Jump to content

महाराष्ट्र संस्कृती/विचारप्रधान साहित्य

विकिस्रोत कडून


४१.
विचारप्रधान साहित्य
 


१. निबंध-ग्रंथ


 विचारप्रधान वाङ्मयात निबंध ग्रंथ या प्रकाराला अग्रस्थान आहे. निबंध हा अत्यंत प्रभावी असा वाङ्मय प्रकार आहे. समाजाच्या जीवनाशी, राष्ट्राच्या उत्कर्षापकर्षाशी त्याचा निकटचा संबंध आहे. नाटक, कादंबऱ्या, काव्य, लघुकथा यांचा समाजोन्नतीशी कितपत संबंध आहे, याविषयी वाद असू शकेल. पण निबंधाविषयी असा वाद असूच शकणार नाही. येथे निबंध हा शब्द व्यापक अर्थाने वापरला आहे. तर्कशुद्ध रीतीने केलेली, बुद्धीला आवाहन करणारी, आपले सिद्धांत साधार, सप्रमाण मांडणारी, इतिहास, अनुभव, अवलोकन यांच्या पायावर उभारलेली विचारप्रधान रचना, असा याचा अर्थ येथे अभिप्रेत आहे. ही रचना वीसपंचवीस पृष्ठांपर्यंत असली तर हल्ली आपण तिला निबंध म्हणतो. तीनचारशे पृष्ठांपर्यंत असली तर तिला ग्रंथ म्हणतो. प्रबंध हा शब्द अलीकडे रूढ होत आहे. हा प्रबंध याच्या कोठे तरी मध्ये बसेल. पण त्याची जाती याच प्रकारची आहे. तेव्हा येथे निबंध या शब्दात निबंध, प्रबंध, ग्रंथ या सर्वाचा समावेश केलेला आहे हे ध्यानी घ्यावे.
 असा हा निबंध आपल्याकडे १८३० नंतर म्हणजे ब्रिटिशकालातच अवतरला. पूर्वी मराठीतच काय पण संस्कृतमध्येही अशा तऱ्हेची रचना कोणी केलेली आढळत नाही. इतिहासदृष्टी जशी सर्व भारतीय इतिहासात आढळत नाही तशीच निबंधदृष्टीही आढळत नाही. ब्रिटिशकालात मात्र प्रारंभापासूनच निबंधकार दिसू लागतात.
 भौतिक इहवादी दृष्टी, बुद्धीला आवाहन, समाजकारण, राजकारण, धर्म, अर्थ- व्यवस्था, विद्या, विज्ञान यांत परिवर्तन किंवा क्रांती घडवून आणण्याची तळमळ ही निबंधलेखनाच्या मागची प्रेरणा आहे. बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, भाऊ महाजन, विष्णुशास्त्री, टिळक, आगरकर, राजवाडे, न. चिं. केळकर, सावरकर, माटे, द. के. केळकर, महर्षी शिंदे यांचे निबंध-ग्रंथ पाहता हे सहज ध्यानात येईल.
 ब्रिटिश कालातील पहिले मोठे निबंधकार म्हणजे बाळशास्त्री जांभेकर हे होत. 'या देशातील लोकांनी आपले लक्ष संसारोपयोगी विद्या कलाकौशल्याकडे द्यावे, त्याचे व्यवहारात कसे उपयोग होतात ते शिकावे. सारांश ज्या गोष्टींनी युरोपीय लोक या देशाचे लोकांपेक्षा श्रेष्ठता पावले आहेत, आणि ज्या गोष्टी नाहीत म्हणोन या देशाची दुर्दशा झाली आहे, त्या सर्व त्यानी साध्य कराव्या,' असे त्यांनी 'दर्पण' मध्ये प्रारंभीच लिहिले आहे. बाळशास्त्री यांनी आपले सर्व निबंध 'दर्पण' व 'दिग्दर्शन' या नियतकालिकांतूनच प्रसिद्ध केले आणि धर्मसुधारणा, स्त्रीपुरुषसमता, विज्ञानाचा अभ्यास युरोपीयांची विद्या हेच त्यांचे विषय होते.
 याच सुमाराचे दुसरे मोठे निबंधकार म्हणजे लोकहितवादी. 'प्रभाकर' या पत्रात त्यांनी प्रथम 'शतपत्रे' लिहिली. त्यांच्या विषयी विवेचन मागे केलेच आहे. धर्म, बुद्धिप्रामाण्य, स्त्रीशिक्षण, विधवाविवाह, उद्योग, यंत्र, आर्थिक प्रगती, पार्लमेंट, लोकशाही हे त्यांच्या पत्रांचे विषय होते. 'शतपत्रा'नंतर त्यांनी पुष्कळ लेखन केले. पण ते सर्व निबंध-ग्रंथरूपाचेच आहे. १८७६ साली त्यांनी 'हिंदुस्थानास दरिद्र येण्याची कारणे' हे पुस्तक प्रसिद्ध केले. 'स्थानिक स्वराज्य' हा त्यांचाच छोटासा प्रबंध आहे. त्यात त्यांनी शासनसंस्थेच्या स्वरूपाचे दिग्दर्शन करून प्रजेच्या मूलभूत हक्काचे विवेचन केले आहे. 'ग्रामरचना, त्यांतील व्यवस्था व त्यांची हल्लीची स्थिती' हा १८८३ सालाचा निबंध आहे. 'वृत्तवैभव' या पत्रात त्यांनी अनेक निबंध लिहिले, ते 'निबंधसंग्रह' या नावाने पुढे ग्रंथरूपाने त्यांनी प्रसिद्ध केले. हा ११०० पृष्ठांचा ग्रंथ आहे. त्यावरून, आपल्या समाजाच्या भवितव्याची लोकहितवादी कशी अखंड चिंता करीत असत ते ध्यानी येते. इतिहास हा तर त्यांचा अत्यंत आवडता विषय. १८५१ सालीच त्यांनी 'भरतखंडपर्व' या नावाने हिंदुस्थानचा संक्षिप्त इतिहास लिहून इतिहासलेखनाची परंपरा महाराष्ट्रात सुरू केली आणि त्यानंतर सुराष्ट्र, गुजराथ, राजस्थान इ. देशांच्या इतिहासाची मराठीत भाषांतरे केली. 'आमच्या देशाच्या माहितीच्या संबंधाने लोकहितवादी केवळ समुद्र आहेत,' ही त्यांच्याविषयीची उक्ती कशी सार्थ आहे ते यावरून दिसेल.
 याच काळात भाऊ महाजन, दादोबा पांडुरंग, म. फुले, रामकृष्ण विश्वनाथ असे आणखी निबंधलेखक होऊन गेले. पण एक गोष्ट स्पष्ट दिसते की निबंध-ग्रंथ ही जी श्रेष्ठ वाङ्मयरचना तिचा खरा प्रारंभ विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या निबंधमालेपासून झाला. बाळशास्त्री, लोकहितवादी व वर उल्लेखिलेले इतर लेखक यांनी फार मोठे सामाजिक कार्य केले, यात शंका नाही. त्याचे वर्णन आणि महत्त्व वर अनेक ठिकाणी सांगितलेच आहे. पण आता आपण साहित्य म्हणून त्यांच्या लेखनाचा विचार करीत आहोत. त्या दृष्टीने पाहता मनातील आशय व्यक्त करणे, या पलीकडे साहित्यकळा अशी त्यांच्या लेखनाला आली नाही. ती कळा शैलीमुळे येत असते आणि तशी निबंधलेखनाची कसलीच शैली यांच्या लेखनात आढळत नाही.
 निबंध ही विचारप्रधान रचना आहे. एक विचारबीज मनात येताच त्याविषयी सर्व माहिती संकलित करणे, तिचे वर्गीकरण करणे, मग तिची व्यवस्थित रचना करणे व त्यावरून शेवटी निष्कर्ष काढणे या पद्धतीने मानवी मनात ग्रंथ तयार होतो. तसा तो तयार झाल्यावर विषयाचे महत्त्व, त्याची कारणे, त्याचे पूर्व रूप, सध्याचे रूप, रूढ समज, वास्तव स्थिती, विरोधी विचार, तुलना, आक्षेप, खंडन, मंडन, इतर पंडितांचे त्याविषयी विचार, ऐतिहासिक दृष्टीतून परीक्षण, अन्वयव्यतिरेक पद्धतीने तपासणी, उपायचिंतन इत्यादी विविध अंगांनी त्याचा- त्या बीजाचा- वटवृक्ष तयार करणे ही निबंधरचना होय. तिचे लेखन करताना उपक्रम, उपसंहार यावर कटाक्षाने लक्ष ठेवणे आणि उपहास, उपरोध, व्याजोक्ती, वक्रोक्ती, उपमा दृष्टातांदी अलंकार, इतिहासातील प्रमाणे, कार्यकारणमीमांसा, संस्कृत, मराठी, इंग्रजी अवतरणे, सुभाषिते, अनेकविध न्याय, म्हणी, पंचतंत्र, इसापनीती यांसारख्या ग्रंथांतील गोष्टी यांनी मूळ विषयाचे प्रतिपादन सजवणे या सगळ्याला शैली म्हणतात. अशा तऱ्हेची निबंधरचना मराठीत प्रथम विष्णुशास्त्री यांनी सुरू केली. म्हणूनच मराठीत त्यांच्या निबंधमालेने नवयुग सुरू केले, असे म्हणतात.
 स्वधर्म, स्वभाषा, स्वदेश, यांचा अभिमान जागृत करणे हा विष्णुशास्त्री यांचा हेतू होता. त्यांच्या आधी जे मोठेमोठे पंडित झाले त्यांची एक दृढ श्रद्धा होती की, इंग्रजच या देशाचे कल्याण करतील. परमेश्वराने त्यांचे राज्य येथे त्याच हेतूने आणले आहे. हे स्वत्वहीन परावलंबन नष्ट करणे हा विष्णुशास्त्री यांचा हेतू होता. इंग्रज हा या देशाचा शत्रू असून तो आपले रक्तशोषण करीत आहे, त्याच्या पाशातून मुक्त होऊन स्वातंत्र्यप्राप्ती करून घेणे हे आपले आद्य कर्तव्य होय, असा त्यांचा सिद्धांत होता. आणि 'मराठी भाषेची सांप्रतची स्थिती' या पहिल्या निबंधापासून, 'आमच्या देशाची स्थिती' या शेवटच्या निबंधापर्यंत त्यांनी सर्व लिखाण त्या सिद्धांताच्या प्रस्थापनेसाठीच केले. विषय कोणताही असो; इतिहास, वक्तृत्व, इंग्रजी भाषा- कोणताही विषय असो- इंग्रज मिशनरी, पंडित व इंग्रज राज्यकर्ते यांच्या अपसिद्धांतांवर, अपकृत्यांवर, झोड उठविल्यावाचून विष्णुशास्त्री तो पुरा करीतच नसत. पण याबरोबर स्वतःच्या समाजाच्या दोषांवरही ते तितकीच कडक टीका करीत असत. जुने शास्त्री पंडित, लोकभ्रमांत पिचणारा समाज, अभ्यासहीन सुशिक्षित वर्ग यांवर कडक प्रहार ते करीत असत आणि इंग्रजांच्या प्रत्येक गुणाची प्रशंसा करीत असत. येथे क्रांती घडवून आणण्यासाठी आपण इंग्रजांनाच गुरू केले पाहिजे, असे स्पष्टपणे त्यांनी सांगितले आहे. देशाभिमान ही वृत्तीच आपल्याकडे नाही, ती इंग्रजांपासून आपण घेतली पाहिजे, असा उपदेश त्यांनी केला आहे आणि सर्व लोकांच्या अंगी तो बाणविण्यासाठी सुशिक्षित लोकांनी ग्रंथरचना केली पाहिजे, असे परोपरीने सांगितले आहे. वाणी आणि लेखणी या दोन शस्त्रांवर त्यांची अपार श्रद्धा होती. फ्रान्समध्ये रूसो, व्हॉल्टेअर यांनी लेखणीने जे घडविले ते येथील सुशिक्षितांनी त्याच पद्धतीने घडवावे, असे सांगण्याइतका निबंध- ग्रंथ या साहित्यावर त्यांचा विश्वास होता.
 आगरकर व टिळक यांनी त्यांच्यापासूनच स्फूर्ती घेतली होती. म्हणूनच न्यू इंग्लिश स्कूल, केसरी हे उद्योग त्यांनी एकत्र केले. केसरीचे पहिले संपादक आगरकरच होते. टिळकांशी त्याचे पटेना म्हणून त्यांनी 'सुधारक' पत्र काढले. या दोन पत्रांतले लेखनिबंध हेच त्यांचे मुख्य लिखाण.
 समाजसुधारणा, आणि त्यातही स्त्रीसुधारणा यांवर आगरकरांचा मुख्य भर होता. तरीही त्यांचे राजकारण जहालच होते. इंग्रज हा या देशाचा शत्रू आहे, त्याचे अंतरंग काळेकुट्ट आहे, तो आर्थिक शोषणासाठीच राज्य करीत आहे, यांविषयी त्यांना शंका नव्हती; व तसे लेखही त्यांनी लिहिले आहेत. पण धार्मिक व सामाजिक सुधारणा हा त्यांचा मुख्य विषय होता. जुन्या सामाजिक व धार्मिक रूढींची अगदी चीरफाड करून, देव- कल्पना पिशाच्च- कल्पनेपासून निघाली आहे, वर्णसंकर हितावह आहे, स्त्रीपुरुषांना एकच शिक्षण व तेही एकत्र दिले पाहिजे, स्वयंवर हीच विवाह- पद्धती उत्तम, असले सिद्धांत त्यांनी मांडले आहेत. ते अज्ञेयवादी होते व 'मानवतेचे ऐहिक सुखवर्धन' हा ते धर्म मानीत असत. बुद्धिवाद हा त्यांचा आत्मा होता. नवीन विचार सांगण्यास जुन्या शास्त्रांचा आधार घेणे त्यांना मुळीच मान्य नव्हते. 'इष्ट असेल ते बोलणार' व 'शक्य असेल ते करणार' असा त्यांचा बाणा होता. 'मनुष्य- सुधारणेची मूलतत्त्वे', 'आमचे काय होणार ?', 'सुधारक काढण्याचा हेतू', 'गुलामांचे राष्ट्र', 'जात का करीत नाही ?', 'हिंदुस्थानचे राज्य कोणासाठी ?', 'फेरजमाबंदी व लष्करी खर्च', 'सामाजिक सुधारणा आणि कायदा', 'मूळ पाया चांगला पाहिजे', 'स्वयंवर', 'आमचे दोष आम्हांस कधी दिसू लागतील ?', 'सोवळ्याची मीमांसा', 'पांचजन्याचा हंगाम', 'ग्रामण्य प्रकरण', 'शहाण्यांचा मूर्खपणा' या निबंधांतून आगरकरांचे सारे व्यक्तित्व स्पष्ट दिसून येते.
 ब्रिटिशकालात जे निबंध- ग्रंथकार झाले त्यांत लो. टिळक हे अग्रगण्य होत. ज्ञानोपासना, व्यासंग हा त्यांच्या निबंधाचा पहिला विशेष होय. वेद, उपनिषदे, महाभारत, रामायण, स्मृती, कालिदास, भवभूती ही संस्कृत सरस्वती तर त्यांच्या जिभेवर अखंड नाचत होतीच पण पाश्चात्य विद्येतील तत्त्वज्ञान व भौतिक शास्त्रे यांचा त्यांनी तसाच अभ्यास केला होता. प्लेटो, ॲरिस्टॉटल, कांट, शोपेनहार, बेंथाम, मिल, ग्रीन हे सर्व तत्त्ववेत्ते आणि डाल्टन, डार्विन, हेगेल हे शास्त्रज्ञ, यांच्या ग्रंथांचे त्यानी आलोडन केले होते. 'गीतारहस्य', 'मृगशीर्ष', 'आर्क्टिक होम' या त्यांच्या ग्रंथांत ठायी ठायी याचा प्रत्यय येतो. त्यांच्या निबंधांतून दिसून येणारे त्यांचे खंडन- मंडन कौशल्य असेच असामान्य आहे. 'मिल आणि मोर्ले', 'अध्यक्षाचे अधिकार', 'हिंदी स्वराज्यसंघ' यांसारख्या निबंधात त्यांचे हे नैपुण्य अगदी टिपेस गेलेले दिसते. 'हिंदुस्थानच्या प्रजेची अस्वस्थता', 'शिवाजी आणि ब्राहाण', 'राष्ट्रीय शिक्षण' या लेखांत धीरजपाल, मॉरिसन, हिस्टारिकस या आक्षेपकांचा टिळकांनी जो परामर्श घेतला आहे त्यात त्यांच्या बिनतोड युक्तिवादाची अशीच उदाहरणे सापडतील.
 व्याजोक्ती, आलंकारिक भाषा हे गुण टिळकांच्या लेखणीला मानवत नाहीत. प्रतिपक्षावर टीका करताना किंवा स्वमत मांडताना आधार, प्रमाण, युक्तिवाद व तात्त्विक सिद्धांत यापलीकडे ते सहसा जात नाहीत. 'हे लेखन निराधार आहे, एकतर्फी आहे, असमंजसपणाचे आहे, मानभावी आहे, अशास्त्रीय आहे', अशी साधी सरळ टीका ते करतात. पण त्यांच्या प्रतिपादनातील भाव मात्र अत्यंत जहरी व तीव्र असा असतो. त्यांनी दृष्टान्त दिलेच तर ज्योतिष, वैद्यक किंवा वेदान्त यांतले किंवा सामान्य व्यवहारातले अगदी गद्यमय असे ते असतात.
 पाश्चात्य विद्येचा जन्मभर अभ्यास टिळकांनी केला असला तरी त्यांच्या लेखनावर तिकडील कोणत्याही विद्वानाची छाया पडलेली नाही. विष्णुशास्त्री यांच्या लेखनावर मेकॉले, जॉन्सन यांची व आगरकरांच्या निबंधांवर स्पेन्सर यांची छाप असल्याचे जाणवते. पण टिळकांच्या मनावर प्रभाव होता तो वेद, उपनिषदे, महाभारत, रामायण यांचा. त्यांचे सर्व जीवनच या ग्रंथांनी घडविले होते. तेव्हा त्याचाच आविष्कार त्यांच्या लेखनातून होत असे.
 गीतारहस्य, मृगशीर्ष, आर्क्टिक होम या त्यांच्या ग्रंथांचे स्वरूप मागील प्रकरणातून स्पष्ट केलेच आहे. त्यांच्या केसरीतील लेखांच्या आशयाचे विवेचनही तेथे आलेले आहे. त्या सर्वावरून सर्व निबंधकारांत त्यांचे स्थान अनन्यसामान्य कसे होते, हे सहज ध्यानात येईल.
 तात्यासाहेब केळकर, शिवरामपंत परांजपे व वा. म. जोशी हे पुढच्या पिढीतले मोठे निबंधकार होत. तात्यासाहेब केसरीचे अनेक वर्षे संपादक होते. त्या पत्रात त्यांनी शेकडो निबंध लिहिले. शिवाय 'मराठे व इंग्रज', 'राज्यशास्त्र', 'हिंदी तत्त्वज्ञानाचा इतिहास', 'आयर्लंडचा इतिहास', 'फ्रेंच राज्यक्रांती' हे ग्रंथही त्यांनी लिहिले आहेत. हे ग्रंथ त्यांची चतुरस्रता, विद्वत्ता, भाषाप्रभुत्व, आकर्षक, आलंकारिक लेखनशैली यांची साक्ष देतात. विपुल माहिती, तर्कशुद्ध विचारसरणी, रेखीव मांडणी व अत्यंत प्रौढ व रम्य अशी भाषासरणी या गुणांनी त्यांचे निबंध संपन्न आहेत. मराठीचे जे भाषाप्रभू आहेत त्यांत केळकरांची गणना अग्रमालिकेत होईल यात शंका नाही.
 शि. म. परांजपे हे असेच दुसरे मराठीचे भाषाप्रभू आहेत. 'काळकर्ते' म्हणून त्यांची कीर्ती आहे. त्यांच्या 'काळ' पत्रातील निवडक निबंधांचे दहा खंड प्रसिद्ध झाले आहेत. त्यातील 'तलवारीचा हक्क', 'राज्यापहार आणि न्याय,' 'दिल्लीचे तख्त व भाऊसाहेबांचा घण' हे त्यांचे लेख म्हणजे स्वातंत्र्यसूक्तेच आहेत. वक्रोती हा त्यांच्या लेखणीचा मुख्य अलंकार होय. मराठीला हे लेणे त्यांनी दिले आहे. व्हॉल्टेअर, स्विफ्ट या पाश्चात्य लेखकांची शैली त्यांनी आत्मसात केली होती. त्यामुळे व्याजोक्ती, उपहास, उपरोध या अस्त्रांचे ते प्रभू होते. निबंधाप्रमाणे ते गोष्टीही लिहीत. पण त्या गोष्टी लघुकथेच्या रूपाच्या नव्हत्या. निबंधाला दिलेले एक निराळे वळण एवढयाच अर्थाने त्या गोष्टी होत्या. 'ध्रुवाची गोष्ट खोटी असली पाहिजे', 'अर्जुनाचा वेडेपणा', शिवाजीची एक रात्र' याचे मूळ रूप निबंधाचेच आहे. 'मराठांच्या लढाया' हा त्यांचा ग्रंथ चांगल्यापैकी आहे. पण शिवरामपंताची खरी कीर्ती 'काळा'तील निबंधांवरच अधिष्ठित आहे.
 वा. म. जोशी हे मुख्यतः कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. पण ते निबंधकारही होते. 'ध्येय हाच देव' व 'ज्ञान हे विष की अमृत' हे त्यांचे निबंध फार गाजलेले आहेत त्यांचा 'नीतिशास्त्र प्रवेश' हा ग्रंथही श्रेष्ठ दर्जाचा आहे. आपल्या विषयाचा ते खोल अभ्यास करीत आणि पूर्ण अनाग्रही बुद्धीने लेखन करीत. संशयवादी म्हणून ते प्रसिद्ध होते. आपल्या इतक्याच आस्थेने ते प्रतिपक्षाची बाजू पहात. आणि केव्हा केव्हा त्यांची डळमळ संपतच नसे. त्यामुळे ठाम विधान करणे त्यांना जड जाई. पण वरील निबंधांत हा दोष नाही. त्यामुळे त्यांनी थोडेच निबंध लिहिले तरी त्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
 वि. का. राजवाडे, चिं. वि. वैद्य, म. म. मिराशी, पं. सातवळेकर हेही मराठीतले श्रेष्ठ निबंधकार होते. पण त्यांचे ग्रंथ संशोधनात्मक आहेत. त्यांचा परामर्श त्या प्रकरणात घेतलाच आहे.
 डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हे मराठीतले एक सन्मान्य ग्रंथकार होऊन गेले. ज्ञानकोशकार म्हणून त्यांची कीर्ती आहे. याचा उल्लेख मागे आलाच आहे. पण त्यांची विशिष्ट बहुमोल कामगिरी म्हणजे महाराष्ट्राला समाजशास्त्रीय दृष्टीची दीक्षा देणे ही होय. 'भारतीय समाजशास्त्र' या त्यांच्या ग्रंथावरून हे दिसून येईल. 'प्राचीन महाराष्ट्र' हा त्यांचा ग्रंथ समाजशास्त्रीय दृष्टीने अभ्यसनीय आहे. 'महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण' हा ग्रंथ त्यांच्या स्वतंत्र विवेचक दृष्टीची साक्ष देतो.
 म. म. दत्तो वामन पोतदार हे इतिहाससंशोधक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे अनेक निबंध मराठी नियतकालिकातून प्रसिद्ध झालेले आहेत. 'प्रांतिक भाषांचे भवितव्य' हा त्यांचा निबंध प्रसिद्ध आहे. स्वतंत्र विचार, ठाकठीक रचना, आटोपशीर वाक्ये, साधी भाषा हे त्यांच्या निबंधांचे विशेष आहेत.
 साने गुरुजी हे एक अलौकिक प्रज्ञेचे लेखक होते. ज्ञानाच्या खाणीतले सुवर्णकण वेचावे आणि सर्वसामान्य वाचकांपर्यंत ते पोचवावे, अशी त्यांना तळमळ होती. 'भारतीय संस्कृती' हा त्यांचा निबंधसंग्रह प्रसिद्ध आहे. उच्च जीवनमूल्यांवर त्यांची दृढ श्रद्धा होती. ते कमालीचे भावनाप्रधान होते. त्यांच्या लेखनात पांडित्यापेक्षा भावनांची कोवळीक जास्त दिसून येते. रसाळ शैली व उत्कट जिव्हाळा हे त्यांच्या लेखनाचे विशेष गुण होत.
 याच काळातले आणखी एक नामवंत ग्रंथकार म्हणजे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे होत. 'अस्पृश्यतानिवारण' हे त्यांचे मुख्य कार्य. १९०६ साली 'ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस मिशन' ही संस्था त्यांनी स्थापन केली व त्या कार्याला वाहून घेतले. पण केवळ समाजसेवक म्हणून त्यांची कीर्ती नाही. ते संशोधक व लेखकही आहेत. अस्पृश्यतेच्या प्रश्नाचे त्यांनी प्राचीन काळच्या वेदवाङ्मयापासून बौद्ध, जैन सर्व वाङ्मयाचे संशोधन केले. आणि आर्याच्या आगमनापूर्वीपासून येथे अस्पृश्यता होती, असा सिद्धात मांडला. 'भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न' हा या विषयावरचा त्यांचा मुख्य ग्रंथ होय. याशिवाय या व एकंदर समाजसुधारणेच्या विषयावर त्यांनी लेख लिहिले आहेत. शिंदे- लेखसंग्रह या नावाने ते प्रसिद्ध झालेले आहेत. 'समाज- सुधारणा यशस्वी का होत नाही ?', 'मराठी वाङ्मय-तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र' 'आपले सामर्थ्य आपण वाढवावे', 'भावी समाजसुधारणेची तयारी' हे त्यांचे निबंध प्रसिद्ध आहेत. समाजसुधारणा यशस्वी का होत नाही, हे सांगताना आपली सुधारणा एकांगी व अपुरी आहे असे त्यांनी सांगितले आहे. त्याचा आशय असा की अस्पृश्यता, ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद ही हिंदुसमाजास जडलेल्या एकाच रोगाची बाह्य लक्षणे आहेत, या दृष्टीने सुधारक त्याच्याकडे पाहात नाहीत व यामुळे त्यांच्या कार्यास गती येत नाही. दीर्घ संशोधन, व्यासंग आणि प्रत्यक्ष कार्य यामुळे त्यांची दृष्टी कशी व्यापक व अनाग्रही झाली होती हे यावरून ध्यानात येते.
 १९२० नंतर निबंधकारांची तिसरी पिढी उदयास आली. स्वातंत्र्यवीर सावरकर हे यातील अग्रगण्य होत. 'हिंदुराष्ट्रवाद' हा त्यांचा प्रमुख विषय होता. पण ते जितके परंपराभिमानी होते तितकेच विज्ञाननिष्ठही होते. 'दोन शब्दांत दोन संस्कृती', 'मंत्रचळ नव्हे, यंत्रबळ' या त्यांच्या निबंधांवरून हे ध्यानात येईल. रक्ताने लिहिणारे व शाईने लिहिणारे असे लेखकाचे दोन वर्ग एकाने केले आहेत. त्यातील पहिल्या वर्गात सावरकर येतात. 'जोसेफ मॅझिनी', 'सत्तावनचे स्वातंत्र्यसमर', 'हिंदुत्व', 'जात्युच्छेदक निबंध,' 'सहा सोनेरी पाने' अशांसारखे त्याचे ग्रंथ या वृत्तीतूनच निर्माण झालेले आहेत. त्यांची स्वातंत्र्यनिष्ठा, हिंदुत्वनिष्ठा, विज्ञाननिष्ठा या प्रत्येक ग्रंथात दिसून येते. आवेश, त्वेष, तळमळ, उत्कट भावना हे गुण त्यांच्या वाङ्मयात पदोपदी दिसून येतात. तरीही विद्वत्ता, व्यासंग यांना कोठेही ढळ पोचलेला दिसत नाही. त्यांची सर्व विधाने साधार, सप्रमाण केलेली असतात. त्यांतील युक्तिवाद बिनतोड असतो. उपहास, उपरोध, वक्तृत्व, नाट्य याही गुणांनी त्यांचे लेखन संपन्न आहे.
 श्री. म. माटे हे महर्षी शिंदे यांच्याप्रमाणेच मोठे समाजसेवक व तसेच मोठे लेखकही होते. अस्पृश्य, दलित यांच्या उद्धाराच्या कार्याला त्यांनी वाहून घेतले होते. पण समाजशास्त्राचा त्यांचा व्यासंगही गाढा होता. त्यातूनच 'अस्पृष्टांचा प्रश्न', 'परशुरामचरित्र', 'विज्ञानबोध','रामदास स्वामींचे प्रपंचविज्ञान' हे ग्रंथ आणि 'साहित्यधारा', 'विचारशलाका', 'विचार गुंफा', 'विवेकमंडन' 'विचारमंथन' हे निबंधसंग्रह निर्माण झाले. माटे देही सावरकरांप्रमाणे परंपराभिमानी होते. पण ते तितकेच बुद्धिवादी, भौतिकवादी व विज्ञाननिष्ठही होते. 'विज्ञानबोध', 'प्रयोगशाळेला शरण जा' हे त्यांचे निबंध-ग्रंथ याची साक्ष देतील. दलितांच्या कार्याला त्यांनी वाहून घेतले असल्यामुळे त्यांचे निबंध, लघुकथा, ग्रंथ यांत त्यांचा आत्मप्रत्यय पदोपदी दिसून येतो. हे प्रचीतीचे बोल आहेत, हे प्रत्येक पानातून जाणवते. 'चिंतन- शीलता, समतोल वृत्ती, सत्यान्वेषणाची इच्छा आणि डौलदार शैली यांची जोड विषयांना मिळाल्यामुळे केळकरांनंतरचे अव्वल दर्जाचे निबंधकार म्हणून माटे यांचाच उल्लेख केला पाहिजे', असे वि. स. खांडेकर यांनी म्हटले आहे, ते अगदी सार्थ आहे.
 द. के. केळकर हे अत्यंत विद्वान, साक्षेपी व सव्यसाची असे लेखक आहेत. 'काव्यालोचन', 'मराठी साहित्याचे सिंहावलोकन', 'साहित्यविहार' हे समीक्षात्मक ग्रंथ जसे त्यांनी लिहिले, तसेच 'संस्कृति- संगम,' 'उद्याची संस्कृती', 'संस्कृती आणि विज्ञान' हे इतिहास व विज्ञान या विषयांवरचे ग्रंथही त्यांनी लिहिले आहेत. 'वादळी वारे' हा त्यांचा निबंधसंग्रह आहे. सर्व इतिहास पाहता पाश्चात्य व भारतीय संस्कृतीत मूलतः काही तसा भेद नाही, हा सिद्धांत त्यांनी आपल्या 'संस्कृतिसंगम' या ग्रंथात मांडला आहे. या ग्रंथांतून त्यांची विद्वत्ता, व्यासंग, शोधक बुद्धी, निर्भयता हे गुण स्पष्टपणे दिसून येतात. विज्ञानाच्या साह्याने आपण इहलोकही आनंदमय करण्यास शिकले पाहिजे, असे त्यांनी आवर्जून सांगितले आहे. 'आपल्या संस्कृतिसंपदेतील उणीव आम्ही आता ओळखली आहे. आणि म्हणूनच आपण निकटच्या भावी कालात ही उणीव भरून काढू व जागतिक राष्ट्रमालिकेत पूर्वीचे स्थान पुन्हा एकदा मिळवू,' अशी उमेद त्यांच्या लेखनातून सतत दिसून येते. 'खऱ्या विद्वानाचे चर्मचक्षू वर्तमानाचे प्रेक्षण करण्यात गुंग असतात, त्याचे ज्ञानचक्षू पूर्वेतिहासाच्या परिशीलंनात मग्न असतात. तर त्याचे तर्कचक्षु भावी परिस्थितीकडे वळलेले असतात. प्रा. केळकरांची विद्वत्ता अशी त्रिनेत्री आहे', असे शि. ल. करंदीकरांनी म्हटले आहे. त्याचा प्रत्यय केळकरांचे ग्रंथ वाचताना सारखा येत राहतो.
 आचार्य शंकर दत्तात्रय जावडेकर हे एक नामवंत ग्रंथकार म्हणून प्रसिद्ध आहेत. राजकारणी तत्त्ववेत्ते म्हणून आचार्यांचा महाराष्ट्रात लौकिक आहे. महात्माजींचे तत्त्वज्ञान व राजकारण यांचा सर्वत्र प्रसार करण्याचे महत्कार्य यांनी केले. 'आधुनिक भारत' हा त्यांचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ होय. ब्रिटिश कालातील राजकीय घडामोडींचे तात्त्विक विवेचन त्यात केलेले आहे. याशिवाय 'शास्त्रीय समाजवाद', 'लोकशाही', 'गांधीवाद', 'गांधीजीवनरहस्य' हे त्यांचे सर्वश्रुत ग्रंथ आहेत. 'स्वराज्य', 'नवशक्ती', 'लोकशक्ती' या पत्रांतूनही त्यांनी विपुल लेखन केले आहे.
 त्र्यंबक शंकर शेजवलकर हे मराठीतले एक ख्यातनाम लेखक आहेत. त्यांनी शिवचरित्र लिहिण्याचा संकल्प केला होता. पण ते लिहून झाले नाही. पण त्याची प्रस्तावना जी त्यांनी लिहिली आहे तो एक स्वतंत्र प्रबंधच झाला आहे. त्यात शिवचरित्राची पार्श्वभूमी आणि महाराजांच्या आयुष्यातील काही प्रसंग यांचे त्यांनी केलेले विवेचन अत्यंत उद्बोधक झाले आहे. त्यावरून त्यांच्या दीर्घ व गाढ व्यासंगाची कल्पना येते. त्यांच्या स्फुट निबंधांचा एक संग्रहही प्रसिद्ध झाला आहे.
 प्रा. गं. बा. सरदार हे महाराष्ट्राला थोर विचारवंत म्हणून परिचित आहेत. 'संतवाङ्मयाची सामाजिक फलश्रुती', 'महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी', 'ज्ञानेश्वरांची जीवननिष्ठा' असे त्यांचे थोडेच साहित्य आहे. पण त्यांची व्याख्याने फार विचार- परिप्लुत असतात. समाजशास्त्र, धर्म, साहित्य या सर्व विषयांत त्यांना सहज गती आहे. त्यांचे वाचन चौफेर आहे आणि त्यामुळेच त्यांची व्याख्याने अगदी मौलिक अशी होतात.
 ना. ग. गोरे हे व्यासंगी लेखक आहेत. त्यांचा व्यासंग बहुविध आहे. य. गो. जोशी यांच्या मालेत त्यांनी 'विश्वकुटुंबवाद' हे पुस्तक लिहिले. कृष्णाकाठची वर्णनेही ते करतात. आणि समाजवादावर व एकंदर राजकारणावरही ते लेखणी चालवितात. विद्वत्तेप्रमाणेच लालित्यानेही त्यांचे लेखन अलंकृत झालेले असते.
 डॉ. इरावती कर्वे या मुख्यतः संशोधक म्हणून प्रसिद्ध आहेत. मानववंशशास्त्र हा त्यांचा विषय. 'मराठी लोकांची संस्कृती' हा त्यांचा ग्रंथ याच दृष्टिकोणातून लिहिलेला आहे. 'परिपूर्ती' हा त्यांचा निबंधसंग्रह होय. 'युगांत' नावाचा त्यांचा महाभारतावरचा ग्रंथ विशेष गाजला होता. 'हिंदुसमाज- एक अन्वयार्थ', व 'महाराष्ट्र- एक अभ्यास' असे दोन प्रबंधही त्यांनी लिहिलेले आहेत.
 काकासाहेब तथा न. वि. गाडगीळ हे काँग्रेसचे एक खंदे पुढारी होते. मंत्री, राज्यपाल इ. अनेक अधिकारपदे त्यांनी भूषविली होती. हा सर्व व्याप संभाळून त्यांनी 'ग्यानबाचे अर्थशास्त्र', 'राज्यशास्त्र विचार', 'घटनाप्रबोधिनी' असे अर्थशास्त्र व राजकारण या विषयांवर ग्रंथ लिहिले. 'माझे समकालीन', 'अनगड मोती', 'त्याचा यळकोट राहिना' हे त्यांचे लेखसंग्रह आहेत. त्यांत काही चरित्रवजा व काही लघु- निबंधवजा असे लेख आहेत.
 दुर्गाबाई भागवत या समाजशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. लोकसाहित्य हा त्यांचा अभ्यासाचा खास विषय आहे. त्यावर 'लोकसाहित्याची रूपरेखा' हा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. 'ऋतुचक्र' हे त्यांचे पुस्तक फार प्रसिद्ध आहे. मेघश्याम आषाढ, सोनेरी अश्विन ही त्यातील प्रकरणे विशेष रम्य आहेत. 'व्यासपर्व' हा त्यांचा ग्रंथ महाभारताविषयी आहे. श्रीकृष्ण, द्रौपदी, दुर्योधन इ. प्रमुख व्यक्तींच्या कार्याचे विवेचन त्यात केलेले आहे.
 तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे महाराष्ट्रातील एक प्रकांड पंडित आणि श्रेष्ठ विचारवंत आहेत. पाश्चात्य व पौर्वात्य, प्राचीन व अर्वाचीन सर्व शास्त्रांत त्यांची गती अकुंठित आहे. 'हिंदुधर्माची समीक्षा' व 'वैदिक संस्कृतीचा विकास' हे त्यांचे दोन ग्रंथ याची साक्ष देतील. त्यांच्यावर एकेकाळी मार्क्सवादाचा फार प्रभाव होता, हे पहिल्या ग्रंथावरून दिसून येते. पण पुढे त्यांचे मतपरिवर्तन झाले. वैचारिक मूल्यांचा प्रभाव समाजातील भौतिक जड परिस्थितीवरही पडतो, हे त्यांना पुढे मान्य झाले. दुसरा ग्रंथ याच दृष्टिकोनातून लिहिलेला आहे.
 डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे हेही पाश्चात्य- पौर्वात्य शास्त्रांचे अभ्यासक आहेत. विज्ञान- प्रणीत समाजरचना' व 'स्वभावलेखन' हे त्यांचे प्रारंभीचे ग्रंथ होत. १९४२ सालापासून ते 'वसंत'मध्ये लिहीत आहेत. जगातील लोकशाही शासनांची त्यांनी सविस्तर चिकित्सा या लेखांत केली आहे. 'भारतीय लोकसत्ता', लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान', 'हिंदुसमाज संघटना- विघटना', 'इहवादी शासन', 'केसरीची त्रिमूर्ती' हे त्यांचे ग्रंथ होत. आणि 'माझे चिंतन, वैयक्तिक आणि सामाजिक', 'पराधीन सरस्वती', 'राजविद्या' हे त्यांचे निबंधसंग्रह होत. पण प्रारंभीचे ग्रंथ वगळता पुढले सर्व साहित्य १९५४ नंतरचे आहे.
 बाळशास्त्री हरदास हे प्राचीन संस्कृत वाङ्मयाचे गाढ अभ्यासक होते. वेद, महाभारत, रामायण, भागवत यांचा अभ्यास करून त्यावर, सर्व भारतात, ते व्याख्याने देत असत. ही व्याख्याने पुढे ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाली. 'वेदांतील राष्ट्रदर्शन' हा त्यांचा द्विखंडात्मक ग्रंथ त्यांच्या विद्वत्तेची साक्ष देतो. महाभारत, रामायण, भागवत, शिवछत्रपती यांवरील त्यांची व्याख्याने व ग्रंथ याचेच प्रत्यंतर देतात.
 रा. चिं. ढेरे, नरहर कुरुंदकर, वि. स. वाळिंबे, शिवाजीराव भोसले, डॉ. प्र. न. जोशी हे अलीकडच्या काळातील मोठे निबंधग्रंथकार होत. थोड्याच अवधीत त्यांनी मोठा लौकिक मिळविला आहे.
 मराठी निबंधग्रंथसाहित्य असे मोठे समृद्ध आणि वैभवशाली आहे. गेल्या शंभर सवाशे वर्षांत महाराष्ट्रात जे धार्मिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक परिवर्तन झाले त्याचे बव्हंशी श्रेय या साहित्यालाच आहे. ग्रंथ हे लोकांचे गुरू आहेत असे म्हणतात; पण वरील वर्णनावरून ते नुसते गुरूच नसून समाजातील अनेक घटनांचे प्रवर्तक, चालक व नेते आहेत, असे दिसून येते. निबंधमाला, गीतारहस्य अशा ग्रंथांची तर समाजमनावर दीर्घकाल सत्ता चालते. आणि राजे, महाराजे, दण्डसत्ताधारी, राष्ट्राध्यक्ष यांच्या सत्तेपेक्षा ही सत्ता लाखपटीने जास्त हितकर असते.

२. वृत्तपत्रे

 वृत्तपत्रे व नियतकालिके हे साहित्यही निबंध साहित्याइतकेच महत्त्वाचे आहे. सामाजिक परिवर्तनाचे श्रेय ग्रंथाइतकेच किंबहुना थोडे जास्तच वृत्तसाहित्याला आहे. वर सांगितल्यापैकी अनेक लेखकांचे निबंध प्रथम वृत्तपत्रे व नियतकालिके यांतूनच प्रसिद्ध झालेले आहेत. यावरून या साहित्याचे महत्त्व किती आहे ते कळून येईल.
 अशा या वृत्तसाहित्याचे आता वर्णन करावयाचे आहे. यांतील काही वृत्तपत्रांचे व त्यांतील लेखनाचे वर्णन मागील अनेक प्रकरणांतून या ना त्या कारणाने येऊन गेले आहे. त्याचा निर्देश फक्त येथे केला आहे. इतरांचा परिचय थोडा विस्ताराने दिला आहे. त्यातही निवड करताना विशेष प्रसिद्ध व नामांकित अशाच नियतकालिकांची निवड केली आहे. महाराष्ट्र संस्कृतीचे स्वरूप दाखविणे एवढाच यात हेतू आहे. सर्व इतिहास देणे हा नाही.
 बाळशास्त्री जांभेकर यांच्या 'दर्पण' व 'दिग्दर्शन' या वृत्तपत्रांचा उल्लेख मागे आलाच आहे. त्यांच्या कार्याचे महत्त्वही येथे स्पष्ट केले आहे. १८४१ साली भाऊ महाजन यांनी 'प्रभाकर' हे पत्र सुरू केले. लोकहितवादींची 'शतपत्रे' यातूनच प्रसिद्ध झाली. या पत्राचा विशेष म्हणजे इंग्रजी राज्यपद्धतीवर टीका प्रथम याच पत्रात सुरू झाली. १८४२ मध्ये अमेरिकन मिशनऱ्यांनी 'ज्ञानोदय' हे पत्र अमहदनगर येथे सुरू केले. ख्रिस्ती धर्माचा प्रसार हा त्याचा हेतू असून त्यात हिंदुधर्मातील रूढींवर व आचारांवर कडक टीका येत असे. पण त्यामुळे हिंदुपंडित हे अंतर्मुख होऊन स्वधर्माचा विचार करू लागले, हा या पत्राचा मोठाच उपयोग झाला.
 १८४९ साली 'ज्ञानप्रकाश' हे प्रसिद्ध वर्तमानपत्र सुरू झाले. कृष्णाजी त्र्यंबक रानडे हे त्याचे पहिले संपादक. प्रथम ते फक्त सोमवारी निघत असे. पुढे सोमवारी व गुरुवारी ते निघू लागले आणि १९०४ साली ते दैनिक पत्र झाले. कृष्णशास्त्री चिपळूणकर, लोकहितवादी, छत्रे, न्या. मू. रानडे इ. अनेक पंडित त्यात लिहीत असत. देशातील व परदेशातील वर्तमान तर त्यात येत असेच. पण शिवाय स्त्रीशिक्षण, देशी उद्योगधंदे, व्यापार, कर इ. विषयांची चर्चाही त्यात येत असे. 'ज्ञानप्रकाश' हे सुधारक पक्षाचे वर्तमानपत्र होते. 'ज्ञानप्रकाशा' नंतरचे महत्त्वाचे पत्र म्हणजे 'इंदुप्रकाश' हे होय. विष्णुशास्त्री पंडित यांनी मुंबईस ते १८६२ साली सुरू केले. त्यात इंग्रजी व मराठी असे दोन विभाग होते. विष्णुशास्त्री पंडित यांनी या पत्रात विधवाविवाह, बालविवाह, केशवपन, स्त्रीशिक्षण इ. विषयांवर आवेशपूर्ण लेख लिहिले. त्यामुळे 'इंदुप्रकाश' महाराष्ट्रात फार गाजले. सामाजिक सुधारणेच्या बाबतीत त्याची कामगिरी फार मोलाची आहे. १९०२ पासून ते दैनिक स्वरूपात निघू लागले. पण १९२५ साली ते बंद पडले. १८६३ साली वि. ना. मंडलीक यांनी 'नेटिव्ह ओपिनियन' हे इंग्रजी-मराठी पत्र सुरू केले. त्यातील लेख भारदस्त व अभ्यासपूर्ण असत.
 १८६६ मध्ये ठाणे येथे काशिनाथ धोंडो फडके यांनी 'अरुणोदय' नावाचे पत्र सुरू केले. त्यांनीच पुढे 'हिंदुपंच' हे विनोदी पत्रही सुरू केले. त्यात प्रचलित राजकीय घडामोडींची व्यंगचित्रे असत. पत्रात अभ्यासपूर्ण लेख नसत. पण जहाल राजकीय विचार असत. त्यामुळे ही दोन्ही पत्रे सरकारी रोषाला बळी पडली. ती विशेष उल्लेखनीय आहेत ती यामुळेच.
 १८७४ मध्ये विष्णुशास्त्री यांची निबंधमाला सुरू झाली. आणि महाराष्ट्रात नवयुग सुरू झाले. त्यांनीच पुढे १८८१ साली आगरकर व टिळक यांच्या साह्याने 'केसरी' पत्र सुरू केले. या केसरीपत्राला पुढे न. चिं. केळकर, कृ. प्र. खाडिलकर, ज. स. करंदीकर यांसारखे खंदे संपादक लाभले. पण त्यांची कीर्ती लो. टिळकांच्या मुळे झाली.
 १८७७ साली कोल्हापुरास 'दीनबंधू' हे साप्ताहिक भालेकर यांनी सुरू केले. म. फुले यांच्यापासून त्यांना प्रेरणा मिळाली होती. हे पत्र मागासलेल्या बहुजनसमाजाचे होते. त्यात त्यांच्याविषयी लेख येत.
 १८९८ साली शि. म. परांजपे यांनी 'काळ' हे पत्र सुरू केले. त्यात दहशतवादी क्रांतिप्रेरक लेख येत. त्यामुळे १९०८ साली ते बंद पाडण्यात आले. १९०५ साली भोपटकर बंधूनी 'भाला' हे पत्र सुरू केले. त्यातील लेख, त्यातील जहरी खवचट भाषेमुळे, त्यावेळी फार गाजले. १९१४ साली वऱ्हाडात 'महाराष्ट्र' हे पत्र सुरू झाले. त्याला इतकी कीर्ती मिळाली की त्याला वऱ्हाडातील 'केसरी' असे लोक म्हणू लागले. १९१५ साली अच्युतराव कोल्हटकर यांनी 'संदेश' हे पत्र सुरू केले. त्यांची लेखणी तेजस्वी होती. त्यामुळे त्याला लवकरच मोठी ख्याती मिळाली. महायुद्धाच्या चटकदार बातम्या आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे सुबोध विवेचन यामुळे 'संदेश' चा बोलबाला खूपच झाला. 'वत्सलावहिनीची पत्रे', 'बेटा गुलाब' यांचे त्यावेळी घरोघरी आवडीने वाचन होत असे.
 १९२० नंतर कृ. प्र. खाडिलकर हे 'केसरी' सोडून गेले. प्रथम त्यांनी 'लोकमान्य' हे दैनिक सुरू केले. पण पुढे ते सोडून त्यांनी 'नवा काळ' हे पत्र सुरू केले. ते काँग्रेसचे पत्र होते. त्यामुळे त्या काळात त्याचा प्रसार खूप झाला.
 त्यानंतरचे विशेष विख्यात पत्र म्हणजे 'सकाळ' हे होय. १ जानेवारी १९३१ साली ना. भि. परुळेकर यांनी ते पुण्यात सुरू केले. पूर्वी उपेक्षित असलेल्या अनेक क्षेत्रांत 'सकाळ'ने पाऊल टाकून बहुजन समाजाला आकर्षित केले. त्याचप्रमाणे विविध प्रकारची माहिती देण्याचा उपक्रम सुरू केल्यामुळे 'सकाळ' पत्राला लवकरच मोठे स्थान प्राप्त झाले.
 १९२० ते ३५ या काळात महाराष्ट्राच्या निरनिराळ्या जिल्ह्यांत बरीच वृत्तपत्रे निघाली. त्यातली बलवंत, ऐक्य, वैनतेय, सत्यवादी, कर्मयोगी ही उल्लेखनीय आहेत.
 १९३४ साली मुंबईला सदानंद यांनी 'नवशक्ती' हे दैनिक सुरू केले. शं. दा. जावडेकर हे त्याचे प्रथम संपादक होते. १९३७ साली कोल्हापुरास 'दैनिक पुढारी' हे पत्र सुरू झाले. १९३८ साली नाशिकला 'गावकरी' हे पत्र सुरू झाले. १९४४ साली नरकेसरी स्मारकमंडळाने नागपूरला 'तरुण भारत' हे पत्र सुरू केले. ग. त्र्यं. माडखोलकर हे प्रारंभापासून त्याचे संपादक असल्यामुळे त्याचा प्रसार झपाट्याने झाला. १९४५ साली ओगले यांनी 'महाराष्ट्र' याचे दैनिकात रूपांतर केले. पुढे ते वऱ्हाडचे मुखपत्रच झाले.
 अलीकडच्या काळात या वृत्तपत्रांच्या क्षेत्रात जयंतराव टिळक, तटणीस, शंकरराव मोरे, पां. वा. गाडगीळ, प्रभाकर पाध्ये, अनंत काणेकर, यदुनाथ थत्ते, ह. रा. महाजनी, पु. रा. बेहरे, ग. वा. बेहरे, अनंत पाटील, माधव गडकरी, त्र्यं. वि. पर्वते, बाळासाहेब पाटील, रॉय किणीकर ही नावे विशेष प्रसिद्ध आहेत.

३. नियतकालिके

 हा वृत्तपत्रांचा विचार झाला. आता इतर नियतकालिकांचा विचार करू. १८६७ साली रा. भि. गुंजीकर यांनी 'विविधज्ञानविस्तार हे मासिक काढले. त्याकाळच्या बहुतेक सर्व संशोधकांचे, पंडितांचे, अभ्याकांचे लेख त्यातून येत असत. त्यामुळे हे मासिक मराठीचे भूषण ठरले आहे. १८९० साली हरिभाऊ आपटे यांनी 'करमणूक' हे साप्ताहिक सुरू केले. हे अतिशय उच्च दर्जाचे होते. हरिभाऊंच्या कादंबऱ्या, उद्बोधक चरित्रे, उपयुक्त माहिती, स्फुट गोष्टी, टीकालेख इ. विविध प्रकारच्या वाङ्मयामुळे ते लोकप्रिय झाले. १८९१- १९०० या काळात महाराष्ट्र कोकिळ, दीनमित्र, मराठी शालापत्रक (चित्रशाळा), ग्रंथमाला इ. अनेक मासिके निघाली. त्यांतील विजापूरकरांचे कोल्हापूरचे 'ग्रंथमाला' हे उल्लेखनीय आहे. त्यातून अनेक प्रथितयश पंडितांचे निबंध व ग्रंथ बारा वर्षात प्रसिद्ध झाले. पुढच्या काळातील 'चित्रमय जगत' हे मासिक विशेष कीर्ती पावले. युद्धविषयक लेख, शास्त्रीय माहिती, इतर सामाजिक, राजकीय विषयांवरचे अभ्यासपूर्ण लेख, यामुळे हे मासिक अल्पावधीतच लोकप्रिय झाले.
 त्यानंतरच्या काळात मनोरंजन, चित्रा, मौज, सत्यकथा, धनुर्धारी, मराठा वैभव, केरळ कोकीळ, रत्नाकर, किर्लोस्कर, स्त्री, मनोहर, वसंत, हंस, वाङ्मयशोभा, सह्याद्री, समाजस्वास्थ्य अशी नियतकालिके निघाली. त्यातील 'किर्लोस्कर' मासिकांनी फार महत्त्वाची कामगिरी केली आहे. सामाजिक, धार्मिक, आर्थिक, औद्योगिक सर्व क्षेत्रांतील अत्यंत पुरोगामी लेख छापावयाचे, असा त्यांचा बाणा होता. डॉ. केतकर, सावरकर, फडके अशा थोर लेखकांचे लेख अनेक वर्षे किर्लोस्करांनी छापले. स्त्रीजीवन- सुधारणेविषयी त्यांचा कटाक्ष होता. अजूनही 'किर्लोस्कर' व 'स्त्री' या मासिकांनी आपली कीर्ती टिकवून धरली आहे. 'रत्नाकर' हे मासिक अल्पकाल जगले. पण तेवढ्यात ते विशेष कीर्ती मिळवून गेले. 'सह्याद्री' मासिकाचे काही काळ स्वतः तात्यासाहेब केळकर संपादक होते. तेव्हा त्याचा दर्जा काय असेल याची कल्पना येईलच. 'मौज,' 'सत्यकथा' यांचे नवसाहित्य छापणे हे वैशिष्ट्य होते. भागवत बंधूंना याचे श्रेय आहे. 'वसंत' ' हंस' यांनी अल्पावधीत सर्व महाराष्ट्रभर नाव मिळावले. काटदरे, अंतरकर यांनी कोणत्याही पक्षाचा पुरस्कार न करता सर्व विषयांवरील लेख व कथा प्रसिद्ध करण्याचे धोरण टेविले. त्यामुळे त्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली. 'समाजस्वास्थ्य' हे र. धों. कर्वे यांचे मासिक अगदी निराळ्या विषयाला वाहिलेले होते. संततिनियमन हा विषय उच्चारणे हे सुद्धा जेव्हा पाप होते तेव्हा ते त्याचा धडाडीने प्रचार करीत होते. आणखी असेच स्त्रीपुरुषसंबंधविषयक लेख त्या वेळी ते छापीत असत. गोमंतक त्यावेळी पारतंत्र्यात होता. तरी दादा वैद्य, हेगडे, देसाई, द. व्यं. पै, सां. घ. कंटक यांनी प्राचीप्रभा, हिंदू, सुबोध इ. नियतकालिके चालवून मराठी बाणा तेथे टिकवून धरण्याची मोलाची कामगिरी केली.

४. समीक्षा

 साहित्यसमीक्षा हाही विचारप्रधान वाङ्मयाचाच एक भाग आहे. मराठीतले पहिले साहित्यसमीक्षक म्हणजे विष्णुशास्त्री चिपळूणकर हे होत. त्यांची मुख्य कामगिरी म्हणजे पाश्चात्य समीक्षापद्धती व तत्त्वे मराठीत आणणे ही होय. 'संस्कृत कविता' या त्यांच्या पुस्तकात शाकुंतलासारख्या संस्कृत विदग्ध साहित्याचे त्यांनी या नव्या पद्धतीने समीक्षण केले आहे. तोपर्यंत मराठीला ही पद्धती ठाऊकच नव्हती. अर्थबोध करून देणे व काही अलंकार सांगणे यापलीकडे मल्लीनाथासारखे टीकाकारसुद्धा जात नसत. कथानक, स्वभावलेखन, निसर्गवर्णन, वास्तवता, कल्पनारम्यता, आत्माविष्कार, जीवनदर्शन यांचा विचारही जुने शास्त्रीपंडित करीत नसत. यासाठी विष्णुशास्त्री यानी त्यांच्यावर टीका केली आहे आणि पाश्चात्य पंडितांनी आमच्या जुन्या साहित्याचे परीक्षण केले नसते तर, आम्हांस त्याचे सौंदर्य समजलेच नसते, असे म्हटले आहे. संस्कृत कवितेच्या समीक्षणाशिवाय विष्णुशास्त्री यांनी शेक्सपियरची नाटके, मोरोपंतांची कविता यावरही टीकालेख लिहिले आहेत आणि 'विद्वत्त्व आणि कवित्व' यांसारखे तत्त्वचर्चात्मक लेखही लिहिले आहेत.
 दुसरे टीकाकार म्हणजे श्री. कृ. कोल्हटकर हे होत. त्यांच्या लेखसंग्रहात त्यांनी केलेली समीक्षणे प्रसिद्ध झाली आहेत. वा. म. जोशी यांनी टीकालेखन थोडे केले. पण त्यांची दृष्टी मार्मिक व रसग्राही असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे.
 त्याच काळातले प्रसिद्ध साहित्यविवेचक म्हणजे तात्यासाहेब केळकर हे होत. 'हास्यविनोदमीमांसा' हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. पण त्याशिवाय त्यांनी अनेक साहित्यकृतींचे परीक्षण केले आहे व अनेक संग्रहांना प्रस्तावना लिहिल्या आहेत. 'वाङ्मय म्हणजे काय' हा त्यांचा विवेचक लेख फार प्रसिद्ध आहे. रा. श्री. जोग हे साहित्यानंदाची व सौंदर्याची मीमांसा करणारे समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. 'सौंदर्यशोध व आनंदबोध' हा त्यांचा ग्रंथ विशेष गाजलेला आहे. त्यात त्यांनी आनंदाच्या स्वरूपाची मीमांसा केली आहे, काव्यानंद हा निःस्वार्थी, उदात्त व अपार्थिव आहे. असे ते मानतात. श्री. के. क्षीरसागर हे 'सत्यम्- शिवम्- सुंदरम्'चा पुरस्कार करणारे आहेत. 'टीका-विवेक' हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यांच्या मते कला हा एक स्वतंत्र अध्यात्ममार्गच आहे. वास्तववाद, सौंदर्यवाद, व अध्यात्मवाद हे त्यांच्यामते साहित्याचे त्रिनेत्रच होत. द. के. केळकर यांनी 'काव्यालोचन' हा ग्रंथ लिहून साहित्यशास्त्रात मोलाची भर घातली आहे. फडके व खांडेकर हे कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. पण ते तितकेच चोखंदळ टीकाकारही आहेत. 'प्रतिभासाधन', 'लघुकथा- तंत्र आणि मंत्र,' 'मनोहरची आकाशवाणी', 'साहित्य आणि संसार' हे फडक्यांचे टीकाग्रंथ प्रसिद्ध आहेत. फडके कलावादी म्हणून प्रसिद्ध आहेत. खांडेकरांनी, 'गडकरी- व्यक्ती आणि वाङ्मय' हे पुस्तक आणि अनेक स्फुट निबंध यांतून आपले वाङ्मयविषयक विचार मांडले आहेत. ते जीवनवादी समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत.
 वाङ्मयाच्या इतिहासाचे लेखक हे वाङ्मयाचे समीक्षक असतातच. ते नुसता इतिहास देत नाहीत. तर त्या वाङ्मयाचे मूल्यमापनही तेथे करतात. या दृष्टीने वि. ल. भावे यांची कामगिरी अद्वितीय आहे. 'महाराष्ट्र सारस्वत' हा त्यांचा ग्रंथ अत्यंत महत्वाचा आहे. प्रारंभापासून पेशवाईअखेरपर्यंतच्या मराठी सारस्वताचा इतिहास त्यांनी या ग्रंथात दिला असून संतवाङ्मय, शाहिरी वाङ्मय, गद्यसारस्वत यांची समीक्षाही केली आहे. असाच दुसरा मोठा उद्योग म्हणजे डॉ. अ. ना. देशपांडे यांचा. प्रारंभापासून आजपर्यंतच्या सर्व मराठी वाङ्मयाचा इतिहास लिहिण्याचे प्रचंड कार्य त्यांनी केले आहे आणि तसे करताना प्रत्येक लेखकाचे मूल्यमापनही केले आहे. गं. बा. सरदार यांनी अव्वल इंग्रजी काळातील मराठी गद्यवाङ्मयाचा इतिहास लिहिला असून त्याच्या मागच्या प्रेरणांची चिकित्साही केली आहे. अलीकडे पुण्याच्या साहित्य परिषदेने समग्र मराठी वाङ्मयाचा इतिहास लिहिण्याचे काम अंगावर घेऊन तीन खंड प्रसिद्धही केले आहेत. प्रा. रा. श्री. जोग त्यांचे संपादक होते. त्यात अनेक पंडितांनी भिन्न भिन्न प्रकरणे लिहिली आहेत. इतिहासाबरोबर वाङ्मयसमीक्षाही ते करतात.
 त्यानंतरचे विख्यात समीक्षक म्हणजे प्रा. डॉ रा. शं. वाळिंबे हे होत. 'साहित्याचा ध्रुवतारा' हा त्यांचा पहिला टीकाग्रंथ होय. जीवन हा ध्रुवतारा होय, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे. त्यानंतर 'वाङ्मयीन टीका', 'साहित्यमीमांसा,' 'प्राचीन भारतीय कला', 'साहित्यातील संप्रदाय' असे तत्त्वचर्चात्मक व बालकवी, गडकरी, माडखोलकर यांच्या साहित्याविषयी टीकात्मक असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले. पाश्चात्य व पौर्वात्य दोन्ही साहित्यशास्त्रांचा त्यांचा गाढ व्यासंग आहे. त्यांच्या ग्रंथांतून याचा पदोपदी प्रत्यय येतो. प्रा. वा. ल. कुळकर्णी हे एक ख्यातनाम टीकाकार आहेत. अर्थपूर्ण भावानुभव हा ललितकृतीचा अंतिम घटक त्यांनी मानला आहे. ललितकृतीचे मूल्यमापन साहित्यमूल्यांच्याच आधारे केले पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे.
 १९४५ नंतर बा. सी. मर्ढेकर यांचे नवे वाङ्मयीन सौंदर्यशास्त्र मराठीत आले. परंपरेचे धागे त्यांनी पूर्णपणे तोडून टाकले. सौंदर्य हे स्वतंत्र, स्वायत्त, आणि अंतिम मूल्य आहे, अस्तित्वाचे अंतिम घटक म्हणजे संवेदनांचे आशय आणि अर्थ हे होत इ. सिद्धांत त्यांनी मांडले. 'वाङ्मयीन महात्मता' हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. पण त्यातील लय तत्त्वाचा महात्मतेशी संबंध जोडता येत नाही. प्रभाकर पाध्ये यांनी मर्ढेकरांच्या विचारांची चिकित्सा करून कलेच्या स्वरूपाविषयी स्वतःचे काही विचार मांडले आहेत. मर्ढेकरांच्या तत्त्वप्रणालीवर घेतलेल्या काही आक्षेपांचे त्यांनी निरसनही केले आहे. आजच्या मानसशास्त्राच्या व ज्ञानतंतुशास्त्राच्या आधारे त्यांनी हे सारे विवेचन केले आहे. त्यामुळे पाध्ये यांना साहित्यमीमांसेत एक आगळे स्थान प्राप्त झाले आहे.
 याशिवाय प्रा. कुसुमावती देशपांडे, पु. शि. रेगे, दि. के. बेडेकर, शरच्चंद्र मुक्तिबोध, द. ग. गोडसे, गंगाधर गाडगीळ, बालशंकर देशपांडे यांनीही या क्षेत्रात मोलाची भर घातली आहे.

५. चरित्र-आत्मचरित्र

 यानंतर चरित्र व आत्मचरित्र या विचारप्रधान शाखेचा विचार करून हे प्रकरण व एकंदर साहित्यविवेचन संपवावयाचे आहे.
 समीक्षेप्रमाणेच मराठीत पहिले आधुनिक पद्धतीचे चरित्र विष्णुशास्त्री यांनीच लिहिले आहे. ब्रिटिशांच्या पूर्वी येथे चरित्रे लिहिली गेली आहेत, नाही असे नाही. चक्रधरांचे लीळा चरित्र, नामदेवांनी लिहिलेले ज्ञानेश्वरांचे चरित्र, सभासदाची बखर शिवचरित्र, महीपतीसारख्यांनी लिहिलेली संतचरित्रे असे हे वाङ्मय विपुल आहे. पण प्रत्येक व्यक्तीला दैवी शक्तीने संपन्न करून टाकण्याची या सर्वांची प्रवृत्ती आहे आणि त्यांनी केलेल्या चमत्कारांवर त्यांचा भर आहे. त्यांना ऐतिहासिक दृष्टी मुळीच नाही. ब्रिटिश काळात प्रारंभी अनेक पाश्चात्य व पौर्वात्य पुरुषांची चरित्रे आधुनिक पद्धतीने लिहिली गेली. पण एक तर त्यांतली बरीचशी भाषांतरवजा आहेत आणि त्यांत माहिती देण्यावरच जास्त भर आहे. चरित्रनायकाचे व्यक्तित्व, त्याचे कार्य, त्याचे मूल्यमापन, त्याच्या गुणदोषांची चिकित्सा, त्याचे समाजातील स्थान यांचा विचार त्यांत नाही. म्हणून विष्णुशास्त्री यांनी लिहिलेले 'जॉन्सनचे चरित्र' हेच मराठीतले पहिले चरित्र, असे म्हणावे लागते. त्यांनी सामान्य व्यक्तीचे चरित्र लिहिण्यामागची नवी दृष्टी कोणती तेही सांगितले आहे आणि वर सांगितल्याप्रमाणे चिकित्सा केली आहे.
 त्यानंतर मराठीत चरित्रलेखनास प्रारंभ झाला. विष्णुशास्त्री यांचे चरित्र त्यांच्या बंधूंनीच लिहिले आहे. त्यात विष्णुशास्त्री यांच्या कार्याची व गुणदोषांचीही चिकित्साही केली आहे विष्णुशास्त्री यांचा आदर्श पुढे ठेवून काशीबाई कानिटकर यांनी डॉ. आनंदीबाई जोशी यांचे चरित्र लिहिले आहे आणि चरित्रनायिकेचे अंतरंग दर्शन घडविण्यासाठी तिच्या खाजगी पत्रव्यवहाराचाही उपयोग केला आहे. ल. रा. पांगारकर हे नंतरचे मोठे चरित्रकार होत. मोरोपत, एकनाथ, ज्ञानेश्वर, तुकाराम व मुक्तेश्वर ही चरित्रे त्यांनी लिहिली. ज. र. आजगावकर व न. र. फाटक यांनीही संतचरित्रे लिहिली आहेत. वरील चरित्रांची व जुन्या प्राचीन काळच्या चरित्रांची तुलना करून पहावी म्हणजे जुने व नवे चरित्रे यांतील फरक ध्यानात येईल.
 नंतरच्या काळात न. चिं. केळकर यांनी लिहिलेले टिळकांचे त्रिखंडात्मक चरित्र, न. र. फाटक यांनी लिहिलेले रानडे यांचे चरित्र, हवालदारांचे मंडलिकांचे चरित्र, शि. ल. करंदीकरांनी लिहिलेले सावरकरांचे चरित्र, जांभेकरांचे बाळशास्त्री यांचे चरित्र ही सर्व चरित्रे नव्या चिकित्सेने लिहिलेली आहेत. गांधीयुगात नेहरू, मालवीय, सुभाषचंद्र व खुद्द महात्माजी यांची चरित्रे प्रसिद्ध झाली. यात दा. न. शिखरे यांनी लिहिलेले महात्माजींचे चरित्र विशेष उल्लेखनीय आहे. निःपक्षपाती व तटस्थ वृत्तीने हे लिहिलेले असल्यामुळे चरित्रग्रंथांत त्याला आगळे स्थान आहे.
 साहित्यिकांची चरित्रे 'चरित्र व वाङ्मय विवेचन' या नावाने प्रसिद्ध होतात. तशी फडके, खांडेकर, हरिभाऊ आपटे, अत्रे, वा. म. जोशी, गडकरी यांची चरित्रे मराठीत प्रसिद्ध झाली आहेत. गं. दे. खानोलकर यांचे या क्षेत्रातील कार्य विशेष उल्लेखनीय आहे. त्यांनी आरंभापासून आतापर्यंतच्या सर्व साहित्यिकांची चारत्रे एकंदर चार खंडांत प्रसिद्ध केली आहेत. त्यामागचे परिश्रम व त्यांची चिकित्सक दृष्टी ही पदोपदी वाचकांना जाणवते.
 याच काळात दादाभाई नौरोजी, न्या. मू तेलंग, आगरकर, गोखले, काव्हूर, गॅरिबाल्डी, मॅझिनी, नेपोलियन, लेनिन, माओ, मार्क्स या देशीविदेशी थोर पुरुषांची चरित्रे लिहिली गेली. त्यांतील भावे यांचे नेपोलियनचे चरित्र उल्लेखनीय आहे. चरित्रलेखनाचा तो आदर्श आहे असे मानले जाते.
 चरित्रवाङ्मयाला इतिहासाइतकेच किंबहुना त्याहूनही जास्त महत्त्व आहे. त्यात इतिहास तर येतोच; पण थोर व्यक्तींचे आदर्श, जे इतिहासात तपशिलाने पहावयास मिळत नाहीत, ते चरित्रात मिळतात. त्या दृष्टीने चरित्रवाङ्मय हे समाजाचे मोठे धन आहे, असे म्हटले पाहिजे.
 चरित्राइतकेच आत्मचरित्राला महत्व आहे. त्यातही इतिहास असतोच. पण तो व्यक्तीच्या दृष्टिकोनातून आलेला असतो. त्यातून काही दोष निर्माण होण्याची शक्यता असते. स्वतःच्या अनेक कृत्यांचे, वागणुकीचे, मतांचे समर्थन असे पुष्कळ वेळा आत्मचरित्राला रूप येते. पण हा दोष पत्करूनही व्यक्तीच्या जीवनाचे अंतरंग समजण्याच्या दृष्टीने व भिन्न व्यक्ती समाजाकडे, परिस्थितीकडे, घटनांकडे कोणत्या दृष्टीने पाहतात हे समजण्याच्या दृष्टीने आत्मचरित्र- वाङ्मयाला महत्त्व आहे.
 मराठीत पूर्वी आत्मचरित्र लिहिण्याची प्रथा नव्हती. संत तुकारामांनी स्वतः विषयी थोडी माहिती लिहिली आहे. पण ती अगदी त्रोटक, सातआठ अभंगांतच आहे. नाना फडणिसांनी आत्मचरित्र लिहिले आहे. ते मात्र विस्तृत असे आहे. गंगाधरशास्त्री पटवर्धन यांनीही आत्मचरित्र लिहिले आहे. हे जुन्या काळाविषयी झाले.
 अलीकडच्या काळातील पहिले आत्मचरित्र म्हणजे दादोबा पांडुरंग यांचे. ते त्यांच्या वैयक्तिक माहितीपेक्षा त्यांच्या काळाच्या माहितीच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातले ख्रिस्ती धर्मप्रचारक बाबा पदमनजी यांनी १८८४ साली आत्मचरित्र लिहिले. वासुदेव बळवंत फडके यांचे आत्मचरित्र त्यांच्या आशाआकांक्षा समजण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
 महर्षी धोंडो केशव कर्वे, धर्मानंद कोसंबी, सी. म. देवधर, माधवराव बागल आणि कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे या सर्वांनी आत्मचरित्रे लिहिली आहेत. हे सर्व समाजसुधारक होते. यांची चरित्रे वाचून तत्कालीन समाजसुधारणेचा सर्व इतिहास डोळ्यांपुढे उभा राहतो. शिवाय समाजसुधारणेकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोनही समजतो.
 स्वातंत्र्यवीर सावरकरांची, माझी जन्मठेप व त्यांचे आत्मवृत्त ही दोन्ही पुस्तके क्रांतिकारकांचे जीवन फार स्पष्टपणे समजावून देतात. न. चिं. केळकर, काकासाहेब गाडगीळ, ना. भा. खरे व ना. ग. गोरे हे सर्व राजकारणातील पुरुष- त्यांची आत्मचरित्रे त्या काळचा राजकीय इतिहास आपल्याला समजावून देतात.
 श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, ल. रा. पांगारकर, ना. सी. फडके, ग. त्र्यं. माडखोलकर ना. गो. चापेकर, काका कालेलकर या साहित्यिकांनी आत्मचरित्रे लिहिली आहेत. श्री. म. माटे व प्र. के. अत्रे यांनी आत्मचरित्रे लिहिली ती जरा निराळ्या पद्धतीने. 'मी व मला दिसलेले जग' असा त्यांचा विषय आहे. त्यामुळे त्यांच्या काळच्या, त्यांच्या जीवनाशी संबद्ध अशा सामाजिक घटनांची माहिती मिळते. वि. द. घाटे यांचे आत्मचरित्र या दृष्टीने उद्बोधक झाले आहे. 'ही माझी जीवनकहाणी बाहेरच्या व आतल्या जीवनाची कहाणी आहे,' असे त्यांनीच म्हटले आहे. के. ना. वाटवे, कृ. पां. कुळकर्णी, कृ. भा. बाबर यांचीही आत्मचरित्रे अशाच पद्धतीची आहेत.
 कलाक्षेत्रातील गोविंदराव टेंबे, गणपतराव बोडस, चिंतामणराव कोल्हटकर, केशवराव भोळे, ग. दि. माडगूळकर, सी. रामचंद्र, बाबूराव पेंढारकर यांची आत्मचरित्रे आपल्याला कलेच्या क्षेत्रात घेऊन जातात व त्या अपरिचित जगातली अनेक मर्मे उकलून दाखवितात.
 लक्ष्मीबाई टिळक, रमाबाई रानडे व पार्वतीबाई आठवले या स्त्रियांनी आत्मचरित्रे लिहिली आहेत. त्यातील लक्ष्मीबाईची 'स्मृतिचित्रे' मराठीत फार गाजली. रमाबाईंचे 'आमच्या आयुष्यातील काही आठवणी' याचेही, न्या. मू. रानडे यांचे स्वभावदर्शन घडविण्याच्या दृष्टीने आगळे महत्त्व आहे. पार्वतीबाईंचे आत्मचरित्र म्हणजे एका अशिक्षित स्त्रीने केवळ अंगच्या कर्तबगारीच्या बळावर केवढे स्थान प्राप्त करून घेतले त्याचे रोमहर्षक वर्णन आहे. कमलाबाई देशपांडे यांची 'स्मरणसाखळी' व लीलाबाई पटवर्धन यांची 'आमची अकरा वर्ष' ही दोन्ही आत्मचरित्रे उल्लेखनीय आहेत.
 मराठीतील विचारप्रधान साहित्याचा इतिहास हा असा आहे. ब्रिटिशकालात महाराष्ट्र समाजात जे आमूलाग्र परिवर्तन झाले त्याचे बव्हंशी श्रेय या विचारप्रधान माहित्यालाच आहे. ललित साहित्यात इतके सामर्थ्य नसते. हरिभाऊ आपटे यांच्यामारखा एखादाच साहित्यिक आपल्या लेखणीने समाजाला वळण लावू शकतो. एरवी सामाजिक घडामोडींचे प्रतिबिंब उमटविणे हेच कार्य ललितवाङ्मय करते. ते करताना कलेचे रंजकत्व न घालविता त्याने भोवतालच्या जीवनाचे वास्तव दर्शन घडविले व त्या जीवनावर भाष्य केले तर त्या साहित्याला फार मोठी उंची प्राप्त होते. मराठी ललित साहित्याने त्या दृष्टीने विशेष मोठे कार्य केले आहे असे वाटत नाही. विचारप्रधान वाङ्मयाने मात्र बाळशास्त्री, लोकहितवादी, विष्णुशास्त्री, आगरकर, टिळक, सावरकर अशा थोर पुरुषांच्या आश्रयाने महाराष्ट्रीय जीवनाची नवी घडी बसविली यात शंकाच नाही.
 मराठी साहित्याचे विवेचन येथे संपले. आता महाराष्ट्रीयांच्या कलोपासनेचे स्वरूप पाहावयाचे आहे.