महाराष्ट्र संस्कृती/मराठी ललित साहित्य

विकिस्रोत कडून


४०.
मराठी ललित साहित्य
 


मिशनरी
 ब्रिटिश कालातील मराठी साहित्याचा विचार करताना पहिली गोष्ट ध्यानात येते ती ही की या साहित्याचा प्रारंभ ख्रिश्चन मिशनऱ्यांनी केलेला आहे. त्यांना सर्व हिंदुस्थानात धर्मप्रसार करावयाचा होता. त्यासाठी बायबलचे सर्व भाषांत भाषांतर करणे अवश्य होते. त्यांतच त्यांनी बायबलचे मराठी भाषांतर केले. आणि या काळातल्या गद्य लेखनास प्रारंभ झाला. धर्मप्रसारासाठी त्यांना लोकांना शिक्षण द्यावयाचे होते. म्हणून त्यांनी शाळा काढल्या व त्या शाळांसाठी कमिक पुस्तके तयार केली. या पुस्तकांत अगदी प्राथमिक स्वरूपाची का होईना पण गणित, इतिहास, भूगोल ही भौतिक विद्याच होती. तेव्हा त्या शिक्षणाचा प्रारंभही या मिशनऱ्यांनीच केला. शिवाय भाषेच्या अध्ययनासाठी कोश व व्याकरण यांची आवश्यकता असते, हे जाणून तोही उद्योग त्यांनी केला. विल्यम केरी याने १८०५ साली मराठी व्याकरण व १८१० साली मराठी कोश तयार केला. तेथून पुढे लंडन मिशनरी सोसायटी, अमेरिकन मिशन, स्कॉटिश मिशन यांच्या न्यूवेल, ज्यूड्सन, यांनी असाच उद्योग केला. मोल्-स्वर्थ व कँडी यांनी मराठीचा कोश रचला तो तर प्रसिद्धच आहे रॉबर्ट निज्बिट, डॉ. जॉन विल्सन् स्टिव्हेन्सन हे १८३० च्या सुमारास हिंदुस्थानात आले व कोश, व्याकरण याबरोबरच ऋग्वेद, गीता यांची भाषांतरेही त्यांनी केली. ख्रिस्ती धर्मप्रसारार्थ 'ज्ञानोदय' नावाचे मासिकही मिशनऱ्यांनी काढले होते. या सर्वात हिंदुधर्माची निंदा मनसोक्त केलेली असे आणि देवाच्या दहा आज्ञा, प्रेषितांची कृत्ये, शाब्बाथनिरूपण इ. ख्रिस्तीधर्मप्रकरणे विवरून सांगितलेली असत. मिसेस फारॉर या बाईंनी बाबाजीची बखर, राधानाथाची गोष्ट इ. गोष्टीही लिहिल्या.
 एकंदर हिशेब पाहाता ख्रिश्चन मिशनऱ्यांनी ख्रिश्चन धर्मपंथाची ६९ पुस्तके, हिंदु- धर्मावर टीका करणारी १५-२० पुस्तके, बोधप्रद गोष्टींची १५ पुस्तके व इतर विषयांवरची २५ पुस्तके त्या काळात लिहिली. याशिवाय वर सांगितल्याप्रमाणे कोश, व्याकरण व क्रमिक पुस्तके त्यांनी लिहिली. यावरून अर्वाचीन मराठी साहित्याचा प्रारंभ त्यांनी केला, हे म्हणणे सार्थ आहे असे दिसून येईल.

जुनी चाकोरी
 यानंतर आपल्या लोकांनी ब्रिटिश काळात केलेल्या मराठी साहित्याचा विचार करावयाचा. तो करू लागताच एक विचित्र गोष्ट ध्यानात येते ती ही काव्य, कादंबरी, नाटक व कथा हे जे ललित साहित्य ते या प्रारंभीच्या काळात, म्हणजे अव्वल इंग्रजीत, जुनी पठडी सोडून गेलेच नाही. बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, दादोबा पांडुरंग, जोतिबा फुले, भाऊ महाजन इ. पंडितांचा वर उल्लेख आलेला आहेच. ब्रिटिश राज्य स्थापन झाल्यावर १०/१५ वर्षांतच यांनी नव्या पाश्चात्य प्रेरणा आत्मसात केल्या आणि धर्म, समाजरचना, राजकारण, अर्थव्यवस्था या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर मूलगामी असे विचार सांगण्यास प्रारंभ केला. पण नवलाची गोष्ट ही की काही अपवाद वगळता, काव्य, कथा, कादंबरी यांना या नव्या प्रेरणांचा स्पर्शही झालेला आढळत नाही. हे सर्व ललित लेखक त्याच वातावरणात राहात होते. वरील पंडितांच्या बरोबर कार्यही करीत होते. तरी त्यांच्या लेखनात नव्या विचारांचा मागोवा दिसू नये ही अत्यंत आश्वर्याची व खेदाची गोष्ट आहे. गद्य निबंधवाङ्मय अशा रीतीने अत्यंत वेगाने पुढे चालले असताना, हरिभाऊ आपटे, अण्णासाहेब किर्लोस्कर, व केशवसुत यांच्या काळापर्यंत, मराठी ललित वाङ्मय जुन्या इंग्रजपूर्व पठडीतूनच चालत राहावे, हे खरोखर न उलगडणारे कोडे आहे.
 (पुढे काव्य, कादंबरी, लघुकथा, विनोद व लघुनिबंध यांचे विवेचन केले आहे. नाट्यवाङ्मयाचा विचार कला विभागात केला आहे.)

१. काव्य

जुनी कविता
 असे हे जे अव्वल इंग्रजीतले ललितवाङ्मय त्याचे स्वरूप आता पाहू. त्यात प्रथम काव्याचा विचार करू.
 भास्कर दामोदर पाळंदे, परशुराम बल्लाळ गोडबोले, पांडुरंग गोविंदशास्त्री पारखी, शिवराम रामकृष्ण निजसुरे, राजा सर टी. माधवराव, कृष्णशास्त्री चिपळूणकर, विठ्ठल भगवंत लेंभे, मोरो गणेश लोंढे, गणेश जनार्दन आगाशे, गोविंद वासुदेव कानिटकर, गंगाधर रामचंद्र मोगरे, विद्याधर वामन भिडे, पांडुरंग व्यंकटेश चिंतामणी पेठकर, कान्होबा रणछोडदास कीर्तीकर हे या काळातले कवी होत.
 पाळंदे यांची 'रत्नमाला' हा ईश्वरभक्तिपर पद्यग्रंथ आहे. बालबोधामृत, नामार्थदीपिका, सीताविरह, सीतापरित्याग, या गोडबोले यांच्या कविता. गंगावर्णना, गणेशपुराण, भट्टवंशकाव्य ही बापूसाहेब कुरुंदवाडकर यांची कविता. पांडुरंगशास्त्री पारखी यांच्या काव्याची, षड्ऋतुवर्णन, कृष्णाकुमारी, बोधामृत ही नावे आहेत. विद्याधनप्रशंसा, शंकरकुबेरआख्यानकाव्य, ही निजसुरे यांची काव्ये. भक्तिसुधा, विलापलहरी, (कीर्तीकर) गंगवर्णना (पेठकर). बोधशतक, बोधामृत, बोधसुधा (लोंढे). सासरची पाठवणी, माहेरचे मूळ, मुलीचा संसार, मंगळसूत्र (आठल्ये). हेन्री फॉसेट, तुकोजीराव होळकर, कोल्हापूरचे शिवाजी महाराज, राणी व्हिक्टोरिया, रामचरित्र, सुंदोपसुंद, शिविसौहार्द- अशी ही या काळातल्या कवींची काव्ये आहेत. यांचे विवेचन करताना- यांची भाषा संस्कृतप्रचुर व दुर्बोध आहे, यांची भूमिका उपदेशकाची आहे, यांचे वळण सर्व संस्कृत पद्धतीचे आहे, ही काव्ये भावहीन, उत्कटताहीन आहेत. ही काव्ये बोजड असून अनुप्रास, यमक यांमुळे सौंदर्यशून्य झाली आहेत, यांत अर्वाचीन विचार मुळीच नाही, सृष्टिवर्णने प्रत्यक्ष अनुभूतीची नाहीत, वेदान्त, मोक्ष, पुनर्जन्म या विषयांवरच अनेकांचा भर आहे- अशी टीका टीकाकारांनी केली आहे. यांतील काही कवींनी- कानिटकर, कीर्तीकर यांनी- इंग्रजी काव्याची मराठी भाषांतरे केली आहेत, पण तरीही त्यांच्या इतर काव्यांत, पुढे केशवसुतांनी जे वळण आणले, ते नाही. मुख्य म्हणजे त्यात आत्माविष्कार किंवा आत्मलेखन नाही. भावगीत यातील एकानेही लिहिले नाही. पण ते नसते तरी फारसे बिघडत नव्हते. त्या काळी लोकहितवादी, जांभेकर, फुले, रानडे हे पंडित जे धर्म, समाज, विषयी विचार मांडीत होते ते जरी यांनी कोणी काव्यात मांडले असते, तशी कथानके निवडून त्यावर काव्य केले असते, तरी स्वकाळ त्यांनी जाणला, असे झाले असते. यांपैकी बहुतेक कवी इंग्रजी विद्या शिकलेले होते. भोवताली वरील प्रकारचे वाङ्मय लिहिले जात होते. वृत्तपत्रात हरघडी नवे विचार येत होते. तरी यांच्या काव्यात बव्हंशी त्यातले काही भेटत नाही, हे फारच खेदजनक वाटते.

केशवसुत आणि नवी कविता
 वरील सर्व कवी जुन्या पठडीतूनच लिहीत राहिल्यामुळे पाश्चात्य प्रेरणा घेऊन मराठी काव्याचे स्वरूप अंतर्बाह्य पालटून टाकणाऱ्या केशवसुतांना 'अर्वाचीन कविकुलगुरु' ही पदवी प्राप्त झाली. व्यक्तिवाद हे नव्या युगाचे लक्षण. ते आत्माविष्काराच्या रूपाने त्यांच्या काव्यात ठायीठायी दिसते. धर्म, समाज, नीती, राष्ट्र, निसर्ग, प्रेम, यांतील प्रत्येक विषयावर त्यांनी स्वतंत्रपणे आपले विचार प्रकट केलेले आहेत. 'तुतारी', 'स्फूर्ती', 'गोफण', 'नवा शिपाई' या त्यांच्या कविता या दृष्टीने अभ्यासण्याजोग्या आहेत. 'जग उलथून देण्याची भाषा' त्या प्रत्येक कवितेत आहे. बाळशास्त्री जांभेकरांच्यापासून बहुतेक सर्व लेखनाचा आशय हाच होता. तो इतके दिवस काव्यात प्रकट होत नव्हता. तो केशवसुतांनी प्रकट केला. म्हणून त्यांच्यापासून काव्याला निराळे वळण लागले. 'सतारीचे बोल', 'भृंग', 'पुष्पाप्रत', 'वातचक्र', 'झपूर्झा', 'म्हातारी' या प्रत्येक काव्यात केशवसुतांचे आत्मलेखन आढळते. कवीची वृत्ती दर वेळी, निबंधकाराप्रमाणे सारखीच असते असे नाही. भिन्नभिन्न कवितांत त्याच्या मनाच्या भिन्न भावना प्रगट होत असतात. यालाच आत्मलेखन किंवा आत्माविष्कार असे म्हणतात. काव्यविषयक काही कविता लिहून, 'कविता अशी असावी किंवा नसावी', हे सांगणारे तुम्ही कोण ? असा परखड सवाल केशवसुतांनी केला आहे. आणि काव्यविषयक सर्व रूढी व संकेत झुगारून देऊन त्यांनी आपले काव्य लिहिले आहे. मराठी काव्यात नवयुग अवतरले असे लोक म्हणू लागले, ते यामुळेच. रेव्हरंड टिळक, रेंदाळकर, विनायक, गोविंदाग्रज, बी, तांबे, बालकवी, दत्त, कवी गोविंद, सावरकर हे सर्व या नव्या युगातलेच कवी. प्रत्येकाची वृत्ती स्वतंत्र आहे. प्रत्येकाच्या काव्याचे रूप निराळे आहे. भावगीते, प्रणयगीते, निसर्गगीते जवळजवळ प्रत्येकाने लिहिली आहेत. तरी सर्वांचे वळण केशवसुती आहे यात शंका नाही.
 रेव्हरंड टिळक यांनी 'वनवासी फूल', 'सुशीला', 'बापाचे अश्रू', 'माझी भार्या' अशी चार दीर्घ काव्ये लिहिली आहेत. पण व्यक्तिवाद, आत्माविष्कार यांनी प्रत्येक काव्य अलंकृत झालेले आहे. भक्ती, स्त्रीस्वातंत्र्य, रूढिभंजन या विषयांवर त्यांनी अनेक भावगीते लिहिली आहेत. शिंग, गुलाब, पाखरा येशिल का परतून, केवढे क्रौर्य हे, ही त्यांची काव्ये प्रसिद्ध आहेत. भक्ती, वैराग्य, क्षणभंगुरता, श्रद्धा ही त्यांच्याही काव्यात आहेत. पण त्यामुळे ही चाकोरी जुनी आहे, असे क्षणभरसुद्धा वाटत नाही.
 विनायक है राष्ट्रीय कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. वर्तमानापेक्षा भूतकालातच ते जास्त रमत. पन्ना, पद्मिनी, दुर्गावती, संयोगिता, वीरमती ही त्यांची काव्ये राष्ट्रीय विचारांनी रसरसलेली आहेत. 'स्त्री आणि पुरुष', 'प्रीती निमाली तर', 'सुवास', 'दोन मार्ग', अशी भावगीतात्मक रचनाही त्यांनी केली आहे.
 'आपण केशवसुत संप्रदायातील आहोत' असे रेंदाळकरांनी स्वतःच सांगितलेले आहे. रूढीवर हल्ला, सामाजिक सुधारणा, निसर्गाचे तत्त्वज्ञान हे यांच्या काव्यात अनेक ठिकाणी दिसून येते. तीव्र निराशावाद हे यांच्या काव्याचे प्रधान लक्षण आहे. 'गिधाड ', 'निवडुंगातून सुटका' इ. काव्यांवरून हे दिसेल.
 गोविंदाग्रज-गडकरी हे स्वतःला केशवसुतांचा चेला म्हणवितात. 'तुतारी मंडळ' ही त्यांनी काढले होते. पण त्यांची कविता केशवसुतांहून खूपच निराळी आहे. बाह्य सजावटीकडे त्यांनी जास्त लक्ष दिले आहे. त्यांच्या प्रणयगीतांत निराशा ओतप्रोत भरली आहे. गोफ, फुले विचिली पण, प्रेम आणि मरण, घुबड या कविता त्या प्रकारच्या आहेत. गुलाबी कोडे, गोड निराशा, विरामचिन्हे, घुंगुरवाळा या कवितांतून त्यांची असामान्य कल्पकता दिसून येते. स्मशानातले गाणे, दसरा यांतून त्यांनी सामाजिक रूढींवर तीव्र हल्ला केलेला दिसतो.
 बालकवी हे निसर्गाचे कवी अशी त्यांची प्रसिद्धी आहे. अरुण, संध्यातारक, संध्यारजनी, निर्झर, फुलराणी ही त्यांची काव्ये यासाठीच प्रसिद्ध आहेत. सर्वत्र निसर्गावर मानवी भावनांचा त्यांनी आरोप केला आहे. त्यामुळे या कवितांना शोभा आली आहे. फुलराणीमधील मुग्ध प्रणयाचा रंग हा अगदी बिनतोड असा आहे. काही कवितांत त्यांनी प्रेषितांचे उसने अवसान आणलेले दिसते. ते अगदी कृत्रिम आहे. समाजाचे, भोवतालच्या परिस्थितीचे कसलेही अवलोकन त्यांनी केलेले नव्हते. स्वतःचे एक विश्व निर्माण करून त्यातच ते रमून राहिले. त्यामुळे त्यांच्या काव्याला व्यापकता, विविधता आली नाही. ते शेवटपर्यंत बालच राहिले.
 'बी' कवी यांनी वृत्तरचना व बाह्यवेश या दृष्टीने केशवसुतांचे अनुकरण केले नसले तरी त्यांची पठडी तीच आहे. कवी आणि काव्य, रूढीविरुद्ध बंड, गूढ गुंजन, विचारप्राधान्य हे सर्व तसेच आहे. डंका, तीव्र जाणीव, चाफा या त्यांच्या कविता प्रसिद्ध आहेत.
 या सर्व कवींत भास्करराव तांबे यांचे स्थान अगदी वेगळे आहे. सृष्टीत सर्वत्र सौंदर्य कोंदून भरले आहे, अशी त्यांची श्रद्धा होती आणि ती त्यांच्या काव्यात पदोपदी प्रकट होते. त्यांच्या प्रणयकाव्यात निराशेचा सूर चुकूनसुद्धा येत नाही. मरण ही कल्पना त्यांना फार मोह घालते. इतकी की 'मरणातून खरोखर जग जगते', असे ते म्हणतात. 'कुणि कोडे माझे उकलिल का, घट भरे प्रवाही, घट तिचा रिकामा' या त्यांच्या काव्यातून त्यांचे प्रेमतत्त्वज्ञान व्यक्त होते. 'रुद्रास आवाहन' ही त्यांची कविता अगदी निराळी आहे. क्रांतीला प्रेरणा देणारी ही कविता आहे. पण अशी कविता त्यांनी फिरून लिहिली नाही.
 सावरकर आणि कवी गोविंद यांचा वर्ग निराळा आहे. त्यांची कविता ती खरी राष्ट्रीय कविता होय. सावरकरांच्या मित्रमेळाव्यात सामील झाल्यावर कवी गोविंद यांनी लिहिलेल्या कविता अत्यंत ओजस्वी झाल्या. 'रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले ?' ही त्यांची कविता त्या वेळी महाराष्ट्रात सर्वत्र दुमदुमत होती.
 सावरकरांची कविता सर्वच दृष्टींनी भव्य दिव्य अशी आहे. मूर्ती दुजी ती, सप्तर्षी, मरणोन्मुख शय्येवर या त्यांच्या कविता राष्ट्रभावनेने रसरसलेल्या आहेत. रानफुले हा त्यांच्या दीर्घ काव्यांचा संग्रह आहे. 'गोमंतक' हे त्यांचे संकल्पित महाकाव्य होते. 'सागरास', 'सान्त्वन' या त्यांच्या लहान कविता मराठीत अमर झाल्या आहेत. १९०९ साली त्यांचे वडील बंधू गणेशपंत यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. तेव्हा आपल्या वहिनींना त्यांनी कविता लिहून त्यांचे 'सान्त्वन' केले. 'अमर होय ती वंशलता । निर्वंश जिचा देवाकरिता' या त्यातल्याच ओळी आहेत. 'माझे मृत्युपत्र' या कवितेतील 'की घेतले व्रत, न हे अम्ही अंधतेने' या ओळी महाराष्ट्रात प्रत्येक देशभक्ताच्या मुखी असतात. 'राष्ट्रीय काव्य' म्हणजे काय ते या कवितांवरून कळून येईल.

रविकिरण मंडळ
 १९२० च्या सुमारास केशवसुती संप्रदाय संपुष्टात आला व 'रविकिरण मंडळा'चे युग सुरू झाले. या मंडळात सात कवी होते. पण माधव जूलियन, यशवंत व गिरीश हे तीनच कवी त्यांतून गाजले. या कवींचे वळण केशवसुतीच होते. पण प्रेम, निसर्ग, जानपद, विडंबन, गूढगुंजन इ शाखांचा विस्तार यांनी विपुल केला. पण सामाजिकतेपेक्षा वैयक्तिक जीवनाकडे त्यांचे लक्ष जास्त होते.
 तुटलेले दुवे, गज्जलांजली, स्वप्नरंजन, मधुलहरी ही माधव जूलियन यांची स्फुट कविता होय आणि सुधारक, विरहतरंग, नकुलालंकार ही त्यांची दीर्घ काव्ये होत. माधवराव फारशीचे जाडे अभ्यासक होते. तेव्हा त्यांनी मराठी काव्याला बरेच फारशी वळण लावले असल्यास त्यात नवल नाही. गज्जल, रुबाया या त्यांनी मराठीत रूढ केल्या व किती तरी फारशी शब्द मराठीत रूढ केले. सुधारक, नकुलालंकार या त्यांच्या काव्यात सामाजिक रूढीवर उपहासात्मक टीका आहे, तर त्यांची प्रेमगीते निराशेने व्यापलेली आहेत.
 कवी यशवंत यांचे संशोधन, भावमंथन, यशोगंध, यशोनिधी, हे स्फुट गीतांचे संग्रह असून बन्दीशाळा, जयमंगला, शिवराय महाकाव्य ही दीर्घ काव्ये आहेत. उत्कट तळमळ, बंडखोरी, भावनोत्कटता हे त्यांच्या काव्याचे प्रधान गुण होत. देहत्वाचा पूल, तुरुंगाच्या दारात, अस्थीचा सवाल ही त्यांची राष्ट्रीय भावगीते आहेत. जीवनाविषयी त्यांची दृष्टी स्थिर असून आशा आणि निराशा या दोन्ही वृत्ती त्यांच्या काव्यातून प्रकट होतात. जानपदगीते, शिशुगिते, प्रेमगीते, निसर्गगीते इ विविध प्रकारची कविता त्यांनी लिहिलेली असून अशी गीते गाऊन दाखवून काव्यगानाची प्रथा त्यानी रूढ केली.
 गिरीश हे रविकिरण मंडळातील तिसरे प्रसिद्ध कवी. कांचनगंगा, फलभार, मानसमेघ ही त्यांची स्फुट कविता आणि अभागी कमल, आंबराई, कला ही दीर्घ काव्ये होत. यांच्या कवितेत सुधारणावाद आहे, पण क्रांतिवाद नाही. यांनी जानपदगीते, निसर्गगीते इ. विविध प्रकारचे काव्य लिहिले आहे.

समाजाभिमुख
 १९३५ च्या सुमारास मराठी कविता वैयक्तिक सुखदुःखे, प्रेमगीते, ठरीव ठशाची ग्रामगीते यांतच गुंतून पडली होती. स्वातंत्र्य, पारतंत्र्य, क्रांती, धनिकशाहीचा जुलूम, दलिताची विपन्नावस्था, हे विषय तिने वर्ज्यच मानले होते. या कोंडीतून तिला कुसुमाग्रज, अनिल, कांत, वसंत बापट, पु. शि. रेगे यांनी मुक्त केले. यांपैकी कुसुमाग्रज हे अग्रगण्य होत. 'गर्जा क्रांतीचा जयजयकार' ही कविता आपल्याला एकदम व्यापक राष्ट्रीय पातळीवर घेऊन जाते. हिमलाट, आगगाडी आणि जमीन, बळी, लिलाव इ. कविता पूर्णपणे समाजाभिमुख असून अन्याय, जुलूम, दलितांची दुःखे यांना वाचा फोडणाऱ्या आहेत. म्हणून खांडेकरांनी त्यांचा 'मानवतावादी कवी' असा गौरव केला आहे. कवी अनिल यांची कविता अशीच समाजाभिमुख आहे. फुलवात, भन्नमूर्ती, निर्वासित चिनी मुलास, पेर्तेव्हा हे त्यांचे काव्य होय. त्यातील फुलवात हा काव्यसंग्रह प्रेमविषयक व व्यक्तिगत कवितांचा आहे. पण 'भग्नमूर्ती' या खंडकाव्याची भूमिका व्यापक राष्ट्राभिमुख अशी आहे. समाजातील संस्कृती आधी नष्ट होते आणि मग हळूहळू त्याचा अधःपात होऊन त्याचे संरक्षणसामर्थ्यही नष्ट होते व देशाची मूर्ती भग्न होते, असा या कवितेचा आशय आहे. वा. रा. कांत हे कुसुमाग्रजा- प्रमाणेच क्रांतीचे उद्गाते आहेत. 'रुद्रवीणा' हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. रुद्राने तृतीय नेत्र उघडून अन्याय, असमता यांच्यावर तांडव करून त्यांचा नाश करावा, असे ते सांगतात. नवे वर्ष, आशिया, गाशिल का हे गान, यांसारख्या कवितांतून, मानव्याची सध्या जी विटंबना चालू आहे तिच्याबद्दल त्वेष व्यक्त केला आहे. वसंत बापट हेही समाजाभिमुख कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. 'झेलमचे अश्रू' ही कविता देशाच्या विभाजनाबद्दल तीव्र त्वेष व्यक्त करते. विंदा करंदीकर यांच्या कवितेचा थाट गंभीर आणि अभिव्यक्ती मौलिक आहे. त्यांची 'स्वेदगंगा' ही वाचकाला केशवसुतांच्या तुतारीची आठवण करून देते. मंगेश पाडगावकर यांनी आपल्या कवितांतून आपली सर्व सुधारणा उथळ असून दिव्य, भव्य गोष्टींचे आपले आकर्षण कमी होत आहे, हे चांगले व्यक्त केले आहे.
 बा. भ. बोरकर हे सौंदर्याचे उपासक व त्याच्या आस्वादात रमणारे कवी आहेत. संतवाङ्मयाचे व गोमंतकीय लोकगीतांचे संस्कार त्यांच्या कवितांत दिसून येतात. गेयता, कोमलता, माधुर्य, लालित्य आणि अध्यात्म यातून त्यांच्या काव्याची मूर्त साकारली आहे. ग. दि. माडगूळकर यांचे सुगंधी वीणा, जोगिया, चैत्रबन इ. काव्यसंग्रह प्रसिद्ध असले तरी त्यांना खरी प्रसिद्धी मिळवून दिली ती 'गीतरामायणा'ने. रामाचे ते दिव्य, अलौकिक चरित्र त्यांनी त्यातून आपल्यापुढे मूर्तिमंत उभे केले आहे. मनमोहन नातू हे लोककवी म्हणून प्रसिद्ध आहेत. 'युगायुगाचे सहप्रवासी' हे हिंदु-मुस्लिम ऐक्यावर त्यांनी लिहिलेले काव्य प्रतिपाद्य विषय व प्रतिपादन शैली या दोन्ही दृष्टींनी यशस्वी ठरले आहे.

कवयित्री
 आधुनिक मराठी काव्यक्षेत्रात संजीवनी मराठे, लक्ष्मीबाई टिळक, बहिणाबाई चौधरी, इंदिरा संत व शांता शेळके या विशेष प्रसिद्ध आहेत. लक्ष्मीबाई टिळक यांनी स्त्रीगीतांचे अंतर्बाह्य स्वरूप पार बदलून टाकले. राष्ट्रीय, अध्यात्मपर, सामाजिक, अशी विविध प्रकारची कविता त्यांनी लिहिली आहे. बहिणाबाई या शेतकरी कुटुंबातील एक निरक्षर कवयित्री. पण त्यांनी आशयघन असे सुंदर काव्य निर्माण केले आहे. चूल, मूल, तवा, जाते, फुंकणी, कापणी, मळणी या विषयांतूनच त्यांनी गंभीर, तात्त्विक विचार प्रगट केले आहेत. 'संसार हे लोढणं नसून गळ्यातला हार आहे' हा त्यांचा विचार 'अरे संसार संसार' या कवितेत आहे. संजीवनी मराठे या 'काव्यकोकिळा' म्हणून गौरविल्या गेल्या आहेत. प्रेमपर, वात्सल्यपर व ईश्वरपर असे त्यांच्या कवितेचे तीन मुख्य प्रकार आहेत. सत्यशिवसुंदराची पूजा ही त्यांच्या कवितेची खरी शोभा आहे. इंदिरा संत यांच्या काव्याचा मुख्य विषय प्रेम हाच आहे. प्रेमळ व कलाभिज्ञ पतीविषयी अंतःकरणात उठणाऱ्या अनेकविध सूक्ष्म लहरी त्यांच्या काव्यात दिसून येतात. त्यांची कविता साधी व अकृत्रिम असून रंग व रंगच्छटा यांचे त्यांना विशेष आकर्षण आहे. शांता शेळके या प्रथितयश कवयित्री आहेत. सहज, सुश्लिष्ट व प्रसन्न रचना हा त्यांचा मुख्य गुण आहे. पद्मा गोळे यांचे प्रीतिपथावर, नीहार इ. कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. स्त्रीच्या अंतरातील प्रेमाच्या विविध पैलूंची विपुल चित्रे त्यांनी रेखाटली आहेत. नव्या युगातील स्त्रीच्या तेजस्वी आशा-आकांक्षाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
 १९५० पासून 'नवकाव्य' म्हणून आज जे प्रसिद्ध आहे त्याला प्रारंभ झाला. मर्ढेकर हे त्यांचे मुख्य प्रवर्तक. पण आपला हा इतिहास १९४७ पर्यंतचाच असल्यामुळे या वादग्रस्त विषयाचे येथे विवेचन केलेले नाही.

२. कादंबरी

हरिभाऊ- युग
 १८३० पासून पन्नास वर्षांतील एकंदर ललित साहित्याविषयी जे प्रारंभी लिहिले आहे ते जसे काव्यांविषयी तसेच कादंबरीविषयी खरे आहे. पाश्चात्य विद्येमुळे जी नवी दृष्टी प्राप्त झाली होती तिची प्रतीती या कादंवऱ्यांत येत नाही. बाबा पदमनजी या ख्रिश्चन गृहस्थाने १८५७ साली 'यमुनापर्यटन' ही कादंबरी लिहिली. हीच मराठीतील पहिली कादंबरी. विधवांच्या दुःखाचे तीत वर्णन आहे. पण कथानक, रचनासौंदर्य असे तीत काही नाही. पुढील मुक्तामाला, मंजुघोषा, मित्रचंद्र, विश्वासराव या कादंबऱ्या तर पुराणपद्धतीच्याच आहेत. थोडा सामाजिक विषय आणल्यासारखे लेखक मधूनच दाखवितात. पण सगळा खेळ अद्भुताचा आहे. प्रत्यक्ष सामाजिक परिस्थितीशी त्याचा काही संबंध नाही. मराठीत कादंबरी साहित्याला खरा प्रारंभ केला तो हरिभाऊ आपटे यांनी 'आजकालच्या गोष्टी' असेच ते आपल्या कादंबऱ्यांना म्हणत असत. गणपतराव, मधली स्थिती, पण लक्षात कोण घेतो, मी, मायेचा बाजार, भयंकर दिव्य इ. दहा सामाजिक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांतील 'पण लक्षात कोण घेतो' व 'मी' या मराठीत अमर झाल्या आहेत. कठोर वास्तववाद व थोर ध्येयवाद यांचे मोठे मधुर मिश्रण त्यांत पाहावयास मिळते. 'मी' म्हणजे जो भाऊ त्याचे जीवन प्रत्यक्ष आपल्याभोवती घडत आहे असे वाटावे, इतके ते वास्तववादी आहे आणि आजन्म ब्रह्मचारी राहून समाजसेवेला अर्पण करून घेण्याचा त्याचा ध्येयवाद उत्तुंग असा आहे. हरिभाऊंनी मध्यवर्गीय जीवनावरच सर्व कादंबऱ्या लिहिल्या. पण सर्व मानवी जीवनाचे हृदगत त्यांतून प्रकट झालेले आहे. स्वभावलेखन, सुलभ घरगुती भाषा, चटकदार संवाद, वेधक कथन ही साहित्याची सर्व भूषणे त्यांच्या कादंबऱ्यांतून दिसून येतात. हरिभाऊंच्या नंतरचे दुसरे मोठे कादंबरीकार म्हणजे वामन मल्हार जोशी हे होत. रागिणी, आश्रम हरिणी, नलिनी, इंदू काळे- सरला भोळे व सुशीलेचा देव या पाच कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांपैकी प्रत्येकीत प्रवृत्ती निवृत्ती, अध्यात्म, देव अशासारख्या विषयांवर गहन गंभीर, तात्त्विक चर्चा केलेली आहे. लालित्याकडे वामनरावांनी द्यावे तितके लक्ष दिलेले नाही. तरीही त्यांच्या कादंबऱ्या प्रारंभापासूनच लोकप्रिय झाल्या आणि त्यांना मराठीत अढळ असे स्थान मिळाले. तिसरे मोठे कादंबरीकर म्हणजे ना. सी. फडके होत. जादूगार, दौलत, उद्धार, अटकेपार या कादंबऱ्यांनी त्यांना अपार कीर्ती मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी ६०- ७० कादंबऱ्या लिहिल्या. पण त्यांच्या कादंबऱ्यांचा जो ठसा एकदा ठरून गेला तो गेला. पुढच्या कादंबऱ्यांत नावीन्य असे फारसे उरले नाही. पण कथानकाची रचना, स्वभावलेखन, प्रसंगनिर्मिती, भाषासौष्ठव, चित्तवेधक निवेदन, रहस्य इ. कलागुणांनी त्यांच्या कादंबऱ्या इतक्या संपन्न आहेत की मराठी भाषा त्यांची कायमची ऋणी राहील. खांडेकरांनी १९३० साली हृदयाची हाक ही पहिली कादंबरी लिहिली. त्या नंतर कांचनमृग, उल्का, दोन ध्रुव, हिरवा चाफा, पांढरे ढग, रिकामा देव्हारा, क्रौंचवध, ययाती इ. अनेक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांच्या नायकांच्या समोर नेहमी उत्तुंग ध्येयवाद असतो. दीनदलितांविषयी त्यांना वाटणारा जिव्हाळा त्यांच्या प्रत्येक कादंबरीत प्रकट होतो. ते जीवनवादी कलाकार आहेत. त्यावेळी जीवनवाद व कलावाद हा विषय फार चर्चिला जात होता. त्यातील पहिल्याचे खांडेकर व दुसऱ्याचे फडके हे अध्वर्यू होते. फडके-खांडेकरांच्या बरोबर ज्यांचे नाव नेहमी येते ते कादंबरीकार म्हणजे माडखोलकर हे होत. मुक्तात्मा, भंगलेले देऊळ, शाप, कांता, दुहेरी जीवन, नागकन्या इ. कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. 'विवाहित स्त्रीच्या जीवनात पतीच्या पत्नीद्रोहामुळे उत्पन्न होणारा एकच एक प्रश्न त्यांनी आपल्या कादंबऱ्यातून विवेचिला आहे,' असे अ. ना. देशपांडे म्हणतात. क्रांतिकारकांबद्दल आकर्षण आणि गांधीवादाचा अधिक्षेप त्यांच्या कादंबऱ्यात नित्य दिसून येतो. म्हणून त्यांना राजकीय कादंबरीकार म्हणतात. पण त्या वेळच्या खऱ्या क्रांतिकारकांचे दर्शन त्यांच्या कादंबरीत मुळीच घडत नाही. गांधीवादाचे तर नाहीच नाही. डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या सर्वच कादंबऱ्या विचारप्रधान व समस्यापूर्ण अशा आहेत. गोंडवनातील प्रियंवदा, परागंदा, आशावादी, ब्राह्मणकन्या, विचक्षणा या त्यांच्या कादंबऱ्या होत. यातील 'ब्राह्मणकन्या' ही त्या वेळी फार गाजली. सुशिक्षित समाजाला तिने आपल्या नीतिअनीतिविषयक कल्पनांचा फेरविचार करावयास लावले, असे वा. म. जोशी यांनी म्हटले आहे. 'विधवाकुमारी' ही वरेरकरांची कादंबरी त्या वेळी अतिशय लोकप्रिय झाली होती. परतभेट, कुलदैवत इ. त्यांच्या कादंबऱ्या सहेतुक व लोक, शिक्षणात्मक आहेत.
 दत्त रघुनाथ कवठेकर यांनी साध्या कौटुंबिक गोष्टी अत्यंत सहृदयतेने सांगितल्या आहेत. त्यामुळे अपुरा डाव, रेशमाच्या गाठी, उमाडलेल्या भावना या त्यांच्या कादंबऱ्या लोकप्रिय झाल्या आहेत. श्री. ना. पेंडसे हे प्रादेशिक कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. एल्गार, हद्दपार, गारंबीचा बापू, रथचक्र इ. त्यांच्या कादंबऱ्या वास्तवपूर्ण स्वभावरेखन, नाट्यमय प्रसंग, रम्य संवाद व प्रत्ययकारी निसर्ग चित्रण या गुणांनी संपन्न आहेत. कोकणातील जीवन हा विषय त्यांनी निवडला असून त्याचे उत्तम दर्शन या कादंबऱ्यांतून घडविले आहे. सानेगुरुजी यांच्या 'श्यामच्या आई'ने त्यांना उदंड कीर्ती मिळवून दिली. त्यामानाने, कठीण कसोटी, पराधीन, धडपडणारी मुले या कादंबऱ्या तितक्या गाजल्या नाहीत. त्यांनी आपल्या बहुतेक कादंबऱ्या तुरुंगात लिहिल्या असून देशप्रेमाने त्या ओतप्रोत भरलेल्या आहेत.

स्त्री कादंबरीकार
 गीता साने यांनी, निखळलेली हिरकणी, वठलेला वृक्ष, लतिका, माळरानात इ. कादंबऱ्यांतून स्त्रीजीवनातील समस्या चांगल्या रीतीने हाताळल्या आहेत. विभावरी शिरूरकर (सौ. मालती बेडेकर) यांच्या, हिंदोळ्यावर व विरलेले स्वप्न या कादंबऱ्यांत बाह्य घटनांपेक्षा मानसिक आंदोलनांना विशेष महत्त्व आहे. त्यांचा पवित्रा आक्रमक असल्यामुळे त्या वेळी त्यांच्या लेखनावरून मोठेच वादळ माजले होते. सौ. मालतीबाई दांडेकर यांच्या मातृमंदिर, तेजस्विनी, वज्रलेख इ. कादंबऱ्यांतून मध्यमवर्गीय कौटुंबिक जीवनातील समस्यांचे सहृदयतेने चित्रण केलेले आहे.
 ना. ह. आपटे, वि. वि. बोकील, ना. वि. कुलकर्णी, रामतनय, (ग. रा. वाळिंबे) पु. भा. भावे, दिघे, शांताबाई नाशिककर, कुमुदिनी प्रभावळकर यांनीही मराठी कादंबरी वाङ्मयात मोलाची भर घातली आहे.

ऐतिहासिक कादंबरी
 यानंतर ऐतिहासिक कादंबरीचा विचार करावयाचा. गुंजीकर यांनी १८७१ साली शिवशाहीवर लिहिलेली 'मोचनगड' ही मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी होय. पण सामाजिक कादंबरीप्रमाणेच ऐतिहासिक कादंबरीतही सर्वश्रेष्ठ स्थान हरिभाऊंचेच आहे. 'उषःकाल' ही त्यांची कादंबरी अगदी अतुल अशी आहे. छत्रपतींनी केलेल्या क्रांतीचे सम्यक रूप तीत आपणांस पहावयास मिळते. आकाराने लहान, पण तशीच यशस्वी अशी त्यांची दुसरी कादंबरी म्हणजे 'गड आला पण सिंह गेला' ही होय. याशिवाय सूर्योदय, सूर्यग्रहण, वज्राघात, कालकूट या ऐतिहासिक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत. पण त्या तितक्या यशस्वी झाल्या नाहीत. दुसरे या क्षेत्रातले लेखक म्हणजे नाथमाधव हे होत. स्वराज्याचा श्रीगणेशा, स्वराज्याचा कारभार, स्वराज्यावरील संकट इ शिवशाहीवरील त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. ना. ह. आपटे यांची अजिंक्यतारा ही कादंबरी मराठ्यांच्या इतिहासावर असून 'रजपुतांचा भीष्म' व 'लांच्छित चंद्रमा' या दोन रजपुतांच्या इतिहासावरील आहेत हडप यांनी ऐतिहासिक कादंबरीच्या दोन माला लिहिल्या. कादंबरीमय पेशवाई व आंग्लाई या त्या माला होत. 'दुर्दैवी रंगू' ही चिं. वि. वैद्य यांची व विंध्याचल ही परांजपे यांची- या दोन कादंबऱ्या त्या वेळी खूपच गाजल्या. याशिवाय छत्रसाल, सम्राट अशोक, गुर्जरवीर अनहील, अस्तनीतील निखारा, वसईचा रणसंग्राम, दोनशे वर्षांपूर्वी, याही कादंबऱ्या त्या काळी लोकप्रिय झाल्या होत्या. या सर्वांमध्ये ऐतिहासिक काळात प्रत्यक्ष शिरून त्या काळाचे चित्रण करण्यात जी सिद्धी हरिभाऊंना मिळाली होती ती इतर कोणाला लाभलेली नव्हती. तरीही मराठे, रजपूत, गुर्जर यांचा इतिहास कादंबरीरूपाने लिहून आपल्या लोकांचा स्वाभिमान या लेखकांनी जागृत केला हे त्यांचे ऋण मोठे आहे यात शंका नाही.
 मध्यंतरी ऐतिहासिक कादंबरी जरा मागे पडली होती. अलीकडे रणजित देसाई, इनामदार यांनी तिचे उज्जीवन केले आहे यात देसाई यांच्या 'स्वामी' या कादंबरीने अपूर्व यश मिळविले. माधवराव पेशवे यांचे जीवन या कादंबरीत वर्णिले असून या थोर पुरुषाला मूर्त रूप देण्यात देसाई पूर्णपणे यशस्वी झाले आहेत.

३. लघुकथा

 लघुकथेच्या क्षेत्रातही प्रारंभ करण्याचा मान हरिभाऊंचाच आहे. त्यांच्या आधी स. का. छत्रे यांनी 'बाळमित्र' मालेतून अनेक बोधकथा लिहिल्या व इतर काहींनी बकासुराची बखर, नलराजाची बखर अशा पौराणिक गोष्टी लिहिल्या. पण भोवतालच्या सामाजिक जीवनावर कथा प्रथम लिहिल्या त्या हरिभाऊनी. १८९० साली त्यांनी 'करमणूक' हे नियतकालिक काढले व त्यात मध्यमवर्गीय कौटुंबिक जीवनावर अनेक कथा लिहिल्या. त्या पुढे स्फुट गोष्टी म्हणून प्रसिद्ध झाल्या. मात्र कादंबरीच्या क्षेत्रात त्यांना जे यश मिळाले ते लघुकथेच्या क्षेत्रात मिळाले नाही. या कथांत केवळ वृत्तकथन असे, संवाद फारसे नसत, आणि मुख्य म्हणजे नीती, सदाचार यांच्या उपदेशावर फार भर असे. १९२६ साली फडके-खांडेकरांचे युग सुरू होईपर्यंत साधारणतः सर्वच लेखकांच्या कथांचे असे रूप होते.
 या सर्वांत अग्रगण्य लेखक म्हणजे वि. सी. गुर्जर हे होत. स्वतंत्र व अनुवादित अशा शेकडो कथा त्यांनी लिहिल्या. त्यांच्या कथा प्रामुख्याने घटनाप्रधान आहेत. कोणते तरी रहस्य निर्माण करावयाचे व त्याला अचानक कलाटणी देऊन शेवट गोड करावयाचा हे त्यांचे तंत्र होते. 'घातपात', 'जगदंबा', 'दिपोटी', 'पुरुषांची जात', 'बायकांची जात', 'शेवटचे हास्य' या त्यांच्या कथा उल्लेखनीय आहेत. कृ. के. गोखले, वा. म. जोशी, काशीताई कानिटकर, गिरिजाबाई केळकर, आनंदीबाई शिर्के, सहकारी कृष्ण, ना. ह. आपटे हे त्या काळातले आणखी लेखक होत.
 यांत दिवाकर कृष्ण यांचा स्वतंत्र उल्लेख केला पाहिजे. नव्या-जुन्याच्या सांध्यावरचे हे लेखक आहेत. घटनाप्रधान लघुकथेला स्वभाव प्रधान वळण देण्याचे महत्त्वाचे कार्य यांनी केले. 'समाधी व इतर सहा गोष्टी' या त्यांच्या संग्रहावरून हे ध्यानात येईल. 'संकष्टी चतुर्थी', 'मृणालिनीचे लावण्य', 'समाधी' या त्यांच्या गोष्टी या दृष्टीने अभ्यसनीय आहेत.

फडके-खांडेकर
 १९२६ ते १९४५ हे मराठी लघुकथेचे दुसरे युग होय. ना. सी. फडके हे यातील सर्वश्रेष्ठ लेखक होत. त्यांनी नवी लघुकथा लिहिली व तिचे तंत्रही निश्चित केले. रचनासौंदर्य, भावनोत्कटता, आत्माविष्कार, निर्हेतुक कलाविकास, एकाच प्रसंगावर अथवा व्यक्तीवर केंद्रीकरण, एकच तत्त्व, हे नव्या लघुकथेचे विशेष होत. ना. सी. फडके यांनी शेकडो लघुकथा लिहिल्या आहेत. तंत्रशुद्धता, रेखीवपणा, आकर्षक सुरुवात, मध्ये गुंतागुंत, शेवटी उकल हे गुण प्रामुख्याने त्यांच्या कथांत दिसून येतात. 'उलटे शाकुंतल', 'शोभेसाठी', 'मीरा', 'ऊन आणि सावल्या' या व त्यांच्या इतर सर्व कथा या तंत्राला धरून लिहिलेल्या आहेत. वि. स. खांडेकर हे या काळचे दुसरे श्रेष्ठ लेखक. त्यांच्या कथेत अनुभवांची विविधता, समृद्धता, जिव्हाळा, या गोष्टी पुरेपूर आढळतात. सामाजिकता हा त्यांच्या कथेचा आत्मा आहे. 'आंधळ्याची भाऊबीज', 'भावाचा भाव', 'हिरा तो भंगला', 'शिष्याची शिकवण' या त्यांच्या प्रातिनिधिक कथा होत. त्यांच्या कथा लोकप्रिय झाल्या त्या तंत्रकौशल्यामुळे किंवा रचनासौंदर्यामुळे नव्हे, तर त्यांतील सामाजिक आशय व जीवनदर्शन यामुळे. वर सांगितल्याप्रमाणे 'जीवनासाठी कला' हे त्यांचे ब्रीद आहे, त्यांच्या कादंबऱ्यांप्रमाणेच त्यांच्या लघुकथाही या ब्रीदाला अनुसरून लिहिलेल्या आहेत. श्री. म. माटे यांच्या कथा म्हणजे 'उपेक्षितांचे अंतरंग' या नावाचा त्यांचा कथासंग्रह मराठीत झाला आहे. अनेक वर्षे दलित समाजात ते काम करीत होते. त्यामुळे त्यांच्या कथांत जिवंत अनुभूतीचा आढळ पदोपदी होतो. 'माणुसकीचा गहिवर', 'शेवंतीचा खराटा', 'रामभरोशी पुन्हा धन्याच्या दारात' अशा त्यांच्या अनेक कथा मनाला चटका लावून सोडतात. महादेवशास्त्री जोशी यांची निवेदनपद्धती जुनी आहे. पण त्यांची लघुकथा पूर्ण आधुनिक आहे गोमंतक, बेळगाव या बाजूचे सर्व थरांतील जीवन त्यांनी आपल्या 'भावबळ', 'मानिनी' 'घररिघी', 'जगावेगळे सासर', धन आणि मन' इ. कथांतून रंगविले आहे. वि. वि बोकील यांच्या कथा विनोद व उपरोध यांनी अलंकृत असतात. चतुर व मार्मिक संवाद हे त्याचे वैशिष्ट्य. 'जमीन अस्मान', 'व्यवहार आहे हा', 'धंदेवाईक मंडळी' या कथा त्या दृष्टीने पाहाव्या. द. र. कवठेकर यांनी मध्यमवर्गीय जीवनातील अतिशय करुण असे प्रसंग निवडून त्यांचे भावव्याकुळ असे चित्रण केले आहे. 'तिळाच्या वड्या', 'मी लावते हं निरांजन,' 'कुंकवाचा करंडा' या कथांतून त्यांनी करुणरम्य व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत. ग. ल. ठोकळ व र. वा. दिघे हे दोघेही कल्पनारम्य व अद्भुत वातावरणात रमतात.
 या काळात स्त्रीजीवनातील समस्या व स्त्रीमनाचे विश्लेषण यांच्या आधारे कथा लिहिणाऱ्या स्त्रीलेखिकांत विभावरी शिरूरकर (मालती बेडेकर) या अग्रगण्य होत. परिस्थितीने, अवहेलनेने, उपेक्षेने आणि लोकनिंदेने कोळपून गेलेल्या अनेक स्त्रियांची चित्रे त्यांनी रंगविली आहेत. 'कळ्यांचे निःश्वास' हा त्यांचा संग्रह त्या वेळी फारच गाजला होता. मुक्ताबाई दीक्षित, कमलबाई टिळक यांनीही स्त्रियांची सुखदुःखे आत्मीयतेने रंगविली आहेत.
 य. गो. जोशी, डॉ. वर्टी, शांताबाई नाशिककर, पिरोज आनंदकर, क्षमाबाई राव, मालतीबाई दांडेकर, प्रभाकर पाध्ये, अनंत काणेकर यांच्याही कथा या काळातल्या आधुनिक स्वरूपाच्या आहेत.

मनोविश्लेषण
 १९४५ च्या सुमारास लघुकथेची जुनी चाकोरी पूर्णपणे सुटत चालली. प्रारंभी कथा कथानकप्रधान होती, घटनाप्रधान होती. आता या दोन्हींना गौणत्व येऊ लागले. मनोविश्लेषणावर व सूक्ष्म वास्तववादी जीवनावर लेखक भर देऊ लागले. दुसऱ्या महायुद्धाने जुने विश्व उद्ध्वस्त झाले होते. जीवनातील चिरंतन मूल्ये कोसळून पडत होती. त्यामुळे जी अश्रद्ध वृत्ती निर्माण होऊ लागली होती. तिचे अतिवास्तव व अतिकटू चित्रण लघुकथा करू लागली. माणसाच्या अंतर्मनात खोलवर दडून बसलेल्या सुप्त- अर्धसुप्त आशा- आकांक्षांची, दबलेल्या विचारांची व विकृत भावनांची चित्रे ती रंगवू लागली. या नव्या प्रकारच्या लघुकथा- लेखकांत अरविंद गोखले, गंगाधर गाडगीळ, पु. भा. भावे, वसुंधरा पटवर्धन हे आघाडीवर आहेत.
 अरविंद गोखले यांच्या कथेचे विश्व व्यापक आहे. महायुद्ध, बेकारी, जातीय दंगे, फाळणी, इ. अनेक घटनांची पार्श्वभूमी त्यांच्या कथांतून स्पष्ट दिसते. 'एरुशा', 'नकार', 'मीलन', 'दिव्य', 'मंजुळा', 'डाग', 'अधर्म', या त्यांच्या कथांतून गोखले यांची वैशिष्ट्ये दिसतात, त्यांतील मनोविश्लेषण प्रत्ययाला येते व समकालीन जीवनाचे दर्शन घडते. गंगाधर गाडगीळ यांनी बहुधा मध्यमवर्गीय जीवनाच्याच कथा लिहिल्या आहेत. फडके यांनी सांगितलेले लघुकथेचे तंत्र त्यांनी अगदी उधळून दिले. प्रयोगशीलता, अंतर्विरोधाची मांडणी, सूक्ष्म मनोविश्लेषण यातून दडपलेल्या भावना, मुर्दाड झालेली मने, आणि मनाच्या अनंत व्यथा त्यांनी चितारल्या आहेत. 'किडलेली माणसे', 'दुबळा', 'वारा भरलेले शीड,' 'सुखी माणसे' या कथा या दृष्टीने वाचनीय आहेत. पु. भा. भावे यांच्या 'सतरावे वर्ष', 'पहिले पाप' 'संस्कार', 'मोह', 'प्रतारणा', 'फुलवा' इ. कथांतून उद्दाम भावना, कणखर व प्रभावी भाषा, प्रणय भावनेच्या अनेक छटा यांचे चित्रण आढळते. पाश्चात्यांचे अंधानुकरण त्यांना तिरस्करणीय वाटते. त्यावर टीका करताना त्यांची लेखणी फार तिखट होते.
 'माणदेशी माणसे' हा व्यंकटेश माडगूळकर यांचा कथासंग्रह अविस्मरणीय आहे. माणदेशच्या मातीत त्यांची कथा खोल रुजलेली आहे. तेथील लोकांचे दारिद्र्य, भोळेपणा, अडाणीपणा, काहींचा अर्कटपणा यांचे परिणामकारक दर्शन त्यांनी घडविले आहे. 'ऑडिट', 'विलायती कोंबडी', 'झोंबी', 'करणी', 'भुताचा पदर' इ. कथा उल्लेखनीय आहेत. द. मा. मिरासदार यांच्या कथा खवचट विनोदाने भरलेल्या असतात. इरसाल, कावेबाज, बढाईखोर, विक्षिप्त अशी माणसे ते निवडतात आणि त्यांच्या व्यक्तिदर्शनातून विनोदाच्या बाह्य आवरणाखाली खरे जीवनदर्शन घडवितात. 'व्यंकूची शिकवणी', 'दळण', 'चोरी- एक प्रकार' इ. कथांतून त्यांचा मिस्किल विनोद विपुल आढळतो. मात्र या विनोदातील जीवनदर्शन फार प्रभावी आहे. वसुंधरा पटवर्धन यांच्या कथा व्यक्तिचित्रण व भावजीवन या दोन्ही दृष्टींनी विशेष उल्लेखनीय झाल्या आहेत. त्यांच्या कथांतून एक वेगळ्याच प्रकारची आर्तता जाणवते. कमला फडके यांनी विनोदी व खेळकर अशा बऱ्याच कथा लिहिल्या आहेत. त्यांच्या कथांत घटनांना बरेच प्राधान्य असते. पण निवेदनशैली मात्र अगदी आधुनिक व अतिशय रसाळ अशी असते. शांता शेळके यांच्या कथा हळुवार व भावनाप्रधान असतात. शंकर पाटील, ग. दि. माडगूळकर व सरोजिनी बाबर यांनी अनेक अस्सल ग्रामीण कथा लिहिल्या आहेत. ग्रामीण जीवनातील परंपरा व तेथील खानदानी यांचा सरोजिनीबाईंना अभिमान आहे. जीवनातल्या शाश्वत मूल्यांवर त्यांचा अढळ विश्वास आहे. दि. बा. मोकाशी यांच्या कथांचे क्षेत्र खूपच व्यापक आहे. विविध क्षेत्रांतली, व्यवसायांतली व थरांतली पात्रे त्यांच्या कथांत येतात व जीवनाचे बहुरंगी दर्शन घडवितात. 'काय रानटी लोक आहेत', 'आमोद सुनासी आले', 'रोमच्या सुताराची गोष्ट', या त्यांच्या गाजलेल्या कथा होत. अं. शं. अग्निहोत्री यांनी सुमारे ५०० कथा लिहिल्या आहेत. मध्यम वर्गाच्या सामाजिक जीवनाचे ते बहुधा चित्रण करतात. त्यांच्या कथांतील पात्रे व प्रसंग विविधता आश्चर्यजनक आहे.
 जयवंत दळवी, वि. शं. पारगावकर, श्री. ज. जोशी, अच्युत बरवे, स्नेहलता दसनूरकर, इंद्रायणी सावकार, आनंद यादव, जी. ए. कुळकर्णी, शंकरराव खरात, मधु मंगेश कर्णिक, विजया राजाध्यक्ष, उद्धव शेळके, व. अ. कुंभोजकर यांची नावे या क्षेत्रात खुपच गाजली आहेत. यांतील बहुतेक लेखक १९४७ च्या पुढच्या काळातले आहेत.
 यांतील अनेक लेखकांच्या कथा 'मनोरंजन' (संपादक- काशीनाथ रघुनाथ मित्र), रत्नाकर (संपादक- ना. सी. फडके, अ. स. गोखले), किर्लोस्कर, स्त्री (संपादक- शं. वा. किर्लोस्कर) या प्रसिद्ध मासिकांतून येत असत. या कथा व इतर साहित्य प्रसिद्ध करून या मासिकांनी फार मोलाची कामगिरी केली आहे.

४. विनोदी वाङ्मय

 विनोदी वाङ्मय ही स्वतंत्र वाड्मय शाखा आहे. आणि ती इतरांइतकीच महत्त्वाची आहे. जीवनातील विसंगती शोधून ती हास्यास्पद करून दाखविणे याला फार तीव्र बुद्धी लागते आणि मुख्य म्हणजे भौतिक जीवनाची निकोप अभिरुची लागते. प्राचीन काळात तिचा अभाव, हे त्या काळी मराठीत उत्तम विनोदी वाङ्मय नसण्याचे मुख्य कारण आहे. अर्वाचीन मराठी साहित्यात विनोदाची गंगोत्री निर्माण झाली ती श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्यापासून. 'सुदाम्याचे पोहे' हा त्यांच्या विनोदी लेखांचा संग्रह या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. त्याचा विनोद, विनोदासाठी विनोद, या प्रकारचा नव्हता. विनादाच्या द्वारे अनिष्ट रूढींचे विध्वंसन, लोकभ्रमांचा निरास व धर्मभोळेपणाचे उच्चाटण करावे असा त्यांचा त्रिविध हेतू होता. मी (सुदामा), बंडूनाना व पांडूतात्या असे तीन मानसपुत्र निर्माण करून त्यांनी समाजातील व्यंगावर प्रहार केलं. 'शिमगा', 'गणेश चतुर्थी', 'श्रावणी', 'निर्जळी एकादशी' या त्यांच्या लेखांवरून याचा प्रत्यय येईल.
 गडकरी- बाळकराम- हे कोल्हटकरांचे शिष्य 'ठकीच्या लग्नाची तयारी' या लेखात त्यांनी लग्न जमविण्याच्या पद्धतीवर खरपूस टीका केली आहे. तर 'कवींचा कारखाना' यात कसे तरी काव्य लिहिणारांचा तीव्र उपहास केला आहे. कोटीबाजपणा व अतिशयोक्ती ही त्यांची साधने होती. कोल्हटकराप्रमाणेच त्यानी तिंबूनाना, बाळक्या, ठकी अशी काल्पनिक पात्रे निर्माण केली आहेत.
 चिं. वि. जोशी यांच क्षेत्रातले स्थान सर्वात मोठे आहे. डॉक्टर, वकील, संशोधक, विमा एजंट, संपादक, घरचे नोकर, कंपॉझिटर इ. समाजातल्या सर्व थरांतील व्यक्तींची विनोदी चित्रे त्यांनी रेखाटली असून अनेक सदोष घटनांचे विडबन केले आहे. त्यांचा विनोद स्वभावनिष्ठ व प्रसंगनिष्ठ असून शुद्ध, सात्त्विक विनोदाचा तो आदर्शच आहे. 'स्टेटगेस्ट', 'लग्नसराई', 'स्टेशन स्टाफची मेजवानी', 'वरसंशोधन', 'गुंड्या- भाऊंचे दुखणे' हे त्यांचे लेख वरील विधानाची साक्ष देतील. ना. धों. ताम्हनकर यांचा 'दाजी' हाही स्वभावनिष्ठ व प्रसंगनिष्ठ विनोदाचाच नमुना आहे. त्याचे चालणे बोलणे, वागणे चाकोरीबाहेरचे असल्यामुळे हे साधले आहे. या दाजीने मराठी वाङ्मयात चांगली भर घातली आहे.
 याशिवाय कॅप्टन लिमये, शा. नी. ओक, डॉ. वर्टी, गो. ल. आपटे यांचेही लेखन विनोदी साहित्यात भर घालणारे आहे.
 आचार्य अत्रे हे विनोदाचे बादशहाच होते. नवयुग या साप्ताहिकात व मराठा या दैनिकात उपहास उपरोधाने रसरसलेले लेख लिहून त्यांनी प्रतिपक्षाला लोळवून टाकले आहे. अनेक क्षेत्रांतून अत्र्यांचा विनोद खळाळतो. विसंगती, विकृती, विडंबन, अतिशयोक्ती, यांची व स्वभावनिष्ठ, प्रसंगनिष्ठ व शब्दनिष्ठ अशी सर्व प्रकारच्या विनोदाची विपुल उदाहरणे अत्र्यांच्या लेखांतून सापडतील.
 अलीकडच्या काळात वि. आ. बुवा, रमेश मंत्री, बाळ गाडगीळ, बाळ सामंत, पु. ल. देशपांडे असे अनेक विनोदी लेखक उदयास आले आहेत. त्यातील पु. ल. देशपांडे यांचा विनोद हा निस्तुळ असा आहे. या सर्वांनी गेल्या तीस वर्षांत मराठी वाङ्मय विनोदाने समृद्ध केले आहे.

५. लघुनिबंध

 लघुनिबंध हाही ललित वाङ्मयाचाच एक प्रकार आहे. तात्त्विक निबंधांत गहन गंभीर विचार, काही शास्त्रीय सिद्धान्त यांचे तर्कशुद्ध विवेचन केलेले असते. आधार, प्रमाण, खंडणमंडण यांनी तो भरलेला असतो. याउलट लघुनिबंध हा अगदी खेळकर पद्धतीने, मित्राशी हितगुज करावे अशा शैलीने लिहिलेला असतो. स्वतःचे गमतीचे अनुभव त्यात सांगितलेले असतात. आणि मुख्य म्हणजे काव्याप्रमाणे यातही आत्माविष्कार असतो. आपल्या अंतरीच्या भावभावना, मनातील लहरी, विचार, विकार लेखक लघुनिबंधात मोकळेपणाने प्रगट करतो आणि या वैयक्तिक आत्मप्रकटीकारणामुळेच लघुनिबंधाला रम्य रूप येते. प्रारंभी काही सिद्धांत आणि शेवटी त्यावरचा निर्णय असे रूप लघुनिबंधाला कधी नसते आणि असले तरी ते सिद्धांत गमतीचे असतात. 'बाजार' हा फडक्यांचा लघुनिबंध पाहा. बाजारात जाणे ही जिकीर आहे असे सामान्यतः लोकांना वाटते, पण तो एक रम्य अनुभव आहे असे फडके म्हणतात. तत्त्वविचारात या सिद्धांताला कोणी सिद्धांत म्हणायलाही तयार होणार नाही आणि लेखकाची तशी अपेक्षाही नाही.
 १९२५ सालच्या सुमारास ना. सी. फडके व वि. स. खांडेकर यांनी लघुनिबंध लेखनास प्रारंभ केला. फडक्यांचे गुजगोष्टी, धूम्रवलये, अबोलीची फुले इ. लघुनिबंधसंग्रह प्रसिद्ध आहेत. खांडेकरांचे वायुलहरी, सायंकाळ, मंझधार हे संग्रह असेच प्रसिद्ध आहेत. या क्षेत्रातले तिसरे असेच मोठे लेखक म्हणजे अनंत काणेकर हे होत. त्यांचे विषय विचारात्मक आहेत. पण शैली अत्यंत खेळकर आहे. गणूकाका हे एक पात्र त्यांनी निर्माण केले आहे. त्याचा व लेखकाचा वादविवाद हे काणेकरांच्या लघुनिबंधांचे सामान्यतः स्वरूप असते. गणूकाका हे सनातनी व काणेकर हे आधुनिक. त्यामुळे या वादविवादांना रंगत चढते व लेखनाला सौंदर्य प्राप्त होते.
 यानंतर अनेक लेखकांनी हा वाङ्मयप्रकार हाती घेतला. त्यातील वि. पां. दांडेकर, ना. मा. संत, कुसुमावती देशपांडे, म. ना. अदवंत, कवी यशवंत, कुसुमाग्रज, र. गो. सरदेसाई ही नावे प्रसिद्ध आहेत. १९४५ नंतर दुर्गा भागवत, न. वि. गाडगीळ, गो. वि. करंदीकर, मंगेश पाडगावकर यांनी लघुनिबंधाच्या सौंदर्यात खूपच भर घातली. त्यामुळे हा वाङ्मयप्रकार अधिकाधिक रम्य होत गेला व त्याला काव्यात्म रूप आले.

दलित साहित्य
 'दलित साहित्य' असा एक मराठी साहित्याचा स्वतंत्र विभाग अलीकडे मानला जातो. तसे मानण्याला अर्थही आहे. म्हणून त्या वाङ्मयाचा थोडा परिचय करून घेऊ. प्रा. गंगाधर पानतावणे यांनी 'अमृत' मासिकात या विषयावर दहाबारा लेख, १९७५-७६ साली लिहून किसन फागू बनसोड, अण्णाभाऊ साठे, बंधू माधव, केरुबुवा गायकवाड इ. दलित लेखकांच्या साहित्याची उद्बोधक माहिती दिली आहे. डॉ. भालचंद्र फडके यांनी 'दलित साहित्य- वेदना आणि विद्रोह' या नावाचा ग्रंथच अलीकडे लिहिला आहे. अस्पृश्य व इतर हीन गणलेल्या जाती यांनी लिहिलेले साहित्य म्हणजे 'दलित साहित्य' होय. वरीलपैकी बनसोड वगळता बहुतेक लेखकांना डॉ. आंबेडकरांपासून, विशेषतः त्यांनी बौद्धधर्म स्वीकारल्यानंतर, स्फूर्ती मिळालेली आहे. किसन बनसोड हे मात्र डॉ. आंबेडकरांच्या आधीचे होत. प्रा. पानतावणे यानी मालेच्या शेवटच्या लेखात डॉ. आंबेडकरांच्या साहित्याचा परिचय करून दिला आहे.
 या सर्व साहित्यिकांनी हिंदुधर्म, हिंदुसमाज, त्यातील अस्पृश्यता, वर्णविषमता, जातिभेद यावर अत्यंत जहरी व जळजळीत टीका केली आहे. त्यांनी काव्य, लघुकथा, कादंबरी, नाटक सर्व प्रकारचे साहित्य लिहिले आहे. ते बहुतेक गेल्या वीस वर्षांतले आहे. बनसोड हे मात्र आधीपासून लिहीत आहेत. 'हा हिंद देश माझा' या कवितेत, हा देश जातिभेद, वर्णभेद मानतो, महारांना अस्पृश्यांना पशूपेक्षाही हीन समजतो, असा माझा हिंद देश आहे, अशी त्यांनी उपहासाने टीका केली आहे.
 प्रस्थापित रूढी, समाजरचना, वर्णव्यवस्था, विषमता यांविरुद्ध उठाव, यांवर टीकेचा भडिमार हे या दलित साहित्याचे मुख्य लक्षण होय. 'विद्रोहाचे पाणी पेटले आहे' असेच नाव प्रा. पानतावणे यांनी आपल्या लेखमालेला दिले आहे. बंधूमाधव यांच्या लघुकथेतील लिंबा हा पाटलाला बजावतो की 'मी मेलेला बैल ओढायला येणार नाही.' त्यावर 'देवानेच तुम्हांला महाराच्या जन्माला घातले आहे', असे पाटील सांगतो. त्यावर लिंबाने उत्तर केले की 'देवाने नाय, तुमच्यासारख्या सोद्या माणसांनीच हा भेद केला आहे.' या सर्व साहित्यात युगानुयुगांच्या गुलामगिरी- विरुद्ध बंड आहे क्रांतीची भाषा आहे. हा माणुसकीचा लढा आहे. नामदेव ढसाळ यांच्या कथेतील नायक म्हणतो, 'दलित वर्गाला संघटित केले पाहिजे, त्यांना वर्ग- संघर्ष शिकविला पाहिजे.' या सर्व साहित्याचा असा क्रांतिकारक सूर आहे व त्याचे स्वागत केले पाहिजे, असे डॉ. फडके यांनी म्हटले आहे.
 किसन फागू बनसोड यांनी 'मजूरपत्रिका', 'चोखामेळा' इ. वृत्तपत्रेही काढली होती. प्रा. पानतावणे यांनी त्यांना डॉ. आंबेडकरांच्या जोडीला नेऊन बसविले आहे. डॉ. आंबेडकरांची 'बहिष्कृत भारत', 'जनता' व 'प्रबुद्ध भारत' ही वृत्तपत्रे प्रसिद्धच आहेत त्यांतील 'अस्पृश्यता निवारणाचा पोरखेळ', 'महार आणि त्यांचे वतन', 'अस्पृश्यता व सत्याग्रहाची सिद्धी', 'अस्पृश्योन्नतीचा आर्थिक पाया', 'हिंदूंचे धर्मशास्त्र', 'हिंदू धर्माला नोटीस' या लेखांनी क्रांतीचा पाया घातला आणि नव्या तरुण दलित लेखकांना स्फूर्ती दिली. हिंदुधर्माच्या नेत्यांनी या साहित्याची वेळीच दखल घ्यावी इतके ते मोलाचे आहे.
 ललित साहित्याचा येथवर विचार केला. आता विचारप्रधान साहित्याचा विचार करावयाचा. तो पुढील प्रकरणात करू.