Jump to content

महाराष्ट्र संस्कृती/साहित्य, कला व विद्या

विकिस्रोत कडून


११.
साहित्य, कला व विद्या
 


 सातवाहन ते यादव या पंधराशे वर्षांच्या दीर्घ कालखंडातील सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट आणि यादव या पाच महाराष्ट्रीय राजघराण्यांच्या स्वराज्य साम्राज्याचा, पराक्रमाचा, राज्यकारभाराचा आणि तत्कालीन इतर राजसंस्थांचा इतिहास येथवर आपण पाहिला. त्याचप्रमाणे तत्कालीन धर्म, समाजरचना व आर्थिक जीवन यांचेही स्वरूप आपण अभ्यासिले आता साहित्य, कला, विद्या इ. संस्कृतीच्या इतर घटकांचा विचार करावयाचा आहे. त्यांतील साहित्याचा प्रथम विचार करू.

( १ ) साहित्य
 अगदी पहिल्या प्रकरणात मराठी भाषेची परंपरा विवरून सांगितली आहे. मूळ भाषा संस्कृत. तिच्यापासून भिन्न प्रांतांत भिन्न प्राकृत भाषा निर्माण झाल्या. त्यांतील महाराष्ट्री प्राकृत ही महाराष्ट्राची सातवाहनकाळची भाषा होय. या महाराष्ट्रीपासूनच पुढे अपभ्रंश भाषा निर्माण झाली. हिलाच प्रथम देस भासा म्हणत. आणि तिचाच विकास होऊन यादवकालीन सराठी सिद्ध झाली. तेव्हा साहित्याचा विचार करताना प्रथम महाराष्ट्रीतले साहित्य, नंतर महाराष्ट्री अपभ्रंश साहित्य आणि नंतर यादवकाळातील मराठी साहित्य अशा क्रमाने या महाराष्ट्रीय साहित्याचा इतिहास आपल्याला पाहावयाचा आहे.

गाथासप्तशती
 सातवाहन काळी महाराष्ट्राची महाराष्ट्री ही भाषा होती हे मागे अनेक प्रमाणे देऊन सांगितलेच आहे. या महाराष्ट्रीतला अगदी पहिला आणि महत्त्वाच्या दृष्टीनेही अग्रगण्य असा काव्यग्रंथ म्हणजे 'गाथासप्तशती-' 'गाहासत्तसई' हा होय. सातवाहन राजा हाल याने इ. सनाच्या पहिल्या शतकात याचे संपादन केले. हा ग्रंथ त्याने स्वतः रचलेला नाही. हे सलग, सबंध असे काव्य नाही. त्या काळी लोकांच्या, विशेषतः ग्रामीण जनतेच्या, मुखी असलेल्या सातशे गाथांचा म्हणजे श्लोकांचा हाल राजाने केलेला हा संग्रह आहे. यामुळेच, हे त्या काळच्या सर्व महाराष्ट्राचे काव्य आहे, असे म्हणतात. सर्व महाराष्ट्राच्या जीवनाचे दर्शन यात घडते ते यामुळेच.

शृंगार रस
 या काव्यातील मुख्य रस शृंगार हा आहे. आणि पुरुषाच्या भावना, स्त्रीच्या भावना, मुग्धा, प्रौढा यांच्या भावना, एकनिष्ठ प्रेम, व्यभिचारी प्रेम अशा शृंगार रसाच्या सर्व छटा या गाथांतून दृष्टीस पडतात. पण एक गोष्ट चटकन ध्यानात येते ती ही की गाथासप्तशतीत जास्त भर व्यभिचारी शृंगारावर आहे. एकनिष्ठ प्रेम, पतिव्रतांचे प्रेम यात नाही असे नाही. पण अशा गाथा मधून मधून आढळतात. बहुसंख्य गाथा व्यभिचारी शृंगारच्याच आहेत. याचा असा एक चमत्कारिक परिणाम झाला आहे की टीकाकारांनी ज्या गाथांत व्यभिचार भाव नाही त्यांचाही अर्थ वाटेल ती ओढाताण करून, कल्पना लढवून, व्यभिचारदर्शक असाच लावला आहे.
 'शरद् ऋतूतील शुभ्र चांदणे, कांडलेल्या नव्या तांदळाप्रमाणे, स्वच्छ दिसते. धान्याची समृद्धी झाल्यामुळे अशा चांदण्या रात्री गरीबसुद्धा स्वच्छंदाने गाणी गातो.' या गाथेत (६८९) निसर्गाचे उत्तम वर्णन आहे. आणि नेहमीच्या ठरीव संस्कृत उपमा टाकून कांडलेल्या तांदळाची उपमा दिल्यामुळे त्याला ग्रामीण जिवंतपणा आला आहे. पण याही गाथेत, 'नवरा चांदण्यामुळे शेतावर गेला आहे, तेव्हा रान मोकळे आहे' असा ध्वनित अर्थ टीकाकारांनी शोधून काढला आहे.
 सोज्ज्वळ शृंगाराचे एक उदाहरण देतो. 'लग्नाचे वेळी गायिका मंगल गीते गात आहेत. आणि जणू त्यामध्ये होणारा पतीच्या नावाचा उल्लेख ऐकण्याकरताच नववधूच्या अंगावर रोमांच उत्सुकतेने उभे ठाकले आहेत. '
 शृंगारवर्णनाबरोबरच निसर्गवर्णने, प्राण्यांची वर्णने, शिकारीची वर्णने या गाथांत आली आहेत. त्यामुळे ग्रामीण जीवनाचे खरे दर्शन त्यांतून घडते हे म्हणणे सार्थ ठरते.


गौरव
 गाथासप्तशती हा काव्यकोश असा काव्यसौंदर्याने नटलेला असल्यामुळे प्राचीन काळच्या पंडितांनी सुद्धा त्याचा मुक्तकंठाने गौरव केला आहे. बाणभट्ट म्हणतो, 'एखाद्या राजाने उत्तम रत्नांचा संग्रह करावा तसा सातवाहन राजाने हा सुभाषितांचा कोश रचला आहे.' उद्योतन सूरी याने आपल्या कुवलयमाला या ग्रंथात ( इ. स. ७७८ ) म्हटले आहे की 'राजसभेतील कवींच्या सहकार्याने हाल राजाने असा अक्षय्य कोश रचला की निरंतर उपयोगाने सुद्धा त्याचे सौंदर्य लोपले नाही.' प्रसिद्ध कवी राजशेखर यानेही सप्तशतीचा असाच गौरव केला आहे. 'सातवाहन राजाने अनेक ठिकाणांहून गाथा जमवून त्यांचा संग्रह केला, त्यामुळे लोकांचा आनंद संकोच तर नाहीच पावला, उलट तो द्विगुणित झाला.'
 संस्कृत साहित्यशास्त्रावर अनेक पंडितांनी ग्रंथ रचलेले आहेत. त्यांतील आनंदवर्धन, धनंजय, मम्मट, विश्वनाथ यांसारख्या मोठमोठ्या ग्रंथकारांनी सुद्धा सप्तशतीतील अलंकारांची उदाहरणे दिली आहेत. यावरून हे अलंकार किती मान्यता पावले होते हे ध्यानात येईल. निरनिराळ्या बारा साहित्यशास्त्रज्ञांनी तरी अशी गाथांची उदाहरणे आपल्या ग्रंथांत दिली आहेत.

हरिविजय
 वाकाटक राजे संस्कृतप्रमाणेच प्राकृताचेही अभिमानी होते आणि त्यांतील सर्वसेन आणि द्वितीय प्रवरसेन यांनी स्वतः 'हरिविजय' आणि सेतुबंध' ही महाराष्ट्री प्राकृतात काव्येही रचली आहेत. 'हरिविजय' हे काव्य सध्या उपलब्ध नाही. पण दण्डी, आनंदवर्धन, अभिनवगुप्त यांनी त्याचे उल्लेख करून प्रशंसाही केली आहे. अभिनवगुप्ताच्या उल्लेखावरून 'पारिजातहरणा'चा प्रसंग या काव्याचा विषय आहे असे दिसते. स्वर्गातून सत्यभामेसाठी श्रीकृष्णाने पारिजात वृक्ष आणला ही ती पारिजातहरण कथा होय. आनंदवर्धनाने ध्वनिकाव्याचे उदाहरण म्हणून हरिविजयातील एक गाथा दिली आहे. आणि कुंतकाने, 'सर्वसेनाचे काव्य सौकुमार्यामुळे सुंदर झाले आहे,' असे म्हटले आहे. सर्वसेनाने काही प्राकृत सुभाषितेही रचली आहेत व त्यांतील काहींचा सध्याच्या गाथासप्तशतीत समावेशही झालेला आहे. आपल्या प्राचीन ग्रंथांत मागून लोक वाटेल तशी भर टाकीत असत हे प्रसिद्धच आहे. त्यातलाच हा प्रकार असावा.
 सर्वसेन व त्याचे वंशज यांच्या राजवटीत वत्सगुल्म हे विद्येचे केंद्र बनले होते. तेथे रचलेली काव्ये व सुभाषिते यांच्या योगे वच्छोमी (वत्सगुल्मी) नामक नवीन, वैदर्भी रीतीसारखी रीतीही प्रचारात आली होती, असे राजशेखराने कर्पूरमंजरीत केलेल्या उल्लेखावरून दिसते.


सेतुबंध
 दुसरे महाकाव्य म्हणजे प्रवरसेनाचे 'सेतुबंध' हे होय. हे महाकाव्याला उचित अशा विदग्ध शैलीत रचलेले आहे. बाणभट्टाने याचा गौरव करताना म्हटले आहे की 'ज्याप्रमाणे रामचंद्राची वानरसेना सेतूच्या योगे समुद्रपार करून गेली, त्याप्रमाणे प्रवरसेनाची कीर्ती 'सेतुबंध' या काव्यसेतूच्या योगाने समुद्रपार गेली.' आनंदवर्धनानेही या काव्याची मनसोक्त स्तुती केली आहे. कवी दण्डीचा श्लोक पहिल्या प्रकरणात दिलाच आहे. 'महाराष्ट्र भाषा ही सर्वश्रेष्ठ प्राकृत भाषा का ? तर तिच्यात सेतुबंधासारखे सूक्तिरत्नांचे सागर आहेत म्हणून.'

कर्पूरमंजरी
 राजशेखर हा कवी, नाटककार व साहित्यमीमांसकही होता. तो नवव्या शतकाच्या अखेरीस होऊन गेला. त्याचे 'कर्पूरमंजरी' हे नाटक महाराष्ट्री प्राकृतात आहे. तो स्वतःला 'महाराष्ट्रकुलचूडामणी' असे म्हणवितो. कर्पूरमंजरी हे चार अंकी नाटक असून कुंतल राजकन्या कर्पूरमंजरी आणि राजा चंद्रपाल यांची प्रणयकथा यात वर्णिली आहे कर्पूरमंजरीच्या विरहाचे वर्णन एका श्लोकात कवीने जुन्या संस्कृत परंपरेप्रमाणेच केले आहे. हार गळ्यात टोचू लागले, चंद्र ताप देऊन लागला, गार वारा देह जाळू लागला, असे हे वर्णन आहे.

जैन साहित्य
 जैनांनी महाराष्ट्री प्राकृतात विपुल साहित्य लिहिले आहे. त्यात प्रामुख्याने कथा आणि चरित्रे आहेत.
  'वामुदेव दिंडी' हा ग्रंथ कथासाहित्यात प्राचीनतम गणला जातो. त्यात कृष्णाचा पिता वसुदेव याच्या दिंडीचा म्हणजे भ्रमणाचा वृत्तांत दिला आहे. या ग्रंथात हरिवंशाची प्रशंसा केलेली आहे. 'वासुदेव दिंडी'चे दोन खंड आहेत. दोन्ही मिळून २८००० श्लोक आहेत. संघदास गणि व धर्मसेन गणि या खंडांचे कर्ते आहेत. 'समराहिच्चकथा' या ग्रंथात उज्जैनचा राजा समरादित्य याची कथा आहे. हरिभद्र सूरी हा याचा कर्ता. त्याने हा ग्रंथ आठव्या शतकात रचला. यात नायक नायिकांच्या प्रेमाचे वर्णन प्रधानतः असून इतरही अनेक कथांची गुंफण केलेली आहे. 'कुवलयमाला' ग्रंथ उद्योतनसूरी याने सन ७७६ मध्ये रचला. काव्यशैलीत लिहिलेला हा ग्रंथ प्राकृत कथा-साहित्यात अनुपम गणला जातो. ग्रंथावरून कर्त्याची विद्वत्ता व निरीक्षणशक्ती यांचा प्रत्यय येतो. बनारस, पैठण इ. अनेक नगरींची वर्णने यात आहेत. 'भुवन सुंदरी' ही कथा समुद्रसूरी याने सन ९१७ मध्ये लिहिली आहे.

पद्मचरित्र
 चरित्रग्रंथांत विमलसूरी याने सन ६० च्या सुमारास रचलेले 'पऊम चरिय'- 'पद्म चरित्र' - हे फार प्रख्यात आहे. यात रामचरित्राचे वर्णन आहे. मात्र मूळ वाल्मिकी रामायणापेक्षा हे फार निराळे आहे. मूळ रामायणात राम एकपत्नी आहे. पऊम चरित्रात रामाला चार पट्टराण्या आहेत. ग्रंथाच्या अखेरीस सीता, लव, कुश यांनी जैन धर्माची दीक्षा घेतली असे वर्णन आहे. चरित्रग्रंथांत 'महावीर चरित' हा दुसरा महत्त्वाचा ग्रंथ होय. गुणचंद्रगणी याने हा सन १०८२ मध्ये रचला. हा ग्रंथ महत्त्वाचा खरा, पण हे चरित्र दंतकथात्मक आहे. त्यात ऐतिहासिक दृष्टी नाही. याचे आठ भाग असून श्लोक १२०२५ आहेत. लेखकाच्या शैलीवर कालिदास, माघ, बाणभट्ट इ. संस्कृत कवींचा प्रभाव स्पष्ट दिसतो. आठव्या भागात महावीरांच्या निर्वाणप्राप्तीचे वर्णन आहे. त्या वेळी अकरा शिष्यांना- गणधरांना- त्यांनी उपदेश केला, दीक्षा दिली त्याचे वर्णनही आहे. इतरही महावीरांसंबंधीच्या अनेक कथा ग्रंथात असून निसर्ग- वर्णनेही उत्तम आहेत. 'पासनाह चरिय'- 'पार्श्वनाथ चरितं' ही गुणचंद्रगणीचीच रचना असून ती सन ११११ मध्ये केलेली आहे. याच्या पाच भागात तेविसावे तीर्थंकर पार्श्वनाथ यांचे चरित्र आहे. हा ग्रंथ गद्यपद्यमिश्रित आहे. काव्यावर संस्कृत शैलीचा प्रभाव असून ग्रंथकाराने अनेक संस्कृत सुभाषिते दिली आहेत. शेवटच्या भागात पार्श्वनाथांच्या निर्वाणाचे वर्णन आहे. त्या आधी त्यांनी मथुरा, काशी, आमलकल्पा या नगरीत केलेल्या कार्याचे वर्णन आहे. पार्श्वनाथांनीही या वेळी अनेक गणधरांना-शिष्यांना-उपदेश केला व दीक्षा दिली शिव, सुंदर, मोप व जय हे त्यांचे प्रमुख शिष्य होत.
 या खेरीज प्रभाकर चरित्र, मनोरमा चरित्र, आदिनाथ चरित्र, कुमारपाल चरित्र, मुनीसुव्रतस्वामी चरित्र, सुपसनाह चरित्र - सुपार्श्वनाथ चरित्र असे अनेक चरित्रग्रंथ व पंचमीकहा, कालकाचार्य कथा अशा अनेक कथा जैनांनी महाराष्ट्री प्राकृतात रचल्या आहेत.
 हे सर्व ग्रंथ काव्यदृष्ट्या चांगले असले तरी त्यांत ऐतिहासिक दृष्टी नाही. हिंदूंच्या या काळातल्या सर्व रचना पुराणवृत्तीच्या आहेत, तशाच जैनांच्याही आहेत. हिंदु- धर्म सोडलेल्या कोणत्याच इतर धर्मीयांनी इतिहासदृष्टी प्रगट केलेली नाही.

पुष्पदंत
 अपभ्रंश किंवा देसभासा या भाषेतील सर्वात श्रेष्ठ कवी म्हणजे पुष्पदंत. हा प्रथम शैव होता. पण पुढे त्याने जैन पंथाचा स्वीकार केला. हा दहाव्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेला. त्या वेळी राष्ट्रकूट राजा कृष्णराज ( ३ रा ) हा मान्यखेट येथे राज्य करीत होता. त्या राजाचा महामात्य भरत याने पुष्पदंताला आश्रय दिला आणि ग्रंथरचनेची प्रेरणाही दिली. 'महापुराण', 'नायकुमार चरिऊ ' ( नागकुमार चरित्र ) आणि 'जसहर चरिऊ' (यशोधर चरित्र) असे पुष्पदंताचे तीन ग्रंथ सध्या उपलब्ध आहेत. 'महापुराणा'चे आदी पुराण व उत्तर पुराण असे दोन भाग आहेत. यात एकंदर त्रेसष्ट जैन थोर पुरुषांची चरित्रे आहेत. आदी पुराणात पहिला तीर्थंकर ऋषभदेव याचे चरित्र आहे. उत्तर पुराणात राहिलेले तेवीस तीर्थकर आणि त्यांचे समकालीन महापुरुष यांची चरित्रे आहेत. दोन्ही खंड मिळून वीस हजार श्लोकसंख्या भरते. हा ग्रंथ लिहिण्यास पुष्पदंताला सहा वर्षे लागली. 'या ग्रंथात जे आहे तेच सर्वत्र आहे व यात जे नाही ते अन्यत्र कोठेही नाही' असे त्याने अभिमानाने लिहिले आहे. पुराणाच्या अनेक अध्यायांत त्याने आपला आश्रयदाता जो भरत त्याची प्रशस्ती गायिली आहे.
 'नायकुमार चरिऊ' हे एक खंडकाव्य असून त्यात पंचमीचा उपवास करणाऱ्या नागकुमाराचे चरित्र वर्णिलेले आहे. त्याच्या शेवटच्या संधीत - अध्यायात - सांख्य, मीमांसा, क्षणिकवाद, शून्यवाद, इ. दार्शनिक मतप्रणालींचे खंडन पुष्पदंताने केले आहे. त्यावरून त्याची गाढ विद्वत्ता दिसून येते. 'जसहर चरिऊ' हेही एक खंड- काव्य असून त्यात यशोधर नामक एका पुराण पुरुषाचे चरित्र वर्णिलेले आहे. हे खंडकाव्य म्हणजे पुष्पदंताच्या भाषाप्रभुत्वाचा उत्तम नमुनाच आहे. त्यात विरहाची व दारिद्र्याची सुंदर वर्णने आढळतात. समकालीन सामंत सरदारांवर या काव्यात पुष्पदंताने कठोर टीका केली आहे. हे काव्य इतके लोकप्रिय झाले की अनेक शैव पंडितांनी त्याचे संस्कृतात अनुवाद केले आहेत. नाथूराम प्रेमी यांनी पुष्पदंताबद्दल म्हटले आहे की पुष्पदंत हा अपभ्रंश भाषेचा महाकवी होता. त्याच्या काव्यातले ओज, प्रवाह, रस व सौंदर्य हे विशेष अन्यत्र दुर्लभ आहेत. त्याचे शब्दभांडार विशाल आहे. शब्दालंकार व अर्थालंकार या दोहींनी त्याचे काव्य समृद्ध आहे.

कनकामर
 अपभ्रंश मराठीतला दुसरा कवी म्हणजे कनकामर हा होय. हाही प्रारंभी ब्राह्मण असून पुढे जैनपंथी झाला. असई, तेर, धाराशीव इ. मराठवाड्यातील गावांचा तो उल्लेख करतो. ही गावे प्राचीन काळी राष्ट्रकूटांच्या राज्यात मोडत होती. याची भाषा यादवकालीन मराठींचे पूर्वरूप दाखविते. 'करंडक चरिऊ' हे त्याचे मुख्य काव्य. यात त्याने राष्ट्रकूटांनी जे विजय मिळविले त्यांचेच, इतर नावांनी, आपल्या काव्यात वर्णन केले आहे.
 धाडीवाहन हा चंपापुरीचा राजा आणि पद्मावती ही कुसुमपूरची राजकन्या. करंडक हा त्यांचा पुत्र. हा मोठा पराक्रमी असून त्याने विशाल साम्राज्य स्थापन केले होते. आयुष्याच्या शेवटी पुत्रावर राज्य सोपवून हा अरण्यात तपश्चर्येला निघून गेला. असे या काव्याचे कथानक आहे.
 महाराष्ट्री आणि अपभ्रंश ही मराठीची दोन पूर्वरूपे. त्यांतील साहित्याचा परिचय येथवर करून घेतला. आता खुद्द मराठीकडे वळावयाचे. यादवकालाअखेर मराठीत मुकुंदराजाचा 'विवेकसिंधू', महानुभावांचे काही ग्रंथ आणि 'ज्ञानेश्वरी' व 'अमृतानुभव' असे ग्रंथ झाले. त्यांतील ज्ञानेश्वरीचा परिचय एकंदर संतवाङ्मयाच्या विवेचनात येईल. येथे प्रथम विवेकसिंधू आणि नंतर महानुभावांचे वाङ्मय यांचा विचार करू.

विवेकसिंधू
 मुकुंदराजाचा 'विवेकसिंधू' हा ग्रंथ इ. स. ११८८ साली लिहिलेला आहे. त्यानंतर पुढल्याच वर्षी यादवांच्या राज्याची स्थापना झाली. शारंगधर नामक कोणा राजाच्या कारकीर्दीत नृसिंहाचा पुत्र बल्लाळ याचा पुत्र जयंतपाळ याच्या प्रेरणेने हा ग्रंथ रचला अशी माहिती स्वतः मुकुंदराजाने ग्रंथाच्या शेवटी दिली आहे. शारंगधर राजा कोण, कोठला हे अजून निश्चित झालेले नाही. आपल्या आजेगुरूसंबंधी लिहिताना 'वैन्यगंगेच्या तीरी मनोहर अंबा नगरी'चा उल्लेख मुकुंदराजाने केला आहे. नागपूर प्रांतात भंडाऱ्याजवळचे अंभोर म्हणजेच वाइनगंगेच्या काठची अंबानगरी होय. यावरून मुकुंदराज नागपूर प्रांतातला असावा असे दिसते. पण त्याची एक समाधी जोगाई अंग्याजवळही आहे. त्यामुळे त्याचे स्थान निश्चित करता येत नाही.
 मुकुंदराजाने श्री शंकराचार्यांचे अद्वैत तत्त्वज्ञानच 'विवेकसिंधू' या ग्रंथात मराठीत सागितलेले आहे. 'श्री शांकरोक्तिवरी । मी बोलिलो मराठी वैखरी । म्हणूनी येथे धरावी चतुरी | शास्त्रबुद्धी ।' असे त्यानेच म्हटले आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विवेकसिंधूबद्दल लिहिताना म्हणतात, 'मराठीत मायावादी अद्वैत सिद्धान्ताची विवेचनात्मक मांडणी करणारा विवेकसिंधू हा पहिला ग्रंथ होय. वेदान्त सिद्धान्ताची समग्र, क्रमबद्ध व प्रकरणवारीने मांडणी करणारा याच्या तोडीचा दुसरा ओवीबद्ध ग्रंथ मराठीत नाही.' विवेकसिंधूची १८ प्रकरणे व ओवीसंख्या सुमारे १७०० असून हा ग्रंथ गुरुशिष्यसंवादरूपाने लिहिलेला आहे.
 मराठीत पहिला ग्रंथ झाला तोच इतका विद्वन्मान्य असावा, हे मराठीला भूषणावह आहे. याच्या आधीचे वाङ्मय काही तरी असलेच पाहिजे; पण ते सध्या उपलब्ध नाही. म्हैसूरजवळील श्रवणबेलगोला येथे गौतमेश्वराचा शिलालेख - श्री चामुंडराये करवियले-, सोमेश्वराच्या मानसोल्लासातील काही गीते अशा तऱ्हेचे लेखनच फक्त उपलब्ध आहे. तेव्हा मराठीतला विवेकसिंधू हा पहिला ग्रंथ होय. आणि वर सांगितल्याप्रमाणे तो मराठीला भूषणभूत झालेला आहे.

महानुभाव
 मुकुंदराजानंतर यादवकाळातील महत्त्वाचे मराठी साहित्य म्हणजे महानुभाव पंथाचे. याचे संस्थापक श्री चक्रधरस्वामी हे मूळचे एक गुजराथचे राजपुत्र. त्या राजपुत्राचे नाव हरपाळदेव असे होते. त्याला जुगाराचे व्यसन होते. त्या पायी कफल्लक होऊन त्याने घर सोडले. इ. स. ११८५ साली ऋद्धिपूर येथे गोविंदप्रभू तथा गुंडम राऊळ यांचे शिष्यत्व त्याने पत्करले. त्यानंतरही त्याने दोन लग्ने केली. पण शेवटी वैराग्य येऊन त्याने संसार सोडला व तो महाराष्ट्रात आला. १२६३ साली त्याला श्री दत्तात्रेयाचे दर्शन झाले व मग त्याने पंथाची स्थापना केली व संन्यास- दीक्षा घेतली. चक्रधरस्वामींच्या पंथाला महानुभाव, महात्मा, जयकृष्णीय, अच्युत पंथ अशी निरनिराळी नावे आहेत. त्यांतील 'महानुभाव' या नावानेच तो ओळखला जातो.
 हा पंथ पूर्ण निवृत्तिवादी असून द्वैतमताचा पुरस्कर्ता आहे. हंस, दत्त, श्रीकृष्ण व चक्रधर हे चार अवतार पंथ मानतो. यांतील दत्त हा त्रिमुखी नसून एकमुखी आहे. तो विष्णूचा अवतार आहे.

प्रमाण ग्रंथ
 'सिद्धान्तसूत्रपाठ ' (चक्रधरांच्या उक्ती), 'भगवद्गीता' आणि 'भागवत' हे तीन ग्रंथ पंथ प्रमाण मानतो. वेद मानीत नाही. कृष्ण उपासना, संन्यास, द्वैतवाद, भिक्षावृत्ती, कपायवस्त्रे ही या पंथीयांची ठळक वैशिष्ट्ये आहेत.
 चक्रधरांच्या मते मोक्ष, कर्मानुष्ठान याला महाराष्ट्राइतका योग्य असा दुसरा देश नाही. सात्विकता, सुखरूपता, निर्दोषत्व, गुणसंपन्नता हे गुण येथे त्यांना दिसून आल्यामुळे, आपल्या पंथाचा प्रचार त्यांनी महाराष्ट्रातच केला. अर्थातच पंथाचे सर्व वाङमय मराठीतच आहे.

सिद्धान्तसूत्रपाठ
 'सिद्धान्तसूत्रपाठ' हा महानुभावांचा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ. यात चक्रधरांच्या उक्ती आहेत. त्यांचा शिष्य महीन्द्रभट याने ही वचने लिहून ठेविली. त्यांचा दुसरा शिष्य केशवसूरी याने त्यांतील काही निवडून हा ग्रंथ तयार केला. त्यात एकंदर १६०९ सूत्रे आहेत. आचार्यसूत्रे ती हीच. महानुभावीयांना हा ग्रंथ वेदाइतकाच पूज्य आहे. 'लीळाचरित्र' हा दुसरा ग्रंथ. हा महीन्द्रभटाने रचला आहे. हे चक्रधरांचे चरित्र आहे. यात त्याच्या एकंदर १५०९ लीळा दिलेल्या आहेत. 'दृष्टान्तपाठ' हा असाच महत्त्वाचा ग्रंथ आहे. यातील मूळ सूत्रे व त्यांवरील दृष्टान्त हे चक्रधर- स्वामींनी सांगितलेले आहेत. त्यांवर दार्ष्टान्तिके लिहून हा ग्रंथ केशवराजसूरी अथवा केसोवास याने इ. स. १२८० च्या सुमारास तयार केला. यात एकंदर ११४ दृष्टान्त असून त्यांत चक्रधरांचे सर्व तत्त्वज्ञान आलेले आहे.

भानुभट
 पद्य ग्रंथांमध्ये भास्कर कविव्यास किंवा भानुभट याचा 'शिशुपालवध' हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. यात प्रामुख्याने श्रीकृष्ण व रुक्मिणी यांच्या शृंगाराचे वर्णन असून शिशुपाळवधाला १०२७ ओव्यांपैकी जेमतेम २०० ओव्या दिलेल्या आहेत. कवीचा गुरुबंधू भावे देवव्यास याने त्यावर टीका केली की 'ग्रंथ निका जाहला; परी तो निवृत्ता जोगा नव्हेचि. शृंगारिया प्रवृत्ता जोगा जाहला.' हे ऐकून मग भास्कराचार्यानि 'एकादश स्कंध' ही भागवताच्या अकराव्या स्कंधावर टीका लिहिली. हा ग्रंथ १२७६ साली लिहिलेला असून त्याच्या ८२७ ओव्या आहेत. वि. ल. भावे यांच्या मते एकनाथांच्या ग्रंथाची सर याला नाही. कवीची टीका तुटपुंजी व त्रोटक वाटते. शिशुपाळवधात शृंगाराचा अतिरेक आहे तर यात वैराग्याचा. दामोदर पंडिताचा 'वत्सहरण' हा काव्यग्रंथ महानुभावांना फार प्रिय आहे. वत्सहरण या भागवतातील कथेवर हे ५०० ओव्याचे काव्य आहे. यात वृंदावन, कालिंदी, श्रीकृष्णाचे रूप यांचे उत्तम वर्णन आहे. भक्ती हा यातील मुख्य रस आहे. नरेन्द्र या कवीचे 'रुक्मिणी स्वयंवर' हे काव्य सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. यातील अलंकारवैभव, कल्पनाप्राचुर्य, वर्णनशैली अनेकांच्या मते अप्रतिम आहे.

ज्ञानप्रबोध
 विश्वनाथ बाळापूरकर यांचा 'ज्ञानप्रबोध' हा पद्य ग्रंथ तत्त्वज्ञानविषयक आहे. गीतेच्या १३ व्या अध्यायातील अमानित्वादी जी ज्ञानाची लक्षणे त्यांवर ही टीका आहे. यात ज्ञानेश्वरीतील शेकडो वाक्यार्थे जशीच्या तशी घेतली आहेत. याची रचना १३३१ साली झाली. 'ऋद्धिपूर वर्णन' हा नारायणपंडित व्यास तथा नारो बहाळिये याचा ग्रंथ असून त्यात ऋद्धिपूर हे जे महानुभावांचे आदिपीठ त्याचे वर्णन आहे. त्यातून कवीची गुरुभक्ती उत्कटत्वाने प्रगट होते. 'सैहाद्रि वर्णन' हा ग्रंथ राघवो पाध्ये तथा रवळोबास याने रचला असून, त्यात महानुभावांच्या एकमुखी दत्ताचे लीळा-चरित्र वर्णिले आहे. याच्या एकंदर ७२९ ओव्या असून तो इ. स. १३३२ साली रचलेला आहे.

ढवळे
 चक्रधराची एक शिष्या महदंबा हिने श्रीकृष्णाच्या लीला वर्णन केल्या आहेत. त्या काव्याला 'ढवळे' म्हणतात. पंथात या ढवळ्यांना फार मान आहे. ही मुख्यतः रुक्मिणी हरणाची कथा असून ती श्रीकृष्णभक्तीने भरलेली आहे.
 याशिवाय प्रश्नावली, नामाचे ठाय, मूर्तिज्ञान, पूजावसर (भावे देव व्यास) मूर्तिप्रकाश, (केशवराज सूरी) स्मृतिस्थळ, श्रीकृष्ण चरित्र असे महानुभावांचे वाङ्मय आहे.

निवृत्ती
 महानुभाव पंथ हा पूर्ण निवृत्तिवादी होता. संसारात राहून मोक्षप्राप्ती होणे अशक्य आहे, असा त्यांचा सिद्धान्त होता. चक्रधराच्या सिद्धान्तसूत्रपाठातील काही वचने पाहा 'स्वदेशसंबंधु त्याज्यु, स्वग्रामसंबंधु त्याज्यु, संबंधीयांचा संबंधु तो विशेषता त्याज्यु' असा स्वामींचा उपदेश आहे. इतर निवृत्तिवादी पंथ फक्त संसार सोडावा असे सांगतात. पण चक्रधरांनी स्वग्राम, स्वदेश सर्वांचाच त्याग केला पाहिजे, असे सांगितले आहे. स्त्रीची अनन्वित निंदा हा निवृत्तीचाच एक भाग मानला जातो. चक्रधर म्हणतात, 'स्त्री म्हणजे मत्त द्रव्यांचा राओ गा । आणिक द्रव्ये सेविलिया माजविती, स्त्री दर्शनमात्रेच माजवी, चित्रीची ही स्त्री न देखावी'. भास्कराचार्याने एकादशस्कंधात स्त्रीविषयी असेच वर्णन केले आहे. 'स्त्री हे पापाची उत्तरपेठ, नरकाची राजवट, मुक्तीचे वज्रकपाट, कामिनी हे।' असे तो म्हणतो.
 साधकाची राहाणी अत्यंत घाणेरडी व किळसवाणी असावी, असे महानुभाव तत्त्वज्ञान सांगते. साधकाचा देह अस्थिपंजरासारखा असावा, अंगातली हाडे वाजतील असा असावा. त्याची वस्त्रे अत्यंत घाणेरडी असावी, शक्य तर स्मशानातली प्रेताची वस्त्रे नेसावी, त्याने सदैव प्रेतासारखे किंवा पोळलेल्या कुत्र्यासारखे राहावे, आणि अशा स्थितीत सदैव परमेश्वराचे चिंतन करावे. आपल्या पंथातील माणूस भेटला तर त्याच्याशीच फक्त बोलावे. इतर कोणाशी एक शब्दही कधी बोलू नये.

विचित्र तत्त्व
 पण यापेक्षाही महानुभाव पंथात एक विचित्र तत्त्व आहे. ते म्हणजे महानुभावाने कधी कोणाच्या उपयोगी पडू नये, हे होय. चक्रधर सांगतात, 'मसणीचे लाकूड, तेही वरी उपयोगा जाए । परी आपण कवणाचेही उपयोगा न वचावे.' याच्याही पुढे जाऊन चक्रधर म्हणतात की जिवंतपणी तर नाहीच, पण मेल्यावरही आपण कोणाच्या उपयोगी पडणार नाही याची काळजी घ्यावी. इतकी समाजविमुखता महानुभावांच्या निवृत्तीत आहे. याला कारण हे की 'दया, करुणा एके परमेश्वरीच आती' - फक्त परमेश्वराजवळच दया, करुणा हे भाव असतात, ते माणसाच्या ठायी असणे योग्य नाही, असे त्यांचे मत आहे.
 महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर महानुभावांचे फार प्रेम होते. केशवराजसूरीने एकदा चक्रधरांचा पट्टशिष्य नागदेवाचार्य यास विचारले की 'उद्धरण', 'संस्करण' ही प्रकरणे संस्कृतात लिहू काय ? त्यावर नागदेवाचार्य म्हणाला, 'नको गा, केशव देया. येणे माझे स्वामीचा सामान्य परिवारू नागवैल की. परमेश्वरे (चक्रधरांनी) सकळासी ब्रह्मविद्येचा लाभु द्यावा म्हणौनिचि महाराष्ट्रिये - मराठीत-निरोपिले गा. एरवी सर्वज्ञा (चक्रधरांना) काई देववाणी निरोपू न लाहे की गा ! म्हणौनि केशवा, संस्कृत सूत्रबद्ध प्रकरण न करी तू.'

गुप्त लिपी
 सर्वसामान्य जनांना ब्रह्मविद्येचा लाभ व्हावा म्हणून महानुभावांनी आपले साहित्य मराठीतून लिहिले. पण पुढे याचा त्यांना विसर पडला. पंथस्थापनेनंतर ६०/७० वर्षांनीच आपले सर्व साहित्य अत्यंत गुप्त ठेवावे, अशी बुद्धी त्यांना झाली आणि गुप्त, सांकेतिक अनेक लिपी तयार करून त्यांनी आपले सर्व वाङ्मय त्यात लिहून ठेविले. चक्रधरांच्या मागून पंथात अराजक माजले आणि त्याचे निरनिराळे तेरा पंथ झाले. प्रत्येक जण आपल्या पंथाला सर्वश्रेष्ठ मानू लागला. आणि आपापले ज्ञान गुप्त ठेवण्याच्या हेतूने प्रत्येकाने आपली स्वतंत्र लिपी केली.

प्रभाव ?
 महानुभाव पंथाचा मराठी जनतेवर किती प्रभाव पडला याचा विचार करून हे विवेचन संपवू. पंजाबातमुद्धा या पंथाचा काहीसा प्रसार झाला होता. तेव्हा महाराष्ट्रात त्याच्या दसपट झाला असेल असे मनात येते. पण तसे काही झालेले नाही. या पंथाबाहेर त्यातील थोर पुरुषांचा उल्लेख, मागल्या इतिहासात चुकूनसुद्धा कोणी केलेला आढळत नाही. मानभावी - ढोंगी - असा तिरस्कारवाचक शब्द मात्र त्यांच्याविषयी रूढ झालेला आहे. याचे एक कारण असे दिसते की आपल्या मठाबाहेर पडून समान्य जनांत मिसळून महानुभवांनी कधी कीर्तन प्रवचने केली नाहीत. नामदेव वाळवंटात उभा राहून विठ्ठलाचा गजर करीत असे. त्या कीर्तनाला हजारो लोक जमत. तसा प्रयत्न महानुभावांनी कधी केला, असे इतिहासात आढळत नाही. त्यातून कोणाच्या कधी उपयोगी पडावयाचे नाही, असे त्यांचे व्रत असल्यामुळे लोकांत त्यांच्याविषयी तिरस्कार वाटत असला पाहिजे. आणि शेवटचे कारण म्हणजे गुप्त लिपी. वरील कारणे असूनही त्यांचे ग्रंथ काही प्रमाणात तरी वाचले गेले असते. पण तो मार्ग पूर्ण बंद झाला. त्यामुळे महाराष्ट्र, मराठी भाषा व मराठी सामान्य जन यांवर प्रेम असूनही महानुभाव पंथाचा महाराष्ट्रात प्रसार झाला नाही आणि येथे त्यांचा कसलाही प्रभाव पडला नाही.

क्रांती ?
 चातुर्वर्ण्य, जातिभेद याच्या विरुद्ध महानुभावपंथ होता. ही त्याने मोठीच क्रान्ती केली, असे अर्वाचीन काळचे काही पंडित सांगतात. तशी क्रांती महानुभावांनी केल्याचे मुळीच आढळत नाही. वारकरी पंथात ज्ञानेश्वर, एकनाथ यांच्या बरोबरीनेच नामदेव व तुकाराम यांचे महत्त्व आहे. पहिले दोघे ब्राह्मण व दुसरे दोघे शूद्र. पण समाज आणि वारकरी त्यांना मुळीच कमी लेखीत नाही. उलट महानुभाव पंथात वर जे ग्रंथकार सांगितले त्यांत एकही ब्राह्मणेतर नाही. मग क्रांती झाली ती कोठे ? महानुभावपंथ अवैदिक आहे, तो वेद मानीत नाही आणि चातुर्वर्ण्य मानीत नाही. यात अर्वाचीन पंडितांना क्रांती दिसते. पण ती आजच्या महानुभावांनाच मान्य नाही. १९३७ साली नागपूरच्या न्यायालयात सनातन पंडितांनी महानुभावांवर खटला केला होता. त्या वेळी बाळकृष्ण महानुभावांसारख्या पंडितांनी अनेक पुरावे देऊन आणि अर्वाचीन पंडितांचेच आधार देऊन, हा पंथ पूर्णपणे वेदानुयायी आहे व त्याने रोटी-बेटीबंदी मोडल्याचे एकही उदाहरण नाही, असे सिद्ध केले. न्यायमूर्ती पुराणिक यांनी आपल्या निकालपत्रात स्वच्छ म्हटले आहे की 'हा पंथ वेदानुयायी आहे यात कसलाही संदेह नाही.'
 वचनप्रामाण्य, कलियुग, कर्मवाद, विषमता या सर्व बाबतीत असेच आहे. या पंथाने कसलीही क्रान्ती केलेली नाही. जेवावे कसे, वस्त्र कसे नेसावे इतक्या क्षुद्र गोष्टीतही चक्रधरांच्या आज्ञा काटेकोर पाळल्या पाहिजेत, नाही तर विधिभंग होतो, असा दण्डक होता. इतके वचनप्रामाण्य असताना क्रान्ती कशी होणार ? कलियुग- कल्पनेत मनुष्य कालवश आहे, स्वतंत्र नाही, असा अर्थ आहे. तो महानुभावांना सर्वस्वी मान्य आहे. 'कलियुगाचे अंती कव्हणी धर्माधर्म न वर्तेती, वर्णावर्ण लोपती, पापरता प्रजा होती, स्त्रियांच्या ठायी पतिव्रता धर्मु न वर्ते,' असे चक्रधरस्वामी सांगतात. चातुर्वण्य, जातिभेद यांविषयी वर सांगितलेच आहे. काही महानुभाव थोर पुरुष हीन जातीयांबरोबर जेवले, राहिले हे खरे. पण त्याने काय होणार ! वर्ण, जाति- विषमता समाजातून नष्ट करण्यासाठी त्यांनी काय केले, असा प्रश्न आहे. तसे काही केले नाही व तसे आमचे तत्त्वज्ञानही नाही, असे आजचे महानुभाव सांगतात. तेव्हा महानुभावांनी समाजक्रान्ती केली हा डॉ. कोलते, डॉ. अ. ना. देशपांडे यांचा दावा फोल आहे. (त्यांच्याच पुस्तकांतून वरील अवतरणे व माहिती दिली आहे.)
 असो. महानुभाव पंथाचे साहित्य व त्यांचे तत्त्वज्ञान यांची माहिती येथवर दिली. त्यांच्या विषयी अनेक मतमतांतरे आहेत. पण त्यांनी आपले ग्रंथ गुप्त करून टाकल्यामुळे महाराष्ट्रीयांवर त्यांचा कसलाही प्रभाव पडला नाही हे सत्य आहे. तरीही मराठीत इतके वाङ्मय त्यांनी निर्माण करून ठेविले याबद्दल महाराष्ट्र त्यांचा ऋणी आहे, यात वाद नाही.
 सातवाहन ते यादव या कालखंडातील साहित्याचा येथवर विचार केला. आता या कालातील वास्तू, शिल्प, चित्र, नृत्य, गायनवादन इ. कलांचा विचार करावयाचा.

( २ ) कला
 

- जगन्मान्य
 साहित्याच्या बाबतीत अखिल भारताने किंवा जगाने महाभारत, रामायण, शाकुंतल, रघुवंश यांच्याप्रमाणे वंद्य मानावी अशी वाङ्मयकृती महाराष्ट्रात या काळात झाली नाही. गाथासप्तशतीबद्दल कोणी तसा अभिमान वाहतात. पण ती एकजिनसी अशी काव्यकलाकृती नाही. एका राजाने केलेले ते संकलन आहे. एकहाती, एकजिनसी कलाकृतीची सर तिला येणार नाही. पण साहित्याच्या बाबतीत हा कमीपणा असला तरी वास्तू, शिल्प, मूर्ती आणि चित्र या कलांच्या बाबतीत मात्र तसे नाही. अखिल भारताने, इतकेच नव्हे, तर अखिल जगताने, मस्तक नम्र करून अभिवादन करावे अशा कलाकृती अजंठा, वेरूळ, घारापुरी, रामटेक येथे भारतीय कलाकारांनी निर्माण करून ठेवलेल्या आहेत. वेरूळ अजिंठ्याच्या कोरीव कलेला आणि चित्रकलेला आजही जगात तोड नाही. कोरीव कला ईजिप्त, असीरिया, रोम, ग्रीस येथेही होती. पण महाराष्ट्रातील वेरूळ अजिंठ्याच्या कलेची सर यांपैकी कोणत्याही देशातील कलेला येत नाही.
 आता आपण या कलांचा इतिहास सातवाहन, वाकाटक इ. महाराष्ट्रातील राजघराण्यांच्या कालखंडांच्या क्रमाने पाहू.

वैभवशाली
 सातवाहन कालात नागरी जीवन समृद्ध होते. अर्थात उत्तम वास्तुकला हस्तगत झाल्यावाचून अशी समृद्धी येत नाही, हे उघड आहे. आज उत्खननात जे अवशेष सापडले आहेत त्यावरून पाहता त्या काळी भाजलेल्या पक्क्या विटांची व कौलांनी आच्छादिलेली उत्तम घरे बांधण्याची कला हस्तगत झालेली होती, हे स्पष्ट दिसते. त्याचप्रमाणे वेषभूषेच्याही कलेत उत्तम प्रगती झालेली दिसून येते. स्त्रियांचे कर्णभूषणे, केशभूषणे, बाहुभूषणे, गळ्यातले, पायातले, कमरेचे- सर्व प्रकारचे दागिने तेव्हा घडवीत असत. आणि सर्व प्रकारची प्रसाधने वापरून स्त्रिया आपले सौंदर्य नटवीत असत. गाथासप्तशतीतील वस्त्रांच्या वर्णनावरून हेच दिसते. अंकुश, दुकूल, निवसन, पट, पटक, पट्टांशुक, साऊली, सिचय, अशी नावे स्त्रियांच्या नेसत्या वस्त्रांची, आणि कंचुकी, कंचुकिका, कूर्पास ही स्तनांशुकांची नावे सप्तशतीत आढळतात. या अनेक नावांवरूनच ते जीवन साधे, प्राथमिक नसून चांगले समृद्ध व वैभवशाली होते हे उघड आहे.
 पण वस्त्रालंकार, घरे ही कला असली तरी ती साधी कला होय. चित्र, शिल्प, मूर्ती या खऱ्या श्रेष्ठ कला होत. तेव्हा सातवाहन कालातील या कलांचे स्वरूप आता पाहू.

लेणी
 सातवाहन कालातील शिल्पकला, आणि चित्रकला ही सर्व पर्वतांतून कोरलेल्या लेण्यांमध्ये दृष्टीस पडते. कोंडाणे, भाजे, पितळखोरे, अजिंठा, नाशिक, जुन्नर, कार्ले आणि बेडसे इतक्या ठिकाणी आणि नाणे घाटात ही लेणी आहेत. यांतील एक नाणे घाटातील लेणे वगळता बाकी सर्व लेणी ही बौद्धांची आहेत. म्हणजे ती धर्मप्रेरणेने झालेली आहेत. विहार आणि चैत्य असे या लेण्यांचे द्विविधरूप प्रामुख्याने दिसते. विहार म्हणजे बौद्धभिक्षूंच्या पावसाळ्यातील राहण्याच्या जागा. मध्यभागी दीर्घ चौकोनी जागा आणि तिच्या तीन्ही बाजूला कोरून काढलेल्या खोल्या. (प्रत्येक खोलीत एकेक दगडी बाक असते.) यात भिक्षूंनी राहावयाचे. दुसरा प्रकार म्हणजे चैत्य. हे बौद्धांचे पूजास्थान होय. मध्यभागी एक विस्तीर्ण मंडप, त्याच्या दोन्ही बाजूला चौकोनी, षट्कोनी किंवा अष्टकोनी खांब, मंडपाच्या मध्यभागी बुद्धाच्या अवशेषांवर उभारलेला स्तूप, त्याच्या भोवती प्रदक्षिणा पथ अशी चैत्याची रचना असते.

दर्शनी भाग
 दर्शनी भागावर कमानी कोरलेल्या आहेत. आणि आतील स्तंभावर सिंह, वाघ, घोडे यांच्या प्रतिमा, पक्ष्यांच्या प्रतिमा, यक्षांच्या प्रतिमा कोरलेल्या दिसतात. हे कोरीव काम इतके सुरेख व नाजूक आहे की हे पशुपक्षी, ही माणसे आता आपल्या देखत हालचाली करतील असे वाटते. इतका जिवंतपणा त्यांच्यात आहे.

कार्ले, नाशिक
 महाराष्ट्रातील ही लेणी महाराष्ट्रीय कलावंतांनीच कोरलेली आहेत. महाराष्ट्रातील राजे, महारठी, महाभोज, सार्थवाह, श्रेष्ठी, गृहपती, सुवर्णकार, त्यांच्या घरधनिणी यांच्या आश्रयाने ते कलावंत राहात. सुमारे अडीचशे शिलालेख या लेण्यांमध्ये आहेत. त्यांतच ही माहिती दिलेली आहे. कार्ले येथील लेणे वैजयंतीचा श्रेष्ठी भूतपाल याने कोरविले आहे. आणि जंबुद्वीपातील सर्वांत उत्तम शैलगृह असे जे शिलालेखात त्याने म्हटले आहे, ते अगदी सार्थ आहे. नाशिक येथील लेणे क्र. १९ हे सातवाहन नृपती कन्ह याच्या राजवटीतले आहे. महाक्षत्रप नहपान व त्याचा जावई उपवदात आणि मुलगी दक्षमित्रा यांचे कोरीव लेख क्र. १४ व १० यांत आहेत. लेणे क्र. ३ हे गौतमीपुत्र सातकर्णी याची माता महादेवी गौतमी बलश्री हिने कोरविले असून तेथील शिलालेखात आपल्या पुत्राच्या महापराक्रमाचे वर्णन तिने केलेले आहे. या लेण्याला गौतमीपुत्र विहार असे म्हणतात. या विहाराच्या दोन्ही बाजूंस खोदीव चौकटी आहेत. ही सर्व बौद्ध कला होय.

नाणे घाट
 नाणे घाटातील लेणी हा अपवाद आहे. प्राचीन काळी कोकण आणि देश यांना जोडणारा मुख्य रस्ता म्हणजे नाणे घाट. तेथे बारीक बारीक अनेक लेणी आहेत. एका मोठ्या लेण्यात एका विस्तीर्ण दालनात सातवाहन कुलातील राजपुत्रांच्या प्रतिमा आहेत. म्हणजे या लेण्यांच्या मागे सातवाहन नृपतींची ऐहिक प्रेरणा आहे. प्रतिमा आता भग्न झालेल्या असून प्रतिमांवर कोरलेली नावे, आणि महाराणी नावनिका हिचा लेख अजून शिल्लक आहे. सातवाहन नृपतींनी घडविलेले सार्वजनिक स्थापत्याचे हे पहिले उदाहरण आहे.

अजिंठा
 अजिंठ्याला कोरीव कला आहेच. पण तेथे चित्रकलाही आहे. त्यामुळे या लेण्यांचे महत्त्व विशेष आहे. लेणे क्र. १० मध्ये बोधिवृक्षाला वंदन करण्यासाठी निघालेला राजा व त्याचा परिवार याचा रंगपट आहे. राजा व त्याचे दासदासी यांच्या मुद्रेवरील भाव फार सुंदर साधले आहेत. या परिवारात एक नृत्यांगना आहे. तिचे चित्र रंगविण्यात कलाकाराने आपले सर्व कसब पणाला लावलेले आहे. सर्पिणीच्या वक्रतेने आपल्या देहाला या नृत्यांगनेने त्रिभंग गिरकी दिली आहे. या चित्रावरून व तिच्याच शेजारी असणाऱ्या एका वाद्यांगनेवरून त्या काळीही नृत्य व वादन कला किती प्रगल्भतेला गेली होती हे कळून येते. या लेण्यात षड्दंत जातकातील एक कथा अत्यंत हळुवारपणे चितारलेली आहे.

सातवाहन काल
 अजिंठ्याची कोरीव लेणी व तेथील चित्रकला यांना इ. पू. पहिल्या शतकात प्रारंभ झाला आणि ते काम इ. सनाच्या सातव्या शतकापर्यंत चालू होते. वरील क्र. १० चे लेणे सातवाहन कालचे आहे; तर क्र. १६, १७, व १९ ही लेणी वाकाटकांच्या काळची (२५०-५५०) आहेत. ही तीनही लेणी भारतातल्या कोणत्याही लेण्यापेक्षा जास्त सुंदर आहेत, असे बर्जेस या पाश्चात्य कलाकोविदाने म्हटले आहे. समोर मोठा व्हरांडा व आत मंडप अशी रचना आहे. व्हरांड्यात व मंडपातही मोठे स्तंभ असून त्यांवर कोरीव काम केलेले आहे. दरवाज्याच्या दोन्ही बाजूंच्या स्तंभांवर मकरवाहन गंगेची मूर्ती खोदलेली आहे. मंडपात एका ठिकाणी गंधर्व-अप्सरांचे मिथुन कोरलेले आहे. मंडपात चैत्यगृह असून तेथे भगवान बुद्धाची मूर्ती, धर्मचक्रप्रवर्तन मुद्रेत, सिंहासनावर बसलेली, दाखविलेली आहे. अंतर्भागात भिक्षूंसाठी सोळा खोल्या खोदल्या आहेत. कोरीव कामाप्रमाणे येथील चित्रकामही फार सुंदर आहे. येथील बहुतेक चित्रे बुद्धाच्या शेवटच्या जन्मातील प्रसंगांविषयी आहेत. एका चित्रात राजा अजातशत्रू बुद्धाच्या दर्शनास जात असल्याचे दाखविले आहे. शेवटचे चित्र एका सुंदरीचे आहे. तिचा पती भिक्षू झाल्याचे कळताच तिला अतीव दुःख झाले. ग्रिफीथ हा समीक्षक म्हणतो की 'शोक, कारुण्य आणि कथाकथनाची पद्धत या बाबतींत या चित्राला मागे टाकणारी कृती कलेच्या इतिहासात सापडणार नाही. फ्लॉरेन्स, व्हेनिस येथल्या चित्रकारांना यापेक्षा जास्त चांगले भावदर्शन साधले नसते.' सतरा क्रमांकाच्या लेण्याची रचना साधारण अशीच असून त्यात अनेक जातककथांतील प्रसंग रंगविलेले आहेत. १९ क्रमांकाच्या लेण्यात सर्वात जास्त कोरीव काम आहे. त्यात बुद्धमूर्ती आहेत, अप्सरा आहेत; वेलपत्ती आहेत. नागराज व त्याची राणी यांच्या मूर्ती आहेत. या लेण्याला गंधकुटी असे नाव आहे.

वास्तुकला
 वाकाटकांनी जशी लेणी कोरविली तशीच अनेक मंदिरेही बांधली. प्रवरसेनाने बांधलेले प्रवरेश्वराचे देवालय, रामगिरीवरील रामगिरीस्वामीचे देवालय, आणि अश्वत्थखेटकातील विष्णूचे देवालय यांचा उल्लेख त्यांच्या शिलालेखात येतो. प्रवरसेनाने प्रवरपूर येथे श्रीरामचंद्राचे एक उत्तुंग देवालय आपल्या मातेकरिता बांधले होते. ही सर्व देवालये आता अवशेषरूपातच दिसतात. पण तेवढ्यावरून त्यांच्या सौंदर्याची व भव्यतेची कल्पना येते. श्रीरामचंद्राच्या देवालयातील काही शिल्पपट्ट आता उत्खननात सापडले आहेत. एक शिल्पपट्ट भरतभेटीचा आहे आणि रामायणात वर्णन केल्याप्रमाणेच राम, लक्ष्मण, सीता, भरत यांच्या मुद्रेवरील भाव दर्शविण्यात कलाकाराला अपूर्व यश आलेले आहे. दुसरा शिल्पपट्ट वालीवधाचा आहे. त्यांतील भावदर्शनही असेच सुरेख आहे.
 यावरून सातवाहन कालानंतर स्थापत्य, चित्र व शिल्प या कलांत परागती झालेली नसून वाकाटक काळात, त्यांच्या आश्रयाने प्रगतीच झालेली आहे, असे दिसून येते.

चालुक्य
 बदामीचे व कल्याणीचे - म्हणजे पूर्व व उत्तर- चालुक्य यांची कीर्ती त्यांच्या राजकीय कार्यापेक्षा सांस्कृतिक कामगिरीमुळेच अधिक झाली, असे कोणी म्हणतात. दोन्ही घराणी मिळून, भारतातील विस्तीर्ण प्रदेशावर चालुक्यांची सत्ता ४०० वर्षे चालू होती. तेवढ्या काळात भारतात साहित्य आणि विविध कला यांची चांगलीच जोपासना झालेली दिसते. अजंठा येथील काही प्रसिद्ध भित्तिचित्रे चालुक्य राजांच्या प्रेरणेमुळे निर्माण झालेली आहेत. चालुक्यांच्या काळी कोरीव कलेचीही प्रगती झालेली होती. बदामीजवळच्या पहाडात वैष्णव व जैन मंदिरे कोरलेली आहेत. त्यांतील विष्णुमंदिर मंगलीशाच्या वेळी कोरलेले असून त्याचे शिल्पकाम अगदी अद्भुत आहे. स्थापत्यकलेच्या दृष्टीने तर चालुक्यांची कामगिरी इतकी भव्य आहे की त्या काळी निर्माण झालेली नवीन शिल्पशैली चालुक्य शैली या नावानेच ओळखली जाते. या शैलीत इंडोआर्यन व द्रवीड या दोन शिल्पकलांचे मिश्रण असून त्याशिवाय काही नवीन कल्पनाही दिसतात. नक्षीदार उंच शिखरे, गोल गुळगुळीत स्तंभ, घुमटाकृती छते, सुरेख मूर्ती व सुंदर भिंती ही त्या शैलीची वैशिष्ट्ये आहेत.

मंदिरे
 बदामीच्या चालुक्यांच्या राजवटीत ऐहिक, पट्टकदल, बदामी व तेर या ठिकाणी अनेक सुंदर मंदिरे बांधली गेली. त्यांतील बदामीचे मलगिट्टी शिवालय व ऐहोळचे मेगुटी मंदिर याचे शिल्पकाम तर असामान्य आहे. पट्टकदल येथील संगमेश्वर, नाथ व विरुपाक्ष यांतील विरुपाक्षमंदिर सर्वोत्कृष्ट आहे.
 नृत्यकला व साहित्य यांनाही चालुक्यांनी उदार आश्रय दिला होता. दुसरा विक्रमादित्य याची राणी लोक महादेवी हिने अनेक संगीतकार व नर्तक यांना आश्रय दिला होता. शिवाय चालुक्य व राष्ट्रकूट या राजघराण्यांतील अनेक स्त्रिया स्वतः नृत्यनिपुण होत्या. चालुक्यांच्या राजवटीत रविकीर्ती, बिल्हण, पंप, रन्न, दुर्गासिंह इ. प्रसिद्ध संस्कृत व कन्नड कवी उदयास आले. त्यांना विपुल राजाश्रय होता. या वंशातील काही स्त्रीपुरुष स्वत:ही कवी होते. चंद्रादित्य देवाची राणी विजय महादेवी हिने उत्तम प्रतीची संस्कृत काव्ये रचली आहेत. सोमेश्वर (तिसरा) हा तर स्वतःच पंडित म्हणून प्रसिद्ध होता.

राष्ट्रकूट
 राष्ट्रकूटांच्या काळातही शिल्प व कोरीव कलेचा असाच उत्कर्ष झालेला आहे. त्यांची लेणी प्रामुख्याने वेरुळला आहेत. अजंठ्याप्रमाणेच वेरुळ हे कोरीव लेण्यासाठी प्रसिद्ध आहे. तेथे बौद्ध, ब्राह्मणी व जैन अशा तीनही धर्मपंथांची लेणी आहेत. आणि तीनही प्रकारची लेणी महाराष्ट्राच्या कोरीव कलेची आज जगाला साक्ष देत आहेत. यांतील बौद्ध लेणी ही ५५० ते ८८० या कालखंडात खोदलेली आहेत. त्यांची संख्या बारा आहे. पुढची १७ लेणी ही हिंदुधमींयांची असून ती सातव्या व आठव्या शतकात कोरलेली आहेत. एकंदर ३४ गुंफा किंवा लेण्यांपैकी शेवटची ५ लेणी जैनांची असून ती राष्ट्रकूटांच्या काळी कोरलेली आहेत.

कैलास
 राष्ट्रकूट कालातले सर्वात श्रेष्ठ लेणे म्हणजे कैलास लेणे होय. हे लेणे सर्व जगात अद्वितीय व अलौकिक असे शिल्पकाम मानले जाते. राष्ट्रकूट राजा कृष्ण (पहिला) याच्या कारकीर्दीत इ. सनाच्या आठव्या शतकात हे कोरलेले आहे. हे संपूर्ण शिवमंदिर अखंड खडकातून खोदून काढलेले असून त्यात शंकराच्या आयुष्यातील भिन्न प्रसंग कोरलेले आहेत. शिव-पार्वती विवाह, त्यांची सारीपाट क्रीडा, नटराजरूपाने शिवाने केलेले नृत्य, रावणाने आपल्या शिरकमलाने केलेली शिवपूजा, अशी अनेक दृश्ये या लेण्यात आहेत. शिवाय गंधर्व मिथुने, गजलक्ष्मी, विष्णू, इ. मूर्ती व सिंह, हंस इ. पशुपक्ष्यांच्या मूर्ती विपुल आहेत.
 वेरुळची राष्ट्रकूटकालीन लेणी निराळी दिसून येतात. त्यांच्या स्तंभांची रचना निराळी असते. हे स्तंभ चौकोनी असून त्यांची रांगच्या रांग लागलेली असते. वेरुळच्या दशावतार लेण्यातील स्तंभांची रचना अशीच आहे. राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक दंतिदुर्ग याने हे कोरविलेले आहे. त्याचा तेथे एक शिलालेखही आहे. येथली शैव आणि वैष्णव शिल्पे अत्यंत सुरेख आहेत. 'रावण की खाई' व 'रामेश्वर' या राष्ट्रकूटांच्या गुंफांत अनेक सुंदर मूर्ती पाहावयास मिळतात.

बौद्ध
 बौद्धांची लेणी अशीच सुंदर मूर्तींनी संपन्न आहेत. बोधिवृक्षाच्या छायेत बसलेला बुद्ध, सिंहासनावर बसलेला बुद्ध, बोधिसत्त्व, कुबेर यांच्या मूर्ती, पूर्णकलायुक्त षट्कोनी, अष्टकोनी स्तंभ, गंगायमुनांच्या मूर्ती, गंधर्व-मिथुने, इतर अनेक नृत्यमूर्ती, हे सर्व काम अप्रतिम आहे. मध्ये मोठा मंडप, भोवताली स्तंभ, त्यामध्ये गर्भगृह, भोवती विहार अशीच साधारणतः बौद्ध लेण्यांची रचना असते.

जैन
 वेरुळ येथील जैनांची लेणी दिगंबर पंथी असून त्यात गोमटेश्वराच्या प्रतिमा सर्वत्र आढळतात. तीर्थंकरांच्याही अनेक मूर्ती असून तेथील नक्षीकाम विशेष चांगले आहे. क्र. ३० चे लेणे हे छोटा कैलास या नावाने प्रसिद्ध असून, हे मंदिर द्रवीड पद्धतीचे आहे. गर्भगृहात भगवान महावीरांची मूर्ती असून बाजूच्या भिंतीत तीर्थंकरांच्या प्रतिमा आहेत. यक्षांच्या नृत्यमूर्ती, गंधर्व-मिथुने अशा मूर्तींही पुष्कळ असून उत्तरेकडील भिंतीत अष्टभुजा देवीचीही मूर्ती आहे. सभामंडपाच्या छतावर रंगीत चित्रांचे अवशेष अजूनही दिसतात. त्यावरून अजंठ्याप्रमाणे येथेही चित्रे काढलेली असावीत असे दिसते.
 सातवाहन ते चालुक्य अखेर म्हणजे सुमारे तेराशे वर्षांच्या काळातील महाराष्ट्राचे शिल्प, चित्र, स्थापत्य, मूर्ती या कलातील वैभव असे अद्वितीय आणि अलौकिक आहे.

घारापुरी
 वेरुळ, अजंठा, नाशिक, कार्ले येथल्याप्रमाणेच घारापुरी व अंबरनाथ येथील शिल्पही महाराष्ट्रीय कलाकारांना भूषणभूत असेच आहे. मुंबईपासून पाच सात मैलांवर समुद्रातील एका लहानशा बेटावर घारापुरी हे गाव आहे. या बेटावरील डोंगरात पाच लेणी खोदलेली असून त्यांत शिवपार्वतीविवाह, गंगावतरण, तांडवनृत्य, अंधकासुरवध, इ. शिवकथा साकार केलेल्या आहेत. ही दृश्ये फार रम्य असून ती शिवाचे जीवन डोळ्यांपुढे उभे करतात. मुख्य लेण्यात एक भव्य दालन असून त्यात अकरा हात उंचीची एक त्रिमुखी मूर्ती आहे. ही तीन मुखे ब्रह्मा, विष्णू, महेशांची असावी, असे एकमत आहे. मधले मुख उमेचे असून दुसरी दोन्ही शिवाचीच आहेत, असे दुसरे मत आहे. काही असले तरी जगातील अत्यंत भव्य अशा शिल्पाकृतीत या मूर्तीची गणना केली जाते. कारागिरीच्या कल्पनेची अतिशय उंच भरारी या शिल्पात दिसून येते. इतरही लेणी अशीच सुंदर असून त्यांत प्रचंड स्तंभ व अनेक मूर्ती आहेत. बेटाच्या दक्षिण बाजूला एक दगडी हत्ती होता. त्यावरून या स्थानाला 'एलेफंटा' हे नाव पडले. घारापुरीची लेणी तिसऱ्या ते सातव्या शतकाच्या काळात कोरलेली असावीत.

हेमाडपंती
 हेमाडपंती वास्तुकलेचा विचार करून महाराष्ट्रीय कलेचे हे विवेचन संपवू. रामदेवराव यादवाचा प्रधान हेमाडपंत याने एका विशिष्ट पद्धतीने महाराष्ट्रात अनेक देवळे बांधली. म्हणून त्या शिल्पपद्धतीस 'हेमाडपंती' असे नाव पडले. हेमाडपंती मंदिराची रचना चुना किंवा माती न घेता फक्त एकावर एक दगड ठेवून केली जाते. देवालयाच्या पायाची आखणी ज्या आकाराची असेल त्याच आकाराची पण लहान अशी शिखराची बैठक असते. प्रमुख दिशांना कोन येतील असा चौरस कल्पून, एका कोनासमोर प्रवेशद्वाराची व्यवस्था केलेल्या या इमारतीच्या पायाची आखणीच कोनबद्ध अशी असते. या पायावर उभारलेल्या भिंतींनी जे कोन बनतात त्या सर्व कोनांच्या रेषा जमिनीपासून निघून थेट कळसापर्यंत गेलेल्या असतात.

अंबरनाथ
 अकराव्या ते चौदाव्या शतकाच्या दरम्यान महाराष्ट्रात अशा पद्धतीने बांधलेल्या मंदिरांमध्ये अंबरनाथ, बलसाणे, महेश्वर, सिन्नर इ. देवालये महत्त्वाची आहेत. त्यांतील अंबरनाथ मंदिर सर्वोत्कृष्ट आहे. तेथे अकराव्या शतकात शिलाहार राजांनी बांधलेले शिवमंदिर हेमाडपंती आहे. त्याचे शिल्प अप्रतिम आहे. गाभाऱ्याच्या दरवाज्यावर शिवादी देवता, सिंह, हत्ती इ. आकृती कोरलेल्या आहेत. मंडपात अनेक स्तंभ असून त्यांवर आधारलेले घुमटाकृती छत आहे. मंदिराच्या भिंतीवर एकंदर ७० मूर्ती कोरलेल्या असून काही शिवाच्या तर काही विष्णूच्या अवतारांच्या आहेत. एका बाजूला त्रिभंगी नृत्यमुद्रेत महिषासुरमर्दिनीची मूर्ती व अष्टभुजा कामदेवतेची मूर्ती आहे. उत्तर कोकणातील हे मंदिर अद्वितीय असून शिलाहारांच्या मंदिर शिल्पाचा तो अत्युत्कृष्ट नमुना आहे.
 महाराष्ट्रातील कलावैभवाचे वर्णन येथवर केले. त्यात नृत्य, गायनवादन यांचे तपशीलवार वर्णन आलेले नाही. पण विशिष्ट अशी नृत्यपद्धती निर्माण न झाल्यामुळे असे झाले असावे. पण या मोठ्या कला महाराष्ट्राने जोपासल्या होत्या यात शंकाच नाही. प्रत्येक मंदिरात व लेण्यात नृत्ययुगले, नृत्यमूर्ती दृष्टीस पडतात. परमेश्वराला आपल्या गायनाने प्रसन्न करून घेतल्याचे उल्लेख इतिहासात सापडतात, त्यावरून हे स्पष्ट आहे. तेव्हा कोरीवकला, मूर्तिकला, स्थापत्य, चित्र आणि नृत्य व संगीत या कला सातवाहन ते यादव या कालात वैभवाला पोचल्या होत्या हे निर्विवाद आहे. (यादव कालाअखेरच्या संगीताचा विचार पुढील कालखंडातील एका लेखात केला आहे. )

विद्या
 
-व्याप
 सातवाहन - यादव या कालखंडातील साहित्य व कला यांचा विचार झाला. आता या कालातील विद्यांचा विचार करावयाचा. विद्या हा शब्द फार व्यापक अर्थाने येथे वापरला आहे. प्राचीन काळी भारतात तक्षशिला, नालंदा, वल्लभी, कांची, मदुरा अशी अनेक विद्यापीठे होती. त्यांमध्ये पारलौकिक व ऐहिक अशा दोन्ही विद्यांचा अभ्यास होत असे. वेद, उपनिषदे, षड्दर्शने, त्रिपिटक, जातक ग्रंथ हे बौद्ध ग्रंथ, जैनांचे ग्रंथ, या तिन्ही धर्माची मूलतत्त्वे, त्यांतील शैव, वैष्णव, हीनयान, महायान, श्वेतांवर, दिगंबर इ. पंथ या सर्वांचा अभ्यास तेथे होई. पण त्याबरोबरच वास्तुकला, स्थापत्यशास्त्र, वैद्यकशास्त्र, कृषिशास्त्र, चित्रकला, शिल्पकला, गणित, ज्योतिष, युद्धविद्या, अश्वपरीक्षा, गजपरीक्षा, रत्नपरीक्षा, रसायन, खाणींचे शास्त्र, पणकर्म (व्यापार विद्या), पाषाणकर्म, ( पाथरवटाची कला ), चर्मकर्म, धातुकर्म यांचाही अभ्यास होत असे. आणि या विद्यापीठांची व तेथील आचार्याची इतकी कीर्ती होती की भारतातल्या सर्व प्रांतांतून, इतकेच नव्हे, तर चीन, इजिप्त, अरबस्थान या परदेशांतूनही येथे विद्यार्थी येत असत.
 अशा व्यापक अर्थाने वरील काळच्या महाराष्ट्रातील विद्यांचा विचार करू लागताच, प्रथमच एक गोष्ट मनाला खटकते. ती ही की महाराष्ट्रात एवढ्या दीर्घ कालखंडात तक्षशिला, नालंदा, वल्लभी यांसारखे एकही विद्यापीठ नव्हते. येथे पैठण, नाशिक, कऱ्हाड ही विद्याकेंद्रे होती. आणि निरनिराळ्या विद्यांचा अभ्यासही येथे होत असे. पण वरीलसारखे एकही विद्यापीठ येथे नसावे ही उणीव मनाला जाणवल्यावाचून राहात नाही.
 सातवाहन ते यादव या कालखंडात पाचसहा राजवंश होऊन गेले. यांपैकी प्रत्येक राजवंशाच्या काळातील विद्याध्ययनाची तपशीलवार माहिती मिळत नाही. राष्ट्रकूट व यादव यांच्या काळची जरा सविस्तर मिळते. ती येथे देतो. इत्सिंग, ह्युएनत्संग यांची प्रवासवर्णने व इतरत्र येणारी त्रोटक वर्णने यांवरून असे दिसते की साधारणपणे शिक्षणाचे हेच स्वरूप या कालखंडाच्या प्रारंभापासून अखेरपर्यंत महाराष्ट्रात सर्वत्र होते.

संस्कृत विद्या
 वेदकाळी सर्व वर्णांना वेदाध्ययनाचा अधिकार होता. पण पुढे हळूहळू प्रथम वैश्य आणि नंतर क्षत्रिय वेदाध्ययनाकडे दुर्लक्ष करू लागले. आणि ब्राह्मणांतही सर्वत्र ब्राह्मण वेदाध्ययन करीत, असे नाही. पण वेदविद्येची परंपरा जी काही राहिली ती ब्राह्मणांनीच संभाळली यात शंका नाही. वेदविद्या हा शब्द व्यापक अर्थाने वापरला जाई. वेद, वेदांगे, उपनिषदे, व्याकरण, ज्योतिष, मीमांसा, धर्मशास्त्र (स्मृती), पुराणे, न्याय, निरुक्त, तर्कशास्त्र, इ. विषयांचा त्यात समावेश होई. म्हणजे विद्या याचा अर्थ संस्कृत विद्या असाच झाला आणि या काळात भिन्न भिन्न संस्थांतून जे शिक्षण दिले जाई ते संस्कृत विद्येचेच होते.

व्यवस्था
 निरनिराळे मठ ही विद्याध्ययनाची मोठी संस्था त्या काळी होती. बहुतेक मठ कोठल्यातरी देवळाशी संलग्न असत. अग्रहार ही दुसरी संस्था. राजे लोक, ब्राह्मणांनी निरंतर अध्ययन अध्यापन करावे म्हणून, त्यांना गावे दान देत. त्यांना अग्रहार म्हणत. त्या गावातील जमिनीवर त्यांचा योगक्षेम चालत असे. तिसरी संस्था म्हणजे कोणा धनिकाने किंवा गावाने दाने देऊन चालविलेल्या शाळा. या तीनही संस्थांत विद्यार्थ्यांची राहण्याची व पुष्कळ ठिकाणी जेवणाखाणाची सोय केलेली असे. विद्यार्थ्यांनी शिक्षण संपल्यावर यथाशक्ती गुरुदक्षिणा द्यावी अशी पद्धत होती.
 ध्रुव राजाचे धुळ्याचे ताम्रपट आहेत. त्यांत, तेथील ब्राह्मण वेद, वेदांगे, इतिहास, पुराणे, व्याकरण, न्याय, मीमांसा व निरुक्त यांत पारंगत होते, असे वर्णन आहे. यांतील व्याकरण विषयाला त्या काळी फार महत्त्व होते. अल्बेरुणीने हे मुद्दाम नमूद करून ठेवले आहे. धारवाड जवळच्या हेब्बाळ गावी एका लेखात नमूद केलेले आहे ( इ. ९७५ ) की मुजवेश्वर देवालयात एक मठ असून त्याला दोनशे एकर जमिनीचे दान दिलेले आहे. या उत्पन्नातून गुरुजींचा व शिष्यगणाचाही खर्च चालत असे. मनगोला व बळगावे या दोन गावी दोन लेख ११६१ व ११८३ या सालचे सापडले आहेत. या दोन्ही खेड्यांत संस्कृतशाळा होत्या. बळगावे येथे दक्षिणेश्वराच्या मंदिरात ही शाळा होती. आणि देवळाचे अधिकारी गावातून दाने जमा करून शाळेचा खर्च चालवीत असत. कान्हेरीला एक बौद्ध विहार होता. राजा अमोघवर्षाच्या काळात कोणी भद्रविष्णू धनिक होता. त्याने या विहाराला देणगी दिली होती. त्यातील काही भाग ग्रंथ विकत घेण्यासाठी खर्चावा, असे दानपत्रात सांगितले आहे. कान्हेरीला त्याप्रमाणे ग्रंथालय केलेलेही होते. धारवाड जिल्ह्यातील कळस हे गाव अग्रहार होते. तेथे एक संस्कृत विद्यालय होते. तेथील लेखात म्हटले आहे की तेथील दोनशे ब्राह्मण व्याकरण, राजनीती, साहित्यशास्त्र, तर्कशास्त्र, टीका यांत पारंगत होते. राष्ट्रकूट राजा गोविंद ४ था याच्या काळातील हे दानपत्र आहे. विजापूर जिल्ह्यातील सालोटगी हे गाव असेच अग्रहार होते. राजा कृष्ण (३ रा) याच्या काळी येथे संस्कृत विद्यालय होते. या राजाचा एक मंत्री नारायण याने सालोटगी येथे 'त्रयी पुरुष' हे मंदिर बांधले होते. त्या मंदिरात हे विद्यालय चालत असे. फार लांबून लांबून येथे विद्यार्थी येत आणि त्यांच्यासाठी सत्तावीस वसतिगृहे बांधलेली होती. १२ निवर्तने (अदमासे ६० एकर) जमिनीचे एक दान विद्यालयाला मिळाले होते. त्यातून येथील दिवाबत्तीचा खर्च भागत असे. ५० निवर्तनांचे दुसरे एक दान दिलेले होते. त्यातून आचार्यांचा योगक्षेम चाले. गावातील लोक लग्नमुंजीच्या प्रसंगी विद्यालयाला दाने देत. विद्यालयाची इमारत एकदा कोसळून पडली. ती गावातील एका सामंताने पुन्हा बांधून दिली, असे एका लेखात सांगितले आहे.
 या काळातील लेखांवरून असे दिसते की शंभर दोनशे गावे सहज अग्रहार होती. आणि ती बहुतेक गावकऱ्यांनी खाजगी देणग्यांतून चालविली होती. डंबळ येथील व्यापारी संघ श्रीमंत असून एकंदर अठरा गावे त्याच्या कक्षेत होती. या संघाने डंबळ येथे एक विद्यालय चालविले होते. यावरून राजे, सामंत, धनिक, गावकरी, यांच्याप्रमाणेच व्यापारी संघही शिक्षण ही आपली जबाबदारी आहे, असे मानीत असत असे दिसते.

यादव काळ
 राष्ट्रकूटांप्रमाणे यादवांच्या राज्यातही मालखेड, कल्याणी, देवगिरी, नाशिक, पैठण, पाटण, कऱ्हाड, ठाणे, बीड, वाघळी अशा गावी पाठशाळा व शिक्षणाची केंद्रे असत. तेथे विद्याभ्यास त्याच पद्धतीने चाले. रामदेवरावाने आपल्या कुलगुरूच्या आज्ञा प्रमाण मानून विधिवास (नेवासे) खंपणकातील बिल्वग्राम, पिप्पलग्राम, आणि त्यांच्यामधला सर्व भूभाग ब्राह्मणांना अग्रहार करून दिला होता. शिवाय वेळोवेळी त्याने 'नवी अग्रहारे ब्राह्मणांसी नविया वृत्ती दिधलिया.' वेजाई नावाच्या एका यादव राणीने वैजनाथाचे देवालय बांधून ब्राह्मणांना तेथे वृत्ती दिल्या होत्या. खानदेशात वाघळीच्या विद्यालयात शिकविणाऱ्या शिक्षकांचे विद्याव्याख्यानकारिन् आणि पुण्यव्याख्यानकारिन् असे दोन वर्ग केलेले होते. पहिले ऐहिक विषय शिकविणारे व दुसरे पारमार्थिक विद्या शिकविणारे. यांपैकी प्रत्येकाला सोळा निवर्तने जमीन दान दिलेली होती.
 सुप्रसिद्ध ज्योतिर्विद भास्कराचार्य यांचा नातू आणि सिंघण यादवाचा राजदैवज्ञ चांगदेव याने चाळीसगावाजवळ पाटण येथे ज्योतिषशास्त्राच्या अध्यापनासाठी एक मठ स्थापून शाळा चालविली होती. भास्कराचार्यांच्या सर्व ग्रंथांचे तेथे सखोल अध्ययन होत असे.
 याप्रमाणे मठ, पाठशाळा, व अग्रहार अशा संस्थांतून विद्येचे अध्ययन महाराष्ट्रात होत असे. आरंभी सांगितल्याप्रमाणे वरील वर्णने राष्ट्रकूट व यादव यांच्या काळची आहेत. पण सातवाहन, वाकाटक, चालुक्य यांच्या काळीही याच पद्धतीने शिक्षण चालत असे, असे अनुमान करण्यास हरकत नाही.

ऐहिक विद्या ?
 यावरून एक गोष्ट दिसते की त्या काळी शिक्षणसंस्था म्हणून ज्या स्थापिल्या होत्या तेथे बव्हंशी संस्कृतविद्येचे अध्ययन होत असे. मग ऐहिक विषयांच्या शिक्षणाचे काय ? या काळात महाराष्ट्रात किती प्रकारचे उद्योग चालत असत ते मागे सांगितलेच आहे. सोने, रूपे, तांबे यांच्या खाणी व यांचे जिन्नस, नौकाबांधणी, शस्त्रास्त्रांचे उत्पादन, रथांची बांधणी, देवालये, प्रासाद यांची उभारणी लेण्यांचे कोरीव काम, कापड विणणे, इ. अनेक उद्योग मोठ्या प्रमाणावर चालत. शेतीही पुष्कळ पुढारलेली होती. पशुपालनही शास्त्रीय पद्धतीने चाले. व्यापाराबद्दल तर सर्व भारतात येथल्या व्यापाऱ्यांची कीर्ती होती. ह्यांपैकी प्रत्येक विषयाचे शिक्षण दिल्यावाचून तरुण पिढीला तो उद्योग हाताळणे अशक्य होते. पण या विषयांच्या शिक्षणासाठी विद्यापीठे किंवा पाठशाळा नव्हत्या. तेव्हा हे शिक्षण पितापुत्रपरंपरेने घरीच दिले जात असले पाहिजे. काही ठिकाणच्या वर्णनांवरून कारागिरांच्याकडेही शिक्षणाची सोय होती, असे दिसते. मोठमोठ्या व्यापारी संघटना होत्या. त्याही तरुण पिढीच्या शिक्षणाची व्यवस्था करीत असल्या पाहिजेत. त्यावाचून सतत पंधराशे वर्षे हे सर्व उद्योग उत्तम पातळीवरून चालू ठेवणे शक्यच नव्हते. संस्कृत विद्येच्या पाठशाळांची वर्णने उपलब्ध आहेत तशी या शाळांची नाहीत, हे मात्र बरे वाटत नाही.
 दुसरी एक गोष्ट. घरोघरी किंवा कारागिरांच्या कारखान्यात शिक्षणाची सोय होती हे खरे. पण स्थापत्य, खाणी, नौकाबांधणी, धातुविद्या, रसायनविद्या यांच्या अध्ययनासाठी स्वतंत्र विद्यालये सतत चालू राहिली असती तर या शास्त्रांचे तात्त्विक अध्ययन होऊन त्यात सतत प्रगती होत राहिली असती व पुढे पुढे त्यांना जे जडत्व आले ते आले नसते.

जडत्व
 हे जडत्व भारतात सातव्या आठव्या शतकापासून सर्वत्रच येत होते. डॉ. आळतेकरांनी 'एज्युकेशन इन् एन्शंट इंडिया' या आपल्या ग्रंथात हा विचार सविस्तर मांडला आहे. ब्रह्मगुप्त, वराहमिहिर हे फार मोठे ज्योतिष शास्त्रज्ञ होते. पण ते हळूहळू शब्दप्रामाण्यवादी होऊ लागले. ग्रहणे राहू-केतूंमुळे लागत नाहीत, पृथ्वी, चंद्र यांच्या सावलीमुळे लागतात हे त्यांना माहीत होते; तसे त्यांनी लिहूनही ठेवले आहे. पण उत्तरकाळी ते स्वतःच, पुराणांचे म्हणणे मानले पाहिजे, त्यांच्या विरुद्ध जाता येत नाही, असे सांगून राहूकेतू - सिद्धान्त मान्य करू लागले. हीच वृत्ती पुढे वाढत गेली. वेदान्त व कर्मकांड यांत ती कशी आली हे मागे सांगितलेच आहे. त्यामुळे बुद्धिप्रामाण्य विद्यापीठातच संपुष्टात आले आणि प्रगती खुंटली. लो. टिळकांनी म्हटलेच आहे की प्राचीन काळी आमचे शास्त्रज्ञ स्वतंत्र संशोधन करीत. पण पुढे ते मागल्या शास्त्रज्ञांचे सिद्धान्तच खलीत बसले. त्यामुळे सर्व प्रगती थांबली.

सप्तशृंखला
 हा सर्व भारताच्याच विद्यांचा इतिहास आहे. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. शब्दप्रामाण्याच्या जोडीला पुढे निवृती आली, कर्मकांड आले आणि आमची जीव- शक्तीच क्षीण झाली. सन बाराशेच्या सुमारास मुसलमानांनी येथली होती नव्हती ती सर्व विद्यापीठे नष्ट करून टाकली, ग्रंथसंग्रह जाळून टाकले व आचार्यांना ठार मारले. यांचे रक्षण आम्हाला का करता आले नाही ? ज्या कारणांमुळे आमची राज्ये आम्हांला संभाळता आली नाहीत त्याच कारणांमुळे विद्यापीठेही रक्षिता आली नाहीत. याची कारणमीमांसा मागे अनेक ठिकाणी केली आहे. 'सप्तशृंखला' हे थोडक्यात सर्वांचे कारण म्हणून सांगता येईल. या श्रृंखला सातव्या आठव्या शतकापासून आम्ही तयार करू लागलो. आणि बाराव्या शतकापर्यंत त्या स्वतःच्या हातापायांत आम्ही पक्क्या ठोकून बसविल्या. तेव्हा सर्व प्रगती खुंटेल नाही तर काय होईल ?
 सातवाहन ते यादव या कालखंडातील साहित्य, कला व विद्या यांचा इतिहास आपण पाहिला. त्यातील कलेचा इतिहास हा अमर व विश्ववंद्य अशा कलाकृतींनी भरलेला आहे. साहित्य व विद्या यांविषयी असे म्हणता येत नाही. विद्याध्ययन येथे होत असे. पण तक्षशिला, नालंदा अशी विद्यापीठे महाराष्ट्रात झाली नाहीत आणि ऐहिक शास्त्रांच्या अध्यापनाची सोय येथील विद्याकेंद्रात मुळीच नव्हती. साहित्यातही अमर विश्ववंद्य अशा कृती नाहीत, विद्या व साहित्य यांतील या उणिवा मनाला जाणवतात. कलावैभवाने मात्र महाराष्ट्राला अमर कीर्ती मिळवून दिली आहे.