महाराष्ट्र संस्कृती/मरहट्ट सम्राट सातवाहन

विकिस्रोत कडून


३.
मरहट्ट सम्राट सातवाहन
 


स्वतंत्र राजसत्ता
 महाराष्ट्री भाषेमुळे आपल्या समाजाला पृथगात्मता आली आणि या भाषेचा व या भूमीचा लोकांत अभिमान निर्माण होऊन त्याला अस्मिता प्राप्त झाली हे गेल्या दोन प्रकरणांत आपण पाहिले. आता या पृथगात्म झालेल्या महाराष्ट्रभूमीच्या राजसत्तेचा विचार करावयाचा. भाषेमुळे पृथगात्म झालेला समाज आपली स्वतंत्र अशी राजसत्ता निर्माण करू शकला नाही तर त्याच्या अस्मितेला स्थिरता येत नाही व त्याच्या संस्कृतीची, धर्माची, साहित्य, कला, शास्त्रे यांची जोपासना होऊ शकत नाही. मनुष्याला देह, मन, बुद्धी, प्रज्ञा सर्व प्राप्त होऊनही त्याची प्राणशक्ती जिवंत नसेल तर वरील सर्व संपदा असून नसल्यासारखीच होते. स्वतंत्र राजसत्तेचे राष्ट्रीय जीवनात असेच महत्त्व आहे. प्राणशक्ती देहाचे सर्व अवयव संघटित व सूत्रबद्ध करते आणि यामुळेच मन, बुद्धी, प्रज्ञा यांच्या सर्व व्यापारांना एकात्मता प्राप्त होते. त्याप्रमाणे राजसत्ता समाजाला संघटित व शासनबद्ध करून त्याच्या सर्व घटकांच्या भिन्न भिन्न व्यापारांना एकात्म, एकरस बनविते व अशी सत्ता दीर्घकाळ टिकली तरच त्या समाजाची पृथगात्मता जगन्मान्य होते व त्याच्या स्वतंत्र संस्कृतीला चिरंजीवित्व लाभते. दक्षिण अमेरिका व उत्तर अमेरिका - युनायटेड स्टेटस् – यांची तुलना येथे उद्बोधक होईल. दक्षिण अमेरिकेत अर्जेंटिना, पेरू, ब्राझील, चिली, इ. अनेक देशांची अनेक स्वतंत्र राज्ये आहेत. हे सर्व प्रदेश दोनतीन शतके स्पेनच्या अधिसत्तेखाली होते. पण ती सत्ता परकी होती. त्यामुळे ती या खंडप्राय प्रदेशाला एकात्म करू शकली नाही. नंतर दीडशे वर्षापूर्वी स्पेनची सत्ता नष्ट झाली. त्या वेळी या सर्व देशांत निरनिराळ्या स्वतंत्र राजसत्ता निर्माण झाल्या. त्यामुळे या देशांच्या संस्कृती अगदी परम्परभिन्न झाल्या. उत्तर अमेरिकेवर प्रथम अशीच इंग्लंडची साम्राज्यसत्ता होती. दीड वर्षापूर्वी तीही स्पेनप्रमाणेच नष्ट झाली. पण त्यानंतर तेथील तेरा संस्थानांनी सर्वांची मिळून एक राजसत्ता निर्माण केली आणि दृढनिश्रयाने ती टिकविली. यामुळेच हा विस्तीर्ण भूप्रदेश एकात्म, एकरस झाला व त्याची स्वतंत्र संस्कृती जोपासली गेली. राजसत्तेचा महिमा असा आहे.

सातवाहन घराणे
 महाराष्ट्राच्या भाग्याने त्याच्या संस्कृतीच्या प्रारंभकाळीच त्याला अशी राजसत्ता लाभली. ती सत्ता म्हणजे विख्यात सातवाहन या राजघराण्याची होय. इ. स. पूर्व ३०० च्या सुमारास महाराष्ट्री भाषेमुळे महाराष्ट्रममाजाचा जन्म झाला; आणि सुदैवाने त्याच वेळी या भूमीत एक अत्यंत प्रभावी, बलशाली व समर्थ अशी राजसत्ता अवतरली. सातवाहनांची सत्ता येथे प्रस्थापित झाली, एवढेच नव्हे, तर या थोर राजघराण्याने साडेचारशे वर्षे आपली सत्ता अविच्छिन्न, अव्याहत, अखंड चालवून महाराष्ट्राची पृथगात्मता, अस्मिता व संस्कृती यांना पक्व, प्रौढ व दृढ असे रूप प्राप्त करून दिले.

सातवाहनपूर्व
 भारतामध्ये येथील लहान लहान राज्ये वितळवून त्यांतून एक मोठे बलशाली साम्राज्य निर्माण करण्याचा पहिला यशस्वी प्रयत्न झाला तो मगधामध्ये. इ. स. पूर्व सहाव्या शतकात ५५० च्या सुमारास शैशुनाग वंशाने मगधात राज्य स्थापून हळूहळू अखिल उत्तर भारत, हिंदुकुशपासून आसामपर्यंतचा सर्व आर्यावर्त आपल्या साम्राज्याखाली आणला. बिंबिसार हा शैशुनाग घराण्यातील पहिला साम्राज्यकर्ता पुरुष होय. तेथून पुढे सुमारे दीडशे वर्षांनी या घराण्याची सत्ता संपुष्टात येऊन राजसत्ता नंद घराण्याकडे गेली; नंतर सुमारे शंभर वर्षांनी नंद घराण्याचा उच्छेद करून चंद्रगुप्त मौर्य याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली. भारताच्या दृष्टीने मौर्य साम्राज्याचे महत्त्व विशेष आहे. पहिली गोष्ट म्हणजे चंद्रगुप्ताने ग्रीकांच्या - यवनांच्या - आक्रमणाचे निर्दाळण केले ही होय. शिकंदराने भारतावर स्वारी करून वायव्य सरहद्दीजवळच्या पट्ट्यात यवनसत्ता प्रस्थापित केली होती. चंद्रगुप्ताने ती तर नष्ट केलीच, पण त्यानंतर सेल्युकस हा ग्रीक सेनापती प्रचंड सेना घेऊन पुन्हा स्वारी करून आला तेव्हा त्याच्याशी सीमेवरच मुकाबला करून चंद्रगुप्ताने त्याचा निःपात केला व यावनी सत्तेचा कणाच मोडून टाकला. यानंतर दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे विंध्याच्या दक्षिणेचा म्हैसूरपर्यंतचा भूभाग जिंकून चंद्रगुप्ताने अखिल भारताचे एक साम्राज्य स्थापन केले ही होय. ज्ञात इतिहासात अखिल भारत एका साम्राज्यात एका सत्तेखाली या वेळी प्रथमच आला. यामुळे या घटनेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. शैशुनाग वंशाने साम्राज्य स्थापन केले होते. पण ते उत्तर भारतापुरते होते. इतिहासकाळात तसे साम्राज्य प्रथमच झाल्यामुळे त्यालाही महत्त्व आहे यात शंका नाही. पण चंद्रगुप्ताचे साम्राज्य अखिल भारतव्यापी होते. त्यामुळे त्याचे महत्त्व अर्थातच असाधारण असे आहे.

अशोकाची अहिंसा
 चंद्रगुप्तानंतर त्याचा पुत्र बिंदुसार याने पित्याने स्थापिलेले अखिल भारतीय साम्राज्य जसेच्या तसे टिकवून धरले. काहींच्या मते त्याचा विस्तारही केला. त्यानंतर सम्राट अशोक सत्ताधीश झाला. त्याने शस्त्रबळाने अहिंसा, भूतदया, वैराग्य, संन्यास, शून्यवाद यांनी संपन्न अशा धर्माचा प्रसार केला. आणि चंद्रगुप्ताने निर्मिलेली अत्यंत कार्यक्षम, समर्थ व परंजयी अशी राज्ययंत्रणा ढिली करून टाकली. त्यामुळे शंभर- सव्वाशे वर्षे बंद पडलेली यावनी आक्रमणे पुन्हा सुरू झाली आणि डेमिट्रियस, मिनेंडर हे ग्रीक ( यावनी ) राजे भारतात घुसून अयोध्येपर्यंत येऊन ठाण मांडून बसले. पूर्वी प्रचंड सेना घेऊन शिकंदरासारखा महाबल सेनानी आला होता. तरी त्याला तसू तसू भूमी लढूनच घ्यावी लागली. त्यामुळे वायव्य सीमेजवळच्या एका लहानशा पट्ट्यापलीकडे त्याला काहीच जिंकता आले नाही. सीमेजवळच्या भारतीयांच्या ठायी अशी प्रखर प्रतिकारशक्ती त्या वेळी होती. पण आता अशोकाने बौद्ध अहिंसा व वैराग्य यांचा प्रसार करून राष्ट्राची प्रतिकारशक्तीच नष्ट करून टाकली होती. समाजाला हतबल करून ठेविले होते. त्यामुळे डेमिट्रियस व मिनँडर, कापसात खड्ग घुसावे तसे भारतात घुसले. मगध सम्राट बृहद्रथ हा धर्मराजाच्या शांतवृत्तीने हे वस्त्रहरण पाहात बसला होता. याच वेळी पुष्यमित्राचा उदय झाला. तो बृहद्रथाचा सेनापती. त्याने सर्व सूत्रे हाती घेतली, सम्राटाला कंठस्नान घातले आणि स्वतः सम्राटपदावर आरूढ होऊन यावनी आक्रमकांना भारताच्या सीमेबाहेर हाकलून लावले. पुष्यमित्राने रणविद्या, प्रतिकारशक्ती, क्षात्रतेज यांचेच केवळ पुनरुज्जीवन केले असे नाही, तर वैदिक संस्कृतीचेही पुनरुज्जीवन केले आणि त्याचे प्रतीक म्हणून अश्वमेध यज्ञही केला. पुष्यमित्राच्या शुंगवंशाने ११२ वर्ष ( इ. पू. १८४ -७२ ) मगधाचे राज्य केले व त्यानंतर ४५ वर्षे म्हणजे इ. पू. ३० पर्यंत काण्ववंशाने सत्ता चालविली. पण पुष्यमित्रानंतरचे राजे विशेष कर्तबगार नव्हते. त्यामुळे तेव्हापासूनच साम्राज्याला उतरती कळा लागली होती; आणि काण्वांच्या राजसत्तेला मगधाबाहेर मुळीच प्रतिष्ठा राहिलेली नव्हती. यामुळे ग्रीक आक्रमकांनी पुन्हा डोके वर काढले होते आणि आता शक- कुशाणांच्या टोळधाडीही भारतावर येऊ लागल्या होत्या. या वेळी उत्तर भारतात त्यांचा प्रतिकार करील अशी संघटित साम्राज्यशक्ती एकही नव्हती. सर्वत्र लहान लहान क्षुद्र राजसत्ता विखरून राहिल्या होत्या. अशा वेळी दक्षिण भारताचीही स्थिती अशीच असती तर शककुशाणांनी दक्षिण भारताचा - म्हणजे पर्यायाने सर्व भारताचा ग्रास घेतला असता. पण अशोकाच्या मृत्यूच्या सुमारास म्हणजे इ. पू. २३६ च्या आसपास दक्षिणेत प्रतिष्ठान नगरीत एक बलशाली सत्ता प्रस्थापित झाली होती आणि शंभर वर्षांनी शककुशाणांच्या टोळधाडी येऊ लागल्या तेव्हा ही राजसत्ता साम्राज्यपदाला पोचून त्या परकी आक्रमणांना तोंड देऊन त्यांचा निःपात करण्यास समर्थ होऊन राहिली होती. सातवाहनांची राजसत्ता तीच ही बलशाली सत्ता होय. तिचाच इतिहास आता आपणास पाहावयाचा आहे.

दक्षिण संस्कृती
 सातवाहन सत्ता ही महाराष्ट्राच्याच नव्हे, तर अखिल भारताच्या इतिहासाला चिरंतन भूषणभूत होऊन राहील अशी सत्ता होती. एक तर भारताच्या इतिहासात विंध्याच्या दक्षिणेला निर्माण झालेली साम्राज्यप्रस्थापक अशी ही पहिलीच सत्ता होय. आर्यांच्या वसाहती प्रथम उत्तर भारतात झाल्या. त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाचा सर्व इतिहास उत्तरेत घडलेला आहे. रामायण, महाभारत या सर्व कथा उत्तरेतल्या आहेत. मगधातील शैशुनाग, नंद, मौर्य, शुंग ही सर्व साम्राज्ये उत्तरेतच झाली. मनू, याज्ञवल्क्य, पाणिनी, पतंजली, बुद्ध, महावीर, हे सर्व विंध्याच्या उत्तरेकडचे होत. याचा अर्थ असा की या काळापर्यंत भारताची सर्व संस्कृती ही उत्तर भारताच्या कर्तृत्वाची होती. सातवाहनांचे वैशिष्ट्य हे की त्यांनी दक्षिण भारताच्या इतिहासाला आणि संस्कृतीला प्रारंभ करून दिला. त्यांचे दुसरे अलौकिकत्व असे की इ. पू. २३५ ते इ. स. २२५ अशी चारशे साठ वर्षे या एका घराण्याने अखंड राजसत्ता चालविली. त्यातील पहिली दोनशे वर्षे तर तिचे वैभव अव्यय तेजाने सारखे प्रतिपच्चंद्ररेखेप्रमाणे वर्धिष्णूच होत राहिले. त्यानंतर काही वर्षे तिला पडता काळ आला. पण गौतमीपुत्र सातकर्णी या सम्राटाने शकांचा निःपात करून पुन्हा तिचे तेज वृद्धिंगत केले. साडेचार शतकांइतका दीर्घकाळ एकाच घराण्याने सत्ता चालविल्याचे उदाहरण भारताच्याच काय पण जगाच्या इतिहासातही दुर्मिळ आहे. सातवाहनांचेच शालिवाहन हे दुसरे अभिधान होते. त्या नावाची कालगणना शालिवाहन शक म्हणून विख्यात झालेली आहे. भारतात अनेक कालगणनांतून दोनच संवत् कायम टिकून राहिले आहेत. एक विक्रम संवत् व दुसरा शालिवाहन संवत्. डॉ. रा. गो. भांडारकरांनी म्हटले आहे की इ. पू. दुसऱ्या शतकापासून इ. सनाच्या चौथ्या शतकापर्यंत ( पुष्यमित्राच्या मृत्यू - पासून गुप्तवंशाच्या उदयापर्यंत ) शिलालेख व नाणी यात महाराष्ट्राचे सातवाहन वगळले तर कोणाही हिंदू राजाचे नाव आढळत नाही. ( कलेक्टेड वर्क्स, खंड १ ला, पृ. ३६ ) [ डॉ. भांडारकरांच्या या विधानाला, नवीन संशोधन पाहता, थोडी मुरड घातली पाहिजे. इ. सनाच्या दुसऱ्या शतकात पंजाब, राजस्थान येथील यौधेयगणांनी कुशाणांचा नाश करून आपले स्वतंत्र्य पुन्हा प्रस्थापित केले होते. ' यौधेयानां जयः ' अशा अक्षरांनी अंकित अशी त्यांची नाणी सापडली आहेत. मालवांनीही शकांचा उच्छेद करून तिसऱ्या शतकात ' मालवानां जय: ' अशी मुद्रा करून आपली नाणी पाडली होती. (कॉप्रिहेन्सिव्ह हिस्टरी ऑफ इंडिया, खंड २ रा, पृ. २५५ ते २५७.) पण असे असले तरी ढोबळ मानाने भांडारकरांचे विधान खरेच आहे. ] भारतावर त्यावेळी केवढे संकट आले होते याची यावरून कल्पना येईल आणि त्यावरून सातवाहनांच्या साम्राज्याचे महत्त्व तेही ध्यानात येईल. भारतीय जनतेने सातवाहनांनी शकांवर मिळविलेल्या विजयाचे स्मृतिचिन्ह म्हणूनच त्यांच्या नावाने मूळची शक कालगणना अलंकृत केली.

गतिमान चित्रपट
 सातवाहनांचे साम्राज्य आंध्रदेश, कलिंग येथपासून माळवा, गुजरात, सौराष्ट्र, राजस्थान येथपर्यंत काही काळ मगधापर्यंत आणि दक्षिणेस कावेरीपर्यंत पसरले होते. आरंभीची दोनशे वर्षे या साम्राज्याला निर्बंध, अभंग शांतता लाभल्यामुळे तेथे भौतिक समृद्धीबरोबरच विद्या व कला यांचा विलक्षण उत्कर्ष झाला. सातवाहन हाल राजा तर त्याच्या विद्याभिरुचीसाठीच प्रसिद्ध आहे. त्याने संपादिलेला 'गाथासत्ततई ' ग्रंथ महाराष्ट्री प्राकृत भाषेत लिहिलेला आणि लोकजीवनाचे वर्णन करणारा भारतातला पहिलाच ग्रंथ आहे. अन्य प्राकृत भाषांत वा अन्य प्रदेशांत ग्रामीण वास्तवजीवनाचे वर्णन करण्याचे प्रयत्नच झाले नाहीत. ग्रामीण जनतेच्या जीवनावर तिच्याच भाषेत रचलेला हा अनन्य ग्रंथ होय. संस्कृतचे विख्यात इंग्रज पंडित डॉ. कीथ गाथासत्तसईविषयी म्हणतात की या काव्यातल्याप्रमाणे सामान्य जीवनाचे खरेखुरे अगदी वास्तव दर्शन संस्कृतात क्वचितच आढळते. महाराष्ट्रीय जनतेचे हेच वैशिष्ट्य आहे. आजही या लोकांच्या ठायी अशीच अकृत्रिम स्वच्छंद वृत्ती व राकट गोडवा हे विशेष तसेच दिसून येतात. (हिस्टरी ऑफ संस्कृत लिटरेचर, डॉ. कीथ, प्र. २२४.) डॉ. के. गोपालाचारी सातवाहनसाम्राज्याविषयी लिहिताना म्हणतात, सातवाहनसाम्राज्याचा इतिहास म्हणजे एक रम्य काव्य आहे. हा इतिहास जड नसून चैतन्याने रसरसलेला आहे. ते स्थिरचित्र नसून तो एक गतिमान चित्रपट आहे त्यातील काही प्रसंग भव्य आहेत तर काही भयानक आहेत. पण प्रत्येक चित्र जिवंत व भावपूर्ण आहे. त्यामुळे वैदिक, बौद्ध, जैन सर्व पंथीयांनी त्यांचे दिव्य पराक्रम पारंपरिक कथा व दंतकथा यांच्या रूपाने अमर करून कालांतराने शककालाचे शालिवाहन काल असे नामकरण केले यात नवल नाही ( काँप्रिहेन्सिव्ह हिस्टरी, खंड २ रा, पृ २९३ ).


सातवाहन - मूळ पुरुष
 महाराष्ट्राच्या विश्वसनीय इतिहासास सातवाहनांच्या राजसत्तेपासूनच प्रारंभ होतो ही राजसत्ता सातवाहननामक पुरुषाने इ. स. पूर्व २३० च्या सुमारास स्थापन केली. पुराणात या राजवंशाची माहिती दिली आहे. ती ढोबळ मानाने पुष्कळ बरोबर आहे. पण अलीकडे स्वतः सातवाहनांची सहस्रावधी नाणी व अनेक शिलालेख सापडले आहेत. त्यांच्या आधारे त्यांच्या इतिहासातील घटनांना पुष्कळसे निश्चित रूप देणे शक्य झाले आहे. पुराणान्वये शिशुक किंवा शिनुक हा सातवाहन घराण्याचा मूळ पुरुष होता. पण अलीकडे सातवाहन या पुरुषाचे नाव असलेलीच नाणी सापडली आहेत त्यावरून सातवाहन हाच या राजवंशाचा मूळ पुरुष होय व त्याच्यावरून या वंशाला हे नाव पडले, असा सिद्धांत म. म. वा. वि. मिराशी यांनी मांडला आहे. (संशोधन मुक्तावली -सर २ रा, पृ. ६४.) त्यामुळे या वंशाला सातवाहन हे नाव कसे पडले असावे याविषयीच्या आतापर्यंतच्या सर्व उपपत्ती काल्पनिक ठरून रद्द झाल्या आहेत. प्रा. मिराशी यांच्या मते सिमुक हा सातवाहन या मूळ संस्थापकाचा नातू असावा. म्हणजे जुन्या कल्पनेप्रमाणे सातवाहनांचा जो आरंभकाळ ठरतो त्याच्या मागे दोन पिढ्या तो न्यावा लागतो.
 सातवाहनांच्या प्रारंभकाळाबद्दल अनेक वाद आहेत, त्याचप्रमाणे हे घराणे महाराष्ट्रीय की आंध्र, वर्णाने ते ब्राह्मण, क्षत्रिय, की शूद्र, शालिवाहनशकाशी त्यांचा संबंध जोडणे कितपत युक्त आहे, या घराण्यात मातृवंशपरंपरा होती काय याबद्दलही खूप वाद आहेत. या वादामध्ये डॉ. रा. गो. भांडारकर ( अर्ली हिस्टरी ऑफ दि डेक्कन ), डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर ( प्राचीन महाराष्ट्र, भाग १ व २), डॉ. सुखटणकर (दि होम ऑफ दि सो कॉल्ड आंध्र किंग्ज, भांडारकर इन्स्टिटयूट, व्हॉ १, सुखटणकर मेमोरियल एडिशन, पृ. २५१), स. आ. जोगळेकर ( गाथासप्तशती - प्रस्तावना आणि दि होम ऑफ दि सातवाहनाज्, ॲनल्स् ऑफ भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट, सिल्व्हर ज्युबिली व्हॉल्यूम, १९१७-४२, पृ. १९६ ), डॉ. के. गोपाळाचारी (अर्ली हिस्टरी ऑफ दि आंध्र कंट्री आणि कांप्रिहेन्सिव्ह हिस्टरी ऑफ इंडिया, खंड २ रा, प्रकरण १० वे ), डॉ. डी. सी. सरकार ( दि हिस्टरी अंड कल्चर ऑफ दि इंडियन पीपल, खंड २ रा, भारतीय विद्याभवन - मुंबई, प्रकरण १३ वे ), विद्या- सागर बखले ( राजवाडे व शालिवाहन राजे, विविध ज्ञानविस्तार, मार्च व डिसें. १९२७ ), महामहोपाध्याय वा. वि. मिराशी ( संशोधन मुक्तावली, सर १ ला व २ रा ) अशा मोठमोठ्या पंडितांनी भाग घेतला आहे. या वादाचा तपशील येथे देण्याचा विचार नाही. वरील प्रश्नासंबंधी मला जे निष्कर्ष ग्राह्य वाटले ते त्यांच्या कारणांसह येथे द्यावे व बाकीच्यांचा जरूर तेथे फक्त निर्देश करावा असे धोरण मी अंगीकारले आहे. ज्यांना मूळ वादात शिरावयाचे आहे त्यांनी कृपया मूळ ग्रंथ पाहावे.


महाराष्ट्रीय घराणे
 सातवाहन हे महाराष्ट्रीय की आंध्र आणि त्यांचे मूळस्थान कोणते हा वादाचा पहिला प्रश्न आहे. पुराणात या वंशाला आंध्र म्हटले आहे. त्यामुळे त्यांचे शिलालेख व नाणी यांचा शोध लागेपर्यंत हे आंध्रप्रदेशीय म्हणजे तेलंगणातले राजघराणे आहे व त्याचे मूळस्थान त्या प्रदेशातले आहे असा समज रूढ होता. पण शिलालेख व नाणी उपलब्ध झाल्यावर सर्वच चित्र पालटले. त्यावरून असे दिसून आले की कोणत्याही शिलालेखात वा नाण्यावर सातवाहन स्वतःला आंध्र म्हणवीत नाहीत. पुराणांखेरीज चुकूनसुद्धा त्यांना कोठे आंध्र म्हटलेले नाही. खारवेल, शक, कदंब यांचे हाथीगुंफा, गिरनार, तलगुंडा येथे शिलालेख आहेत. त्यांतही 'सातवाहन' असेच या वंशाला म्हटलेले आहे, आंध्र म्हटलेले नाही. दुसरे असे की सातवाहनांचे प्रारंभीचे सर्व शिलालेख नाशिक, कार्ले, नाणेघाट, कान्हेरी या महाराष्ट्रातील गावी सापडले आहेत. त्यांच्या साम्राज्याच्या अगदी उत्तर काळातील फक्त चार शिलालेख आंध्रप्रदेशात आहेत. प्रारंभीची नाणी सापडली तीही सर्व पश्चिम हिंदुस्थानातच सापडली. वसिष्ठीपुत्र पुलुमायी याचा शिलालेख व याची नाणी आंध्रप्रांतात आहेत. हा उत्तरकालीन राजा होय. यांवरून पंडितांनी असा निष्कर्ष काढला आहे की पुराणे लिहिली गेली त्या काळी सातवाहनांचे महाराष्ट्रातील राज्य नष्ट होऊन त्यांची सत्ता आंध्रप्रदेशातच शिल्लक राहिली होती; तेवढ्यावरून पुराणांनी त्यांना आंध्र ठरविले असावे. वास्तविक ते मूळचे महाराष्ट्रीय होत.

भाषा
 सातवाहन हे महाराष्ट्रीय होत, असे म्हणण्यास दुसरा महत्त्वाचा पुरावा म्हणजे त्यांची भाषा होय. त्यांचे सर्व शिलालेख महाराष्ट्री भाषेत आहेत. त्यांचा एकही लेख द्रविडी भाषेत नाही शिवाय हालसातवाहनाचा गाथासप्तशती हा ग्रंथ महाराष्ट्रीमध्ये आहे. राजशेखरने आपल्या काव्यमीमांसेत, सातवाहन हा राजा कुंतलप्रांती असून तो प्राकृत भाषा बोलतो, असा उल्लेख केला आहे. हा भाषेचा पुरावा महत्त्वाचा आहे. त्यावरून सातवाहनांचे महाराष्ट्रीयत्व निश्चित सिद्ध होते.
 कलिंगराज खारवेल याने सातकर्णीवर स्वारी केली होती. हाथीगुंफा येथील शिलालेखात तिचा उल्लेख असून त्या वेळी त्याने आपले सैन्य पश्चिमेला धाडले असे म्हटले आहे. कलिंगाच्या पश्चिमेस महाराष्ट्र येतो. आंध्र दक्षिणेला आहे. सातकर्णी आंध्रात असता तर सैन्य दक्षिणेला धाडले असे म्हटले असते. 'लीलावई' या महाराष्ट्री काव्याचा कर्ता कवी कौतूहल याने हालसातवाहन हा अश्मक देशातील प्रतिष्ठान (पैठण) नगरीचा राजा होता व त्या प्रांतातील स्त्रिया मरहट्ट स्त्रिया होत्या असे वर्णन केले आहे.


अंदरमावळातील
 स. आ. जोगळेकर यांनी आपल्या 'दि होम ऑफ सातवाहनाज' या लेखात एक मोठे अभिनव, प्रबळ व ग्राह्य असे मत मांडले आहे. पुण्याशेजारी तळेगाव दाभाडे म्हणून एक लहानसे गाव आहे. त्याच्या नजीकच्या मावळाला अंदरमावळ - आंध्र मावळ -असे म्हणतात. त्याच्या जवळून दोन मैलांवरून आंध्रा याच नावाची नदी वहाते. ती राजापुरी या कार्ल्यापासून आठ मैलांवर असलेल्या खेड्याजवळ इंद्रायणीला मिळते. नदीवरून पूर्वी प्रदेशाला व लोकांनाही (सरस्वती-सारस्वत, सिंधु - हिंदु ) अशी नावे पडल्याची उदाहरणे अनेक आहेत. आंध्रा या नदीवरून त्या प्रदेशाला आंध्रमावळ व तेथल्या लोकांना आंध्र असे नाव पडले असण्याची पूर्ण शक्यता आहे. त्या परिसरात आजही आंध्रे नावाचे मराठे घराणे राहात आहे. यावरून सातवाहनांचे मूलस्थान आज अंदरमावळ म्हणून प्रसिद्ध असलेले मावळ हेच असावे असे अनुमान करण्यास हरकत नाही.
 डॉ. सुखटणकर यांच्या मते कर्नाटकातील बेल्लारी जिल्हा हे सातवाहनांचे मूलस्थान होय. या जिल्ह्यातील मायाकडोनी व हिरा हदगल्ली येथील कोरीव लेखांत सातवाहनी- हार व सातवाहनी रठ्ठ असे शब्द आले आहेत, हा पुरावा ते देतात. पण बेल्लारी हे सातवाहनांचे मूळस्थान असते तर प्रारंभीच्या सातवाहनांचे अनेक कोरीव लेख तेथे उपलब्ध व्हावयास हवे होते. हे लेख आहेत ते शेवटचा सातवाहन राजा पुलमायी याचे. त्यावरून हे अनुमान काढणे सयुक्तिक नाही. कर्नाटक हा सातवाहनमाम्राज्यात होता. तेव्हा तेथे त्याचे कोरीव लेख असणे हे स्वाभाविक आहे. तेवढ्यावरून ते त्याचे मूलस्थान ठरत नाही.

स्वभूमी - कर्मभूमी
 पण माझ्या मते एखादे राजघराणे वा राजकुल हे आंध्र आहे का कन्नड आहे का महाराष्ट्रीय आहे हे त्या घराण्याने स्वभूमी कोणती मानली, कर्मभूमी कोणती स्वीकारली, पिढ्यान् पिढ्या ते कोणत्या देशात राहिले, कोणत्या भूमीच्या जीवनाशी ते एकजीव झाले यावरून ठरविले पाहिजे. नेपोलियन हा इटलीजवळच्या कोर्सिका बेटातला मूळचा. पण त्याने फ्रान्स ही कर्मभूमी निवडली, फ्रेंचांसह पराक्रम केले. तो फ्रेंच झाला. आयसेन होअर, रूझवेल्ट हे मूळ जर्मन, डच असे होते. पण काही पिढ्या ही घराणी अमेरिकेत राहिली, ती त्यांनी स्वभूमी मानली व ते अमेरिकन झाले. राष्ट्रकूट घराण्याविषयी लिहिताना डॉ. आळतेकर म्हणतात, या घराण्याचा मूळ राजपुरुष दंतिदुर्ग याच्या चार पिढ्या महाराष्ट्रात गेल्या होत्या. त्यामुळे दंतिदुर्ग महाराष्ट्रीय झाला होता. मूळचे ते घराणे लातूर या कानडी भाषी परगण्यातले होते. ( अर्ली हिस्टरी ऑफ दि डेक्कन, सं. यजदानी, पृ. २५० ). भारतातल्या अनेक राजघराण्यांचे असे आहे. अनेक घराणी आपल्या शिलालेखांत आपण चंद्रसूर्यवंशी असून मधुरा, अयोध्या हे आपले मूलस्थान, असे सांगतात. पण त्यावर काही अवलंबून नाही हे उघड आहे. ती घराणी पिढ्यान् पिढ्या कोठे राहिली, त्यांनी स्वभूमी - कर्मभूमी कोणती मानली यावरून हा निर्णय केला पाहिजे. आणि या दृष्टीने पाहिले तर सातवाहन हे घराणे संपूर्णपणे महाराष्ट्रीय होते याविषयी शंका राहात नाही. त्यांची राजधानी पैठण, त्यांचे कोरीव लेख नाशिक, कार्ले, कान्हेरी या परिसरात. त्यांच्या प्रारंभीच्या राजपुरुषांच्या प्रतिमा कोरल्या आहेत त्या जुन्नरजवळील नाणेघाटात. गाथासप्तशती हा ग्रंथ वर्णन करतो ते महाराष्ट्रजीवनाचे. यावरून या घराण्याचे महाराष्ट्रीयत्व वादातीत दिसते. त्यांची भाषा महाराष्ट्री प्राकृत होती हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. पण ती भाषा घेऊन ते पिढ्यान् पिढ्या अन्य प्रांतात राहिले असते तर त्यांना महाराष्ट्रीय म्हणणे अवघडच गेले असते. कांचीचे पल्लव हे सातवाहनाप्रमाणेच मोठे राजघराणे होते. त्यांची भाषा महाराष्ट्री होती. त्यांची एकंदर चार घराणी झाली. त्यांतील पहिल्या दोन घराण्यांचे काही शिलालेख प्राकृतात आहेत, काही संस्कृतात आहेत, तामीळमध्ये एकही नाही. ते शिव, विष्णू यांचे उपासक होते. त्यांनी याच देवतांची मंदिरे बांधली, तामीळ वाङ्मयातील देवतांची बांधली नाहीत. ( जर्नल ऑफ इंडियन हिस्टरी, नोव्हें. १९२२, दि ऑरिजिन अँड अर्ली हिस्टरी ऑफ दि पल्लवाज - डॉ. एस. कृष्णस्वामी आयंगार. ) तरीही तामीळनाड या भूमीत त्यांनी शतकानुशतक निवास केला व पराक्रम तेथेच केले. म्हणून ते महाराष्ट्र-भाषी असले तरी त्यांना तामीळीच मानणे युक्त होय. याच विचारसरणीने सातवाहन हे महाराष्ट्रीय ठरतात. त्यांची भाषा महाराष्ट्री प्राकृत होती या प्रमाणाने हा निर्णय जास्त दृढ होतो यात शंका नाही.

प्रारंभकाळ
 यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सातवाहनांच्या प्रारंभकाळाचा. अशोकाच्या मृत्यूच्या सुमारास म्हणजे इ. स. पूर्व २३६ च्या आसपास सातवाहन सत्तेला प्रारंभ झाला असे म. म. मिराशी यांचे मत असल्याचे वर सांगितलेच आहे. पण डॉ रा. गो. भांडारकर यांच्या मते हा काळ इ. स. पू. ७३ असा आहे आणि डॉ. डी. सी. सरकार यांच्या मते तो इ. स. पूर्व ३० पर्यंत अलीकडे येतो. डॉ. गोपाळाचारी यांनी ' सातवाहन साम्राज्य ' या आपल्या लेखात इ. पू. २३५ हा काळ निश्चित केला आहे तो मला ग्राह्य वाटतो. शकक्षत्रप रुद्रदामा याचा गिरनार येथील शिलालेख हा इ. स. १५० या वर्षांचा आहे हे बहुमान्य झाले आहे. त्यात त्याने दक्षिणापथपती शातकर्णी याचा उल्लेख केला आहे. हा शातकर्णी सातवाहन म्हणजे शिवश्री पुलुमायी होय, हेही आज बहुमान्य झाले आहे. सातवाहन वंशात एकंदर ३२ राजे होऊन गेले. त्यात शिवश्री पुलुमयी हा सव्विसावा राजा होय. पुराणात त्याच्या आधीच्या राजांच्या राजसत्तेची गणना दिली आहे; तीवरून हिशेब करता इ. स. १५० च्या मागे आपणांस इ. स. पूर्व २३५ या वर्षापर्यंत जावे लागते. जुन्नर जवळील नाणेघाटात सातवाहनांचे जे शिलालेख उपलब्ध झाले आहेत ते त्यांतील लिपीवरून (अक्षरांच्या ठेवणीवरून ) इ. स. पूर्व २०० ते २५० या काळातील असले पाहिजेत असे व्यूलर या पंडिताचे मत आहे. आणि बहुतेक संशोधकांना ते मान्य आहे, असे डॉ. केतकर म्हणतात. ( प्राचीन महाराष्ट्र, भाग १ ला पृ. ४०८ व ४०९ ) वर उल्लेखिलेल्या 'काँप्रिहेनसिव्ह हिस्टरी ऑफ इंडिया' या ग्रंथात डॉ. जे. एन. बॅनर्जी यांनी 'उत्तर व पश्चिम भारतातील क्षत्रपसत्ता' हे प्रकरण लिहिले असून त्यात त्यांनी डॉ. के. गोपळाचारी यांच्याच मताला पुष्टी दिली आहे. सातवाहनसत्तेच्या अखेरीविषयी फारसे मतभेद नाहीत. तेव्हा इ. स. पूर्व २३५ ते इ. स. २२५ हा सातवाहन राजवंशाचा सत्ताकाळ होय, हे डॉ. के. गोपाळाचारी यांचे मत मान्य होईल असे वाटते. मूळ कुळपुरुष सातवाहन हा अर्थातच इ. पू. २३५ पूर्वीचा होय.

ब्राह्मण-क्षत्रिय ?
 सातवाहन हे राजे वर्णाने ब्राह्मण होते की क्षत्रिय होते की शूद्र होते, हा प्रश्न बराच वादग्रस्त आहे. दंतकथा व पुराणे याअन्वये, मूळ सातवाहन हा ब्राह्मण स्त्री व नागपुरुष यांच्यापासून झाला, असे आहे. पण नाशिक येथील गौतमी बलश्री ( महाराज गौतमीपुत्र सातकर्णी याची माता ) हिने कोरविलेल्या लेखात आपल्या पुत्राचा 'एक ब्राह्मण', 'क्षत्रियदर्पमानमर्दन' असा गौरव केला आहे. 'एक बाह्मण' 'खतियदपमानमदन' असे मूळ शब्द आहेत. त्याचप्रमाणे तिने स्वतःला ' राजर्षि- वधू' असे म्हणविले आहे. यांवरून दंतकथा अगदीच त्याज्य होत, यात शंका नाही. पण वरील पदव्यांवरून निरनिराळे वाद निर्माण होतात, हेही खरे आहे. 'एक बह्मण' याचा ' असामान्य ब्राह्मण' असा सेनार्ट याने अर्थ केला आहे व 'ब्राह्मण या नावाला एकमेव योग्य ' असा बुल्हरने केला आहे. डॉ. भांडारकर 'ब्राह्मणांचा एकमेव प्रति- पालक' असा अर्थ घेतात. तो जास्त संयुक्तिक वाटतो. गौतम बलश्री स्वतःला राजर्षि- वधू म्हणविते. यावरून त्या घराण्याचे क्षत्रियत्वच सिद्ध होते. म्हणून डॉ. भांडारकरांचा अर्थ ग्राह्य वाटतो. पण ' खतिय-दप - मान-मदन' अशीही गौतमीपुत्राला पदवी आहे. ती वरील अनुमानाच्या विरुद्ध जाते. पण तेथे ' खतिय' याचा अर्थ सर्व क्षत्रिय राजे असा घेण्याचे कारण नाही. क्षत्रिय ही एक त्या काळी स्वतंत्र जमात असू शकेल. त्या काळी शूद्र हेही एका वर्णाचे नाव नसून जमातीचे नाव असल्याचे उल्लेख आहेत. डॉ. जयस्वाल यांच्या मते, येथे खतिय हे एका जमातीचे नाव मानणं युक्त आहे. सध्या खत्री नावाची जमात मुंबई प्रांतात व अन्यत्रही आहे. डॉ. कुमारी भ्रमर धोप यांनी 'दि कास्ट ऑफ दि सातवाहन रूलर्स आफ दि डेक्कन' या आपल्या लेखात वरील विवेचन करून, सातवाहन क्षत्रिय होते, असे अनुमान काढले आहे. ( इंडियन कल्चर-ऑक्टो. १९३४, पृ. ५१३. शूद्र ही एक जमात होती, असे त्याच अंकात बी. सी. लॉ यांनी आपल्या लेखात सांगितले आहे. पृ. ३०४.) मनूने शकयवनपल्हवपारद यांना संस्कारलोपामुळे शूद्रत्व पावलेले क्षत्रिय असे म्हटले आहे. गौतमीपुत्राने शकांचा निःपात केला. तेव्हा त्यांना उद्देशूनही ' खतिय' हा शब्द वापरलेला असण्याचा संभव आहे. या सर्वावरून सातवाहन हे क्षत्रिय असावे असे मानण्याकडे कल होतो. तरी हा प्रश्न वादग्रस्त असून त्याचा समाधानकारक निर्णय लावता येत नाही हे खरे आहे. पण माझ्या दृष्टीने त्याला फारसे महत्त्व नाही. जुन्या परंपरेप्रमाणे व पुराणांन्वये नंदवंश व मौर्यवंश यांचे संस्थापकही शूद्र होते. प्राचीन काळातले अनेक ऋषिमुनी अगदी हीनवंशीय होते. तेव्हा सातवाहन हे शूद्र होते असे ठरले तर त्यात खेदजनक असे काही नसून, हीनकुलीन पुरुषही इतक्या थोर पदवीला त्या काळात जाऊ शकत असत, त्यांच्या कर्तृत्वाला द्विजांइतकाच तेव्हा अवसर व मान होता, असे त्यावरून ठरत असल्यामुळे त्या काळच्या समाजरचनेला ते भूषणावह होते असेच मानावयास पाहिजे.
 मेवाडच्या गोहिल किंवा गोहिलोट वंशातील राजांचे जे शिलालेख आता उपलब्ध झाले आहेत त्यांवरून प्राचीन काळच्या घराण्यांचे ब्राह्मणत्व वा क्षत्रियत्व निश्चित करणे किती अवघड आहे व त्यामुळेच व्यर्थ आहे हे दिसून येते. शक्तिकुमार या गोहिलोटवंशीय राजाचा इ. स. ९७७ मधला शिलालेख ऐतपूर येथे सापडला आहे. त्यात म्हटले आहे की या वंशाचा मूळपुरुष गुहदत्त हा विप्रकुलानंदन महीदेव ( ब्राह्मण ) होता. चितोडचा इ. स. १२७४ चा लेख सांगतो की बाप्पारावळ हा विप्र होता. अचलेश्वरचा १२८५ चा लेख म्हणतो की बाप्पाने ब्रह्मतेज टाकून क्षात्रतेज स्वीकारले. चितोडच्या १२७४ च्या लेखात राजा अंबाप्रसाद याचे वर्णन आहे की तो भृगुपती परशुराम याप्रमाणे महातेजस्वी असून क्षत्रसंहारकारी होता. हा क्षत्रिय राजा असून तो क्षत्रसंहारकारी होता या म्हणण्याचा अर्थ काय ? पण म्हणून त्याला व त्याच्या घराण्याला ब्राह्मण म्हणावे तर अनेक लेखांत त्यांना क्षत्रियही म्हटले आहे. अंबाप्रसादाचा एक पूर्वज नरवाहन याला क्षत्रक्षेत्र म्हटले आहे. या घराण्याच्या सोयरिकी राष्ट्रकूट, चाहमान, परमार यांशी होत असत. आश्चर्य असे की प्रतीहार, चाहमान, परमार या कुळांनीही आपण ब्राह्मण असल्याचा दावा केलेला काही लेखांत आढळतो. इ. स. ८३७ चा जोधपूर येथील प्रतीहार वौक याचा लेख, आणि इ. स. ११६९ चा बिजोलिया येथील सोमेश्वर चाहमानाचा लेख याची साक्ष देतील. ( जी सी. रायचौधरी, गुहिलोट ऑरिजिन्स, देवदत्त भांडारकर व्हॉल्यूम, पृ. ३११–१६.)

मातृवंशपद्धती ?
 सातवाहन घराण्यात मातृवंशपद्धती होती, मातृसत्ताक कुटुंबपद्धती होती, असे एक मत आहे. डॉ. केतकर व इतिहासाचार्य राजवाडे या मताचे पुरस्कर्ते आहेत. या घराण्यात गौतमीपुत्र सातकर्णी, वसिष्ठीपुत्र पुलुमायी अशी मातेचा निर्देश करणारी नावे दिसतात. यावरून या कुळात मातृवंशपद्धत होती असे राजवाडे म्हणतात. (राधामाधवविलासचंपू, पृ. १८० ) त्यांच्या मते मगधातून आलेल्या महाराष्ट्रिकांनी महाराष्ट्र बसविला. त्यांच्यात ही पद्धत नव्हती. यावरून सातवाहन हे. त्यांच्यात मातृवंशपद्धती असल्यामुळे, महाराष्ट्रीय नव्हत असेही राजवाडे म्हणतात डॉ. केतकरांनी गौतमीपुत्र, वसिष्ठीपुत्र इ. नावांचा आधार घेतलाच आहे. शिवाय भावाच्या घरी राहात असलेल्या एका ब्राह्मणविधवेला शेषापासून सातवाहन हा मुलगा झाला या दंतकथेचाही आधार त्यांनी घेतला आहे. शिवाय कोचीन, मलबार या प्रदेशांत स्त्री माहेरीच भावाजवळ राहाते, पती वरचेवर बदलते, पतीच्या घरी जात नाही अशी जी रुढी आहे, तिचा निर्देश केला आहे. सर्वात आश्रर्याची गोष्ट म्हणजे या दोघाही थोर पंडितांनी प्रत्यक्ष सातवाहनांच्या इतिहासाकडे दुर्लक्ष केले आहे. पुराणे व कोरीव लेख यांच्या आधारे त्यांचा जो इतिहास दिसतो त्यावरून असे दिसते की प्रत्येक ठिकाणी पित्यामागून पुत्रच गादीवर आला आहे. चुकूनमुद्धा याउलट दिसत नाही. नागनिका, गौतमीवलश्री या स्त्रिया आपल्या पतीच्या घरीच रहात होत्या. आपले पती, पुत्र, नातू यांच्याशी असलेले नातेच त्या अभिमानाने सांगतात. पतीच्या मृत्यूनंतर तापसीव्रताने जन्मक्षेप करतात. अशा स्थितीत या घराण्यात मातृकन्यापरंपरा होती, मातृ सत्ताककुटुंबपद्धती होती, ( डॉ. केतकर, प्राचीन महाराष्ट्र भाग २ रा, पृ. ५१ ) अशी विधाने करणे युक्त नाही.
 डॉ. गोपाळाचारी यांनी आपल्या प्रबंधात विस्तृत विचार केला आहे. ते म्हणतात, सातवाहन घराण्यात ही मातेवरून निर्देश करण्याची पद्धत गौतमीपुत्रापूर्वी नव्हती. पुढे ती त्यांच्या घराण्यात दिसून येते. तशीच महारष्ट्रातील महारथी महाभोज या घराण्यातही दिसून येते. वेदकाळातील कौशिकीपुत्र, आलंबीपुत्र अशी मातृनिर्देश करणारी नावे आढळतात. बौद्धवाङमयातही वैदेहीपुत, मोगलीपुत अशी नावे ठेवण्याची पद्धत दिसते. माळव्यातल्या अनेक शिलालेखांत असा मातेवरून केलेला पुत्राचा निर्देश दिसतो. बुल्हरच्या मते आजही रजपुतांत अशी चाल आहे. कदाचित राजाला अनेक राण्या असतात, त्यामुळे पुत्राचा निर्देश करताना मातेचा निर्देश करण्याची पद्धत पडली असेल; पण त्यावरून त्या घराण्यात मातृसत्ताकपद्धती किं मातृवंशपद्धती होती असे म्हणण्याला अर्थ नाही.

शालिवाहन शक ?
 सध्या दक्षिणेत शालिवाहन शक रूढ आहे. गौतमीपुत्र सातकर्णीने तो स्थापिला असे स. आ. जोगळेकर म्हणतात. श्री. जी. बोस यांचेही तसेच मत आहे. पण हे मत टिकण्याजोगे नाही. गौतमीपुत्राने तो स्थापिला असता तर त्याच्या पुढील सातवाहनांनी तो आपल्या कोरीव लेखांत निश्चित योजिला असता. त्यांनी तर तो नाहीच योजिला, पण पुढे शकगणना ज्यांनी स्वीकारली त्यांनीही तिचा फक्त शककाल असाच उल्लेख केला आहे. शालिवाहन हे नाव तिच्याशी जोडले गेले ते इ. स. एक हजारनंतर ! पण शालिवाहन - सातवाहन - या नावाशी शककालगणना संलग्न झाली आहे व धर्मकृत्यांतही ती मानलेली आहे. तेव्हा बऱ्याच उत्तरकाळी मूळ शकराजांनी स्थापिलेल्या या गणनेला कोणीतरी शालिवाहनाचे नाव देऊन ती पावन करून घेतली असली पाहिजे, असे म्हणावे लागते. म. म. मिराशी, डॉ. के. गोपाळाचारी यांचे असेच मत आहे.

स्वराज्यस्थापना
 वर सांगितकेच आहे की अशोकाच्या मृत्युच्या सुमारास सातवाहननामक पुरुषाने महाराष्ट्रातील प्रतिष्ठान या नगरीत सातवाहनसत्तेची स्थापना केली. मौर्य साम्राज्य दक्षिणेस म्हैसूरपर्यंत पसरलेले होते. अर्थात महाराष्ट्राचा त्यात अंतर्भाव असलाच पाहिजे असे काही पंडितांना वाटते. अपरान्त म्हणजे उत्तर कोकण यावर मोर्यसत्ता होती याबद्दल वाद नाही. पण अशोकाचे शिलालेख महाराष्ट्रात नाहीत यावरून त्याची सत्ता महाराष्ट्रावर नसावी, असे डॉ. केतकर म्हणतात. मात्र त्यांचे धर्मप्रसारक महाराष्ट्रात पोचले होते हे त्यांना मान्य आहे. (प्राचीन महाराष्ट्र, भाग १ ला, प्रकरण ४४ वे.) पण याविषयी निश्चित असे काही सांगणे कठीण आहे. सातवाहन हे मौर्याचे मांडलीक होते, असेही एक मत आहे. पुराणात त्यांना कोठे आंध्र म्हटले आहे, कोठे आंध्रभृत्यही म्हटले आहे. आंध्रभृत्य हा समास कर्मधारय करून तो आंध्र हेच भृत्य, असा काही पंडित सोडवितात. आणि सातवाहन हे मूळचे आंध्र होते व ते मौर्यांचे भृत्य होते म्हणून त्यांना आंध्रभृत्य म्हटले असावे, असे अनुमान करतात; पण यालाही निश्चित असा पुरावा काही नाही. सातवाहन या राजाने अशोकाच्या अखेरीच्या काळात आपले स्वतंत्र राज्य महाराष्ट्रात स्थापन केले एवढेच. त्याची जी नाणी अलीकडे सापडली आहेत त्यांच्या आधारे, आपणास आज म्हणता येते. हे राज्य स्थापिताना त्याला मौर्यसत्तेशी लढावे लागले असा कोठेही उल्लेख नाही. असा काही लढा झाला नाही यावरून मौर्यांचे साम्राज्य महाराष्ट्रात नसावे किंवा असल्यास या वेळी ती सत्ता अगदी दुर्बळ झाली असावी असे अनुमान करावे लागते.
 मूळ संस्थापक श्री सातवाहन याचा पुराणात किंवा कोणत्याही शिलालेखात उल्लेख नसल्यामुळे त्याच्याविषयी अधिक काहीच माहिती उपलब्ध नाही. १९४५ साली त्याची नाणी सापडली तोपर्यंत त्याच्या अस्तित्वाचीही कोणास माहिती नव्हती. त्या नाण्यांमुळे तो मूळ संस्थापक होता हे कळले हेच विशेष होय. पुराणांनी व शिलालेखांनी उल्लेखिलेल्या या वंशातील पहिला राजा म्हणजे सिमुक सातवाहन हा होय. नाणेघाटातील कोरीव लेखात त्याची भग्नप्रतिमाही आहे. तिच्याखाली 'राया सिमुक सातवाहनो सिरिमातो' असा त्याचा निर्देश आहे. मौयसत्ता ज्या कोणत्या रूपात होती ती नष्ट करून त्याने स्वराज्याची स्थापना केली. त्या वेळी त्याला रथिक व भोज या जमातींची फार मदत झाली, म्हणून त्याने स्वतः राया ही पदवी स्वीकारली त्यावेळी त्यांच्या प्रमुखांना महारथी ही पदवी दिली व त्यांच्याशी सोयरीकही केली. त्याने एकंदर इ. पू. २३५ ते इ. पू. २१३ असे तेवीस वर्षे राज्य केले. त्याच्या राज्याचा विस्तार हा शिवछत्रपतींच्या प्रारंभीच्या विस्ताराइतका अल्प, प्रतिष्ठानच्या आसपासच्या परिसरापुरताच असणार हे उघड आहे.

साम्राज्य
 सिमुकानंतर त्याचा भाऊ कान्ह अथवा कृष्ण हा गादीवर आला. त्याने आपल्या अठरा वर्षांच्या कारकीर्दीत राज्यविस्ताराचेच धोरण पुढे चालवून नाशिकपर्यंतचा प्रदेश जिंकला. त्याच्यामागून सिमुकाचा पुत्र सिरी सातकणी - श्री सातकर्णी हा सत्तारूढ झाला. सातवाहन कुलात सम्राटपद प्रात करून घेणारा हा पहिला महाराजा होय. या वेळी उत्तरेत राजसत्ता ढिली झाली होती. डेमिट्रियस या बॅक्ट्रियाच्या ग्रीक राजाने अयोध्येपर्यंत आपली ठाणी वसविली होती. आणि सर्वत्र बौद्धधर्मातील अहिंसा तत्त्व प्रबळ झालेले असल्यामुळे त्याला कोणीच प्रतिकार करीत नव्हता. मगधसम्राट बौद्धधर्मनिष्ठ असल्यामुळे व त्यांनाही शस्त्रविजयापेक्षा धम्मविजयच श्रेष्ठ वाटत असल्यामुळे सर्व उत्तर भारत निर्वीर झाला होता. आणि महाराष्ट्रात श्री सातकर्णी, कलिंगात खारवेल व मगधात पुष्यमित्र हे कर्तेपुरुष निर्माण झाले नसते तर सर्व भारत यवनांनी - ग्रीकांनी आक्रमिला असता. या सर्वात सातकर्णीने आघाडी मारून उत्तरेत चाल केली व पश्चिम माळवा, अनूप - ( नर्मदेचे खोरे) आणि विदर्भ आपल्या साम्राज्यात समाविष्ट करून टाकले. हे प्रदेश त्याने घेतले ते मौर्यसाम्राज्यातून. पण यावेळी मौर्य अगदी निष्प्रभ झाले होते. तेव्हा अयोध्येपर्यंत आलेल्या यवनांनी सहज गिळंकृत केले असते. सातकर्णीने ते घेतले म्हणूनच वाचले.

कलिंगराज खारवेल
 या वेळी खारवेल हा एक अत्यंत प्रबळ राजा कलिंगाधिपती झाला होता. अशोकाच्या मृत्यूनंतर थोड्याच दिवसांनी चेदीवंशातील महामेघवाहन या पुरुषाने मौर्य साम्राज्याचे जू झुगारून देऊन कलिंग प्रदेश स्वतंत्र केला होता. खारखेल हा त्याचाच पुत्र किंवा नातू होय. भुवनेश्वराजवळील उदयगिरीवर हाथीगुंफानामक लेण्यात याच्या पराक्रमाचा दीर्घ शिलालेख आहे. त्यावरून असे दिसते की याने मगध साम्राज्यावर तीन वेळा स्वारी केली होती आणि एका स्वारीत मौर्यसम्राटाला पायाशी लोळवून तेथून अपार लूट कलिंगाला नेली होती. दुसऱ्या स्वारीचे कारण डेमिट्रियस हे होते. मौर्य- सम्राट बृहद्रथ हा त्याचा मुळीच प्रतिकार करीना. तेव्हा तो पाटलीपुत्रावर चाल करून येणार असा रंग दिसू लागला. म्हणून खारवेलानेच आधी चढाई केली. काही पंडितांचे मत असे की या स्वारीत त्याने डेमिट्रियसचा पराभव करून त्याला सिंधूपार पिटाळून लावले. दुसरे मत असे की डेमिट्रियसच्या स्वतःच्या बॅक्ट्रियाच्या राज्यातच शुक्रेडायटीम या प्रतापी पुरुषाने बंड केल्यामुळे त्याला घाईने परत जावे लागले. आणि खारवेलाच्या भीतीने तो पळून गेला असे श्रेय खारवेलाला उगीचच मिळाले. हा राजकीय पट पाहताना आपण एवढेच ध्यानात घ्यावयाचे की अशोकाने अहिंसा व धम्मविजय यांच्यापायी, चंद्रगुप्त मौर्याने उभारलेली समर्थ व कार्यक्षम राज्ययंत्रणा ढिली केली आणि लोकांतही बौद्धधर्माचा प्रसार केला. त्यामुळे मौर्यसाम्राज्य-राजे - आणि लोकही दुबळे होऊन गेले होते, आणि ते सर्वांचे भक्ष्य बनले होते. प्रतिकार असा तेथे कोणी करीतच नव्हता. त्यामुळे वायव्येकडून येणाऱ्या यवन आक्रमकांना पाटलीपुत्रापर्यंत सहज घुसता आले. पण त्याच वेळी सातकर्णी व खारवेल हे उदयास आल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

महाराष्ट्रावर स्वारी
 खारवेल हा मोठा प्रतापी व महत्त्वाकांक्षी पुरुष होता. मगधाची लूट केल्यानंतर त्याने आपली दृष्टी सातवाहन साम्राज्याकडे वळविली आणि मूषिकनगरापर्यंत एक प्रचंड सेना धाडली. हे नगर कोणाच्या मते वाईनगंगेच्या तर कोणाच्या मते कृष्णेच्या तीरी आहे. याच वेळी खारवेलाला फार मोठा जय मिळाला असे हाथीगुंफेच्या लेखात वर्णन आहे. पण पंडितांच्या मते तसे काही झाल्याचे दिसत नाही. पुढील वर्षी वऱ्हाड, खानदेश व अहमदनगर या प्रदेशांवर खारवेलाने स्वारी केली, तेव्हा मात्र त्यास मोठा जय मिळाला हे सर्वमान्य आहे. खारवेल हा जैनधर्मी होता. पण एकतर तो धर्मसहिष्णू होता आणि दुसरे म्हणजे त्या धर्मातील अहिंसा तत्त्व त्याने राजकारणापासून दूर ठेविले होते; म्हणूनच त्याला एवढे पराक्रम करून यवन आक्रमणाला पायबंद घालता आला.

अश्वमेधकर्ता
 श्री सातकर्णीच्या साम्राज्यावर खारवेलाचे दोनदा आक्रमण झाले तरी त्याने ते तत्काळ मोडून काढले, असे दिसते. कारण त्याने आपल्या अकरा वर्षांच्या लहानशा कारकीदींत ( इ. पू. १९४ ते इ. पू. १८५ ) दोनदा अश्वमेध यज्ञ केला आणि एकदा राजसूय यज्ञ केला. हे यज्ञ व अग्न्याधेय, अन्वारंभणीय, गवामयन, आप्तोर्याम, अंगिरसामयन, छंदोग - पवमान, अतिरात्र, दशरात्र, त्रयोदशरात्र इ. त्याने जे इतर अनेक यज्ञ केले, त्यांवरून वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्धार करूनच त्याने साम्राज्य–विस्तार केला हे उघड आहे. दीर्घकालपर्यंत महाराष्ट्रात बौद्धवर्चस्व प्रस्थापित झाले होते. सातवाहनांनी ते नष्ट करून विजीगिषू, विश्वविजयी, साम्राज्यकांक्षी वैदिक धर्माचा पुनरुद्धार केला हे त्यांचे फार मोठे कार्य होय. श्री सातकर्णी याची राणी नायनिका अथवा नागनिका हिने जुन्नरजवळील नाणेघाटात जो मोठा लेख कोरविला आहे, त्यावरून सातवाहन हे वैदिकधर्मीय व हिंदु परंपरेचे अभिमानी होते हेच दिसून येते. त्या लेखात इन्द्र, संकर्षण, वासुदेव यांना प्रारंभी नमन आहे. नंतर यम, वरुण, कुबेर, वासव यांना नमन आहे. वर ज्या यज्ञांचा उल्लेख केला आहे त्यांत प्रत्येक वेळी ब्राह्मणांना किती गायी, अश्व व धन दक्षिणा दिली ते नमूद केलेले आहे. यावरून याविषयी संशयाला जागा कोठे राहात नाही.

नायनिका
 सातकर्णीची राणी देवी नायनिका हिची म. म. मिराशी हे भारतवर्षातील महनीय स्त्रियांत गणना करतात. महाराष्ट्रात त्या वेळी अनेक नागसरदार होते. ते महारठी ही पदवी धारण करीत. सिमुक सातवाहनानेच त्यांना या पदव्या दिल्या होत्या, हे वर सांगितलेच आहे. अशाच एका महारठी त्रणकयिरो नावाच्या सरदाराची नायनिका ही कन्या होती. वेदिश्री, सतिश्री, हकुश्री या तिच्या पुत्रांचे पुतळेही नाणेघाटात आहेत. सातकर्णी मृत्यू पावला त्या वेळी कुमार वेदश्री हा लहान होता. त्यावेळी आपल्या पित्याच्या साह्याने देवी नायनिकेने साम्राज्याचा कारभार उत्तम चालविला. पतिनिधनानंतर तापसीव्रताने ती राहात असे, असे शिलालेखात तिने वर्णन आहे. तापसीव्रताने राहून राज्यकारभार करणाऱ्या या महाराणीचे वर्णन वाचून देवी अहल्याबाईचे वाचकांना सहज स्मरण होईल.

पुष्यमित्र शुंग
 सम्राट श्री सातकर्णी इ. पू. १८५ या वर्षी मृत्यू पावला. त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे १८४ साली मगधात राज्यक्रान्ती झाली. अशोकानंतरचे राजे दुबळे व प्रतिकारशून्य असल्याने साम्राज्याची वाताहात होत होती आणि सर्वत्र बजबज माजून प्रजेत अत्यंत असंतोष निर्माण झाला होता. यावनी आक्रमणाची भीती तर सारखी वाढतच होती. अशा वेळी पुष्यमित्राचा उदय झाला. तो मौर्यसम्राट बृहद्रथ याचा सेनापती होता. एकदा संचलनाचे वेळी उठावणी करून त्याने बृहद्रथाला ठार मारले व आपण सम्राटपद धारण करून आपल्या शुंगवंशाची स्थापना केली. या पुष्यमित्राने खुद्द पाटलीपुत्रातच अश्वमेध केला व दुबळ्या, निवृत्तिप्रधान बौद्धधर्माला बाजूस सारून वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले. या शुंगवंशाने इ. पू. १८४ ते इ. पू. ७२ असे ११२ वर्षे राज्य केले.

विदिशेपर्यंत
 पहिल्या सातकर्णीनंतर तेवढाच पराक्रमी सातवाहन राजा म्हणजे दुसरा सातकर्णी हा होय. त्याने इ. स. १६६ पासून इ. पू. १११ पर्यंत म्हणजे ५६ वर्षे राज्य केले; आणि सातवाहन साम्राज्याला दृढता व स्थैर्य प्राप्त करून दिले. पहिल्या सातकर्णीने पश्चिम माळवा जिंकला होता. याने पूर्व माळवाही जिंकला. विदिशेला (भिलसा ) एका शिलालेखात सातकर्णीचा उल्लेख आहे तो याचाच असावा असे पंडितांचे मत आहे. साची येथील महाद्वारावर सातकर्णीच्या पदरी असलेला शिल्पकार वसिष्ठीपुत्र आनंद याचा दानविषयक एक लेख कोरलेला आहे. त्यावरून तेथपर्यंत सातवाहनसत्ता स्थिर झाली होती असे दिसून येईल. डॉ. केतकरांच्या मते, प्रयागजवळच्या उत्खननात सापडलेल्या मुद्रा- शिक्के- या सातवाहनांच्या व त्यांच्या अधिकाऱ्यांच्या आहेत. तसे असले तर सातवाहनसाम्राज्य तेथपर्यंत पोचले होते असा अर्थ होईल. पण त्या मुद्रा वाकाटकांच्या आहेत असे डॉ. जयस्वाल यांचे मत आहे. (प्राचीन महाराष्ट्र, भाग १ ला, डॉ. केतकर, पृ. ३९९.)

वीर विक्रम ?
 कालकाचार्यांच्या कथेतला वीर विक्रम म्हणजे हा दुसरा सातकर्णीच होय असे गाथासप्तशतीचे संपादक स. आ. जोगळेकर यांचे मत आहे. कालक हे जैन आचार्य. ते धर्मप्रसारार्थ उज्जयिनीस आले असता तेथील राजा गर्दभिल्ल तथा गंधर्वसेन याने त्यांची बहीण सरस्वती हिचे हरण केले. तिची सुटका करण्याचे सर्व प्रयत्न विफल झाल्यावर आचार्यांनी शकराजांना उज्जयिनीवर स्वारी करण्यासाठी निमंत्रण दिले. ( भारतीयांनी हीच परंपरा आजपर्यंत अखंडपणे चालविली आहे. ) त्याप्रमाणे बोलनघाटातून येऊन शक उज्जयिनीवर कोसळून पडले, त्यांनी गंधर्वसेनाचा नाश करून सरस्वतीची सुटका केली. पण काम झाल्यावर ते परत जाईनात. त्यांनी माळव्याचे राज्य बळकावले व प्रजेवर ते अनन्वित अत्याचार करू लागले. कालकाचार्यांचीही ते अप्रतिष्ठा करू लागले. तेव्हा त्यांचा उच्छेद करण्याच्या हेतूने सातवाहन राजाची मदत मागण्यासाठी आचार्य प्रतिष्ठानास आले. सातवाहन राजाने त्यांची मागणी मान्य केली व सेना घेऊन तो माळव्यात गेला व त्याने मालवगणांच्या मदतीने शकांना पिटाळून लावले. हा सातवाहन राजा म्हणजे दुसरा सातकर्णी होय, असे जोगळेकर म्हणतात. त्यांच्या मते मूळ कथेतला वीर विक्रम तो हाच होय. मात्र संवतकर्ता जो विक्रमादित्य त्याच्याशी ते याचा संबंध जोडीत नाहीत.
 सातकर्णीने कालकाचार्यांच्या विनंतीवरून माळव्यात जाऊन शकांचा उच्छेद केला या घटनेला थोडा विश्वसनीय पुरावा सध्या उपलब्ध झाला आहे. जैनांचे पर्युषणपर्व श्रावणात असे ते कालकाचार्यांनी बदलून भाद्रपदात आणले असा इतिहास आहे. 'युग प्रधानस्वरूप ' या जैन ग्रंथाप्रमाणे हे कालकाचार्य इ. स. पू. १७१च्या सुमारास होऊन गेले. दुसऱ्या सातकर्णीचा हाच काळ आहे. आणि जैन कालकाचार्यकथेप्रमाणे हेच आचार्य प्रतिष्ठानला सातवाहन राजाकडे आले होते. यामुळे जोगळेकरांचे अनुमान खरे असावे असे वाटते.
 पहिल्या सातकर्णीविषयीही जोगळेकरांनी थोडी निराळी माहिती दिली आहे. त्यांच्या मते पुष्यमित्राने मिनँडर - मिलिंद - या बौद्धधर्मी ग्रीक राजाचा पराभव केला व त्याला सीमापार केले, त्या वेळी त्याला या सातकर्णनि साह्य केले होते. पहिल्या सातकर्णीचा मृत्यू इ. पू. १८५ या साली झाला असे वर दिले आहे. पुष्यमित्राचा उदय त्यानंतर एक वर्षाने म्हणजे इ. पू. १८४ साली झाला व त्याने मिनेडरचा उच्छेद इ. पू. १७५ साली केला असे एक मत आहे. तेथपर्यंत सातकर्णी जिवंत होता असे जोगळेकर मानतात.

कुलव्रत
 जोगळेकरांचे मत मान्य केले तर परकी आक्रमकांचा उच्छेद करणे हे सातवाहन कुलाचे प्रारंभापासूनच व्रत होते असे दिसून येईल. पहिल्या सातकर्णीने वर सांगितल्याप्रमाणे माळव्यात जाऊन शकांचे निर्दाळण केले आणि इ. सनाच्या पहिल्या शतकात गौतमीपुत्र सातकर्णीने महाराष्ट्रातील शकसत्ता नाश करून टाकिली हे तर सर्वमान्यच आहे. सातवाहनकुलाचे हे वैभव अपूर्व होय यात शंका नाही.

हाल - गाहासत्तसई
 दुसरा सातकर्णी हा सहावा सातवाहन राजा होय. त्यानंतर पुढच्या १४ राजांनी नावे पुराणात आहेत. पण लंबोदर, आपीलक व कुंतल सातकर्णी यांच्या त्रोटक माहितीपलीकडे पुराणांनी काहीच दिलेले नाही. पण मधल्या एकदोन राजांची माहिती नव्याने उपलब्ध झाली आहे. उत्तरेन शुंगसत्ता इ. पू. १८० ते इ. पू. ७२ पर्यंत होती. शुंगांना एका सातवाहन राजानेच सत्ताच्युत केले, असे एक मत आहे. हा सातवाहन म्हणजे पूर्णाेत्संग असावा असे जोगळेकर म्हणतात. शुंगानंतर काण्व वंशाने ४५ वर्षे म्हणजे इ. पू. २७ पर्यंत मगधावर राज्य केले. त्या साली सातवाहन सम्राटाने काण्वांना पदच्युत करून आपली सत्ता स्थापन केली. हा सम्राट बहुधा पुलुमायी असावा. पुराणांनी मगधापर्यंत साम्राज्यविस्तार करण्याचे श्रेय सिमुकाला म्हणजे सातवाहन सत्तेच्या मूळ संस्थापकाला दिले आहे, पण ते चूक आहे. कारण सिमुकाचा काळ यापूर्वी दोनशे वर्षांचा आहे. म्हणून त्या वेळचा सम्राट पुलुमायीच असावा असे वाटते. त्यानंतरचा प्रसिद्ध सातवाहन सम्राट म्हणजे हालराजा होय. याचा काळ इ. स. २१ असा मानला जातो. सातवाहनांविषयी कसलीच गंधवार्ता नव्हती तेव्हा याचे नाव मात्र संस्कृत व प्राकृत साहित्यात गाजत होते. त्याचे कारण म्हणजे त्याने रचलेला गाथासप्तशती - गाहासत्तसई - हा काव्यग्रंथ होय. कवी कोऊहलाने रचलेला महाराष्ट्री प्राकृत भाषेतील काव्याचा - लीलावईचा - हाच नायक होय हे मागे सांगिलेच आहे. त्या काव्यात त्याच्या पराक्रमाचे वर्णन आहे, पण ते सर्व अद्भुतात जमा होणारे व दंतकथांवर आधारलेले आहे. इतिहासात त्याला स्थान देता येणार नाही. हालाच्या वाङ्मयीन कर्तृत्वाचे वर्णन सातवाहनकालीन साहित्याच्या वर्णनात येईलच.


गौतमीपुत्र
 हाल सातवाहनानंतर गौतमीपुत्र सातकर्णी याचे चरित्र सांगावयाचे. ज्याचे यशोवर्णन करताना कवींना स्फूर्ती यावी, इतिहासकारांना अभिमान वाटावा व या भूमीला कृतज्ञतेने ज्याचे स्मरण राहावे असा हा सम्राट होता. सातवाहन कुलातील हा सर्वश्रेष्ठ राजा होय. मुस्लीम आक्रमणापासून महाराष्ट्राला मुक्त करणाऱ्या शिवछत्रपतींचे नाव जितक्या आदराने व भक्तिभावाने आपण घेतो तितक्या आदराने व भक्तिभावाने ज्याचे नाव घ्यावे असा महाराज, राजराज गौतमीपुत्र श्री सातकर्णी हा राजा होऊन गेला. शकपल्हव यांनी केवळ भारतावरच नव्हे, तर पाश्चात्य जगावरही आक्रमण केले होते, आणि देशचे देश बेचिराख केले होते. सातवाहनांच्या साम्राज्यावरही इ. सनाच्या पहिल्या शतकाच्या उत्तरार्धात शकांची टोळधाड कोसळली. त्यांची धडक एवढी प्रचंड होती की काही काल हे बलशाली साम्राज्यही मूळापासून हादरले. पण गौतमीपुत्राचा उदय झाला व त्याने या शकांचे निर्दाळण केले. नाशिक येथे या महापुरुषाची माता गौतमी बलश्री हिने आपल्या प्रियपुत्राची प्रशस्ती, मोठा लेख कोरून, चिरंतन करून ठेविली आहे. त्यात क्षहरातवंश निरवशेषकर, शकपल्हवनिषूदन, त्रिसमुद्रतोयपीतवाहन, असा त्याचा गौरव केला आहे तो अगदी सार्थ आहे.
 ग्रीकयवनांची जी भारतावर आक्रमणे झाली त्यांचा चंद्रगुप्त मौर्य, खारवेल व पुष्यमित्र शुंग यांनी निःपात केला, याचा निर्देश वर जागजागी आलाच आहे. यवनांच्या नंतर शकांच्या टोळधाडी भारतावर येऊ लागल्या. त्यानंतर युएची अथवा कुशान या रानटांचे आक्रमण झाले. त्यांनी तर दीर्घकालपर्यंत उत्तर भारतावर साम्राज्य स्थापिले होते. ते संपुष्टात आल्यावर हूणांच्या टोळधाडी येऊ लागल्या. पण भारतातले लोक त्या काळी समर्थ व पराक्रमी होते. त्यामुळे ही आक्रमणे त्यांनी निर्दाळून त्या आक्रमकांचा निःपात केला, इतकेच नव्हे, तर त्यांच्यावर धार्मिक व सांस्कृतिक विजय मिळवून भारतीय समाजात व संस्कृतीत त्यांना संपूर्णपणे विलीन करून टाकले. शक लोक अशा क्रूर, रानटी जमातींपैकीच होते. उत्तरेत शुंगांनंतर समर्थ अशी राजसत्ता न राहिल्यामुळे त्यांना तेथे भराभर जय मिळाले व तेथे आपली राज्ये स्थापून ते नंतर दक्षिणेत घुसले. पण तेथे त्यांना गौतमीपुत्र सातकर्णी, वसिष्ठीपुत्र पुलमायी, श्री यज्ञ सातकर्णी, असे प्रतापी सातवाहन सम्राट भेटले. त्यांनी दक्षिणेतून त्यांच्या सत्तेचे निर्मूलन करून टाकले.
 यवन, शक, कुशाण ( युएची ) व हूण या चार जमाती इ. स. चौथ्या शतकापासून इ. सनाच्या पाचव्या शतकापर्यंत मधूनमधून आक्रमणे करीत होत्या. यांतील यवन हे ग्रीक होत. ते सुसंस्कृत होते. पण बाकीच्या तीन जमाती या रानटी होत्या. भारताच्या वायव्य सरहद्दीच्या वर एकापलीकडे एक थेट चीन देशापर्यंत शक- कुशाणांची वसतिस्थाने होती. भूगर्भात असलेल्या लाव्हारसासारखीच यांची स्थिती होती. मधूनमधून यांच्यातील अंतराची आग भडकत असे आणि मग यांच्या पाशवी शक्तीचे उद्रेक होऊन जग कंपायमान होई. इ. स. पूर्व पहिल्या शतकात हूणांची टोळधाड कुशाणांवर व त्यांची शकांवर कोसळून शक हे लाव्हाच्या लोंढ्यासारखे भारतात घुसले. त्यांच्या मागोमाग कुशाण हेही आत लोटले व त्यांनी उत्तर भारतावर सम्राज्यच स्थापन केले. शकांना साम्रज्यस्थापनेची ऐपत नव्हती. ते भारतात आधी आले, पण कुशाणांचे ते क्षत्रप–सरदार, सुभेदार म्हणूनच जास्त प्रसिद्ध आहेत. त्यांच्यातील एका क्षहरातवंशीय भूमक नावाच्या क्षत्रपाने प्रथम काठेवाड, गुजराथ व पश्चिम रजपुताना या प्रदेशात आपली सत्ता स्थापन केली नव्हती. नहपान हा याचा मुलगा किंवा वंशज होता. हा व याचा जावई उपवदात ( ऋषभदत्त ) यांनी आपली सत्ता पुष्कळच वाढविली. त्यांनी माळवा आक्रमिला, नर्मदेचे खोरे जिंकले व ते महाराष्ट्रात उतरले. या वेळी म्हणजे इसवी सन १२५ च्या सुमारास मंदालक, पुरींद्रसेन हे प्रतिष्ठानच्या गादीवर असलेले सातवाहन राजे दुबळे होते. त्यामुळे वऱ्हाड, कोकण, कुंतल या भागांवर शकसत्ता स्थापन झाली. नहपान हळूहळू जुन्नर, कार्ले येथपर्यंत घुसला. दोन्ही ठिकाणी त्याचे शिलालेख आहेत. त्यांत त्याने मिळविलेल्या या यशाचा खूपच गौरव केलेला आहे.
 शककुशाणांच्या बाबतीत एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. यांना स्वतःची अशी संस्कृती व धर्म नव्हता. त्यामुळे भारतात येताच ते बौद्ध व वैदिक धर्माचे अनुयायी होत. कुशाणसम्राट कनिष्क हा बौद्ध होता व त्याचा नातू वासुदेव हा परमभागवत म्हणवून घेण्यात भूषण मानीत असे. नहपानाचा जावई याने ऋषभदत्त है हिंदू नाव स्वीकारले होते व तो पौराणिक हिंदुधर्माचा कट्टा पुरस्कर्ता होता. त्याने अनेक गावे ब्राह्मणांना दान दिली, लक्ष भोजने घातली, पुष्करतीर्थात स्नान करून गोप्रदाने दिली, असे उल्लेख त्याच्या शिलालेखांत आहेत. बौद्धांनाही त्याने अशाच उदार देणग्या दिल्या होत्या. यामुळे त्याची सत्ता जास्तच दृढ झाली आणि क्षणभर सातवाहन साम्राज्य नष्ट होणार व अखिल भारत परकीयांच्या सत्तेखाली जाणार अशी चिन्हे दिसू लागली. पण सातवाहनकुलात गौतमीपुत्र सातकर्णीचा उदय झाला व हे भयावह संकट टळले.

शकपल्हवनिपूदन
 साधारणतः इ. स. ३५ ते ९० ही पन्नासपंचावन्न वर्षे महाराष्ट्र शक सत्तेखाली होता. इ. स. ७२ साली गौतमीपुत्र प्रतिष्ठानच्या गादीवर आला व पहिली पंधरासोळा वर्षे तयारीत घालवून नंतर त्याने शकांवर चढाई करण्यास प्रारंभ केला. प्रथम त्याने पुणेप्रांत, मावळ प्रांत मोकळा केला व मग उत्तरेस स्वारी करून रणांगणावर त्याने नहपान व उषवदात या दोघांनाही कंठस्नान घातले आणि मग दक्षिणेत जेवढे म्हणून शक, यवन, पल्हव होते त्यांच्या एकतर त्याने कत्तली केल्या किंवा त्यांना उत्तरेत पिटाळून लावले. यवन हे बौद्ध झाले होते. साहजिकच त्यांचा ओढा या परकीयांकडे होता. त्यामुळे त्यांचेही गौतमीपुत्राने निर्मूलन केले. या विजयानंतर लगेच सतत स्वाऱ्या करून सम्राट सातकर्णीने पूर्वपश्चिम माळवा, नर्मदापरिसर, विदर्भ, कोकण, सर्व उत्तर महाराष्ट्र हे मुक्त केले. आणि उत्तरेकडील क्षत्रपांच्या ताब्यातील पश्चिम रजपुताना, सौराष्ट्र हे प्रदेशही साम्राज्यात समाविष्ट करून टाकले. पुढील काळात महेन्द्र, मलय, आंध्र, कलिंग हेही प्रदेश त्याने जिंकले व 'त्रिसमुद्रतोयपीतवाहन' - हे बिरुद त्याने सार्थ केले. नाशिकच्या लेखात त्याच्या मातेने त्याची राम, केशव, अर्जुन, भीमसेन यांच्याशी तुलना केली आहे, नहुप, जनमेजय, ययाती, सागर यांच्यासारखाच तो पराक्रमी होता असा त्याचा गौरव केला आहे. त्यात मातेचे कौतुक असले तरी सत्यार्थही बराच आहे असे आपणांस दिसून येईल.

सम्राट पुलुमायी
 इ. स. ७२ ते इ. स. ९५ या आपल्या २४ वर्षांच्या कारकीर्दीत शकआक्रमणाचा निःपात करून व सातवाहन साम्राज्यसत्ता पुन्हा दृढ व समर्थ करून गौतमीपुत्र मृत्यू पावला. त्याच्या मागून त्याचा पुत्र वसिष्ठीपुत्र स्वामी श्रीपुलुमायी हा गादीवर आला. तोही पित्यासारखाच पराक्रमी होता. त्याने सातवाहन साम्राज्य दृढ करून वर्धमानही केले. दोन डोलकाठ्यांनी जहाजे - ही चित्रे असलेली त्याची नाणी कॉरोमांडेल किनाऱ्यावरील नगरीत सापडली आहेत. त्यावरून त्याची सत्ता समुद्रापर्यंतच नसून समुद्रावर आणि त्याच्याही पलीकडे पसरली होती हे आता सिद्ध झाले आहे. गौतमी- बलश्री हिने पुत्रासंबंधी नाशिकला शिलालेख कोरविला तो याच्या राज्याच्या १९ व्या वर्षी होय. तिने त्यात 'महाराजपितामही' असे स्वतःचे वर्णन केले आहे. कारण पुलुमायी हा तिचा नातू त्या वेळी सम्राटपदी होता. पुलमायी ( २ रा ) याने इ. स. ९६ ते ११९ अशी २४ वर्षे राज्य केले. त्यानंतर वसिष्ठीपुत्र श्री सातकर्णी हा बहुधा त्याचा भाऊ किंवा नातू - गादीवर आला. हाही पराक्रमी होता. त्याने १२० ते १४९ अशी तीस वर्षे राज्य केले. त्यानंतर शिवश्री पुलमायी हा सम्राट झाला. याच्या कारकीर्दीत सातवाहन —शकसंघर्ष पुन्हा सुरू झाला. वसिष्ठीपुत्र पुलुमायीच्या कारकीर्दीत अखेरीस दुसऱ्या एका शकवंशाने उत्तरेत सत्ता स्थापिली होती. चष्टन या त्या वंशातील क्षत्रपाने कच्छमध्ये राज्य स्थापन केले व हळूहळू राज्यविस्तारास प्रारंभ केला होता. त्याचा महत्त्वाकांक्षी नातू रुद्रदामा हा आता सत्तारूढ झाला. त्याचा शिवश्री पुलुमायीशी संघर्ष सुरू झाला व दोनदा त्याने पुलुमायीचा पराभव केला. गिरनार येथे रुद्रदाम्याचा शिलालेख आहे. त्यात 'रुद्रदाम्याने दक्षिणापथपतीचा दोनदा पराभव केला, पण त्याचा नाश केला नाही; कारण तो त्याचा जवळचा नातलग होता' असे वर्णन आहे. शिवश्री हा रुद्रदाम्याचा जावई होता असे एकमत आहे. दुसऱ्या मतान्वये वसिष्ठीपुत्र सातकर्णी हा जावई असून शिवश्री हा नातू होता. म्हणजे जवळचा नातलग होता हे निश्चित.
 श्री यज्ञ सातकर्णी हा सातवाहन वंशातील शेवटचा मोठा सम्राट होय. इ. स. १६० ते इ. स. १८९ अशी सुमारे तीस वर्षे त्याने सत्ता चालविली. याची नाणी गुजराथ, काठेवाड, कोकण, चांदा, अकोला, गोदावरी, कृष्णा (आंध्रातील जिल्हे) या सर्व जिल्ह्यांतून विपुल प्रमाणात सापडली आहेत. त्यावरून रुद्रदाम्याचे आक्रमण परतवून याने पुन्हा सातवाहनसत्ता सर्वत्र प्रस्थापित केली असे दिसते. याच्या काही नाण्यांवर अश्वचिन्हही आहे. त्यावरून याने अश्वमेध केला असावा असे पंडित म्हणतात.
 या सम्राटाच्या कारकीर्दीत सातवाहनसत्तेला उतरती कळा लागली. आता हा वंश थकला होता. सतत सव्वाचारशे वर्षे एका कुळात कर्ते पुरुष निर्माण होणे ही गोष्ट फार दुर्मिळ असते. इतकी वर्षे एकसारखे थोर पराक्रमी सम्राट निर्माण झाले हेच जास्त होय. आता निसर्गक्रमाने उद्भवणाऱ्या विघटक शक्ती प्रबळ होऊ लागल्या. सातवाहनांच्या शाखोपशाखांतील भाऊबंदांनी वऱ्हाड, कुंतल येथे स्वतंत्र राज्ये स्थापिली. आभीर ही एक नवीच जमात या वेळी वर उसळली व तिने सातवाहन- साम्राज्याचे लचके तोडण्यास प्रारंभ केला. आंध्रातील इक्ष्वाकू हे सातवाहनांचे सरदार होते, तेही आता स्वतंत्र झाले. अशी सर्व बाजूंनी पोखरणी लागल्यामुळे पुढील ३०/३५ वर्षे प्रतिष्ठानला सातवाहनसत्ता अस्तित्वात होती, तरी ती फार मर्यादित व निष्प्रभ अशी होती. इ. स. २२५ च्या सुमारास तीही नष्ट झाली व चारसाडेचार शतके अव्याहत चाललेल्या या पहिल्या महाराष्ट्र साम्राज्यसत्तेचा अंत झाला.

अमर काव्य
 सातवाहन घराण्याचा मूळ संस्थापक राजा सातवाहन आणि त्या राजघराण्यातील पहिला सातकर्णी, दुसरा सातकर्णी, हालराजा, गौतमीपुत्र सातकर्णी यांच्याविषयी अनेक अद्भुतरम्य कथा भारतात रूढ झालेल्या आहेत. बृहत्कथा, कथासरित्सागर, पुराणे, लीलावईसारखी काव्ये या वैदिकपरंपरेतल्या साहित्यात त्या आहेतच, पण जैन, बौद्ध यांच्या वाड्ययातही सातवाहनांविषयीच्या अनेक रम्यकथा आढळतात. पण येथपर्यंत सांगितलेल्या त्यांच्या इतिहासावरून असे ध्यानात येईल की तसल्या काल्पनिक अवास्तव कथा पूर्णपणे वगळल्या तरी सातवाहन घराण्याचे चरित्र हे एक अद्भुतरम्य काव्य वाटावे इतके त्या राजपुरुषांचे पराक्रम अलौकिक आहेत. दक्षिणेत पहिली साम्राज्यसत्ता त्यांनी स्थापिली, शकपल्हव या आक्रमकांचे पुनःपुन्हा निर्दाळण करून दक्षिणेतून त्यांना निरवशेष करून टाकले, आपल्या साम्राज्याच्या मर्यादा उज्जयिनी, साची येथपर्यंत नेऊन भिडविल्या, साडेचारशे वर्षे हा साम्राज्यभार आपल्या मस्तकावर पेलून धरण्याचे सामर्थ्य असलेले कर्ते पुरुष महाराष्ट्राला दिले आणि राजसत्तेची स्थापना, धर्माचे पुनरुज्जीवन, विद्याकलांचे संवर्धन, कृपिव्यापारधनसमृद्धी यायोगे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा पाया घातला, ही कृत्ये कमी अद्भुत आहेत काय ? कोणत्याही महाकवीला अमर काव्य निर्मिण्याची स्फूर्ती व्हावी असे हे पराक्रम आहेत. त्या पराक्रमांची स्मृती मनात घोळत ठेवूनच पुढील काळच्या महाराष्ट्राच्या राजघराण्यांचा इतिहास आपण आता पाहू.

*