महाराष्ट्र संस्कृती/संतांचे कार्य
बहामनी कालातील नेतृत्वाचा विचार आपण करीत आहो. तेराव्या शतकाच्या अखेरीपासून सुरू झालेली मुस्लिमांची आक्रमणे, त्यानंतर काही काळ चाललेली दिल्लीच्या सुलतानांची सत्ता आणि नंतर प्रस्थापित झालेली बहामनी सत्ता ही महाराष्ट्रावर आलेली अस्मानी प्रलयापत्तीच होती. मराठ्यांची राजसत्ता तर मुस्लिमांनी नष्ट केलीच होती, पण त्याबरोबरच मराठ्यांचा हिंदुधर्म, त्यांच्या प्राचीन परंपरा, हा सर्व महाराष्ट्र समाज आणि या लोकांचे स्वत्व यांचा संपूर्ण नाश करण्याची प्रतिज्ञाच बहामनी सुलतानांनी केली होती. अशा वेळी या समाजाच्या नेत्यांनी या अनर्थापासून महाराष्ट्राला वाचविण्यासाठी काय प्रयत्न केले आणि त्यांत त्यांना किती यश आले याचा शोध आपण घेत आहो. तो घेत असताना मराठा सरदार आणि ब्राह्मण शास्त्रीपंडित यांच्या कार्याची चिकित्सा गेल्या दोन प्रकरणांत आपण केली. तीतून असे दिसून आले की परकीय मुस्लिम आक्रमण व येथे प्रस्थापित झालेली मुस्लिम सत्ता ही नष्ट करून या समाजाचे रक्षण करण्याचे कसलेही प्रयत्न या दोन वर्गातील नेत्यांनी केले नाहीत. मराठे आपला क्षात्रधर्म विसरले होते आणि यवनसेवेतच ते धन्यता मानू लागले होते. आणि समाजाचे धारण करील, येथील सकळ लोकसंस्थेचे रक्षण करील असा जो प्राचीन वैदिक धर्म त्याचा शास्त्रपंडितांना विसर पडला होता. श्राद्धपक्ष, व्रतवैकल्ये, तीर्थयात्रा, प्रायश्चित्तविधी यालाच ते धर्म मानीत होते. अशा स्थितीत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास या संतांचा, या महापुरुषांचा या भूमीत उदय झाला नसता तर महाराष्ट्राचा सर्वनाश अटळ होता. त्यांनी आपल्या वाणीने, लेखणीने, कर्तृत्वाने भारतालल्या प्राचीन वैदिक धर्मांचे, गीताधर्माचे पुनरुज्जीवन केले आणि त्या प्रलयापत्तीपासून या समाजाचे रक्षण केले. त्यांच्या त्या कार्याचे स्वरूप आता पाहावयाचे आहे.
(१) भक्तियोग
या संतप्रणीत भागवतधर्माचे पहिले लक्षण म्हणजे 'भक्तियोग' हे होय. भक्तिमार्ग न म्हणता 'भक्तियोग' असे मुद्दामच म्हटले आहे. कारण भक्तियोगाचा येथे व्यापक आशय अभिप्रेत आहे. हे सर्व संत अद्वैतपथी होते. परमेश्वर हा निर्गुण निराकार असून तो चराचर असून तो चराचराला व्यापून राहिलेला आहे. मूर्तीमध्ये, प्रतिमेमध्ये परमेश्वर नसतो. मूर्ती हे उपासना करण्याचे साधन आहे. तिच्यात परमेश्वर आहे असे मानणे म्हणजे अनंत ईश्वराला अत्यंत लहान, संकुचित रूप देणे होय. मुळात परमात्मा प्राणिमात्राच्या ठायी आहे, सर्व भूतांच्या ठायी आहे. म्हणून या सर्व भूतांची भक्ती, या प्राणिमात्राच्या ठायी असलेल्या या परमेश्वराची सेवा म्हणजे खरी भक्ती होय, असा संतांचा सिद्धांत आहे. खरा भक्तियोग तो हाच होय. सर्व मानवतेची सेवा हाच संतांनी उपदेशिलेला श्रेष्ठ धर्म होय.
खरी भक्ती
'भक्ति म्हणजे सर्वभूती । सप्रेम भजनयुक्ती ॥' असे एकनाथ म्हणतात. भूतजाताविषयी प्रेमाची भावना, हीच खरी भक्ती होय. 'सर्वाभूती भगवद्भजन॥' 'सर्वभूती भगवंत पाही, भूते भगवंताचे ठायी, तो भक्तामाजी अति श्रेष्ठ ॥', 'ज्यासि सर्वाभूती बुद्धि समान, तेचि भक्ती तेचि ज्ञान, तेचि स्वानंद समाधान, सत्य सज्ञान मानिती ॥', 'भगवद्भाव सर्वाभूती । या नाव गा अभेदभक्ती ॥' अशी वचने एकनाथी भागवतात ठायी ठायी आढळतात. मोक्षप्राप्तीसाठी भगवंताचे भजन, नामस्मरण, पादसेवन करणे हा जो साधा अर्थ भक्तिमार्ग या शब्दाने व्यक्त होतो, त्यापेक्षा हा अर्थ फार व्यापक आहे. सर्व भूतांच्या ठायी परमेश्वर आहे आणि अशा या परमेश्वराची सेवा करणे हीच भक्ती होय हा संतांच्या भक्तियोगाचा आशय आहे.
सृष्टजात वासुदेव
ज्ञानेश्वरांनाही हाच भावार्थ ज्ञानेश्वरीत अनेकदा, अनेक ठिकाणी विवरून सांगितला आहे. 'हे समस्तही श्रीवासुदेवो, ऐसा प्रीतिरसाचा वोतला भावो, म्हणोनि भक्तां माजी रावो, आणि ज्ञानिया तोचि ॥' हे सर्व सृष्टजात वासुदेवच आहे असा भक्तिभाव, असा प्रेमभाव ज्याच्या अंतःकरणात दाटला आहे, तो सर्व भक्तांमध्ये श्रेष्ठ होय आणि खरा ज्ञानीही तोच होय, असे ते म्हणतात. 'सर्वाभूता अभिन्ना माते भजे -', 'जेणे ऐक्याचिये दिठी, सर्वत्र मातेची किरीटी, देखिला जैसा पटी, तंतु एकु ॥' (सर्वभूतस्थितं मां भजति - या गीता वचनावरील टीका) अशी भक्तियोगाचे स्वरूप विशद करणारी अनेक वचने ज्ञानेश्वरीत आढळतात.
वेदीचे वचन
नामदेवांचीही भक्तीची व्याख्या अशीच आहे. ते भाळेभोळे भक्त होते असा समज आहे, तो खरा नाही. अद्वैत ज्ञानाच्या पायावरच त्यांचा भक्तियोग उभा आहे. 'पाषाण देवाची करिती जे भक्ती । सर्वस्वा मुकती मूढपणे ॥' असे त्यांनीही म्हटले आहे. सर्व भूतांचे प्रेम म्हणजेच परमेश्वराची भक्ती हाच त्यांच्या भक्तियोगाचा अर्थ आहे. 'सर्वाभूती विठ्ठल आहे आहे साचे | हे तव वेदीचे वचन जाण ॥', 'भूतदया करा, भक्तिभावे करा, भजन हरिहरा, वेद सांगे ॥' भूतदया हेच भक्तिभावाने हरिहरांचे केलेले भजन होय, असे वेद म्हणतात. 'सर्वांभूती भजन हेचि पै चोखडे । ब्रह्म माजिवडे करोनि घेई ॥' ब्रह्म हा मध्य कल्पून त्याच्या आश्रयाने राहणाऱ्या सर्वभूतांचे भजन करणे, हाच उत्तम मार्ग होय. अशा अनेक वाक्यांतून नामदेवांनी भक्तियोगाचा अर्थ स्पष्ट केला आहे.
सर्वाभूती विठ्ठल
'विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म ॥', 'वंदीन मी भूते, आता अवधींचि समस्ते, तुमची करीन भावना, पदोपदी नारायणा ॥' सामान्य दैवते असतात - 'तैसा नव्हे नारायण, जग व्यापक जनार्दन, तुका म्हणे त्याचे करा चिंतन ॥', 'अवघे समब्रह्म आहे, सर्वांभूती विठ्ठल पाहे, रिता नाही कोणी ठाव, सर्वाभूतीं वासुदेव ॥' या अभंग- वाणीवरून तुकारामांचाही भक्तीचा अर्थ, सर्व भूतांवरील प्रेम, प्राणिमात्रांची सेवा, असाच आहे, हे दिसून येईल.
सर्व भूतांच्या ठायी भगवंत असल्यामुळे त्या भूतांची सेवा, त्यांचे भजन, त्यांच्या दुःखाचे निवारण, यातच भक्तीची परिणती झाली पाहिजे हे उघडच आहे. त्यामुळे-
भक्तीची परिणती
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती । देह कष्टवीती उपकारे ॥
भूतांची दया हे भांडवल संता । आपुली ममता नाही देही ॥
तुका म्हणे सुख पराविया सुखे । अमृत हे मुखे स्रवतसे ॥
हे संतांच्या भक्तियोगाचे सार आहे. 'जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले । तोची साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा ॥', 'दया, क्षमा, शांती । तेथे देवाची वसती ॥ भूत दया गाई, पशूंचे पालन, तान्हेल्या जीवन, बना माजी ॥ घडे जया उपकार भूतांची ते दया । आत्मस्थिती तया अंगी वसे ॥' तुकोबांच्या वाणीतून ते सार आपल्याला पदोपदी ऐकावयास मिळते.
प्राणिमात्राची सेवा
सर्व भूतांच्या हृदयात ईश्वर आहे ही जाणीव ज्याला झाली त्याला, सर्व भूतांची दुःखे, विश्वाची दुःखे नाहीशी करणे, हाच धर्म होय याविषयी संदेह राहात नाही. 'ऐसे माझेनी नामघोषे । नाहीचि करती जगाची दुःखे । अवघे जगचि महासुखे । दुमदुमित भरले ॥' असे भक्तांचे वर्णन ज्ञानेश्वरांनी केले आहे. अहिंसा या दैवी गुणाचा अर्थ ज्ञानेश्वरांनी काय केला आहे ? जगाला सुख देणे ! 'आणि जगाच्या सुखोद्देशे | शरीर वाचा मानसे । राहटणे हे अहिंसे । रूप जाण ॥' (१६-११४)
एकनाथांनी अहिंसेचा असाच अर्थ केला आहे. 'कायिक, वाचिक, मानसिक । भूता उपजे त्रिविध दुःख । ते जेथे निमाले निःशेख | अहिंसा देख ते ठायी ॥ कृपालुता याचा अर्थ हाच. '- आपणासी होय दुख । ते परासी न करी निःशेख । जे आपणिया होय सुख । ते आवश्यक करी प्राणिमात्रा ॥ - या नाव कृपालुता.'
या अनेक वचनांवरून संतांच्या भक्तियोगाचा अर्थ स्पष्ट होईल. भूतांची, प्राणिमात्राची सेवा, मानवजातीवरचे प्रेम, विश्वाच्या सुखदुःखाची चिंता, रंजल्यागांजलेल्यांना हृदयी धरणे, हीच खरी भक्ती होय, असा तो अर्थ आहे.
(२) स्वधर्म
स्वधर्माचे, विहितकर्माचे आचरण हे संतांच्या भागवतधर्माचे दुसरे लक्षण होय. सर्व संतांची चातुर्वर्ण्यावर श्रद्धा होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे परंपरागत चार वर्ण ते मानीत असत आणि या चारही वर्णांच्या लोकांनी, शास्त्राने सांगितलेली आपापली कर्मे केली पाहिजेत, असा संतांचा कटाक्ष होता. ही विहित कर्मे निष्ठेने करणे हीच परमेश्वराची पूजा, हीच खरी भक्ती, असे ते सांगत. नामस्मरणाचे संतांना अतिशय महत्त्व वाटत असे, यात शंका नाही. पण केवळ नामस्मरण, फळाफुलांनी केलेले पूजन, याला ते भक्ती म्हणत नाहीत. आपापली विहित कर्मे हीच खरी फुले आणि या फुलांनी केलेली परमेश्वराची पूजा ही खरी पूजा होय असा त्यांचा उपदेश आहे. 'तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्मकुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा, तोषालागी.' स्वकर्मकुसुमांनी केलेली पूजा परमेश्वराला अपार संतोष देते, असे ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. 'स्वकर्माचिया महापूजा, तोषला ईशु,' 'हे विहितकर्म पांडवा, हेचि परमसेवा, मज सर्वात्मकाची' याही वचनांचा तोच भावार्थ आहे. वर्णप्राप्त कर्माचे म्हणजेच स्वधर्माचे आचरण करणे हीच खरी परमेश्वराची पूजा होय. (१८ - १७)
यज्ञ
स्वधर्माचरणाला ज्ञानेश्वरांनी यज्ञही म्हटले आहे. 'म्हणोनि स्वधर्मानुष्ठान । ते तुज अखंड यजन॥', 'तुम्ही स्वधर्मयज्ञीं यजावे, अनायासे ॥', 'हे संपत्तिजात आघवे, हवनद्रव्य मानावे, मग स्वधर्मयज्ञे अर्पावे आदिपुरुषो' ही तिसऱ्या अध्यायातील वचने प्रसिद्धच आहेत. स्वधर्म आचरिताना सर्व संपत्तीवर पाणी सोडावे; एवढेच नव्हे, तर अवश्य तर प्राणही अर्पावा, असेही ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे. 'या स्वधर्माते अनुष्ठिता, वेचु होईल जीविता, तोही निका, वर उभयतां, दिसतसे' अशा प्राणार्पणाने उभयता म्हणजे दोन्ही लोकी कल्याण होईल. (ज्ञानेश्वरी ३ -१३०, २२९)
लोकसंस्थेचे रक्षण
स्वधर्माचा असा आग्रहाने उपदेश करण्याचे कारण असे की 'पुढतपुढती हे पार्था, हे सकळ लोकसंस्था, रक्षणीय सर्वथा, म्हणऊनीया - ' (३- १७०) या सर्व लोकसंस्थेचे म्हणजे समाजाचे रक्षण झाले पाहिजे. ते रक्षण करणे हे चारही वर्णांचे कर्तव्य असल्यामुळे त्यांनी आपापली वर्णप्राप्त कर्मे, फलाशा टाकून, म्हणजे समाजहित बुद्धीने, केली पाहिजेत. अर्जुन हा क्षत्रिय. 'क्षत्रिया आणिक काही, संग्रामावाचूनि उचित नाही.' हा क्षात्रधर्म त्याने सोडला तर काय होईल ? 'पूर्वजांचे जोडले, आपणचि होय धाडिले, जरी आजी शस्त्र सांडिले, रणी इये ॥ पूर्वजांनी येथे जे वैभव निर्माण केले आहे ते आपण घालविले, असे होईल. आणि पतीवाचून स्त्रीची जी अवस्था होते ती, तू जर स्वधर्म सोडलास तर तुझी होईल. म्हणून, आता ऊठ, 'आणि या भारापासोनि सोडवी, मेदिनी हे!' या पृथ्वीचे म्हणजे सामाजाचे रक्षण कर.
शुद्ध भागवतधर्म
एकनाथांनी स्वधर्माचे विवरण करताना हाच अर्थ सांगितला आहे. 'जे जे कर्म स्वाभाविक । ते ते ब्रह्मार्पण अहेतुक | या नाव भजन निर्दोख । भागवत धर्म याचि नाव शुद्ध ॥' स्वकर्म हीच फुले, त्यांनी देवाची पूजा करावी, असे ज्ञानेश्वर म्हणतात. ती कर्मे निर्हेतुकपणे करणे हेच भजन होय, असे एकनाथ म्हणतात. आणि त्यांच्या मते हाच खरा भागवत धर्म होय. 'चहू आश्रमांहूनि उत्तम । आपुला जो निजाश्रम | तेथे स्थिरावोनि मनोधर्म । वर्णाश्रम चालवी ॥' एकनाथांना वर्णव्यवस्थेप्रमाणेच आश्रमव्यवस्थाही मान्य होती. पण सर्व आश्रमांत गृहस्थाश्रम श्रेष्ठ होय असे त्यांचे मत होते. त्या निजाश्रमात राहून वर्णाश्रमव्यवस्थेचे तू संरक्षण कर, असे ते म्हणतात. 'उचिताचे धर्म । भागा आले ते करू,' 'आला भागासी तो करीं वेवसाव । परी राहो भाव तुझ्यापायीं ॥' या वचनांतून तुकारामांनीही प्राप्तकर्म, भागा आलेला वेवसाव, वर्णाप्रमाणे ठरलेला उद्योग, म्हणजेच स्वधर्म किंवा विहितकर्म यांचाच उपदेश केला आहे.
स्वधर्माची महती संतांनी सांगितली याच्या मागेही तोच दृष्टिकोन आहे. भक्ती म्हणजे केवळ नामस्मरण नव्हे. भूतमात्राच्या ठायी परमेश्वर आहे म्हणून भूतमात्राची सेवा ही खरी भक्ती होय. त्याचप्रमाणे निष्कामबुद्धीने, फलाशेचा त्याग करून, त्याग-बुद्धी मनात ठेवून, वर्णप्राप्त कर्मे करीत राहणे ही पण परमेश्वराची भक्तीच होय, असा संतांचा भावार्थ होता. ही सर्व लोकसंस्था, समाजसंस्था टिकून राहिली पाहिजे, समाजाचा उत्कर्ष झाला पाहिजे, याविषयी संतांना संदेह नव्हता; म्हणूनच त्यांनी स्वधर्माचरणाचा कटाक्षाने उपदेश केला आहे.
(३) गृहस्थाश्रम
स्वधर्माचरणाचा आग्रह धरला की संन्यासाला विरोध ओघानेच येतो. महाराष्ट्रातील सर्व संतांनी यामुळेच संन्यासाला, संसारत्यागाला निक्षून विरोध केला आहे. महाराष्ट्रात आणि खरे म्हणजे अखिल भारतात त्या काळी संन्यासवादाचा फार प्रभाव पडला होता. या संन्यासवादाचे म्हणजेच निवृत्तिवादाचे मुख्य प्रवर्तक म्हणजे आद्य श्री शंकराचार्य हे होत. पुढच्या काळात रामानुजाचार्य, मध्वाचार्य असे मोठमोठे आचार्य होऊन गेले. शंकराचार्यांशी त्यांचे मूळ तात्त्विक सिद्धान्ताविषयी, पुष्कळच मतभेद होते, पण संन्यास, निवृत्ती यांविषयी सर्वाचे एकमत होते. महाराष्ट्रात महानुभावपंथाचा आधीच उदय व प्रसार झाला होता. हा पंथ तर पराकाष्ठेचा निवृत्तिवादी होता. भागवत पुराण हे शंकराचार्यानंतर एकदोन शतकांनी म्हणजे नवव्या दहाव्या शतकात लिहिले गेले. ते पुराणही अतिरेकी निवृत्तिवादाचाच पुरस्कार करते. भागवत धर्माचा उदय वेदकाळीच झालेला आहे. वेदप्रणीत भागवतधर्म पूर्ण प्रवृत्तिवादी होता. पण त्यानंतर काही उपनिषदांनी संन्यासवादाचा जोराने पुरस्कार केला. संन्यासवाद हा समाजाला नेहमीच घातक ठरतो. हे जाणून श्रीकृष्णांनी गीतेमध्ये कर्मयोगाचे प्रतिपादन फार आग्रहाने केले. त्यानंतर बौद्ध व जैन या धर्माच्या प्रणेत्यांनी संपूर्ण निवृत्तीचा संदेश समाजाला दिला. पण महाभारत आणि स्मृती या ग्रंथांच्या कर्त्यांनी प्रवृत्तिवादाचा पक्ष अत्यंत प्रभावीपणे उचलून धरला. त्यामुळेच इ. स. पूर्व तिसऱ्या शतकापासून इ. सनाच्या सातव्या आठव्या शतकापर्यंत भारतात सुवर्णयुग अवतरले होते. त्यानंतर शंकराचार्यांचा उदय झाला आणि भागवतपुराण हा ग्रंथ अवतीर्ण झाला. आचार्य हे ज्ञानमार्गाचे व भागवतकार हे भक्तिमार्गाचे प्रणेते आहेत. पण निवृत्तीविषयी, संसारनिषेधाविषयी त्यांचे मतैक्य आहे. आचार्यांचा भारतातील पंडितजनांवर आणि भागवताचा बहुजनांवर फार मोठा प्रभाव त्या काळी होता व अजूनही आहे. पुढील काळात झालेले रामानुजादी आचार्य हे निवृत्तिवादीच होते हे वर सांगितलेच आहे. संतांच्या उदयाच्या काळी अशी परिस्थिती होती. पण त्या ओघात वाहून न जाता संतांनी संसारत्यागाचा एकमुखाने निषेधच केला आहे.
वैदिक आणि पौराणिक
भागवत धर्मामध्ये ही जी परिवर्तने झाली त्यांचे अतिशय उद्बोधक असे विवेचन डॉ. शं. दा. पेंडसे यांनी केले आहे. 'वैदिक वाङ्मयातील भागवतधर्माचा विकास आणि 'पौराणिक भागवत धर्म ' हे दोन आणि ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास या संतांच्या कार्याविषयी चार असे या विषयावर सहा ग्रंथ लिहून त्यांनी या विषयाचे अगदी सांगोपांग आणि विद्वत्तापूर्ण विवेचन केले आहे. त्यांच्या मते वेद व गीता यांतील भागवतधर्म हा प्रवृत्तिवादी आहे, त्याला निवृत्तिवादी रूप भागवत पुराणाने दिले. पण संतांनी, भागवत पुराणाचा महिमा त्यांना मान्य असूनही, वैदिक, प्रवृत्तिवादी भागवतधर्माचाच पुरस्कार केला. 'ज्ञानेशांचा कर्मयोग' आणि (एकनाथांचा) 'भागवत आणि कर्मयोग,' या त्यांच्या ग्रंथांतील प्रकरणांत त्यांनी आपल्या मताची सविस्तर मांडणी केली आहे. संतांनी वेद-गीताप्रणीत कर्मयोगाचेच प्रतिपादन केले आहे. या त्यांच्या मताची थोडी चर्चा करू. पण संतांनी संसारत्यागाचा निषेध केला आहे, संन्यासमार्गाला विरोध केला आहे, याविषयी वादच नसल्यामुळे, त्या विषयाचे सरळ प्रतिपादन येथे केले आहे.
अलिप्त कमळ
'न लगे लौकिक सांडावा व्यवहार | ध्यावे वनांतर भस्मदंड ॥' असे तुकारामांनी सांगितले आहे. मोक्ष मिळवण्यासाठी, परमेश्वरप्राप्तीसाठी लौकिक व्यवहार म्हणजे संसार सोडावा लागतो, अंगाला भस्म फासून, हातात दंड घेऊन अरण्यात जावे लागते, असे नाही. संसारात राहूनही नित्य नामस्मरण करीत राहिले तर परमेश्वर प्रसन्न होतो. 'सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे । घडे ज्या उपकार, भूतांची ते दया, आत्मस्थिती तया अंगी वसे ॥' या एका अभंगात संसाराविषयीचे संतांचे सर्व प्रतिपादन आलेले आहे. भक्तांनी संसारातच राहावे, पण कशाविषयी आसक्ती ठेवू नये भोगविषयांच्या आहारी जाऊ नये. वासनांचे गुलाम होऊ नये. व्यवहार करायचा तो सत्याने, नीतीने करावा, भूतदया सतत चित्तात ठेवून परोपकार करीत राहावे. ज्या मनुष्याचे असे आचरण आहे तो, संसारात असूनही, मुक्तच आहे.
इंद्रियांचा जय
संतांचा मुख्य कटाक्ष आहे तो मनोनिग्रहावर, वासनाजयावर आहे; संसाराच्या प्रत्यक्ष त्यागावर नाही. कारण संसारत्याग करून माणूस वनात गेला तरी, त्याच्या वासना प्रबळ असतील तर, तेथेही तो भोगाधीन होतोच. तेथेही तो अनाचार करतोच. उलट इंद्रियांचा जय करून तो संसार नीतीने करील राहिला, स्वकर्मकुसुमांनी परमेश्वराची भक्ती करीत राहिला तर संसारातील भोग मोक्षाच्या आड येत नाहीत. एकनाथ म्हणतात –
'सकळ सांडूनि वना गेला । वनी वनिता चिंतू लागला ॥' तर काय उपयोग ? 'अशा मूर्खासि त्याग तो झाला बाध' अशाला त्याग हा घातकच ठरणार. कारण सरळ मार्गाने वासनांची तृप्ती न झाल्यामुळे हा मनुष्य आडमार्गी जातो. उलट 'देही असोनि नाही अहंकृती । गेही असोनि नाही गृहासक्ती | शेखी लोकांमाजी लौकिकस्थिती । सुखे वर्तन लोकांसारिखे ॥' मनुष्याने अहंकाराचा, मीपणाचा त्याग केला, संसारातील भोगांविषयीची आसक्ती सोडली तर तो खरा त्यागी ठरतो, असा मनुष्य लोकांतच राहतो, लोकांसारखाच वागतो. तो मोठा ठरतो तो त्याच्या मनोजयामुळे, भूतदयेमुळे; अलौकिक, विपरीत आचरणामुळे नव्हे.
समाधी
'प्रपंच सांडूनि वना गेला । तो देहप्रपंचे अडकला । देही देहो जेणे मिथ्या केला । तो सत्य जाण अकिंचन ॥ विवेकेवीण वैराग्य गहन । ते केवळ आंधळे जाण । सर्वाभूती भगवद्भावो । हे वैराग्य युक्ति पहा हो ॥' या एकनाथांच्या वचनांचा भावार्थ हाच आहे. याच संदर्भात समाधीविषयी त्यांनी केलेले विवरण फार प्रसिद्ध आहे. त्याचा सारांश असा. समाधी म्हणजे भगवद्गीतेतील स्थितप्रज्ञता. संसारात राहून कर्माचरण करीत असताना ही स्थितप्रज्ञता प्राप्त होत नाही असे जे म्हणतात त्यांना अध्यात्म मुळीच कळलेले नाही. अर्जुनाला भगवंतांनी प्रथम स्थितप्रज्ञता शिकविली आणि लगेच युद्धात लोटले. याचा अर्थ हाच की स्वकर्माच्या आचरणाने स्थितप्रज्ञतेला बाध येत नाही. ताटस्थ्य म्हणजे स्वधर्माचरणापासून, सांसारिक उद्योगापासून दूर राहणे. ही खरी समाधी म्हणजे स्थितप्रज्ञता नव्हे. 'ताटस्थ्या नाम समाधी । म्हणेल त्याची ठकली बुद्धी । हे समाधी नव्हे त्रिशुद्धी । जाण नुसती मूर्च्छा आली.' कर्मापासून अलिप्त राहणे ही निश्चितपणे समाधी नव्हे. ती मूर्च्छा आहे. संसारात राहून, स्वधर्माचरण करीत असतानाही, जी मनःशांती अंगी बाणते ती खरी समाधी. ती खरी स्थितप्रज्ञता. 'इंद्रियी वर्तता विषयी विरक्त, तो भगवद्भक्त धन्य होय.'
नैष्कर्म्य
ज्ञानेश्वरांचे या बाबतीतले विवेचन अतिशय स्पष्ट आहे. संसारासाठी करावी लागणारी कर्मे, ते व्यावहारिक उद्योग, मोक्षाच्या आड येतात, म्हणून त्यांचा त्यागच केला पाहिजे, संसार करून मोक्षलाभ कधीही होणे शक्य नाही, असा संन्यासवादी लोकांचा सिद्धांत होता. त्याला उत्तर म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात - 'जयाचे ऐहिक धड नाही ! तयांचे परत्र पुससी काई ?' ( ४. १५४ ) या इहलोकीचा संसार, येथले जीवन ज्यांचे यशस्वी होत नाही ते मोक्षाच्या बाबतीत, परलोकसाधनात कसे यशस्वी होणार ? उलट निष्काम बुद्धीने, आसक्ती न ठेवता संसार केला तर इह आणि पर दोन्ही साधतात. 'ऐहिक तरी न नशे । आणि मोक्ष तो उरलाचि असे ॥' ज्ञानेश्वरांचे नैष्कर्म्य या शब्दावरचे विवरण या दृष्टीने अगदी निर्णायक आहे. कर्माचा, सांसारिक उद्योगांचा त्याग म्हणजे नैष्कर्म्य, असे म्हणणे हा मूर्खपणा आहे. 'की प्राप्तकर्म सांडिजे । येतुलेनि नैष्कर्म्य होईजे । हे अर्जुना वाया बोलिजे । मूर्खपणे ॥' मग नैष्कर्म्य म्हणजे काय ?– 'ब्रह्म तेचि कर्म । ऐसे बोधा आले जया सम । तथा कर्तव्य ते नैष्कर्म्य । धनुर्धरा ॥' (४.१२१) सर्व कर्मे ही ब्रह्मोपासना आहे असे स्थितप्रज्ञ, सम बुद्धीने जो मानतो, त्याचे कर्तव्य, त्याचे सर्व उद्योग म्हणजे नैष्कर्म्य होय. म्हणून 'गृहादिक आघवे । ते काही न लगे त्यजावे । जे येते जाहले स्वभावे । निःसंगु म्हणउनी ।' (५.२२)
(४) कर्मकांडनिषेध
निष्कामकर्म, त्यागबुद्धी, स्थितप्रज्ञता, मनोनिग्रह, वासनाजय हा खरा धर्म होय असा संतांचा निश्चय होता. लोकसंग्रह, विश्वाची सेवा, रंजल्यागांजलेल्यांना हृदयाशी धरणे, दया, क्षमा, शांती, भूतांचे पालन, कंटकांचे निर्दालन हा शुद्ध भागवत धर्म होय, असा त्यांचा ठाम सिद्धान्त होता. त्यामुळे कर्मकांडाचा जागोजागी निषेध करून त्यांनी नीतीला- सत्य, चारित्र्य, निःस्पृहता या नीतितत्त्वांना - धर्मविचारात अग्रस्थान दिले आहे.
व्रततप न लगे
शास्त्री पंडितांनी कर्मकांडालाच सर्व महत्त्व देऊन धर्माला किती हीन पातळीवर आणून ठेवले होते, हे मागे आपण पाहिलेच आहे. तीर्थयात्रा, व्रतवैकल्ये, तिथीवार, श्राद्धपक्ष, मंत्रतंत्र हाच त्यांच्या मते धर्म होता. संतांनी या कर्मकांडात्मक धर्मावर कडक टीका केली आहे. ज्ञानेश्वर म्हणतात, 'तुम्ही व्रत नियम न करावे, शरीराते न पीडावे, दूरी केही न वचावे, तीर्थासि गा ॥', 'योगादिक साधने, साकांक्ष आराधने, मंत्रतंत्र विधाने । झणी करा ॥' (करू नका); तर तुम्ही स्वधर्मरूप यज्ञाने भगवंतांची आराधाना करावी (३-८९-९१) नागपंचमीला नागाची पूजा, चतुर्थीला गणेशाची, एकादशीला विष्णूची आराधाना, या सर्वांपुढे नवससायास करणे, हे करून शिवाय तीर्थयात्रेला जाणे या सर्व अवडंबराची, जड, भावहीन, काम्यकर्माची ज्ञानेश्वरांनी अत्यंत कटू शब्दांत निर्भर्त्सना केली आहे. नामदेवांनी अशाच शब्दांत व्रत- वैकल्यावर टीका केली आहे. 'व्रततप नलगे करणे, नलगे तुम्हां तीर्था जागे ॥ आपुलेचि ठायी असा सावधान, करा हरिकीर्तन सर्व काळ ॥' यात्रा, व्रते यांचा, भस्म, दंड, जटा, त्रिपुंड्र, तुळशीमाळा, चंदनाची उटी यांचाही, नामदेव निषेध करतात आणि 'सर्वाभूती समदृष्टी, हेचि भक्ती गोड मोठी' असा भक्तांना उपदेश करतात.
भाव धरावा
'केले काय तुवा जाउनिया तीर्था । सर्वथा विषयासी भुललासी ॥ वरी दिसशी शुद्ध, अंतरी मलिन । तोवरी हे स्नान व्यर्थ होय ॥ मन शुद्ध झालिया, गृहीच देव वसे, भाविकासी दिसे बैसल्या ठायी,' अशा शब्दांत एकनाथांनीही व्रतवैकल्याविषयी आपले मत व्यक्त केले आहे. व्रतवैकल्याप्रमाणेच टिळाटोपीमाळा यांचाही ते निषेध करतात- 'टिळा टोपी घालुनी माळा, म्हणती आम्हां संत ।', 'पाय घालुनी आडवा, काय जपतोसि गाढवा ।' शरीरदंडन हाच धर्म, असे मानणारांची एकनाथांनी अशी शोभा केली आहे. भावभक्तिहीन अशा या ज्या शारीरिक कवायती त्यांचा त्यांना आणि सर्वच संतांना अतिशय तिटकारा असे. 'भाव धरावा बळकट । आणिक काही नको कष्ट ॥' असे त्यांचे मत होते. मनापासून खरी परमेश्वराची भक्ती करणाऱ्या भक्तांबद्दल, इंद्रियनिग्रह करून, अहंकाराचा त्याग करणाऱ्या हरीच्या दासांबद्दल, त्यांना एवढा आदर असे की त्यांनी तीर्थयात्रेला जाण्याचे कारण नाही, कारण, 'तीर्थ करिती त्यांची यात्रा' असे एकनाथांनी म्हटले आहे.
भीतरी चांगा
दांभिक बाह्य आचार, सोंगेढांगे यांची तुकारामांना इतर संतांपेक्षा दसपट चीड असे. संन्यासी, कानफाटे, मलंग, जंगम या सर्वांना ते मायेचे मइंद म्हणतात. हे सर्व पोटभरू लोक - 'त्याजपाशी गोविंद नाही नाही ।' तीर्थ यात्रा, व्रते यांविषयी त्यांचे हेच मत आहे.
'काय काशी करिती गंगा । भीतरी चांगा नाही जो ॥ काय टिळे करिती माळा । भाव खळा नाही ज्या ॥'
कर्मकांड, जड आचार धर्म या हीन धर्माचा निषेध करून नीती, शुद्ध चारित्र्य, निर्मळ जीवन या खऱ्या धर्माचे, शुद्ध भागवतधर्माचे महत्त्व संतांनी समाजमनावर बिंबविले, हे त्यांचे फार मोठे उपकार आहेत. 'भीतरी चांगा असणे' हाच त्यांच्या मते खरा धर्म होय. चित्तशुद्धी हेच खरे चारित्र्य होय.
नीतीचे आदर्श
भक्त हे नीतीचे, चारित्र्याचे केवळ आदर्श असतात. जयांचिये लीळेमाजी नीती जियाली असे ॥ असे ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. त्यांचे सहज वागणे हाच नीतीचा खरा आधार होय. परमेश्वराचे हे भक्त कधी कोणाचा द्वेष करीत नाहीत, सर्व प्राणिमात्राशी त्यांची मैत्री असते, आणि मुख्य म्हणजे त्यांच्या मनात कसलाही भेदभाव नसतो. ज्ञानेश्वरांनी बाराव्या अध्यायात, भक्तांची लक्षणे सांगताना, पृथ्वी, दीप, पाणी यांची उदाहरणे देऊन, त्यांच्या ठायी समभाव किती उत्कट असतो हे विशद केले आहे. 'आणि मी हे भाष नेणे, माझे काहीच न म्हणे!' या वाक्यात सर्व नीतीचे त्यांनी सार सांगितले आहे. कारण या मीपणातूनच सत्तालोभ निर्माण होत असतो. या दोन लोभांतूनच सर्व अनीती, सर्व भ्रष्टाचार उगम पावतात.
'पहा परदारा जननिये समान । परद्रव्य पाषाण म्हणोनि मानी ॥ परनिंदा, परपीडन सांडोनिया, भजन हरीचे करा ॥' या अभंगात नामदेवांनीही नीतिधर्माची अशीच महती गायिली आहे. आणि 'सर्वाभूतीं कृपा, संतांची संगती । मग नाही पुनरावृत्ती जन्ममरण ॥' अशी भक्तांना ग्वाही दिली आहे.
शुद्ध चर्या
संत परमेश्वराचे पूजन कसे करतात ? तुकाराम म्हणतात, 'शुद्धचर्या हेचि संतांचे पूजन | लागतचि नाही धन वित्त ॥' (जोगगाथा, ४३८). ते आपल्या शुद्ध आचरणाने विठ्ठलाची पूजा करतात. त्यासाठी त्यांना धन लागत नाही. परमार्थसाधनाची, जन्ममरण टाळण्याची नामदेवांनी सांगितली तीच दोन साधने तुकारामांनी सांगितली आहेत. 'परद्रव्य, परनारी यांचा धरीरे विटाळ । साधने तरी हीच दोन, जरी कोणी साधील...' आणि 'यामुळे देव, भाग्ये घरी येती, संपत्ती त्या सकळा ॥' अनीतीचे सर्वत्र रूढ असलेले जे दोन प्रकार त्यांचा मुद्दाम निर्देश करून तुकारामांनी त्यांचा निषेध केला आहे. लाच घेऊन खोटा न्याय देणे आणि पैशावर नजर ठेवून वैद्याने भलतीच ओषधे देणे, हे ते दोन प्रकार होत. 'लोभावरी ठेवूनि हेत । करी असत्य न्यायनीत ॥', 'न हो वैद्य आम्ही अर्थाचे भुकेले । भलते द्यावे पाले भलत्यासी ॥' तुकारामांना नीतिदृष्ट्या सर्वात वंद्य कोण वाटतो ? 'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले !' ही शुद्ध चर्या किती दुर्मिळ आहे हे पावलोपावली प्रत्येकाला दिसतच असते.
गुरुचरित्र
तीर्थयात्रा, व्रतवैकल्ये, श्राद्धपक्ष, टिळेटोपीमाळा, गंधभस्म, हे जे सर्व कर्मकांड त्याचा पुरातन काळापासून थोर धर्मवेत्ते निषेध करीत आले आहेत. पण तरीही त्याचा जोर कमी होत नाही. याचे कारण उघड आहे. एकतर मनोनिग्रह, वासनाजय यांपेक्षा त्याचे आचरण सुलभ असते, आणि दुसरे म्हणजे त्यामुळे धनलाभ, पुत्रलाभ, राज्यलाभ असे अनेक लाभ होतील, अशी आश्वासने त्याचे प्रणेते देत असतात. शास्त्री- पंडितांच्या निर्णय सिंधूसारख्या ग्रंथांचे जे विवेचन मागे केले त्यावरून हे स्पष्ट होईल. तशाच तऱ्हेचा मराठीतला ग्रंथ जो गुरुचरित्र त्याचा विषयपूर्तीसाठी येथे विचार करू. गुरुचरित्र हा ग्रंथ सरस्वती गंगाधर यांनी इ. स. १५५८ साली लिहिला. त्यात श्रीपाद श्रीवल्लभ आणि नरसिंह सरस्वती या दोन दत्तावतारी पुरुषांचे चरित्र दिलेले असून त्या गुरूंच्या मुखातूनच वरील प्रकारच्या धर्माचा उपदेश केलेला आहे.
गोकर्ण क्षेत्र
सातव्या अध्यायात सांगितलेले गोकर्ण या क्षेत्राचे माहात्म्य पाहा. एक चांडाळ स्त्री वृद्ध, अंध, महारोगी अशी होती. ती अत्यंत पापी होती. आधीच्या जन्मीही तिने फार पापे केली होती. ती स्त्री कशी तरी या क्षेत्री येऊन एका झाडाखाली पडली होती. तिला कोणीही भीक घातली नाही. त्यामुळे तिला उपवास घडला. त्याच वेळी कोणीतरी तिच्या हातात एक बेलाचे पान दिले. तिने ते संतापाने फेकून दिले. ते नेमके शिवलिंगावर जाऊन पडले. यामुळे तिला अपार पुण्य लाभले. आणि देवदूतांनी येऊन तिला विमानात बसवून स्वर्गाला नेले. अन्न नाही म्हणून घडलेला उपास आणि फेकून दिलेले – वाहिलेले नव्हे- बेलाचे पान याचे एवढे पुण्य ! या कृत्यांचा मनाशी, अंतःकरणाशी कसलाही संबंध नाही आणि संत तर सांगतात की देव भावाचा भुकेला ! संतांच्या भागवतधर्मात आणि या कर्मकांडात केवढा जमीन-अस्मानाचा फरक आहे, ते यावरून दिसून येईल.
अनंतव्रत
बेचाळिसाव्या अध्यायात अनंतव्रत सांगितले आहे. सरस्वती गंगाधरांनी ते गुरूकडूनच वदविले आहे. सुशीला नावाची स्त्री होती. कौंडिण्य नावाचा तिचा पती. दोघेही प्रवासात असताना सुशीलेने एका नदीच्या काठी, काही बायकांच्या सांगण्यावरून, तेथेच फुले, वाती, कापूर घेऊन अनंताची पूजा केली. घरी पोचताच त्या दोघांना ऐश्वर्य प्राप्त झाले. पुढे कौंडिण्याच्या आज्ञेवरून तिने ते व्रत बंद केले. तेव्हा सर्वनाश ओढवला. पुन्हा सुरू केले तेव्हा पुन्हा राज्यप्राप्ती झाली ! या व्रताचा महिमा असा की भगवान श्रीकृष्णांनी, वनवासात पांडवांना ते भेटावयास गेले असताना, तेथे त्यांना गेलेले राज्य परत मिळविण्याचा उपाय म्हणून, ते सांगितले आहे. आणि ते घारगे, खीर, इ. पक्कान्नांच्या तपशिलासह. पण पुढे त्याच श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता कशाला सांगितली, आणि त्याच्याकडून युद्ध करविले, हे ध्यानात येत नाही. पुनः पुन्हा त्याच्याकडून अनंतव्रत करवून घेतले असते तर काम भागले असते !
बाह्य आचार
तीर्थक्षेत्रे आणि व्रते यांचे हे माहात्म्य झाले. इतर बाह्य आचारांचा महिमा शास्त्री- पंडितांप्रमाणेच सरस्वती गंगाधरांनी सांगितला आहे. जेवताना कोणत्या लोकांनी कोणत्या धातूच्या भांड्यातून जेवावे, तांब्याचे, पितळेचे, काशाचे, ही भांडी कोणाला वर्ज्य, कोणाला युक्त हे तपशिलाने सांगितले आहे. जेवताना पाचही बोटांनी घास घ्यावा. एक बोट सोडून कोणी जेवला तर गोमांसभक्षण केल्याचे पातक लागते. तोंड धुवायचे ते मधल्या बोटाने धुतले तर मनुष्य रौरव नरकात जातो. लसूण, गाजर, कांदा, मुळा, तांबडा भोपळा, पांढरा भोपळा यांतले कोणत्या तिथीला काय चालेल व काय वर्ज्य याविषयीही नियम सांगितलेले आहेत. त्यांपैकी एखाद्याचा जरी भंग झाला तरी रौरव नरक ! शौचाहून आल्यावर माती किती वेळा लावावी, ब्रह्मचाऱ्याने किती वेळा, गृहस्थाने किती वेळा, भिन्न वर्णाच्या माणसांनी किती वेळा, नंतर चुळा किती वेळा भराव्या - ब्राह्मणाने ८ वेळा, क्षत्रियाने ६ वेळा, वैश्याने ४ वेळा व शूद्राने २ वेळा - याचेही कडक नियम आहेत. यात काही चुकले तर माणसाच्या अंगावर जितके केस आहेत तितके दिवस नरकवास !
दोन आक्रमणे
गुरुचरित्रात असा हा कर्मकांडात्मक धर्म सांगितलेला असून त्याचा त्या वेळी तर प्रभाव होताच पण आजही तो तसाच आहे. किंवा तो जास्तच वाढला आहे. हा प्रभाव ब्राह्मणवर्णात विशेष आहे. या ग्रंथाच्या आवृत्त्यावर आवृत्त्या निघत आहेत. एक संक्षिप्त आवृत्तीही निघाली आहे. तीत गुरुचरित्राच्या कार्याविषयी जे विचार मांडले आहेत ते सांगतो. त्यावरून या ग्रंथाचा प्रभाव किती आहे ते कळून येईल.
हा ग्रंथ सरस्वती गंगाधरांनी कशासाठी लिहिला ? रिसबूड म्हणतात, त्या काळी हिंदुसमाजावर, हिंदुधर्मावर दोन आक्रमणे आली होती. एक मुसलमानांचे बाह्य आक्रमण व दुसरे भागवत संप्रदायाचे आक्रमण ! भागवत धर्म हे हिंदुसमाजावर आक्रमण होते म्हणजे काय ? रिसबूड म्हणतात, भागवत धर्म ऊर्फ भक्तिसंप्रदाय हा सुटसुटीत, आचारसुलभ, तंत्रमंत्र नसलेला, वैदिक कर्मकांड नसलेला आणि एकवर्णात्मक असा धर्म होता. त्यामुळे जनता त्याच्याकडे आकृष्ट झाली व मुस्लिम धर्मप्रचारास आळा बसला. पण त्या वेळी क्षत्रिय व वैश्य हे दोन वर्ण नष्ट झाले होते. फक्त ब्राह्मण व शूद्र हे दोनच वर्ण शिल्लक होते. आणि या एकवर्णीय भक्तिसंप्रदायामुळे ब्राह्मण वर्णही नष्ट होण्याची वेळ आली होती. तो धोका टाळून, ब्राह्मण वर्णाची उन्नती करण्यासाठी दत्त संप्रदाय स्थापन झाला. आणि मुस्लिमांचे व भागवत धर्माचे अशा दोन्ही आक्रमणांस तोंड देऊन त्याने हिंदुसमाजाचे रक्षण केले.
यांपैकी मुस्लिम आक्रमणास दत्त संप्रदायाने तोंड कसे दिले याचा विचार पुढे करू. भागवतधर्माच्या आक्रमणापासून रक्षण करण्यासाठी गुरुचरित्राने कोणते उपाय सांगितले ते येथे पाहू.
भागवतधर्माचे रिसबूड यांनी जे वर्णन केले आहे त्यावरून ते उपाय कोणते ते सहज ध्यानात येईल. भागवतधर्मात तंत्रमंत्र नाही, कर्मकांड नाही, आणि तो एकवर्णात्मक आहे; म्हणजे तो भक्तीच्या दृष्टीने वर्णावर्णात उच्चनीचता मानीत नाही. भेदाभेद भ्रम अमंगळ असे म्हणतो. तेव्हा तंत्रमंत्र असलेला, वैदिक कर्मकांड असलेला व वर्णावर्णांत भेदभाव मानणारा असा धर्म सांगणे हा समाजरक्षणाचा उपाय होय हे स्पष्ट आहे. गुरुचरित्राने तो सांगून भागवत धर्माच्या आक्रमणास तोंड दिले असे रिसबूड यांचे म्हणणे आहे.
ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम या संतांनी तंत्रमंत्र, कर्मकांड यांचा निषेध केला. भक्तिसंप्रदायात उच्चनीच असा भेद नाही, वर्णभेद मानणे अमंगळ आहे, असे सांगितले; त्यामुळे त्यांचा भागवतधर्म हे हिंदुसमाजावर आक्रमण ठरले. मुस्लिमांच्या आक्रमणासारखेच ते आक्रमण घातक ठरले आणि त्यावर उपाय म्हणून गोकर्ण क्षेत्र, अनंतव्रत, भोजनविधी, शैौचविधी, खाद्य पदार्थाचे विधिनिषेध यांनी युक्त असा धर्म गुरुचरित्राने सांगितला, असे त्या ग्रंथाचे अभिमानी आजही सांगत आहेत. कर्मकांडात्मक धर्माचा प्रभाव किती असतो ते यावरून कळून येईल.
वैदिक कर्मकांडाचा उपनिषदांनी निषेध केला आहे. गीतेने वेदांचा उल्लेख करून वेदवादरत लोक कामात्मे व स्वर्गपर असतात, असा अभिप्राय व्यक्त करून स्थितप्रज्ञता, लोकसंग्रह, निष्काम कर्मयोग या धर्माचा उपदेश केला आहे. भक्तीचा उपदेश करताना त्या मार्गाने स्त्रिया, वैश्य, शूद्र हेही तरून जातील असे सांगितले आहे. म्हणजे या बाबतीत गीताही वर्णभेद मानीत नाही. याच भक्तिमार्गाचे संतांनी पुनरुज्जीवन केले आणि त्यालाच गुरुचरित्राचे अभिमानी हिंदुधर्मावरचे आक्रमण म्हणत आहेत.
(५) हीनदेवता पूजन
कर्मकांडाइतक्याच तीव्रतेने संत हीनदेवतापूजनाचा निषेध करतात. त्या काळी बहुजनसमाजात जाखाई, जोखाई, मरी आई, सटवाई, काळकाई इ. हीन, क्रूर, अमंगळ अशा देवतांचे पूजन चालू होते. त्याचा निषेध करून देव ही एक क्रूर, सौदा करणारी, केवळ शासन करणारी, सूडबुद्धी बाळगणारी शक्ती नसून ती माऊली आहे, मातेप्रमाणे ती भक्तांचा प्रतिपाळ करते, यासाठी तिला काही बळी द्यावा लागत नसून केवळ भक्तीने, प्रेमाने ती वश होते, हा अतिशय उदात्त विचार संतांनी येथल्या समाजात दृढमूल करून टाकला. ज्या समाजाची दैवते उंच झाली तो संस्कृतीच्या वरच्या पातळीवर चढला, यात शंकाच नाही. महाराष्ट्र समाजाला अशा रीतीने वरच्या पातळीवर नेण्याचे कार्य संतांनी केले आहे.
अमंगळ देवता
नामदेव म्हणतात, 'जाखाई जोखाई उदंड दैवते । वाउगेची व्यर्थ श्रमतोसि । अंतकाळी तुज सोडविना कोणी । एका चक्रपाणी वाचोनिया ॥' या देवता क्षुद्र आहेत, त्यांना बळी लागतो. 'तेणे न पावती सुख कल्लोळी एका विठ्ठला वाचोनिया ॥'
एकनाथांनी आपल्या स्फुट अभंगांतून हाच भाव व्यक्त केला आहे. 'प्रेमी पूजी मेसाबाई, सांडोनिया विठवाई | काय देईल ती वोंगळ, सदा खाय अमंगळ ॥' ती मेसाबाई 'आपुलिये इच्छेसाठी मारी जीव लक्ष कोटी ।' उलट 'तैसी नोहे विठाबाई, सर्व दीनांची ती आई.' हे क्षुद्र देव फजितीचे आहेत. आपणासाठी जगाला पीडणारे ते काळतोंडे आहेत. नरदेहाला येऊन अशा भूतांना जे भजतात ते महामूर्ख होत. 'एका जनार्दनी ऐसिया देव जो पूजी तो गाढवासम होय.'
तुकारामांनीही या देवतांची अशीच संभावना केली आहे. 'सेंदरी हे देवी दैवते । कोण ती पूजी भुतेखेते ॥ आपुल्या पोटा जी रडती, मागती शिते अवदाने ॥ आपुले इच्छे आणिका पीडी । काय ते देईल वराडी ॥'
ध्येयवाद
आज आपण ध्येयवादाच्या भाषेत बोलतो. माणसाचे ध्येय उच्च असावे. मग ते साधण्यात अपयश आले तरी चिंता नाही. काही असाध्य साध्य करताना अपयश आले तरी ते भूषणच होय. पण ध्येय क्षुद्र ठेवणे हे मात्र अगदी गर्ह्य होय. असले ध्येय साध्य झाले तरी त्याला किंमत नाही. ते दूषणच होय. कारण क्षुद्र ध्येयामुळे मनुष्य क्षुद्र होतो. तेच देवतांविषयी आहे. माणसाने पूजेसाठी थोर देवता निवडाव्या. उदार, कृपाळू, जगाचे पालनपोषण करणाऱ्या, विश्वाचे संरक्षण करणाऱ्या, केवळ भावभक्तीच्या भुकेल्या, अशा देवतांच्या पूजेने, भक्तीने, माणसाचे मन उंच होते, विशाल होते. विठ्ठल हा तसा देव आहे. संतांनी त्याचे परोपरीने तसे वर्णन करून लोकांना त्याची भक्ती शिकविली आणि जाखाई जोखाईसारख्या हीन अभंगळ देवतांपासून त्यांना मुक्त केले.
पाच लक्षणे
संतप्रणीत भागवधर्माची लक्षणे आपण पाहात आहो. भक्तियोग हे त्याचे पहिले लक्षण होय. सर्वभूतांची सेवा हीच खरी भक्ती, हा त्या भक्तियोगाचा अर्थ आहे. स्वधर्माचरण हे त्याचे दुसरे लक्षण होय. वर्णप्राप्त कर्तव्ये करून त्या कर्मांनी परमेश्वराची पूजा करावयाची याचे नाव स्वकर्माचरण. त्यामुळेच लोकसंस्थेचे रक्षण होते. संन्यासविरोध हे त्याचे तिसरे लक्षण होय. परमेश्वरप्राप्तीसाठी संसार सोडून वनात जाण्याची गरज नाही, असे संतांनी निक्षून सांगितले आहे. शुद्ध चारित्र्याची महती आणि कर्मकांडाचा निषेध हे भागवतधर्माचे चौथे लक्षण होय. शुद्ध चर्या, नीतिनिष्ठा यांवाचून समाजाचा कधीही उत्कर्ष होत नाही, हे जाणूनच संतांनी या गुणांचा महिमा गायिला आहे. हीन, क्षुद्र देवतांचा निषेध करून विठ्ठल या परमश्रेष्ठ दैवताच्या भक्तीचा उपदेश हे भागवत धर्माचे पाचचे लक्षण होय. क्षुद्र देवतांच्या उपासनेमुळे माणूस स्वतःच क्षुद्र होतो. ही आपत्ती टाळण्यासाठी संतांना हा उद्योग करावा लागला.
संतांनी उपदेशिलेल्या भागवतधर्माची पाच लक्षणे येथवर विवरून सांगितली. आणखीही या धर्माची चारपाच लक्षणे अशीच विवरून सांगावयाची आहेत. भक्तीच्या दृष्टीने संतांनी सर्व वर्णाची समता उपदेशिली आहे. भेदाभेद ते अमंगळ मानतात. शिव, विष्णू, राम या देवतांमध्ये संत भेद करीत नाहीत. ही सर्व एकाच परमेश्वराची रूपे आहेत, असा त्यांचा सिद्धांत आहे. देवतांप्रमाचेच नाथ, दत्त, वारकरी या संप्रदायांतही भेद नाही, असा संतांचा उपदेश आहे. संतांनी हा सर्व उपदेश केला तो वेद, उपनिषदे या परंपरेचा धागा अतूट ठेवून, त्या परंपरेचा अभिमान बाळगून केला, आणि हा सर्व उपदेश अमृतातेही पैजा जिंकील अशा मराठीत केला. समाजसंघटनेच्या दृष्टीने या त्यांच्या प्रयत्नांचे फार महत्त्व आहे. या सर्व लक्षणांचे वर्णन पुढील लेखात करू. तत्पूर्वी येथे ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ व तुकाराम या धुरेच्या संतांनी केलेला उपदेश बहुजनसमाजात कसा त्वरित पसरला आणि मान्यता पावला हे ज्ञानेश्वरांच्या व नामदेवांच्या प्रभावळीतल्या काही संतांच्या वचनांच्या आधारे पाहू आणि हे प्रकरण पुरे करू.
सकलसंतगाथा
मुक्ताबाईचे ताटीचे अभंग प्रसिद्ध आहेत. एका अभंगात ती म्हणते, 'थोरपण जेथे वसे, तेथ भूतदया असे, रागे भरावे कवणाशी, आपण ब्रहा सर्व देशी ॥ ऐसे समदृष्टी करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥' जगमित्र नागा हा ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतलाच, पिरंगुट येथे राहणारा कवी. तो म्हणतो, 'हीच उपासना धरा, नरदेही सार्थक करा, भक्ती देवाची करावी, भेददृष्टी ते सोडावी ॥ आत्मा आहे भूतांत, भूते आहेती आत्म्यात ॥' नरहरी सोनार याने हाच सिद्धांत सांगितला आहे. 'जग हे अवघे सारे ब्रह्मरूप, सर्वाभूती एक पांडुरंग ॥ अणुरेणूपर्यंत ब्रह्म भरियेले, सर्वावरी राहिले अखंडित ॥' भूतमात्राच्या ठायी पांडुरंग आहे, आणि त्याची भक्ती हीच खरी उपासना, असाच सर्वाचा भावार्थ आहे.
यापुढे अनेक संतांची संसार, कर्मकांड, नीतिधर्म यांविषवियीची वचने, काही टीकाभाष्य न करता देतो; ज्ञानेश्वर, नामदेव यांचीच तत्त्वे ते सांगत आहेत हे त्यांवरून सहज ध्यानात येईल. 'जयाचियासाठी जातो वनाप्रती । ते (काम क्रोध) तो सांगाती येती तेथे ॥ जयाचियासाठी टाकिला संसार । ते (मायामोह) तो बलवत्तर पाठी येती ॥' (चोखामेळा). 'सुखे संसार करावा । माजी विठ्ठल आठवावा ॥ जैसा सूर्य घटाकाशी । तैसी देही जनी दासी ॥' (जनाबाई).
दया, क्षमा, शांती हाच खरा धर्म हा महासिद्धांत प्रत्येकाने सांगितला आहे. 'अंगी हो पै शांती । दया, क्षमा सर्वा भूती ॥ जैसी दया पुत्रावरी । तेचि पाहे चराचरी ॥' (जनाबाई). 'सकळ धर्माचे कारण । नामस्मरण हरि कीर्तन ॥ दया, क्षमा, समाधान । ध्यावे संतांचे दर्शन ॥' (नरहरी सोनार). 'करिता परोपकार । त्याच्या पुण्या नाही पार ॥ करिता परपीडा । त्याच्या पापा नाही जोडा ॥ आवडे जगा जे काही | तैसे पाही करावे ॥' (सेना न्हावी) . 'धिक् ब्रह्मज्ञान वाउग्या या गोष्टी । दया, क्षमा, पोटी शांती नाही ॥' (चोखा मेळा).
'न लगती तीर्थे, हरिरूपे मुक्त | अवघेचि सूक्त जपिनले ॥ मुक्ताई हरिनामे सर्वदा पै मुक्त । नाही आदि अंत उरला आम्हा ॥' (मुक्ताबाई). 'न लगे धूम्रपान, पंचाग्नि- साधन । करिता चिंतन हरी भेटे ॥ बैसुनि निवांत करा एकचित्त । आवडी गाये गीत विठोबाचे ॥ करि योगयाग, सिद्धी न पवेचि सांग | देव भावावीण नाही, एर व्यर्थ शीण ॥' (सेना न्हावी) .
अशी ही संतांची वचने आहेत. त्यावरून हे ध्यानी येईल की ज्ञानेश्वर व नामदेव यांची धर्मतत्त्वेच त्यांनी आत्मसात केली होती आणि लोकांना त्यांचा उपदेशही ते करीत असत. त्या थोर पुरुषांच्या मानाने यांची विवेचने अल्प आहेत. पण भागवत धर्माचा सारार्थ तोच आहे ज्ञानेश्वर - नामदेवांचे पडसाद यांच्या रचनेतून पावलो - पावली कानी येत असतात. ज्ञानेश्वर या सर्वांचे परात्पर गुरू होते, हे तर यांपैकी प्रत्येकाने अनेकवार, मोठ्या भक्तीने, सांगितले आहे. तेव्हा ज्ञानेश्वरांनी या भागवत- धर्माचा पाया घातला होता आणि नामदेवांनी त्याचा विस्तार सर्वत्र केला होता, यात शंका नाही.
वर सांगितल्याप्रमाणे संतांच्या भागवतधर्माच्या विवेचनाचा हा पूर्वार्ध झाला. पुढील प्रकरणात उत्तरार्ध विशद करून हे विवेचन संपवू.