Jump to content

महाबळेश्वर/हवा

विकिस्रोत कडून
हवा.
---------------

 महाबळेश्वराची खुबी अशी आहे कीं, येथें कितीही श्रम केले तरी फार शीण येत नाहीं व थोडाबहुत आला तरी तो थोडा वेळ टिकतो. याचें कारण येथील थंड हवा हें होय. समुद्राच्या पृष्ठ भागापासून महाबळेश्वराची उंची सुमारें ५००० फूट आहे. आणि म्हणून डोंगराच्या माथ्यावर वारा मोठ्या सोसाट्यानें चालतो, या तत्वास अनुसरून मैदानांतील प्रदेशांप्रमाणें येथें उष्णता भासत नाहीं. याचा अनुभव पुष्कळांस असेल. तसेंच पांडवगड, कमलगड, रायगड, मकरंदगड, सिंहगड, पुरंदर, तोरणा, प्रतापगड, पन्हाळा, यवतेश्वर, जरंडा, माथेरान वगैरे लहानसान डोंगरांवरही बराच गारवा असतो , हे पुष्क- 


ळांच्या पाहण्यांत आलें असेल. तेव्हां महाबळेश्वराची उंची हें येथील थंड हवेचें कारण झालें. येथील उंची फार असून शिवाय येथें झाडीही फार आहे.

 याशिवाय दुसरी एक गोष्ट ध्यानांत ठेविली पाहिजे ती ही कीं, झाडी होण्यास डोंगराच्या माथ्यावर झाडांचीं मुळे खोल जाण्यासारखी ठिसूळ व मातट अशी बरीच सपाट किंवा घसरती जागा पाहिजे; तेव्हां त्रिकोणासारख्या काळ्याठिक्कर पाषाणाचा सुळका चंद्र सूर्यांच्या मार्गात आड येण्याइतका उंचीचा जरी असला तरी त्यावर झाडी कोठून होणार ? तसें या ठिकाणीं नाहीं, या महाबळेश्वरचा माथा फार विस्तृत असून त्यावर झाडें रुजण्यासारखी तांबड्या मातीची जमीन आहे.

 साहेब लोकांनीं महाबळेश्वरच्या आसपासच्या पांच मैलपर्यंत झाडी तोडूं नये असे मोठया सक्तीचे नियम केले आहेत. यामुळे सुमारें एकोणीस वीस चौरस मैलांचें क्षेत्र हिरव्यागार झाडांनीं नेहमीं आच्छादून गेलेलें दृष्टीस पडते. ह्या विस्तीर्ण झाडीचाच पावसावरही विलक्षण परिणाम घडतो. अगोदर उंच डोंगर 

आपल्या उच्चत्वामुळे पर्जन्योदकवाहक ढगांचें आपल्याकडे आकर्षण करितात, ही गोष्ट सुप्रसिद्ध आहे. त्यांतही अशा डोंगरावर झाडांची गर्दी असले कारणानें हें आकर्षण मोठ्या झपाटयानें चालून पाऊस पुष्कळ पडतो आणि झाडांचें जीवन जें उदक हें त्यांस यथेच्छ मिळून त्यांची वाढ चांगली होते व त्यांची संतती झपाटयाने वाढत जाते. डोंगर माथ्यावर अतिवृष्टी होत असल्यामुळे व लागलींच खालीं पायथ्याकडे कमी असल्यामुळे तळांतील पिकें माथ्यावर होत नाहींत, हें डोंगरावरील अतिवृष्टीचें सूचक चिन्ह होय.

 यावरून वाचकांच्या लक्षांत आतां ही गोष्ट स्पष्टपणें येईल कीं, थंड हवा उत्पन्न होण्यास उंच डोंगराचा सपाट व ढिसूळ माथा, झाडें आणि पाऊस यांची फार अवश्यकता आहे. महाबळेश्वरास या साऱ्या गोष्टींची पूर्ण अनुकूलता आहे म्हणून येथील हवा या प्रांतांतील इतर ठिकाणांपेक्षां फारच नामी आहे.

 अगदीं उष्ण प्रदेशांतही या तीन कारणामुळे मधून मधून रम्य ठिकाणें दृष्टीस पडतात. म्हैसूर प्रांतांतील निलगिरी हें स्थान महाबळे श्वरापेक्षांही रमणीय आहे असें सांगतात. त्याप्रमाणेच व-हाड, खानदेश, गुजराथ, राजपुताना, माळवा, नागपूर वगैरे सर्व प्रसिद्ध उष्ण प्रांतांतही उन्हाळ्यांत उन्हाळा न वाटण्यासारखीं ठिकाणें आहेत पण यां पैकीं सर्वच ठिकाणीं महाबळेश्वराइतका पाऊस पडत नाहीं.

 आक्टोबर महिन्याच्या सुरवातीपासून जून महिना येऊन थडकेपर्यंत बाहेरील लोकांनीं येथें येण्याची शोभा असते. पुढें कोणी छत्रीवर पावसाळा काढणारे लोक येऊन राहिल्यास त्यांचे हाल कुतरे खाणार नाहींत, इतके होतात. आक्टोबरपासून जूनपर्यंत मात्र हवा थंड असून शरीरास आराम करणारी असते. आतां ती निरनिराळे ऋतूंमध्यें कसकशी बदलते याबद्दलच्या विशेष माहितीवरून असें समजलें आहे कीं:-

 आक्टोबर महिन्यांत बहुतकरून येथें थोडा पाऊस पडतो त्यामुळे सकाळीं हवा थोडी सर्द होते, व सायंकाळीं धुकट येऊन वांबाळ पडते. नोवेंबर, डिसेंबर, व जानेवारी, या महिन्यांत हवा शुष्क होते, आणि 

थंडी इतकी पडते कीं, आंग उघडें ठेविल्यास त्यास तें फुटून भेगा पडतात; व झाडावर थंडीचे कडके पडून झाडें कोंवळींं असल्यास वाळून जातात. कधीं कधीं घरांत सांठविलेल्या पाण्याचें गोंठून बर्फ बनतें. पूर्वेकडून थंडगार वारा सकाळी व सायंकाळीं सुटतो तो तर अंगाला फार झोंबतो. या वेळी उष्णता मापक यंत्रांतील पारा ६०|७० अंशावर येतो. फेब्रुवारी महिन्यापासून थंडी कमी कमी होत जाऊन शेवटीं अर्धामुर्धा फेब्रुवारी महिना होतो आहे इतक्यांत हिंवाळा खलास होऊन उन्हाळा डोकाऊं लागतो. परंतु येथील ऐन उन्हाळा तारीख १२ मार्चपासून सुरू होऊन एप्रिल महिना आखेरपर्यंत सरासरी असतो. एप्रिल महिन्याच्या अखेरीच्या सुमारासच पूर्वेकडील वारा वाहण्याचें बंद होऊन पश्चिमेकडून वारा वाहूं लागतो. हा पश्चिमेकडील वारा सुरू झाला ह्मणजे पाऊसकाळाचे डोहाळे लागण्यास प्रारंभ होतो. मे महिन्यामध्यें पश्चिमेकडून समुद्र किना-यावरील वाऱ्याच्या झुळका येऊंं लागल्या म्हणजे ऊष्ण प्रदेशांतून येथें येणा-या लोकांस फार समाधान वाटल्याशिवाय राहत नाहींं. 

सकाळीं हातपाय गळून जाणें, यत्किंचित श्रम झाले असतां अंगास घाम सुटणें, एकसारख्या उत्सुकतेनें काम करीत बसण्याची ताकद नसणें, वगैरे ऊष्ण हवेच्या भावना ज्या कोणास झालेल्या असतील त्यास येथें आल्याबरोबर रामबाण औषध मिळून तो मनुष्य कसा अगदीं ताजातवाना बनतेा. मे महिन्यांत येथे कधीं कधीं पावसाच्या सरी येऊन विजा व गारा यांचें तुफान वावटळच होतें. त्यामुळे हवेत ओलसरपणा अधिक अधिक प्रमाणाने येऊं लागतो. ढग व धुक्याने वारंवार सर्व खोरीं भरून जाऊन दिसेनाशीं होतात. आणि जसजसा दिवस वर येऊन उन्हाची ताप पडते, तसतसे ते ढग व धुकें यांची जी तारंबळ उडते ती पाहण्याची मोठी मेोज असते. उन्हाने त्याचें लहान लहान तुकडे तुकडे होऊन जसा कांहीं नाच चालला आहे कीं काय असें दिसतें. असें होऊन ते देखावा अगर्दी स्वप्नासारखा वाटतो. सिलोनमध्यें पाऊसकाळ सुरू झाल्यापासून सुमारें १९|२० दिवसांनीं येथें त्याची टाकी चालू होतेच. ज्येष्ठमासीं मृगनक्षत्रापासून पावसाळा लागतो असें ह्मणतात तोच हा होय. ज्या

ठिकाणीं दोन तीन महिन्याच्या अवकाशांत तीनशेंपासून चारशें इंच पाऊस पडतो, त्या ठिकाणच्या पावसाळ्याची कल्पना करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षां तो फार जंगी असेल असें मानून स्वस्थ राहणें बरें दिसतें. मे महिन्याच्या दहाव्या बाराव्या तारखेपासून येथील ग्रामस्थ लोक या स्वारीच्या आगमनसत्काराच्या तयारीस लागतात; व जूनच्या दहावे तारखेपयंत बहुतकरून सगळे सज्ज झालेले असतात; मुख्य तयारी धान्य व लांकडे घेऊन ठेवण्याची. महाबळेश्वरीं जळाऊ लांकडे सामान्य ऋतूंत पुष्कळ सवंग मिळतात खरीं, पण पावसाळ्यांत दसपट किंमत दिली तरी तीं मेिळणार कशीं ? व मिळाली तर तीं जळणार कशीं ? तेव्हां प्रथम चरू आणि इंधन यांचा पुरेसा सांठा केल्यावर, ज्या घरांत हा भयंकर पावसाळा काढावयाचा, त्याचा तरणोपाय कसा लागेल, हें पहावें लागतें ! पावसाच्या संतत धारेनें घराच्या भिंती वाहून जाऊं नयेत. व बुरशानें व शेवाळीनें त्यांची नासाडी होऊं नये म्हणून येथील लोक आपलीं घरे मागल्या दारापासून पुढल्या दारापर्यंत, व आढ्यापासून जात्याप

र्यंत लांब लांब गवताच्या व पानाच्या जाड ताटयांनीं कुडून टाकितात. आणि ज्या दिशेनें फारच थोडा वारा किंवा धुकें घरांत भरण्याचा संभव असेल अशा ठिकाणींं एक लहानसें गवाक्ष ठेऊन पावसाळ्यांत त्या वाटेनें नडलेल्या कामासाठी बाहेर पडतात व आंत परत जातात. साहेब लोकांची छावणी उठली, आणि ते डोंगराखालों उतरले, म्हणजे त्यांचे माळी बागेतल्या कुंडयांतील झाडे काढून टाकतात. आणि त्यांतील माती एखाद्या कोप-यांत रचून ठेवून व तीवर पाल्यापाचोळ्याची शाकारणी करून बंगल्याच्या व्हरांडयांत उर्फ पडव्यांत कुंड्यांच्या रांगा लाऊन ठेवितात. बंगल्यांच्या आसपासची माती व सडका अगदीं नाहीशा होऊं नयेत म्हणून त्यांवर झाडाचा पाला दाबून बसविण्याची चाल आहे. पावसाळ्यास आरंभ होऊन आठ पंधरा दिवस झाले कीं जांभळी शिवाय करून इतर झाडावर एक पान किंवा फूल दिसेल तर शपथ ! साहेब लोकांच्या बंगल्या समोरच्या बागांतील दिखाऊ, पण वासानें आणि सामर्थ्याने अगर्दी नादान फुलझाडें तर एक दोन सरी बरोबरच जमिन

दोस्त होऊन जातात. लिली, लारेल, कौझलिप, डेलिया, डेझी वगैरे विलायती झाडाचे खुंट जमिनींत जगून राहिले तर मोठे भाग्य ! अशा वेळी बंगल्यांचे माळीलोक, देवस्थानचे भटभिक्षुक, दहा पांच वाणी उदमी, दारू विके, एक दोन पारशी, व धावड, कुणबी, धनगर, मिळून सारे हजार लोक येथें डोके देऊन राहतात. जुलई महिन्यांत मात्र पाऊस अगदीं मुसळधारांनी ओतावयास लागतो. तेव्हां रोजचा पाऊस कधीं कधीं १२ पासून १८ इंच पावेतों होतों. सर्व झ-यांना पाण्याचे लोंढे वाहूं लागतात. यामुळे रस्ते व बगीचे यांचें अगदीं नुकसान होऊन जाते. या देिवसांत जिकडे पहावें तिकडे डोंगरावर, रस्त्यावर, आणि रानांतून पाणीच पाणी झालेलें असतें; व पृथ्वीची चर्या आनंदानें अगदी तल्लीन होऊन शांत झालेली दिसते.

हवेचे गुण.

 येथील हवेमध्यें साधारण गुण असा आहे कीं, तिचे योगानें निरोगी मनुष्याची प्रकृति सतेज राहून त्याचे अंगांत सदोदित हुषारी असते. असें होण्याचीं कारणें अशीं आहेत:  ( १ ) या हवेमध्यें थंडी फार आहे. ती फार असण्याचें कारण उघडच आहे. एक तर गांव सह्यपर्वताचे एका उंच शिखरावर वसला आहे. वृक्ष, वनस्पति सदोदित दाट, सच्छाय व हिरव्या असल्यामुळे सूर्याची प्रखरता त्याच्या अंतरंगांत शिरतच नाहीं. शिवाय कृष्णा आदिकरून नद्यांची उत्पति या डोंगरांतून असल्यामुळे त्यांचें पाणी चहूंकडे पहाडांत खेळत राहिलेले आहे. तसेंच वरचेवर मेघपटलें येऊन सूर्याच्या उष्णतेचें निराकरण होत असतें. या सर्व गोष्टींमुळे उन्हाळ्यामध्यें उष्णतेपासून बाहेरगांवी मनुष्यमात्रास जे विकार होतात, ते येथें होत नाहींत. म्हणून उष्णता शमन होण्याकरितां कृतीनें गार केलेलें पाणी पिण्याची किंवा कृत्रिम शितोपचारांची येथें जरूरच लागत नाहीं. तेव्हां अर्थातच कृत्रिम शीतजल, कृत्रिम वायु, इत्यादिकांपासून पुढें जे वाईट परिणाम होतात, ते येथें राहिल्यापासून होण्याची तिळप्राय धास्ती नाहीं.

 (२) येथील हवा सुखावह असण्याचें दुसरे कारण हें आहे कीं, ही हवा इतकी थंड आहे तथापेि तिच्यांत स्निग्धता विशेष आहे. येथें हवा हिंवाळ्यांत 

जरी इतकी थंड ह्मणजे देशावरील हवेपेक्षां दसपटीनें थंड असते, तरी देशावर थंडीनें जसे अंग, हात, पाय व ओठ, वगैरे फुटतात तसे येथें बहुशः फुटत नाहीत; व देशावरील उन्हाच्या दाहानें जसा फार त्रास वाटतो, निरुत्साह होतो व अंगीं शिथिलता येते, तसें येथें कांहींसुद्धां होत नाहीं. उलटे मन सुप्रसन्न राहून अंगांतील हुषारी अणुमात्रसुद्धां कमी न होता दिवस मोठ्या मौजेने तेव्हांच निघून जातो. साधारण थकवा येण्यास देखील येथें व्यायाम फार करावा लागतो. बाहेरून कितीही थकून आलें तरी स्वल्प उपहार करून, गार पाण्याचे चार दोन घोट घेतल्याबरोबर, पहिल्याप्रमाणें ताजेतवान होऊन पुन्हा काहीतरी उद्योग करावा असें वाटू लागतें. एखादे वेळीं थकवा आला, तरी तो केवळ क्षणिक असतो. त्यापासून हातापायाची आग होणे, मस्तक दुखणें, घशास कोरड पडणें वगैरे विकार होत नाहींत.

 ( २ ) तिसरें कारण असें आहे कीं देश व कोंकण या दोहोंच्या हवांचें या ठिकाणीं संमेलन होऊन दोहींचे दोष जाऊन गुण मात्र राहिले आहेत; ह्मणजे 

मावळांतील सर्दी कोंकणच्या अंतरंगांतील उष्णता खानदेश व वऱ्हाड येथील रुक्षवात हे गुण येथील हवेंत मुळींच नाहींत.

 ( ४ ) थंड व वनस्पतिमय ठिकाणच्या हवेंत विकार असण्याचा संभव असतो, ते या ठिकाणीं अगदीं नाहीं. याचें कारण पावसाचें सांचलेलें विकारी पाणी डोंगरावर मुळींच न राहतां लागलींच खालीं वाहून जातें आणि नद्यांचे प्रवाहास मिळतें. यामुळे गवत, झाडपाला वगैरे त्या पाण्यांत कुजण्याचा संभवच नसतों. शिवाय येथें दलदली किंवा पाणथळ जमिनी नाहीत; यामुळे हवेत रोगट सर्दी नाहीं. शिवाय डोंगरांच्या सभोंवतील सखल प्रदेशाची हवा स्वभावतःच उत्तम असल्यामुळे खालीं मलेरियासारखे साथीचे विकार होतच नाहीत; तेव्हां अर्थातच तेथून ते वर येण्याचे भय राहत नाहीं. पावसाळा गेलेवर दुस-या कित्येक ठिकाणींं हिंवताप वगैरे येतात, तसे या ठिकाणीं येत नाहींत. पावसाचें पाणी डोंगराला उतार असल्यामुळे जमिनीत न मुरतां निघून जातें, हें जरी मलेरिया न होण्यास कारण खरें आहे, तथापि गांवांत घाणीचे 

पाणी व इतर राबाचे पाणी जाण्यास गटार (ड्रेनेज) बांधून काढले नसल्यामुळे तें जागोंजागीं मुरतें. इकडे म्युनिसिपाल कमिटीचें लक्ष्य गेलें तर लोकांस फार सुखावह होणार आहे. येथील जमीन ढिसूळ असल्यामुळे व वस्ती लहान असले कारणानें हें पाणी मुरल्यापासून जरी हवा दूषित होणेचा संभव कमी आहे, तरी या प्रसिद्ध आरोग्यवर्धक स्थलीं या गोष्टीकडे दुर्लक्ष नसावें. घाण व राबाचें पाणी घराबाहेर न येऊं देणें व घरांतही न सांठूंं देणें याबद्दल येथील म्युनिसिपालिटीची सक्तीची तसदी आहे तरी त्यापासून असलें पाणी सांडण्याची व जमिनींत मुरण्याची क्रिया कमी झाली आहे असें होत नाही; इकडे म्युनिसिपालिटीचे लक्ष्य जाईल काय ! घरांतही पाणी सांडूं नये ह्मटलें, तर घरांत राहणाराचा मोठा निरुपाय होईल असें जाणून दिलेली सवलत ही मोठी मेहरबानीच समजली पाहिजे.

  या हवेंत नेहमीं हुषारी राहते यांचें कारण असें सांगतात कीं, या प्रदेशाची उंची समुद्रसपाठीपासून सुमारें पांच हजार फूट असल्याच्या योगानें शरीरावर 

हवेचा दाब पुष्कळ कमी बसून रुधिर वाहिन्यांतून रक्ताची गती किंचित् तीव्र होते; तेणेंकरून सदा उत्साहवृत्ति राहते. ( जसजसें वरवर जावें, तसें तसें पृथ्वीच्या भोंवतालचें वातावरण पातळ होत जातें, या तत्त्वावर हा सिद्धांत काढला आहे;) तसेंच अशक्तता, वीर्यक्षय, मस्तकाचा हल्लकपणा, निरुत्साह, उद्ग्विनता, व व्याकुलता इत्यादि प्रकार या ठिकाणींं फार कमी होतात.

 आणखी असें आहे कीं येथील हवा तल्लख व अंतर्यामी किंचित शोषक असल्यामुळे या ठिकाणीं पित्त सदैव जागृत असतें. यामुळे अग्निमांद्य मोडून पचनादि व्यापार जोरानें चालतात, अन्नाचा रस यथाक्रम होऊन रक्तशुद्धि व सामर्थ्यवृद्धि हळुहळु होत असते. हवेच्या पित्तकरपचाणें प्रत्यंतर प्रातःकाळीं निजून उठल्याबरोबर उन्हाकडे पाहिलें असतां पिवळे दिसणें व स्वतांस हल्लक वाटणें हेंच होय. यावरून पित्तांशाचा जोर येथें अधिक असावा हें उघड आहे. ह्मणून महाबळेश्वरीं सारक औषधाप्रीत्यर्थ डाक्टरास पैसे भरण्याची गरज नाहींपण ही गोष्ट ज्यांचे कोठे हिरडय़ांस किंवा बाळहिर

डयांस दाद देईनासे झाले आहेत, त्यांस मात्र लागू नाहीं. जन्मत:च ज्यांची पित्तप्रकृति आहे किंवा ज्यांचे काळिजांत किंवा पित्ताशयांतच विकार झालेला आहे, त्यांस ही हवा पित्ताचा ज्यास्त प्रकोप होऊन चैन पडू देणार नाही. आजार बरे करण्याचे उपयोगापेक्षां, अंगीं मूळचा असलेला धट्टेकट्टेपणा आणि निरोगीपणा कायम ठेवण्यास या हवेचा उपयोग फार आहे. अंगांत कांहीं विशेष आजार नसून फक्त ज्यांचे प्रकृतीस हुषारी नसेल, किंवा उष्णप्रदेशांत राहिल्यानें, अथवा सतत बैठकीचें काम केल्यामुळे ज्यांस शीण आला असेल त्यांस ही हवा फारच हितकारक आहे. गंडमाळा व हृदयाचा विकार जडतोसें भासू लागतांच इकडे या हवेंत आल्यास ते आजार जाऊन मनुष्य पहिल्यासारखा तयार होईल. राहून राहून वरचेवर येणारे तापांसही, ही हवा चांगली आहे.

 ही हवा पुरुषांपेक्षां स्त्रियांस व विशेषेकरून लहान मुलांस फारच आरोग्यकारक आहे, ही गोष्ट हल्ली अनुभवसिद्ध आहे. इंग्रज लोक एक वेळ स्वतः महाबळेश्वरी जाणार नाहीत, परंतु मुलांना उन्हाळ्यांत अवश्य 

तिकडेस पाठवितात, येणेंकरून पोरांना लहानपणीं जी रोगराई होण्याची भीति असते ती रहात नाहीं. तसेंच दांत येते वेळेस त्यांस क्लेश कमी होतात, व एकंदरीनें त्यांचें शरीर सुदृढ व पुष्ट होऊन उतार वयांत तें निरोगी व निकोप राहते.

 येथें अति पर्जन्य असल्यामुळे या हवेंत दोषही आहेत. अतिसार, संधिवात, धनुर्वात, गुल्म, प्लीहा रोग, यकृद्रोग, उदर, व शूल इत्यादिकांस येथील हवा फार वाईट आहे. क्षय, रक्तदोष, रक्तशुद्धि या विकारांस मात्र ही हवा चांगली आहे. परंतु जसा एखादा दररोज गांजा ओढणारा, अफू खाणारा, किंवा दारू पिणारा असला ह्मणजे त्यास नित्य अमली पदार्थ सेवन केल्यानें कैफ येत नाहीं तसेंच वरील हवेच्या अंगच्या गुणदोषांचे साधकबाधकपणाचा परिणाम येथील कायमच्या रहिवाश्यांवर विशेष घडत नाही. म्हणजे त्यांचे त्या पासून हित किंवा अहित जितक्या पुरतें तितकेंच होतें. हिंवाळ्यांत व पावसाळ्यांत पाणी तोंडांत घातलें, तर बर्फाचा तुकडा जिभेवर ठेविल्यासारखे जिभेस रवरवरतें, इतकें तें गार असतें; अंग उघडे टाकलें तर काला

सारखें गार होतें; परंतु त्यापासून अपाय होण्याचें मुळींच भय नसतें. महाबळेश्वरचा खरा उन्हाळा इतर ठिकाणांप्रमाणें मे व जून महिन्यांत नसतो. मार्च व एप्रिल हे महिने येथें फार कडक वाटतात. इंग्लंडांतील व येथील कडक उन्हाळ्याची उष्णता सारखी आहे असें एका ग्रंथकारानें लिहिलें आहे, या दिवसांत पारा कधीं कधीं ९० अंशांपर्यंत जातो. मे व जूनमध्यें तो ७५ पासून ८५ पर्यंत असतो. पण किती झाला तरी तो महाबळेश्वरचा उन्हाळा ! ह्मणजे फक्त बारापासून दोन वाजेपर्यंत फलाणीची बंडी घालू नयेसें वाटतें. तेव्हां देशावरील ज्या उन्हाळ्यांच्या रखरखीत ओलें चिरगुट सगळ्या अंगभर गुंडाळून घेऊन, ज्या ठिकाणीं कालत्रयीं सूर्याच्या किरणांचा प्रवेश होणार नाहीं अशा एखादे भुयारांत किंवा लादणींत जाऊन दडी मारावी अशी इच्छा होते, त्या उन्हाळ्यांत व यांत केवढे अंतर आहे बरें? अशा कडक हवेंतून पित्ताचे फोड किंवा गांधी आलेला मनुष्य महाबळेश्वराच्या कितीही कडक उन्हाळ्यांत येथे येण्यास निघाला तरी त्याला 

महाबळेश्वर घांटमाथ्याची हवा लागल्याबरोबर बरे वाटुं लागेल, व बहुश: एक दोन रात्रीं येथें काढल्यावर त्याच्या त्वचेवर उष्णापासून आलेली त्रासदायक विदूपता नाहींशी होईल. येथील थंड हवेमुळे दुपारचें जेवण झाल्याबरोबर प्रत्येकांस थोडीशी वामकुक्षी घेप्ण्याची इच्छा सहज उत्पन्न होते, व ज्याअर्थी बहुतेक लोक येथें आरामासाठींच येणारे असतात त्याअर्थी ती इच्छा टाळण्याबद्दल कोणी फारशी धडपडही करींत नाहींत. परंतु हिचा होईल तितका आव्हेर करणें या हवेला फार इष्ट आहे. तथापि नाइलाज होऊन झोपेची मिठीच पडली तर त्यावर उपाय ह्मणून सकाळ व संध्याकाळीं कोणत्या तरी प्रकारचा बराच व्यायाम केला असतां, ही दुपारची झोंप ह्मणण्यासारखी बाधक होणार नाही. असें समजूनच युरोपियन लोक देखील तिचा थोडाबहुत आदर करण्यास मागें पुढें पाहत नाहींत. महाबळेश्वरचें पाणी जात्या स्वच्छ पण जड आहे. चांगला व्यायाम केला तर यासारखें पाचक पाणी दुसरें नाहीं, पण जो कोणी व्यायाम न करील त्याला ते भोंवल्याशिवाय कधींही  राहावयाचें नाहीं. ज्याला महिना दीड महिना महाबळेश्वरीं काढून पांच चार शेर मांस वाढवून घेऊन परतावयाचे असेल त्यानें येथें हिंडणे, खाणें, व विश्रांति घेणें, या तीन धातुसाधित नामाच्या बाहेर फारसें जातां कामा नये. अकरा महिने कष्ट करून बारावा महिना खूप चैनीत घालविण्यास अत्यंत योग्य असें हें ठिकाण आहे.

---------------