माझे चिंतन/सरस्वतीची हेळसांड

विकिस्रोत कडून





सरस्वतीची हेळसांड





समर्थांच्या वाङ्मयात
 समर्थ रामदासस्वामींच्या कार्याची आता मराठी पंडितांनी खूप चिकित्सा केली आहे. त्या चिकित्सेत कितीही भिन्न मते प्रगट झाली असली, तरी सतराव्या शतकात महाराष्ट्रांत झालेल्या क्रांतीच्या श्रेयात समर्थ अंशभागी होते याबद्दल दुमत नाही. क्रांतिपूर्व जागृती घडवून आणण्यासाठी समर्थ स्वतः व त्यांचे शिष्य हे सर्व हिंदुस्थानभर वणवण भटकत होते व आपल्या वाणीने लोकांना त्यांच्या परिस्थितीची जाणीव करून देत होते. क्रांतीला संघटित सामर्थ्याची फार आवश्यकता असते. समर्थांनी या भूमीत शेकडो मठ स्थापन करून त्या दृष्टीने सिद्धता करून ठेवलीच होती. पण समर्थांचे खरे कार्य याहून निराळे आहे. त्यांच्यापूर्वी महाराष्ट्रात निवृत्तिमार्गाचे प्राबल्य फार होते. निवृत्तिमार्गी आचार्यांनी संसारविमुखतेचा तीनशे वर्षे उपदेश करून लोकांच्या मनातील राजसगुणी ऐहिक आकांक्षा उच्छिन्न करून टाकल्या होत्या. ऐहिक प्रपंचाविषयी, या भूमीच्या उत्कर्षापकर्षाविषयी लोक उदासीन होऊन बसले होते. परमार्थातील विश्वकुटुंबवाद ऐहिकात घुसविल्यामुळे राजकीय आकांक्षांना अवश्य असणारा आपपरभाव, शत्रु- मित्रभाव हा नाहीसा झाला होता. संसार करणे हे पाप आहे, निदान तो गौणपक्ष आहे असा विचार सर्वत्र रूढ झाला होता. समर्थांनी ही विचारसरणी, हे तत्त्वज्ञान नष्ट करून लोकांना प्रपंचाचे, राजकारणाचे, ऐहिक आकांक्षांचे, स्वराज्य- साम्राज्याचे तत्त्वज्ञान शिकविले. प्रपंच केला नाही तर परमार्थही बुडेल हे लोकांना दाखवून दिले. सुंदर स्त्री व मुलेबाळे असणे दुर्भाग्य नसून हा 'सुकृताचा योग आहे' असे सांगितले. राज्ये मिळतात ती बाहुबल, मुत्सद्देगिरी यांनी मिळतात, नामस्मरणाने मिळत नसतात, ही शिकवण दिली. शत्रु मित्र सर्व सारखे, हे बुळगे तत्त्वज्ञान नष्ट करून, प्रखर आपपरभाव त्यांनी निर्माण केला. सदैव कटावर कर ठेवून अठ्ठावीस युगे निष्क्रियपणे उभा राहणारा विठोबा दूर सारून त्या जागी धनुर्धर, परंतप अशा रामाची उपासना रूढ केली. हातात वारकऱ्याची पताका न घेता 'शर्थीची तलवार करावी' असा उपदेश केला. दैववादाने हतबल, निःसत्त्व, हीनदीन झालेल्या लोकांना, ' यत्न तो देव जाणावा ' हा मंत्र दिला. आणि ही सर्व विद्या लोकांमध्ये हळूहळू पेरण्यासाठी अनेक शिष्य निर्माण करून नेणत्या लोकांना जाणते करून ' महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे ' हे स्वप्न खरे करून दाखविले.
 समर्थांची ही जी नवी शिकवण, त्यांचे हे जे क्रांतिकारक तत्त्वज्ञान त्याचे सम्यक् आकलन व्हावे म्हणून आपण त्यांचे वाङ्मय पाहू लागलो तर एक मोठी विस्मयजनक गोष्ट ध्यानात येते. ती ही की, समर्थांच्या समग्र ग्रंथांत या तत्त्वज्ञानाचे सविस्तर सांगोपांग असे विवेचन कोठेही केलेले नाही. समर्थांचे दासबोध, रामायण, अष्टके इत्यादी समग्र ग्रंथ एकत्र केले तर सुमारे बाराशे पृष्ठे भरतील. यांपैकी या नव्या तत्त्वज्ञानाला अवघी बारा पृष्ठे दिलेली आहेत. आणि ती वाचून पाहिली तरी त्यात या तत्त्वज्ञानातील संघटना, प्रयत्नवाद, ऐहिकाची आवश्यकता, तर्काची श्रेष्ठता, महाराष्ट्रधर्म, शत्रु मित्रभाव या तत्त्वांचे साकल्याने विवेचन कोठेच आढळत नाही. दासबोधात किंवा अन्यत्र नवविधा भक्ती, आधिभौतिक ताप, बद्धलक्षण, मोक्ष, माया, पुरुषप्रकृती, रजोगुण, तमोगुण इत्यादी परमार्थातील तत्त्वांचे आणि सिद्धांताचे जे विवरण आहे ते अगदी सविस्तर आहे. मूल सिद्धांताचे विवरण, त्यावर येणाऱ्या शंका, आक्षेप यांचे निरसन व खंडन, स्वमताचे पुन्हा मंडन, त्याला आधार, प्रमाण, त्याची अनेकवार पुनरुक्ती; हे सर्व प्रकार या परमार्थविषयाच्या विवेचनात आढळतात. तसा विषयाचा प्रपंच या नवविचारांच्या बाबतीत थोडे अपवाद सोडले तर कोठेही आढळत नाही. संघटना, प्रयत्नवाद, तर्कनिष्ठा ही तत्त्वे अशी आहेत की समाजाला त्यांचे पूर्ण आकलन व्हावयास हवे असेल तर त्या प्रत्येकावर एकेक दासबोध लिहिणे आवश्यक आहे. आणि जेव्हा जनमताचा ओघ विरुद्ध दिशेला वाहात असेल तेव्हा त्याला वळवून आणण्यासाठी तर याहीपेक्षा मोठा प्रयत्न अवश्य आहे. समर्थांनी जनमताचा ओघ आपल्या वाणीने व प्रत्यक्ष कृतीने वळविला ही गोष्ट इतिहासप्रसिद्धच आहे. पण वाणीने त्यांनी जन्मभर जे विवेचन केले ते सर्व ग्रंथनिविष्ट झाले नाही ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. ग्रंथनिविष्ट जे वाङ्मय आहे त्याचा सर्व भर परमार्थविचारांवर आहे. नवे तत्त्वज्ञान त्यात अगदी थोडे आहे. आणि तेही फुटकळ विचारांच्या रूपाने आलेले आहे. या प्रकरणांतून, अशी काही वाक्ये जमवून त्यांच्या आधाराने समर्थांच्या राजकीय तत्त्वज्ञानाची उभारणी करावी लागते. महंतांचे कार्य, शक्तीची उपासना, प्रपंचाचे महत्त्व, राजकारण अशा काही विषयांवर सबंध समास किंवा प्रकरण फार तर खर्ची पडलेले दिसते. इतर विषयांवर तेही नाही. ' संभाजीस पत्र ', ' आनंदवनभुवन ' इत्यादी प्रकरणांत मधूनच त्याविषयी आलेल्या वचनांवरून समर्थांच्या विचारांचा अदमास बांधावा लागतो. आणि हे सर्व जरी एकत्र केले तरी वर सांगितल्याप्रमाणे एकंदर हजार बाराशे पृष्ठांपैकी फार तर साठ-सत्तर, अगदी पराकाष्ठा म्हणजे ऐंशी, पृष्ठे भरतील. म्हणजे समर्थांचे जे खरे कार्य त्याला त्यांच्या वाङ्मयात अगदी गौण, अल्प असे स्थान मिळालेले आहे. आणि पूर्वीच्या संतमंडळींनी जे परमार्थ-विचार, जो वेदान्त, जो भक्तिमार्ग, जो निवृत्तिमार्ग उपदेशिला त्याच्या विवेचनासाठी, प्रतिपादनासाठी समर्थांचे बहुतेक वाङ्मय खर्ची पडले आहे.

तत्त्वज्ञान ग्रंथवद्ध झाले नाही.

 याचा अर्थ असा होतो की समर्थांनी राजकीय क्षेत्रात जे महान कार्य केले, ज्या चळवळी सुरू केल्या, स्वराज्य संस्थापनेसाठी जी वैचारिक क्रांती केली, जे नवे तत्त्वज्ञान प्रसृत केले ते, खरे पाहता, ग्रंथबद्ध झालेच नाही. जे काही थोडेबहुत झाले ते परमार्थ-विचार-महोदधीत इतके विरून गेले की त्यांच्या वेळच्या पिढीसही त्याची जाणीव राहिली नाही. आणि हीच महाराष्ट्राच्या व भरतखंडाच्या इतिहासातील मोठी दुर्दैवी घटना होय असे मला वाटते.
 मराठ्यांच्या इतिहासातील शिव-समर्थांचा काल व पुढील काल याची तुलना केली तर त्या दोहोंत एक फार महत्त्वाचा फरक दृष्टीस पडतो. पहिल्या कालखंडात परकीय आक्रमणाशी झुंज दिलेली आढळते, त्याचप्रमाणे हिंदू समाजव्यवस्थेत जे दोष आढळतील ते नष्ट करून, त्या समाजाच्या अनेक शतकांच्या दौर्बल्याची कारणे नाहीशी करून त्याची पुनर्घटना करण्याचे प्रयत्न झालेले दिसतात. पुढील काळात नुसता पराक्रम दिसतो. लढाया, स्वाऱ्या, मोहिमा यांचाच तो इतिहास आहे. समाजाचे बल हे त्यांतील धार्मिक संस्था, सामाजिक रूढी, अर्थव्यवस्था, राजकीय तत्त्वज्ञान, म्हणजे एकंदर त्याची संस्कृती यावर अवलंबून असते. केवळ तलवारीत ते बळ नसते. ते तलवारीच्या मागच्या तत्त्वज्ञानात असते. ते तत्त्वज्ञान उंच करावे, सामाजिक, धार्मिक संस्थांतील दोष नाहीसे करून, नव्या रूढी प्रसृत कराव्या, आणि विघटनेची बीजे नाहीशी करून समाज संघटित करावा असा विचारपूर्वक केलेला प्रयत्न पहिल्या कालखंडात दिसून येतो. दुसऱ्या कालखंडात असा प्रयत्न मुळीच दिसत नाही.
 शिवछत्रपती हे केवळ राज्यकर्ते, सेनापती किंवा मुत्सद्दी होते असे नाही. ते एक थोर तत्त्ववेत्तेही होते, ते राजर्षी होते. धर्म, अर्थ, समाजरचना या क्षेत्रांत पुनर्घटना करण्याचे त्यांचे जे प्रयत्न झालेले दिसतात त्यांवरून हे स्पष्ट दिसून येते. परकीय शत्रू हा खरा शत्रू नव्हे तर नव्या काळाला प्रतिरोध करणारी जुनी समाजव्यवस्था, जुन्या धर्मकल्पना, जुनी अर्थव्यवस्था म्हणजे जुने तत्त्वज्ञान हा खरा शत्रू होय हे त्यांनी जाणले होते. आणि म्हणूनच पतितांची शुद्धी, भाषाशुद्धी, समुद्रगमन, वतन-व्यवस्थेचा उच्छेद, क्षत्रियत्वाची स्थापना इत्यादी नवी तत्त्वे त्यांनी रूढ केली व आचरली. मराठेशाहीच्या पुढील काळात समाजाच्या जडदेहधारी शत्रूवरच फक्त लक्ष होते असे दिसते. प्रगतीला विरोध करणारी जुनी संस्कृती या शत्रूकडे कोणाचेच लक्ष नव्हते.

याची जबाबदारी पंडितांवर

 पण या वैगुण्याची, या अवनतीची बरीचशी जबाबदारी शिवाजी व समर्थ यांच्या काळच्या पंडितांवर आहे. त्या दोन महापुरुषांनी निर्माण केलेल्या नव्या परंपरा, त्यांचे क्रांतिकारक विचार, त्यांचे नवे धोरण, त्यांची काल भेदून मागेपुढे पाहणारी दृष्टी, यांचे विवेचन करणारे विपुल ग्रंथ या पंडितांनी लिहून ठेवले असते, तर पुढील काळात आलेली दुर्दशा टळली असती. ते ग्रंथ हाती घेऊन पुढीलांनी मार्ग आखले असते आणि त्यांच्या आधारानेच कालाच्या धावत्या ओघाला अनुसरून दर वेळी नवे तत्त्वज्ञान, नवे धर्मबंध त्यांनी निर्माण केले असते. कालाला कलाटणी देणारे शिवसमर्थांसारखे पुरुष काही दर शतकात होत नसतात. पण सरस्वतीच्या साह्याने त्यांना अमर करणे मात्र शक्य असते. त्यांच्या काळच्या पंडितांनी हे केले नाही. त्यामुळे शिवछत्रपतींचे व समर्थांचे तत्त्वज्ञान त्यांच्याबरोबरच लुप्त झाले. थोर पुरुष विद्यमान असतात तोपर्यंत त्यांची वाणी व कृती यांवरून त्यांचे तत्त्वज्ञान लोकांत पसरत असते. पण त्यांचे विचार, त्यांची शिकवण ग्रंथनिविष्ट झाली नाही, तर पुढील पिढीस त्यांचे दर्शन घडत नाही. मराठी राजसंस्थापकांची हीच स्थिती झाली. त्यांच्या दिव्य दृष्टीचे, क्रांतिकारक विचारांचे आकलन तत्कालीन पंडितवर्गाला झाले नाही. आणि या त्यांच्या प्रज्ञाहीनतेमुळे पुढील पिढ्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे.
 समर्थांच्या समकालीन शिष्यांनी व भक्तांनी त्यांच्याविषयी व त्यांचा ग्रंथ जो दासबोध त्याविषयी अनेक स्तोत्रे, आरत्या, धावे करून ठेवले आहेत. हे सर्व वाचले म्हणजे मनाला मोठा उद्वेग वाटतो. समर्थांच्या वाङ्मयात बाराशे पृष्ठांपैकी राष्ट्रीय तत्त्वज्ञानाला अवघी सत्तर-ऐंशी पृष्ठे दिली आहेत, ही मोठी दुर्दैवाची गोष्ट होय, असे जे वर पुनःपुन्हा म्हटले आहे, त्याचे कारण त्यांच्याविषयी त्यांच्या शिष्यांनी केलेल्या आरत्या वाचल्या म्हणजे चांगले कळून येते. या शिष्यकृत सर्व वाङ्मयात समर्थांच्या राष्ट्रीय कार्याचा चुकून सुद्धा कोठे उल्लेख केलेला नाही. भवडोहातून तारले, चौऱ्यायशीचा फेरा चुकविला, जन्ममृत्यू दूर केले, अज्ञानजडजीवां मार्ग सुकर केला, नवविधा भक्ती विशद करून सांगितली, त्यामुळे बद्ध हे सिद्ध झाले, भक्तांचा उद्धार झाला, शांती, क्षमा, विरक्ती, वैराग्य, भक्ती, ज्ञान यांचा प्रसार झाला, यांविषयीच सर्व कौतुक आहे. त्यांनी संघटना घडविली, क्षात्रधर्माचे उद्दीपन केले, संसाराची महती सांगितली, राष्ट्रधर्म शिकविला, याचा एका अक्षरानेही कोणी निर्देश केलेला नाही. त्यांच्या शिष्यांनाच समर्थांच्या कार्याचे स्वरूप कितपत कळले होते हे यावरून दिसून येते ! ही शिष्यांची कथा ! मग त्यानंतरच्या भक्तांची गोष्ट कशाला ! समर्थांची शिकवण इतर संतांच्यापेक्षा निराळी होती, जुन्या रूढ परंपरा उच्छिन्न करून लोकमताचा ओघ बदलून टाकण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ते क्रांतिकारक होते असे आज जरी कोणी प्रतिपादन केले तरी त्यावर त्यांचे भक्त आजही अगदी उसळून उठतात. इतर संत व समर्थ यांच्यात फरक केलेला त्यांना मुळीच खपत नाही. भक्ती, ज्ञान, वैराग्य यांच्या प्रसाराहून त्यांचे कार्य निराळे होते हे म्हणणे त्यांना सहन होत नाही, इतके समर्थांच्या कार्याचे त्यांना आकलन झाले आहे !
 जी गोष्ट समर्थांची तीच शिवछत्रपतींची. त्यांनी ज्या वेळी राज्यव्यवहार-कोश करण्याची आज्ञा दिली, त्या वेळी भाषेच्या शुद्धतेची महती सांगितली असलीच पाहिजे. पतितांची शुद्धी करण्याची चाल सुरू केली, त्यावेळी तिची कारणमीमांसा केली असलीच पाहिजे. ' कलावाद्यन्तयोः स्थितिः । ' या मूर्ख विचारसरणीचा उच्छेद करून ' मी क्षत्रिय आहे ' असे सांगून स्वतःस राज्याभिषेक करवून घेतला, त्यावेळी श्रीकृष्णाप्रमाणेच त्यांनी धर्माधर्माविषयी विवेचन केले असलेच पाहिजे. पण श्रीकृष्णाच्या मुखीचे अमृतबिंदू जसेच्या तसे संग्रहीत करून सरस्वतीच्या साह्याने ते अमर करून ठेवणारे वेदव्यास भारतकाळी होते तसे शिवछत्रपतींच्या तत्त्वज्ञानाला अमररूप देणारे पंडित त्यांच्या काळी झाले नाहीत, हे दुर्दैव होय. त्यामुळे त्यांनी अंगीकारलेले क्रांतिकारक तत्त्वज्ञान एका पिढीतच लुप्त होऊन गेले व पुढील काळात जड बाहुबल तेवढे उरले.
 शिवसमर्थांचे तत्त्वज्ञान, त्यांची शिकवण, त्यांचा नवा धर्म हा ग्रंथनिविष्ट झाला नाही ही जी दुर्दैवी घटना ती मुद्दाम विस्ताराने वर्णन करून सांगण्याचे कारण असे की ती घटना एकाकी नसून हिंदुस्थानाच्या गेल्या एक हजार वर्षांच्या इतिहासाचे ते एक लक्षणच आहे. मला मुख्यतः हे सांगावयाचे आहे की, या दीर्घ कालखंडात या भूमीत पित्याने पुत्राला सरस्वतीच्या साह्याने शिकविलेच नाही. या कालात, या भूमीत ऐहिक क्षेत्रात अनेक कर्ते राजे झाले, सेनापती झाले, मुत्सद्दी झाले, तत्त्ववेत्ते झाले, राजनीतिज्ञ झाले; पण त्यांतल्या कोणीही आपली शिकवण ग्रंथरूपाने पुढील पिढीस दिली नाही. त्यांनी स्वतः तसे केले नाही; आणि त्यांच्या शिष्यांनी भक्तांनी किंवा समाजातील इतर पंडितांनीही ही काळजी घेतली नाही आणि त्यामुळे येथे ज्ञानाचा संचय झाला नाही. दर पिढीला पुन्हा श्रीगणेशा पासून प्रारंभ. श्रीमंत थोरले बाजीराव यांनी ज्या अनेक लढाया मारल्या त्यांची आज जी थोडीशी वर्णने आपण वाचतो त्यांवरून युद्धविषयक कितीतरी सिद्धांत त्यांच्या मनात निश्चित झाल्याचे दिसून येते. निजामाशी त्यांनी ज्या लढाया केल्या त्यांवरून आपल्याला हवे त्या ठिकाणी शत्रूला आणून तेथे त्याचा निःपात करण्याचे नेपोलियनचे हुकमी कसब त्यांच्या ठायी होते असे दिसून येते. पण याचे विवेचन करून त्यावरून सिद्धांत बांधून त्याचे युद्धशास्त्र करून सांगणारा कोणीही रणविशारद येथे झाला नाही आणि त्यामुळे पुढच्या सेनापतीला स्वतःचे युद्धशास्त्र प्रारंभापासून तयार करावे लागले. आणि ही कहाणी प्रत्येक क्षेत्रातल्या कर्त्या पुरुषाची आहे. प्रत्येकाचे विचार, त्याने मनात बांधलेले सिद्धांत त्याच्याबरोबर लुप्त होऊन जात. आणि त्याच्या पुढील पिढीला पायापासून प्रारंभ करावा लागे; त्यामुळे राजनीती, युद्ध, व्यवहारनीती, समाजरचना या शास्त्रांचा येथे विकासच झाला नाही. न्यूटनचा सिद्धान्त त्याने लिहून ठेवला नसता आणि प्रत्येक विद्यार्थ्याला तो स्वतंत्रपणे शोधून काढावा लागला असता, तर वस्तुशास्त्राची जी प्रगती शक्य झाली असती तितकीच प्रगती येथे समाजशास्त्राची झाली. कारण येथे पित्याने आपले सिद्धान्त लिहून ठेविले नाहीत, पुत्राला शिकविले नाहीत.
 रजपुतांनी जवळजवळ आठशे वर्षे मुसलमानांशी संग्राम केला. तेवढ्या अवधीत त्या भूमीतल्या पुरुषांना लक्षावधी अनुभव आले असतील. मुसलमानांची कडवी धर्मनिष्ठा, त्यांची युद्धनीती, आपली युद्धपद्धती, किल्ल्यांचे महत्त्व, बचावाचे धोरण, चढाईचे धोरण, शरण आलेल्यास अभयदान, जोहार, यवनांची कपटनीती, रणात सर्वांनी आत्मबलिदान करणे, या आणि यांसारख्या असंख्य सामाजिक व राजकीय विषयांवर कितीतरी विचार रजपूत पुरुषांनी केला असेल. पण प्रत्येकाचा विचार ज्याचा त्याच्याबरोबर गेल्याने आठशे वर्षांच्या अखेरीस पुन्हा सर्व धोरण पहिल्यासारखेच ! ज्ञानाचा संचय, वाढ व विकास व त्यामुळे निर्माण होणारे नवे तत्त्वज्ञान यांचा येथे ठावठिकाणाच नाही. त्यामुळे येथल्या घडामोडी या निसर्गातील वायू, वीज, अग्नी यासारख्या अंधशक्तीच्या संघर्षासारख्याच बहुतांशी भासू लागतात. पिढ्या न् पिढ्या डोळसपणे लोक मार्ग आक्रमीत आहेत असे दिसत नाही.

युरोपीयांतील आणि आमच्यांतील फरक

 ड्यूक ऑफ वेलिंग्टन हा त्या मोठ्या पदवीस जाण्यापूर्वी हिंदुस्थानात प्रसिद्धीस आला होता. येथेही प्रसिद्धी मिळण्यापूर्वीच एकदा त्याने मद्रासहून बंगलोरपर्यंत प्रवास केला होता. पण हा प्रवासही त्याने फुकट घालविला नाही. या प्रवासात असताना टिपणे करून ठेवून परत आल्यानंतर या सर्व प्रदेशाच्या भूपृष्ठाची युद्धदृष्टीने त्याने माहिती लिहून काढली व ती पुस्तकरूपाने राजकर्त्यांच्या हवाली केली. पुढे त्याला व इतर सेनापतींना तिचा उपयोग किती झाला असेल हे सांगावयास पाहिजे असे नाही. आणि हे धोरण एकट्या वेलिंग्टनचेच होते असे नाही. इंग्रजांचा प्रत्येक गव्हर्नर, प्रत्येक सेनापती, प्रत्येक मुत्सद्दी आपले अनुभव असे लेखनिविष्ट करीत आलेला आहे. मराठे लोक कसे आहेत, त्यांचा पराक्रम काय, युद्धपद्धती कोणत्या, त्यांच्या निष्ठा कोणत्या, त्यांची आपसात फूट कशी आहे, त्यांच्यांत बुद्धिमान कोण, शूर कोण, -सर्व तपशील अनेकांनी लिहिला आहे. आणि त्यामुळेच नवीन आलेल्यांना या भूमीचे आकलन करणे फार सुलभ होत असे. गुरुत्वाकर्षण पहिल्यापासून शोधावे हा प्रसंग त्यांच्यावर येत नसे !
 राष्ट्रात जे विचारी व कर्ते पुरुष निर्माण होतात त्यांच्या विचारांचे व कर्तृत्वाचे धन ग्रंथबद्ध झाले की पुढील पिढीवर त्याचे संस्कार होतात व त्या पिढीत कर्ती माणसे निर्माण होतात. त्यांचे तत्त्वज्ञान पुन्हा ग्रंथबद्ध झाले की, ते पुढील पिढीस उपयोगी पडते. आणि अशा रीतीने राष्ट्राचे ज्ञानधन वाढत जाऊन त्यातून अनेक प्रकारची शास्त्रे निर्माण होऊन समाज बलशाली होतो. बाराव्या तेराव्या शतकापासून युरोपात नेमका हाच प्रकार सुरू झाला. आठदहा शतके अंधारात घोरत पडलेला हा भूभाग या वेळी जागा झाला आणि विचार करू लागला. पोपचे अधिकार किती, राजाचे किती, ग्रंथप्रामाण्य काय म्हणून मानावे, धर्माचा अंतिम हेतू काय, जीवनात आनंद भोगण्याचा मानवाला हक्क आहे की नाही, बायबलातील पापाची मीमांसा खरी आहे काय, पारलौकिकाचा ऐहिकावर पगडा किती असावा, हे व या तऱ्हेचे अनंत प्रश्न लोकांच्या मनात उद्भवू लागले. आपल्याकडे हे उद्भवले नसतील, हे शक्य नाही. पण युरोपच्या पंडितांनी व कर्त्या पुरुषांनी सरस्वतीचे सामर्थ्य ओळखून दरवेळी आपले विचार ग्रंथबद्ध करून ठेवले व ज्ञानधन वाढवीत नेले, आणि येथीलांनी ते केले नाही हा मुख्य फरक आहे. मार्सिग्लियो, विल्यम ऑफ ओकॅम, जॉन हस्, वायक्लिफ, पेट्रार्क, लूथर, इरॅस्मस अशा किती तरी ग्रंथकारांनी पुढील पिढ्यांना शिकवण्याचे कार्य अव्याहत चालू ठेविले होते. तेराव्या शतकापासून युरोपचा जो उत्कर्ष झाला त्याचे एक प्रमुख कारण म्हणजे सरस्वतीच्या साह्याने अमर करून ठेविलेले हे विचार, हे तत्त्वज्ञान, हे आहे. युरोपात बुद्धिवादाचा उदय झाला. ग्रंथप्रामाण्यवादी धर्मोपदेशकांचे वर्चस्व नष्ट झाले, राष्ट्रनिष्ठा ही प्रबळ शक्ती उदयास आली आणि विज्ञान वाढीस लागून पुढे औद्योगिक क्रांती घडून आली. यांपैकी कोणतीही घटना हे एका व्यक्तीचे कार्य नाही. शेकडो पंडित, तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ यांचे ते कार्य आहे, आणि या पंडितांचे हे कार्य चारपाच शतके चालू होते व अजूनही चालू आहे. पण या पंडितांनी आपले विचार लिहून ठेवले नसते तर हे कार्य घडून आले नसते. तेराव्या शतकातील पंडितांच्या तत्त्वज्ञानाचा पत्ता चौदाव्या शतकातील पंडितांना लागला नसता. त्यांना पुन्हा पायापासूनच सुरुवात करावी लागली असती. आणि दर शतकात, दर प्रांतात हेच होऊन प्रत्येकाचे ज्ञान वातावरणात विरून गेले असते आणि मग त्यातून राजकीय किंवा धार्मिक असे कोणतेच तत्त्वज्ञान निर्माण होणे शक्य झाले नसते.
 महाराष्ट्रात व भरतखंडात नेमके हेच झाले. ऐहिक क्षेत्रात जे विचार त्याच काळी पाश्चात्त्यांच्या चित्तांत स्फुरत होते ते येथील लोकांच्या मनात आलेच नसतील हे अशक्य आहे. मराठेशाहीत तर असे विचार उसळत होते याविषयी वाटेल तितके पुरावे उपलब्ध आहेत. शिवछत्रपती आणि समर्थ यांनी तर ते अमलात आणण्याचा प्रयत्नही केला होता. बाजीरावाच्या मनात मस्तानीला हिंदू करून घेऊन तिच्या मुलाची मुंज करावयाची होती. माधवरावांच्या वेळी सैन्यातली अस्पृश्यता नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. आणि ' राज्य हे कोणाच्या मालकीने नसून आपण केवळ त्याचे संरक्षक आहो, ' हा महनीय सिद्धान्त त्यांनी सांगितला होता. रामशास्त्री, परशुरामभाऊ यांचे विधवाविवाह चालू करण्याविषयीचे प्रयत्न प्रसिद्धच आहेत. पण या तऱ्हेचे हे क्रांतिकारक विचार सरस्वतीच्या कृपेच्या अभावी वातावरणात विरून गेले; त्यांचे तत्त्वज्ञानात रूपांतर झाले नाही. त्याचे कोणी शास्त्र केले नाही. स्वतः या पंडितांनी किंवा त्यांच्या आसपासच्या लोकांनी हे विचार ग्रंथबद्ध करण्याचा प्रयत्न केला असता तर, दर दशकास एकात दुसऱ्याची भर पडून या क्रांतिकारक विचारांचा एक बलशाली प्रवाह निर्माण झाला असता आणि मग त्याच्या ओघात जुने घातकी विचार वाहून गेले असते; पण हे घडले नाही. म्हणूनच शिवकालानंतरच्या मराठेशाहीला जडशक्तींच्या संघर्षाचे स्वरूप आले.
 समाज जगण्यास कोणाच्यातरी एका निष्ठेची आवश्यकता असते. उत्तर मराठेशाहीत या तऱ्हेची प्रबल, बहुजनमान्य अशी निष्ठा कोणतीच नव्हती. इंग्रज हा इंग्रजाविरुद्ध लढणार नाही, फ्रेंच हा फ्रेंचाविरुद्ध लढणार नाही अशी निष्ठा युरोपात ठरून गेली होती. पण येथे हिंदू हिंदूविरुद्ध, मराठा मराठ्याविरुद्ध, भोसल्यांचे सेवक भोसल्यांच्या सेवकांविरुद्ध सारखे लढत होते. दृढ अशी कोणाचीच निष्ठा नव्हती, आणि याचे कारण म्हणजे राष्ट्रीय, राजकीय, सामाजिक तत्त्वज्ञानाचा अभाव हे होय.
 कोणत्याही क्षेत्रात पंडितांनी आपले विचार ग्रंथबद्ध केले तर त्याचा प्रभाव केवढा पडतो याचे उदाहरण महाराष्ट्राच्या इतिहासातच सापडते. परमार्थ, भक्तिमार्ग, अद्वैतवेदांत यांविषयी ज्ञानेश्वरांनी ग्रंथ लिहिण्याची जी परंपरा घालून दिली ती आजतागायत चालू आहे. त्यामुळे परमार्थातले कर्म, पुनर्जन्म, आत्मा, मोक्ष, माया, सगुणनिर्गुण असले गहन विचारसुद्धा अगदी निरक्षर शेतकऱ्यापर्यंत जाऊन पोहोचले आहेत. ज्ञानेश्वरांनी गीतेवर नऊ हजार ओव्या लिहिल्या. पण त्या कमी वाटून दासोपंताने त्याच गीतेवर एक लक्ष ओव्या लिहिल्या. पण ' मराठा तेवढा मेळवावा ', ' यत्न तो देव जाणावा ', ' शक्तीने मिळती राज्ये ' या समर्थांच्या सिद्धान्तांचे विवेचन करण्यासाठी एक ओवीसुद्धा कोणी लिहिली नाही. जनमनावर एखादे तत्त्वज्ञान बिंबवावयाचे असले तर त्यासाठी केवढा विपुल ग्रंथसंभार निर्माण करावा लागतो हे मराठीतील परमार्थ- वाङ्मयाकडे पाहिले म्हणजे कळून येते. बाराव्या शतकापासून दर शतकात, पुढे तर दर दशकात आणि पुढे दरवर्षी या विषयीचे ग्रंथ निर्माण होऊ लागले. हजारो हरदास, कीर्तनकार, पुराणिक समाजावर त्याचे संस्कार करू लागले आणि त्याचाच परिणाम होऊन हा भारतीय समाज इहविन्मुख होऊन पराक्रमशून्य बनला. समर्थांनी भिन्न तत्त्वज्ञान निर्माण करण्याचा अल्पसा प्रयत्न केला. त्यामुळे महाराष्ट्रापुरती जागृती निर्माण झाली. पण समर्थांना कोणी दासोपंत न भेटल्यामुळे त्या निवृत्तीच्या ओघात त्यांचा खरा ' दासबोध ' लुप्त होऊन गेला.
 अलीकडच्या काळात मागल्यासारखी स्थिती नाही हे जरी खरे असले तरी जी सामाजिक, राजकीय, धार्मिक क्रांती व्हावयास पाहिजे आहे, तिच्या मानाने पाहता निर्माण झालेले वाङ्मय अगदी अल्प आहे. अस्पृश्यतानिवारण, मिश्रविवाह, पतितपरावर्तन, संसारप्रेम, कर्मयोग, चातुर्वर्ण्यनाश इत्यादी ज्या सुधारणा आवश्यक आहेत त्या आपण करीत चाललो आहोत. पण त्याचे सर्व प्रतिपादन केवळ मानव्याच्या, सहानुभूतीच्या, उदारतेच्या दृष्टीने होत आहे. आरंभी तसे व्हावे हे युक्तच आहे. कारण कोणत्याही सुधारणेची पहिली प्रेरणा सहृदयतेतूनच निर्माण होत असते; पण हे दीर्घकाल टिकणार नाही. दीर्घकाल रूढ असलेल्या आचारविचारांचे तत्त्वज्ञानपूर्वक निर्मूलन झाले नाही तर क्रांतिकारक सुधारणा या चिरस्थायी होत नाहीत. आणि त्या दृष्टीने विचार करता आपल्या सामाजिक पुनर्घटनेचे तत्त्वज्ञान शास्त्रीय दृष्टीने लिहिले गेलेच नाही असे म्हणावे लागते.
 जीवशास्त्र, वंशशास्त्र यांचा जगातल्या पंडितांनी अपरिमित अभ्यास केला आहे. तो विचारात घेऊन आपल्या जातिसंस्थेचे व चातुर्वर्ण्याचे तत्त्वज्ञानपूर्वक उन्मूलन करणे अवश्य आहे. हिंदुस्थान हे आपणांस एकराष्ट्र घडवावयाचे आहे. या तत्त्वावर सध्या असंख्य आक्षेप येत आहेत. तेव्हा राष्ट्रनिष्ठेची महती समाजाला पटविण्यासाठी वाङ्मयाचा वर्षाव केला पाहिजे. भांडवलशाही आहे या स्वरूपात टिकवून धरून कोणताच समाज टिकणार नाही. कामगारवर्गाचे हित हाच ध्रुवतारा कोणत्याही समाजाच्या अग्रणींनी पुढे ठेवला पाहिजे. या क्षेत्रात तर वर्गविग्रह, आंतरराष्ट्रवाद, विरोधविकासवाद इत्यादी अनेक तत्त्वे प्रचलित झाली आहेत. त्या सर्वांचा खोल अभ्यास करून पंडितांनी समाजाला मार्गदर्शन करणारे ग्रंथ लिहिणे अवश्य आहे. लोकसत्ता, संघसत्ता यांविषयी आपण बहुतेक सिद्धांत दत्तक घेऊन चाललो आहो. त्यांचाही शास्त्रीय अभ्यास झाला पाहिजे. विज्ञानात आपण काही प्रगती करीत आहोत. विज्ञान मुलांना थोडे शिकवीत आहो, पण विज्ञाननिष्ठा निर्माण करण्याचे अल्पही प्रयत्न होत नाहीत. अशा रीतीने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपण क्रांतिकारक विचार करीत असलो तरी क्रांतिकारक तत्त्वज्ञान प्रतिपादन करणाऱ्या वाङ्मयाची उणीव फार आहे. आणि ती भरून निघाली नाही तर समाजाची आपण जी नवी घडण करू तिला स्थैर्य येणार नाही.
 फार पूर्वीच्या काळी सरस्वतीच्या या सामर्थ्याचे महत्त्व पूर्वसूरींनी जाणले होते आणि महाभारतात समाजाच्या सर्व अंगोपांगांची तात्त्विक चर्चा अगदी विपुल प्रमाणात त्यांनी करून ठेवली होती. संस्कृत भाषेशी प्रत्यक्ष संबंध सुटल्यानंतर ज्या देशी भाषा निर्माण झाल्या त्यांनी महाभारतातील कथा व काही वेदान्ती प्रकरणे यांचाच फक्त प्रचार केला. समाजरचनेविषयी जे अत्यंत प्रगल्भ विचार त्यात सांगितलेले आढळतात त्याचा मागमूसही देशी वाङ्मयात दिसत नाही. त्या शतकातील पुरुषांना नवीन विचार सुचले, त्यांनी काही प्रमाणात ते प्रत्यक्षातही आणले; पण वाङ्मयाचा आश्रय करून त्यांनी ते चिरस्थायी करून ठेविले नाहीत. म्हणून नव्या काळाला अवश्य ते तत्त्वज्ञान, अवश्य तो नवा धर्म निर्माण झाला नाही व आपला अपकर्ष झाला. आजही आपण तोच प्रमाद करीत आहोत. सरस्वतीच्या सामर्थ्याचे महत्त्व आपण आकळिले आहे असे वाटत नाही. आणि यामुळे आपले सामाजिक पुनर्घटनेचे प्रयत्न तितकेसे यशस्वी होत नाहीत. म्हणून महाराष्ट्रीय पंडितांना माझी आग्रहाची विनंती अशी आहे की त्यांनी हे प्रचंड कार्य शिरावर घ्यावे आणि सामाजिक, राजकीय, धार्मिकय, आर्थिक पुनर्घटनेचे तत्त्वज्ञान प्रतिपादन करणाऱ्या ग्रंथांचा या भूमीवर अविरत वर्षाव करावा. तसे त्यांनी केले तर गेल्या पाचसहाशे वर्षात जे संत होऊन गेले त्यांना निवृत्ती, संसारविन्मुखता, वैयक्तिक धर्म यांचा प्रसार करण्यात जे यश आले तेच यश आपल्याला मिळून संघटना, राष्ट्रनिष्ठा, विज्ञाननिष्ठा ही नव्या धर्माची तत्त्वे समाजातील अगदी खालच्या थरापर्यंत पसरतील व पुनर्घटनेचे कार्य सुकर होईल.

मे १९४६