माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो.../चला, हत्यारे परजून घेऊ या
Appearance
चला, हत्यारे परजून घेऊ या
गेल्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारसभांमध्ये मी आवर्जून सांगत होतो की फारा वर्षांनी भारताला अटलबिहारी वाजपेयींसारखं सर्वांना सामावून घेऊन सर्वांना सांभाळून नेणारं, आपल्या पक्षातल्या अतिरेक्यांनासुद्धा थोडा वेळ थंड बसवणारं आणि स्वदेशी जागरण मंचासारख्यांचा कार्यक्रम बाजूला ठेवूनसुद्धा खुल्या व्यवस्थेला पुढे नेऊन देशाला प्रचंड आर्थिक विकासाची गती देऊन देश जागतिक आर्थिक महासत्ता बनू शकतो असा आत्मविश्वास देणारं नेतृत्व लाभलं आहे.
हे नेतृत्व खरंच असं होतं, पण आपण असे करंटे निघालो की त्या नेतृत्वाला आपण पुन्हा सिंहासनावर बसवू शकलो नाही. मी खासदार झालो म्हणून सत्कार स्वीकारताना माझ्या मनात खंत आहे, की अटलबिहारी वाजपेयींसारखं नररत्न आमच्या हातात होतं पण त्या माणसाला आपण पुन्हा पंतप्रधान करू शकलो नाही.
मी खासदार झालो, राज्यसभेत गेलो तेव्हापासून काय काय होतं आहे त्याचा अभ्यास करीत आहे. बाळासाहेब ठाकरेंचा शेती हा काही विषय नाही, जसा हिंदुत्व हा माझा विषय नाही; पण त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची आणि मोफत विजेची घोषणा केली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकरी संघटनेचं ९ ऑगस्टचं आंदोलन सुरू व्हायच्या आधी मला सांगितलं की लवकरच मोफत विजेची घोषणा करतो आहोत, कृपा करून तुम्ही आंदोलन चालू करू नका. हे फक्त माझं नाही तुम्हा सर्व शेतकरी भावाबहिणींचंही यश आहे. त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. फार दिवस व्हावा व्हावा अशी इच्छा होती तो निर्णय झाला. ज्या विजेच्या बिलापोटी शेतकऱ्यांना आंध्र प्रदेशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करावी लागली त्या विजेच्या बिलाच्या महाराक्षसाचा अंत झाला आणि आपण विजेच्या दराच्या जाचातून सुटलो.
माझी अपेक्षा अशी आहे की लवकरच कर्जमुक्ती संबंधीची घोषणा होईल. ती तुमच्या पूर्ण समाधानाची नसेल कदाचित. कर्जमुक्तीचा विषय आला की शेतकऱ्याच्या मनात अपेक्षा उगम पावते की आपल्या डोक्यावरचा हजारो वर्षांचा कर्जाचा बोजा जाईल; 'कर्जात जन्मलो, कर्जात जगलो, कर्जातच मरणार' ही परिस्थिती एकदाची संपून जाईल; पण सरकारकडे हा विषय गेला की कर्जमुक्ती तर करायची म्हणतात पण त्याला 'जर...तर', 'जमले तर' असे फाटे फुटायला लागतात. १९९० साली नागपूरला झालेल्या आपल्या शेतकरी मेळाव्यात त्यावेळचे पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंग यांनी म्हटलं होतं की 'कर्जमुक्ती करण्याचं मी वचन दिलेलं आहे. रक्कम चौदा हजार कोटीची असो की चोवीस हजार कोटीची असो; पंतप्रधानांच्या शब्दाचीसुद्धा काही किंमत आहे आणि मी कर्जमुक्ती करून दाखवणार आहे. एका पंतप्रधानाचे शब्द अमलात आले नाहीत. त्यांनी शेतकऱ्यांची कर्जातून सुटका केली, पण दरडोई फक्त दहा हजार रुपयांची.
कोणाही पुढाऱ्याचं कर्जमुक्तीचं वचन 'जेवल्याखेरीज खरं नसणाऱ्या निमंत्रणा'सारखंच असतं. कर्जमुक्तीची आश्वासनं याहीपूर्वी आपण ऐकली आहेत. ती काही पुरी झाली नाहीत. २४ लाख नोकऱ्याही मिळाल्या नाहीत आणि २४ लाख घरंही मिळाली नाहीत. आश्वासनं पुरी न होण्याचं कारण काय? याचं कारण मला बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं की तुम्ही माझ्या हातात ताकद द्याल तर मी तुम्हाला मुक्ती देऊ शकतो. यावेळी मी त्यांना आश्वासन दिलं आहे की तुम्ही शेतकऱ्यांचा कार्यक्रम घ्या, सगळ्या शेतकऱ्यांना एकजूट करणारे कार्यक्रम घ्या; आम्ही तुमच्या हाताला ताकद देऊ आणि कधी नाही जमलं ते, शेतकऱ्यांना एकदा कर्जमुक्त करून दाखवू.
महाराष्ट्र शासनाची याबाबतची घोषणा कदाचित् कर्जमुक्तीची नसेल. तशी नसली तर काहीतरी असेल - कर्जमुक्ती फक्त दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनाच मिळेल, छोट्या शेतकऱ्यांनाच मिळेल, सीमांत शेतकऱ्यांनाच मिळेल; कोणाचं व्याजच माफ होईल, कोणाचं मुद्दलच माफ होईल.
मी तुमच्यासमोर ९ ऑगस्टच्या आंदोलनाचं निमंत्रण देण्यासाठी आलो होतो. पण मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरून आपण ते आंदोलन पुढे ढकलले आहे; मागे घेतलेले नाही. जर का महाराष्ट्र शासनाने संपूर्ण कर्जमुक्ती याचा अर्थ सगळ्या शेतकऱ्यांची सगळ्या व्याजासकट कर्जमुक्ती जर केली नाही तर ३ सप्टेंबर २००४ पासून सबंध राज्यामध्ये कोठेही रेल्वेगाडी चालणार नाही, कोठेही रस्त्यावरील वाहतूक चालणार नाही असं 'चक्का जाम' आंदोलन सुरू होईल. ३ सप्टेंबर हा दिवस मी अशाकरता निवडला आहे की तो संसदेच्या चालू अंदाजपत्रकी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्या दिवसाचे कामकाज सुरू होण्याच्या आत महाराष्ट्रातील सर्व वाहतूक ठप्प झाल्याच्या बातम्या संसदेच्या दारावर धडकल्या पाहिजेत. हे आंदोलन इतकं प्रभावी व्हायला हवे की भविष्यात ३ सप्टेंबर हा दिवस शेतकऱ्यांचा मुक्तिदिन म्हणून साजरा करता आला पाहिजे.
मी अगदी सुरुवातीला सांगलीला आलो होतो. तेव्हा आपले आकारामबापू पाटील मला म्हणाले होते की, 'साहेब, आमची अशी इच्छा आहे की तुमची हत्तीवरून मिरवणूक काढावी.' मी म्हटलं, 'हत्तीवरून मिरवणूक काढण्यात काय विशेष आहे? माझी इच्छा अशी आहे की शेतकऱ्यांसमोर मी बोलावं आणि सांगलीपासून सुरू झालेली सहकारी साखर कारखान्यांची चळवळ ही शेतकऱ्यांचा आत्मघात करणारी कशी ठरली ते सगळ्या शेतकऱ्यांना समजावून सांगावं.' ते म्हणाले, 'आमचा पहिलवानांचा भाग आहे. इकडे तुम्ही बोलले काय याच्यापेक्षा तुमची किती मोठी मिरवणूक निघाली यावर तुमचं महत्त्व लोक ठरवतात!'
मी जे काही सांगतो ते तुम्हाला कितपत समजले हे पाहण्यासाठी मी काही तुमची लेखी किंवा तोंडी परीक्षा घेणार नाही. ३ सप्टेंबर २००४ पासून सुरू होणाऱ्या आंदोलनात किती संख्येने सांगलीतील शेतकरी कार्यकर्ते बाहेर पडतात आणि किती ताकदीने 'चक्का जाम' करतात यावरून तुमची परीक्षा होणार आहे.
आजपर्यंत आपण अनेक आंदोलने केली. या आंदोलनामध्ये कर्जमुक्ती हा एक विषय आहे. पण त्याहीपेक्षा एक महत्त्वाचा विषय आहे. तो मी थोडक्यात मांडायचा प्रयत्न करतो.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना, अटलबिहारी वाजपेयी निवडून आले नाहीत याचं किती दुःख झालं आहे हे मला माहीत नाही. पण सर्वसाधारणपणे असं दिसतं की, ते निवडून आले नाहीत, आता पंतप्रधान नाहीत तेव्हा त्यांना फक्त कचऱ्याची टोपलीच दाखवायची ठेवली आहे; आजकाल त्यांचं नावसुद्धा ऐकू येत नाही. माझ्या मनावर मात्र याचा फार आघात झाला आहे आणि माझी खात्री आहे की कम्युनिस्ट आणि काँग्रेस, आणि त्यांच्याबरोबर 'लालूप्रसाद' हे भयानक मिश्रण दिल्लीमध्ये फार दिवस टिकणार नाही. याच्या पुढची निवडणूक जेव्हा येईल तेव्हा सर्व धार्मिक अतिरेकीपणा बाजूला ठेवून आर्थिक स्वातंत्र्याचा कार्यक्रम सांगणारी एक आघाडी यशस्वी होणार आहे आणि त्या लढ्याची सुरुवात लवकरच होणार आहे. कदाचित अजून सहा महिने, आठ महिने केंद्रातील सरकार दम काढीलही, पण त्याच्याही आधी महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा, लोकसभा निवडणुकीत हरलेल्या फौजेमध्ये पुन्हा एकदा आत्मविश्वास तयार व्हावा अशा तहेचा कार्यक्रम करणे आवश्यक आहे.
शेतकरी संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांचं मी कौतुक करतो. ज्या ठिकाणी पूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मोठ्या संख्येने जागा मिळत असत - मुंबईसारख्या शहरांमध्ये - तिथे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या हाती लोकसभा निवडणुकीत फारसं काही आलं नाही. विदर्भ, मराठवाडा हे काँग्रेसचे कायमचे किल्ले. त्या ठिकाणी मात्र राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ११ पैकी १० जागा विदर्भात आणि मराठवाड्यात ८ पैकी ६ जागा मिळाल्या. महाराष्ट्रात मिळालेल्या एकूण २८ जागांपैकी १८ जागा स्वतंत्र भारत पक्षाच्या पाठिंब्यामुळेच मिळाल्या असे शिवसेनेचे आणि भाजपाचे नेतेसुद्धा मान्य करतात. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्या निवडणुकीत काम केले एवढेच नव्हे तर कोणतीही अपेक्षा न ठेवता काम केले. लोकसभेमध्ये आम्ही एकही जागा घेतली नाही. कोणताही मोबदला न घेता आमचे कार्यकर्ते धावले. घरची भाकरी खाऊन त्यांनी प्रचार केला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा एकही उमेदवार असा सापडणार नाही, जो म्हणेल की शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याने माझ्याकडे येऊन धाब्यावर जेवण्याकरिता ५ रुपये मागितले. कोणी गाडी मागितली नाही आणि पिणेबिणे कार्यक्रम आमच्या छावणीत नाहीच, तो दुसऱ्या छावण्यांचा भाग आहे. अशा प्रकारे शेतकरी संघटनेच्या पाईकांनी काम केलं आणि म्हणून महाराष्ट्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या.
तेव्हासुद्धा मी खासदार म्हणून जायचं हे ठरलेलं नव्हतं. मी खासदार का झालो?
अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले नाहीत. आपल्या हाती सरकार नाही, सत्ता नाही. उलट्या बाजूला काँग्रेस आणि त्यांच्या बाजूने शेतकरी संघटनेच्या खुल्या अर्थव्यवस्थेच्या विचाराला शंभर टक्के विरोध करणारे समाजवादी आणि कम्युनिस्ट यांचं मत असं की शेतकऱ्यांना स्वातंत्र्य नको, त्यांना बंधनात घाला. शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेऊन त्या जमिनींचं वाटप करा, मजुरांकरिता कायदे करा, शेतकऱ्यांना रास्त भाव देण्याची गरज नाही असं म्हणणाऱ्या कम्युनिस्टांचं केंद्रातल्या सरकारला पाठबळ मिळालं. लोकसभेत कम्युनिस्टांचे ६३ खासदार आहेत आणि कोणी त्यांना नावं ठेवोत, कम्युनिस्ट मंडळी ही मोठी अभ्यासू आणि वादविवादकुशल असतात. प्रश्न असा पडला की यांना तोंड कोण देणार? ज्यांनी माझी राष्ट्रीय कृषि कार्यबलाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली त्या अटलबिहारी वाजपेयींनी सूचना केली की या डाव्या लोकांशी शेतीप्रश्नासंबंधी सामना करायचा असेल तर तिथे शरद जोशी हवेत. तेव्हा, संसदेतील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संघामध्ये माझी निवड झाली ती याकरिता झाली. महाराष्ट्रभरच्या शेतकऱ्यांनी माझा जो सत्कार चालवला आहे तो काही मी खासदारकीची लढाई मारून आलो म्हणून नाही, तर चक्रव्यूह भेदून जाण्याकरिता अभिमन्यू निघाला तेव्हा सर्व पांडवांनी ओवाळलं तसंच तुम्ही मला ओवाळता आहात असं मी मानतो. कारण संसदेतील ६३ कम्युनिस्ट खासदारांनी रचलेल्या चक्रव्यूहाचा भेद करण्याकरिता मला पाठवण्यात आलं आहे.
त्या चक्रव्यूहाचा भेद मी करू शकेन याबद्दल माझ्या मनात शंका नाही. कारण डंकेल प्रस्तावाच्या चर्चेच्या वेळी मी विरुद्ध सारा हिंदुस्थान अशी चर्चा झाली. त्याही वेळी कम्युनिस्ट, स्वदेशी जागरण मंचाचे लोक, गांधीवादी, सर्वसेवा संघ, डॉ. मनमोहनसिंग, पी. चिदंबरम, मोंटेकसिंग अहलुवालिया अशी सगळी मंडळी माझ्या विरोधात होती; पण भारत शासनाने माझं ऐकलं आणि जागतिक व्यापार संस्थेच्या करारावर त्यांनी सह्या केल्या. त्यामुळे, संसदेतील ६३ कम्युनिस्ट खासदारांशी वादविवाद करताना मी जिंकेन याबद्दल माझ्या मनात बिल्कुल शंका नाही.
पण त्यांच्या हातात एक हत्यार आहे. ते हत्यार माझ्याही हातात आहे. पण माझ्या हातातील हत्यार थोडं परजून ठेवण्याची आवश्यकता आहे.
समाजवादाचा पाडाव झाल्यानंतर जसजसं स्पर्धेचं युग येऊ लागलं तसतसे संघटित कामगार आणि नोकरदार मोठे चवताळले आहेत. कारण, नागपूरच्या अधिवेशनात म्हटल्याप्रमाणे, नेता-तस्कर-गुंडा-अफसर हे समाजवाद पडल्यापासून मोठे बेचैन झाले आहेत. आपलं राज्य पुन्हा यावं याकरता त्यांनी संघटित कामगार आणि नोकरदारांचे संप, हरताळ इत्यादी विकासविरोधी कारस्थाने सुरू केली. आता २४ ऑगस्ट २००४ पासून बँकांचा संप चालू होणार आहे, २ सप्टेंबरपासून मुंबईत कामगारांचा संप सुरू होणार आहे. संपूर्ण हिंदुस्थानमध्ये अशांती माजवायची, संप, हरताळ करायचे, नक्षलवाद्यांकडून हिंसाचार घडवून आणायचे आणि त्याच्या आधाराने लोकसभेत, राज्यसभेत 'गरिबांचा आक्रोश' आहे असा गदारोळ करून 'खुली व्यवस्था काढून टाका', 'जागतिक व्यापार संस्थेतून बाहेर पडा' असा धोशा लावायचा असा त्यांचा रणव्यूह आहे.
'गरिबांची भाषा तुम्ही बोलता कशाला? तुमचे गरीब कोण? पन्नास हजार ते एक लाख रुपये ज्यांचे वार्षिक उत्पन्न असेल त्यांची तुम्ही आयकरातून सुटका केली ते तुमचे गरीब? शेतकऱ्यांतले गरीब कोण? जे ट्रॅक्टर खरीदतात ते? खरे गरीब ते की उद्या जगावं कसं हे कळत नाही म्हणून जे आत्महत्या करायला प्रवृत्त झाले आहेत असे हिंदुस्थानातील शेतकरी. आजपर्यंत आत्महत्या केलेल्यांपैकी एकही नोकरदार नाही, एकही कामगार नाही. सगळे आहेत ते कर्जबाजारी शेतकरी आहेत' अशा प्रकारचे युक्तिवाद करीत मी या, समाजवाद पुन्हा आणू इच्छिणाऱ्या ताकदींना आजपर्यंत थोपवून ठेवलं आहे; पण यापुढे जसजशी त्यांची आंदोलनं होत राहतील तसतसा माझा एकट्याचा आवाज त्या ६३ लोकांच्यापुढे टिकायचा असेल - ज्यांना मनमोहनसिंग, सोनिया गांधी, लालूप्रसाद, मुलायमसिंग अशा सगळ्यांचा पाठिंबा आहे - त्यांना जर टक्कर द्यायची असेल तर मला तुम्हा शेतकऱ्यांकडून एका मदतीची अपेक्षा आहे.
मला आता दिल्लीतच अधिक काळ राहाणं भाग असल्यामुळे जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये वारंवार येऊन प्रचार करणं आता शक्य होणार नाही आणि तरीसुद्धा दिल्लीला बसून मी नुसता शब्दांनी जरी निरोप दिला तरी प्रचंड ज्वालामुखीसारखं शेतकऱ्यांचं आंदोलन इथं उभं राहिलं तर राज्यसभेतल्या माझ्या शब्दाला किंमत असेल, एरवी नाही.
येत्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही ३ सप्टेंबरच्या आंदोलनाला महत्त्व आहे. आम्ही युती आहे असं म्हणतो आहोत. या व्यासपीठावरसुद्धा भाजप, शिवसेना, स्वभाप, शेतकरी संघटना - सगळ्यांचे नेते छान सामोपचाराने बसले आहेत; पण चुकून जर का कोणी प्रश्न काढला की सांगलीच्या मतदारसंघाची उमेदवारी कोणाकडे जावी तर इथं लगेच भांडणं सुरू होतील. मुंबईतसुद्धा एकत्र बैठकीत 'तुमची आमची युती - जन्मोजन्मीची' अशी भाषा होते. सोफासेटवर बसायचं, चहा पिता पिता चर्चा करायची. त्यात बंधुभावाच्या गोष्टी होतात आणि तेथून उठल्यानंतर बाहेर पडले की भाषा सुरू होते की, त्यांनी आपल्याला पेचात पकडलं आणि ही ही सीट सोडवून घेतली. आपण त्यांचे पाय त्या मतदारसंघात कापले पाहिजेत' अशा तहेची जर ही युती असेल तर ती याच्यापुढे टिकू शकणार नाही.
युती कशी असावी?
समजा, भारतीय जनता पक्ष हा एक लाकडी ठोकळा आहे, शिवसेना हा आणखी एक लाकडी ठोकळा आहे, स्वतंत्र भारत पक्ष हाही एक छोटा लाकडी ठोकळा आहे. या तिघांना एकत्र कसं आणायचं? सध्या आपण या तीनही ठोकळ्यांना एखाद्या सुतळीने बांधून एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. सुतळीने ठोकळे एकत्र राहत नाहीत. सुतळी ढिली झाली की ठोकळे हलतात, एकमेकांवर आपटतात आणि ढील फार झाली तर ठोकळे बाजूलाही होतात आणि मग भाजप, शिवसेना आणि स्वभाप - तिघांमध्येही एकमेकांविषयी टीकात्मक उद्गार ऐकायला मिळतात. ही युती जर टिकाऊ बनवायची असेल तर काय करायला पाहिजे? तीनही ठोकळ्यांमधील अहंकार संपवून त्यांचा जर भुसा केला आणि सरसाच्या साहाय्याने एखाद्या मुशीत घालून त्यांचा एकच ठोकळा तयार केला तर ती खरी, अभेद्य युती होईल.लाकडाचं ठीक आहे, त्याचा भुसा करता येतो. माणसांचं काय करावं?
माणसांची अभेद्य युती घडवायचं हिंदुस्थानात एक मोठं साधन आहे. श्रीकृष्णाच्या जन्मापासून ते साधन मोठमोठ्या क्रांतिकारी लोकांनी वापरलं आहे. उष्णता देऊन मुशीत घालून एकी करण्याची सगळी कामं हिंदुस्थानात तुरुंगात झालं आहे. श्रीकृष्णाचा जन्म तुरुंगात झाला, महात्मा गांधींची चळवळ तुरुंगात झाली. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडे काहीही साधनं नसताना त्यांच्यात एकी झाली याचं कारण आम्ही तुरुंगातल्या भाकऱ्या एकत्र खाल्ल्या. मला भाजपा, शिवसेना आणि स्वतंत्र भारत पक्ष या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांना एकत्र तुरुंगात न्यायचं आहे. तर खरी आपली युती होईल.स्वभापच्या शिलेदारांना निमंत्रणाची आवश्यकताच नाही पण मी शिवसेनेच्या सैनिकांना, भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणे निमंत्रण देतो की, "शेतकरी संघटनेने पुकारलेल्या ३ सप्टेंबरच्या 'कर्जमुक्ती' आंदोलनात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे." तुमच्याकडे मोठी ताकद आहे आमचीही संख्या कमी नाही; पण आमचे शेतकरी स्वभावाने मऊ आहेत. आंदोलन सत्याग्रहाच्या पद्धतीने करतात; त्यामुळे तुमचा आवाज जितका सरकारला कळतो तितका आमच्या आंदोलनाचा कळत नाही. युती करायची असेल तर या विषयावर आपण एकत्र येऊ या आणि मग पाहू या आपल्याविरुद्ध कोण टिकतं ते. ती खरी युती होईल.'
आणि अशा तऱ्हेने युती झाल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत आपण राष्ट्रीय लोकशाही आघाडीला यशस्वी करून दाखवलं तर, माझी खात्री आहे की, हिंदुस्थानमध्ये गेल्या निवडणुकीत आपली एक तऱ्हेने जी पीछेहाट झाली; खुलेपणा मागणारे लोक एका अर्थाने मागे पडले; सहिष्णुता, सर्वसमावेशकता पाळणारे लोक मागे पडले आणि अर्थव्यवस्थेमध्ये जातीयवाद मांडणारे लालूप्रसाद, मुलायमसिंग यांच्यासारखी माणसं राष्ट्रीय पक्षांनासुद्धा बाजूला सारून उत्तर हिंदुस्थानात निवडून आली ही परिस्थिती दुरुस्त करण्याची एक संधी आपल्या हाती येणार आहे. तेव्हा आपलं पहिलं ध्येय महाराष्ट्र विधानसभेतून काँग्रेसला पार हटवून लावणे हे असलं पाहिजे.
लोक विचारतात, 'तुमची युती होणार का?' मी म्हणतो, 'युती होणार यात काही शंका नाही. कारण दुसरीकडे कोठे जाणार? शरद जोशी काही कम्युनिस्टांकडे नाही जाऊ शकत.'
ते पुढे विचारतात, 'मग, भाजप आणि शिवसेनेशी तुमचं जमतं का?'
'थोडं जमतं, थोडं नाही. लग्न लागताना कुठे नवराबायकोचं सुद्धा सगळं जमत असतं? हळूहळू जमवून घेतात, हळूहळू शिकतात.'
आमची युती व्हायच्या आधी बाळासाहेब ठाकरे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे आणि संपूर्ण वीजबिलमुक्ती झाली पाहिजे अशी घोषणा करतील असं कोणाला वाटलं होतं?
आमच्यावर त्यांचे काही संस्कार होणार आहेत आणि त्यांच्यावर आमचेही काही परिणाम होणार आहेत. युती अशीच पक्की होत जाणार.
मग ते कुरापतखोर हलक्या आवाजात प्रश्न विचारतात, 'तुम्ही विधानसभेत किती जागा मागणार?' बाळासाहेब वगैरे जणू ऐकतील या भीतीने अगदी खालच्या आवाजातच प्रश्न विचारणार. मी हल्ली या प्रश्नाचं एकच उत्तर ठरवून टाकलं आहे.
'किती जागा मागणार?'
'२८८'
'सांगलीत किती मागणार?'
'सगळ्या. २८८ महाराष्ट्रात मागतो त्याअर्थी सांगलीतही सगळ्या मागणार; पण २८८ पैकी किती जागा स्वतंत्र भारत पक्षाला द्यायच्या याचा निर्णय मी बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या हाती सोपवला आहे.'
माझी अपेक्षा अशी आहे की ज्या काँग्रेसला आम्ही शत्रू नंबर एक मानलं त्या काँग्रेसचेच लोक फोडून घ्यायचे - कारण त्यांच्याकडे गडगंज पैसा जमला आहे - आणि त्यांना शिवसेनेमध्ये किंवा भाजपमध्ये घेतले म्हणजे ते शुद्ध झाले असं म्हणून ही मंडळी आपल्याच पायावर धोंडा पाडून घेणार नाहीत. ते शुद्ध झाले म्हटल्याने आपल्या मनाचं समाधान होईल कदाचित्; पण नेताजी पालकरला शुद्ध करणं शक्य झालं, या काँग्रेसवाल्यांना तितकंसुद्धा शुद्ध करून घेता येणार नाही. हे लक्षात न घेतल्याने मागच्या लोकसभा निवडणुकीत, अशा तऱ्हेने शुद्ध करून घेतलेल्या उमेदवारांना लोकांनी नाकारलं ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. विमानाने आले आणि एका उमेदवाराची उमेदवारी घोषित करून गेले म्हणजे तो उमेदवार जिंकून येईल असे नाही. अशा तऱ्हेचे संकुचित निर्णय केल्यामुळे आपण राष्ट्रीय निवडणूक हरलो. महाराष्ट्राची निवडणूक हरणं आपल्याला परवडणार नाही. हा जीवनमरणाचा प्रश्न आहे असं समजून सगळ्यांनी एकोप्याच्या, घरगुती भावनेने एकत्र यावं, ३ सप्टेंबरच्या आंदोलनात त्याची प्रचीती द्यावी आणि पुन्हा एकदा नव्या भारताच्या बांधणीला सुरुवात व्हावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो.
(६ ऑगस्ट २००४ - सांगली)
(शेतकरी संघटक २१ ऑगस्ट २००४)
◼◼