमेकांशी चर्चा केली. दोघांनी एकमेकांना पत्रं लिहिली आणि महात्मा गांधींनी एका पत्रामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंना म्हटलं, "कारखानदारी म्हणजे देशाचा विकास असं जर तुझं मत ठाम असेल तर तुझ्या मताविरुद्ध लढा करायला स्वतंत्र हिंदुस्थानातसुद्धा मी पुन्हा उभा राहीन."
 हा लढा झाला नाही. पंडित नेहरू पंतप्रधान झाले आणि त्यानंतर नवीन नेहरूसरकार ज्या तऱ्हेची धोरणं आखायला लागले ते पाहून गांधीजींच्या सगळ्या जवळच्या माणसांना चिंता वाटायला लागली. ज्या स्वातंत्र्याची आपण इतके दिवस वाट पाहिली ते स्वातंत्र्य आलं, लाल किल्ल्यावर झेंडा फडकला पण ही जी काही नवीन धोरणं आहेत ती काही गांधीजीची धोरणं नाहीत; वेगळीच, विचित्र धोरणं आहेत.
 या सेवाग्रामला बैठक ठरलेली होती. मला आठवते त्याप्रमाणे ४ फेब्रुवारी १९४८ रोजी ही बैठक व्हायची होती. दिल्लीला आणखी एक दोन दिवस राहून गांधीजी इकडे सेवाग्रामला यायला निघणार होते आणि नेहरूपद्धतीचा तोंडवळा असलेली देशाची अर्थव्यवस्था न ठेवता गावावर आधारलेली, गांधींच्या पद्धतीची अर्थव्यवस्था कशी व्हावी याची चर्चा इथं व्हायची होती. हे सगळं फसलं. किती दिवसांनी फसलं? फक्त चारपाच दिवसांनी. ४ फेब्रुवारीला महात्माजी इथं यायचे होते आणि ३० जानेवारीला त्यांची हत्या झाली. एक कालखंड संपला.
 नेहरू-अमलाचा अंत
 ६ डिसेंबरला जेव्हा बाबरी मशीद पाडली तेव्हा संध्याकाळी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव रेडिओवर बोलले. ते काय म्हणाले? ते म्हणाले, "आज बाबरी मशीद पाडली. ही महात्मा गांधीच्या हत्येनंतर घडलेली सर्वांत मोठी दारूण घटना आहे." पी. व्ही. नरसिंहराव त्यावेळी फार मोठं बोलून गेले. त्यांना कल्पना नसेल इतकं मोठं सत्य बोलून गेले.
 ज्या दिवशी बापूजींना गोळी लागली आणि ते गेले त्या दिवशी गांधीयुगाचा अंत झाला. गांधीयुग संपलं आणि त्या दिवशी चालू झाला पंडित नेहरूंचा अंमल; युग नव्हे, अंमल. गेली ४५ वर्षे तो चालू आहे; पण जेव्हा बाबरी मशीद पडली त्या दिवशी नेहरू - अमलाचा अंत झाला. नेहरूंनी जी काही व्यवस्था तयार केली ती संपलेली आहे आणि हिंदुस्थानामध्ये १९५० मध्ये जी घटना लिहिली गेली ती घटना, त्या सालापासून जे गणराज्य तयार झालं ते गणराज्यसुद्धा संपलं आहे. त्याचा मुडदा झाला आहे. तो जाळायचा केव्हा त्याची तारीखच फक्त ठरायची आहे. दुसरं गणराज्य येणार आहे, नाही तर हा देश फुटणार आहे.
 यादवीची लक्षणे
 मी हे का म्हणतो, लक्षात घ्या. अयोध्येच्या प्रश्नावर दंगा झाला.६ डिसेंबरला मशीद पडली आणि दंगा झाला, समजण्यासारखं आहे. कुणा हिंदुची डोकी फिरली, कुणा मुसलमानांची डोकी फिरली. भावाभावामध्येसुद्धा असं भांडण होतं; पण जानेवारी महिन्यात जी दंगल झाली ती अशी साधी नाही. त्यात हिंदू आणि मुसलमान असा काही संबंध नाही. हिंदू म्हणजे फक्त मुंबईतला हिंदू आणि मुसलमान म्हणजे फक्त मुंबईचा मुसलमान असं नाही ना? आपल्या गावांतही हिंदू आहेत, मुसलमान आहेत; मग दंगा झाला तो फक्त मुंबईत झाला. कोणत्याही गावात झाला नाही याचं कारण काय? याचं कारण दंगा हा हिंदू म्हणून झाला नाही, मुसलमान म्हणून झाला नाही; दंगा ज्यांना करायचा होता त्यांनी दंगा मुद्दाम करवून आणला, घडवून आणला. का घडवून आणला, समजून घ्या.
 दंग्याचे रसायन
 रामाचे नाव भक्तीनं घेणारी माणसं फार थोडी. रामायण आयुष्यात एकदा तरी वाचलं असेल अशी माणसंही थोडी. दंगा का झाला ते समजावून घ्या, कारण आपल्या गणराज्याचं, दुसऱ्या गणराज्याचं सगळं यश त्यावर अवलंबून आहे.
 गेल्या महिन्यात राष्ट्रीय एकात्मता परिषदेची बैठक भरली होती. त्या बैठकिमध्ये अयोध्येतील या मंदिराविषयी चर्चा झाली. सगळे लोक भारतीय जनता पार्टीला खूप नावं ठेवत होते. मी काही भारतीय जनता पार्टीविषयी चांगलं बोलणारा माणूस नाही. मीटिंगनंतर चहाच्यावेळी गृहमंत्री शंकरराव चव्हाणांना मी म्हटलं की, "शंकरराव, सगळ्यांनी भाजपावर टीका केली हे ठीक आहे, पण काँग्रेसवाल्यांना भाजपावर टीका करण्याचा अधिकार नाही. तुमचं म्हणणं की सत्ता मिळविण्याकरिता त्यांनी रामाच्या मंदिराचं भांडवल केलं, एवढंच ना? मग तुम्ही काय केलं इतके दिवस? तुम्ही इतके दिवस नेहरू-गांधी घराण्याचं नाव घेतलं आणि सत्ता हाती ठेवली. परिस्थिती अशी तयार केली की प्रियांका गांधीचं नाव आसाममध्ये माहीत आहे; पण अटल बिहारी वाजयपेयींचं नाव तेथे कोणाच्या कानी पडलेलं नाही. नेहरू घराण्यातल्या पाळण्यातल्या बाळाचं नाव हिंदुस्थानातल्या सगळ्या कोपऱ्यात माहीत होतं; पण आयुष्य कुर्बान केलेल्या नेत्याचं आणि देशभक्ताचं नाव माहीत होत नाही. मग, त्यांनी काय केलं; भाजपाची त्यात चूक काय? तुम्ही एक घराणं - नेहरू घराणं वापरलं, त्यांनी त्याच्यापेक्षा जुनं घराणं; सत्ता मिळण्याकरिता. तेही चोर, तुम्हीही चोर."
 सत्ता - जादूई चिराग
 असं का झालं? सत्तेकरिता लोक इतके पागल का होतात? त्याचं कारण मी संघटनेच्या मेळाव्यांमध्ये अनेकदा सांगितलं आहे. शेती करा, नांगर चालवा, कष्ट करा, आयुष्याच्या शेवटापर्यंत मळकं धोतर बदलायची काही शक्यता नाही. उलट, बापानं तुमच्याकरिता जी काही जमीन ठेवलेली असेल त्यातली दोनचार एकर विकूनच तुम्ही तुमच्या पोराच्या हाती देता. शेती जमत नाही म्हणून दोन गाई ठेवल्या, चार म्हशी ठेवल्या, दूध काढलं तरी दूध विकून कुणी माडी बांधली असं उदाहरण मला अख्ख्या महाराष्ट्रात सापडलं नाही; पण दूध विकायच्या ऐवजी जर का गावच्या सोसायटीचा चेअरमन झाला तर मात्र एका वर्षामध्ये तो माडी बांधतो. यातलं रहस्य लक्षात ठेवा. तुम्ही कितीही कष्ट केले तरी तुम्हाला काही मिळायची शक्यता नाही, पण निवडणूक लढवली आणि निवडणूक जिंकलो म्हणजे मग सगळं काही भरपेट मिळतं हे दूध सोसायटीच्या बाबतीतही खरं.
 अरबी सुरस कथांमध्ये एक गोष्ट असते ती तुम्ही सर्वांनी ऐकली असेल. एखादं पोरगं उनाड असतं. त्याचे आईबाप त्याच्यावर रागावतात आणि त्याला घरातून काढून लावतात. मग ते पोरगं बाहेर पडतं. सदा सर्वकाळ उनाडक्याचं केल्यामुळे आता काय करावं ते त्याला समजत नाही. मग त्याच्या नशिबानं त्याला एक जादूची अंगठी किंवा जादूचा दिवा सापडतो. एकदा का ती अंगठी किंवा दिवा हातामध्ये आला की एक राक्षस समोर उभा राहतो. मग तो राक्षस विचारतो, "मालक, काय करू मी तुमची सेवा?" मग त्यानं नुसतं सांगायचं, "आता मला भूक लागली आहे, ताटभर जेवायला दे." पोट भरलं की पुन्हा दिवा घासायचा, की राक्षस हजर. विचारतो, "काय देऊ." मग, "मला एक मोठा महाल बांधून दे." म्हणायचं. ताटभर जेवण असो की मोठा महाल असो की सगळ्या जगातली सुंदर राजकन्या असो दिवा घासला की काय वाटेल ते मिळतं. तशी ही सत्तेची खुर्ची म्हणजे 'जादूचा दिवा' झाला आहे. कोणाही नालायक माणसाच्या हाती हा दिवा गेला अन् त्यानं दिवा घासला की त्याला सगळं काही मिळतं. कॉलेजमध्ये कॉपी करताना सापडली म्हणून नापास झालेली पोरं, नंतर शिक्षणमंत्री बनतात आणि दिल्लीलासुद्धा जाऊन आणखी काही बनतात आणि एकदा का मंत्री झाला की हा पोरगा किती उनाड होता, किती गुंड होता, टवाळ्या करत कसा फिरत होता याच्याकडे न पाहता मोठे मोठे विद्वान, विश्वविद्यालयांचे कुलगुरूसुद्धा त्याला वाकून सलाम घालतात.
 नेहरू - जादूच्या दिव्याचे जनक
 हा 'जादूचा दिवा' कुणी तयार केला. हा जादूचा दिवा नेहरूंनी तयार केला. दिल्लीमधील खुर्चीत इतकी काही ताकद ठेवली की ती खुर्ची ज्याला त्याला हवीहवीशी वाटते, हा 'जादूचा दिवा' आपल्या हाती लागावा असं वाटतं आणि मग तो हस्तगत करण्यासाठी लोक काय वाटेल ते करायला तयार होतात. आपल्या गावाचं उदाहरण घेतलं तरी समजू शकेल. दूध सोसायटीचा चेअरमन, चेअरमन झाल्यानंतर चार पैसे चांगले कमावतो म्हणून सोसायटीच्या निवडणुकीकरता लोक काय वाटेल ते करतात; याला पळव, त्याला पळव, सगळं काही करतात; पण त्याच्याऐवजी, दूधसोसायटीचा चेअरमन झाला म्हणजे दोन पैसेसुद्धा मिळत नाहीत, उलट प्रसंगी खिशातले चार पैसे काढून सोसायटीचं काम करायला लागतं अशी परिस्थिती असती तर निवडणुकीमध्ये कुणी आलंच नसतं, निवडणूक लढवायला. ज्यानं त्यानं दुसऱ्यालाच पुढे केलं असतं. लोक आज निवडणूक लढवायला का धावतात? तिथं गेल्यावर सगळं काही विनासायास मिळतं म्हणून धावतात. गावच्या दूधसोसायटीचं जे खरं तेच दिल्लिच्या खुर्चीचं खरं. या नेहरूव्यवस्थेने त्या 'जादूच्या दिव्या'ला इतकं काही आकर्षण तयार केलं आहे की तो मिळविण्याकरिता कोणी कोणी काय काय पापं केली याची यादी करायला बसलं तर दिवस दिवस लागतील.
 सत्तेसाठी कसलेच सोयरसूतक नाही
 १९५२ मध्ये इंदिरा गांधींनी निवडणुकीनं निवडून आलेलं केरळातलं कम्युनिस्टांचे सरकार पाडलं, पहिलं पाप. काश्मीरमधलं शेख अब्दुल्लांचं सरकार पाडलं, पंजाबमध्ये काँग्रेसचं राज्य टिकावं म्हणून भिन्द्रानवाल्यांना उभं केलं, ते इंदिरा गांधींनी केलं. निवडणुकीने आपल्या हाती सत्ता राहावी म्हणून राजीव गांधींनी शहाबानो प्रकरणामध्ये फेरफार केली, बोफोर्स प्रकरणात कमिशन खाल्लं. जनता दलाने हातामध्ये सत्ता यावी म्हणून 'मंडला'चा राक्षस उभा केला आणि उद्या अजून द्वारका, मथुरा, काशी मशीद असे किती राक्षस उभे राहणार आहेत कुणास ठाऊक?
 याचा अर्थ काय? याचा अर्थ राम महत्त्वाचा नाही; 'गर्व से कहो, हिंदू है।' म्हणणारांच्या मनामध्ये हिंदू धर्माचा गर्व अजिबात नाही. यांच्या मनात आहे खुर्चीवर जाऊन बसणे. कारण, त्या खुर्चीवर बसलं म्हणजे जादूचा दिवा हाती येतो आणि मग सगळी सुखं आपल्या हाती येतात. असा हा स्वार्थांधांचा खेळ नेहरूव्यवस्थेने शक्य झाला.
 समस्या आणि सत्ता अद्वैत
 अयोध्या प्रश्न सोडवून समस्या संपतील? नाही संपणार. अयोध्येच्या ऐवजी नवीन वाद तयार करतील. कारण वाद तयार केला म्हणजे खुर्ची मिळते. खुर्ची मिळाली म्हणजे लायसेन्स द्यायला मिळतं, परमिट द्यायला मिळतं, परवानगी द्यायला मिळते, गॅसचं कनेक्शन पाहिजे असलं तरी देता येतं, टेलिफोन देता येतो, सोसायटी काढायची तरी देता येते, साखर कारखानाही देता येतो. म्हणून या सगळ्या ताकदीकरिता लोक रामाचं नाव घेतात, रहिमाचं नाव घेतात; उद्या आणखी कुणाचं घेतील.
 हा प्रश्न सोडवायचा मार्ग एकच आहे. अयोध्येचा प्रश्न सोडवून हा वाद संपणार नाही. काय करायला पाहिजे? लक्षात ठेवा, सत्तेचा हा जादूचा दिवा म्हणजे पाप आहे. जोपर्यंत हे पाप आहे तोपर्यंत सत्तेकरिता लालचावलेली सगळी माणसं काय वाटेल ते करायला तयार आहेत. त्या खुर्चीतली सत्ता काढून टाका. चेअरमनला चार हरामाचे पैसे कमावता येणार नाहीत अशी चोख व्यवस्था ठेवा, म्हणजे चेअरमन व्हायचा कोणी प्रयत्न करणार नाही. पंतप्रधान बनलं म्हणजे सगळी काही मौजच मौज आहे असं वाटायच्या ऐवजी पंतपधान म्हणजे मोठी जबाबदारी आहे; कोण करणार त्या फुकटच्या लष्करच्या भाकऱ्या भाजायचं काम? अशी जर का परिस्थिती झाली तर हिंदुस्थान वाचेल, तर अयोध्येसारखे नवे प्रश्न निर्माण होणार नाहीत, तर नवी अर्थव्यवस्था येण्यात अडथळे येणार नाहीत, तर शेतकऱ्याच्या घामाला दाम मिळणारी व्यवस्था येईल.
 थोडक्यात काय? या नेहरूव्यवस्थेने शेतकऱ्यांचं वाटोळ केलं.शेतकऱ्यांना लुटलं, कर्जात बुडवलं, देशालासुद्धा कर्जात बुडवलं, सोनंसुद्धा बाहेर देशात गहाण ठेवायला लावलं अशी परिस्थिती या नेहरूव्यस्थेने एका बाजूला आणली आणि म्हणून त्याचा निषेध करण्याकरिता आपण मुंबईला जाणार होतो.
 सरकार किमान असावे
 या सेवाग्रामच्या गांधीबाबाने आपल्याला सूचना दिली की अरे हा आजार इतका लहान नाही. तुम्हाला वाटतं त्यापेक्षा मोठा आजार आहे. हा नुसता नेहरू - अर्थव्यस्थेच्या निषेधाने बरा होणारा नाही. देश वाचवायचा असेल तर सगळं सरकार बदललं पाहिजे. सगळी घटना बदलली तर हे जमेल आणि घटना बदलायची म्हणजे काय करायचं? सरकारकडे फायद्याचं कलम ठेवायचं नाही. शेती कशी चालायची, अर्थव्यवस्था कशी चालायची, कारखाने कसे चालवायचे हे ठरवायचं काम सरकारचं नाही. सरकारचं काम म्हणजे कोणी चोरी केली त्याला पकडून आणा, कुणी खून केला त्याला पकडून आणा, परदेशातील कुणी हल्ला केला तर तो परतवून लावा. आजच्या सरकारचे पोलिस एवढंच काम करीत नाहीत. चोरांना आणि दरोडेखोरांना सोडून बाकी सगळ्यांना पकडण्याचं काम पोलिस करतात.
 पायताण पायातच हवे
 सरकारचं काम कायदा व सुव्यवस्था ठेवणं एवढंच फक्त असायला हवं. म्हणजे, सरकार असणं आवश्यक आहे, सरकार काही बंद करून चालत नाही. घरामध्ये आपल्याला संडास लागतो ना? दिवसातलं जे थोडं अस्वच्छ काम करायला लागतं त्याला संडास लागतो. तसं समाजामध्ये काही चोर असतात. काही दरोडेखोर असतात; त्याच्याकरिता सरकार लागतं; पण सरकारची जागा म्हणजे घरातल्या शौचकूपासारखी आहे. त्या सरकारला दिवाणखान्यात जागा देऊ नका.
 सरकारकडे एवढंच काम द्या. आर्थिक बाबतीत हात घालू नका, शेतकऱ्याचा भाव पाडायचा प्रयत्न करू नका आणि ज्याला त्याला मानानं आणि सन्मानानं जगता येईल अशी परिस्थिती तयार होऊ द्या अशी सरकारला ताकीद द्या. आज न्यायालयाचे न्यायाधीश फालतू उपमंत्र्याला घाबरतात. परवा एका सभेत मी म्हटलं की, "उपमंत्री आले तर आमच्या विश्वविद्यालयाचे कुलगुरूसुद्धा वाकून वाकून नमस्कार करतात." त्या सभेत एक प्राध्यापक होते; तर ते म्हणाले, "शरदराव, तुम्ही आमचा फारच सन्मान केला. प्राध्यापक किंवा कुलगुरू हे उपमंत्र्याला घाबरतात असं तुम्ही म्हणालात म्हणजे आमचा फार मोठा सन्मान झाला. आम्ही तर उपमंत्र्याचा चपराशी आला तरीसुद्धा त्याच्यापुढे घाबरून वाकून वाकून उभे राहतो."
 ही नेहरूराज्याची परिणती. हे नेहरूराज्य संपून न्यायाधीश न्यायाधीशाप्रमाणे वागतील, प्राध्यापक विद्वान प्राध्यापक विद्वानांप्रमाणे वागतील; जे कुणी राजकीय नेते आहेत त्यांचे सगळे गुलाम अशी व्यवस्था राहणार नाही असं दुसरं गणराज्य आलं पाहिजे.
 महात्माजींचा संदेश दुसऱ्या गणराज्याचा
 आपलं भाग्य असं की आपला कार्यक्रम ९ डिसेंबरला मुंबईला झाला नाही, २६ जानेवारीला मुंबईला झाला नाही, या गांधीबाबांनी आपल्याला हाक मारली की, "अरे किती वर्षे झाली मी इथं वाट पाहतो आहे." गांधीवाद संपून नेहरूंचा अंमल चालू झाला तो नेहरूंचा अंमल संपलेला मला पाहू दे अशी या बाबाने आपल्याला हाक घातली म्हणून आपल्याला इथं जमायचा योग आला.
 मग हे दुसरं गणराज्य आणायचं कसं? सरकारने कोणत्याही आर्थिक बाबतीत हात घालू नये असं करायचं कसं? तो संदेशसुद्धा या गांधीबाबाने आपल्याला देऊन ठेवला आहे. तुम्ही मनातून हे सरकार काढून टाका. हे सरकार नाहीच, असं समजून तुम्हाला जे जे काही करायचं असेल ते करायला लागा. 'एका वर्षाच्या आत स्वराज्य' ही महात्मा गांधींची घोषणा. आज त्यांच्या साक्षीने आपण इथं प्रतिज्ञा घेऊ या की आम्हीसुद्धा एका वर्षाच्या आत बळिराज्य आणून देतो; पुढच्या ३० जानेवारीच्या आत इथं बळिराज्य तयार झालेलं दिसेल.
 बळिराज्यचा कार्यक्रम
 बळिराज्य तयार व्हायचं, तर काय करायला पाहिजे? सरकार जिथं जिथं अर्थकारणात हात घालत तिथं तिथं आम्ही सरकारला मानायला तयार नाही. सरकारने कायदा तयार केला आहे, कोणाला पाहिजे तो कारखाना काढता येतो; लायसेन्सची गरज नाही, परमिटची गरज नाही; पण शेतकऱ्याला मात्र हे स्वातंत्र्य नाही. शेतकऱ्याला तर लायसेन्स पाहिजे. दुधावर प्रक्रिया करण्याचा कारखाना काढायचा झाला तर लायसेन्स पाहिजे, फळांपासून काही करायचं झालं, अगदी मुरंबा करायचा झाला तरी लायसेन्स पाहिजे, विदर्भातल्या कापूस शेतकऱ्याने ठरवलं की आपल्या कापसाची रूई करण्याकरिता एखादा रेचा टाक तर त्याला परवानगी नाही आणि भंडाऱ्याच्या, कोकणच्या शेतकऱ्यांनी ठरवलं की माझं भात सडण्याकरिता मी स्वतः भातगिरणी घालतो तर त्याला परवानगी नाही. हे सरकारचं 'परवानगी नाही', 'निर्बंध आहे', 'हे करू नको', 'ते करू नको', जे आहे यापैकी आम्ही आता काहीसुद्धा मानायला तयार नाही. आज शेतकरी संघटना तुम्हाला परवानगी देत आहे. आता ते नियम संपले. ज्याला ज्याला भात सडायची गिरणी घालायची आहे त्यांनी त्यांनी ती घालावी, ज्याला ज्याला कपाशीचे रेचे घालायचे आहेत त्यांनी त्यांनी ते घालावेत. कोणाच्या परवानगीची गरज नाही. कोण पोलिस येतात आणि आपल्याला अटक करतात पाहूया. अटक झाली तर त्या माणसाबरोबर लाख लाख शेतकरी तरुंगात जायला तयार आहेत.
 आपल्या महाराष्ट्रात कापसाची एकाधिकार खरेदी आहे. हे एकाधिकार वगैरे आम्ही काही मानत नाही. व्यापाऱ्यांना विदर्भात, नांदेड-परभणीत, महाराष्ट्रात कुठेही कापूस खरेदी करण्याची मुभा पाहिजे. सरकारला खरेदी करायची असेल तर सरकारनेही करावी, हवं असेल तर खुशाल एकाधिकाराचे नाव लावून खरेदी करावी. तुम्ही खरेदी करू नका असं आम्ही म्हणत नाही; पण त्याबरोबर दुसऱ्या कोणाला खरेदी करून देणं, खुला व्यापार थांबवणं हे मुक्त अर्थव्यवस्थेत बसत नाही. आमच्या दुसऱ्या गणराज्यात हे बसत नाही. बळिराज्यात अशी बंदी असू शकत नाही. विदर्भातल्या शेतकऱ्यांना मी आज आश्वासन देतो की पुढच्या वर्षी जर का कापूस एकाधिकार खरेदीच्या बरोबर मुक्त व्यापार इथे चालू दिला नाही तर शेतकरी संघटना स्वतः कापूस खरेदी करण्याचं काम करेल आणि हिंदुस्थानात, परदेशांत आवश्यक तिथे नेऊन विकेल.
 आमच्या हातातल्या या, नेहरूंनी घातलेल्या बेड्या त्यांच्या पहिल्या गणराज्याच्या पतनाबरोबर आणि अयोध्येच्या मशिदीबरोबर पडून गेल्या आहेत. बियाणं आयात करायचं आहे, तर आम्ही करणार आहोत. तुम्ही थांबवणारे कोण? कापसाची निर्यात आम्ही करणार आहोत. तुम्ही थांबवणारे कोण? कांदा आम्ही पाठवायचा नाही, तो नाफेडमार्फतच गेला पाहिजे असं म्हणणारे तुम्ही कोण? जे जे म्हणून करण्याची आमच्यामध्ये ताकद आहे, जे जे आम्ही करू शकतो, ते आम्ही करणार आहोत. तुमची काय पोलिसांची ताकद आहे? फार फार तर आम्हाला पकडाल, इतकंच ना?
 आणखी एक मुद्दा. महाराष्ट्र सरकार कायद्याच्या ४८ (अ) कलमाने शेतकऱ्याचा शेतीमाल विकल्यानंतर शेतकऱ्याने सोसायटीतून काढलेल्या कर्जाची रक्कम वळती करून घेण्याची व्यवस्था आहे. ही व्यवस्था बळिराज्यात, दुसऱ्या गणराज्यात बसत नाही. नेहरू - राज्यातील ही व्यवस्था आजपासून संपली असं आम्ही जाहीर करतो.
 आपला माल आपण शहरात घेऊन आलो तर ते म्हणतात कृषि उत्पन्न बाजार समितीतच गेलं पाहिजे. माझ्या घरची भाजी, मी टोपली घेऊन रस्त्यावर बसायला या नेहरूवादाच्या राक्षसाने आम्हाला बंदी केली होती. आजपासून ती बंदी संपली. तुमचा माल जिथं घेऊन जाता येईल, जिथं बसून विकता येईल, देशात परदेशात, तुम्ही विका. काय कोण शिक्षा करील ती आपण सगळे मिळून भोगू.
 सहकारी संस्था, आम्हाला काढायची आहे. आम्ही दहा अकरा जणांनी बसून सोसायटी काढली आणि अर्ज केला तर वरचा साहेब म्हणतो, "नाही, तुम्हाला सोसायटी काढता येणार नाही. कारण अशी सोसायटी काँग्रेसच्या एका पुढाऱ्याने आधीच काढलेली आहे." साखर कारखाना काढला तुम्हाला परवानगी नाही कारण आमच्या पुढाऱ्याने आधीच काढलेला आहे. सहकारामध्ये अकरा शेतकरी एकत्र आले की त्यांना सहकारी संस्था काढायचं स्वातंत्र्य हे बळिराज्यदुसरे गणराज्य देत आहे. सरकारची वाट न पाहता तुम्ही संस्था चालू करा. पाहू काय होते ते?
 बळिराज्याच्या वाटचालीचा मार्ग
 हे सगळं करायचं तर तुम्ही सर्वांनी मनातली भीती काढून टाका. हे माझं वाक्य नाही, या गांधीबाबांचं वाक्य आहे. त्याचा रस्ता आपले नवे अध्यक्ष पाशा पटेल यांनी नोकरदारासंबंधीच्या ठरावाने आखून दिला आहे. लक्षात ठेवा, आता तुम्हाला या नोकरदारांना घाबरून चालायचं नाही. इतके दिवस तुम्ही एखादा नोकरदार अधिकारी आला की म्हणत होता, "तसं बरं चाललंय, पण आमच्यावर जरा कृपादृष्टी असू द्या" आणि त्याच्यापुढे वाकत होता. आपल्या अध्यक्षांनी मांडलेल्या ठरावाने उद्यापासून काय होणार आहे, माहीत नाही? आता तुम्ही त्याला बाबा म्हणा, वाघ म्हणा, का वाघ्या म्हणा, का वाघोबा म्हणा, तो तुम्हाला खायलाच येणार आहे. उद्याची वर्तमानपत्रं हे सगळे अधिकारी वाचणार आहेत. पाशा पटेलांचं भाषण वाचणार आहेत आणि तुम्ही त्याच्यासमोर गेलात म्हणजे तुम्हाला ते विचारणार आहेत, "काहो, तुम्ही शेतकरी ना? तुम्हाला आमचा पगार वाढायला नको काय? आणि तुम्हाला आमची बढती व्हायला नको काय? आम्ही भ्रष्टाचार करू नये असं तुम्हाला वाटतं काय?" असं म्हणून तो आता तुमच्या नरड्याला धरणारच आहे. सिंहगडावर तानाजी पडला आणि मावळे घाबरून पळायला लागले. तेव्हा शेलारमामा काय म्हणाला, "अरे आता पळता कुठे? मागचे दोर मी केव्हाच कापून टाकले आहेत. तसं, पाशा पटेलांनी तुमचे मागचे सगळे दोर कापून टाकले आहेत." तुम्हाला पुढंच जाऊन लढाई देणं भाग आहे.
 तेव्हा आता उद्यापासून घाबरायचं सोडून द्या. छाती पुढं काढून या अधिकाऱ्याला सांगा, "अरे ए, तू माझा नोकर आहेस, माहीत आहे का तुला? तू नोकर सरकारचा नाही, तू नोकर माझा आहेस." ही हिम्मत जर तुम्ही ठेवली तर दुसऱ्या गणराज्याचे तुम्ही नागरिक झाला, तर बळिराज्याचे सैनिक झालात असं समजा.
 या सगळ्या लढाईमध्ये किती वेळा चिंता केली, किती वेळा योजना केल्या आणि असं वाटलं की लढता लढता एक दिवस आपल्याला मार्ग सापडेल; पण काय दैव म्हणावं, मुंबईला जाऊन जे जमलं नसतं, जी दृष्टी मिळाली नसती ती मुंबईचा कार्यक्रम रद्द झाल्याने मिळाली. मोठी भाग्याची गोष्ट आहे की मुंबईचा कार्यक्रम रद्द झाला. या गांधीबाबांनी सांगितलं की, "अरे त्या मुंबईला गेटवे ऑफ इंडियापाशी हिंदुस्थानातल्या सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला काय सापडणार आहेत? तिथं तुम्ही नेहरूबाबाची पाटी पुसली काय अन् न पुसली काय, काही फरक पडणार नाही. हिंदुस्थानच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला शोधाची असतील, सगळा देश गरीब का राहिला हे शोधायचं असेल, सगळीकडे दंगे का चालले आहेत, माझं रक्त सांडलं तरी हिंदू-मुसलमान एकमेकांत का लढताहेत हे समजायचं असेल तर ते गेटवे ऑफ इंडियाला ज्ञान मिळणार नाही, ते ज्ञान मिळाविण्याचं विद्यापीठ इथं सेवाग्रामला आहे. आपला इथं सेवाग्रामला येण्याचा योग होता म्हणून हे सगळं घडलं."
 बळिराज्य, नाहीतर विनाश
 दुसऱ्या गणराज्याची आज आपण घोषणा करतो आहोत. मी जेव्हा दहा वर्षांपूर्वी शेतीमालाच्या भावाविषयी बोलायला लागलो तेव्हा सगळेच म्हणत, "हे असं कुठं असतं काय?" आजही आपण दुसऱ्या गणराज्याची घोषणा केली त्याची उद्या बातमी आल्यानंतर लोक म्हणणार आहेत की, "हे शरद जोशी काहीच्या काही बोलत असतात." पण, विश्वास ठेवा, माझी खात्री आहे की हिंदुस्थानची घटना २००३ सालाच्या आत बदलून ती बळिराज्याची घटना झालेली असेल. ही घटना जर बदलली नाही, सरकारच्या हातातील आर्थिक सत्ता काढून घेतली गेली नाही, बळिराज्य आलं नाही तर हा देश टिकूच शकत नाही. म्हणजे गेली दहा वर्षे जे बळिराज्य यावं म्हणून आपण जी लढाई केली त्या लढाईचं यश सर्व तव्हेने साकार होताना पुढे दिसत आहे आणि मी माझं हे भाग्य समजतो की बळिराज्याची ही घोषणा करायला, त्याची शपथ घ्यायला कुठंतरी गेटवे ऑफ इंडियाच्या सिमेटाच्या चौकात न बसता सेवाग्रामला बापूकुटीच्या शेजारी आपण बसलो आहोत. कदाचित, यातूनच देशाचा इतिहास घडायचा आहे.
 दुसऱ्या भारतीय गणराज्याच्या पहिल्या नागरिकांनो
 आपण इथून निघताना थोडं गंभीर होऊन, अंतर्मुख होऊन निघायला पाहिजे. आपण काय ठरवलंय. याचा मी थोडक्यात आढावा घेतो. नुसत्याच घोषणा देत जाऊ नका.
 निर्णय कृषिनीती
 शेतीसंबंधीची कृषिनीती आम्ही शेगावला ठरविलेली आहे. आमचा शेगावचा जाहीरनामा तीच कृषिनीती आहे. लोकसभेमध्ये सरकारने कृषिनीती म्हणून जो काही फाटका कागद ठेवला आहे, अक्षरशः हास्यास्पद कागद आहे, त्याला कृषिनीती म्हणणं म्हणजे शेतीचा अपमान आहे, शेतकऱ्याचा अपमान आहे, देशाचा अपमान आहे. सरकारचा हा कृषिनीतीचा कागद आम्ही लाथाडून, झिडकारून लावतो. हा पहिला निर्णय आहे.
 भीतीमुक्ती
 दुसरा निर्णय, पाशा पटेलांनी मांडलेला ठराव. त्यांनी म्हटल्याप्रमाणे उद्यापासून नोकरांना घाबरायचं नाही, त्यांनी नखं काढून दाखविली तरी. त्यांना सरळ विचारायचं, "तू दिवसभर करतो काय आणि कमवतो काय याचा हिशोब देतो का बोल." उद्यापासून सगळेच नोकरदार तुमचा रागराग करणार आहेत; पण आपण ते जाणूनबुजून ओढवून घेतलं आहे. हे निभवायची हिम्मत बाळगली तर तुम्ही खरे शेतकरी.
 ३१ मार्च, चलो दिल्ली
 तिसरा निर्णय, ३१ मार्चला आपल्याला दिल्लीला जायचं आहे. आज आपण पाहिलं गणराज्य, नेहरू अंमल संपला असं सांगितलं. शेतकरी यापुढे त्याला जे जे पाहिजे ते करणार असं सांगितलं. ते होऊ दिलं नाही तर काय करायचं, पुढचं पाऊल काय टाकायचं यासंबंधी लढाईचा कार्यक्रम जाहीर करायचा आहे. ३१ मार्च १९९३ ला नवी दिल्लीला.
 लक्ष्मीमुक्ती
 त्याआधी करायचं एक अत्यंत महत्त्वाचं काम. घरची लक्ष्मी दुःखी राहिली तर तुमच्या कामाला यश येऊ शकत नाही. घरच्या लक्ष्मीच्या घामाला दाम नाही, तुमच्या घामाला दाम मिळू शकत नाही. घरच्या लक्ष्मीचा तळतळाट असला तर तुम्हाला यश येणं शक्य नाही. घरची लक्ष्मी प्रसन्न असल्याखेरीज बाहेरची लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात येत नाही. तेव्हा जास्तीत जास्त संख्येने लक्ष्मीमुक्ती कार्यक्रमाची अंमलबजावणी करा.
 शेतकरी : दुसऱ्या गणराज्याचा आत्मा
 हा कार्यक्रम दुसऱ्या गणराज्याचा आहे. आज आपण इथून जातो आहोत ते ३० जानेवारी १९४८ ला सुरू झालेला नेहरू-अमलाचा काळाकुट्ट कालखंड संपवून जात आहोत. आज इथं सुरुवात होते आहे ती दुसऱ्या गणराज्याची होते आहे. या गणराज्याची घटना सावकाश लिहिली जाईल. त्याच्यातली कलमं सावकाश लिहिली जातील; पण त्या गणज्याचा आत्मा हा इथं बसलेले शेतकरी आहेत. येताना त्यांच्या डोळ्यामध्ये भीती होती, कोकरासारखे बघत आले; देशभर दंगे चालले आहेत, सुरे घेऊन फिरणारे लोक मोठी मौज करत आहे हा काय प्रकार आहे या संभ्रमात आले; शेतकऱ्यांचं काय व्हायचं या चिंतेने व्याकूळ झालेल्या डोळ्यांनी आले; इथून जाताना त्यांचे डोळे निर्भय झालेले आहेत, आता आम्ही जिंकणार आहोत, कारण बापूंच्या या कुटीपासून पुन्हा एकदा एका नवीन लढ्याची स्फूर्ती घेऊन आम्ही जातो आहोत, आमचे डोळे आता कोकराचे नाहीत, आमचे डोळे आता वाघाचे बनले आहेत असं समजून जात आहेत.

(३० जानेवारी १९९३- सेवाग्राम, जि. वर्धा मेळावा)
(शेतकरी संघटक ६ फेब्रुवारी १९९३)


◼◼