महाराष्ट्र संस्कृती/संतकार्य - चिकित्सा
बहामनी कालातील महाराष्ट्राच्या नेतृत्वाचा विचार करताना गेल्या प्रकरणात आपण संतांच्या भागवत धर्माचे स्वरूप पाहत होतो. भक्तियोग, स्वधर्माचरण अशा त्याच्या चारपाच लक्षणांचा विचार तेथे केला. आता संतांनी प्रतिपादिलेली वर्णसमता, भिन्न देवतांचे आणि भिन्न धर्मपंथांचे ऐक्य अशा काही लक्षणांचा विचार करावयाचा आहे.
(१) वर्णसमता
विषमता
संतांच्या काळी हिंदू समाजात वर्णविषमता आणि जातिविषमता पराकोटीला पोचली होती. हिंदू धर्मात अगदी प्रारंभीचा काळ सोडला तर दीर्घ काळापासून वर्णविषमता आहे. प्रारंभीच्या काळात शूद्रांनाही यज्ञाचा अधिकार होता. उपनिषदांत ब्राह्मणांप्रमाणेच क्षत्रिय राजे आणि शुद्रही ब्रह्मतत्त्वाचे केवळ अध्ययन नव्हे, तर अध्यापनही करताना दिसतात. पण नंतरच्या काळात हळूहळू वर्णभेद तीव्र होऊ लागले आणि मग वर्णसंकरातून जातिभेद आणि अस्पृश्यताही निर्माण झाली. तरीही आठव्या नवव्या शतकापर्यंत शूद्राचे अन्न ब्राह्मणाला चालत असे. क्षत्रिय ब्राह्मण स्त्री स्वीकारीत असे आणि ब्राह्मणाला क्षत्रिय, वैश्य व शूद्र या वर्णाच्या स्त्रिया चालत असत. पण हळूहळू ही उदार दृष्टी लोप पावली आणि वर्णभेद व जातिभेद फार कडक होऊ लागले. मुस्लिम आक्रमणे अकराव्या शतकाच्या प्रारंभापासून सुरू झाली. त्या वेळी जातिभेद आणि अस्पृश्यता फार तीव्र स्वरूपाला गेली होती. त्यामुळे हीन गणलेल्या लोकांना इस्लामची दीक्षा देऊन त्यांचे धर्मांतर करणे मुस्लिमांना फार सुलभ होऊन गेले. अशा वेळी वर्णभेद व जातिभेद यांवर कडक टीका करून, वर्णसमतेचा उपदेश करून, संतांनी सर्व वर्णाना व जातींना मोक्षमार्ग खुला करून दिला नसता, अध्यात्मक्षेत्रात शूद्रांना आणि अस्पृश्यांनाही काही प्रतिष्ठा प्राप्त करून दिली नसती तर मुस्लिमांना हिंदूंचे धर्मांतर घडविण्यात मिळाले त्यापेक्षा दसपट यश मिळाले असते.
वेदांची कृपणता
वेदांमध्ये प्रारंभी वर्णविषमता नव्हती तरी पुढे उत्तर कालीन वेदांनीच ती मान्य केली आणि त्रैवर्णिकांनाच वेदाधिकार आहे असा दंडक घालून दिला. वेदांच्या या कृत्यावर ज्ञानेश्वरांनी, ज्ञानेश्वरीचा समारोप करताना, अठराव्या अध्यायात निर्भयपणे टीका केली आहे. 'वेद हा सर्व दृष्टींनी संपन्न आहे, पण तीनच वर्णांची तो काळजी वाहतो, त्यांनाच फक्त वेदाधिकार देतो, हा त्याचा कृपणपणा आहे. तो दोष नाहीसा करण्यासाठी गीता अवतरली आहे व तिने चारही वर्णांना, सर्व भूतांना, मोक्षमार्ग मोकळा केला आहे.' ज्ञानेश्वरांच्या या वचनांवरून धार्मिक क्षेत्रात त्यांना वर्णविषमता मान्य नव्हती हे स्पष्ट दिसते.
भक्तीचा महिमा
गीतेच्या नवव्या अध्यायातील बत्तिसाव्या श्लोकावर टीका करताना ज्ञानेश्वरांनी आपला वर्णभेदाविषयीचा अभिप्राय अगदी स्पष्ट शब्दांत मांडला आहे. 'मनुष्य कोणत्याही वर्णाचा असो. तो भक्ती करीत असेल तर, तो पापयोनीत जन्माला आला असला तरी, त्याने वेदाध्ययन केले नसले तरी, त्याला मी (श्रीकृष्ण) माझ्याइतक्याच योग्यतेचा मानतो.' (ज्ञानेश्वरी, ९ - ४४९). 'म्हणोनि भक्ति गा एथ सरे । (पुरेशी आहे) जाति अप्रमाण । म्हणोनि कुळ जाति वर्ण । हे अवघेचि गा अकारण | एथ अर्जुना माझेपण | सार्थक एक ॥' 'समुद्रात टाकलेले मिठाचे कण जसे सर्व एकरूप होऊन जातात तशा माझ्या भक्तीच्या सागरात जाती विरून जातात.'
गीतेच्या तिसऱ्या अध्यायात 'यज्ञाबरोबरच प्रजा निर्माण करून ब्रह्मदेव त्यांना म्हणाला की यज्ञ ही तुमची कामधेनू आहे' असा श्लोक आहे (३.१०). त्यातील 'प्रजा' याचा अर्थ 'तीन वर्णाच्या प्रजा' असा शंकराचार्यांनी केला आहे. ज्ञानेश्वरांनी प्रजा याचा अर्थ 'सर्व भूते' असा केला आहे. यावरून दोघांच्या दृष्टिकोनातील फरक सहज ध्यानात येतो. ज्ञानेश्वरांच्या वरील टीकेवरून त्यांना अध्यात्माच्या क्षेत्रात वर्णभेद, जातिभेद, एवढेच नव्हे तर स्पृश्यास्पृश्य भेदही मान्य नव्हते, असे दिसून येईल.
जाती अप्रमाण
विठ्ठल हा जातिभेद पाहत नाही, उच्चनीच भेद मानीत नाही, तो फक्त शुद्ध भाव पहातो, असे नामदेवांनीही सांगितले आहे. 'नाही यातिवर्ण, नाही या वेदोक्ती, नामेचि संतृप्ति होते जीवा ॥' 'नाही यातिकुळ, उंचनीच भेद, भाव एक शुद्ध पाहातसे ॥' असे ते म्हणतात.
एकनाथांनी ज्ञानेश्वरांप्रमाणेच वर्णभेदासाठी वेदांवर टीका केली आहे. 'वेदे आप्त केले तीन्ही वर्ण । दुरावले स्त्रीशूद्रजन । न शिवे त्यांचे कान । हे वेदांसि न्यून पै आले ॥' आणि वेदांचा हा दोष घालविण्यासाठी श्रीकृष्णांनी गीता सांगितली असेही त्यांनी म्हटले आहे (एकनाथी भागवत, ४१ - २१) आणि वैष्णवांचे वर्णन करताना त्यांनी ज्ञानेश्वरांप्रमाणेच वर्णसमतेचे विचार सांगितले आहेत. 'वैष्णवांचा विचार करताना तेथे जाती अप्रमाण आहे, भक्तीच फक्त प्रमाण आहे. म्हणून तेथे शूद्र किंवा ब्राह्मण असे काही नाही. श्रेष्ठ जातीचा मनुष्य जर भक्तिहीन असेल तर तो वैष्णव नव्हे' (ए. भा. ११-४३). एकनाथ म्हणतात, 'श्वपच (चांडाळ) आणि ब्राह्मण यांच्यात अत्यंत भेद आहे. पण आत्मदृष्टीने पाहता दोघेही चिद्-रूपच आहेत.' (२९.१४) दोघांच्या ठायी एकच चिन्मय आत्मतत्त्व आहे.
याही पुढे जाऊन, गुणांवरून वर्ण ठरतो, असे एकनाथांनी म्हटले आहे. 'ज्याची जीविका जेणे जाण । त्या ब्राह्मणाचा तोचि वर्ण ॥' जातीने ब्राह्मण असला तरी तो ज्या वर्णाचा उद्योग पोटासाठी करीत असेल तो त्याचा वर्ण होय. जो क्षत्रियाचा उद्योग करतो तो क्षत्रिय. वाणिज्य वृत्तीने राहणारा तो वैश्य आणि जो जातीने ब्राह्मण शूद्राची परिचर्यादी कर्म करतो तो वर्णाने शूद्र होय. आणि ज्या लोकांच्या ठायी असत्य, कृतघ्नता, हिंसक वृत्ती, इत्यादी दुर्गुण असतात 'तो हो का भलता वर्ण । परी अंत्यजपण त्या माजी ॥' (१७.२०). ते कोणत्याही वर्णाचे असले तरी ते अंत्यज होत.
सकळांसि अधिकार
हो का भलते कुळ । शुचि अथवा चांडाळ । म्हणवी हरीचा दास । तुका म्हणे धन्य त्यास ॥ मनुष्य कोणत्याही कुळातला असो, चांडाळही असो, तो जर हरीचा दास असेल तर, तुकाराम त्याला धन्य समजतात. त्यांच्या मते, सकळांसि येथे- या भक्तिमार्गात- आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिनामे ॥ म्हणून भेदाभेद भ्रम त्यांना अमंगळ वाटतो. ते म्हणतात, हे सर्व वर्ण एका देहाचेच अवयव आहेत. एकनाथांप्रमाणेच त्यांनीही म्हटले आहे की जन्माने एखादा मनुष्य अंत्यज असला तरी, 'तो जर रामकृष्ण नामे उच्चारी सरळे, आणि त्याच्या ठायी जर शांती, दया, क्षमा हे अलंकार असतील तर, तो ब्राह्मणच होय, तो मूर्तिमंत परब्रह्म होय.'
व्यवहारात
संतांनी वर्णसमतेचा असा उपदेश केला असला, भेदाभेद हे अमंगळ आहेत असे सांगितले असले तरी, व्यवहारात, नित्याच्या जीवनात, वर्णभेद, जातिभेद आणि अस्पृश्यता हे सर्व भेद अत्यंत कटाक्षाने पाळले पाहिजेत, असा त्यांचा आग्रह होता. अंत्यजाचे, मातंगाचे घर दुरूनच टाळले पाहिजे, त्याच्या घराशी चुकून जरी संन्यासी गेला तरी त्याची त्याला लाज वाटली पाहिजे, अंत्यजाशी संभाषण करणेही वर्ज्य होय, असे ज्ञानेश्वरांचे मत होते (ज्ञानेश्वरी, १८-५४८, १६- १७६, १७- १०७). अत्यंत तामस असे ज्ञान कसे टाळावे ? आसुरी वृत्ती कशी निषिद्ध ? लज्जा शब्दाची व्याख्या काय ? याचे विवरण करताना वरील प्रकारचे दृष्टांत त्यांनी दिले आहेत. हे अंत्यजां विषयी झाले. शूद्रांविषयी तेच आहे. प्रत्येकाने स्वधर्म आचरावा. दुसऱ्याचा धर्म चांगला असला तरी तो त्याज्यच होय, हे समजावून देताना, ब्राह्मण दरिद्री असला तरी, त्याने शूद्राघरची उत्तम पक्कान्नेही त्याज्यच मानली पाहिजेत, असा दृष्टांत त्यांनी दिला आहे (३-२२१).
वर्ण किंवा जाती या गुणांवरून मानाव्या असा विचार संतांनी कोठे कोठे मांडला असला, तरी तो फक्त भक्तीच्या क्षेत्रात. एरवी जाती किंवा वर्ण हे जन्मानेच ठरतात असे त्यांचे मत होते. 'गोरेया आंगा जैसे गोरेपण', गोरा रंग जसा जन्मतःच प्राप्त होतो, तो बदलता येत नाही, त्याचप्रमाणे 'वर्णाप्रमाणे आलेले कर्म करणीय', असे ज्ञानेश्वर म्हणतात (१८-८८७). या अठराव्या अध्यायातच प्रत्येक वर्णाची कर्मे सांगताना 'तीन वर्णाचे शुश्रूषण-सेवा-ते शूद्रकर्म' असेच त्यांनी सांगितले आहे. प्रत्येकाचा अधिकार हा जातिवश आहे, सहज आहे, तो शास्त्राने सांगितला आहे, आणि तोच प्रत्येकाने जाणून त्याप्रमाणे आचरण केले पाहिजे, असे स्पष्टपणे त्यांनी म्हटले आहे (१८-८९१).
वेदी लागू नाही
याचा अर्थ असा की संतांनी वर्णजातिसमता प्रतिपादिली असली तरी ती मोक्षमार्गातील अधिकारापुरती होती. पण याही बाबतीत ती समतापूर्ण नव्हती. ज्ञानेश्वर आणि एकनाथ यांनी, वेदांनी तीन वर्णानाच वेदशास्त्रांचा, यज्ञाचा अधिकार दिला म्हणून, वेदांवर टीका केली आहे. पण स्वतः त्यांनी, शूद्रांना तो अधिकार नाही, असेच म्हटले आहे. ज्ञानेश्वरांनी, 'क्षत्रिय व वैश्य हे दोन वर्ण ब्राह्मणांच्याच तोलाचे आहेत, कारण त्यांना वैदिक धर्मक्रियांचा अधिकार आहे (ते वैदिकविधानी योग्य)', पण 'चौथा शूद्र जो धनंजया, वेदी लागु कीर नाही तया ॥ चौथा जो शूद्र वर्ण त्याला वेदाधिकार नाही', असेच सांगून ठेवले आहे (१८-८१९, ८२०). एकनाथांनीही 'वेदशास्त्रांचा अधिकारी ब्राह्मण, नामासि अधिकारी चारी वर्ण ॥' असा अधिकार भेद सांगितलाच आहे. तेव्हा धार्मिक क्षेत्रात सर्वांना अधिकार आहे याचा अर्थ इतकाच की विठ्ठलाची भक्ती करून सर्वांना सम मोक्ष प्राप्त करून घेण्यास मोकळीक आहे. विठ्ठलाच्या पायाशी सर्व सारखे याचा अर्थ विठ्ठलमंदिरात सर्वांना प्रवेश आहे इतका सुद्धा नाही. अस्पृश्यांना कोणत्याही मंदिरात प्रवेश नव्हता. कारण ते आत गेले असते तर इतरांना विटाळ झाला असता आणि असा विटाळ होणे संतांना भुळीच मान्य नव्हते. 'चारी वर्णाचा एक मेळु होईल, कोणी कोणाचा विटाळु न धरील', हे कलियुगाचे लक्षण म्हणून नामदेवांनी सांगितले आहे. तुकारामांनीही, वर्णधर्म कोणी पाळीत नाहीत म्हणून, खेद व्यक्त केला आहे. 'वर्णधर्म कोणी न धरी विटाळ । घालिती गोंधळ एके ठायी ॥' असे ते म्हणतात. सर्वांनी एकत्र भोजन करणे हे कलियुगाचे लक्षण, असे त्यांनी सांगितले आहे. 'ऐका कलीचे हे फळ । पुढे होईल ब्रह्मगोळ । चारी वर्ण अठरा जाती । भोजन करिती एके पंक्ती ॥'
जरी ब्राह्मण-
सर्व संतांच्या मनाला वर्णजातिविषमतेमुळे अतिशय दुःख होते. पण शास्त्राविषयी त्यांना आदर व श्रद्धा असल्यामुळे, व्यवहारातही समता पाळावी, हे त्यांना सांगता येत नव्हते. ते दुःख आणि ही श्रद्धा यांमध्ये त्यांच्या मनाची ओढाताण होत आहे हे पावलोपावली जाणवते.
'वर्ण अभिमाने कोण जाले पावन ?' असा प्रश्न विचारून, 'अंत्यजादि योनी तरल्या हरिभजने' असे तुकाराम सांगतात; आणि रोहिदास चांभार, चोखा मेळा, बंका महार यांची उदाहरणे देतात. याशिवाय गोरा कुंभार, सेना न्हावी, दादू पिंजारी, कबीर यांचे पुरावे देतात. कोठे कोठे, 'गुणअवगुण हे दोन्ही प्रमाण । यातीशी कारण नाही देवा ॥' असे स्पष्ट सांगतात. पण रूढ धर्मशास्त्राकडे मन ओढताच, 'ब्राह्मणे ब्राह्मण सद्गुरू करावा । परी न करावा शूद्रादिक ॥' असा उपदेश करतात. आणि 'जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट, तुका म्हणे श्रेष्ठ तीन्ही लोकी ॥' असाही निर्वाळा देतात.
नवी उभारी
पण हे ध्यानात घेऊनही, केवळ मोक्षाच्या व भक्तीच्या दृष्टीने का होईना, पण त्यांनी वर्णसमतेचा पुरस्कार केला आणि भेदाभेद अमंगळ आहेत असे म्हटले, यासाठी सुद्धा महाराष्ट्र त्यांचा ऋणी राहील. हरीचा भक्त पापयोनी असला तरी तो श्रेष्ठच होय, ब्राह्मणाच्या योग्यतेचा होय, असे त्यांनी सांगितल्यामुळे चोखा मेळा, बंका, रोहिदास यांसारख्या हीन गणलेल्या जातीच्या लोकांना एक प्रकारची उभारी आली, उल्हास आला आणि 'सगुण, निर्गुण, सर्वाभूती एक आत्मा', 'नामाचिया बळे कळिकाळाच्या माथा सोटे मारू', 'सर्व घटी राम, जीवशीव सम, सर्व रूपे ब्रह्म भरले सदा' अशी अध्यात्मविषयाची चर्चा ते करू लागले. 'वाऊगे घरदार, वाऊगा संसार, वाऊगे शरीर नाशिवंत ॥ मी तू पण गेले वाया । पाहता पंढरीच्या राया ॥' असे चोख्याची महारी सोयराबाई म्हणू लागली व अशी रचना करू लागली. हा मनोविकास एरवी अशक्यच होता.
प्रतिष्ठा
चोखा मेळा, बंका, कर्ममेळा यांनी आपल्याला हीन याती केल्याबद्दल फार चीड व्यक्त केली आहे. कर्ममेळा याने तर, 'आमुची केली हीन याती । तुज का न कळे श्रीपती ॥ जन्म गेला उष्टे खाता । लाज न ये तुमचे चित्ता ॥' अशी तीव्र शब्दांत देवाचीसुद्धा निर्भर्त्सना केली आहे. हे मानसिक बळ, संतांनी त्यांना भक्तिबळाने जी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, तिच्यामुळेच आले यात शंका नाही.
सर्व सामाजिक उन्नतीचे एकच लक्षण असते. मानवी मनाला धैर्य, बळ, निष्ठा, काही उच्च विचार करण्याचे सामर्थ्य प्राप्त करून देणे, याचेच नाव उन्नती. संतांनी भक्तिमार्गातील समतेचा उपदेश करून, काही मर्यादित प्रमाणात का होईना, हीन यातींना उन्नत केले हे त्यांचे कार्य अगदी अनमोल असे आहे.
(२) एकं सत्
साम्यात् सख्यम् !
समाज जितका जास्त एकरूप तितकी त्याच्यात एकता जास्त संभवत असा समाज संघटित करणे जास्त सुलभ असते. साम्यात् हि सख्यं भवति । वैषम्यात् नोपपद्यते ॥ हे व्यासवचन प्रसिद्ध आहे. त्या दृष्टीने संतांचे वर्णसमतेचे तत्त्व जितके महत्त्वाचे, तितकेच सर्व देवतांचे त्यांनी प्रतिपादिलेले ऐक्य, हरिहरांतील अभेद हाही महत्त्वाचा आहे. सर्व देव एक आहेत, त्यांची बाह्य रूपे भिन्न असली तरी त्यांतील सत्-तत्त्व एकच आहे, हा सिद्धांत भारतात वेदकालापासून सर्वमान्य झालेला आहे. इंद्र, वरुण, यम, अग्नी, वायू ही त्या एकं सत्-चीच रूपे आहेत, असे ऋग्वेदात म्हटले आहे. असे असले तरी, प्रत्येक देवतेचे भक्त आपापल्या देवतेचा अभिमान धरून पुनः पुन्हा समाजात द्वैत माजविण्याचा प्रयत्न करीत असतात. म्हणून पुनः पुन्हा सर्व देवतांचा अभेद प्रतिपादून, थोर धर्मवेत्ते ते द्वैत नष्ट करून तेथे अद्वैत स्थापिण्याचा प्रयत्न करतात. कारण देवतांचे ऐक्य हे समाजाच्या ऐक्याला फार पोषक असते.
सर्व देव एक
ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम या संतांच्या व त्यांच्या प्रभावळीतल्या इतर संतांच्या रचनांमध्ये, सर्व देव एक आहेत, त्यांत भेद करणे हे पाप आहे, असे आवर्जून सांगितलेले असते. ज्ञानेश्वरीत श्रीकृष्णांनी सदाशिवाचा अतिशय गौरव केलेला आढळतो (अध्याय १२-२१६). तेथे सदाशिव माझी भक्ती करतो, असे श्रीकृष्णाच्या तोंडी वचन आहे. उलट एका अभंगात, ज्ञानेश्वरांनी, 'विठ्ठलाने महेशाला मस्तकी वंदिले' असे म्हटले आहे. आणि 'सदाशिवाचा पांडुरंग निजठेवा' असेही दुसऱ्या अभंगात म्हटले आहे (सकल संत गाथा, जोशी प्रत, पृ. १०, ११). 'बाप रखुमा देवी वरू, ज्योतिलिंग विश्वनाथ । तेणे माझा मनोरथ, पुरविला गे माये ॥' हा ज्ञानेश्वरांचा अभंग प्रसिद्धच आहे.
पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मस्तकावर जो मुकुट आहे तो खरा मुकुट नसून शंकराची पिंडी आहे, हा जो वरील अभंगाचा भावार्थ, तो सर्व संतांना मान्य आहे. 'विष्णुसहित शिव आणिला पंढरी, केले भीमातीरी देखणे तेणे ।' असे निवृत्तिनाथांनी, पुंडलिकाचा गौरव करताना, स्पष्टच म्हटले आहे. पांडुरंग हे मूळ नाव शंकराचे असून, कानडीत त्याचे पंडरंगे असे रूप होते. त्यावरूनच पुढे पंढरपूर, पंढरपूर हे नाव झाले, असे डॉ. भांडारकर म्हणतात. विठ्ठल हा मूळ कानडी देव याविषयी सर्व संताचे एकमत आहे. एकनाथांनी तर, 'तीर्थ कानडे, देव कानडे, क्षेत्र कानडे पंढरीये, विठ्ठल कानडा विटेवरी', असे म्हणून वादाला जागा ठेवलीच नाही. 'विठ्ठल कानडे बोलू जागे । त्याची भाषा पुंडलीक नेणे ॥' असे नामदेव म्हणतात. 'कानडा विठ्ठल कर्नाटकु ।' असे ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. आणि कर्नाटकातून आलेला हा विठ्ठल शिवमस्तकी धारण करणारा होता, असे अनेक संशोधकांचे मत आहे.
शिव-विष्णू
शिव, विष्णू, विठ्ठल, कृष्ण, राम या सर्वांत संत अभेद मानीत असत एवढाच याचा भावार्थ. 'नामा म्हणे शिव विष्णू एकरूप । ताराया अमूप अवतार ॥' असे नामदेव म्हणतात. एका अभंगात तर, विष्णूचे भजन करून मनुष्य जर शिवापासून दूर जाईल, तर त्याचा अधःपात होईल असे सांगून, भेद मानणाऱ्यांची त्यांनी निर्भर्त्सना केली आहे. 'शिवपूजा करी, विष्णूसी अव्हेरी । तयाचिये घरी यम नांदे ॥ नामा म्हणे असती शिवविष्णु एक । वेदांचा विवेक आत्माराम ॥' असा वेदांचा आधार त्यांनी दिला आहे.
वेलांटीचा फरक
'होऊनिया विष्णुभक्त शिवनिंदा जो करीत ।' त्याला एकनाथांनी महामूर्ख म्हटले आहे. आणि 'रमा, रमेश, मस्तकी हर । पुढे तीर चंद्रभागा ॥' असा विठ्ठलाच्या मस्तकावर शिवलिंग असल्याचाही उल्लेख त्यांनी केला आहे. 'हरिहरा भेद । नाही, करू नये वाद ॥' असे तुकारामांनीही म्हटले आहे. त्याच अभंगात पुढे ते म्हणतात, दोघांमध्ये एका वेलांटीचा फरक आहे, त्याला काही महत्त्व नाही. 'उजवे वाम भाग । तुका म्हणे एकचि अंग ॥' डावा व उजवा असा हातापायांत भेद असला तरी, अंग-शरीर-एकच असते. त्याप्रमाणे शिव व विष्णू एकच आहेत.
नरहरी सोनाराची कथा या दृष्टीने उद्बोधक आहे. तो कट्टर शिवभक्त होता. पंढरीस राहूनही तो विठ्ठलाचे दर्शन घेत नसे. पुढे ज्ञानदेव, नामदेव यांच्या संगतीने त्याच्या मनातला हा भेद मावळला. आणि शेवटी तो म्हणाला, 'शिव आणि विष्णू एकचि प्रतिमा । ऐसा ज्याचा प्रेमा सदोदित ॥ धन्य ते संसारी नर आणि नारी । वाचे हर आणि हरी उच्चारिती ॥ नाही पै भेद । अवघा मनी अभेद । द्वेषाद्वेषसंबंध । उरो नेदी ॥ सोनार नरहरी । न देखे द्वैत । अवघा मूर्तिमंत । एकरूप ॥'
भिन्न देवतांच्या उपासकांत द्वेष कसा असतो आणि तो नाहीसा करण्याला समाज- संघटनेच्या दृष्टीने किती महत्त्व असते ते या कथेवरून कळून येईल. संतांनी हे महत्त्व महाराष्ट्राच्या मनावर कायमचे बिंबवलेले आहे.
(३) सर्वसमावेशक
पण महाराष्ट्र समाज एकरूप करण्याच्या दृष्टीने, याहीपेक्षा संतांनी केलेले जास्त महत्त्वाचे कार्य म्हणजे निरनिराळ्या धार्मिक संप्रदायांतील भेदभाव नष्ट करून, त्यांचा आपल्या वारकरी संप्रदायात समावेश करून घेऊन, वारकरी संप्रदाय व विठ्ठल हे दैवत यांच्या कक्षेत सर्व महाराष्ट्राला आणले, हे होय. नाथपंथ व दत्तपंथ हे महाराष्ट्रातून नाहीसे झाले असे नव्हे. पण अखिल महाराष्ट्राचा धर्मपंथ कोणता या प्रश्नाचे उत्तर 'वारकरी पंथ ' हेच त्यापुढे ठरून गेले आणि अखिल महाराष्ट्राचे दैवत म्हणजे विठ्ठल हेही त्यापुढे ठरून गेले.
वारकरी पंथ
वारकरी पंथ हा ज्ञानेश्वरांच्या आधी चारपाचशे वर्षे तरी येथे असावा, असे संशोधकांचे मत आहे. विठ्ठल हे दैवतही पुरातनच आहे. तेव्हा 'ज्ञानदेवे रचिला पाया' याचा अर्थ वारकरी पंथाची त्यांनी स्थापना केली असा नसून त्यांनी त्याला तत्त्वज्ञानाची दृढ बैठक दिली, इतर पंथांच्या तत्त्वज्ञानांशी त्याचा समन्वय साधला, दीनदलितांना त्यात समाविष्ट करून घेतले आणि भक्तियोगाचे स्वरूप निश्चित करून भूतमात्रांची सेवा हे परमोच्च ध्येय त्याच्या डोळ्यापुढे ठेवले असा आहे.
नाथ, दत्त
नाथपंथ व दत्तसंप्रदाय हे पुरातन धर्मपंथ आहेत. नाथपंथाची स्थापना आदिनाथ म्हणजे स्वतः शंकर यांनीच केली, अशी आख्यायिका आहे. ऐतिहासिक दृष्ट्या पाहिले तर ज्ञानेश्वरांच्या आधी साधारण शंभर वर्षे गोरक्षनाथांनी त्याची स्थापना केली असे दिसते. स्वतः ज्ञानेश्वर नाथपंथी होते. त्यांचे थोरले बंधू निवृत्तिनाथ हेच त्यांचे गुरू होते. त्यांना गहिनीनाथांपासून दीक्षा मिळाली. नाथपंथाची अशी परंपरा चालू झाली असली तरी, भिक्षाटन, संन्यास, हटयोग, यांवर त्या पंथाचा भर असल्यामुळे, सर्व समाजात त्याचा वारकरी पंथासारखा प्रसार झाला नाही. दत्त- संप्रदायाचे तेच झाले. दत्ताची उपासना प्राचीन काळापासून रूढ झालेली आहे. पंधराव्या शतकाच्या मध्याला त्याला काहीसे व्यवस्थित रूप नरसिंह सरस्वती यांनी दिले. पण त्यांचा ग्रंथ एकही उपलब्ध नाही. त्यांच्या आचारविचारांविषयी माहिती सरस्वती गंगाधराचा मागे सांगितलेला ग्रंथ 'गुरुचरित्र' यावरूनच फक्त मिळते. ती पाहता हा पंथ कडक आचारधर्म, कर्मकांड, अतिरेकी सोवळे ओवळे यांवर भर देतो आणि ब्राह्मणवर्णाची उन्नती एवढेच त्याचे ध्येय आहे असे दिसते. त्यामुळे त्याचाही बहुजनांत प्रसार झाला नाही.
पंढरीकडेच
वारकरी पंथाच्या प्रसाराचे आणखी एकम हत्वाचे कारण म्हणजे ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ व तुकाराम यांसारखे थोर संत त्याला एकामागून एक लाभले. महाराष्ट्रात इतर कोणत्याच पंथाला हे भाग्य लाभले नाही. मौजेची गोष्ट अशी की वारकरी पंथाचे दोन मोठे नेते जे ज्ञानेश्वर व एकनाथ हे मूळचे नाथ व दत्त संप्रदायाचे अनुयायी होते. पण त्यांनी ध्वजा धारण केली ती वारकरी पंथाची. वर वर्णन केलेल्या त्या पंथाच्या मर्यादा त्यांनी जाणल्या आणि अखिल महाराष्ट्राला धर्मदीक्षा द्यावयाची तर ती वारकरी पंथाची, विठ्ठलसंप्रदायाचीच दिली पाहिजे, नाथ किंवा दत्त यांमध्ये बहुजनांना ओढून घेण्याचे सामर्थ्य नाही, हे ध्यानी घेऊन त्यांनी वारकरी पंथाच्या प्रसारासाठीच सर्व शक्ती वेचावयाची, असे ठरविले. तुकारामांनाही गुरूपदेश मिळाला तो चैतन्यसंप्रदायाच्या पुरुषाकडून; वारकरीपंथाकडून नव्हे. पण त्यांनाही धर्मरक्षणासाठी आटी करावयाची होती. त्यामुळे त्यांनीही पढरीकडेच महाराष्ट्र समाजाचा ओघ वळविला.
बहुजनांत
वारकरी पंथाच्या प्रसाराच्या दृष्टीने नामदेवांच्या कार्याचे मला सर्वात जास्त महत्त्व वाटते. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहून पंथाचे तत्त्वज्ञान निश्चित केले. पण समाजमनात ते दृढमूल करण्याचे कार्य सर्वस्वी नामदेवांचे आहे. स्वतः नामदेव हीन गणलेल्या यातीचे होते. असा पुरुष सुंभाचा करदोटा व रकट्याची लंगोटी लावून वाळवंटी कीर्तनास उभा राहिलेला पाहून बहुजनसमाजात कमालीचा आत्मविश्वास निर्माण झाला असला पाहिजे. पुढे ज्ञानेश्वर त्याला सखा मानतात, ब्राह्मण लोकही त्याचे शिष्य होतात, हे पाहून तो शतपटीने दृढावला असला पाहिजे. शिवाय, 'नामयाची वाणी, अमृताची खाणी', हे बळ त्याच्याजवळ होतेच. तेव्हा महाराष्ट्राला वारकरी पंथाची दीक्षा देण्याचे प्रारंभीचे कार्य नामदेवांनी केले यात शंका नाही.
त्यांच्या नंतर दोनशे वर्षे त्यांच्यासारखा समर्थ वारकरी झाला नाही. पण सुदैवाने ते कार्य पुढे चालविण्यास एकनाथांसारखा थोर वाग्मी वारकरी पंथाला लाभला. त्यांच्या पाठोपाठ तुकाराम आले व त्यांनी या मंदिरावर कळस चढविला. आणि 'विठ्ठल विठ्ठल गजरी' ने केवळ पंढरीच नव्हे, तर अवघी महाराष्ट्रभूमी दुमदुमून टाकली.
महाराष्ट्र महाराष्ट्र झाला, येथला समाज एकरूप झाला, याचे बरेचसे श्रेय याप्रमाणे वारकरी पंथाला आहे.
(४) एक परंपरा
एक धर्म व एक दैवत यांच्याप्रमाणेच एक प्राचीन परंपरा आणि एक भाषा यांचाही समाज एकरूप करण्यास उपयोग होतो. संतांनी वेद, उपनिषदे, महाभारत, गीता, रामायण यांची परंपरा अतूट, अखंड राखण्याचा, या परंपरेचा अभिमान जागृत ठेवण्याचा सतत प्रयत्न केलेला दिसतो. त्यांनी जो भागवत धर्म सांगितला तो प्रामुख्याने भगवद्गीता आणि भागवत पुराण यांच्या आधारे सांगितला आणि तसे करीत असताना वेद, उपनिषदे, महाभारत, रामायण, श्रीरामचंद्र, श्रीकृष्ण, व्यास, वाल्मिकी, ध्रुव, हरिश्चंद्र यांच्याविषयीचा पूज्यभाव ठायी ठायी प्रगट केला.
वेद-उपनिषदे
ज्ञानेश्वरीच्या आरंभीच ज्ञानेश्वरांनी महाभारत आणि व्यास यांचा, आपली सर्व शब्दशक्ती पणाला लावून गौरव केला आहे. 'महाभारत म्हणजे सर्व काव्यांचा राजा, ग्रंथगौरवाचे पीठ आहे. या ग्रंथामुळे चातुर्य शहाणे झाले, आणि सुखाचे सौभाग्य पुष्ट झाले. सूर्याच्या तेजामुळे विश्व जसे धवळते तसे व्यासमतीमुळे त्रैलोक्य उजळले आहे.' पुढील विवेचनात वेद व उपनिषदे यांचा मधून मधून असाच गौरव त्यांनी केला आहे. प्राचीन परंपरेविषयी नामदेवांचाही हाच भाव आहे. शिव आणि विष्णू यांचे ऐक्य सांगताना वेदांनी हा निर्धार केला आहे, हा वेदांचा विवेक आहे, असे ते म्हणतात. रामनामाचा जप करा हे सांगताना नामदेव म्हणतात की हे उपनिषदांचे सार मी तुम्हांला सांगतो आहे. सर्वाभूती विठ्ठल आहे, हे वेदीचे वचन आहे. ब्राह्मण हे स्वधर्मापासून भ्रष्ट झाले अशी टीका करून, त्यांनी वेदपरायण असणे, हे खऱ्या ब्राह्मणाचे लक्षण म्हणून सांगितले आहे. त्यांनी षट्कर्मे आचरली पाहिजेत, असा त्यांचा आग्रह आहे. 'वेदांचे महिमान', 'समर्थ वेद तो आमुचा' असा वेदाभिमान ते ठायी ठायी प्रगट करतात.
एकनाथांनी जो भागवत धर्म सांगितला तो भागवताच्या आधारे सांगितला. पण ही भक्ती वेदोक्त आहे, असे ते आवर्जून सांगतात. भागवताधारे जसा त्यांनी कृष्णमहिमा वर्णिला तसाच भावार्थ रामायणाच्या आधारे राममहिमा गायिला. भागवताच्या आरंभी, नमन करताना, त्यांनी, अद्वैत मताचा पुरस्कर्ता जो बृहदारण्यकातील याज्ञवल्क्य, त्याला व्यासवाल्मिकीच्या बरोबरच वंदन केले आहे. एकनाथांच्या काळापर्यंत संस्कृतप्रमाणेच मराठीतही थोर परंपरा निर्माण झाली होती. तिचाही आदर करून एकनाथांनी निवृत्ती, ज्ञानदेव, नामदेव. चांगा वटेश्वर यांनाही प्रारंभी वंदन केले आहे.
ज्या धर्माच्या रक्षणासाठी तुकारामांना आटी करावयाची होती तो धर्म कोणता होता ? 'वाचा बोलू वेदनीती, करू संता केले ते ॥' या वेदांचा अभिमान त्यांना किती होता ? ते म्हणतात, 'वेदांचा तो अर्थ आम्हांसीच ठावा, येरांनी वहावा भार माथा ॥' कारण केवळ पाठांतर करणाऱ्यांना - ब्राह्मणांना - वेदांचे गव्हर कळणार नाही. तुकाराम स्वतः शूद्र होते. जुन्या परंपरेने शूद्रांना हीन लेखिले होते. तरी त्या परंपरेचा अभिमान तुकाराम धरतात, वर्णाश्रमव्यवस्था सांभाळली पाहिजे असे आग्रहाने सांगतात आणि वेदशास्त्र नाही पुराण प्रमाण । तयाचे वदन नावलोका ॥' असे बजावतात. त्यांचा प्राणसखा विठ्ठल हा शास्त्रांचे सार आणि वेदांची साक्षात मूर्ती आहे. या प्राचीन परंपरेप्रमाणेच तुकारामांना नव्या मराठी परंपरेचाही अभिमान आहे. ज्ञानेश्वरांना ते ज्ञानियांचा राजा म्हणतात, मायबाप म्हणतात आणि 'मी तुमच्या पोटीचे बाळ आहे, माझी ब्रह्मीची आळ पुरवा', अशी विनवणी करतात. आपले सर्व कवित्व नामदेवांनी दिलेल्या स्फूर्तींमुळेच झाले, अशी त्यांची श्रद्धा होती. आणि एकनाथांना ते जीवीचे जीवन म्हणतात.
चार महापुरुष
वारकरी पंथाचे हे मोठे सौभाग्य आहे. चार महापुरुष त्या संप्रदायाला लाभले. त्यांपैकी प्रत्येकाचे व्यक्तित्व स्वतंत्र, कणखर, तेजस्वी असे आहे. ते सर्व स्वयंप्रज्ञ आहेत. प्रत्येकांची प्रतिभा त्या स्वयंप्रज्ञेने उजळून निघालेली आहे. आणि तरीही प्रत्येकाची मागीलांवर इतकी उत्कट भक्ती आहे की त्यांच्यात ते विलीन होऊन गेल्यासारखे दिसतात. सर्व एकरूप भासतात. त्या पंथाला जे एक आगळे बळ प्राप्त झाले आणि त्यामुळे महाराष्ट्र जो एकरूप झाला त्याला कारण या चार पुरुषांतील अभेदभाव हे आहे.
(५) मराठी - राष्ट्रभाषा
एका समान परंपरेचा अभिमान हे जसे समाज एकरूप करण्याचे साधन, तसेच एकभाषा हेही एक प्रभावी साधन आहे. महाराष्ट्राला मराठी भाषा देऊन तिला अतिशय मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे कार्य प्रामुख्याने संतांनी केले. ज्ञानेश्वरांच्या आधी प्रथम मुकुंदराजांनी व नंतर महानुभावांनी मराठीत ग्रंथरचना करण्यास प्रारंभ केला होता. पण महानुभावांचे ग्रंथ लवकरच गुप्त लिपीत गेले आणि समाजापासून दूर पडले आणि मुकुंदराजाच्या विवेकसिंधूचा बहुजनांवर तसा प्रभाव केव्हाच पडला नाही. असे असतानाच ज्ञानेश्वरीचा अवतार झाला आणि मराठीला एकदम मोठी प्रतिष्ठा लाभली. त्या काळी मराठीसारख्या प्राकृत भाषेत ग्रंथ लिहिणे शास्त्रीपंडित मोठे पाप मानीत असत. मराठीत धर्मलेखन करण्यास त्यांचा तीव्र विरोध होता. पण त्याला भीक न घालता अमृताते पैजा जिंकणारी मराठी भाषा ज्ञानेश्वरांनी लिहिली. मराठी ही महाराष्ट्राची राष्ट्रभाषा करून टाकली.
वाग्विलास
ज्ञानेश्वरांना गीतेतील भागवत धर्माची तत्त्वे बहुजनांपर्यंत पोचवावयाची होती. म्हणून भाषा अत्यंत रम्य आणि वेधक करण्याची त्यांनी प्रतिज्ञाच केली. ती किती यशस्वी झाली? त्यांनीच म्हटले आहे की 'मराठी भाषा देशी खरी, पण तिच्या सौंदर्यामुळे शांतरस शृंगाररसापेक्षाही जास्त आकर्षक होईल. आणि मग मूळ ग्रंथ कोणता आणि टीका कोणती अमा संभ्रम पडेल.' ज्ञानेश्वरांना जबरदस्त आत्मविश्वास होता की मी मराठीत असा वाग्विलास निर्माण करीन की त्यायोगे गीतार्थाने विश्व भरून जाईल आणि जगाला आनंदाचे आवार लाभेल. महाराष्ट्रात त्यानंतर सात आठ शतके गीतार्थ ओतप्रोत भरून राहिला आहे; यावरून त्यांचा आत्मविश्वास किती सार्थ होता हे कळून येईल, अशी ही शब्दश्री मराठीला तिच्या आरंभकाळीच लाभल्याने ज्ञानेश्वरी, मराठी भाषा आणि महाराष्ट्र ही एकरूप होऊन गेली.
आम्ही मराठे
ज्ञानेश्वरांनंतर महाराष्ट्राचे स्वातंत्र्य गेले आणि मराठी भाषेवर उर्दूचे आक्रमण सुरू झाले. एकनाथांच्या काळी मराठी गद्यात शेकडा सत्तर ऐशीपर्यंत उर्दू शब्द घुसले होते. संस्कृत पंडितांची मराठीविषयीची उपेक्षा बुद्धी पूर्वीसारखीच कायम होती. तेव्हा एकनाथांना मराठीसाठी दुहेरी सामना करावा लागला. पण तो त्यांनी यशस्वीपणे करून मराठीला पुन्हा सन्माननीय स्थान प्राप्त करून दिले. शिवाय भागवत, रामायण, रुक्मिणीस्वयंवर आणि पदे, भारुडे अशी प्रचंड ग्रंथरचना करून त्यांनी मराठीला इतकी समृद्ध करून टाकली की तिच्या सामर्थ्याविषयी पुन्हा कोणी शंका घेऊ नये. याशिवाय ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतील अनेक संत, बहिरा जातवेद, चोंभा, मुक्तेश्वर यांसारखे पंडित कवी यांनी आणि एकनाथानंतर तुकारामांनी मराठीचा अभिमान धरून बहामनी कालात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मराठी नाद पोचविले, आपण सर्व मराठे आहो, असा एक हुंकार सर्व महाराष्ट्रभर घुमविला आणि महाराष्ट्र व मराठा समाज यांना स्थैर्य, दृढता व एकरूपता प्राप्त करून दिली.
(६) ऐहिक ऐश्वर्याची चिंता !
अस्मिता
ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, व तुकाराम या संतांच्या कार्याचे येथवर विवेचन केले. या थोर पुरुषांनी महाराष्ट्राच्या पारतंत्र्याच्या, विपत्तीच्या काळात स्वधर्मनिष्ठा जागृत ठेवून मराठ्यांच्या स्वत्वाची जपणूक केली हे त्यांचे मुख्य कार्य होय. प्राणिमात्राची पूजा हीच भगवंताची पूजा, या भक्तियोगाचा त्यांनी उपदेश केला. प्रत्येकाने संसारात राहून स्वधर्मप्राप्त कर्म करून त्या कुसुमांनी परमेश्वराची पूजा बांधणे हाच खरा भागवत धर्म, असा त्यांचा सिद्धांत होता. कर्मकांडाचा निषेध करून नीती, चारित्र्य हाच खरा धर्म हे महातत्त्व त्यांनी समाजाला सांगितले. त्याचप्रमाणे वर्णसमता, देवतांचे ऐक्य, भिन्नपंथांतील अभेद, समपरंपरेचा अभिमान यांचा उपदेश करून आणि आपली सर्व प्रवचने करून त्यांनी महाराष्ट्र समाजाला एकरूप करण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्राला स्वतंत्र अस्मिता प्राप्त करून दिली.
प्रवृत्तिवाद ?
संतांचे हे कार्य निःसंशय अतिशय मोठे आहे. आणि यासाठी महाराष्ट्र त्यांचा कायमचा ऋणी राहील. पण यापलीकडे जाऊन, संत केवळ लोकांच्या पारलौकिक कल्याणाचाच विचार करीत नाहीत, तर ऐहिक ऐश्वर्याचाही विचार करतात, असे काही पंडित सांगू लागले. संत प्रवृत्तिवादी होते, समाजाच्या ऐहिक उत्कर्षाची त्यांनी कधीच उपेक्षा केली नाही, असे कोणी विद्वान आग्रहाने प्रतिपादू लागले म्हणजे मग मनाला जरा संभ्रम पडतो. आणि हे संत प्रवृत्तिवादी असून समर्थ रामदास स्वामी मात्र मूलतः परलोकनिष्ठ होते, असे जेव्हा काही अभ्यासक म्हणू लागतात, तेव्हा ऐहिक ऐश्वर्य, समाजाचा ऐहिक उत्कर्ष, प्रवृत्तिधर्म या शब्दांच्या विवक्षेत काही गफलत होत आहे, असे वाटू लागते.
आखलेले क्षेत्र
वास्तविक संतांच्या ज्या कार्याचे स्वरूप वर वर्णिले आहे तेवढ्यावरून त्यांचे मोठेपण पुरेसे सिद्ध होत आहे. त्यांच्या अंगावरच्या, चरित्रावरच्या रत्नमाणिकांत आणखी काही भर घातली पाहिजे असे नाही. प्रत्येकाने आपापले क्षेत्र आखून घेतलेले असते आणि काही उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून त्यासाठी तो तनमन झिजवीत असतो. त्याच्या बाहेर त्याने पाऊल टाकले नाही, इतर क्षेत्रांकडे लक्ष दिले नाही, तर त्याचा काही मोठा दोष आहे, न्यून आहे, असे मानण्याचे कारण नाही. संतांनी मोक्ष, परलोक, भक्तिमार्ग, सत्यअहिंसादी नीतितत्त्वे यांचा उपदेश करून धर्मजागृती करावयाची आणि या जागृतीचे लोण समाजाच्या सर्व थरांत पोचवावयाचे, हे उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवले होते व त्यासाठी त्यांनी सर्वस्वार्पण केले होते. आणि यासाठीच त्यांची नावे अजरामर झाली आहेत. पण ऐहिक ऐश्वर्याचीही चिंता ते तितकीच वहात असत, असे जेव्हा डॉ. शं. दा. पेंडसे यांच्यासारखे पंडित सांगू लागतात, तेव्हा या विधानाची चिकित्सा करणे प्राप्त होते.
उत्कर्षाची आकांक्षा
ऐहिक ऐश्वर्याची पहिली प्रेरणा म्हणजे स्त्री, पुत्र, संसार, मुलेबाळे यांच्यावरचे उत्कट प्रेम, त्यांच्याविषयीचे ममत्व, त्यांच्या सुखदुःखाची सतत चिंता, त्यांच्या उन्नतीविषयीची अखंड व्यग्रता आणि याच्या जोडीला वैयक्तिक उत्कर्षाची, कीर्ती, मान, धन, सत्ता यांविषयीची प्रचंड दुर्निवार आकांक्षा ही होय. समाजात सर्व नागरिकांच्या चित्तात ते प्रेम व ही आकांक्षा असल्यावाचून ऐहिक ऐश्वर्य कधीही कोणालाही प्राप्त होत नाही, कधी झालेले नाही. व्यापार करावा, पेढ्या स्थापाव्या, चहूदेशी माल घेऊन फिरावे, आणि अमाप धन मिळवावे, आपले पुत्रपौत्र, वंशज यांच्यासाठी कायमची जिंदगी करून ठेवावी अशी ईर्षा वैश्य, व्यापारी, सावकार, जमीनदार, शेतकरी, यांच्या मनात सतत असली तरच समाजजीवन समृद्ध होते. विद्यापीठे स्थापावी, गणित, ज्योतिष, रसायन, व्याकरण, तत्त्वज्ञान, भाषाशास्त्र इ. शास्त्रांचा दीर्घ अभ्यास करावा, आयुर्विद्या, धनुर्विद्या यांचा विकास करून समाजात त्यांचा प्रसार करावा, ही प्रचंड आकांक्षा ब्राह्मणांच्या चित्तात सतत असावयास पाहिजे. वेरूळ अजिंठा यांसारखी लेणी खोदावी, प्रचंड मंदिरे बांधावी, नानाप्रकारचे सुवर्णाचे अलंकार बनवावे, सर्व जगात त्या व इतर अनंत कलाकृती खपवाव्या आणि देशात अमाप धन आणावे ही आकांक्षा कारागीर, कलाकार (त्या काळी यांना शूद्र म्हणत असत) यांच्या ठायी अहर्निश तेवत राहिली पाहिजे. राज्य मिळवावे, साम्राज्य स्थापावे, जगभर लष्करी संचार करून नाना देश जिंकावे, आणि लक्ष्मीचा उपभोग घ्यावा ही विजीगिषा क्षत्रियांच्या ठायी अवश्य आहे. यासाठी या सर्वांच्या ठायी तसा आत्मविश्वास व उग्र अहंभाव असावा लागतो. धन, लक्ष्मी, सत्ता, नाना भोग यांच्या विषयींच्या वासना अत्यंत प्रबळ असाव्या लागतात. समाजाची अशी मनोवृत्ती असल्यावाचून ऐहिक ऐश्वर्याची, राज्यवैभवाची, लक्ष्मी-समृद्धी यांची प्राप्ती केवळ अशक्य आहे.
संसारनिंदा
हे ऐहिक ऐश्वर्य महाराष्ट्राला लाभावे हे संतांचे उद्दिष्ट असते तर त्यांनी लिहिले त्यापेक्षा फार निराळे वाङ्मय लिहिले असते. त्यांनी अशा तऱ्हेच्या प्रेरणा दिल्या नाहीतच, तर उलट संसाराची व ऐश्वर्याची अत्यंत कडवट अशी निंदा केली आहे आणि या ऐश्वर्याची आकांक्षा धरणाऱ्यांची कमालीची निर्भर्त्सना केली आहे. संतांनी संसार करावा असे सांगितले आहे, हे खरं. पण वनात जाऊन भक्तीला अवश्य तो वासनाजय होणार नाही म्हणून तू संसारात रहा, एवढाच त्यांचा अभिप्राय आहे. भेदा- भेदभ्रम अमंगळ असे ते नाही का म्हणाले ? पण एक भक्तिमार्ग सोडला तर प्रत्येक क्षेत्रात वर्णभेद, जातिभेद अत्यंत कडक स्वरूपात पाळले पाहिजेत, असा त्यांचा आग्रह होता (हे मागे दाखविलेच आहे). धर्माच्या क्षेत्रातही त्यांना समता मान्य नव्हती. वेदाधिकार त्यांनी सर्वांना दिला नाही. देवळांत सर्वांना प्रवेश नाही. भक्ती करून मोक्ष मिळविण्यास सर्वांना मोकळीक आहे, एवढाच त्यांच्या वर्णसमतेचा अर्थ आहे. तेच त्यांच्या गृहस्थाश्रमाच्या गौरवाचे, संसारात राहावे या उपदेशाचे आहे. त्याला फार मर्यादित अर्थ आहे.
ढेकणाची बाज
संसारात राहावे, पण त्याची सतत घृणा करावी, त्याची किळस मानावी, असे संत सांगतात. हा सर्व संसार ओकारीसारखा आहे, वमनासारखा आहे, हे विषाचे पात्र आहे, इंगळाचे अंथरूण आहे, असे ज्ञानेश्वर म्हणतात, राज्य, धन, सत्ता, ऐश्वर्य हे सर्व समाजाला सुख मिळविण्यासाठी असते. पण ज्ञानेश्वर म्हणतात, मृत्युलोकात सुख मिळणे अशक्य आहे. राखाेंडीतून जशी ज्वाला निघत नाही तसे संसारातून सुख मिळणार नाही. तुकाराम हेच सांगतात. परमेश्वरप्राप्तीसाठी लौकिक व्यवहार सांडावा लागत नाही, असे ते म्हणतात. पण 'संसारसंगे परमार्थ जोडे, ऐसे काय घडे जाणते ना | ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना येऊ पाहे !' असे त्यांनी वारंवार बजावले आहे. संसारात राहावे, पण आपले घर, पैसा आणि स्वदेश (स्वदेश सुद्धा) यांचा वीट मानावा, देह आणि देहसंबंधी म्हणजे स्त्रीपुत्रादी यांना निंद्य मानावे, कुत्रे, डुकरे यांनासुद्धा वंदन करावे, पण स्त्रीपुत्रांचा लोभ धरु नये (जोग गाथा, ७५५), असा त्यांचा उपदेश आहे.
संसार X देव
'नाशवंत धन, नाशवंत मान, नाशवंत स्त्रीपुत्रादिक बाळे' असा निर्वाळा देऊन एकनाथ म्हणतात, 'अरे अशा संसारात राहणे हे गाढवाने उकिरडा फुंकण्यासारखे आहे. मरणाची भीती तू विसरतोस आणि या प्रपंचासाठी व्यर्थ कष्ट करतोस.' नामदेवांनीही, 'संसार करिता देव जरी सापडे, तरी का झाले वेडे सनकादिक ? संसारी जरी देव भेटता, शुकदेव कासया जाती तपालागी ?' असे प्रश्न विचारून हाच अभिप्राय व्यक्त केला आहे.
गालबोट
संतांनी संसाराची अशी निंदा केलीच आहे. पण त्यापेक्षाही या संसाराची अधिष्ठात्री देवता, गृहस्थाश्रमाची स्वामिनी जी स्त्री, आणि ज्यांच्यासाठी या लोकसंस्थेचे रक्षण करावे असे वाटेल ती मुलेबाळे, यांची फारच निंदा केली आहे. संतांनी ऐहिक ऐश्वर्याचीही चिंता केली या मताचे सर्वात मोठे पुरस्कर्ते म्हणजे डॉ. शं. दा. पेंडसे. त्यांनी 'भागवतोत्तम संत एकनाथ' या आपल्या ग्रंथात, 'भागवताची गालबोटे' असे एक प्रकरण लिहिले आहे. त्यात एकनाथांनी स्त्रियांची जी निंदा केली आहे ती अगदी अप्रशस्त होय असे म्हटले आहे. त्यांच्या मते हे त्यांच्या भागवत धर्मप्रतिपादनाला गालबोट आहे. ते म्हणतात, 'विद्यमान देहाने स्त्रीला पुरुषाइतकाच मोक्ष- संपादनाचा अधिकार असताना, तिची अशी निंदा करणे अप्रशस्त होय.' एकनाथांनी केलेल्या स्त्रीनिंदेची काही उदाहरणे देऊन पेंडसे म्हणतात, 'अकुलीन, कुलीन स्त्रियांची सरसकट केलेली निंदा गृहस्थाश्रमी नाथांच्या भागवताला लागलेले गालबोट आहे.'
ही टीका डॉ. पेंडसे यांनी एकट्या एकनाथांवरच का केली, असा प्रश्न मनात येतो. कारण सर्वच संतांनी अशी निंदा केली आहे. 'पुत्र पत्नी बंधु सोयरी खाणोरी (चोर), यांचा कोण धरी संग आता ? हो का पुत्र, पत्नी, बंधु त्यांचा तोडावा संबंधु । फोडावे मडके मेल्यालेखी एके घाये ॥' ही तुकारामाची वचने प्रसिद्धच आहेत. नामदेवांनी तर स्त्रीची मोठीच मत्कारिक निंदा केली आहे. एखादी स्त्री सुरेख आहे म्हणूनच ती पापिणी आहे, असे ते म्हणतात. 'लावण्य सुंदर रूपाने बरवी, पापीण कामिनी जाणावी ती ।' उलट जी कुरूप आहे ती धन्य नारी ! 'कायारूप जिचे हिनवट अती, माऊली धन्य ती नारी ॥' (गाथा, पृ. ४९७)
वाढदिवस
अपत्यलाभ, पुत्रलाभ हा संसारातला मोठा आनंद आणि पराक्रमाची ती मोठी प्रेरणा. पण संतांच्या मते ती सर्वात मोठी हानी होय. तुकाराम म्हणतात की 'देवा, कोणाला संतान व्हावे, किंवा द्रव्य मिळावे, असा आशीर्वाद माझ्या मुखातून येऊ नये. कारण या दोहोंपासून पतनच व्हावयाचे.' मुलाचा वाढदिवस हा घरात मोठा आनंदोत्सव असतो. पण ज्ञानेश्वर असा वाढदिवस करणाऱ्यांचा निषेध करतात. त्यांच्या मते मुलाचा वाढदिवस याचा अर्थ असा की तितका मुलगा मृत्यूच्या जास्त जवळ गेला ! हे ध्यानात न घेता गुढ्या, पताका उभारून लोक मुलाचा वाढदिवस करतात ! (ज्ञा. ९-५१२).
संसार, स्त्री, पुत्र, यांच्याविषयी खऱ्या भक्ताचे काय धोरण असावे ? संत म्हणतात, वाटेने जाताना वाटसरूला झाडाची सावली दिसते, तितकीसुद्धा आस्था ज्ञानी पुरुषाला घराविषयी वाटत नाही. आपल्या सावलीविषयी आपल्यालाच भान नसते. तसेच स्त्रीविषयीही असावे. आणि आपली जी प्रजा, मुलेबाळे त्यांच्याकडे कसे पाहावे ? वाटेने जाताना वाटसरू, झाडाखाली बसलेल्या गुरांच्याकडे जसे पाहील तसे.
अंतकाळी ?
स्त्री, पुत्र, मुलेबाळे, आप्तइष्ट यांच्याविषयी अशी दृष्टी का असावी ? संतांनी याचे कारण जे सांगितले आहे त्यावरून त्यांचे उद्दिष्ट काय आहे ते स्पष्ट होते. ते म्हणतात, यांचा अंतकाळी काही उपयोग नाही. एका श्रीपतीखेरीज तेव्हा कोणी साह्यकर्ता नाही. 'तैसा हा संसार पाहता पाहता । अंतकाळी हाता काही नाही ॥'
उद्दिष्ट - मोक्ष
संतांचा हा विचार अगदी निर्णायक आहे. मोक्षप्राप्ती हे एकच उद्दिष्ट त्यांच्यापुढे आहे. त्यासाठी जे उपयोगी पडतील त्यांचाच फक्त संत गौरव करतात. ऐहिक ऐश्वर्य- प्राप्तीसाठी, गृहस्थाश्रमाच्या सफलतेसाठी स्त्रीपुत्रांचा, आप्तेष्टांचा, लक्ष्मीचा उपयोग होत असेल, पण त्याला संतांच्या मते महत्त्व नाही. कारण त्याची त्यांना पर्वा नाही. त्यांना लोकांना भवसागरातून पैलतीरी न्यावयाचे आहे. त्याला साह्यभूत होणाऱ्यांचेच त्यांना महत्त्व वाटते. असे असताना ऐहिक ऐश्वर्याची चिंता, प्रवृत्तिधर्माची उपासना हे संतांच्या माथी मारण्यात त्यांच्यावर अन्याय होतो असे मला वाटते.
राजधर्म
तसा अट्टाहास करणाऱ्या पंडितांना एक गोष्ट नम्रपणे सांगावीशी वाटते की संतांना ऐहिक ऐश्वर्याची उपासना सांगावयाची असती तर राजधर्म हाच सर्वांत श्रेष्ठ धर्म होय असे त्यांनी निक्षून सांगितले असते. महाभारतातील थोर धर्मवेत्ते श्रीकृष्ण, व्यास, भीष्म यांनी तर ऐहिकच काय, पण पारलौकिक धर्माच्या दृष्टीनेसुद्धा राजधर्म श्रेष्ठ होय, असे सांगितले आहे.
सर्वा विद्या राजधर्मेषु युक्ताः । सर्व लोका राजधर्मे प्रविष्टाः ।
तस्माद् धर्मा राजधर्माद् विशिष्टो । नान्यो लोके विद्यतेऽजातशत्रो ॥
राजधर्मात सर्व विद्या येतात, सर्व समाज येतो, म्हणून या राजधर्मापेक्षा श्रेष्ठ असा धर्म नाही, असे महाभारतकारांचे मत आहे.
पुढील वचन जास्त निर्णायक आहे-
यथा राजन् हस्तिपदे पदानि । संलीयन्ते सर्व सत्त्वोद्भवानि ।
एवं धमीन् राजधर्मेषु सर्वान् । सर्वावस्थान् संप्रलीनान् निबोध ॥
हे राजा, हत्तीच्या पावलात इतर सर्व प्राण्यांच्या पावलांचा समावेश होतो, त्याप्रमाणे एका राजधर्मात सर्व धर्मांचा सर्व प्रकारे अंतर्भाव होतो, हे तू पक्के समज.
बल - सामर्थ्य
संतांना प्रवृत्तिधर्म सांगावयाचा असता तर त्यांनी देशकालपरिस्थितीचे, यवनाक्रांत भारतभूचे यथातथ्य, सविस्तर वर्णन करून, लोकांत विजीगिषू वृत्ती जागृत करून, त्यांनी या राजधर्माचा अग्रक्रमाने उपदेश केला असता. या राजधर्मात अग्रमान बल, सैन्य, लष्करी सामर्थ्य याला आहे आणि दुसरा मान कोश, धन, द्रव्य याला आहे. एका दृष्टीने, भीष्मांच्या मते, धर्मापेक्षाही बल हेच श्रेष्ठ होय, कारण बलाबाचून धर्म अनाथ होतो. ते म्हणतात,
अति धर्माद् बलं मन्ये, बलाद् धर्मः प्रवर्तितः ।
बले प्रतिष्ठितो धर्मो, धरण्यां इव जंगमम् ॥
कोश
जे बलासंबंधी तेच कोशासंबंधी, धनासंबंधी राजाचे मुख्य बल म्हणजे कोश. लष्करी बलाला त्याचाच आधार असतो. आणि या बलाच्या आधारे धर्म टिकतो व धर्माच्या आधारे प्रजा टिकतात. तेव्हा जे कोशाचे हरण करतात त्यांना ठार मारल्यावाचून यश कधीच मिळणार नाही. हे राजा ध्यानात ठेव की धनाच्या योगानेच हा लोक आणि परलोक हे जिंकता येतात (शांतिपर्व १३०-३६, ४३, ४४,). संतांना ऐश्वर्याचे ते तत्त्व मान्य होईल काय ?
बुडबुडा
संतांनी देशकालपरिस्थितीचे वर्णन करून, मुस्लिम आक्रमणांचे स्वरूप स्पष्ट करून प्रत्यक्ष असा राजधर्माचा उपदेश कोठेही केलेला नाही. ज्ञानेश्वरांच्या काळात महाराष्ट्र स्वतंत्र होता हे खरे. पण मंदिरे पाडून मशिदी उभारणे हे यादव राजांच्या डोळ्यांपुढे चालू होते. सूफीपंथ हिंदूंना बाटविण्याचाही उद्योग करीत होता. आणि दुसरे म्हणजे वायव्येकडून मुस्लिमांची आक्रमणे तीनशे वर्षे उत्तर भारतावर चालू होती. तेराव्या शतकाच्या आरंभी तर दिल्लीला मुस्लिम सत्ताही स्थापन झाली होती. ज्ञानेश्वर उत्तर हिंदुस्थानची यात्रा करून आले तेव्हा ही टोळधाड लवकरच दक्षिणेवर येणार, हे काय त्यांच्या ध्यानात आले नसेल ? त्या ज्ञानियांच्या राजाविषयी असे म्हणणे केव्हाही योग्य होणार नाही. ऐहिक ऐश्वर्याचा विचार त्यांच्या मनात असता तर त्यांनी परत येताच त्या वेळच्या रामदेव यादवाला सावध केले असते. पुढे यादवांचे राज्य बुडाल्यावर त्यांच्याच वंशातील एक गोविंद देव याने काही काळ खानदेशात स्वतंत्र राज्य स्थापिले होते. नामदेव आणि ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतील इतर संत यांनी जनतेत राजकीय जागृती करून गोविंद देवाला प्रोत्साहन द्यावयास हवे होते. कर्नाटकात विद्यारण्य स्वामींनी हेच कार्य केले. हरिहर आणि बुक्क यांना स्वधर्मात परत घेऊन त्यांनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला, प्रेरणा दिली. आणि त्या दोवा धनुर्धरांनी विजयनगरला स्वतंत्र राज्याची १३३६ साली स्थापनाही केली. संतांना हे करावयाचे असते तर महाराष्ट्रात हे सहज शक्य झाले असते. पण त्यांचे ते उद्दिष्टच नव्हते. म्हणून तर नामदेव येथून निघून पंजाबात गेले. आणि तेथेही त्यांनी भक्तिमार्गाचाच प्रसार केला. त्या वेळी पंजाबात तर अस्मानी सुलतानीच होती. पण नामदेवांनी त्याविषयी एक चकार शब्द काढला नाही. कारण, 'जळी बुडबुडे देखता देखता, क्षण न लागता दिसेनाती, तैसा हा संसार ।' अशी त्यांची धारणा होती. या भवसिंधूतून लोकांना तरून नेणे हेच त्यांचे उद्दिष्ट होते. म्हणून श्रीकृष्णाच्या महाभारतातील राजधर्माचा विचार न करता त्याच्या बालक्रीडांचा महिमाच फक्त त्यांनी लोकांना सांगितला.
अध्यात्मरंग
संतांनी देशकाल वर्णन करून प्रत्यक्षपणे राजधर्माचे प्रतिपादन कोठेही केलेले नाही. अप्रत्यक्षपणे, प्रसंगानुसार मागील कथा सांगताना, रामकृष्णांचे पराक्रम वर्णिताना, आणि गीतेतील कर्मयोगावर भाष्य करताना, क्षात्रधर्माचे प्रतिपादन त्यांनी केले आहे. त्यांनी शत्रूंचे निर्दाळण केले, असुरांचा संहार केला, अनाथांचे रक्षण केले, असे सांगून एकनाथांनी पराक्रमाची प्रेरणा दिली आहे. जे प्रजा पीडूनि कर घेती । जया नावडे धर्मनीती । ऐसे राजे भारभूत क्षिती । नेणो किती निर्दाळिले ॥ अबलांचे निजबळ राजा । तो राजचि स्वये नागवी प्रजा । ऐसा अनर्थ उपजे क्षितिभुजा । गरुडध्वजा न साहवे ॥ अशी श्रीकृष्णाच्या पराक्रमाची एकनाथांनी जागोजागी वर्णने केली आहेत. 'महालक्ष्मी' हे वीररसप्रधान काव्य लिहून एकनाथांनी क्षात्रधर्माला अशीच प्रेरणा दिली आहे. ही महालक्ष्मी आदिमाया आहे, महिषासुरमर्दिनी आहे. राम, कृष्ण, विठ्ठल हे तिचेच अवतार आहेत. हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, रावण, कुंभकर्ण यांचा संहार तिनेच केला, असे वर्णन दर कडव्याच्या शेवटी, 'बया दार उघड', (असे पालुपद घालून, या आदिमायेने भक्तांना आश्रय द्यावा अशी प्रार्थना केली आहे.)
पण एकनाथांच्या या वीररसात एक मोठे वैगुण्य आहे. त्यांनी आपले सर्व प्रतिपादन आध्यात्मिक रूपकांच्या भाषेत केले आहे. काम, क्रोध म्हणजेच शंखासुर, हिरण्याक्ष, असे ते म्हणतात. रामकथा सांगताना अशी रूपके करण्याचे वास्तविक काही कारण नव्हते. पण राम म्हणजे परब्रह्म, कौशल्या म्हणजे सद्विद्या, कैकयी ही अविद्या, रावण म्हणजे वासनांचे जुंबाड, अशी रूपके ते करतात. त्यांच्या रामायणातील राम हा विश्वामित्रालाच व्याख्यान देतो आणि देह, तारुण्य, स्त्रिया यांची निंदा करतो. रामकथेला आणि इतरही कथांना असा सर्वत्र अध्यात्माचा रंग एकनाथांनी दिल्यामुळे त्यातील वास्तवता सर्व नष्ट झाली आहे.
पाइक
तुकारामांचे 'पाइकाचे अभंग' ही क्षात्रधर्माला प्रेरणा देणारी रचना आहे. 'पाइक' याचा शिपाई, सैनिक असा येथे अर्थ आहे. या पाइकांवाचून प्रजांचे दुःख सरणार नाही, पाइकांनी जिवावर उदार झाले पाहिजे, गोळ्या, बाण, यांचा भडिमार साहिला पाहिजे, त्यांनी गनिमी कावा करून शत्रुला जिंकावे. असे पाइक ज्याच्या पदरी असतात तो नाईक त्रैलोक्याचा बलिया होतो, असे हे पाइकस्तोत्र आहे. ह. भ.प. विष्णुबुवा जोग यांनी या अभंगाचा परमार्थपर अर्थ केला आहे. पांगारकरांनी भक्त आणि सैनिक या दोघांना उद्देशून हे अभंग लिहिले आहेत, असे म्हटले आहे. डॉ. पेंडसे यांच्या मते यात क्षात्रधर्माचाच उपदेश आहे. अभंग नीट वाचल्यावर तेच बरोबर असावे असे वाटते.
संतांनी केलेले राजधर्माचे प्रतिपादन हे एवढेच आणि हे सर्व अडीचशे वर्षांच्या दीर्घ काळात.
मर्यादा
संसार आणि वर्णसमता याविषयीचे जे संतांचे धोरण त्याबद्दल जे वर सांगितले, तेच राजधर्माविषयी आहे. संसार करावा, वनात जाऊ नये, असे त्यांनी सांगितले खरे. पण तो संसार म्हणजे वमन आहे, त्याची किळस मानवी, स्त्रीपुत्र, आप्त इष्ट हे चोर आहेत, हे ध्यानात ठेवावे, असा उपदेश त्यांनी केला आहे. त्यांच्या वर्णसमतेविषयी असेच आहे. भक्तीचा अधिकार सर्वांना आहे. पण इतर व्यवहारात जातिभेद, वर्णभेद अत्यंत कडकपणे पाळले पाहिजेत, असा त्यांचा आग्रह आहे. त्यांचे क्षात्रधर्मा विषयीचे प्रतिपादन असेच समजून घेतले पाहिजे. त्यांनी त्याचे प्रत्यक्ष प्रतिपादन कोठेही केलेले नाही. यावनी आक्रमणाचा विचार ते चुकून सुद्धा करीत नाहीत. त्यांच्या डोळ्यांसमोर जे भयंकर अत्याचार घडत होते त्यांची दखलही त्यांनी कधी घेतली नाही. प्राचीन देवतांचे पराक्रम ते वर्णितात. आणि तेही त्याला आध्यात्मिक रंग देऊन. प्राचीन काळच्या मानवी पराक्रमाची चंद्रगुप्त, समुद्रगुप्त, शालिवाहन, सिंघण यांचीही वर्णने ते करीत नाहीत. त्यांचे राजधर्माचे प्रतिपादन हे असे आहे.
याचे कारण एकच. ते त्यांचे उद्दिष्टच नव्हते. सर्व जातींना, हीन दीन दलितांना भक्ती हा मोक्षाचा मार्ग खुला करून द्यावा, या क्षेत्रात सम अधिकार आहे हे सांगावे, हे उद्दिष्ट त्यांच्या डोळ्यांसमोर होते. नाहीतर राजधर्माचे सविस्तर विवेचन त्यांनी केले असते. राजधर्मामध्ये संघटित बल, कोश, राजनीती, मुत्सद्देगिरी, इ. अनेक गोष्टी येतात. कोश, वन याला महाभारतकारांच्या मते किती महत्त्व आहे ते वर सांगितलेच आहे. पण संतांनी धनाची सरसहा निंदाच केली आहे. कारण त्यामुळे सर्वनाश होतो असे त्यांना वाटत होते.
धननिंदा
'मूळ नाशाशी कारण, कनक आणि स्त्री जाण, जो न गुंते येथे सर्वथा, त्याला परमार्थ पुरता॥' असे एकनाथ म्हणतात. यावरून ऐहिक ऐश्वर्य व परमार्थ यात मूलतःच विरोध आहे, असा त्यांचा सिद्धांत होता हे स्पष्ट दिसते. तुकारामांनीही असेच सांगितले आहे. 'धन मिळवोनि कोटी, सवे न ये रे लंगोटी, का आवडे हे प्रियापुत्र धन, कामा काय कोण कोणा आले ? प्रपंच परमार्थ संपादित दोन्ही । एकही निदानी न घडे त्यासी ॥ तुका म्हणे तथा दोही धका । शेवटी तो नरकामाजी पडे ॥'
शेवटी बरोबर काय येईल, मोक्षाला साधनीभूत काय होईल, हीच संतांची चिंता होती. आणि प्रपंचाला जे उपकारक ते परमार्थाला घातकच ठरणार, याविषयी त्यांना संदेह नव्हता. म्हणूनच धनाचीच नव्हे, तर राज्याची सुद्धा ते निंदा करीत. 'वृत्ति, भूमि, राज्य, द्रव्य उपार्जिती । जाणा त्या निश्चिती देव नाही ॥' असे तुकाराम म्हणतात. त्यातील भावार्थ स्पष्ट आहे. देव हवा असेल तर राज्य सोडा, राज्य म्हणजे जमीन; सत्ता हे ऐहिक ऐश्वर्य हवे असेल तर देव सोडा. असा तीव्र विरोध असल्यामुळे समाजाला देवामागे न्यावयाचे असे संतांनी ठरविले व राजधर्भाकडे पाठ फिरविली.
भौतिक विद्या
भौतिकविद्यांविषयी संतांची जी वृत्ती दिसून येते तिच्यावरूनही हेच दिसून येते की ऐहिक ऐश्वर्य, समाजाची भौतिक प्रगती हे त्यांच्या दृष्टीने अगदी गौण होते. ज्योतिषशास्त्र, तर्कशास्त्र, वैद्यक शास्त्र, शिल्प, व्याकरण, शब्दकोश, काव्यनाटके, वेद, स्मृती, पुराणे यांचा व्यासंग - या सर्व विषयांचे ज्ञान ऐहिक प्रगतीला अवश्य नाही काय ? या सकळ लोकसंस्थेच्या रक्षणासाठी तनमन अर्पून लोकांनी या विद्या हस्तगत करणे अवश्य नाही काय ? पण या विद्यांचा गौरव संतांनी कधीही केला नाही. उलट ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे की हे ज्ञान असले आणि त्या शास्त्रज्ञाला, कलाकाराला, कवीला आत्मज्ञान नसेल तर 'जळो त्याचे ते ज्ञान' (१३-८२९ ते ८३६).
ती चिंता असती तर -
मनात प्रश्न येतो की असे का ? आर्यभट्ट, लल्ल, वराहमिहिर, नागार्जुन, भास्कराचार्य, पाणिनी, पतंजली यांना आत्मज्ञान नसले तरी त्यांची ती विद्या लोकसंस्थेच्या रक्षणासाठी, ऐहिक उत्कर्षासाठी, ऐश्वर्यासाठी अवश्यच आहे. वेरुळ, अजंठा, कोणार्क, सांची, कारले ही लेणी ज्यांनी निर्माण केली ते काय आत्मज्ञानी होते ? अध्यात्मात त्यांची गती अगदी शून्य असण्याची सुद्धा शक्यता आहे. पण त्यांची कला हे भारताचे ऐश्वर्य आहेच. सातवाहन ते यादव या काळात हजारो भारतीय व्यापारी जगभर हिंडून भारतात सोन्याचा प्रवाह आणून सोडीत होते. त्यांच्यापैकी आत्मज्ञान किती जणांना असेल ? पण त्यांच्या त्या व्यापारी लक्ष्मीवाचून भारतातील लोकसंस्थेचे रक्षण झाले असते काय ? वरील काळात भारतात चाणक्यासारखे अनेक राजनिपुण होऊन गेले. त्यांच्यावाचून सातवाहन, गुप्त, चालुक्य, राष्ट्रकूट यांची साम्राज्ये टिकलीच नसती. आता या राजनीतिनिपुण अमात्यांपैकी आत्मज्ञानी किती असतील ? तरी त्यांच्या विद्येमुळेच भारताचे ऐहिक ऐश्वर्य टिकून राहिले, यात शंकाच नाही. आणि यादवांच्या नंतरच्या तीनशे वर्षात तसे व्यापारी, तसे अमात्य व तसे भास्कराचार्य कोणी झाले नाहीत, म्हणूनच ते ऐश्वर्य नष्ट झाले व ही लोकसंस्थाच विनाशपंथाला लागली, यातही शंका नाही. संतांना ऐहिक ऐश्वर्याची चिंता असती तर त्यांनी या सर्व शास्त्रज्ञांचा, त्यांना आत्मज्ञान आहे की नाही याची काडीमात्र चिंता न करता, महागौरव केला असता. पण तसे त्यांनी केले नाही. यावरून त्यांचे उद्दिष्ट काय होते ते सहज ध्यानात येते.
आदर्श कोण ?
संतांचे आदर्श पाहिले तर हेच दिसून येते. सर्व वर्णांनी स्वधर्म पाळावा, असा त्यांचा आग्रह होता. तर मग त्या सर्वांच्या स्वधर्माचे आदर्श त्यांनी लोकांपुढे उभे करावयास हवे होते. तसे त्यांनी केले नाही. नामस्मरण करून जे तरून गेले, ज्यांनी देव प्राप्त करून घेतला, त्यांचाच फक्त संत आदर करतात. प्रल्हाद, बळी, सुदाम, उपमन्यू, अजामीळ, पिंगला यांची स्तोत्रे संत गातात. पण हरिहर, बुक्क, विद्यारण्य, कृष्णदेव राय, महाराणा हमीर, महाराणा प्रताप सिंह, भास्कराचार्य, आर्यभट्ट, चंद्रगुप्त, समुद्रगुप्त यांचा संत उल्लेखसुद्धा करीत नाहीत. कालिदास, भवभूती, भारवी यांचा निर्देशही नाही. वास्तविक हे सर्व भगवद्भक्त होते, स्वकर्मकुसुमांनी भगवंतांची पूजा करीत होते, स्वधर्म पाळीत होते. मग यांचा निर्देश संत का करीत नाहीत ?
तो त्यांचा विषय नाही, हे त्याचे उत्तर आहे. हे सर्व पुरुष ऐहिक ऐश्वर्य उपासक होते. ते राज्य, द्रव्य, मान, उपार्जित होते. यांचा अंतकाळी काही उपयोग नव्हता. परमार्थाच्या वाटेत ते अडसर होते. त्यामुळे संतांनी त्यांची पूर्ण उपेक्षा केली हे उघड आहे.
अन्याय
संतांच्या कार्याचे विवेचन येथे संपले. त्याचा तात्पर्यार्थ एवढाच सांगावासा वाटतो. की संतांनी जे केले ते फार फार मोठे आहे. फार उदात्त असे आहे, त्यासाठी महाराष्ट्र त्यांचा कायमचा ऋणी राहील. पण त्यांनी जे करावयास हवे होते असे आज आपणास वाटते, ते बळेच त्यांच्या माथी लादणे हे मला युक्त वाटत नाही. कारण त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होतो. ऐहिक ऐश्वर्याची चिंता वाहत होते, असे म्हटले तर त्यांच्या प्रतिपादनात अनेक उणिवा, अनेक न्यूने, अनेक विसंगती दिसू लागतात. ते प्रतिपादन अतिशय तोकडे, तुटपुंजे, आणि असमाधानकारक आहे असे दिसू लागते. म्हणून असला अन्याय संतांच्यावर करू नये असे मला वाटते. आणि या दृष्टीने विचार केला तर, 'धर्मभावना सतत जागृत ठेवून हिंदूंच्या अस्मितेची त्यांनी अखंड जपणूक केली आणि मराठीचा अभिमान धरून, त्या भाषेत ग्रंथ निर्मिती करून, महाराष्ट्राला महाराष्ट्ररूप प्राप्त करून दिले. या त्यांच्या कार्याची महती आपल्या ध्यानात येईल.
यादवकालातील नेतृत्वाचा विचार येथे संपला. आता त्याच्या समारोपादाखल काही थोडे लिहून मग समर्थ रामदास स्वामींच्या कार्याचे स्वरूप पाहावयाचे आहे.
मागे सातवाहन ते यादव या कालखंडाचा अभ्यास करताना हिंदुसमाजाच्या अवनतीची मीमांसा केली होती. यादव काळाच्या उत्तरार्धात या समाजाची जीवशक्तीच नष्ट झाली होती. या अधःपाताची कारणे कोणती ? निवृत्ती किंवा संन्यासवाद हे पहिले कारण. या निवृत्तीमुळेच राजधर्म, भौतिक विद्या, उद्योग, व्यापार यांची हेळसांड झाली आणि हळूहळू भारतातून त्यांचा लोप झाला. कलियुगाची घातकी कल्पना व तज्जन्य प्रारब्धवाद हे दुसरे कारण. मीमांसकांचे शब्दप्रामाण्य व पुढे त्यातून उद्भवलेले गुरुमाहात्म्य हे तिसरे कारण. कलिवर्ज्य या महामूढ धर्मग्रंथाने हिंदूंच्या समुद्रप्रवासास व परदेशगमनास बंदी घातली आणि या विपरीतबुद्धी समाजाने मानली हे चौथे कारण. याच कलिवर्ज्याने पतितपरावर्तनास म्हणजे धर्मांतरितांच्या शुद्धीसही बंदी घातली आणि तीही या समाजाने मानली हे पाचवे कारण. आणि वर्णभेद, जातिभेद, अस्पृश्यता यांच्याविषयी थोडे उदार, थोडे लवचिक असे पूर्वीच्या शास्त्राने सांगितलेले धोरण लोप पावून त्यांना अत्यंत कडक व तीव्र रूप प्राप्त झाले हे सहावे कारण होय.
या कारणांमुळे अखिल हिंदुसमाज क्षीणबल झाला आणि इ. स. १००१ पासून सुरू झालेल्या मुस्लिम आक्रमणास त्याला यशस्वीपणे तोंड देता आले नाही. येथील साम्राज्ये पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली आणि इ. स. १३२० च्या सुमारास अखिल भारत यवनाक्रांत झाला. त्याला पूर्ण पारतंत्र्य आले.
हे आक्रमण विजयनगरच्या साम्राज्य, संस्थापकांनी तत्काळ नष्ट केले आणि जवळ जवळ अडीचशे वर्षे तुंगभद्रेच्या दक्षिणेचे स्वातंत्र्य टिकविले. पण १५६५ साली त्यालाही टिकाव धरता आला नाही. रजपुतांनी दीर्घकाल झगडा केला. पण तेही याच सुमारास नामोहरम झाले. शिखांची तीच गत झाली. महाराष्ट्रात शिवछत्रपतींच्या आगमनापर्यंत संतांच्या धार्मिक चळवळीमुळे स्वत्व टिकून राहिले. पण त्यांच्या धार्मिक तत्त्वज्ञानाला शास्त्रीपंडितांनी जयिष्णू राजधर्माची जोड न दिल्यामुळे येथे परदास्य कायमच राहिले. पण पुढे समर्थ रामदास स्वामी आणि शिवछत्रपती यांनी ही उणीव भरून काढली. त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रधर्माची स्थापना केली. त्यामुळे संतांच्या प्रयत्नांनी जिवंत राहिलेल्या धर्मभावनेला राष्ट्रभावनेची जोड मिळून महाराष्ट्राची जीवशक्ती त्याला पुन्हा प्राप्त झाली आणि त्यामुळे तो मुस्लिम आक्रमणाचा उच्छेद करू शकला. तेव्हा आता प्रथम आपल्या राष्ट्रधर्माचे संस्थापक जे दोन महापुरुष त्यांपैकी समर्थांच्या कार्याचे स्वरूप पाहावयाचे आहे.