Jump to content

माझे चिंतन/नरोटीची उपासना

विकिस्रोत कडून





नरोटीची उपासना





मिर्झा राजे
 औरंगजेबाच्या इस्लामी राज्याची वाढ करण्यासाठी शिवछत्रपतींवर चालून येणारे मिर्झा राजे जयसिंग यांचे नाव इतिहासात प्रसिद्ध आहे. बाराव्या वर्षापासून त्यांनी शिपाईगिरी चालविली होती व मध्य आशियापर्यंत मोहिमा करून श्रेष्ठ सेनापती, कुशल रणपंडित म्हणून अतुल कीर्ती मिळविली होती. पण आपल्या अंगचे हे सर्व संगरनैपुण्य त्यांनी इस्लामी राज्याच्या अभिवृद्ध्यर्थ अर्पण केले होते. आणि असे करण्यात आपण हिंदुधर्माशी काही द्रोह करीत आहो असे त्यांना वाटत नव्हते. दक्षिणेत शिवछत्रपती हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याच्या प्रयत्नात होते. त्यांचे ते प्रयत्न धुळीस मिळविण्याची जबाबदारी मिर्झा राजे यांनी शिरावर घेतली व छत्रपतींना पराभूत करून पारही पाडली. पुढे छत्रपतींनी आग्र्याहून निसटून जाऊन डाव उलटविला ते निराळे. पण हिंदवी स्वराज्य संस्थापनेचे कार्य नेस्तनाबूद करण्याची आपली प्रतिज्ञा मिर्झा राजे यांनी पार पाडली होती. छत्रपती आग्र्याहून सुटून गेल्यावर औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग यांना ठपका दिला. तुम्हीच बापलेक शिवाजीला सामील झाला, असा त्याने बोल लाविला. तेव्हा मुसलमानी तख्ताशी आपण एकनिष्ठ आहो हे सिद्ध करण्यासाठी जयसिंगाने बादशहास लिहिले की, ' आपली परवानगी असेल तर अजूनही काही युक्ती करून मी शिवाजीचा काटा काढून टाकीन. मी माझ्या मुलासाठी शिवाजीच्या मुलीला मागणी घालीन. आम्हा उच्चकुलीन राजपुतांशी संबंध जोडण्याची त्याला फार हौस आहे. तो ही मागणी निश्चित मान्य करील. मग विवाह विधीसाठी आम्ही एकत्र आल्यावर मी त्यास तेथेच छाटून टाकीन किंवा विष घालीन. मात्र हा बेत आपण सर्वथा गुप्त ठेविला पाहिजे. '
 असे अत्यंत हीन व ओंगळ कारस्थान करण्यात, आणि हिंदवी स्वराज्याची संस्थापना करण्याची आकांक्षा धरणाऱ्या क्षत्रियकुलावतंस श्रीशिवछपत्रतींविरुद्ध ते कारस्थान रचण्यात काही धर्मभ्रष्टता आहे, असे मिर्झा राजे जयसिंग यांनी स्वप्नातही मान्य केले नसते. हे सर्व प्रकार घडल्यावर त्यांना जर कोणी म्हणाले असते की, 'राजे, तुम्ही धर्मभ्रष्ट आहा, हिंदुधर्मावर तुमची श्रद्धा नाही. तुम्ही स्वधर्माची सेवा करीत नाही, तुम्ही धर्मद्रोही आहा'. तर त्यांना पराकाष्ठेचा विस्मय वाटला असता, संताप आला असता. हिंदुधर्माचा व शिवाजीवर चालून जाण्याचा संबंध काय? औरंगजेबाचे सर्व प्रयत्न इस्लाम धर्माच्या अभिवृद्धीसाठी चालू आहेत हे न जाणण्याइतके मिर्झा राजे दूधखुळे नव्हते. छत्रपतींनी दिल्लीला बादशहाच्या भेटीसाठी जाण्याचे मान्य केल्यावर त्यांना बादशहाने जे पत्र धाडले त्याच्या मायन्यात त्याने छत्रपतींना 'मुसलमानीधर्मरक्षक शिवाजीराजे' असे संबोधिले आहे. राजे जयसिंग यांना औरंगजेबाच्या या सर्व आकांक्षा माहीत होत्या. तरीही त्याच्या तख्ताशी एकनिष्ठ राहण्यात आपण धर्मद्रोहीपणा केला असे त्यांना कधीच मान्य झाले नसते.
 ' आपली हिंदुधर्मावर श्रद्धा आहे हे सिद्ध करा. ' असे त्यांना कोणी हटकले असते तर त्यांनी काय पुरावा दिला असता ? त्यांनी वाटेल तेवढा पुरावा दिला असता. त्यांनी त्या हटकणाऱ्याला आपल्या वाड्यात नेऊन सांगितले असते की पाहा, येथे भगवान् एकलिंगजीची रुद्राभिषेकाने नित्य पूजा चालू आहे, माझ्या वाड्यात नित्य ब्राह्मणभोजने चालू आहेत, अग्नीमध्ये मी नित्य आहुती देतो, मी कितीतरी गाई पाळलेल्या आहेत, त्यांचे मी नित्य दर्शन घेतो, एकादशी, सोमवार हे उपास चुकू देत नाही; गंध, शेंडी, घेरा ही हिंदुत्वाची लक्षणे मी अभिमाना धारण करतो, जन्मापासून मरेपर्यंत आमच्या घरात सारे संस्कार हिंदुपद्धतीने होतात. काशी, रामेश्वर, पुष्कर, सोमनाथ या यात्रा मी करतो. गंगा, यमुना या नद्यांना घाट मी बांधले आहेत. तेथे कोटी लिंगार्चन व्हावे म्हणून मी जमिनी दिल्या आहेत. हे व या तऱ्हेचे शेकडो आचार मी पाळीत असताना माझी हिंदुधर्मावर श्रद्धा नाही, मी हिंदुधर्माची सेवा करीत नाही, असे तुम्ही म्हणता याचा अर्थ काय ?

नरोटी

 कोणत्याही समाजाची धारणा व्यवस्थित व्हावी, त्याचा योगक्षेम नीट चालावा त्याची उन्नती व्हावी यासाठी त्यातील धुरीणांनी वेळोवेळी काही तत्त्वे मनाशी निश्चित करून त्याअन्वये काही नियम, काही शासने सांगितलेली असतात. त्या शासनांच्या मागची जी तत्त्वे, त्यांचा जो मूळ हेतू त्याकडे लक्ष ठेवून जोपर्यंत समाज त्यांचे पालन करीत असतो तोपर्यंत फलदायी होतात. समाजाच्या धारणपोषणास, रक्षणास, अभ्युदयास त्यांचे साह्य होते. पण कालांतराने स्वार्थामुळे, मोहामुळे, अज्ञानामुळे, आळसामुळे, श्रद्धाशून्यतेमुळे त्या मूळतत्त्वांचा विसर पडून समाज त्या शासनाच्या केवळ जडस्वरूपाचा उपासक बनतो. तो फक्त त्याची चौकट, त्याचा सांगाडा, त्याचे बाह्यरूपच तेवढे जाणतो. अंतरीचे तत्त्व, त्याचा आत्मा तो जाणीत नाही. नारळाची नरोटीच फक्त त्याला दिसते. आतले खोबरे कोणी नेले, ते नासले, तरी त्याच्या ध्यानातच येत नाही. तो फक्त त्या नरोटीची उपासना करीत असतो. पण त्याची श्रद्धा मात्र अशी असते की आपण श्रीफळाचीच उपासना करीत आहो. समाजाचा अधःपात तेथूनच सुरू होतो. धर्म, विद्या, नीती, राजकारण, समाजव्यवस्था या प्रत्येक क्षेत्रात जेव्हा जेव्हा बाह्य, जड रूपावर, केवळ कर्मठ आचारांवर, टिळेटोपी- गंधमाळांवर, यांत्रिक कसरतीवर समाज आपले लक्ष केंद्रित करतो त्या वेळी त्या त्या संस्थेचा ऱ्हास होऊ लागतो. आणि सर्वच क्षेत्रांत नरोटीची उपासना सुरू झाली की एकंदर समाज रसातळास जातो. मिर्झा राजे जयसिंग व त्यांचे समकालीन लक्षावधी, कोट्यवधी हिंदुलोक यांची धर्मश्रद्धा या प्रकारची होती. हिंदुधर्माचा व हिंदुसमाजाच्या धारणेचा, रक्षणाचा, स्वातंत्र्याचा, योगक्षेमाचा, संपन्नतेचा, अभ्युदयाचा काही संबंध आहे ही कत्पना त्यांच्या मनाला कधीही शिवली नव्हती. धारण, पोषण, रक्षण, समृद्धी, स्वातंत्र्य, अभ्युदय हे ज्याने साध्य होईल तो धर्म, याची जाणीव कित्येक शतकांपासून त्यांच्या मनातून लुप्त झाली होती.
 ब्रिटिशांचा राज्यविस्तार हिंदुस्थानात चालू होता. त्यावेळी 'गुप्ता' या नावाचे एक जैन पेढीवाल्यांचे घराणे त्यांना अखंड साह्य करीत असे. ते लोक ब्रिटिशांना सढळ हाताने द्रव्यसाहाय्य तर करीतच, पण त्याशिवाय येथील राजांचे कारभार, त्यांच्या लष्करी हालचाली, त्यांच्या मसलती, यांच्या गुप्त बातम्या हेराकडून मिळवून त्या ब्रिटिशांना पुरवीत. लॉर्ड क्लाईव्ह याने गुप्त घराण्यातील जगत्-शेट व अमीरचंद यांना दिलेल्या शिफारसपत्रात म्हटले आहे की, ' पूर्वेकडील मुलखाची बातमी आम्हांस पुरविण्यासाठी तुम्ही स्वतंत्र टपालच उघडण्याचे ठरविले आहे व सर्व सरदार व रयत यांना आपले पैसे खर्चून आमच्या अमलाखाली शरण आणण्याचा आपला बेत आहे हे ऐकून आम्हांला फार आनंद होतो.' १८१७ साली खडकीची लढाई झाली. त्या वेळी एक अत्यंत महत्त्वाची गुप्त बातमी आयत्यावेळी कळविण्याची कामगिरी या घराण्याने केली. तीसंबंधी जेंकिन्स लिहितो - ' ही बातमी अशी वेळेवर न मिळती तर आम्हांस जय मिळविण्यास फार काळ लागता व सायास पडते.' ग्वाल्हेरचा किल्ला ब्रिटिशांनी घेतला तेव्हा महाराजाधिराज सवाई शिकंदर स्वरूपचंद गुप्ता यांनी किल्ल्यावर जाण्यासाठी एक चोरवाट होती ती अत्यंत प्रयासाने समजून घेऊन ब्रिटिशांना तिची माहिती दिली. त्यामुळे तो किल्ला विनाश्रम ब्रिटिशांच्या ताब्यात गेला.
 हे गुप्ता घराणे अत्यंत धर्मनिष्ठ म्हणून त्यावेळी नावाजले होते. आश्चर्य असे की ब्रिटिशांना साह्य करताना वेळोवेळी जे यांचे करारमदार झाले त्यात त्यांनी एक अट ब्रिटिशांना नेहमी घातलेली आहे की, ' तुम्ही आमच्या धर्मात कधीही हात घालू नये.' आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना तशी आश्वासनेही दिली आहेत. आपण परक्यांना द्रव्यसाह्य केले, येथे सरदार व रयत यांना परक्यांना शरण जाण्यास भाग पाडिले, आपल्याच लोकांवर हेरगिरी करून त्यांच्या गुप्त बातम्या इंग्रजांना दिल्या, किल्ल्याच्या चोरवाटा दाखवून मूळ मालकांना दगा केला तरी आपण यात काही धर्महानी केली, धर्मद्रोह केला असे गुप्तांना वाटले नाही. आणि इंग्रजांनी येथल्यांचे स्वातंत्र्य हिरावले, धन लुबाडले, छळ केला, अनन्वित क्रूर कृत्ये केली तरी त्यांनी धर्मात हात घातला नाही, असेच त्यांचे मत होते. तोंडावर पट्टी बांधू दिली, उपासतापास करू दिले, सणवार पाळू दिले, श्वेतांवर, दिगंबर हे भेद कायम ठेवू दिले, मंदिरे बांधू दिली, तेथे पूजाअर्चा करू दिली म्हणजे इंग्रजांनी धर्मात हात घातला नाही, ते अलिप्त राहिले अशी गुप्तांची श्रद्धा होती. आणि अशी काळजी घेतल्यानंतर आपण प्रत्यक्ष व्यवहारात स्वदेश, स्वजन यांशी कसलाही द्रोह केला, त्याचा परिणाम म्हणून येथल्या समाजाचे स्वातंत्र्य गेले, त्याची अन्नान्नदशा झाली, त्याची लूट झाली, नागवणूक झाली,- इंग्रज हे सर्व करीत होते हे गुप्ता प्रत्यही पाहातच होते- तरी त्यात धर्मनिष्ठेला बाध आल्यासारखे होत नाही अशी त्यांची समजूत होती. आणि समाजाचीही वृत्ती तशीच होती. मिर्झा राजे किंवा स्वरूपचंद, अमीरचंद यांना त्या काळात धर्मभ्रष्ट असे कोणीच म्हटले नाही.
 १७४२-४३ साली नानासाहेब पेशवे उत्तर हिंदुस्थानात स्वारीला गेले होते. यावेळी हिंदूंची तीर्थस्थळे, प्रयाग, काशी वगैरे क्षेत्रे मुसलमानांच्या अमलातून सोडवावी असा त्यांचा विचार होता. त्याप्रमाणे फौज घेऊन ते काशीक्षेत्राकडे निवाले. त्यावेळी काशीक्षेत्र यवनांच्या राज्यातून मुक्त करून ते हिंदूंच्या आधिपत्याखाली आणण्याचा त्यांचा मनोदय विफल करण्याची व ते हिंदूंचे क्षेत्र मुसलमानांच्याच वर्चस्वाखाली राहील अशी व्यवस्था करण्याची कामगिरी कोणी केली ? काशीच्या त्यावेळच्या ब्राह्मणांनी ! त्यावेळचा नबाब सफदरजंग याने त्या ब्राह्मणांना अशी धमकी दिली की तुमच्या राजास आमचे मुलखातून परत फिरवा; नाही तर तुम्हांला बाटवून सर्वांना मुसलमान करतो. त्यामुळे काशीकर ब्राह्मण हे नारायण दीक्षित कायगावकर यांना पुढे घालून रडत, भेकत पेशव्यांच्याकडे आले आणि पाया पडून, विनवण्या करून, त्यांनी पेशव्यांना परत जायला लावले.
विपरीत श्रद्धा
 धर्म हा खाण्यापिण्यावर, शेंडीगंधावर, सोवळ्याओवळ्यावर - म्हणजे जड बाह्यस्वरूपावरच अवलंबून आहे, आंतरिक निष्ठेचे त्यात महत्त्व नाही अशी विपरीत श्रद्धा निर्माण करून हिंदुधर्माने स्वतःच्या आसनाखाली एक कायमचा सुरूंग लावून ठेवला आहे. त्यामुळे स्त्रीला ज्याप्रमाणे इच्छा नसली तरी बलात्कार करणाऱ्या पुरुषाचा गर्भ धारण करावा लागतो, त्याप्रमाणे हिंदुधर्मीयाला आपली मुळीच इच्छा नसली तरी परक्याचा धर्म स्वतःवर लादून घ्यावा लागतो. स्वधर्मावर त्याची कितीही श्रद्धा असली, त्यासाठी आत्मार्पण करण्यासही तो सिद्ध असला तरी त्याचा उपयोग नाही. हिंदू राहणे न राहणे हे त्याच्या हाती नाही. मुसलमानांना वाटले याला मुसलमान करावे तर हिंदूला मुसलमान झाले पाहिजे. ख्रिस्त्यांना वाटले, याला ख्रिस्ती करावे तर त्याला प्रभू येशूच्या गटात गेले पाहिजे. कारण धर्म ही नरोटीची उपासना आहे, श्रीफलाची नव्हे अशी हिंदूंची श्रद्धा आहे. काशीच्या ब्राह्मणांना असे वाटत नसते तर त्यांना भीती कशाची होती ? नबाबाने त्यांना बाटवले असते म्हणजे काय केले असते? काही अभक्ष्यभक्षण, अपेयपान करायला लावले असते. त्यांच्या शेंड्या कापल्या असत्या, त्यांची जानवी तोडली असती, त्यांना लुंग्या नेसविल्या असत्या. पण अंतरांतल्या धर्मनिष्ठेला त्याला काडीमात्र धक्का लावता आला नसता. पण तीवर धर्म अवलंबून नाहीच मुळी ! एखाद्याने गंध, शेंडी, जानवे, गोमूत्र पिण्याचा अधिकार यांना हात लावला नाही की त्याने आमच्या धर्मात हात घातला नाही असे होते. आणि दुसऱ्या कोणी त्यांची छाटाछाट केली की त्याने आमचा धर्म बुडविला असे ठरते. काशीक्षेत्र हिंदुराज्यात यावे, तेथील प्रजेच्या स्वत्वाचे रक्षण व्हावे, तिला स्वाभिमानाने जगता यावे, मुसलमानांनी चालविलेल्या अत्याचारांना पायबंद बसावा, आपल्या स्त्रियांचे विटंबनेपासून रक्षण व्हावे, पुढेमागे रामाची अयोध्याही हिंदुराजाच्या राज्यात येऊन रामचंद्रांच्या जन्माच्या जागी मशीद आहे ती जाऊन तेथे त्याचे मंदिर व्हावे, काशीविश्वेश्वराच्या देवळाच्या निम्म्या भागात मशीद आहे ती दूर व्हावी याचा हिंदुधर्माशी काही संबंध आहे असे त्या ब्राह्मणांचे मुळींच मत नव्हते. शेंडी, गंध, गोमूत्र, पंचगव्य यावरच सर्व धर्म अवलंबून आहे, त्यांचे पालन, त्यांची उपासना हीच खरी हिंदुधर्माची उपासना अशी त्यांची श्रद्धा असल्यामुळे मुसलमानांचेच राज्य कायम ठेवावे अशी त्यांनी हिंदुराजाला प्रार्थना केली. आणि त्यानेही ती ऐकली !

धर्मभ्रष्ट म्हणजे काय ?

 पन्नास पाऊणशे वर्षांपूर्वी इंग्रजी विद्येचा आपल्या देशात प्रसार होऊ लागला आणि त्यामुळे नवे आचार-विचार सुरू झाले. त्यावेळी धर्म बुडाला, आता कलियुग आले, विनाशकाल जवळ आला असे उद्गार सर्वत्र सनातनी लोकांच्या तोंडून ऐकू येऊ लागले. घरोघरी आईबाप आपली मुले धर्मभ्रष्ट झाली- त्यावेळच्या भाषेत- सुधारक झाली, असे म्हणू लागले होते. त्यावेळी मुले धर्मभ्रष्ट झाली म्हणजे काय झाले, असे जर त्यांना कोणी विचारले असते तर त्यांनी काय उत्तर दिले असते ? विश्वनाथ नारायण मंडलीक, दादोबा पांडुरंग यांच्या चरित्रात ही उत्तरे सापडतात. अमक्या दिवशी हजामत करणे निषिद्ध असताना ती केली, अमक्या वारी अमुक खावयाचे नसताना खाल्ले, घेऱ्याचा आकार कमी केला, एकादशीला बटाटे, रताळी हे खाण्याऐवजी मुळे, गवारी, गहू हे खाल्ले, अशा स्वरूपाच्या त्या तक्रारी होत्या. धर्म म्हणजे मानसिक उन्नती आहे, धर्म म्हणजे हृदयाचा, सद्गुणांचा विकास आहे, असे कोणाच्या मनातही आले नाही. धर्म म्हणजे संयम, निग्रह, भूतदया, परमेश्वरावरील श्रद्धा, सत्यनिष्ठा, दया, क्षमा, शांती, विद्येचा अभिलाष, स्वत्वाचा अभिमान असे अर्थच त्यावेळी कोणी केले नाहीत. जडदेहाच्या संस्कारापलीकडे धर्म म्हणजे काही आहे अशी या जनांची समजूत असती तर त्यांनी आपला मुलगा निग्रही नाही, दयाशून्य आहे, स्वत्वशून्य झाला आहे, अशा तक्रारी केल्या असत्या. पण त्या काळच्या वाङ्मयात अशा तक्रारी सापडत नाहीत. धर्म म्हणजे केवळ जड आचार, याचा मनाशी, संस्कृतीशी काही एक संबंध नाही, इतक्या विपरीत टोकाला काही जनांची बुद्धी गेल्याची साक्ष संस्कृतात आहे. एकादशीचे महत्त्व सांगताना-

वरं हि मातृगमनं वरं गोमांसभक्षणम्
ब्रह्महत्त्या, सुरापानं, एकादश्यां न भोजनम् ।

असे कालतरंगिणीकाराने म्हटले आहे. जगातली अत्यंत भयानक व किळसवाणी अशी पापे केली तरी चालतील, पण एकादशीला जेवलेले चालणार नाही, असा त्याचा अभिप्राय आहे. आणि जेवणे याचा अर्थ भातभाकरी खाणे ! बटाटे, साबूदाणा इत्यादी पदार्थ खाणे हे भोजन नव्हे. जड, शारीर आचाराला, धर्माच्या बाह्यस्वरूपाला, माणसे किती महत्त्व देऊ लागली होती आणि तसे करताना त्यांची बुद्धी किती बहकली होती, किती पतित झाली होती ते यावरून कळून येईल.
 कोणत्याही समाजाच्या ऱ्हासकाळाचे हे प्रधानलक्षण आहे. या काळी तो समाज मूलतत्त्वांपासून लांब जाऊन जडाचा उपासक बनतो. बहुतेक सर्व तत्त्वे, संस्था, निष्ठा या प्रथम मानवाच्या कल्याणासाठी निर्माण झालेल्या असतात. सर्व मानवांना इहलोकीची व परलोकीची सुखे मिळावी, त्यांच्यांत प्रेमभाव नांदावा, समाजाचे रक्षण व्हावे, त्यात समता, बंधुता, स्वातंत्र्य ही नांदावी, प्रत्येकाला उन्नतीला अवसर मिळावा इत्यादी अनेक हेतू मूळ प्रवर्तकाच्या मनात असतात. त्यासाठी तो काही सिद्धान्त सांगतो, एखादी संस्था किंवा मठ स्थापन करतो, काही आचार आवश्यक म्हणून सांगतो आणि प्रारंभीच्या काळात तो अंतिम हेतू लोकांच्या मनात असेपर्यंत त्या संस्थेचा कारभार व लोकांचे आचार यांना अर्थ असतो. पण पुढे पुढे मूळ हेतू हा जो आत्मा तो नाहीसा होऊन केवळ कलेवर शिल्लक राहते. ते कुजू लागले तरी लोक त्यालाच लोभावलेले असतात. आणि मग त्याच्या दुर्गंधीने, त्यातील जंतूंमुळे समाजपुरुषाचा नाश होतो.

तत्त्वांना जडरूप

 पण माणसाच्या मनाची ही ठेवणच होऊन बसली आहे. आपल्या कृती व त्यांच्यामागील प्रेरक हेतू यांच्यांत विसंगती निर्माण होत नाही ना हे पाहात राहणे त्याला नको असते. त्याची दगदग त्याला झेपत नाही. नित्य जागरूक राहणे ही फिकीर त्याला सोसत नाही. सामान्य जनांना ही नाहीच सोसत पण समाजधुरीणही तिचा कंटाळा करतात. किंवा ती सोसण्याची ऐपत त्यांच्या ठायीही नसते. म्हणून ते थोर तत्त्वांना जडरूप देतात आणि तोच खरा धर्म असे स्वतःच्या मनाचे समाधान करतात. अकबराच्या स्वाऱ्यांमुळे राणा प्रतापसिंहजी यांना चितोड सोडून रानोमाळ भटकावे लागत होते. आणि अखेरीस चितोड परत घेण्याची त्यांची आकांक्षा तृप्त न होताच त्यांना कालवश व्हावे लागले. त्यावेळी त्यांचे अनुयायी, त्यांचे वारस, वंशज यांनी प्रतिज्ञा केली की, चितोड परत मिळेपर्यंत आम्ही गवतावर निजू. गादीवर निजणार नाही. पानावर जेवू, चांदीच्या ताटात जेवणार नाही. पुढे ही घोर प्रतिज्ञा पार पाडण्याचे सामर्थ्य त्यांच्या वंशजांत राहिले नाही. आणि प्रतिज्ञा पार पाडीपर्यंत ते बिकट व्रत संभाळण्याचा कणखरपणा, ती तीव्र निष्ठा त्यांच्या ठायी नव्हती. तेव्हा त्यांनी निष्ठेला जडरूप दिले. ते मांडलिक म्हणून चितोडला परत आले. सुखासीन झाले, गादीवर निजू लागले, चांदीच्या, सोन्याच्या ताटात जेवू लागले. पण त्यांनी व्रतही चालविले. म्हणजे काय केले ? मऊ परांच्या गादीखाली ते थोडेसे गवत घालून ठेवीत व मग निजत आणि सोन्याच्या ताटाखाली एक वडाचे पान ठेवून मग जेवीत. अशा रीतीने गवतावर निजू व पानावर जेवू ही व्रते त्यांनी अखंड आचरिली. नरोटीची उपासना ती हीच. त्या व्रतांतला स्वाभिमान, त्याग, तेज हा आत्मा नष्ट झाला होता. ते श्रीफल राणाजींच्या प्राणज्योतीबरोबरच अंतर्धान पावले होते. फक्त शब्द राहिले होते. व्रताची यांत्रिक कृती उरली होती. कलेवर शिल्लक होते. पण आपण प्रतिज्ञेचे पालन करीत आहो, आपण तिच्याशी द्रोह केलेला नाही, ही त्या वंशजांची श्रद्धा तरीसुद्धा कायम होती.
 मनुष्याच्या मनाचे हे जे दौर्बल्य, सत्त्वापासून, स्वधर्मापासून च्युत होऊन जडाची उपासना करीत असताना आपण धर्माचीच उपासना करीत आहोत असे समाधान मानण्याची ही जी वृत्ती ती अर्वाचीन काळी कमी झाली आहे असे मुळीच नाही. मार्क्सवाद, लोकसत्ता हे जे नवे युगधर्म त्याने स्वीकारले आहेत, त्यांचे प्रतिपालनही तो याच सनातन पद्धतीने करीत आहे.

मार्क्सधर्माचे जडरूप

 भांडवलशाही नको असे मार्क्स का म्हणाला १ अल्पसंख्यांच्या हाती सर्व धन एकवटते आणि मग ते त्याच्या जोरावर सत्ता काबीज करून इतरांना छळतात, नागवितात म्हणून. रशियाने मार्क्सवाद स्वीकारला. भांडवलदार, जमीनदार नष्ट केले. पण सर्व धन पुन्हा सत्ताधारी अल्पसंख्यांच्या हातीच आणून ठेविले. पूर्वी भांडवलदारांचे राजसत्तेवर वर्चस्व असे, पण ते दूरतः अप्रत्यक्षपणे असे, आता सत्ता व धन एकाच अल्पसंख्य गटाच्या हाती देऊन रशियाने जास्तच भयानक परिस्थिती निर्माण केली आहे. तरी पण आपण मार्क्सधर्म पाळीत आहोत, हे त्याचे समाधान अभंग आहे ! भांडवलदार नष्ट केल्यानंतर सैन्य, पोलीस, तुरुंग ही चोवीस तासांच्या आत नाहीशी केली पाहिजेत, कारण यांच्याच बळावर सत्ताधारी लोक नागरिकांना छळीत असतात, ही मार्क्सची पहिली अट रशियाच्या धुरीणांनी दृष्टीआड केली आहे. मार्क्स म्हणाला की, भांडवलशाही नष्ट केल्यावर कामगारांचे राज्य झाले पाहिजे. सर्व दलितांच्या व्यक्तिमत्त्वविकासाला अवसर मिळावा, जीवनाची, उत्कर्षाची किमान साधने सर्वांना सुलभ व्हावी हा त्याचा तसे सांगण्याचा हेतू होता. रशियात ' कामगारांचे राज्य ' या घोषणा चालू आहेत. कामगारांना मतदानाचा अधिकार दिला आहे. पण कारखाने व एकंदर कारभार यांचे नियंत्रण सरकारने स्वतः नेमलेल्या अधिकाऱ्यांकडे देऊन सर्व सुलतानी अधिकार त्यांच्याकडे सुपूर्द करून या कामगारराज्याचा हेतू विफल करून टाकला आहे. राजसत्तेचे अधिकार राहोच, साधा संप करण्याचा अधिकारही कामगारांना नाही. त्यांना फक्त स्टॅलिनचा जयजयकार करण्याचा व परदेशातल्या प्रवाशांच्या पुढे आपल्या सुखाचे प्रदर्शन मांडण्याचा अधिकार आहे. मार्क्सधर्माचे पालन ते हेच.
 मार्क्सधर्मात क्रांती, उत्पात, स्फोट, विध्वंस यांना फार महत्त्व आहे. विरोध- विकासवाद हे या धर्मातील आदितत्त्व आहे. जगाची प्रगती साध्या विकास पद्धतीने न होता दर वेळी संघर्ष, द्वंद्व, उत्पात होऊन त्यातून प्रगती होते असे मार्क्सधर्म सांगतो. यातील जगाची प्रगती, हा आत्मा काढून टाकून विध्वंस, अत्याचार, दंगेखोरी, बेदिली, फूट, एवढ्याचा मात्र कम्युनिस्ट लोक दर ठिकाणी, जुन्या काळच्या शाक्तपंथीयांप्रमाणे आश्रय करतात. गेल्या पंचवीस वर्षांत फ्रान्स, जर्मनी, इटली, झेकोस्लोव्हाकिया, पोलंड या देशांत दुही माजविणे, फूट पाडणे, अत्याचार करणे, दंगल माजविणे हा उद्योग त्यांनी चालविला आहे. यामुळे त्या त्या देशाची कसलीही प्रगती न होता ते देश दुबळे होऊन बसले आहेत किंवा होण्याच्या मार्गावर आहेत. या अत्याचारांनी आपण मार्क्सचेच प्रतिपालन करीत आहो, अशी मार्क्सवाद्यांची श्रद्धा आहे.
 धर्म ही अफू आहे, असे कार्ल मार्क्सने सांगून टाकले होते. परलोक, पुनर्जन्म, स्वर्ग या कल्पनांच्या नादी लोकांना लावून त्यांच्यावर होणाऱ्या जुलमाचा त्यांना विसर पाडणे, प्रतिकाराची त्यांची बुद्धी बधिर करूर टाकणे ही कामे धर्माने केल्यामुळे त्याने तसे उद्गार काढले होते. काल्पनिक सुखाच्या विलोभनाने लोकांची मने बेहोष करून टाकून त्यांना वस्तुस्थितीचा विसर पाडणे हे पातक आहे, असा मार्क्सच्या विधानाचा आशय आहे. तो आशय सोव्हियेट नेते विसरले आहेत, एवढेच नव्हे तर त्यांनी मार्क्सधर्मालाच अफूचे स्वरूप दिले आहे. स्टॅलिनचे ते परमेश्वराप्रमाणे गुणगान करतात. तो पृथ्वीवरच स्वर्ग आणून देणार आहे, कामगारांचे नंदनवन निर्माण करणार आहे, अशी आश्वासने देतात. काही वर्षांनी रशियात विपुल, अतिविपुल समृद्धी निर्माण होणार आहे, प्रत्येकाला त्याच्या सगळ्या गरजा पुरविता येतील इतके धन आम्ही लवकरच देऊ, अशी अभिवचने देतात. या कल्पनासृष्टीत रशियन कामगार गुंग आहेत. या सध्याच्या जगात सारखे विषप्रयोग व अन्यायी खटले चालू आहेत. कोटी दीड कोटी कामगारांना मजूरवाड्यात, सैबेरियात गुलामापेक्षाही हीन जिणे जगावे लागत आहे. या घोर परिस्थितीचा त्यांना विसर पडावा यासाठीच ही योजना आहे.
 शासनसंस्थेचा विलय, कामगारांचे नेतृत्व, जगातील कामगारांची संघटना, स्त्रीचे दास्यविमोचन, व्यक्तीचे आर्थिक स्वातंत्र्य, आंतरराष्ट्रीयता या प्रत्येक तत्त्वाच्या बाबतीत सोव्हियेट रशियाने नरोटीची उपासना चालविली आहे. त्यातील श्रीफल नष्ट झाले आहे. त्यानेच ते नष्ट केले आहे. आणि मुसलमानांच्या राज्यविस्तारासाठी, हिंदुराज्यांच्या विनाशासाठी तनमनधन अर्पण केले तरी तो हिंदुधर्माशी द्रोह होत नाही, ही ज्याप्रमाणे येथील समाजधुरीणांची श्रद्धा होती त्याचप्रमाणे मानवाचे व्यक्तित्व, त्याचे सुख, त्याची उन्नती, त्याचे सर्व क्षेत्रांतील स्वातंत्र्य यांना पदोपदी हरताळ फासूनही आपण मार्क्सधर्माशी द्रोह करीत नाही, अशी सोव्हियेट धुरीणांची अचल श्रद्धा आहे. मार्क्सवादाचा सांगाडा, त्याचे जडस्वरूप याला ते बिलगून बसले आहेत. आज त्यांनी जाणूनबुजूनच हे चालविले आहे. कालांतराने लोकांच्या ते अंगवळणी पडेल, आणि खरा मार्क्सधर्म तो हाच असे त्यांना वाटू लागेल. गादीवर निजावयाचे व थोडे गवत गादीखाली ठेवायचे, ताटात जेवावयाचे पण एक पान त्याच्याखाली ठेवायचे, एवढे केले की राणाजींच्या मृत्युसमयी केलेल्या प्रतिज्ञांचे पालन केल्याचे पुण्य मिळते ही जशी रजपूत राजांची श्रद्धा होती त्याप्रमाणे शासनयंत्र पूर्ण जोरात चालवावयाचे पण त्याच्याखाली एखादा कामगार उभा करावयाचा म्हणजे शासनसंस्थेचा नाश केल्याचे पुण्य मिळते, अशी कार्ल मार्क्सच्या अनुयायांची दृढ, अढळ श्रद्धा आहे.
 जिवंत तत्त्वाला जडरूप देऊन त्याचीच उपासना करीत बसावयाचे, आणि अशा रीतीने त्याचा मूलहेतू विफल करून टाकावयाचा या मानवाच्या वृत्तीमुळेच जगात आजपर्यंत अनेक थोर महात्मे जगदुद्वाराच्या प्रयत्नात खर्ची पडूनही जग आहे तेथेच आहे. बुद्धाची अहिंसा, जीजसची दया, महात्माजींचे सत्य या प्रत्येकाची मानवाने अशी दशा करून टाकली आहे. आज जेथे मार्क्सवाद नाही तेथे लोकशाहीची उपासना चालू आहे. पण तेथेही पद्धत हीच आहे; बाह्यरूपाविषयी माणसे पराकाष्ठेची दक्षता दाखवितात. अंतरात्म्याची त्यांना काळजी नसते. इतकेच नव्हे तर त्यांना त्याची दखलही नसते. जड सांगाडा म्हणजेच लोकशाही अशी त्यांची श्रद्धा असते. निवडणुका, मतदान, लोकसभा, अध्यक्ष, उपाध्यक्ष, पॉइंट ऑफ ऑर्डर, कोरम, सभासदांचे हक्क, मतमोजणी, यांविषयी लोक जसे दक्ष असतात तसे सर्व राष्ट्राची जबाबदारी प्रत्येकाने घेणे, समाजहितासाठी अंग झिजविणे, आपणच केलेल्या कायद्याचे पालन करणे, सार्वजनिक कारभार निर्मळ राखणे, बुद्धिवादाची जोपासना करणे, प्रत्येकाच्या कर्तृत्वाचा विकास करण्याचा प्रयत्न करणे इत्यादींविषयी मुळीच नसतात. लोकशाहीच्या धर्माच्या उपासनेत याचा अंतर्भाव होतो हे त्यांना पटतच नसते. म्युनिसिपालिटीच्या खताच्या गाड्या आपल्या शेतात नेणे, जकात न देता गावात माल आणणे, प्राप्तीवरील कर चुकविणे, आपल्या घराच्या सोयीनी रस्ते करणे, पब्लिक सर्व्हिस कमिशनचे आदेश धुडकावून आपल्याच पित्त्यांची वर्णी लावणे, जातीयवादाला चिथावून निवडणुका लढविणे हे आचार करणाऱ्यांना 'तुम्ही लोकशाहीशी द्रोह करीत आहा' असे जर कोणी म्हटले तर ते मिर्झा राजे जयसिंग यांच्याप्रमाणेच चकित होतील. आपण मतदान केले आहे, निवडणुका लढविल्या आहेत, लोकसभेत भाषणे केली आहेत इत्यादी आपल्या आचाराकडे बोट दाखवून आपली लोकशाहीवरील श्रद्धा ते क्षणार्धात सिद्ध करतील.

शिक्षणातील कर्मकांड :

 जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मनुष्याच्या या वृत्तीचा प्रत्यय आपणास येतो. सध्याच्या शिक्षणशास्त्राच्या व्यवहारात तर तिचा कळस झालेला दृष्टीस पडतो. अमुक एका पद्धतीनेच पाठ घेतला पाहिजे असा आग्रह या क्षेत्रात असतो. तो इतका की अर्थ न कळला तरी चालेल, विषय न समजला तरी चालेल, पण पद्धत अवलंबिली गेलीच पाहिजे अशी उत्तरे तज्ज्ञ म्हणविल्या जाणाऱ्या शिक्षकांनी दिलेली मी ऐकली आहेत. हा रानटीपणाचा कळस आहे, आणि या रानटीपणावर शिक्कामोर्तब झालेले आहे. पाठांची परीक्षा घेणारे जे परीक्षक त्यांना पाठाचा विषय येत नसला तरी चालते. कित्येक वेळा तो येत नसतो. संस्कृताचा गंधही नसणारा परीक्षक संस्कृतचा पाठ किंवा रसायनात मुळीच गती नसणारा मनुष्य रसायनाचा पाठ पाहून त्या शिक्षकाला पास-नापास करतो. आणि हे शास्त्राला, विद्यालयांना व विद्यापीठांनाही मंजूर आहे. याचा अर्थ असा की अध्यापन ही एक कसरत झाली आहे. ही कर्मकांडातील प्रक्रिया झाली आहे. अमुक कृती केली की अमुक फल मिळते, असे अंधपणे अदृष्टधर्मातल्याप्रमाणे येथे ठरविले जाते. तेथे कार्यकारण, अनुभव, प्रत्यक्ष मूल्यमापन यांचा संबंध राहिलेला नाही. काही हातवारे झाले की जादू होते. त्याप्रमाणे काही ठराविक चाकोरीतून शिक्षक वा विद्यार्थी यांची प्रश्नोत्तरे व तदनुषंगाने काही हातवारे झाले की अध्यापनाचे कार्य झाले अशी शिक्षकांची श्रद्धा आहे आणि या शिक्षणामुळे मुलांच्या बुद्धीचा, कर्तृत्वाचा, चारित्र्याचा विकास कितपत झाला याचे मापन पुढे कोणीच करीत नसल्यामुळे कर्मकांडाचे फल स्वर्गात किंवा नरकात किती मिळते हे जसे अज्ञात आहे तसे या पद्धतीचे झाले आहे. निश्चित ज्ञान, जिज्ञासा, चारित्र्य, कर्तृत्व हा जो आत्मा तो बुद्धिपुरस्सर दुर्लक्षिला जावा ही नरोटीच्या उपासनेची अगदी परमसीमा होय.
 मावळातील खेड्यात गणेशचतुर्थीच्या दिवशी शेतकरी शेतात जाऊन पिकाच्या मध्यभागी झाडाची एक लहानशी फांदी पुरून ठेवतो. ही चाल आज अनेक वर्षे रूढ आहे. तसे करण्याचे कारण तेथे कोणालाच माहीत नाही. एका जुन्या पुस्तकात त्याचे कारण पुढीलप्रमाणे दिलेले आहे. या महिन्यापासून पाऊस कमी होतो. शेतजमीन थोडी उघडी पडते व मग तेथे उंदीर फिरू लागतात आणि पिकांची खराबी करतात. शेतात या वेळी पुरुषभर उंच असे डांभे पुरून ठेवले की त्यावर कावळे येऊन बसतात व ते उंदरांना मारतात. त्या भयाने मग उंदीर येईनासे होऊन पिकांची खराबी होत नाही. पण शेतकऱ्यांना यातले काहीच माहीत नाही. ते हा एक धार्मिक विधी म्हणून करतात. त्याचे फल सर्व धार्मिक विधीप्रमाणे अदृष्टच आहे. त्यामुळे म्हणजे फलाचे मूल्यमापन नसल्यामुळे, हेतू व कृती यांचा प्रत्यक्ष संबंध अज्ञात राहिल्याकारणाने शेतकरी दहापंधरा डांभे न पुरता एकच पुरतात व तोही साधारण हातभर उंचीचा ! तो पिकाच्या खाली झाकून जात असल्यामुळे त्याचा काहीच उपयोग नसतो. पण धार्मिक विधीच्या प्रत्यक्ष उपयोगाची चिकित्सा करावयाची नसते. यांत्रिक कसरत झाली की आपले काम संपले, पुढे सर्व दैवाधीन आहे अशीच भावना असते.
 आपले वनमहोत्सव, आपल्या 'अधिक धान्य पिकवा' यांसारख्या मोहिमा, आपला ग्रामोद्धार, आपल्या विकास योजना, या सर्वांना कालांतराने हे धर्मविधीचे रूप प्रात होणार आहे अशी मला भीती वाटते. अन्नधान्याच्या मोहिमा का फसल्या त्याची चिकित्सा करताना अनेक तज्ज्ञांनी असे सांगितले आहे की, नेमलेल्या अधिकाऱ्यांनी जड यंत्राप्रमाणे हुकमाची तालीम करण्यापलीकडे काहीच केले नाही. विहिरी खणा म्हटले तेव्हा त्यांनी विहिरी खणल्या. गावात जुन्या विहिरी किती आहेत, डागडुजीने दुरुस्त किती होऊ शकतील, त्यांचे पाणी किती पुरेल याचा विचारही त्यांनी केला नाही. विहीर खणणे हा त्यांच्या मते अदृष्टफल देणारा धार्मिक विधी होता. तो त्यांनी केला. खते वाटणे, शेतकऱ्यांना बियाणाचा पुरवठा करणे, तगाई देणे या सर्वांचा कारभार असाच चालू आहे. कहींनी तर पुण्यामुंबईच्या हपिसांत बसून, इतकी खते दिली आहेत, इतके बी दिले आहे, तेव्हा इतके पीक येणारच असा हिशेब करून वर्षअखेर तसा अहवालही लिहून टाकला. काही अभ्यासकांनी अशी तक्रार केली आहे की हिंदुस्थान सरकारकडे येणारे पुष्कळ आकडे असे असतात. वनमहोत्सवातही असे अनेक प्रकार घड़ल्याचे ऐकू येते. झाडे लावा असा हुकूम येताच झाडे लावली गेली. त्यांची निगा, त्यांचे खतपाणी, त्यांची उपयुक्तता, त्यांतील तारतम्य याचा विचार बऱ्याच ठिकाणी झाला नाही. म्हणजे हा धर्मविधी झाला. हे कर्मकांड झाले.
 आज या योजना आखताना त्या योजकांच्या मनात हेतू स्पष्ट असतो. तो वर्तमानपत्रांतून जाहीर झालेला असतो. त्यावर व्याख्याने करविलेली असतात. असे असूनही त्यांचा व्यवहार होताना हेतू व कृती यांचा संबंध स्पष्ट राहात नाही. हेतूचा विसर पडतो, विपर्यास होतो व कृती अर्थशून्य होऊन त्यांना धार्मिक विधीचे व कर्मकांडाचे रूप येते. मग कालांतराने काय होईल यांची सहज कल्पना करता येईल. शेंडी, घेरा, गंध, स्नानसंध्येच्या वेळचे हातवारे, या जुन्या कसरती आहेत, त्याचप्रमाणे आरोग्यसप्ताहातील स्वच्छता, वनमहोत्सवातील वृक्षारोपण, गांधी सप्ताहातील सूतकताई, बी. टी. कॉलेजमधील शिक्षकांचे पाठ, अन्नधान्य मोहिमेतील विहिरी खणणे, बांध घालणे, खते टाकणे, ग्रामविकास योजनेतील चरांचे संडास, खतांचे खड्डे, यांना कसरतीचे स्वरूप येईल. आणि राष्ट्रद्रोहाची इतर कृत्ये कितीही केली तरी सूतकताई, खतांचे खड्डे, वृक्षारोपण, चरांचे संडास यांकडे बोट दाखवून त्यावेळचे नागरिक आपण पूर्ण राष्ट्रनिष्ठ असल्याची ग्वाही देतील. राष्ट्रधर्म तो हाच अशीच त्यांची श्रद्धा होईल. मग पाकिस्तानाशी संगनमत करणे, पोलिशी राज्य प्रस्थापित करणे, जातीयता पेटवून तिच्या आधारे अधिकारारूढ होणे, घटनेचा दरक्षणी उपमर्द करणे यांसारखी पातके करूनही आपण राष्ट्राशी किंवा लोकशाहीच्या तत्त्वाशी द्रोह केला असे त्यांच्या स्वप्नातही येणार नाही. त्यांच्यावर तसा कोणी आरोप केला, तर ते मिर्झा राजांप्रमाणे विस्मित होतील. कारण राष्ट्रनिष्ठा, लोकशाही यांचे तोपर्यंत सांगाडे बनलेले असतील आणि तेच त्यांचे उच्चरूप अशी श्रद्धा त्यांच्या मनात दृढ होऊन जाईल. मग धर्माप्रमाणेच राष्ट्रनिष्ठा, लोकसत्ता यांची विटंबना होईल. आज होतच आहे. पण ती स्वार्थी हेतूने, दुष्टपणाने होत आहे. पुढे श्रद्धेने, भाविकपणाने होऊ लागेल; कारण तेच राष्ट्रधर्माचे रूप, तोच उच्च राष्ट्रधर्म, तीच खरी लोकसत्ता असा भोळा भाव लोकांच्या मनात दृढ होईल.
 जुने धर्मशास्त्र व अर्वाचीन मार्क्सवाद यांच्या प्रवर्तकांनी एक गोष्ट गृहीत धरलेली आहे. एकदा समाजाला काही व्यवस्था लावून दिली, की ती कायम टिकते, तसा तिच्यात स्वयंभू गुण असतो, असा त्यांचा समज आहे. हा समज अगदी भ्रामक आहे. मानव हा चल घटक आहे. तो घोटीव नियमात कधीही बसत नाही; त्यामुळे वर सांगितल्याप्रमाणे दरवेळी त्या त्या काळी प्रवर्तित केलेल्या धर्मतत्त्वातील आत्मा कालांतराने नष्ट होतो, व त्याला जडरूप येते. म्हणून ही गृहीत गोष्ट चूक आहे हे ध्यानात घेऊन आपण सतत जागरूक राहिले पाहिजे. लोकशाहीला अखंड जागरूकता, सावधानता अवश्य असते, असे नेहमी म्हणतात. पण कोणत्याही समाजव्यवस्थेला या सावधतेची आवश्यकता आहे असे दिसून येईल. आपल्या डोळ्यांवर क्षणभर जरी झापड आली, मुहूर्तभर जरी आपण बेसावध राहिलो तरी आपल्या हातातले श्रीफल नाहीसे होऊन नरोटी तेवढी शिल्लक राहील. म्हणून—

न हि प्रमादात् परमस्ति कश्चित् । वधो नराणामिह जीवलोके ।
प्रमत्तमर्था हि नरं समन्तात् । त्यजन्त्यनर्थाश्च समाविशन्ति ॥

(या लोकी मनुष्यांना बेसावधपणापेक्षा घातक असे काहीच नाही. बेसावध मनुष्याला सर्व प्रकारचे वैभव सोडून जाते व त्याला आपत्ती चहू बाजूंनी घेरतात.) महाभारत - सौप्तिकपर्व १०।१९
 या वचनाची जाणीव नित्य ठेवून आपल्या समाजरचनेच्या तत्त्वांना जडरूप येऊ नये अशी आपण सतत चिंता वाहिली पाहिजे.

नोव्हेंबर १९५३