Jump to content

महाराष्ट्र संस्कृती/अस्मितेचा उदय

विकिस्रोत कडून


२.
अस्मितेचा उदय
 



 महाराष्ट्राची पृथगात्मता केव्हापासून दिसू लागते याचा शोध गेल्या प्रकरणात आपण घेतला. तेराव्या शतकापासून मागे जाताजाता इ.पू. ३००/४०० या काळापर्यंत आपण प्रवास केला. त्यावरून तेव्हापासून या प्रदेशाची स्वतंत्र अशी महाराष्ट्री भाषा सिद्ध झालेली होती, आणि या भाषेमुळेच या प्रदेशाला व तेथील लोकांना पृथगात्मता प्राप्त झाली होती असे आपल्याला आढळून आले. या महाराष्ट्री प्राकृत भाषेपासूनच पुढे इ. सनाच्या चौथ्या पाचव्या शतकात महाराष्ट्रीअपभ्रंश भाषा निर्माण झाली व आणखी चारपाच शतकांनी या अपभ्रंशापासूनच मराठीचा जन्म झाला, असे दिसून आल्यामुळे महाराष्ट्राच्या पृथगात्मतेचा धागा त्या त्र्यंबकेश्वरापासून नेवाशापर्यंत अतूट चालत आला आहे, असे आपल्याला निःशंक म्हणता आले.

महाराष्ट्र - नामाभिधान
 आता यापुढील प्रश्न म्हणजे ज्या प्रदेशात या भाषांचा हा स्वतंत्र संसार थाटला गेला आणि विकसत राहिला त्या प्रदेशाच्या नामभिधानाचा होय. अगदी प्रारंभी महाराष्ट्राच्या सीमारेषा आपण पाहिल्या. गोवा ते दमण ही पश्चिम रेषा, तेथून तापीच्या काठाने भंडाऱ्यापर्यंत उत्तरसीमा व तेथून गोव्यापर्यंत तिरपी येणारी ती पूर्वदक्षिण सीमा अशा या भूमीच्या सीमा आहेत. या महाराष्ट्राच्या सीमा असे आज आपण निःशंकपणे म्हणतो. पण या भूमीला हे महाराष्ट्र असे अभिधान केव्हापासून प्राप्त झाले. ते आता पहावयाचे आहे.
तेराव्या शतकात मराठी भाषा परिपक्व दशेस आली व त्यामुळे या भूमीची अस्मिता तेथून पुढे वादातीत झाली असे मागल्या प्रकरणात आपण म्हटले आहे. याचवेळी महाराष्ट्र हे नामाभिधानही निश्चित झालेले होते, असे आपल्याला दिसून येते. ज्या ज्ञानेश्वरांच्या ग्रंथामुळे मराठी परिपक्क दशेस आली त्यांनी त्याच ग्रंथात 'आम्ही आपला ग्रंथ महाराष्ट्र मंडळात रचला' असे सांगून या भूमीचे अभिधानही निश्चितपणे सांगितलेले आहे. ज्ञानेश्वर म्हणतात -

ऐसे युगी वरी कळी । आणि महाराष्ट्र मंडळी
श्री गोदावरीच्या कुळी | दक्षिणिली
तेथ महेशान्वय संभृते । श्रीनिवृत्तनाथ
केले ज्ञानदेव गीते । देशीकार लेणे

यावरून स्वतंत्र भाषेप्रमाणेच स्वतंत्र अभिधानही तेराव्या शतकाच्या अखेरीला निश्चित झालेले होते यात शंका नाही.
 या आधी महानुभावपंथीयांनी महाराष्ट्र हे नाव आपल्या ग्रंथात वापरलेले आहे. या भूमीचा अभिमानही त्यांनी वाहिला आहे. पण एकतर त्यांचे ग्रंथ शंभरएक वर्षात त्यांनी गुप्त करून टाकले. त्यामुळे या भूमीच्या अस्मितेच्या पोषणास त्यांचा पुढील शतकात काहीच उपयोग झाला नाही. आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथामुळे मराठी भाषेला जी प्रौढता आली, प्रगल्भता आली, परिपक्वदशा आली, अमृताते पैजा जिंकण्याचे तिला जे सामर्थ्य आले ते महानुभावांच्या ग्रंथांमुळे येणे, ते गुप्त झाले नसते तरी, शक्य नव्हते. त्यामुळे मराठीजन्य अस्मितेचा प्रारंभ ज्ञानेश्वरीपासूनच झाला असे म्हणावे लागते. इटली या देशाच्या सीमा कोठपर्यंत मानाव्या असा प्रश्न येताच, महाकवी डान्टे याची भाषा जेथपर्यंत बोलली जाते तेथपर्यंत, असे निःसंदेह उत्तर इटलीत दिले जाते. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या सीमा कोठपर्यंत असा प्रश्न येताच, ज्ञानेश्वरांची भाषा जेथपर्यंत बोलली जाते तेथपर्यंत, असे उत्तर निःसंदेह देता येईल. ते महानुभावांच्या कोणत्याही ग्रंथावरून देता येणार नाही. म्हणून महाराष्ट्र या नावाची मोहोर या भूमीवर ज्ञानेश्वरांनीच केली असे म्हणण्यात फार मोठे औचित्य आहे.
 हे निश्चित झाल्यानंतर आता भाषेचा ज्याप्रमाणे आपण मागोवा घेत मागे मागे गेलो त्याचप्रमाणे 'महाराष्ट्र' या अभिधानाचा मागोवा घेत आपल्याला प्रवास करावयाचा आहे. आणि हे नाव प्रथम या भूमीला केव्हा प्राप्त झाले ते पहावयाचे आहे. त्या प्रवासात प्रथम आपल्याला महानुभावांची भेट होईल हे उघडच आहे.

महानुभाव साहित्यात
 महानुभावांचे महाराष्ट्रावर अगदी अनन्य असे प्रेम होते, भक्ती होती. कर्नाटक, तेलंगण या प्रांतांत न जाता 'महाराष्ट्री वसावे' असा चक्रधरस्वामींचा शिष्यांना नेहमी उपदेश असे. हा प्रदेश सात्त्विक वृत्तींना पोषक आहे, तेथली हवा मुमुक्षूंना हितकारक आहे आणि सर्व सद्गुणांचा या भूमीत परिपोष होतो, अशी त्यांची श्रद्धा होती. 'महंत राष्ट्र म्हणौनि महाराष्ट्र, महाराष्ट्र निर्दोष आन सगुण, धर्म सिद्धी जाये ते माहाराष्ट्र', अशी महानुभाव ग्रंथकारांची वचने प्रसिद्ध आहेत. (आचारपाठ, १ ले सूत्र ) ' महाराष्ट्री विद्या आणि पुरुष असे' हे वचन लीळाचरित्रात एकदोनदा आले आहे. (एकांक-लीळा क्र. ४. पूर्वार्ध-लीळा क्र. २५०) चक्रधरांच्या तोंडचे उद्गार वर दिलेच आहेत. त्यावरून महाराष्ट्र हा प्रदेशवाचक शब्द ज्ञानेश्वरांच्या आधी निश्चित रूढ झाला होता असे दिसते.
 त्या काळी त्या लेखकांच्या मनात महाराष्ट्राची व्याप्ती काय होती हे कोठे स्पष्ट झालेले नाही. पण चक्रधराविषयी लिहिताना उत्तरकालच्या लोकांनी ते अगदी स्पष्ट केले आहे. 'देश म्हणजे खंडमंडळ | जैसे फले ठाणा पासौनि दक्षिणसि मऱ्हाटी भाषा जेतुला ठायी वर्ते ते एक मंडळ | तयासी उत्तरे बालाघाटाचा शेवट असे ऐसे एक खंडमंडल | मग उभय गंगातीर ( गोदातीर ) तेही एक खंडमंडळ | आन तयापासोनि मेघंकर घाट ते एक खंडमंडळ | तयापासोनि अवघे वराड ते एक खंडमंडळ | परी अवघे मिळोनि महाराष्ट्र बोलिजे किंचित किंचित भाषेचा पालट भणौनि खंडमंडळे जाणावी.' हा उतारा तेराव्या शतकातील आचार - महाभाष्य या ग्रंथातील आहे. फलटण, बालाघाट, लोणार - मेहकर, गोदापरिसर व वऱ्हाड एवढा प्रदेश म्हणजे महाराष्ट्र, असा लेखकाचा अभिप्राय आहे. कृष्णमुनी तथा डिंभ या लेखकाने 'श्री ऋद्धिपूर महत्त्व' या ग्रंथात पुढीलप्रमाणे महाराष्ट्राच्या सीमा दिल्या आहेत. 'विंध्याद्री- पासून दक्षिणदिशेसि कृष्णानदीपासून उत्तरेशी । झाडी मंडळापासून पश्चिमेसी कोकणपर्यंत, महाराष्ट्र बोलिजे । चक्रधर क्रीडा केली जेथे जेथे ' यावरून महानुभावांच्या मनात महाराष्ट्र म्हणजे कोणता देश होता ते स्पष्ट होईल.

राजशेखर
 राजशेखर हा नाटककार व साहित्यशास्त्रज्ञ इ. सनाच्या दहाव्या शतकात होऊन गेला. तो बहुधा महाराष्ट्रीय असावा. आपल्या 'बालरामायण' या नाटकात त्याने अकालजलद या आपल्या पणजोबांचा महाराष्ट्रचूडामणिः । असा उल्लेख केला आहे. हा ब्राह्मण होता. पण याची स्त्री अवन्तीसुंदरी चव्हाण ही क्षत्रिय होती. 'कर्पूरमंजरी' हे त्याचे नाटक महाराष्ट्री प्राकृतात आहे. त्यात चाहुआण कुलमोलिमालिआ राअसेहरकइन्दगेहिणी ' असा तिचा त्याने गौरवपूर्वक उल्लेख केला आहे. बालरामायणात, लंकेहून सीतेसह राम परत जात होते त्या वेळी, सुग्रीव रामाला म्हणाला, ' भरताग्रज, अयमग्रे महाराष्ट्रविषयः ।' रामचंद्रा, हा समोर महाराष्ट्र देश आहे. या ठिकाणी रामाने सीतेला कुंतल व विदर्भ या महाराष्ट्रातील खंडमंडळाचे वर्णन करून सांगितले. कुंतल ( सातारा, कोल्हापूर हा भाग ) हा ' मदनाचे स्थान' आहे व विदर्भ म्हणजे 'सारस्वती जन्मभू: ' आहे असे राम म्हणतो. स्वयंवराला जमलेल्या राजांत कुंतल देशाचा राजा होता, त्याचा सीता 'महाराठ्ठ वरिठ्ठो' असा निर्देश करते. यावरून विदर्भ व कुंतल हे दोन विभाग त्या वेळी महाराष्ट्रात मोडत होते असे दिसते. ' चतुर्विशति प्रबंध ' या आपल्या ग्रंथात राजशेखर महाराष्ट्राचा अनेक वेळा उल्लेख करतो. ' इह भारतवर्षे दक्षिणखंडे महाराष्ट्र देशावतंसं श्रीमत् प्रतिष्ठानं नाम पत्तनं विद्यते ' (पृ. १३६) हा त्यांपैकी एक होय. यात पैठणचा उल्लेख येतो. विदर्भ, कृष्णाकाठ व पैठण या तीहींवरून आजच्या महाराष्ट्राच्याच सीमा त्या वेळी असाव्या असे दिसते.

लीलावई
 कोऊहल कवी इ. स. ८०० च्या सुमारास होऊन गेला. त्याने आपले 'लीलावई' हे खंडकाव्य 'महरठ्ठ-देसी भासा ' मध्ये लिहिले आहे. का? तर त्याच्या प्रियतमेने 'सर्वसाधारण स्त्रियांना समजेल अशा भाषेत तुम्ही काव्य लिहा ', असा आग्रह धरला म्हणून ( लीलावई ४१ व १३३० ) . 'लीलावती' या काव्यात शातवाहन राजा हाल व सिंहलद्वीपाची राजकन्या लीलावती यांच्या प्रणयाची व विवाहाची कथा आहे. त्यात प्रारंभीच कवीने हाल राजाच्या राज्याचे जे वर्णन केले आहे त्यातून त्याच्या मनातील महाराष्ट्र. अश्मक व हालाची राजधानी प्रतिष्ठान (पैठण) नगरी यांच्याविषयीचा उत्कट अभिमान प्रकट झालेला आहे. कवी म्हणतो, 'पृथ्वीला भूषणभूत असलेल्या या प्रदेशात धनधान्यसमृद्धीमुळे शेतकरी संतुष्ट असतात. मदिरा- पानाने सुखी होऊन येथले लोक गाणी गातात. त्या गीतसौंदर्याने उद्याने नेहमी भरून गेलेली असतात. या महाराष्ट्रात नित्य कृतयुग असते. ही भूमी म्हणजे धर्माचा आधार आहे. येथील सृष्टी म्हणजे ब्रह्मदेवाची शाळाच आहे. ही सृष्टी पाहूनच तो आपली सृष्टिरचना करतो. हा देश सुखसमूहांचे जन्मस्थान होय. सद्गुणांचे सुक्षेत्र होय. येथले कोवळे गवत खाऊन गोधन पुष्ट झालेले असते व त्याच्या हंबरण्यामुळे दिशा निनादून गेलेल्या असतात. येथे सर्वत्र जलविहार करण्याजोगी तळी आहेत. उत्तम वृक्षवेली असलेली उद्याने आहेत. सर्वत्र कमळांनी भरलेली सरोवरे आहेत. या भूमीत कलिकाल येतच नाही. येथे पाप कोणी पाहिलेले नाही. शत्रुचा पराक्रम येथे कोणाला दिसतच नाही. या देशाची राजधानी प्रतिष्ठान नगरी अत्यंत रम्य असून ती गोदावरीच्या काठी वसलेली आहे. या नदीत स्नान करून मरहट्टीया स्त्रिया आपली सर्व पापे धुऊन टाकतात. त्यांच्या वक्षांची हळद पाण्यात मिसळल्यामुळे गोदावरीचे पाणी पिवळसर झालेले असते. ' ( लीलावई - संपादक - डॉ. उपाध्ये पृ. ११-१५ ). स्वभाषा व स्वदेश यांच्या अभिमानाचे इतके स्पष्ट दर्शन या काव्यात होते की या काळी महाराष्ट्राची अस्मिता संशयातीत होती असे म्हणण्यास हरकत नाही.
 उद्योतनसुरी याने आपला 'कुवलयमाला' हा अपभ्रंश भाषेतील काव्यग्रंथ इ. स. ७७८ च्या सुमारास रचला. त्यात त्याने 'घटमुट, काळासावळा, सहनशील, अभिमानी व कलहशील आणि दिण्णले, गहिल्ले असे बोलणारा मरहट्टा' असे मराठ्यांचे वर्णन केले आहे.

चिनी प्रवासी
 विजापूर जिल्ह्यातील ऐहोळे येथे इ. स. ६३४ मध्ये कोरलेला जैन कवी रविकीर्ती याचा लेख आहे. त्यात 'दुसरा चालुक्यसम्राट सत्याश्रय पुलकेशी हा नव्याण्णव हजार गावे असलेल्या तीन महाराष्ट्रकांचा राजा झाला' असा उल्लेख आहे. 'अगमदधिपत्वं यो महाराष्ट्रकाणां, नवनवति सहस्रग्रामभाजां त्रयाणाम् ।' सातव्या शतकात ( इ. स. ६३९ ) हुएनत्संग हा चिनी प्रवासी भारतात आला होता. त्याने महाराष्ट्र, मराठे व मराठ्यांचा राजा सत्याश्रय पुलकेशी यांचे मोठ्या गौरवाने वर्णन केले आहे. तो म्हणतो, 'महाराष्ट्राची भूमी सुपीक असून ती धन्यधान्याने समृद्ध आहे. येथले लोक साधे, प्रामाणिक पण तापट आहेत. त्यांच्या जे उपयोगी पडतात त्यांशी ते कृतज्ञ असतात. पण त्यांना कोणी दुखविले तर ते सूड घेतल्याखेरीज राहात नाहीत. लढाईत पळपुट्यांचा ते पाठलाग करतात; पण शरण आलेल्यांना ते मारीत नाहीत. राजाजवळ हजारो शूर शिपायांचे सैन्य नित्य खडे असते. लढाईला निघताना ते मद्य पिऊन धुंद झालेले असतात. आणि अशा भालाइतातील एक शिपाई हजारांना भारी असतो. अशा सैन्यापुढे कोणताच शत्रु उभा राहू शकत नाही. त्यांचा राजा अशा सेनेच्या बळावर शेजारच्या शत्रूला मुळीच मोजीत नाही ( डॉ. रा. गो. भांडारकर. कलेक्टेड वर्क्स, ३ रा खंड, पृ. ७२ ).

प्रकृष्टं प्राकृतम्
 महाराष्ट्राश्रयां भाषां प्रकृष्टं प्राकृतं विदुः । हे सातव्या शतकात होऊन गेलेल्या कवी- दण्डीचे वचन प्रसिद्धच आहे. त्यावरून महाराष्ट्र हा देशवाचक शब्द होता. त्याची भाषा महाराष्ट्री होती व ती सर्वश्रेष्ठ होती या तिन्ही गोष्टींचा बोध होतो. ' भाग्ये रसविक्रयिणः पण्यस्त्रीकन्यका महाराष्ट्राः । ' हे वराहमिहिराने ( इ. स. ५०५) बृहत् संहितेत केलेले वर्णन आहे. या ठिकाणी महाराष्ट्राः हा शब्द 'महाराष्ट्र देशे ये जना निवसन्ति ।' महाराष्ट्रात राहणारे लोक, या अर्थी योजलेला आहे, असे बृहत्संहिंतेवरील आपल्या टीकेत भट्टोत्पलाने सांगितले आहे. सागर जिल्ह्यातील एरण या गावी इ. स. ३६५ मध्ये स्तंभावर कोरलेला एक शिलालेख आहे. श्रीधरवर्म्याचा सेनापती सत्यनाग हा आपल्याला महाराष्ट्री म्हणवितो, असे त्यावरून समजते. श्रीधरवर्मा हा महाक्षपत्र होता. सत्यनाग हा त्याचा सेनापती. त्यानेच हा स्तंभ उभारलेला आहे. त्यावरील लेख संस्कृतात असून त्यात 'राज्ञः आरक्षिकेन सेनापति सत्यनागेन महाराष्ट्रप्रमुखेन, महाराष्ट्रेन' असा त्याने स्वतःचा उल्लेख केला आहे.
 हा कोरीव लेख आहे आणि 'महाराष्ट्र ' देशाचा उल्लेख असलेला आद्य लेख आहे. त्यामुळे त्याचे महत्त्व विशेष आहे. हा चौथ्या शतकातला 'महाराष्ट्र' या प्रदेश नावाचा उल्लेख झाला. यापूर्वीच्या काळात या नावाचा उल्लेख शिलालेखात किंवा ग्रंथात कोठेच सापडत नाही. उल्लेख सापडतात ते 'महारठ्ठ', 'महारठी' असे सापडतात. त्यांचे महत्त्व कमी आहे असे नाही. प्राकृतातले ते उल्लेख असल्यामुळे त्यांना महत्त्व जास्तच आहे. पण आज रूढ असलेल्या महाराष्ट्र या नावाचा मागोवा घेत आपण चाललो होतो. त्यातला हा आद्य लेख म्हणून याचे महत्त्व विशेष एवढेच. येथून मागे 'महारठ्ठ' या नावाचा शोध घेत आपल्याला जावयाचे आहे. पण तत्पूर्वी पुराणातील 'महाराष्ट्र ' प्रदेशाचे उल्लेख पाहून मग तिकडे वळू. पुराणरचना साधारणपणे चौथ्या शतकाअखेरीपर्यंत पुरी झाली असे काही पंडितांचे मत आहे. पण त्यात मागून पुष्कळ भर घातली गेली, हे सर्वमान्य आहे. त्यामुळे त्यातील उल्लेख हा विश्वसनीय पुरावा मानता येत नाही; तथापि त्यातील निर्देश पाहणे हे अवश्य आहे.
 मार्कंडेय पुराणात - ' महाराष्ट्रामाहिषकाः कलिंगाश्रैव सर्वशः' असा महाराष्ट्राचा उल्लेख आहे ( अध्याय ५७, श्लोक ४६ .). याच ठिकाणी दक्षिणापथात कोणते देश येतात ते सांगताना इतर देशांबरोबर दण्डक, अश्मक, नैसिक, कुंतल, वैदर्भ यांचाही उल्लेख आहे. ५८ व्या अध्यायातही पुन्हा महाराष्ट्र, कर्नाटक असा निर्देश आलेला आहे. पुराण ग्रंथांचा प्रसिद्ध अभ्यासक पार्गिटर याने मार्कंडेय पुराणाच्या प्रस्तावनेत इ. स. ४ थे शतक असा त्याचा काळ ठरविलेला आहे. त्याच्या मते पुराणातले महाराष्ट्रजन हेच अर्वाचीन मराठे होत. मार्कंडेयाप्रमाणेच वायू व ब्रह्म या पुराणातही महाराष्ट्र हे देशनाम सापडते.
 वात्स्यायनाच्या कामसूत्रात 'महाराष्ट्रकाणाम् व ' महाराष्ट्रिक्य' असे उल्लेख आहेत. शं. रा. शेंडे यांच्या मते कामसूत्राचा काळ शालिवाहन शकाचे पहिले शतक हा होय. भरताच्या नाट्यशास्त्रातही 'द्रमिडांध्र - महाराष्ट्रा:' असा महाराष्ट्राचा उल्लेख आहे. सुशील कुमार दे यांच्या मते भरताचा काळ इ. सनाचे पहिले शतक किंवा इ. पूर्व दुसरे शतक होय. पण या दोन्ही ग्रंथांच्या काळाबद्दल फारच मतभेद आहेत.

महाराष्ट्र - महारठ्ठ
 'महारठ्ठ' हे महाराष्ट्र याचेच प्राकृतरूप आहे असे प्राकृत व्याकरणकारांचे निश्चित मत आहे. हा ' महारठ्ठ' शब्द सुमारे सहाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या पाली भाषेतील ' महावंस' या ग्रंथात येतो. मोगली पुत्ततिस्स याने इ. पू. तिसऱ्या शतकात बौद्धांची परिषद भरविली होती. त्या वेळी त्याने आपले बुद्ध धर्मोपदेशक महिसमंडल, वनवासी, अपरांतक, महारठ्ठ इ. प्रांतांत पाठविले होते असे महावंशात सांगितले आहे. असाच उल्लेख बुद्धघोषाच्या समंतपासादिकेच्या प्रस्तावनेत आहे. 'योनकधम्म रख्खितथेरं अपरान्तकं, महाधम्मरख्खितथेरं महारठ्ठं पेसेसी ।' असे तो म्हणतो. ( विनयपिटक - खंड ३ रा, सं. ओल्डेनबर्ग. या ग्रंथालाच बुद्धघोषाची ही प्रस्तावना जोडलेली आहे. प्र. ३१४ पाहा ) बुद्धघोष हा इ. सनाच्या ५ व्या शतकात झाला असे एक मत आहे. हा ख्रिस्ती शकाच्या पूर्वार्धात होऊन गेला, हे अनेक पुराव्यांनिशी सिद्ध झाले आहे असे ज्ञानकोशकार म्हणतात. महावंशाच्या दीड वर्षाच्या आधीच्या 'दीपवंस' या ग्रंथात महावंशाप्रमाणेच महारठ्ठला धर्मोपदेशक पाठविल्याचा उल्लेख आहे. 'महाधम्मरख्खितथेरो महारठ्ठं पसादयि । '
 महारठ्ठाचे हे उल्लेख इ. सनाच्या चौथ्या, पाचव्या, सहाव्या शतकातले असले तरी मोगली पुत्ततिस्स याने येथे धर्मोपदेशक पाठविले ही घटना इ. पू. तिसऱ्या शतकातली आहे. यावरून या प्रदेशाला त्या काळापासून 'महारठ्ठ' हे नाव रूढ झाले होते, असे मिद्ध होते, असे डॉ. पां. वा. काणे म्हणतात ते सयुक्तिक वाटते. ( एन्शंट जॉग्रफी अँड सिव्हिलिझेशन ऑफ महाराष्ट्र जे. बी. बी. आर. ए. एस. व्हॉ. २४. इ. स. १९१४–१६, पृ. ६२२ ).
 'महारठ्ठ' हा देशवाचक शब्द असला तरी महारठ, महारठिनी हे शब्द तेथील स्त्रीपुरुषांचे वाचक होत हे उघड आहे. सातवाहनांच्या काळचे इ. पू. २०० पासून पुढचे नाणेघाट, भाजे, कारले, बेडसे, कान्हेरी येथले शिलालेख आता उपलब्ध झाले आहेत. त्यांत "वेदिसिरिस महारठिनो, महारठिस कोतकीपुतस विण्हुदतस, महाभोयबालिकाय महादेविय, महारठिनिय, महारठिस, गोतिपुत्रस, अग्निमिणकस, महाभोजिय बालिकाय महारठिणिय, " असे शब्द आले आहेत. हे सर्व महारठ शब्दाचे उपयोग महाराष्ट्राचे देश व लोक या नात्याने अस्तित्व निःसंशय सिद्ध करतात. ( डॉ. केतकर, प्राचीन महाराष्ट्र, पृ. २४ )

दक्षिणापथ
 आपल्या मायभूमीचे आजचे नाव ' महाराष्ट्र' असे आहे. त्याचा मागोवा घेताना ते इ.सनाच्या चौथ्या शतकापर्यंत रूढ असलेले आपल्याला आढळले. त्यापूर्वी या प्रदेशाचे नाव 'महारठ्ठ' असे होते. आणि महावंस, दीपवंश इ. ग्रंथांतील घटनांच्या आधारे पाहता ते इ. पू. तिसऱ्या शतकात सर्वविश्रुत होते असे दिसते. त्याच्या पूर्वीच्या काळात मात्र ही दोन्ही अभिधाने सापडत नाहीत. पण त्या पूर्वीच्या काळात 'महाराष्ट्र' भूमीला 'दक्षिणापथ ' असे नामाभिधान होते, असे काही विद्वानांचे मत आहे. त्याचा आता विचार करू. दक्षिणापथ हे नाव फार प्राचीन आहे. बौधायन- सूत्र, महाभारत, रामायण, पतंजलीचे महाभाष्य, इ. ग्रंथांत दक्षिणापथ हा शब्द अनेक वेळा आलेला आढळतो; पण अनेक ठिकाणच्या उल्लेखांवरून असे दिसते की 'दक्षिणापथा'त कोणत्या प्रदेशांचा समावेश होतो यासंबंधी भिन्न मते आहेत. नर्मदेपासून रामेश्वरापर्यंतच्या सर्व दक्षिण प्रदेशाला 'दक्षिणापथ ' म्हटलेले काही ठिकाणी आढळते. पूर्वचालुक्यांचा पहिला राजराज विष्णुवर्धन याने दिलेल्या दानात असे म्हटले आहे की विष्णुवर्धनाने सेतू व नर्मदा यांमधील सप्तलक्षांचा दक्षिणापथ जिंकला. समुद्रगुप्ताचा अलाहाबाद येथील चौथ्या शतकातील शिलालेख पाहता असे दिसते की पिष्टपूर (मद्रास इलाखा ), ऐरंडपल्ल ( तेलंगण ), कांची, वेंगी व देवराष्ट्र इ. भाग म्हणजे कन्याकुमारीपासून नर्मदेपर्यंतचा सर्व प्रदेश दक्षिणापथात मोडत होता.
 पण काही ठिकाणी कमी व्यापक अर्थानेही दक्षिणापथ हा शब्द वापरलेला आढळतो. पांड्यांना जिंकून नंतर सहदेव हा दक्षिणापथाला गेला, असे महाभारतात म्हटले आहे. त्यावरून पांड्यांचा देश दक्षिणापथात समाविष्ट होत नव्हता असे दिसते. पेरिप्लसचा (ग्रीक) कर्ता दक्षिणापथाचा उल्लेख दक्षिणावेडस असा करतो. आणि भडोच पासून दामिरिका ( द्रविड देश ) पर्यंतच त्याची व्याप्ती सांगतो. दक्षिणावेडस हा, डॉ. भांडारकरांच्या मते, दक्षिणापथ, दक्षिणावध, दक्षिणावध - याचा अपभ्रंश असणे शक्य आहे. अशा काही प्रमाणांवरून दक्षिणापथाचा एक अर्थ तरी 'महाराष्ट्र' असा आहे, असे डॉ. रा. गो. भांडारकर ( कलेक्टेड वर्क्स, व्हॉ. ३ रा, पृ. ६ ), म. म काणे ( एन्शंट जॉग्रफी अँड सिव्हिलिझेशन ऑफ महाराष्ट्र, पूर्वोक्त ) व डॉ. केतकर (प्राचीन महाराष्ट्र, पृ. २२) या थोर पंडितांनी आपले मत दिले आहे. पाकिस्तान झाल्यापासून हिंदुस्थान या संज्ञेचा अर्थ बदलला आहे. मराठेशाहीत केवळ उत्तर हिंदुस्थानालाच हिंदुस्थान म्हणत असत. पोलंड, रुमानिया यांच्या सीमा आपल्या डोळ्यांदेखतच दोन वेळा बदलल्या. हे ध्यानात घेता 'दक्षिणापथ' या संज्ञेची विवक्षा पुरातनकाळी बदलली असणे शक्य आहे असे मानण्यास प्रत्यवाय येणार नाही असे वाटते.

घटक प्रदेश
 आज जिला आपण महाराष्ट्र म्हणतो तेवढ्या व्यापक भूमीला मागल्या काळात एक असे प्रदेशवाचक अभिधान होते की नाही याचा येथवर आपण शोध घेतला. त्यावरून इ. सनाच्या चौथ्या शतकापर्यंत महाराष्ट्र हे नाव सापडते; त्याआधी ४ । ५ शतके इ. स. पूर्वी तिसऱ्या शतकापर्यंत महाराठ्ठ हे नाव आढळते आणि त्याच्यापूर्वी दक्षिणापथ हे नाव सापडते, असे दिसले. हा अखिल महाराष्ट्राच्या नावाविषयी विचार झाला. पण महाराष्ट्राचे जे विदर्भ, मराठवाडा, कोकण इ. विभाग आहेत त्यांचे स्वतंत्र उल्लेख याच्या पूर्वीच्या काळच्या ग्रंथांतही विपुल सापडतात. त्यावरून असे दिसते की या सर्व भूप्रदेशाला एक अभिधान प्राप्त होण्याच्या पूर्वीपासूनच त्याच्या भिन्न भिन्न घटक विभागांत महाराष्ट्र संस्कृतीची जोपासना होत होती. विदर्भ, अश्मक, कुंतल, अपरान्त ही या भूमीच्या विभागांची नावे प्राचीन संस्कृत वाङ्मयात वारंवार आढळतात. त्याचप्रमाणे पांडुराष्ट्र, गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र अशीही येथल्या भूविभागांची नावे असलेली दिसतात. या नावांनी त्या काळी कोणत्या खंडमंडळांचा निर्देश होत होता ते पाहिल्यावर यांचा महाराष्ट्र भूमीत कसा समावेश होत होता, ते ध्यानात येईल.
विदर्भ म्हणजे आजचा वऱ्हाड प्रांत होय, हे जवळ जवळ सर्वमान्य आहे. त्याच्या विस्ताराविषयी काही मतभेद आहेत. वऱ्हाडापेक्षा विदर्भ मोठा होता असे म. म. मिराशी व कुलगुरू चिं. वि. वैद्य यांचे मत आहे. पण हा किरकोळ मतभेद आहे. विदर्भाचा प्रथम उल्लेख बृहदारण्यकोपनिषदात सापडतो ( अ. २, ब्रा. ६-३ ). आर्य प्रथम दक्षिणेत आले ते प्रथम विदर्भ आणि अपरान्त (कोकण) या प्रांतांत आले. उत्तर व दक्षिण यांमध्ये विंध्य हा दुर्लंघ्य पर्वत उभा होता. त्याच्या पश्चिमेकडून व पूर्वेकडून वाट काढणे सोपे होते. त्यांपैकी पश्चिमेकडून भृगू ऋषी अपरान्तात म्हणजे उत्तर कोकणात उतरले व पूर्वेकडून अगस्ती ऋषी विदर्भात उतरले. अगस्तीबरोबर भोज या क्षत्रीयवंशाची एक शाखाही विदर्भात आली. त्या वंशात विदर्भ नावाचा एक राजा होता. त्याने विदर्भा नगरीची स्थापना केली. कुंडिनपुर ते हेच. त्या राजाच्या नावावरूनच विदर्भ हे नाव पडले. ऐतरेय ब्राह्मणातही विदर्भाचा उल्लेख आहे ( ७. ३४. ९ ). महाभारत व रामायण यात महाराष्ट्र हे अभिधान नाही. पण विदर्भाचे निर्देश मात्र अनेक वेळा येतात. श्रीकृष्णाची पट्टराणी रुक्मिणी ही विदर्भ राजकन्या होती. याच भोजवंशात दमयन्तीचा जन्म झाला होता. अजराजाची राणी इन्दुमती ही भोजकुलातलीच होती. अगस्त्याची स्त्री लोपामुद्रा ही पण विदर्भकन्याच होती. विदर्भ हे धर्मनिष्ठ व श्रेष्ठ राष्ट्र होते असा महाभारतात त्याचा गौरव केलेला आहे. ' - राष्ट्रे धर्मोत्तरे श्रेष्ठे विदर्भेष्वभवद् द्विजः । ' ( भीष्म, २७२.३ ) पुढील काळात विदर्भाचा हा गौरव वाढतच गेला, असे दिसते. यानंतरचा प्रांत म्हणजे अश्मक हा होय. हा गोदावरीच्या भोवतालचा परिसर होय. प्रतिष्ठान-पैठण ही याची राजधानी. भीष्मपर्वात दक्षिणेच्या देशांची यादी दिली आहे तीत अश्मकराष्ट्र आहे. याच्या राजाचा अभिमन्यूने वध केला, असे द्रोणपर्वात सांगितले आहे. अशोकाच्या शिलालेखात पेतनिक म्हणून उल्लेख येतो तो पैठणचा होय असे विद्वानांचे मत आहे. म. म. काणे यांच्या मते प्राचीन काळी खानदेश, नाशिक, नगर या जिल्ह्यांचा अंतर्भाव अश्मकात होत होता. यादवकाळात यालाच सेऊण देश म्हणू लागले. यादव सरदार सेऊणचंद्र याने हे नाव दिले. सिन्नर ही त्याची राजधानी होती.
 कुंतल हा चिं. वि. वैद्य यांच्या मते कृष्णेच्या उगमाजवळचा देश. महाबळेश्वर, कऱ्हाड, मिरज, कोल्हापूर, चिकोडी, बेळगाव, मुधोळ यांचा यात समावेश होत असे. विदर्भात भोजांनी वसती केली तशी कुंतलात यादवांनी केली. प्रा. स्टेन को नौ यांच्या मते कुंतल व विदर्भ मिळून महाराष्ट्र होतो. महाभारताप्रमाणेच पुराणातही कुंतलाचा निर्देश आहे. वात्स्यायनाच्या कामसूत्रात कुंतलः सातकर्णिः | असा उल्लेख सापडतो.
 अपरान्त म्हणजे कोकण हा प्रांत प्राचीन काळापासून विदर्भाइतकाच प्रसिद्ध आहे. महाभारत, अशोकाचे लेख, त्याच्याही पूर्वीची गौतमधर्मसूत्र, बौधायनधर्मसूत्र ही धर्मसूत्रे (इ.पू. ५००) यात अपरान्ताचे उल्लेख येतात. शूर्पारक, सूपारक, अर्वाचीन सोपारा ही याची राजधानी होती. ही जशी परशुरामभूमी म्हणून प्रसिद्ध त्याचप्रमाणे नागभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. पाताळ, रसातळ, महीतळ हे सर्व कोकणच्या विभागांचेच उल्लेख आहेत, असे राजवाडे म्हणतात. चेमुलक (चौल ), कलियण ( कल्याण ) ही कोकणातील बंदरे प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहेत. येथून पाश्चात्य देशांशी मोठा व्यापार तेव्हा चालत असे. ग्रीक भूगोलज्ञ टॉलेमी याने अपरान्ताचा याचसाठी निर्देश केला आहे ( इ. पू. १५० ). पुढे पुराणात, नाशिकच्या शिलालेखात अपरान्त सूपारक यांचे उल्लेख वारंवार येतात.
 गोपराष्ट्र म्हणजे नाशिकचा परिसर होय. मल्लराष्ट्र हे त्याच्या दक्षिणेस होते. पांडुराष्ट्र हे प्रसिद्ध पांड्यराष्ट्र होय. याचाही अंतर्भाव त्या वेळी महाराष्ट्रात होत असावा असे कृ. पां. कुळकर्णी म्हणतात.

मरहट्ट- कानडी
 शं. वा. जोशी यांनी आपल्या 'मऱ्हाटी संस्कृती - काही समस्या' या पुस्तकात महाराष्ट्र हे देशनाव, मराठे लोक, त्यांची मऱ्हाटी भाषा याविषयी काही अभिनव मते मांडली आहेत. त्यांच्या मते महाराष्ट्र या देशाचे मूळ नाव मरहट्ट असे होते. ते नाव कानडी आहे. मर हा कानडी शब्द असून त्याचा अर्थ झाड असा आहे. हट्ट, हट्टी हे पत्ती या संस्कृत शब्दाचे कानडी रूप होय. हे दोन शब्द मिळून मरहट्ट शब्द झाला. वऱ्हाडात हटगार - धनगर या लोकांची वस्ती आहे. आणि मूळ महाराष्ट्र म्हणजे वऱ्हाडच होय. झाडीमंडळ असे वऱ्हाडचे एक दुसरे नाव पूर्वी रूढ होते. तेव्हा झाडीत राहाणारे हट्टी ते मरहट्टे लोक होत आणि त्यांच्यावरून त्यांच्या भाषेला नाव पडले हे स्पष्ट आहे. हे विवेचन करताना जोशी यांनी असा विचार वारंवार मांडला आहे की इ. सनाच्या बाराव्या शतकापर्यंत महाराष्ट्र या भूप्रदेशावर कानडी भाषेचे व कर्नाटकाचे सामाजिक व राजकीय वर्चस्व होते. त्या सुमारास मराठी भाषा कानडी- पासून वेगळी होऊ लागली. ज्ञानेश्वरीवर कानडीची दाट छाया आहे. यावरून हे अनुमान निश्चित होते. खानदेश हा कृष्णदेश म्हणजे कानडी देशच होय. वऱ्हाड ( वऱ्हाट ) याचेच ' व ' चा 'म' होण्याच्या कानडी प्रवृत्तीमुळे मऱ्हाट असे रूप झाले. राष्ट्रकूटाचे पूर्वज राष्ट्रिक - रिस्टिक हे होत. राष्ट्रिक याचा अर्थ देशाचा मूळ रहिवासी. हा राष्ट्रिक शब्द नाडव या कानडी शब्दाचे भाषांतर होय. त्र्यंबकेश्वरला हाटकेश्वर असेही एक नाव आहे. त्यातील हाटक म्हणजे हट्टी. त्यांचा ईश्वर तो हाटकेश्वर. भावार्थ असा की इ. सनाच्या बाराव्या शतकापर्यंत महाराष्ट्र हा कन्नड देशच होता.
 व्युत्पत्तीच्या आधाराने जोशी यांनी एक उत्कृष्ट भ्रमजाल निर्माण केले आहे यात शंका नाही. याबद्दल त्याचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. त्यांच्या या विचार- सरणीचा आता परामर्श घेऊ.
 जोशी म्हणतात, जुन्या काही पंडितांनी महारथी, महारठी, राष्ट्रिक - महाराष्ट्रिक वगैरे क्लृप्त्या लढवून महाराष्ट्राची व्युत्पत्ती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यांतील एकही उपपती समंजस नाही. याचे कारण काय? तर त्यांतील एकाची व्युत्पत्ती दुसऱ्यास संमत नाही. डॉ. भांडारकर, डॉ. काणे, राजवाडे यांची मने परस्परविरोधी आहेत ! वरील पंडितांची मते परस्परविरोधी आहेत, एकाचे मत दुसऱ्यास संमत नाही. म्हणून त्यांतील एकही मत समंजस नाही, हे अजब तर्कशास्त्र आहे. त्याअन्वये कोणतेही मत असमंजस व त्याज्य ठरविता येईल. कारण ते कोणाला तरी अमान्य असतेच. जोशी यांची त्यांच्या या पुस्तकातील सर्वच मते या न्यायाने असमंजस ठरतील.
 वररुची हा व्याकरणकार इ. सनाच्या प्रारंभी होऊन गेला. त्याने महाराष्ट्री हे भाषेचे नाव दिलेले आहे. मरहट्टे लोकांची हीच महाराष्ट्री प्राकृत भाषा होय हे जोशी यांना मान्य आहे. पण भाषेला ते नाव कसे पडले, हा वाद आहे. कारण महाराष्ट्र हा शब्द वररुचीच्या पूर्वी सापडत नाही. शिवाय महाराष्ट्र हा जनवाचक शब्द नाही, देशवाचक आहे. प्राचीन काळी देशांना नावे पडत ती जनांवरून, लोकांवरून पडत. तेव्हा वररुचीच्या पूर्वी महाराष्ट्र देशाला लोकांवरून पडलेले दुसरे नाव असलेच पाहिजे. ते कोणते असावे ? तर मऱ्हाट, आणि ते मरहट्टे या लोकांवरून पडले. आणि हा शब्द कानडी आहे.

आधी महाराष्ट्र
 वररुचीच्या पूर्वी महाराष्ट्र हा शब्द कोणत्याही ग्रंथात आढळत नाही, म्हणून या देशाचे ते नाव होते, हे मत स्वीकारता येत नाही असे म्हणून जोशी 'मरहट्ट' हे नाव सुचवितात. तेव्हा हा शब्द वररुचीच्या पूर्वीच्या कोणत्या तरी ग्रंथात आहे असे दाखविण्याची जबाबदारी त्यांनी घ्यावयास हवी होती, पण तसे त्यांनी दाखविलेले नाही. त्यांच्याच मते मरहट्ट शब्द प्रथम लीलावई या इ. स. ८०० च्या सुमारास झालेल्या काव्यात सापडतो. त्याच्या पूर्वीच्या लेखांत, ग्रंथांत 'महाराष्ट्र' हा शब्द निश्चित आढळतो हे त्यांनाही मान्य आहे. तरी 'मरहट्ट' शब्दच मूळचा व मागून त्याचे महाराष्ट्र हे संस्कृतीकरण झाले असा त्यांचा आग्रह आहे. या शब्दातील दोन्ही पदे मर व हट्ट ही कानडी आहेत, आणि हा शब्द इ. सनापूर्वी वररुचीपूर्वी रूढ असला पाहिजे, असे जोशी यांचे मत आहे. पण त्या काळी कानडी भाषाच अस्तित्वात नव्हती. कानडीतला पहिला शिलालेखच इ. स. ४५० च्या सुमाराचा आहे. त्या आधी फारतर शेदोनशे वर्षे ती भाषा बोलण्यात असणे शक्य आहे. इ. सनापूर्वी ती असणे तर शक्य नाही. तरी त्या काळी हे कानडी नाव वऱ्हाड प्रांताला व पर्यायाने महाराष्ट्राला पडले होते, असे जोशी म्हणतात.
 जनांवरून, लोकांवरूनच प्रदेशाला नाव पडते हा जोशी यांचा आग्रह अनैतिहासिक आहे. दक्षिणापथ, सिंध, पंजाब, अवंती ही नावे लोकांवरून पडलेली नाहीत. मल्लराष्ट्र, गोपराष्ट्र, पांडुराष्ट्र, यांचे एकीकरण होऊन जे मोठे राष्ट्र झाले ते महाराष्ट्र असे कोणी म्हणतात. पण 'मोठे' हा शब्द देशाची पहाणी, मोजमाप झाल्यावाचून लावणे शक्य नाही. आणि असे मोजमाप त्याकाळी असंभव होते, असे जोशी म्हणतात. मोठेपणाची कल्पना मोजमाप करूनच येते, अन्य मार्गाने नाही असा हा युक्तिवाद आहे. महानदी हे नदीला पडलेले नाव भारतातल्या सर्व नद्यांची मोजमापे घेऊन नंतर दिले गेले, असे जोशी यांचे मत असावे !

पत्ती-हट्टी
 हाटकेश्वर यात हाटक हा सोने या अर्थाचा संस्कृत शब्द आहे. हट् = प्रकाशणे या धातूपासून तो साधला आहे. पण जोशी यांनी त्याचा हट्टी शब्दाशी संबंध जोडला आहे; व हड्डी-हाटक-जनांचा ईश्वर तो हाटकेश्वर असा समास सोडविला आहे. वऱ्हाडचे म्हणजेच मूळ महाराष्ट्राचे रहिवासी तेच हे हट्टीजन. यांच्यावरूनच मरहट्टे हे नाव पडले. म. म. मिराशी यांनी जोशी यांच्या एतद्विषयक सर्व मतांचे खंडन केले आहे (नवभारत, डिसें. १९५३ ). ते म्हणतात, वऱ्हाडातील धनगर समाजाचे हट किंवा हट्टी हे नाव कोणत्याही प्राचीन कोरीव लेखात आढळत नाही. नाशिक, कारले भाजे, कान्हेरी इ. ठिकाणच्या कोरीव लेखांत अनेक जातींची नावे आली आहेत. पण हट किंवा हट्टी हे नाव नाही. त्यांच्यावरून देशाला नाव पडण्याइतके त्यांना महत्त्व असते तर त्यांचा नामनिर्देश खचित आढळला असता. हट्टी हा मूळ पट्टी ( पत्ती ) शब्द होय. तो यजुर्वेदातील रुद्राध्यायात आहे, असे सांगून जोशी यांनी त्यावर मोठीच इमारत रचली आहे. पत्ती म्हणजे मूळचे आर्येतर लोक म्हणजेच द्रविडी - हट्टी-लोक होत असे ते म्हणतात. मिराशी म्हणतात की रुद्राध्यायात, 'पत्तीनां पतये नमः ।' असे म्हटले आहे. पण रथपती, अश्वपती, सेनापती यांच्याबरोबरच पत्ती शब्द येतो. तेव्हा 'पादचारी योद्धा' असा सायणाचार्यांनी त्याचा केलेला अर्थच संदर्भाशी जास्त जुळता आहे. मधलाच एक शब्द तेवढा जनवाचक मानणे सयुक्तिक नाही. डेक्कन कॉलेज पुणे येथील डॉ. सांकलिया यांनीही महाराष्ट्र शब्दाची व्युत्पत्ती ही हट्टी किंवा पट्टी या शब्दापासून लावण्याचा जोशी यांचा प्रयत्न अयोग्य आहे, असेच मत दिले आहे (महाराष्ट्र संस्कृतीचा प्रारंभकाल - मौज, दिवाळी अंक १९५४). हेमाद्रीने झाडीमंडळ जिंकले, असा उल्लेख यादवांच्या शिलालेखात आहे. त्याचा अर्थ वऱ्हाड असा करून जोशी यांनी मरहट्ट हेच मूळ महाराष्ट्राचे नाव असे मत मांडले आहे. पण मिराशी म्हणतात, तेथे झाडीमंडळ याचा अर्थ वऱ्हाड असा करणे युक्त नाही. कारण वऱ्हाड हा हेमाद्रीच्या आधीच यादवांनी जिंकला होता असे अनेक शिलालेखांवरून दिसते.

व्युत्पत्तीची जादूगिरी
 ज्ञानेश्वरीवर कानडीची दाट छाया आहे हे जोशी यांचे विधान असेच मनोरंजक आहे. ज्ञानेश्वरीत १२००० शब्द आहेत. त्यांतील सुमारे ४० शब्द कानडी आहेत. ही दाट छाया होय ! आता व्युत्पत्तीच्या साधनाने आणखी अनेक शब्द कानडीपासून आले असे दाखविता येईल; पण जोशी यांच्या इतर व्युत्पत्तींप्रमाणेच याही मनोरंजक ठरतील. पुलकेशी हा संस्कृत शब्द पुल म्हणजे मोठा व केशी म्हणजे सिंह. पण जोशी कुपुली या कानडी शब्दापासून तो साधू पहातात. वसिष्टी पुत्र पुलुमायी किंवा पुलुमावी हा सातवाहन राजा. त्याच्या नावातील पुलुमायी शब्द हाही पुली ( वाघ ) यापासूनच झाला असे जोशी म्हणतात. पण पुलोमारी -( इन्द्र ) याचा तो अपभ्रंश असणे अगदी शक्य आहे. तेव्हा व्युत्पत्तीची जादूगिरी करून एखाद्या राष्ट्राच्या वा समाजाच्या नावासंबंधी, कर्तृत्वासंबंधी, मूलस्थानासंबंधी काही सिद्धान्त काढणे फार धोक्याचे आहे हे आपण ध्यानात ठेविले पाहिजे.
 मरहट्ट म्हणजे झाडीमंडळ, तेच वऱ्हाड आणि तोच मूळ महाराष्ट्र, खानदेश हा मूळ कण्ण देश म्हणजेच कानड देश; राष्ट्रिक हे नाडव या कानडी शब्दाचे भाषांतर; ज्ञानेश्वरीवर कानडीची दाट छाया आहे इ. विधाने मांडून इ. सनाच्या बाराव्या शतकापर्यंत महाराष्ट्र हा भावार्थाने कन्नड देशच होता असे मत जोशी यांनी आग्रहाने मांडले आहे. या दोन प्रदेशांतील देवतांचे साम्य दाखवून हाच निष्कर्ष त्यांनी काढला आहे; आणि शेवटी कन्नड व मराठे हे मूळचे जुळे बंधू आहेत असे उदार विधान केले आहे. डॉ. सालेटोर या पंडितानेही जवळजवळ असेच मत मांडले आहे. गोदावरीच्या परिसरात राष्ट्रकूटांच्या काळी कानडी संस्कृती व भाषा यांचे वर्चस्व होते व मराठी- कानडी अशी एक मिश्र बोली तेव्हा तेथे बोलली जात असे, असे ' यादव आणि त्यांचा काळ ' या आपल्या ग्रंथात ते म्हणतात.
 याउलट, श्रवणबेळगोळ या म्हैसूरजवळील गावी गोमटेश्वराचा जो पुतळा आहे त्याच्या खाली ' श्री चावुंडराये करवियले ' असा मराठी शिलालेख आहे, त्यावरून म्हैसूरपर्यंतचा भाग दहाव्या शतकापर्यंत महाराष्ट्रात होता असे मत एका संशोधकाने मांडले आहे.

तीन महाराष्ट्रके
 पण एवढ्यावरच हे भागले नाही. शंकर रामचंद्र शेंडे यांनी ऐहोळे येथील बदामीच्या चालुक्यांच्या काळचा, इ. स ६३४ सालचा सत्याश्रय पुलकेशीच्या प्रशस्तीपर, असा रविकीर्तीचा जो शिलालेख आहे त्यातील अगमदधिपत्वम् । इ. ज्या श्लोकाचा वर निर्देश केला आहे त्याच्या आधारे त्या काळी म्हैसूर, गुजराथ, माळवा, राजस्थान या प्रदेशांचाही महाराष्ट्रात समावेश होत असे असे प्रतिपादन केले आहे ( भांडारकर ओ. रि. इन्स्टिट्यूट, सिल्व्हर ज्युबिली व्हॉल्यूम, 'दि एक्स्टेंट ऑफ महाराष्ट्र ', पृ. ४९४ ). रविकीर्तीच्या या प्रशस्तिकाव्यात, श्लोक १८ ते २२ यांत सत्याश्रय पुलकेशी याने गंग, वनवासी, लाट, मालव, गुर्जरदेश इ. प्रदेश जिंकले असे सांगून त्यानंतर पुढील तीन श्लोकांत त्याची स्तुती गाताना ९९००० ग्रामे असलेल्या तीन महाराष्ट्रकांचा तो अधिपती झाला असे म्हटले आहे. यावरून वर जिंकलेले म्हैसूर, गुजराथ, माळवा इ. प्रदेश म्हणजे पुढल्याच श्लोकातील तीन महाराष्ट्र, असा शेंडे यांनी अर्थ केला आहे. असा अर्थ होणे शक्य आहे हे खरे. पण केवळ एवढया निर्देशावरून म्हैसूर, गुजराथ, माळवा हे प्रदेश म्हणजे महाराष्ट्राचाच विभाग होता असे म्हणणे युक्त वाटत नाही. ज्या प्रदेशात महाराष्ट्री प्राकृत भाषा किंवा महाराष्ट्री अपभ्रंश भाषा या प्रचलित होत्या, जेथे या भाषेत ग्रंथरचना होत असे, शिलालेख लिहिले जात होते आणि हे सर्व विपुल प्रमाणात होत होते त्यालाच महाराष्ट्र म्हणता येईल. एरवी नाही. अशी प्रमाणे वरील देशात मुळीच मिळत नाहीत. एकतर वनवासी, गंग, गुजराथ या जिंकलेल्या प्रदेशांचा उल्लेख 'तीन महाराष्ट्रके' यात आहे हे निश्चित नाही. आणि दुसरे म्हणजे एका निर्देशावरून एवढा अर्थ लावणे साहसाचेच होय. शं. वा. जोशी यांनी ज्या विचारपद्धतीचा आपल्या पुस्तकात अवलंब केला आहे त्या पद्धतीने शेंडे यांचे प्रतिपादनही सयुक्तिक मानावे लागेल हे खरे. पण ती पद्धती सर्वथैव त्याज्य होय. ( इंडियन अँटिक्वेरी, खंड ८ वा आणि एपिग्राफिया इंडिका, खंड ६ वा, यात पुलकेशी - प्रशस्तीचे रविकीर्तीचे सर्व काव्य दिले आहे.)

माळव्यापर्यंत
 दुसऱ्या एका लेखात शेंडे यांनी, इ. सनाच्या बाराव्या शतकापर्यंत नर्मदेच्या उत्तरेस उज्जयनी माळवा प्रांतात, महाराष्ट्री भाषेतला शके १९३२ सालचा एक लेख सापडला आहे, तेथील हिंदी भाषेशी महाराष्ट्री व महाराष्ट्री अपभ्रंश यांतील रूपांचे व म्हणींचे साम्य आहे, इ. प्रमाणे देऊन महाराष्ट्राच्या सीमा त्या काळापर्यंत माळव्याच्या मध्यरेषेपर्यंत पसरल्या होत्या, असे म्हटले आहे. (विक्रमस्मृती, ग्वाल्हेर, पृ. ४६६ ) हीही प्रमाणे वरच्याप्रमाणेच अपुरी आहेत. केवळ महाराष्ट्रत्रयांचा उल्लेख यापेक्षा ती खूपच जास्त आहेत. पण तेथपर्यंत महाराष्ट्राचा विस्तार होता असे विधान करण्याच्या दृष्टीने ती अगदी अल्प आहेत.
 डॉ. वि. भि. कोलते यांनी याच ग्रंथात 'अपभ्रंशापासून मराठी निघाली' असा सिद्धान्त मांडला आहे व शेवटी अपभ्रंशाचे स्थान असलेली अवंती व तिच्या भोवतालचा परिसर हे मराठीचे माहेर मानायला हरकत नाही, असे म्हटले आहे. पण शेवटी - ऐतिहासिक दृष्टीने या विधानाची काटेकोर सत्यता अजून सिद्ध व्हावयाची आहे, असे नमूद करून ठेविले आहे.
 शं. बा. जोशी किंवा शं. रा. शेंडे यांचे विवेचन वाचताना एक विचार मनात येतो. वेदकाळापासूनच आर्य, द्रविड, नाग या जमाती एकत्र राहात होत्या. त्यांच्यांत वर्णसंकरही विपुल चालू होता. पुढे हेच लोक भिन्नकाळी दक्षिणेत उतरून गुजराथ, माळवा, महाराष्ट्र, कर्नाटक येथे स्थायिक झाले. द्रविड देशातील भाषा संस्कृताहून भिन्न असल्या तरी इ. पूर्व तिसऱ्या शतकापासून त्यांच्यावर संस्कृत व प्राकृत यांचे वर्चस्व बसू लागले होते. अशा स्थितीत एका भाषेतील शब्द, रूपे, म्हणी इ. अन्य भाषेत सापडतात एवढ्यावरून फार मोठी अनुमाने काढणे हे युक्त नाही.

मराठे लोक कोण ?
 पहिल्या प्रकरणात मराठी भाषेची पूर्वपीठिका आपण पाहिली. नंतर या प्रकरणात 'महाराष्ट्र' या अभिधानाच्या इतिहासाचा व त्याच्या विस्ताराचा शोध घेतला. आता महाराष्ट्रीय म्हणजेच मराठे हे लोक कोण आहेत, ते कोणत्या वंशाचे होते, ते येथे केव्हा आले व या भूमीला महाराष्ट्र हे अभिधान मिळाले ते कोणावरून, हे पाहावयाचे आहे. ते पाहून झाले की महाराष्ट्राच्या पृथगात्मतेचा निश्चय पूर्ण झाला असे होईल.
 या बाबतीत आजपर्यंत निरनिराळ्या पंडितांनी जी मते मांडली आहेत ती येथे एकत्र मांडण्यापलीकडे काही करता येण्याजोगे नाही. कारण प्रत्यक्ष शास्त्रीय व ऐतिहासिक अशी प्रमाणे, असे आधार, या बाबतीत फार थोडे आहेत - जवळजवळ नाहीतच. बहुतेकांनी शब्दांच्या व्युत्पत्तीचा आधार घेतला आहे. तो आधार किती फसवा असतो ते पंडितांनी एकमेकांवर ज्या टीका केल्या आहेत त्यांवरून सहज दिसून येईल. व्युत्पत्ती- खेरीज इतर आधार म्हणजे प्राचीन ग्रंथांत दक्षिणेतल्या जमातींच्या नावाचे जे उल्लेख येतात व त्यांची जी वर्णने सापडतात, ते होत. पण त्यांतील पुष्कळशी वर्णने काल्पनिक असतात. आपापल्या वंशाचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी चंद्रसूर्यास्तापर्यंत आपली परंपरा नेऊन भिडवावयाची अशी पूर्वी लोकांना फार हौस असे. त्याचप्रमाणे इतरांना हीन ठरविण्यासाठी त्यांना संकरज ठरविण्याचा उद्योगही चालू असे. मनूने व इतर धर्मशास्त्रकारांनी संकरज जातींच्या याद्याच्या याद्या दिल्या आहेत. आता या धर्मशास्त्रज्ञांनी संकराचे हे गुणदोष कसे ठरविले, त्यांना यात कितपत माहिती होती, त्यांना यातले काय कळत होते, हे मोठेच प्रश्न आहेत शिवाय यांतल्या प्रत्येक ग्रंथात पुढील लोकांनी हवी तशी भर घातली आहे. त्यामुळे त्यातून मागल्या काळच्या लोकांविषयी काही विश्वसनीय माहिती मिळेल ही आशा करण्यात अर्थ नाही. आणि माझ्या मते त्याला महत्त्वही नाही. महाराष्ट्रातले आजचे लोक जुन्या काळी प्रथम कोठून आले, ते कोणत्या वंशाचे होते, आर्य होते की अनार्य होते, नाग होते की द्रविड होते, ब्राह्मण होते की महार होते याला ऐतिहासिक जिज्ञासा, कुतूहल यापलीकडे काही महत्त्व नाही. त्यांनी पराक्रम कोणते केले, कर्तृत्व कसे प्रगट केले, मन, बुद्धी, प्रतिभा यांचे कोणते सामर्थ्य त्यांच्या ठायी दिसत होते याला सांस्कृतिक दृष्ट्या खरे महत्त्व आहे. ऐतिहासिक घटनांच्या आधारे ते जितक्या निश्चयाने ठरविता येईल तितके ठरविणे हे आपले उद्दिष्ट आहे. महाराष्ट्राची पृथगात्मता ठरविण्यासाठी भाषेच्या संशोधनाला व नामाभिधानाच्या इतिहासाला जसे महत्त्व आहे तसे येथल्या लोकांच्या मूळस्थानाच्या व त्यांच्या मूलवंशाच्या शोधाला नाही. आहे ते त्यांच्या कर्तृत्वाला आहे. म्हणजेच त्यांच्या संस्कृतीला आहे. ते वैभव येथे आहे असे दिसले तर या लोकांचे मूलस्थान कोणते होते व मूलवंश कोणता होता याला महत्त्व नाही. आणि ते वैभव नसले तर या लोकांच्या इतिहासाचा विचार करण्याला अर्थच नाही. म्हणून वर सांगितल्याप्रमाणे या बाबतीत विद्वनांच्या मतांची नोंद घेण्यापलीकडे फारसे काही करण्याची आवश्यकता नाही आणि काही करता येण्यासारखे नाही. कारण विश्वसनीय असा पुरावा या बाबतीत मुळीच उपलब्ध नाही. म्हणून पंडितांच्या भिन्न मतांची फक्त माहिती पुढे देतो.

राजवाडे मत
 इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी 'राधामाधवविलासचंपू' या ग्रंथाच्या प्रस्तावनेत आपले मत मांडले आहे. इ. पू. ५००-६०० च्या सुमारास मगधातील महाराजांचे भक्त जे महाराजिक म्हणजेच महाराष्ट्रिक लोक ते तेथील बौद्ध व जैन धर्मीय राजांच्या जुलमाला कंटाळून दक्षिणेत वसाहत करण्यास आले. त्यांच्याबरोबरच कुरुपांचालांतून राष्ट्रिक नावाचे व उत्तरकुरू आणि उत्तरमद्र येथून वैराष्ट्रिक हे लोक आले. त्यांतील महाराष्ट्रिक है लोकसंख्येने खूपच जास्त असल्यामुळे सर्वांनाच पुढे महाराष्ट्रिक म्हणू लागले व त्यांच्यावरून या भूमीला महाराष्ट्र हे नाव पडले. हे लोक उत्तरेतून आले तेव्हा अनुलोम विवाह चालू होते. क्षत्रिय लोक शूद्रभार्या करीत. या शूद्रभार्यापासून झालेल्या संततीचा महाराष्ट्रिक लोकांत बराच भरणा होता. त्यामुळे हे लोक क्षत्रिय असले तरी कमतर क्षत्रिय होते. ते दक्षिणेत आले तेव्हा येथे नाग लोकांच्या आधीच वसाहती होत्या. या नागांशी त्या महाराष्ट्रिकांचा पुढील हजार वर्षात मिलाफ होऊन येथला आजचा मराठा समाज तयार झाला. त्यामुळे त्याच्या अंगी कर्तृत्व फारसे दिसून आले नाही. पाटिलकी, देशमुखी, सरदेशमुखी मिळवावी व टिकवावी यापलीकडे यांच्या ठायी धमक नव्हती. सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य, यादव यांनी महाराष्ट्रात राज्ये, साम्राज्ये स्थापिली. पण ते सर्व राजवाडे यांच्या मते आर्य, अयोध्या, चेदी इ. प्रांतांतून आलेले म्हणजे परकी होत. त्यांचे राज्य म्हणजे महाराष्ट्रात परक्यांचे राज्य होय. त्या परक्यांच्या दास्यात महाराष्ट्रिक लोक इ.पू १ ल्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत म्हणजे सुमारे दीड हजार वर्षे रखडत होते. भोसल्यांचे राज्य झाले ते महाराष्ट्रात पहिले स्वकीयांचे राज्य होय.
 राजवाडे यांनी आपल्या या मताला कसलाच आधार दिलेला नाही. चालुक्य, राष्ट्रकूट, यादव यांना परकी का म्हणावयाचे ते त्यांनी सांगितलेले नाही आणि दुसरे असे की 'महाराष्ट्राचा वसाहत काल' या आपल्या प्रबंधात त्यांनी याच्या उलट लिहून ठेविले आहे. महाराष्ट्रातील पाटील, देशमुख हे सर्व अस्सल क्षत्रिय होत, असे ते म्हणतात. त्याचप्रमाणे रट्ट, महरट्ट, राष्ट्रिक, महाराष्ट्रिक हे जातीचे वा देशाचे नाव नसून प्रांताधिकाऱ्यांचे नाव आहे, राष्ट्र हा एक देशाचा विभाग, त्यावरील मुख्य तो राष्ट्रकुट, मोठ्या विभागावरील मुख्य तो महाराष्ट्रकूट असेही त्यांनी सांगितले आहे. ते पुढे म्हणतात की उत्तरेत लोकसंख्या अतोनात झाली तेव्हा हे लोक दक्षिणेत वसाहती करण्यास आले. हे उच्चवर्णीय क्षत्रिय होते. मानव्य, हैह्य, भोज, यादव, नल, मौर्य, चालुक्य इ. शेकडो गोत्रांचे म्हणजेच ९६ कुळीचे मराठे होत. मराठ्यांचा इतिहास म्हणजे या ९६ कुळींच्या कर्तृत्वाचा इतिहास होय.
 महिकावतीच्या बखरीच्या प्रस्तावनेत येथे कातवडी, कोळी, वारली, ठाकर है केव्हापासून राहात होते ते सांगून राजवाडे म्हणतात, महाराष्ट्र जितका महाराष्ट्रिकांनी बनविला तितकाच बहुतेक मांगेले, वारली, कोळी, कातवडी, लाडी, रांगडी इत्यादी पुंजांनी बनविला आहे.
 महाराष्ट्रातल्या लोकांपैकी कोण कोटून आले, ते कोणत्या वंशाचे होते, कोणाचे रक्त शुद्ध, कोणाचे मिश्र यासंबंधीची ही मते परस्पर-विसंगत आणि त्याचबरोबर प्रमाणहीन आहेत असे दिसून येईल. त्यामुळे त्यांचा विचार करण्याचे कारण नाही.

आर्य द्रविड
 कुलगुरु चिंतामणराव वैद्य यांच्या मते पाणिनीच्या नंतरच्या काळी म्हणजे इ. स. पू. ६०० च्या सुमारास आर्य लोक दक्षिणेत आले व गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र, पांडुराष्ट्र अशा वसाहती करून राहिले. अशोकाच्या शिलालेखात रास्टिक लोकांचा उल्लेख येतो ते रास्टिक म्हणजे हेच लोक होत. आंध्रभृत्यांचे वेळी ते एका सत्तेखाली आले तेव्हा भोजांचे जसे पूर्वी महाभोज झाले तसेच राष्ट्रिकांचे महाराष्ट्रिक झाले व त्यांच्यावरूनच पुढे महाराष्ट्र हे नाव पडले. वैद्यांच्या मते आर्याचे नागांशी उत्तरेतच मिश्रण झाले होते; आणि आर्य दक्षिणेत आले त्यांच्याबरोबर नागलोकही आले. हे नाग द्रविडवंशीय होत. म्हणजे महाराष्ट्रीय लोक आर्यद्रविड वंशोद्भव आहेत. या मिश्रणा- मुळेच त्या काळात महाराष्ट्रात महाराष्ट्री ही प्राकृत भाषा निर्माण झाली. ( भारत इतिहास सं. मं. वर्ष १३ वे, अंक १ ला . ) .
 अशोकाचे शिलालेख आणि महाभारतातील गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र इ. नावे यांचा या उपपत्तीला थोडा आधार आहे, त्यावर बसविलेली ही अनुमाने आहेत. त्यामुळे ही संभाव्य घटना आहे, एवढेच म्हणता येईल.

महारांचे राष्ट्र
 या देशात अत्यंत प्राचीन काळी महारांची वस्ती होती; व त्यांच्यावरूनच महारांचे राष्ट्र ते महाराष्ट्र असे नाव पडले, असे एक मत कोशकार मोल्सवर्थ यांनी गेल्या शतकात मांडले आहे. जॉन विल्सन यांनीही याच मताला पाठिंबा दिला होता. डॉ. केतकर यांनी 'प्राचीन महाराष्ट्र ' या आपल्या ग्रंथात हेच मत पुन्हा मांडले आहे. (पृ. २५-२७ ) विल्सन यांनी 'गाव तेथे महारवाडा' ही म्हण आधार म्हणून दिली आहे व तो आधार केतकरांनी ग्राह्य मानला आहे. केतकरांच्या मते अत्यंत प्राचीन काळी कोळी, भोई, महार व रठ्ठ यांची वस्ती महाराष्ट्रात होती व त्यामुळेच स्थलनामे व भाषानामे निश्चित झाली आहेत. ही उपपत्ती अशीच कल्पनेवर उभारलेली आहे. 'गाव तेथे महारवाडा' ही म्हण मराठीतली व म्हणूनच इ. स. हजार- नंतरची आहे. प्राचीन काळची घटना सिद्ध करण्यास तिचा आधार घेणे सयुक्तिक नाही. दुसरे असे की महार हा शब्द प्राचीन काळी एखाद्या जमातीचे नाव म्हणून रूढ असल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. ऐतरेय ब्राह्मणात विश्वामित्राने स्वतःच्या पुत्रांना, त्यांनी अवज्ञा केली म्हणून, शाप दिला व तेच पुढे आंध्र, मूतिब, पुलिंद, पुंड्र, शबर झाले असा उल्लेख आहे. याखेरीज शक, यवन, बर्बर, शबर, म्लेंच्छ, आभीर, हूण, कुशान इ. अनेक आर्येतर व रानटी जमातींचा उल्लेख पुराणात येतो. पण महार हा शब्द आर्य व अनार्य कोणालाच लावलेला नाही. मनूने कैवर्त, चांडाल, किरात, दरद, खश इत्यादी जातींचा उल्लेख केला आहे. पण महार हे नाव कोठेही नाही. मग त्या काळी या नावाची जमात होती व तिच्यावरून या भूमीला नाव मिळाले असे डॉ. केतकर कशावरून म्हणतात ? डॉ. केतकर म्हणतात, त्या काळी येथील लोक आपणास महार म्हणवीत नसतील कशावरून ?' या उपपत्तीची चर्चा करण्याची गरज आहे असे वाटत नाही.
 डॉ. भांडारकरांनी रट्ट या शब्दाचेच संस्कृत रूप राष्ट्रिक होय, असे सांगून भोज जसे पुढे आपणास महाभोज म्हणवू लागले तसेच राष्ट्रिक आपणास महाराष्ट्रिक म्हणवू लागले, असे मत मांडले आहे. या भूमीत रस्टिक लोक होते असा निर्देश अशोकाच्या शिलालेखात आहे. त्यावरूनच रट्ट, त्यावरून महारट्ट व त्याचे संस्कृतीकरण महाराष्ट्र, अशी ही उपपत्ती आहे. म. म. पां. वा. काणे यांच्या मते महाराष्ट्र हे नाव वंशावरून किंवा जातीवरून पडलेले नसून देशाच्या विस्तारावरून पडलेले असावे. सातवाहन साम्राज्यात महाराष्ट्रातले अनेक घटक विभाग एकत्र झाले व त्या मोठ्या प्रदेशाला महाराष्ट्र असे नाव पडले असे त्यांचे मत आहे.

मिश्रवंश
 महाराष्ट्रातले लोक कोणत्या वंशाचे होते, ते मूळ कोठून आले आणि महाराष्ट्र हे अभिधान कशावरून पडले याविषयीची भिन्न मते आपण पाहिली. त्या मतांत काही विद्वानांची मते अगदीच काल्पनिक आहेत. इतर पंडितांच्या अनुमानांना काही थोडा आधार आहे, पण निश्चित निर्णय देण्याइतका तो पुरेसा नाही. महाराष्ट्री वा अपभ्रंश या भाषा येथे होत्या की नाही हे ठरविण्यास त्या भाषांतील शिलालेख, ग्रंथ, त्या काळच्या पंडितांनी त्यासंबंधी काव्यव्याकरणादी ग्रंथांत केलेले उल्लेख असा प्रत्यक्ष पुरावा मिळतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्रीपासून अपभ्रंश व त्या अपभ्रंशापासून मराठी असे सिद्धान्त मांडण्यास स्वरव्यंजनप्रक्रिया, विभक्तिरूपांची घडण अशांसारखी निश्चित वस्तुनिष्ठ प्रमाणे उपलब्ध आहेत. पण येथल्या लोकांचा मूळचा वंश, वर्ण वा जाती कोणती हे ठरविण्यास निश्चित असा कसलाही आधार नाही. पंडितांनी दिलेली मते म्हणजे केवळ अनुमाने आहेत आणि तीही व्यक्तिनिष्ठ काल्पनिक अनुमाने! म्हणून ती स्वीकारणे युक्त नाही. पण या बाबतीत आणखी एक महत्त्वाचा विचार ध्यानात ठेवला पाहिजे. महाराष्ट्रीयांचा मूळ वंश वा जाती कोणती हे ठरविण्याचा अट्टाहास करण्याचे कारण, राजवाड्यांसारख्या काही पंडितांच्या मनात तरी निदान असे आहे की त्यांच्या मते संस्कृती ही वंशजातिवर्ण यांवर असते. आणि महाराष्ट्राची संस्कृती श्रेष्ठ आहे हे ठरविण्यास हे लोक श्रेष्ठवंशीय वा वर्णीय आहेत हे ठरविणे अवश्य आहे, असे त्यांना वाटते. हा भ्रम आपण आपल्या मनातून प्रथम काढून टाकला पाहिजे. या विषयाचे सविस्तर विवेचन पुढे समाजरचनाप्रकरणी येईलच. पण विपषयपूर्तीसाठी त्याचा सारार्थ सांगतो. पहिली गोष्ट अशी की आर्य हा शब्द वंशवाचक नाही, हे आता निश्चित सिद्ध झाले आहे. दुसरे असे की इ. सनाच्या दहाव्या शतकापर्यंत भारतात आणि महाराष्ट्रातही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांच्यांत अनुलोम व प्रतिलोम विवाह विपुल होत असत. अनुलोम विवाहाला तर धर्मशास्त्राचीच मान्यता होती. त्यामुळे अमका वर्ण, अमकी जात येथे शुद्ध रक्ताची राहिली आहे, असा वृथाभिमान धरून, तिच्यामुळे संस्कृतीचा उत्कर्ष झाला किंवा दुसऱ्या संकरज जातीमुळे अपकर्ष झाला या म्हणण्याला काही अर्थ नाही. द्रविड, नाग, शक, हूण यांच्याशी आर्य म्हणविणाऱ्या लोकांचा उत्तरेत व दक्षिणेतही संकर होत होता याला विपुल ऐतिहासिक प्रमाणे उपलब्ध झालेली आहेत. शक, यवन, कुशाण, हूण, आभीर यांनी शतकानुशतक येथे धुमाकूळ घातला होता व दीर्घकाळ राज्येही चालविली होती. आणि रणकंदनेही केली होती. अशा स्थितीत वंशशुद्धी कितपत टिकली असेल हे सहज ध्यानात येईल. तेव्हा वर्ण व कर्तृत्व यांचा अविभाज्य संबंध आहे असे ज्यांचे मत आहे त्यांनीसुद्धा हे सत्य ध्यानात घेऊन राजवाड्यांसारखी विधाने न करणे हेच श्लाघ्य होय. या बाबतीत डॉ. इरावतीबाई कर्वे यांनी पुष्कळ संशोधन केले आहे. महाराष्ट्रातल्या अनेक जातिउपजातींची रक्ते तपासली आहेत. आणि त्या सर्व माहितीच्या आधारे 'मराठी लोकांची संस्कृती' या आपल्या ग्रंथात, वंशावर संस्कृतीचा उत्कर्षापकर्ष मुळीच अवलंबून नाही, असा निर्णय दिला आहे. 'संस्कृतीची परंपरा ही शरीर- परंपरेपेक्षा अगदी निराळी आहे, हे ध्यानात ठेविले तर सामाजिक प्रश्न सोडविण्यास लागणारी बुद्धीची शुद्धता तरी निर्माण होईल' असे त्यांनी म्हटले आहे (पृ. ७४ ). महाराष्ट्र - संस्कृतीच्या अभ्यासात मूळ वंशाच्या विचाराला महत्त्व नाही, असे मी जे वर म्हटले आहे ते याच अर्थाने. पण हे मत ज्यांना मान्य नाही त्यांनीही, निश्चित प्रमाणांच्या अभावी, कोणतीही ठाम विधाने करण्याचा मोह टाळणे हेच श्रेयस्कर ठरेल.
 महाराष्ट्र हे नाव कसे पडले याविषयी अशीच अनिश्चितता आहे. त्याही बाबतीत ढोबळ विचार असा दिसतो की राष्ट्रिक, रट्ट, रठ्ठ हे लोक गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र, पंडुराष्ट्र, विदर्भ, अपरान्त, कुंतल अशा वसाहती करून येथे दीर्घकाळ रहात होते. ते एका साम्राज्यात आल्यावर या देशाला 'महाराष्ट्र' असे नाव पडले. त्यातल्या त्यात संभवनीय उपपत्ती ही वाटते, इतकाच अर्थ.
 काळासंबंधी विचार करता थोडे जास्त निश्चित बोलता येणे शक्य आहे असे वाटते. कारण तेथे भाषेचा निकट संबंध आहे. महाराष्ट्री ही भाषा इ. पू. ३००/४०० च्या सुमारास उदय पावली. आणि भाषेला प्रदेशावरून नाव पडले असण्याची जास्त शक्यता असते; त्या अर्थी त्या काळच्या सुमारास किंवा आगेमागे महाराष्ट्र हे नाव रूढ झाले असावे असे अनुमान करणे शक्य आहे. शूरसेन प्रांतातली ती शौरसेनी, मगधातली ती मागधी अशी नावे त्या त्या प्रदेशावरून प्राकृत भाषांना मिळाली हे सर्वमान्य आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्राची ती महाराष्ट्री हे मत स्वीकार्य वाटते आणि यामुळेच महाराष्ट्र हे नाव याच स्वरूपात, किंवा महारठ्ठ, महरट्ट या स्वरूपात तरी निदान, इ. पू. ४००/५०० च्या सुमारास पडले असणे संभवनीय आहे.

प्रादेशिक अस्मिता
 इ. पू. ३०० पासून महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास या ग्रंथात सांगावयाचा आहे. त्यासाठी त्या काळापासून महाराष्ट्राला स्वतंत्र अस्तित्व होते, पृथगात्मता होती हे निश्चित करणे प्रथम अवश्य होते. महाराष्ट्री भाषा व महाराष्ट्र हे नामाभिधान यांचा इतिहास पाहून ते प्रथम आपण निश्चित केले. आता पृथगात्मतेचे याहीपेक्षा एक महत्त्वाचे लक्षण पाहून हा विषय पुरा करू.
 भाषा, भूप्रदेश व लोक यांना काही भिन्नता, पृथगात्मता प्राप्त झाली असली तरी राष्ट्राच्या पृथगात्मतेचे खरे लक्षण म्हटले म्हणजे या पृथगात्मतेची लोकांच्या मनात जागृत असलेली जाणीव हे होय. प्रादेशिक अस्मिता, अहंता याचा हाच अर्थ आहे. अहंता ही लोकांच्या मनातच असू शकते. आम्ही इतरांपासून निराळे आहोत, म्हणजे श्रेष्ठ आहोत ही भावना म्हणजेच अस्मिता. हीच मानवाच्या सर्व कर्तृत्वाची जननी आहे. तेव्हा इ. पू. ३०० पासून इ. स. १३०० या कालखंडात महाराष्ट्रातील लोकांना, महरठ्ठांना आपला देश, आपला समाज व आपली भाषा यांचा अभिमान कितपत होता याचा विचार आता केला पाहिजे. संस्कृतीला प्रारंभ होण्यापूर्वी प्रत्येक देशाच्या गिरिकंदरात रानटी जमाती राहातच असत. तशा महाराष्ट्रातही होत्या. कातवडी, ठाकर, कोळी, गाेंड, भिल्ल, वारली या येथल्या आदिवासी जमाती होत, असे अभ्यासक आज सांगत आहेत. या जमाती परस्परांपासून भिन्न होत्या. त्यांच्या भाषाही भिन्न असण्याचा संभव आहे. पण आम्ही इतरांहून श्रेष्ठ आहो, आमचे कर्तृत्व असामान्य आहे अशी प्रबळ अहंता, असा प्रखर अभिमान त्यांच्या ठायी निर्माण झालेला नव्हता. म्हणूनच त्यांची कसलीही प्रगती होऊ शकली नाही.
 ग्रीकांचा उदय झाला त्या काळी त्यांच्या शेजारच्या प्रदेशात बल्गर, रुमिनी, सर्ब इ. रानटी जमाती राहात होत्या. ग्रीकही प्रारंभी त्यांच्याप्रमाणे रानटी अवस्थेतच होते. पण आपण रक्ताने श्रेष्ठ आहो, श्रेष्ठवंशीय आहो, अशी एक भावना, काही कारणाने, त्यांच्या ठायी निर्माण झाली. तिचे वर्णन करून प्रसिद्ध इतिहासपंडित एच. ए. एल. फिशर म्हणतो की या अस्मितेच्या जाणिवेमुळेच ग्रीकांच्या ठायी कर्तृत्वाचा उदय झाला (हिस्टरी ऑफ युरोप, पृ. १५) हाच प्रकार सर्वत्र होत असतो आणि म्हणूनच ही श्रेष्ठतेची जाणीव, हा अभिमान, हेच पृथगात्मतेचे खरे लक्षण होय, असे वर म्हटले आहे. हे लक्षण महाराष्ट्रीयांच्या ठायी कितपत होते, त्यांना स्वदेश, स्वभाषा व स्वसमाज यांचा अभिमान कितपत होता ते आता पाहावयाचे आहे. त्याचबरोबर इतरांना म्हणजे महाराष्ट्रीयतरांना यांच्या भिन्नतेची वैशिष्ट्याची भिन्न संस्कृतीची जाणीव होती की नाही, कितपत होती, हेही शोधावयाचे आहे.
 मराठीच्या प्रारंभकाळीच मराठीत वाङ्मय लिहून ज्यांनी या भाषेला नामरूप प्रात करून दिले त्या महानुभावांना महाराष्ट्राचा विशेष अभिमान होता. ' महाराष्ट्र म्हणजे महंत राष्ट्र' हे आचारस्थळकर्ते शिववास यांचे उद्गार वर एके ठिकाणी दिलेच आहेत. महाभाष्यकर्ते विश्वनाथवास यांचेही उद्गार असेच आहेत. 'थोरा पासोनी महाथोर, तयाते महाराष्ट्र म्हणिजे. तर राष्ट्रशब्दे आणिक देश बोलिले असत की. ना ते भूमीने थोर होती, परी गुणवृद्धीने नव्हेती.' दुसऱ्या एका उत्तरकालीन महानुभाव ग्रंथात महाराष्ट्राचा असाच गौरव केलेला आढळतो. ' साठी लक्ष देश महाराष्ट्र | तेथीचे राये शिहाणे सुभटू। वेदशास्त्रचातुर्याची पेठू भरेली तिये देशी । ऐसे हे महाराष्ट्र राये सुंदरू | वरी महाराष्ट्र भाषा चतुरू तेही बसविले गंगातीरु । क्षेत्र त्र्यंबक वेऱ्ही.
 यातील महाराष्ट्र देश व महाराष्ट्र भाषा यांचा अभिमान स्पष्ट आहे. ज्ञानेश्वरांच्या काळापासून मराठी भाषेचा, महाराष्ट्रभूमीचा व येथील भागवतधर्मी लोकांचा अभिमान निःसंह रीतीने प्रगट होऊ लागला. पण आपल्याला शोध घ्यावयाचा आहे तो त्याच्या मागल्या ह्जार दीडहजार वर्षांच्या काळातला. म्हणून मांगल्याप्रमाणेच महानुभावांपासून प्रारंभ केला आहे. तेथून सातवाहन काळापर्यंत आपण जाणार आहो.

वीरपुरुषांचा देश
 दहाव्या शतकातील नलचंपू या काव्यात कवीने महाराष्ट्राची 'वीरपुरुषांचा देश' म्हणून प्रशंसा केली आहे.

वीरपुरुषं तदेतद् वरदातटनामकं महाराष्ट्रम् ।
दक्षिणसरस्वती सा वहति विदर्भा नदी यत्र ॥ नलचंपू, ६.६६

 वरदातट म्हणजे वऱ्हाड म्हणजे विदर्भ. त्यालाच कवीने महाराष्ट्र म्हटले आहे व ते वीरपुरुषांचे राष्ट्र आहे, असा त्याचा गौरव केला आहे. शिवाय विदर्भा नदीला दक्षिण सरस्वती म्हणून महाराष्ट्रीयांच्या विद्यासंपन्नतेचाही त्याने निर्देश केला आहे.
 राजशेखराचा उल्लेख वर आलाच आहे. बालरामायणात त्याने महाराष्ट्राचा ( विदर्भाचा ) 'सारस्वती जन्मभूः' असा रामाच्या तोंडून उल्लेख केला आहे. त्याला महाराष्ट्राचा किती अभिमान होता हे तेथे दिलेल्या इतर वचनांवरूनही स्पष्ट होईल.
 कोऊहल कवीच्या लीलावई काव्यातला उताराही वर दिला आहे. कुवलयमालाकार उद्योतनसूरी व चिनी प्रवासी ह्युएनत्संग यांनी महाराष्ट्राचे व तेथील शूर लोकांचे केलेले वर्णन तेथे दिले आहे. या सर्व उताऱ्यांवरून या भूमीतील लोकांना अस्मिता प्राप्त झाली होती हे स्पष्ट दिसून येते. या भूमीत नित्य कृतयुग असते, येथे कलियुग कधी येतच नाही, ही भूमी म्हणजे धर्माचा आधार आहे, येथली सृष्टी म्हणजे ब्रह्मदेवाची सृष्टिरचनेची शाळा आहे, असे उद्गार कवींच्या मुखांतून निघतात, तेव्हा त्या लोकांच्या राष्ट्रीय अभिमानाविषयी शंका घेण्याचे कारण नाही.

स्वभाषा
 देशाचा जसा त्या काळचे लोक अभिमान बाळगीत होते तसाच किंवा त्याहूनही उत्कट असा आपल्या भाषेचाही अभिमान त्यांच्या मनात होता, हेही विपुल प्रमाणा- वरून दिसून येते.
 श्रीरामशर्मा हा प्राकृत भाषेचा व्याकरणकार होता. त्याच्या मते महाराष्ट्री ही सर्व भाषांच्या मूलस्थानी असून ती महाराष्ट्रातच निर्माण झालेली आहे. शौरसेनी, मागधी या, त्याच्या मते, महाराष्ट्रीपासून निर्माण झाल्या आहेत.

सर्वासुभाषास्विह हेतुभूतां भाषां महाराष्ट्रभुवां पुरस्तात् |
निरूपयिष्यामि यथोपदेशः श्रीरामशर्माहमिमां प्रयत्नात् ॥

 (रामतर्कवागीश, प्रा. ल. स्तबकर अवतरण - 'मराठी भाषा उद्गम आणि विकास', कृ. पां कुळकर्णी. पृ. ९३ )
 राजशेखराने जसा महाराष्ट्राचा गौरव केला आहे तसाच त्याने, तो स्वतः संस्कृत- पंडित असूनही, महाराष्ट्री प्राकृताचाही केला आहे.

परुस सक्कअ पाऊअ बंधोवि होई सुकुमारो ।
पुरिस महिलाणं जेत्तिअमिहंतरं तेत्तिअमिमाणं ॥

 संस्कृत कर्कश तर प्राकृत भाषा सुकुमार आहे. राकट पुरुष व नाजूक स्त्री यांच्यात जेवढे अंतर असते तेवढे या दोन भाषांत आहे.
 धर्मोपदेशमाला हा नवव्या शतकातील ग्रंथ आहे. त्यात 'मरहठ्ठ भासा ' हिचा विशेष गौरव केला आहे.

सलिलयपदसंचारा, पयडिय मयणा, सुवण्ण रयणेल्ला
मरहठ्ठ भासा कामिणि य अडवीय रेहन्ती.

 मराठी भाषा सुवर्णरचनावती, सललितपदसंचारा, प्रकटितमदना अशी कामिनी आहे. ती आपल्या वैभवात विराजत आहे.
 'गउडवहो' या प्राकृत महाकाव्याचा कर्ता वाक्पतिराज याच्या पुढील उद्गारांवरून प्राकृत - महाराष्ट्री- भाषेचा त्याचा अभिमान व्यक्त होईल.

णवमत्थ दंसणं संनिवेस सिसिराओं बंध रिद्धिओ ।
अविरलमणिओ आभुवनबंधमिह णवर पयमक्ति ॥

 सृष्टीच्या आरंभापासून आजपर्यंत अभिनव आशय, समृद्धरचना आणि मृदुशब्दमाधुर्य या बाबतीत प्राकृत भाषा सर्व भाषांत श्रेष्ठ आहे. त्यानेच पुढे म्हटले आहे की जल हे सागरापासून निर्माण होते व ते सागरातच विलीन होते. त्याप्रमाणे सर्व भाषा प्राकृतातून निर्माण होतात व प्राकृतातच विलीन होतात. प्राकृतापासून मनाला अनिर्वचनीय आनंद होतो. त्या आनंदाने नेत्र विकसित होतात व तृप्तीने मुकुलितही होतात.
 'वज्जालग्ग' हा जयवल्लभाने रचलेला ग्रंथ गाथासप्तशतीसारखाच सुभाषित- भांडाराच्या स्वरूपाचा आहे. त्यात कवी म्हणतो,

ललिए महुरक्खए जुबई-यण बल्लहे ससिंगारे |
संते पाइय कव्वे को सक्कइ सक्कयं पढिऊं ? ॥

 लालित्यपूर्ण, मधुर युवतींना प्रिय असलेले व शृंगाररसयुक्त प्राकृत काव्य उपलब्ध असताना संस्कृत कोण वाचणार ?
 महाराष्ट्री प्राकृतातील पहिले अभिजात काव्य म्हणजे 'गाथासप्तशती' हे होय. त्यात आरंभीच

अमिअं पाऊअ काव्यं पढिऊं सोऊं अजेण अणंति
कामस्स तत्ततंतिं कुणतिं ते कहं ण लज्जति ?

 असा प्राकृत भाषेचा व काव्याचा अभिमान कवीने प्रगट केला आहे. तो म्हणतो- प्राकृत काव्य शृंगाररसाच्या पूर्णतेमुळे अमृतरूप आहे. ( त्या प्राकृत काव्यास अशिष्ट समजून ) ते पढणे व ऐकणे जे जाणत नाहीत त्यांना मदनाची तत्त्वचिंता करताना लज्जा कशी वाटत नाही ?
 कवीने प्रगट केलेला प्राकृत काव्याबद्दलचा हा अभिमान संस्कृत कवींनाही मंजूर होता, हे अनेक संस्कृत कवींनी गाथासप्तशतीचा जो गौरव केला आहे त्यावरून दिसून येते. 'कादंबरीचा' कर्ता सुप्रसिद्ध कवी बाण म्हणतो,

अविनाशिनमग्राम्यं अकरोत् सातवाहनः ।
विशुद्धजातिभिः कोशं रत्नैरिव सुभाषितैः ।

 प्राकृत भाषेचा हा अभिमान तिचे सौकुमार्य, सौंदर्य एवढ्यापुरताच मर्यादित नाही. शिक्षण, लोकव्यवहार या सर्व क्षेत्रात प्राकृताचा आश्रय केला पाहिजे असे तिच्या उपासकांचे म्हणणे आहे.

प्राकृत हे मूळ
 संस्कृताचा अपभ्रंश होऊन प्राकृत निर्माण झाली हे प्राकृताच्या अभिमान्यांना मुळीच मान्य नाही. संस्कृत पंडितांचा मात्र तसा आग्रह आहे. संस्कृत ही दैवी भाषा व तिच्यापासून जन्मलेली ती प्राकृत असे दण्डीने म्हटले आहे. चंड, वाग्भट या पंडितांचेही असेच मत आहे. इतकेच नव्हे, तर प्राकृताचा प्रसिद्ध व्याकरणकार हेमचंद्र हाही 'प्रकृतीः संस्कृत, तद्भवं, तत् आगतं - प्राकृतम् ' असेच म्हणतो. पण प्राकृताचे अभिमानी निराळी व्युत्पत्ती व उपपत्ती सांगतात. प्राक् - पूर्व-कृत- प्राकृतम् । पूर्वी, संस्कृतच्या आधी झालेली, ती प्राकृत. किंवा लोकव्यवहार म्हणजे प्रकृती - तत्रभवं सव प्राकृतम् | अशी व्याख्या ते देतात. त्यांची हीच विचारसरणी आज पंडितांना मान्य झालेली आहे. संस्कृत ही सर्व लोकांची भाषा असणे कदापि शक्य नाही. शास्त्री- पंडित ती तत्त्वविवेचनासाठी, ग्रंथरचनेसाठी योजीत असले तरी लोकव्यवहार संस्कृतात होणे शक्य नव्हते. लोकांना तत्त्वनिरूपण समजावे म्हणून प्राकृताचाच आश्रय केला पाहिजे, आणि अशी लोकसुलभ जी भाषा तीच श्रेष्ठ, असा अभिमान अनेक पंडितांनी मागल्या काळीसुद्धा प्रगट केलेला आहे. जैन पंडितांनी तर या बाबतीत संस्कृतवादी लोकांचा धिक्कार केला आहे.

संस्कृता प्राकृता चेति भाषे प्राधान्यमर्हतः ।
तत्रापि संस्कृता तावद् दुर्विदग्ध हृदि स्थिता ॥

वास्तविक संस्कृत व प्राकृत दोन्ही भाषा महत्त्वाच्या आहेत. पण दुराग्रही संस्कृत पंडित तरीसुद्धा संस्कृतलाच कवटाळून बसतात.

बालस्त्रीमंदमूर्खाणां नृणां चारित्रकांक्षिणाम् |
अनुग्रहार्थं तत्त्वज्ञैः सिद्धान्तः प्राकृतः कृतः ॥

बाल, स्त्रिया, जडबुद्धी, मूर्ख यांच्यासाठी, धर्मनीती जाणण्याची इच्छा असलेले यांच्यासाठी, तत्त्ववेत्त्यांनी प्राकृतात धर्मसिद्धान्त सांगितले आहेत, असे सांगून हा पंडित पुढे म्हणतो, ही भाषा बालांना अती सद्बोधकारिणी आहे, कर्णपेशला - श्रुति- मधुर आहे, तरी हटाग्रही लोकांना ती मान्य होत नाही.
 'कुमारपाल' या काव्याचा कर्ता म्हणतो, ' आदी पुरुषाने प्रथम १४ स्वर व ३८ व्यंजने करून प्राकृत भाषा केली आणि मग तीवर संस्कार झाल्यामुळे संस्कृतभाषा झाली. तेथून पुढे अनेक भाषाभेद झाले. तेव्हा, सकलशास्त्रमूलं मातृकारूपं प्राकृतमेव प्रथमम् । '
 प्राकृत ही सुलभ असल्यामुळे अध्यापनासाठी तिचा उपयोग संस्कृतावरोवर करावा, असा उपदेश काही प्राचीन पंडितांनी केलेला आढळतो.

नात्यंतं संस्कृतेनैव, नात्यंतं देशभाषया ।
कथा गोष्टीषु कथयन् लोके बहूमतो भवेत् । कामसूत्रे १, ४, १०

केवळ संस्कृत नव्हे, केवळ देशभाषा ( प्राकृत ) नव्हे, तर दोहींचा अवलंब करून जो निरूपण करतो त्यालाच लोकात बहुमान मिळतो.

संस्कृतैः प्राकृतैर्वाक्यैः यः शिष्यमनुरूपतः ।
देशभाषाद्युप यैश्च बोधयेत् स गुरुः स्मृतः ॥ विष्णुधर्मोत्तरे.

प्रसंगाप्रमाणे संस्कृत, प्राकृत व देशी भाषा यातून जो शिष्यांना बोध करील त्यालाच गुरू म्हणावे.
 संस्कृत ही या काळात सर्वसुलभ नव्हती, अध्यापनासाठी प्राकृत व देशी भाषा यांची गरज होती. यावरून लोकात प्राकृत व देशी याच प्रचलित होत्या हे स्पष्ट दिसते. महाभारतातही-

नाना चर्मभिराच्छन्ना, नाना भाषाश्च भारत ।
कुशला देशभाषासु जल्पन्तोऽन्योन्यमीश्वराः ॥

नाना वर्णाचे, अनेक भाषा बोलणारे, देशी भाषांमध्ये प्रवीण असे अनेक राजे एकमेकांशी बोलतात, असे वर्णन आले आहे. यावरून प्राकृताच्या लोकप्रियतेविषयी शंका राहात नाही.
 इ. सनाच्या पाचव्यासहाव्या शतकात मागधी, महाराष्ट्री या भाषांचेही रूप बदलू लागले व त्यांचे अपभ्रंश त्या त्या प्रदेशात रूढ होऊ लागले, हे मागे सांगितलेच आहे. ते रूढ झाल्यावर लोकांना त्यांचाही असाच अभिमान वाटू लागला. महाराष्ट्री अपभ्रंशाला देशी हे नाव त्या वेळी रूढ होते व तेच पुढे प्रारंभीच्या मराठी कवींनी मराठीला लावले हे, डॉ. कोलते यांच्या आधारे, मागल्या प्रकरणी सांगितलेच आहे. त्या अपभ्रंश-देशी-भाषेचा अभिमान साहित्यात कसा दिसून येतो ते पुढील उताऱ्यावरून कळून येईल.

वायरणु देशी सद्दत्थगाढ | छंदालंकारविसाल पोढ ॥

 देशीभाषेत व्याकरण आहे, गाढ शब्दार्थ आहे, ती छंदालंकारांनी संपन्न आहे आणि प्रौढ आहे. (पासणाह चरिऊ- पद्मदेव ).

सक्कअवाणी बहुअ न भावइ | पाऊनरसको मम्म व पावइ ।
देसिल वअना सब जन मिट्टा । तै तैसन जापओ अवहट्टा ॥

 या श्लोकाच्या उत्तरार्धात, देशी वचने सर्व लोकांना गोड वाटतात म्हणून त्याच अपभ्रंशात (अवहट्टा) मी रचना करतो, असे कवीने म्हटले आहे. (कीर्तिलता-विद्यापती ठक्कुर ). [ विक्रमस्मृती, मराठीचे माहेर - डॉ. कोलते यांनी दिलेले उत्तर. ]
 नद्या, डोंगर, समुद्र यांनी किंवा भाषेमुळे प्रदेश जरी पृथक झाला तरी तेवढ्यामुळे त्याला भिन्न अस्मिता आली असे होत नाही. त्या पृथकपणाची जाणीव तेथील समाजाला झाली, आपण भिन्न आहो, इतरांहून गुणसंपदेने श्रेष्ठ आहो, ही अहंता त्याच्या ठायी उद्भवली, आणि या अहंतेमुळे श्रेष्ठ कर्तृत्व तो प्रकट करू लागला म्हणजे मगच त्याच्या भूमीला अस्मिता प्राप्त झाली असे म्हणणे युक्त ठरते. महाराष्ट्र भूमीला इ. पू. दुसऱ्या शतकापासूनच ती कशी प्राप्त होत होती, ही भूमी, तिची भाषा व येथल्या लोकांची गुणसंपदा यांचा अभिमान तेव्हापासूनच येथे कसा फुलत होता आणि इतरांनाही तो कसा सार्थ वाटत होता, हे येथवर आपण पाहिले. आता या अस्मितेचे सातत्य ज्या राजसत्तेमुळे टिकून राहते तिचा विचार करावयाचा आहे.