महाराष्ट्र संस्कृती/आर्थिक जीवन

विकिस्रोत कडून


१०.
आर्थिक जीवन
 


आधारग्रंथ
 सातवाहन ते यादव या कालखंडातील धार्मिक जीवन आणि समाजरचना यांचा विचार झाला. आता त्या काळच्या आर्थिक जीवनाचा विचार करावयाचा. गाथासप्तशती हा सातवाहन काळचा गाथासंग्रह उपलब्ध आहे. कौटिल्याचे अर्थशास्त्र, महाभारत यांसारख्या ग्रंथांवरून काही माहिती मिळते. परकी प्रवाशांनी काही वर्णने लिहून ठेवली आहेत. या सर्वांवरून डॉ. मिराशी, डॉ. आळतेकर, डॉ. मुनशी इ. पंडितांनी या काळच्या आर्थिक जीवनाचे वर्णन केलेले आहे. सातवाहन काळच्या गाथासप्तशतीवरून महाराष्ट्राची विशिष्ट अशी माहिती मिळते म्हणून त्या ग्रंथाचे महत्त्व जास्त आहे. स. आ. जोगळेकरांनी गाथासप्तशतीचे मोठ्या परिश्रमाने संपादन केले आहे. त्यात त्या काळच्या महाराष्ट्राच्या आर्थिक जीवनाचे वर्णन दिलेले आहे.

शेती
 साधारणतः शंभर-सव्वाशे उंबरे असलेले खेडे - ग्राममध्यभागी, त्याच्या भोवती पिकाऊ जमीन, तिच्या पलीकडे गुरांना चरण्यासाठी कुरणे व त्यापलीकडे जंगले, अरण्ये अशी त्या वेळी ग्रामीण प्रदेशाची रचना असे.

शेतकरी
 शेतकरी साध्या लोखंडी नांगरानेच जमीन नांगरीत. नांगराला दोन बैल जोडलेले असत. अनेक ठिकाणी टोणगेही जोडीत. पुष्कळ शेतकऱ्यांची स्वतःची दोनचार एकरांची लहानशी जमीन असे. श्रीमंत शेतकऱ्यांची हजार एकरांपर्यंतही जमीन असे. भूमिहीन शेतमजूर हे त्या काळीही होते. सामान्यतः शेतकऱ्यांचे जीवन कष्टाचेच होते. मग या शेतमजुरांचे कसे असेल हे सांगण्याची आवश्यकता नाही. नांगरणी, कुळवणी, पेरणी ही कामे पुरुष करीत. स्त्रिया घर संभाळून राहिलेल्या वेळात वेचणी, राखणी इ. कामे करीत.

पिके
 तांदूळ हे त्या काळी मुख्य पीक होते. याचे दोन तीन प्रकार असत. कलम- कोळंबा, साळी, व्रीही अशी त्यांची नावे आढळतात. गहू आणि तूर, हरभरा, मूग मसुरा ही कडधान्ये ही दुसरी पिके. तीळ, मोहरी, जव, यांचेही भरपूर उल्लेख आहेत. आणि कापूस व ऊस ही जरा श्रीमंती आणि व्यापारी पिकेही काही शेतकरी काढीत असत.

पाणी
 बहुतेक शेती पावसाच्या पाण्यावरच होई. त्याच्या जोडीला विहिरींचे पाणी मोटेने किंवा रहाटगाडग्याने जमिनीला देत. तलावांचे उल्लेख क्वचित कोठे आढळतात. पण कालवे, पाटबंधारे यांची वर्णने आढळत नाहीत. हिंदुस्थानात वेदकाळापासून कालव्यांची पद्धत होती. महाभारतात तसे उल्लेख आहेत. पण वर उल्लेखिलेल्या पंडितांच्या ग्रंथांत धरणे, कालवे, पाटस्थळे, यांची वर्णने नाहीत. तेव्हा त्या दृष्टीने फारशी प्रगती झालेली नसावी असे वाटते.

पशुधन
 पशुधनाचे महत्त्व त्या काळीही लोकांनी जाणलेले होते. गायी, बैल, म्हशी, टोणगे, हत्ती, उंट, शेळ्या, मेंढ्या, डुकरे असे अनेकविध पशू लोक पाळीत. गोधनाला त्या काळी सर्वांत जास्त महत्त्व होते. राजे लोक गोधनाची मोठमोठी खिल्लारे बाळगीत व त्यावर गोपालक, तंतिपाल असे अनेक प्रकारचे अधिकारी नेमून त्यांची निगा राखीत. दुर्योधन व विराट या राजांची अशी खिल्लारे असल्याचे वर्णन महाभारतात आहे. पांडवांपैकी सहदेव हा विराटाकडे तंतिपाल म्हणूनच होता. तो पशुवैद्यक उत्तम जाणीत असे. गायीची उत्तम पैदास करण्याची विद्याही त्या काळी अवगत होती असे दिसते.

कर
 शेतीवर नाना प्रकारचे कर त्या वेळी असत. पशुधनावरही कर असत. बळी, भाग, विवित, कर असे करांचे वर्गीकरण कौटिल्याने दिले आहे. वेठबिगार त्या काळी सर्रास चालू होती. तोही एक प्रकारचा करच मानला जात असे. शिवाय निरनिराळ्या प्रसंगी राजाला नजराणे द्यावे लागत ते वेगळेच. उत्पन्नाच्या एकषष्ठांश कर आसवा असे स्मृतिकारांनी सांगितले आहे. पण अनेक वेळा हे कर वीसपंचवीस टक्क्यांपर्यंत असत असे इतिहासकार सांगतात.
 आर्थिक जीवनात प्रामुख्याने शेती, उद्योग व व्यापार यांचा अंतर्भाव होतो. उद्योगामध्ये कारागिरी व कारखानदारी येतात. कारखानदारी हा शब्द अलीकडचा आहे. आणि त्यावरून सूचित होणारे प्रचंड कारखाने त्या काळी नव्हते हे उघडच आहे. पण इषुकार, रत्नकार, रथकार, नौकाकार यांचे उल्लेख येतात. त्यावरून लहान प्रमाणावर का होईना, पण कारखानदारी त्या वेळी होती यात शंकाच नाही. त्याकाळचे जीवन समृद्ध होते आणि समृद्ध जीवन कारखानदारीवाचून चालणे शक्यच नाही.

कारागीर
 गाथासप्तशती व जातके यांवरून त्या काळचे औद्योगिक जीवन कसे होते याची कल्पना येते. सुतार, लोहार, चर्मकार, कुंभार, विणकर, गवळी, रंगारी, सोनार, गवंडी, नापित, माळी, तेली, तांबट हे ग्रामीण भागातले कारागीर होत. वर्षभर यांनी शेतकऱ्याचे काम करावे आणि भातमळणीच्या वेळी खळ्यावर जाऊन त्यांनी आपली वार्षिक मजुरी वसूल करावी अशी पद्धत त्या वेळी होती. हिंदुस्थानात परवा परवापर्यंत हीच पद्धत होती व अजूनही ती क्वचित कोठे असेलही.
 वर उल्लेखिलेली कारागिरी ही ग्रामीण भागातील होय. ती सामान्य व ओबडधोबड अशीच असणार. पण त्या वेळच्या जीवनाची जी वर्णने जातककथा, शिलालेख इतर कथा यांत आढळतात, जे जीवन कोरीव लेण्यांतील कलेवरून दिसून येते, त्यावरून नागर भागात ही कारागिरी पुष्कळच विकसित झाली होती याविषयी भरभक्कम पुरावा मिळतो.

कसबी कारागीर
 कंठा, हार, कर्णभूषणे, वलये, मेखला, नुपूर, कंकणे असे सर्व प्रकारचे दागिने स्त्रिया त्या वेळी वापरीत. लेण्यांतील चित्रांत ते पहावयास मिळतात आणि आता उत्खननात प्रत्यक्षातच ते सापडत आहेत. हे दागिने सोन्याचांदीचे आहेत, हिऱ्या- माणकांचे आहेत व मोत्यांचेही आहेत. रत्नांमध्ये नील, पद्मराग, मणी, मरकत, पाचू या रत्नांचे उल्लेख आहेत. सोन्याचे तर अगणित आहेत. यावरून सुवर्णकार, रत्नकार यांची कारागिरी फार उच्च प्रकारची होती हे उघडच आहे आणि यावरून सोने, हिरे, तांबे, लोखंड यांच्या समृद्ध खाणी महाराष्ट्रात होत्या आणि समुद्रातून मोती काढण्याचे कामही मोठ्या प्रमाणात चालत असे हे दिसून येते. लेण्यांमध्ये पटई, जाळ्या यांचे जे लाकूडकाम आहे ते कलेच्या सदरात येण्याजोगे आहे. दगडी कामही त्याच तोलाचे आहे. तेव्हा सुतार, पाथरवट यांची कारागिरी वरच्या थराला पोचली होती यात शंका नाही.

विणकाम
 जे दागिन्यांवरून दिसते तेच त्या वेळच्या वस्त्रांवरून ध्यानात येते. कोरीव लेण्यांत, गाथासप्तशतीत, जातकात व महाभारतात स्त्री-पुरुषांच्या अनेक प्रकारच्या वस्त्रांची वर्णने आहेत. ती वस्त्रे कापसाची, लोकरीची व रेशमाचीही आहेत. ती जशी जाडी- भरडी आहेत तशीच अत्यंत तलमही आहेत. त्यावर नक्षी आहे, भरतकाम आहे, जरतारी आहे. तेव्हा सूत कातणे, कापड विणणे आणि शिवणे हे सर्व उद्योग तेव्हा विपुल प्रमाणात चालत हे स्पष्टच आहे.

लोखंड
 त्या वेळी लढाया चालत त्यांतील शस्त्रांचे उल्लेख पाहिले म्हणजे तो एक थोर मोठा उद्योग येथे चालत असे हे दिसून येते. तरवार, भाला, अंकुश, बाणांची टोके, धनुष्ये, शूल, श्रृंखला, मेख, चिखलत, रथ यांची निर्मिती हा केवढा तरी मोठा उद्योग आहे. लोखंड खाणीतून काढणे, त्याच्यावर नाना रसायनक्रिया करणे आणि मग त्याच्या वस्तू घडविणे असा हा मोठा पसारा आहे. चरक, नांगर, फाळ याही लोखंडाच्याच वस्तू. लोखंडाची भांडीही अनेक प्रकारची बनवीत.
 कोणताही एक पदार्थ निर्मावयाचा म्हणजे त्यासाठी भिन्न प्रकारचे उद्योग करावे लागतात. सातवाहन काळची रूपे, पोटीन व तांबे यांची नाणी सापडली आहेत. त्या वेळी नाना प्रकारचे सुगंध गंधी लोक तयार करीत. मृदंग, तबला ही चर्मवाद्येही होती. त्या वेळच्या वाङ्मयात आरशाचे उल्लेख आहेत. लेण्यातही आरसे दिसतात. हे आरसे धातूंचे असावेत असे विद्वानांचे मत आहे. हस्तिदंताचे अनेक जिन्नस आता उत्खननात सापडले आहेत. अनेक वनस्पतींपासून रंगारी रंग तयार करीत. व्यापारासाठी व सैन्यासाठी जलमार्ग चालू होते. तेव्हा नौकाबांधणी हा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालू असला पाहिजे.
 या प्रत्येक उद्योगाच्या मागे इतर दहा उद्योग डोळ्याला दिसू लागतात. त्यावाचून त्या वस्तूंची पैदास होणेच शक्य नाही. या उद्योगाच्या मागे धातुविद्या, रसायनविद्या याही आल्याच. त्या विद्या साधणे, पोसणे व शिकवणे हाही स्वतंत्र उद्योग आहे.
 या सर्व वर्णनावरून त्या वेळच्या कारागिरीची व कारखानदारीची कल्पना येईल. आणि त्या वेळचे आर्थिक जीवन खूपच विकसित झाले होते हे ध्यानात येईल. आणि याच्या जोडीला त्या काळच्या व्यापाराची वर्णने पाहिली म्हणजे याविषयी कसलीच शंका राहणार नाही.

व्यापार
 हिंदुस्थान देश मागल्या काळी जसा धर्मासाठी तसाच किंवा त्याहूनही जास्त व्यापारासाठी प्रसिद्ध होता. अंतर्गत आणि बाह्य देशांशी चालणारा व्यापार फार मोठ्या प्रमाणावर चालत असे. उत्तरपथ व दक्षिणापथ यांना जोडणारे व्यापारी मार्ग सर्वत्र पसरले होते. भारताच्या पूर्व व पश्चिम भागांचा एकमेकांशी फार मोठा व्यापार सातवाहन काळात चालत असे. अपण्णक जातकात एका मोठ्या सार्थवाहाचे वर्णन आहे. सार्थवाह म्हणजे व्यापारी तांड्याचा नायक. हा सार्थवाह पाचशे गाडे घेऊन पूर्वेकडून पश्चिमेकडे व पश्चिमेकडून पूर्वेकडे असा सारखा हिंडत असतो. कऱ्हाड, जुन्नर, नाशिक, पैठण, भोगवर्धन, चौल, सोपारा, कल्याण, वैजयंती ही सातवाहन कालातली व्यापारी नगरे होत. ती नगरे सार्थवाहपथांनी एकमेकांशी जोडली गेली होती. पैठण, तेर (नगर) यांना उज्जयिनीशी जोडणारा रस्ता अजिंठ्याच्या घाटातून गेला होता. गोवर्धन व नाशिक ही ठाणी नाणे घाटाने जुन्नरशी व कोकण घाटाने कार्ल्याशी जोडणारा सार्थवाहपथ नाशिकच्या लेण्यावरून जात होता.
 या नगरींचा विशेष हा की या सर्व ठिकाणी बौद्धांची व इतर कोरीव लेणी आहेत. आणि त्या सर्वांना या सार्थवाहांनी उदार देणग्या दिलेल्या शिलालेखांत नमूद केलेल्या आहेत. असा या लेण्यांचा व्यापाराशी दूरान्वयाने संबंध आहे. वैजयंतीचा श्रेष्ठी भूतपाल याने दिलेल्या दानातून कार्ल्याचा चैत्य कोरवला गेला. तेथील शैलगृह सर्वांत सुंदर शैलगृह असल्याचा अभिमान भूतपालाने शिलालेखात व्यक्त केला आहे.

परदेशी व्यापार
 हे अंतर्गत व्यापाराविषयी झाले. त्या काळी परकी देशांशी चालणाऱ्या व्यापाराचे प्रमाण असेच मोठे होते. इ. पू. सहाव्या शतकात कोकणातील सोपाऱ्याहून बाबिलोनशी व्यापार चालू होता है बौद्ध वाङ्मयावरून समजते. रोम, कार्थेज व इजिप्त या देशांशी सातवाहन काली मोठा व्यापार चालू होता. भडोच, सोपारा, कल्याण, चौल, जयगड, दाभोळ, बाणकोट, राजापूर ही बंदरे त्या वेळी यासाठी प्रसिद्ध होती.

व्यापारी माल
 हस्तिदंत, शंख, शिंपले, मोती, रंग, लोखंड, लाकूड आणि सुती व मलमली कापड हा माल प. भारतातून जागतिक बाजारपेठेत जात असे. रोममधून आलेल्या मालात कलाकुसर असलेली खापरे, चंबू, खुजा, सुरई, मद्यकुंभ अशा तऱ्हेचा माल उत्खननात सापडतो. परदेशांहून भारतात आलेल्या व्यापाऱ्यांनीही लेण्यांना दाने दिलेली आहेत. धेनुकाकट येथील यवन व्यापाऱ्यांनी कार्ले, पितळखोरे येथील बौद्धसंघांना दिलेल्या दानांचा उल्लेख आहे.

दिशाकाक
 प्राचीन काळी नौकानयन करणाऱ्या प्रवाशांना दिशांचे ज्ञान होण्याचे साधन म्हणजे दिशाकाक. हे कावळे शिकवून तयार केलेले असत. जमीन दिसेनाशी झाली की या कावळ्यांच्या गतीच्या अनुरोधाने जहाजे नेत असत. समुद्रप्रवासासाठी खगोल- शास्त्राचे ज्ञानही अवश्य आहे, असे एका जातकाच्या लेखकाने सांगून ठेवलेले आहे.

श्रेणी
 हे व्यापारी आणि इतर व्यावसायिक यांच्या त्या काळी श्रेणी म्हणजे संघटना किंवा मंडळ्या असत. कुंभार, लोहार, तेली, चर्मकार, गंधिक, सुवर्णकार, सार्थवाह, सेटी अशा अनेक श्रेणींचे उल्लेख सातवाहनकालीन शिलालेखांत आढळतात. अलीकडच्या सहकारी पतपेढ्यांसारखे यांचे स्वरूप असावे. या श्रेणी लोकांच्या ठेवीही ठेवीत आणि त्यांना नऊ ते बारा टक्क्यांपर्यंत व्याजही देत. लेण्यांतील शिलालेखात व्यावसायिक श्रेणींचे निर्देश आढळतात. गोवर्धन येथे विणकर संघ होता. नाशिक येथे कुंभार व तेली यांचे संघ होते. नागरी श्रेणीच्या अध्यक्षाला श्रेष्ठी म्हणत. ग्रामीण श्रेणींच्या मुख्याला भोजक म्हणत. या सर्व श्रेणींचे परस्पर सहकार्य असे. कारागीर संघ माल निर्माण करीत आणि व्यापारी संघ त्याची खरेदीविक्री करीत. यावरून आमची प्राचीन ग्रामीण अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण होती असा जो एक समज आहे तो खरा नाही हे स्पष्ट दिसते. नागर व ग्रामीण जीवन या दोन्ही ठिकाणी स्पर्धा व सहकार्य होते. यामुळेच सहजीवन शक्य होते.
 सातवाहनकालीन आर्थिक जीवनाचे येथवर वर्णन केले. आता वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, उत्तर चालुक्य व यादव या घराण्यांच्या साम्राज्यांच्या काळचे वर्णन करावयाचे. यासंबंधी मुख्य अडचण अशी आहे की या विशिष्ट घराण्यांच्या काळी महाराष्ट्राची आर्थिक स्थिती काय होती याचे वर्णन करणारे ग्रंथ नाहीत. राष्ट्रकूट घराण्याचा इतिहास डॉ. आळतेकरांनी लिहिला आहे. त्यात आर्थिक जीवनाचे वर्णन करणारे एक स्वतंत्र प्रकरण आहे. पण त्यात प्रारंभीच त्यांनी ही अडचण सांगितली आहे. पुरेशी आधारप्रमाणे नाहीत. मग त्यांनी काय केले ? पेरिप्लस हा इ. सनाच्या पहिल्या शतकातील परकी प्रवाशाचा ग्रंथ येथपासून तेराव्या शतकातील मार्कोपोलो या प्रवाशाचा ग्रंथ आणि यांच्या मधल्या काळातील इत्सिंग, ह्युएनत्संग, अलबेरूणी, अल् अद्रिसी या प्रवाशांनी लिहून ठेवलेली वर्णने यांचे आधार घेतले. आणि आधीच्या काळी असे होते, नंतरच्या काळात असे होते, त्यावरून मधल्या राष्ट्रकूटांच्या काळी तसेच असावे असे अनुमान करून त्या आधारे वर्णन केले आहे. 'हिस्टरी अँड कल्चर ऑफ इंडियन पीपल' या मुनशींनी भारतीय विद्याभवनातर्फे प्रसिद्ध केलेल्या इतिहासात प्रत्येक खंडात, 'आर्थिक स्थिती' हे प्रकरण असतेच. त्यात वरील प्रवाशांचे आधार घेतलेले आहेतच. पण त्याशिवाय त्या त्या काळच्या स्मृती, पुराणे, बाणभट्टांसारख्यांचे ग्रंथ, वराहमिहिरासारख्या शास्त्रज्ञांचे बृहत्संहितेसारखे ग्रंथ, अमरकोश, निरनिराळ्या ठिकाणचे शिलालेख यांच्या आधाराने माहिती दिली आहे. ही सर्व माहिती पुष्कळशी उत्तर हिंदुस्थानातील आर्थिक जीवनासंबंधीची आहे. कारण वरील बहुतेक ग्रंथ तेथे झालेले आहेत. पण त्या ग्रंथांचा प्रभाव सर्व भारतावर होता. त्यांचे अध्ययन, पठन सर्व भारतात होत होते. तेव्हा त्यांतील वर्णने सामान्यतः महाराष्ट्रालाही लागू पडतील, असे धरून चालण्यास हरकत नाही. धार्मिक ग्रंथ ज्याप्रमाणे सर्व भारताचे एकच, ते उत्तर भारतात झाले तरी दक्षिणेला धार्मिक स्थिती जाणण्यास त्यांचा आधार घेण्यास हरकत नाही, तसेच इतर ग्रंथांचे आहे.
 वाकाटक ते यादव या कालखंडातील आर्थिक जीवनाचे पुढे जे वर्णन केले आहे. ते अशा आधारप्रमाणांच्या साह्याने केले आहे. अनेक पंडितांनी असेही म्हणून ठेवले आहे की शेती, उद्योग आणि व्यापार यांच्या घडणीत इ. सनाच्या दहाव्या शतकापर्यंत फारसा फरक पडला नव्हता. आणि नंतरही व्यापाराचे रूप बदलले तरी शेती व कारागिरी यांच्या स्वरूपात फारसा फरक पडला नाही. म्हणून वरील पद्धतीने पंडितांनी महाराष्ट्रीय आर्थिक जीवनाचे जे वर्णन केले आहे ते बरेचसे विश्वसनीय आहे असे धरून चालण्यास हरकत नाही.
 सातवाहन साम्राज्याच्या विलयानंतर चौथ्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्रात वाकाटकांचे साम्राज्य स्थापन झाले. आणि त्याच वेळी उत्तरेत गुप्तांचे साम्राज्य स्थापन झाले. गुप्त साम्राज्य अत्यंत बलाढ्य असून अखिल भारतव्यापी होते. त्यामुळे सुमारे दोनशे वर्ष, म्हणजे इ. स. ५०० पर्यंत भारताला शांतता प्राप्त झाली. शेती, उद्योग व व्यापार यांची या काळात चांगली प्रगती झाली.

वृक्ष आयुर्वेद
 वराहमिहिराचा बृहत्संहिता हा ग्रंथ सहाव्या शतकातला आहे. त्यात पाऊस मोजण्याची पद्धत सांगितलेली आहे. द्रोण हे त्या वेळच्या मापाचे नाव होते. ग्रह- ज्योतिशास्त्राच्या आधारे पावसाविषयी भविष्येही त्या वेळी वर्तवीत असत. शेतीच्या बाबतीत काही प्रगतीही झालेली असावी असे दिसते. वृक्षआयुर्वेद असे कृषिशास्त्राला म्हणत. या शास्त्राचा कौटिल्यानेही आपल्या अर्थशास्त्रात उल्लेख केला आहे. वराह- मिहिराने आपल्या ग्रंथात जमीन तयार करणे, पेरणी करणे, वृक्षांची कलमे करणे व पिकांना योग्य वेळी पाणी देणे यासंबंधी नियम दिले आहेत. पिकांवर पडणारे रोग व त्यांवरील उपाय यांचीही चर्चा त्याने केली आहे.

पिके
 या काळातली मुख्य पिके म्हणजे तांदूळ, गहू. कडधान्ये:- मूग, मसूर, उडीद, हुलगे, वाटाणे. गळिताची धान्ये:- तीळ, मोहरी, ऊस ही होत. उसाच्या रसापासून गूळ आणि साखरही करीत. आंबा, फणस, कलिंगड, केळी, नारळ, संत्री, मोसंबी या फळांच्या बागा लावण्यास शेतकऱ्यांना उत्तेजन द्यावे, असे सांगितलेले आढळते. ओसाड किंवा पडीत जमीन लागवडीस आणणाराला राजाकडून पारितोषिक मिळे. आणि पिकांचा किंवा वृक्षांचा कोणत्याही प्रकारे नाश करणाराला जबर दंड करावा, असे स्मृतीत सांगितले आहे.

कृषिशास्त्र
 पुढच्या काळातल्या शेतीविषयी माहिती देणारे प्रमुख ग्रंथ म्हणजे अभिधानरत्नमाला आणि माघतिथीचा स्मृतीवरील टीकाग्रंथ. एकंदर अठरा प्रकारच्या धान्यांचा उल्लेख अभिधानरत्नमालेत आहे. शिवाय कडधान्ये व गळिताची धान्ये ती निराळीच. जमिनीची काळजीपूर्वक वर्गवारी करून कोणती जमीन कोणत्या पिकाला योग्य तेही या ग्रंथात सांगितले आहे. मेधातिथीवरून असे दिसते की बी-बियाण्यांचा वैश्यांनी (शेतकऱ्यांनी) उत्तम अभ्यास करावा अशी अपेक्षा होती. कोणते बी दाट पेरावे, कोणते विरळ पेरावे, कोणत्या जमिनीत कोणते बियाणे टाकावे याचा तपशीलही त्यांना माहीत असावा असे दिसते. भात, मोहरी, ऊस यांचे अनेक प्रकार त्या वेळी माहीत होते आणि प्रत्येक प्रकारची निगा कशी राखावयाची याचेही ज्ञान होते. शेतीला पाणी रहाटगाडग्याने किंवा पखालीने देत असत. नवव्या दहाव्या शतकातील अरब प्रवाशांनी पश्चिम हिंदुस्थानातील शेतीची प्रशंसा केलेली आढळते. येथली जमीन सुपीक असून विविध प्रकारची धान्ये, फळे, भाजीपाला येथले शेतकरी पिकवतात असे त्यांनी म्हटले आहे. अरबांचा महाराष्ट्राशी दृढ संबंध होता म्हणून त्यांच्या लिहिण्याला जरा विशेष महत्त्व.
 यादवकाळ अखेरपर्यंत महाराष्ट्रातील शेतीची सामान्यतः हीच स्थिती होती. पिके तीच, कसणीची पद्धत तीच आणि पाण्याची व्यवस्थाही तीच. बहुतेक शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असे. त्याच्या जोडीला विहिरी व तलाव. पण पाट- बंधारे व कालवे याविषयी मात्र प्रमाणे मिळत नाहीत. शेतीला व एकंदर जीवनाला पाण्याचे महत्त्व किती हे धर्मशास्त्रज्ञांनी व लोकांनी जाणले होते विहीर, तलाव खणणे हे महापुण्य मानले जाई. त्यांचा नाश हे महापाप व मोठा गुन्हा. त्याला जबर शिक्षा असे. असे असूनही महाराष्ट्रात पाटबंधारे, कालवे यांकडे लक्ष दिलेले दिसत नाही. दक्षिणेतील भास्करभवदुरे येथील शिलालेखात पोरूमामिल्ल तलावाची माहिती आहे. त्यावरून जलशास्त्राचा अभ्यास तेव्हा होत असे असे दिसते. गोरिबिदनूरच्या एका लेखात नदी अडवून कालवा काढल्याचा उल्लेख आहे. त्यावरून महाराष्ट्रातही कालवे, पाटबंधारे असावे असे कोणी म्हणतात. पण त्याविषयी कोठल्याही लेखात निर्देश सापडत नाही.
 शेतीवरील कर आकारणीची पद्धतही यादव काळी फारशी निराळी नव्हती. सारावसुली ऐनजिनसी होत असे. आणि पिकांची स्थिती पाहून कर आकारणी होत असे. सामान्यतः आठपासून पन्नास टक्क्यांपर्यंत पट्टी आकारण्यास धर्मशास्त्रज्ञांची संमती होती. पिकांची स्थिती कशी आहे हे ठरविण्याचे काम गावातल्या पंचांचे होते. साऱ्याची बाकी दोन वर्षांपलीकडे राहू देत नसत. दोन वर्षांहून जास्त सारा राहिला तर जमीन विकून तो वसूल करण्याचा अधिकार गावपंचांना होता. देवस्थाने, ब्राह्मणांना दिलेले अग्रहार या जमिनीवर बहुधा कर नसे. विशेष म्हणजे पाणीपट्टी त्या काळी नव्हती.
 शेतकरी, बलुतेदार, पाटील, देशमुख, कुळकर्णी यांची स्थाने, यांचे संबंध यांचे अधिकार हेही सातवाहन कालाप्रमाणेच बव्हंशी यादवकाळाअखेरपर्यंत होते. अर्थात एकंदर ग्रामव्यवस्थेचे स्वरूपही तेच राहिले असणार हे उघडच आहे.
 सातवाहन ते यादव या कालखंडातल्या शेतीची अशी अवस्था होती. यावरून समृद्धीबरोबरच दारिद्र्य व कष्टाचे जीवन हेही येथे होते असे दिसून येते.
 वस्त्रे विणण्याचा उद्योग फार प्राचीन काळापासून भारतात चालू होता. सातवाहन काळी ही कीर्ती टिकून होती हे आपण पाहिलेच आहे. पुढच्या काळाबद्दलही असेच म्हणता येईल. त्या वेळचे काव्य ग्रंथ, कोरीव लेणी, प्रवाशांची वर्णने यावरून, रेशीम, लोकर, कापूस, काही जनावरांचे केस आणि झाडाच्या साली यापासून विविध प्रकारची वस्त्रे येथे विणली व वापरली जात असत, अत्यंत भरड पासून कोळ्याच्या जाळ्याइतकी तलम अशी सर्व प्रकारची वस्त्रे येथे होत, वस्त्रांना रंगही नाना तऱ्हेचे दिले जात असत, हे दिसून येते.
 कातडी कमावणे व त्याच्या पादत्राणे, बुधले पखाली, पंखे अशा विविध वस्तू बनविणे हाही धंदा जोरात चालत असे, सोने आणि चांदी यांच्या विपुल खाणी येथे होत्या, असे ह्युएनत्संगाने सांगितले आहे. डॉ आळतेकरांच्या मते महाराष्ट्रात तांब्याच्या खाणीही होत्या. वात्स्यायनाच्या कामसूत्रामध्ये या धातूवर रासायनिक प्रक्रिया कशा कराव्या ते दिले आहे. पितळही येथे विपुल प्रमाणात तयार केले जात असे; आणि तांब्याच्या पितळेच्या मूर्तीही केल्या जात असत. गुप्त काळात दिल्लीला उभारलेला एक स्तंभ अजूनही दाखविला जातो. तो तेवीस फूट उंच असून त्याचा परीघ सोळा फूट आहे. इतकी शतके झाली तरी त्याला गंज चढलेला नाही. यावरून धातुविद्या, रसायनविद्या या किती प्रगत झाल्या होत्या ते दिसून येते.

रत्ने
 रत्नांसाठी तर भारत त्या काळी फारच प्रसिद्ध होता. वात्स्यायनाच्या कामसूत्रात रूपरत्नपरीक्षा हे स्वतंत्र प्रकरणच आहे. वराहमिहिराने बावीस प्रकारच्या रत्नांची माहिती बृहत्संहितेत दिली आहे. विविध प्रकारच्या रत्नांचे भेद कवींना चांगले माहीत होते हे त्यांनी केलेल्या वर्णनांवरून दिसते. विविध अलंकार, वस्त्रे, देवळांच्या कमानी, सिंहासने, यांना शोभा आणण्यासाठी ही रत्ने वापरली जात. रत्नकारांच्या कौशल्याचे वर्णन मृच्छकटिकासारख्या नाटकात केलेले आढळते. श्रीमंतांच्या घरीच हे काम चाले असे दिसते.
 रत्नांप्रमाणेच मोतीही विपुल प्रमाणात होते. बृहत्संहितेत एकावली, नक्षत्रमाला असे मोत्यांच्या माळांचे अनेक प्रकार वर्णिले आहेत. अलंकारांप्रमाणेच तरवारीच्या मुठी, सुवर्णपात्रे, स्त्रियांची वस्त्रे यांवरही मोती बसविले जात असत.

बंदरे
 सातवाहन काळानंतर अनेक शतके अंतर्गत व बहिर्गत व्यापारही जोरात चालू होता. कल्याण हे त्या काळचे फार महत्त्वाचे बंदर होते. याशिवाय सोपारा, ठाणे, दाभोळ, जयगड, देवगड, मालवण ही बंदरे होतीच. कापड, सूत - तलम व भरड, मलमल, कातडी, गालिचे, नीळ, धूप, अत्तरे, नारळ, विड्याची पाने, चंदन, शिसवी, साग, तिळाचे तेल, हस्तिदंत हे निर्यातीचे मुख्य जिन्नस होते. आयातीचे जिन्नसही बरेच होते. सोने, चांदी, तांबे यांची आयात ठाणे बंदरातून होत असे. अरबस्थान, इराण, आफगाणिस्थान येथून उत्तम घोड्यांची आयात विपुल होई.

यादव - वस्त्रे
 आता यादव काळातील उद्योग व व्यापार यांचा विचार करावयाचा. या काळीही कापड हाच महाराष्ट्राचा प्रमुख उद्योग होता. येथे होणारे मलमली, मखमली, रेशमी वगैरे सर्व प्रकारचे कापड भारतामध्ये सर्वत्र जात असे; इतकेच नव्हे, तर परदेशातही त्याला खूप मागणी होती. फार पुरातन काळापासून वस्त्रे विणणे या उद्योगासाठी पैठण, नगर, ठाणे, चौल ही नगरे प्रसिद्ध होती. तेराव्या शतकात पैठण, ठाणे व चौल याची कीर्ती जगभर झाली होती. एकट्या ठाणे शहरात पाच हजार विणकर मखमलीचे कापड तयार करण्यात गुंतलेले असत. बऱ्हाणपूर येथे तयार झालेले कापड अरबस्थान, इराण, इजिप्त, पोलंड येथे जात असे. पैठणची पैठणी तर जगविख्यात होती. कोळ्याच्या जाळयातील तंतूइतके तिचे रेशमी धागे नाजूक, पण तारेसारखे भक्कम असत. आणि त्यावर बारीक नक्षीकाम केलेले असे. धोतरे, उपरणी, साड्या इ. सुती किंवा रेशमी वस्त्रे नळीत घालून ठेवण्याइतकी तलम असत.
 या खालोखाल चामडे कमावण्याचा धंदा महाराष्ट्रात चाले. मोटा, पखाली, पादत्राणे ही ठाणे बंदरातून परदेशातही रवाना होत.

जहाजे
 वसई येथे मालाची वाहतूक करणारी जहाजे बांधणारी गोदी होती. तेथे कित्येक कसबी सुतार त्या उद्योगात गुंतलेले होते. बैलगाडी हे खुष्कीच्या वाहतुकीचे मुख्य साधन असल्यामुळे तोही उद्योग मोठ्या प्रमाणावर चालत असे.
 देवगिरी ही यादवांची राजधानी. तेथे हिरेमाणकांना पैलू पाडणे आणि सोन्या- चांदीची व इतर कलाकुसरीची कामे करणे हा मोठा उद्योग चालत असे.

व्यापारी पेठा
 इतके उद्योग येथे चालत तेव्हा त्यांचा व्यापारही तशाच मोठ्या प्रमाणात असला पाहिजे हे उघड आहे. सातवाहनाच्या काळापासून जे भिन्न राजवंश महाराष्ट्रात झाले त्यांच्या राजधान्या म्हणजे मोठी नगरे होती. चांदोर, सिन्नर व देवगिरी अशा यादवांच्याच क्रमाने तीन राजधान्या झाल्या. शिवाय नाशिक, एलिचपूर, कोल्हापूर, माण, लातूर, मलखेड, ठाणे, कल्याण, चौल, गोवे इत्यादी देशावरची व कोकणातली कित्येक नगरे या वा त्या कारणांनी प्रसिद्धीस आली होती. बहुतेक सर्व शहरांभोवती कोट बाधलेले असत. त्यामुळे संरक्षणाची व्यवस्था चांगली होती. ही सर्व शहरे व्यापाऱ्यांनी आपल्या पेठा करून टाकली होती. यांत देवगिरी ही अर्थातच प्रमुख पेठ होती. या सर्व पेठांचा मोठा व्यापार सर्व भारतभर चालत असे, असे मार्कोपोलोच्या वृत्तावरून दिसते.

सर्व भारतात
 गुजराथ, तेलंगण, कर्नाटक हे प्रांत तर महाराष्ट्राच्या सीमेचे प्रांत, पण त्यांच्या शिवाय केरळसारख्या दूरच्या प्रदेशांशी सुद्धा महाराष्ट्रीय व्यापाराचे दळणवळण सतत चालू होते. गंगा तटाकीचे ( गोदातटाकीचे ) चारे म्हणजे व्यापारी गुजराथेत आपले कापड विकीत असत. मिरजेचे व्यापारी तेलंगणात माल नेत. बळगावे ही त्यावेळी एक प्रचंड बाजारपेठ होती. तेथे सर्व व्यवहाराला एकसूत्रता यावी म्हणून एखाद्या व्यापाऱ्याची प्रमुख निवड केली जात असे. समय चक्रवती जयपती सेठी हा एकदा प्रमुख असल्याचा उल्लेख सापडतो. या पेठेत सोने, कापड, तेल, कापूस, तांदूळ, गूळ, सुगंधी द्रव्ये, हळद, हिंग, मिरे, ऊस, कडबा, असा नाना प्रकारचा माल खपविण्यासाठी व म्हशी, बैल, घोडे या जनावरांच्या खरेदीविक्रीसाठी व्यापाऱ्यांची अखंड ये-जा चालू असे. मिरज, कोल्हापूर याही मोठ्या पेठा होत्या. या सर्व पेठांतून सर्व भारतभर माल जात असे.

व्यापारी संघटना
 सातवाहनांच्या काळापासून व्यापाऱ्यांच्या संघटना बांधण्याची पद्धत होती, हे मागे सांगितलेच आहे. यादव काळाअखेरपर्यंत ती व्यवस्थित चालू होती. स्मृतीमध्ये या संघटनांना श्रेणी व पूग अशी नावे दिलेली आहेत. आणि त्यांच्या कार्यासंबंधी नियमही सांगून ठेवलेले आहेत. मालाची देवाणघेवाण, भांडवलाचा पुरवठा यासाठी व्यापाऱ्यांच्या सहकार्याची गरज होती. त्याचप्रमाणे माल घेऊन लांबच्या रस्त्याने जाताना चोरदरोडेखोरांपासून संरक्षण करण्यासाठीही हे सहकार्य अवश्य होते. म्हणून या श्रेणी प्रथम निर्माण झाल्या व टिकून राहिल्या. अनेक श्रेणींना स्वतंत्र सैन्य ठेवण्यासाठी राजांनी परवानगी दिलेली असे. डंबळ येथील वीखळंजु सेठीच्या श्रेणीला सन १०९५ च्या सुमारास सम्राट जगदेक मल्ल याने छत्र आणि चामर वापरण्याचा बहुमान दिला होता. प्रत्येक श्रेणीचा स्वतंत्र ध्वज असे व प्रवासात सैन्याप्रमाणेच तो पुढे डौलाने मिरवत असे.
 स्मृतीप्रमाणेच कोरीव लेखांवरूनही श्रेणींविषयी माहिती मिळते. कापड, भुसार माल, जवाहीर इ. माल विकणारे व्यापारी, सुतार, कुंभार, सोनार, शिंपी, गवंडी, तेली इ. कारागीर यांच्या श्रेणी असत. यावरून सामान्यतः एका श्रेणीत एकाच जातीचे लोक असत असे दिसते. तरी त्या काळी भिन्न जातीचे लोक एकच धंदा करीत असेही मिताक्षरेवरून दिसते, कारण श्रेणीत निरनिराळ्या जातींतील लोकांचा समावेश होतो, असे तिने सांगितले आहे.
 लक्ष्मेश्वर येथील सन ७७५ च्या लेखात विणकरांच्या श्रेणीचा उल्लेख आहे. मुळगुंद येथील सन ८८० च्या लेखात ३६० शहरांत कामाचा व्याप असलेल्या श्रेणीचा उल्लेख आहे. अकराव्या शतकातील लेखात एकंदर तेरा श्रेणींचा उल्लेख आहे. त्यांतील काही कोल्हापूर, मिरज येथील आहेत; तर काही म्हैसूर कोईमतूरपर्यंत पसरलेल्या आहेत.

श्रेणी लोकाभिमुख
 या श्रेणींना समाजात फार महत्त्वाचे स्थान होते. त्यांच्यामुळे संपत्तीची अभिवृद्धी होत असे, हे तर कारण आहेच. पण मुख्य कारण म्हणजे त्यांची लोकाभिमुख वृत्ती हे होय. मंदिरे, मठ, धर्मशाळा यांना या श्रेणी उदार देणग्या देत. बेळगाव जिल्ह्यातील कुरंबेट्ट येथील वणंजूंनी चामुंडराजाने बांधलेल्या देवळास देणग्या दिल्या आणि मल्लेश्वर या देवतेला काकती हे नगर व इतर काही जमीन लिहून दिली. मिरजेच्या वीरवणंज कार्यकारिणीने माधवेश्वराच्या देवस्थानास दान दिल्याचा लेख आहे. खानदेशातील पाटणच्या मठाला अनेक देणग्या दिल्याचे उल्लेख ताम्रपटात आहेत. विक्रेता आपल्या मालातील ( धान्य, तेल, इ. वस्तूंतील ) काही भाग देई, तसाच खरेदी करणाराही देई. श्रेणींची अशी वृत्ती असल्यामुळे नागरिक गावच्या कारभाराची बरीच जबाबदारी सेठींवर सोपवीत आणि त्याला सरकार मान्यताही मिळे.
 लोकांना जसे श्रेणींचे साह्य होत असे तसे राजांनाही होत असे. श्रेणींना स्वतंत्र सैन्य ठेवण्याची परवानगी असे. त्या सैन्याचा अनेक वेळा युद्धप्रसंगी राजांनाही उपयोग होत असे. आणखी दुसरा उपयोग म्हणजे पैसा. युद्धाच्या किंवा इतर आपत्तीच्या प्रसंगी सधन व्यापारी आणि सावकार राजाला मुबलक द्रव्यसाहाय्य करीत. यामुळे महासामंतांना मिळणाऱ्या सवलती, त्यांना मिळणारी दरबारमान्यता, छत्रचामरांचा मान हे सर्व वैभव सेठींनाही राजांकडून मिळत असे, यात नवल नाही.

वजनमापे
 हल्लीप्रमाणेच त्या वेळीही निरनिरळ्या प्रकारची वजनेमापे प्रचलित होती. धान्य मोजण्यासाठी कुडव, शेर, दुशेरी, पासरी, मण, खडी ही मापे होती. गुंज, वाल, मासा, तोळा अशी वजने सोन्याचांदीसारख्या मौल्यवान वस्तूंसाठी होती. या वजनमापामध्ये कोणी लबाडी केल्यास किंवा पदार्थात भेसळ केल्यास स्मृतींमध्ये त्याला शिक्षा सांगितलेल्या आहेत.

विनिमय
 पुष्कळसा विनिमय त्या वेळी ऐनजिनसी होत असे. वस्तू देऊन वस्तू विकत घेत. पण नाण्यांनीही पुष्कळ व्यवहार होत असे. यादवांच्या काळी महाराष्ट्रात सोन्या- चांदीची व तांब्याची नाणी प्रचलित होती. द्रम्म, होन, निष्क, सुंक, रुका, कवडा अशी नाण्यांची नावे कोरीव लेखांत आढळतात. ( यादवकाळातील माहिती - यादव-कालीन महाराष्ट्र, मु. ग. पानसे )
 सातवाहन ते यादव या दीड हजार वर्षाच्या काळात महाराष्ट्राचे आर्थिक जीवन कसे होते याची वरील वर्णनावरून कल्पना येईल. नगरे आणि खेडी असे दोन मुख्य विभाग आताप्रमाणे तेव्हाही होते. खेड्यात मुख्य व्यवसाय म्हणजे शेती आणि नगरात व्यापार आणि वरच्या दर्जाचे उद्योग. खेड्यातही शेतकऱ्यांखेरीज लोहार, सुतार, चांभार यांचे उद्योग चालत. पण ते कारागिरीच्या रूपाचे होते. आणि शेतकऱ्यांच्या गरजा भागविण्यापलीकडे त्यांची मजल जात नसे. नगरातील व्यापारी आणि उद्योगपती यांचे जीवन संघटित असून सर्व देशाच्या जीवनात त्यांना फार महत्त्वाचे स्थान होते. त्या काळी महाराष्ट्राचा व्यापार सर्व हिंदुस्थानभर तर चालेच, पण इजिप्त, अरब देश, रोम, जावा, सुमात्रा येथपर्यंतही येथला माल जात असे व तेथला येथे येत असे. शेतीमध्ये तांदूळ, गहू, कापूस, ऊस, कडधान्ये, गळिताची धान्ये अशी सर्व तऱ्हेची पिके होत. आणि ती बहुधा पावसावरच अवलंबून असे. विहिरी, तलाव यांची जोड त्याला मिळे. पण धरणे, कालवे यांचा आढळ फारसा होत नाही. सोने, चांदी, तांबे यांच्या खाणी विपुल होत्या. रत्नमाणकांच्याही होत्या. आणि मोत्यांची पैदासही होत असे. यावरून येथे समृद्धी होती हे स्पष्ट असले तरी श्रीमंत व गरीब आणि नागरी व ग्रामीण असा भेद तितकाच स्पष्टपणे दिसून येतो.
 एकंदर संस्कृतीच्या दृष्टीने विचार करता शेती, उद्योग व व्यापार या तिन्ही दृष्टींनी तत्कालीन भारतात व जगातही महाराष्ट्र हा पहिल्या दर्जाच्या आर्थिक जीवनाचा उपभोग घेत होता यात शंका नाही. यादवांच्या उत्तरकाळात हे सर्व खालावू लागले. समुद्रगमननिषेध, निवृत्तीचे प्राबल्य, कर्मकांडाचे प्राधान्य इ. याची अनेक कारणे आहेत. त्यांची चर्चा अन्यत्र केलेलीच आहे. यादव काळाअखेर मुस्लिमांच्या महाराष्ट्रावर स्वाऱ्या होऊ लागल्या व थोड्याच काळात सर्व दक्षिण हिंदुस्थान परक्यांच्या भक्ष्यस्थानी पडला. यामागे जी कारणे तीच आर्थिक जीवन खालावण्यामागे आहेत. पण तो अखेरीचा पडता काळ सोडला तर सातवाहन ते यादव हा दीर्घ कालखंड आर्थिक दृष्ट्या महाराष्ट्राचा वैभवाचा काळ होता असे म्हणण्यास चिंता नाही.