महाबळेश्वर/मूळ महाबळेश्वर श्रीशंकराचें

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
मूळ महाबळेश्वर श्री शंकराचें
स्थान व पंचगंगा.
-------------


शिरस्योर्ध्वंं मौलिर्नयनयुगुलं भाति विमलं

ललाटे कस्तूरीतिलकमपि कृष्णे स्मितमुखी ।

चतुर्हस्ते पद्मं वरदमभयं शंखवलयं

कटौ सूक्ष्मं पीतांबरमपि च वंदे तव पदं ॥१॥

जनानां स्नातानां वृजिनहरणोत्धूलितवपुर्न

वै लेभेऽभ्यंगावसरमपि वा पुण्यसलिलं । 

प्रहातुं मालिन्यंं स्नपनविधिना जन्हुतनया
त्वदंते संयाति त्रिदशगुरुकन्यागमतिथौ ॥२॥

 मूळ महाबळेश्वर प्रसिद्ध क्षेत्र असून नहर किंवा मालकम पेठेपासून दक्षिणेस सुमारें ३ मैल आहे.

 स्कंदपुराणामध्यें या क्षेत्राचे उत्पत्तीविषयीं वृत्तांत लिहिला आहे त्याचा सारांश घेऊन येथें माहिती दिली आहे.

 मनुष्य जातीची उत्पति होण्याचे पूर्वी शैल्यकाननादि सृष्टि निर्माण करून ब्रह्मदेव ब्रह्मलोकीं तप करीत असतां विष्णूंनीं त्यांस मनुष्यसृष्टि करण्याची आज्ञा दिली. तेव्हां शिव, विष्णु, सरस्वती, कश्यपादि ऋषी, व वेद या सर्वांस समागमें घेऊन ब्रह्मदेव सह्याद्रीच्या मस्तकावर आले. नंतर ब्रह्मा, विष्णु, महेश यांनीं ब्रह्मतीर्थ, विष्णुतीर्थ आणि रुद्रतीर्थ या ठिकाणीं तपश्चर्या केली. त्यावेळेस सृष्टि उत्पन्न करण्याजोगी तपःसिद्धि होऊन, तपोवनें इत्यादि निर्माण झालीं.

 ब्रह्मा, विष्णु, महेश यांचा निवास येथे होऊं लागल्यावर ब्रह्मदेवानें यज्ञ करण्याचें मनांत आणून, 

ब्रह्मारण्यांत उत्तम रत्नखचित मंडप घातला व यज्ञसामग्री जमा करून, देव, ऋषि, गंधर्व इत्यादिकांस नेिमंत्रण केलें. वेदी सिद्ध होऊन यज्ञाच्या मुहूर्ताची घटिका भरत आली. तथापि मुख्य यजमान जो ब्रह्मदेव त्याची पत्नी सावित्री ही वस्त्रभूषणें परिधान करण्याचे नादांत निमग्न असल्यामुळे, तिला मुहूर्ताच्या समयाचें भान न राहतां येण्यास विलंब लागला. तेव्हां विष्णुप्रभृति देवाची अनुमति घेऊन ब्रह्मदेवानें आपली द्वितीय पत्नी जी गायित्री इचे समागमें यज्ञदीक्षा घेतली व मुहूर्त साधला. नंतर मंगलवाद्यांचा गजर व वेद घोष झाला ते ऐकून सावित्री लगबगीनें यज्ञमंंडपति येऊन पाहते तो गायित्रीसमागमें यजमान यज्ञ करीत आहेत. असें पाहून तिच्या अंगाचा अगदी तिळपापड होऊन कोपानें ती अगदीं लाल झाली आणि तिनें लागलींच सर्वांवर शापांचा गहजब करून सोडला:-

ब्रह्माविष्णुमहेशाश्च मामुल्लंंघ्य यशस्विनीम् ।
धर्मातिक्रममारेभुरतः संतु जलात्मकाः ॥
---------------------------------

 १ महाबळेश्वर गांवाच्या पलीकडील अंगास जें एक अफाट अरण्य आहे त्यांस हें नांव पडलें आहे. 

स्त्रियोनाम्ना प्रथां यांतु गायित्र्याः पक्षपाततः ।
गायित्रपि नदी भूत्वा केनापीयं न लक्षिता ॥

याचा भावार्थ असा कीं, तुम्ही गायित्रीचा पक्षपात केलात, त्याअर्थी जलरूप होऊन स्त्री नांवानें जगांत प्रसिद्ध व्हाल, व गायित्रीही नदी होईल व तिजकडे लोक दुर्लक्ष्य करितील. हें ऐकून विष्णूनेही सावित्रीला शाप देऊन उसने फेडिलें व जलप्राय करून टाकिलें. असें होतांच सावित्रीने मोठया त्राग्यानें लागलींच जवळ विलक्षण उंचीच्या कडयावरून उडी घेऊन समुद्रात सत्वर जाऊन मिळण्याचा मार्ग स्वीकारला. असे पाहून तिची समजूत करून तिला परत माघारी आणण्याकरितां ब्रम्हदेवही मागोमाग गेले. परंतु ती परत आली नाही. सावित्रीचे कांठी समुद्रकिना-यापर्यंत १२ लिंगें अंतरानें असलेली पाहून याचा खरेपणा वाटतो. नंतर आरंभिलेला यज्ञ पुढें चालविला असतां त्यास एक मोठे विघ्न उत्पन्न झालें, त्याची हकीकत अशी :-

 महाबळ व अतिबळ या नांवाचे दोन पराक्रमी दैत्य भाऊ भाऊ असत. त्यांनीं तिन्ही लोकांस फार जर्जर केलें. तेव्हां ब्रह्मा विष्णु महेश हे सैन्य घेऊन

त्याजबरोबर युद्ध करण्यास गेले असतां, विष्णूनें अतिबळाचा वध केला. हे वृत्त महाबळास कळतांच तो देवांबरोबर समर करण्यास आला. त्याचे प्रतापापुढे देवत्रयाचा ठिकाण लागेना. या कारणास्तव देवांनी जाऊन महामाया जी देवी तिचे स्तवन केले व दैत्याचा नाश होईल अशी युक्ति सांगावी म्हणून विनंति केली. देवी प्रसन्न होऊन तिने त्यांस मोह घालून संगरांतून परत आणले. नंतर महाबळाने संतुष्ट होऊन वर मागण्याविषयीं देवांस सांगितले. तेव्हां " तूं आमचे हातून मरावास " हे वरदान त्यांनी मागितले. सर्व देव आपणास शरणागत झाले आहेत, आपण विश्वाचे स्वामी आहोत, व विश्वाचा उपभोगही घेतला आहे त्याअर्थी देहाचे सार्थक होऊन गेले, आतां मरण यावें हेच उचित, असा विचार करून दैत्याने देवांस देह अर्पण केला. नंतर देवांनी त्यास मुक्तिपद देऊन वर मागण्यास सांगितले. तेव्हां दैत्याने देवाचा स्तव करून वर मागितला तो असाः-

प्रसन्नोऽसि यदा शंभो तदास्मिन्सह्यमस्तके॥
मन्नाम्ना लिंगरूपस्त्वं सृष्ट्यादौ भव शंकर ॥ १ ॥
मस्तके पंचगंगानामुत्पतिश्चास्तु संततम् ।
मद्भ्रातृनाम्ना विष्णो त्वं दिव्यलिंगं भव प्रभो॥२॥
सैन्यस्य मम कोटीनां कोटीशो भव पद्मज ॥
मन्नाम्ना ख्यातिमागत्य क्षेत्रं चास्तु भुवि प्रभो॥३॥

 याचा भावार्थ असा कीं शिवानें लिंगरूप होऊन मस्तकीं पंचगंगांच्या उगमांचें ओझें धारण करून महाबळेश्वर नांवानें या ठिकाणीं वास करावा; व विष्णूनें माझ्या भ्रात्याच्या (म्हणजे अतिबळेश्वर) या नांवाने येथे रहावें; आणि ब्रम्हदेवानें माझ्या कोटी सैन्याचें नांव धारण करून कोटीश्वर व्हावें. तसेच सर्व क्षेत्रभूमीसही महाबळेश्वर हेंच नांव द्यावें.

याप्रमाणें आलेल्या विघ्नाचें निरसन करून यज्ञाचें कृत्य शेवटास नेलें. आणि यज्ञसमाप्तीचे अवभृतस्नान सर्वानी कोंकणांत हरिहरेश्वरी शुक्लतीर्थात केलें.

याप्रमाणे महाबळाचे मागणें मान्य करून या महाबळेश्वर गांवांत शिवांनीं लिंगरूप धारण केले व 

मस्तकावर पंचगंगा उगमाची साक्ष देणारे पांच जलपूरित रुद्राक्षाकृति खळगे धारण करून येथें वास केला. हें देऊळ या पंचनद्यांच्या उत्पतिस्थानाचें महाबळ राक्षसाच्या वरदानाप्रमाणें स्मारक म्हणून केलेलें आहे. तसेंच फक्त कृष्णादि पंचनद्यांचें महाबळेश्वर देवळाच्या वरील चढावावर एक देऊळ आहे. त्यांतही उगमाच्या निरनिराळ्या ओऱ्या बांधून काढून गायमुखाने सर्व नद्यांचें पाणी कुंडांत सोडिलें आहे. तिसरी गोष्ट उगमाचीं स्थलें महाबळेश्वर डोंगराखालील निरनिराळ्या खो-यांतून उत्पन्न झालेल्या प्रवाहांच्या मुळांशीही मानण्याची लोकांत प्रवृत्ति आहे.

 जेथे ब्रम्हदेवांनी यज्ञ आरंभून कलह उत्पन्न केला व एकमेकांवर शापांचे भडिमार करून घेउन सर्व देव जलरूप बनले तें यज्ञाचे ठिकाण महाबळेश्वर गांवच्या लगतच उच्चस्थानी अरण्यांत आहे.

 देवांनीं याच स्थळीं महाबळ व अतिबळ या दैत्यांबरोबर तुमुल युद्ध करून त्यांचा नाश केला पण स्वत: त्यांच्या वचनांत सांपडले हीही हलकीसालकी गोष्ट झाली नाहीं, हें वरील हकीकतीवरून 

कळून येईलच. या सर्व डोंगरास महाबळेश्वर अशी संज्ञा मिळाली व पांचही पुण्य नद्यांचें पवित्र व मधुर पाणी सर्व डोंगरभर सारखे पसरून राहिलें आहे. अशा करण्यानें देवांनीं त्या महाबळ दैत्याच्या वरप्रदानाची व सावित्रीच्या शापाची पाळणूक केली. परम साध्वी जी सावित्री, तिचा जाज्वल्य शाप-स्त्रीरूपाने जगांत प्रसिद्ध होण्याचा- उगीच लटपटींत नव्हता. त्या प्रमाणे सर्वजण जलप्रवाहरूप धारण करून निरनिराळ्या खोऱ्यांंतून जणूं काय सर्व जगांत नीटपणें प्रसिद्धी व्हावी म्हणून जवळच्या जवळ पश्चिमेकडे न जातां, तिघे देव नदीरूपानें दूरवर पूर्व समुद्राकडे वहात गेले. त्यांतील विष्णू कृष्णा नदीचें नांव स्वीकारून पूर्ववाहिनी नदी बनले. महेश वेण्या नदी रूपानें प्रसिद्धीस आले. व ब्रम्हदेव कुकुद्मति किंवा कोयना नदी होऊन गेले. गायित्री व सावित्री या दोन्ही जातीच्याच स्त्रिया असल्यामुळे त्यांस स्त्रीवाचक नावें निराळी पडली नाहींत. फक्त त्यांच्या नद्या मात्र निरनिराळ्या पश्चिमवाहिनी झाल्या आहेत. कृष्णाबाई वगैरे पंच नद्यांच्या उगमांचें एक व खुद्द महाबळे

श्वरचेंं एक, अशींं दोन निरनिराळीं देवळे फक्त स्थळमाहात्म्य वाढविण्याकरितां स्मारकाप्रमाणें केली आहेत.

 अशींं महाबळेश्वरगिरीच्या मस्तकावर देवतांची रूपांतरें होऊन त्या पुनः एके ठिकाणीं महाबळेश्वर लिंगाच्या वर येऊन राहिल्या त्याची साक्ष अद्याप पावेतों आहे. ती पाहण्याची कोणाची इच्छा असल्यास त्यांनीं महाबळेश्वर क्षेत्रांतील महाबळेश्वरच्या देवालयांत जाऊन त्यांतील गाभा-यांत स्वयंभू पिंडी किंवा लिंग आहे त्यावर सतत पाण्यानें डबडबलेले पांच खळगे आहेत ते पहावे. यांतील पाणी कधीही आटत नाही. ब्राह्मण व शूद्र यांवाचून इतरांस मात्र आंत जाऊन शिऊं देत नाहींत. याप्रमाणें पूर्वी पुराणांत वर्णन केलेल्या कांहीं गोष्टींचें प्रत्यंतर मिळालें म्हणजे मनांत पूज्यबुद्धि उत्पन्न होऊन परमेश्वराच्या लीलेचा चमत्कार वाटतो.

 या क्षेत्रांत महाबळेश्वरच्या देवळाजवळ दुसरें एक फक्त नद्यांचें देऊळ आहे. परंतु त्या देवळांस तीर्थसमुदायवाचक नांव न देतां फक्त सर्वात श्रेष्ठ मानलेली कृष्णानदी इचेंच नांव देण्यांत आलें आहे. या देवळांत 

डोंगराकडील बाजूस एक मोठी दगडी भिंत बघून तीमध्यें जमिनीचे फरशीसरपट सुमारे एक फूट उंचीच्या तीन तीन फुटावर कमानी केल्या आहेत. त्या कमानी समोरच्या भिंतींत पांच आहेत व एक डावे हातचे भिंतींत व दुसरी उजवे हातचे भिंतीत अशा सात ठिकाणांतून सात नद्यांचे ओघ बांधून पुढें एकवटून सर्वांचा संगम झालेल आहे आणि तें पाणी एका दगडी बांधलेल्या पन्हळांतून आणून गायमुखानें कुंडांत सोडलें अहे. त्या कुंडास ब्रम्हकुंड अशी संज्ञा दिली आहे. या संगमांत स्नान करण्याचा योग आला असतां लोक भाग्योदय मानतात. परंतु हें पाणी उन्हाळ्यांत सुद्धां फार गार असते आणि हिवाळ्यांत यांत बोट घातलें तर जरी गळून पडलें नाहीं तरी बधिर झाल्यावाचून राहणार नाहीं. याचे खालचे बाजूस दुसरें एक कुंड आहे त्यास विष्णुकुंड असें म्हणतात. यांत सात नद्यांपैकीं पहाणाराच समोरच्या भिंतींतील कृष्णा, वेण्या, कोयना, गायित्री आणि सावित्री या पांच नद्यांचे पाण्यास बारा महिने खळ पडत नाहीं. डावे हातची जी 

ओरी आहे तींतून भागीरथी नदी बारा वर्षांनीं कन्या राशीस गुरू आला म्हणजे कन्यागतीं वाहूं लागते, अशी आख्यायिका आहे. त्या वेळेस येथें वर्षभर यात्रेकऱ्यांच्या उड्यावर उड्या पडतात. आणि हिंदुधर्माप्रमाणें काशीस भागीरथीतटाकीं जे विधी, मुंडण वगैरे करणें इष्ट आहे ते येथें येऊन करितात. उजवे बाजूचे ओरींतून साठ वर्षांनीं कपिलाषष्ठीचा योग आला म्हणजे सरस्वती नदी वाहूं लागते, तेव्हांही मोठी गर्दी होते. असें पुराणांतून या नद्यांचें माहात्म्य वर्णन केलें आहे. परंतु पावसाळ्यामध्यें या सर्व ओऱ्यातून पाणी मोठ्या जोराने वाहतें, आणि कुंडे अगदीं तुडुंब भरून जातात आणि वाहूं लागतात. अशा वेळीं यांचें सांडपाणी जाण्यास मार्ग खालून केला असल्यामुळे त्यांतून जातें.

 या पांची नद्या महाबळेश्वर डोंगराखालीं निरनिराळ्या द-यांतून वाहत गेल्या आहेत. कृष्णा नदी वर सांगितलेल्या देवळापासून सुमारें ५०० यार्ड अंतरावर कडयावरून खालीं जोर खो-यांत पडून पूर्ववाहिनी झाली आहे. ती जोर, धोम, वांई वगैरे गांवांशेजारून वाहत जात आहे. 


इच्या प्रवाहाची लांबी ८०० मैल असून ती मच्छलीपट्टण जवळ समुद्रास दोन मुखानें मिळाली आहे. गोदावरी व कावेरी या मोठ मोठया नद्यांच्या पात्रांपेक्षां इचें पात्र फार मोठं आहे. सातारा जिल्ह्याच्या पलीकडील प्रदेशांत इच्या प्रवाहांतून नांवा व बोटी चालतात. कृष्णकांठच्या जमिनी, पुरांत बुडाल्यानंतर त्यांजवर गाळ बसल्यामुळे व इतर अशाच कारणांनीं, कित्येकवेळां पाऊस कमी पडला तरी, चांगल्या पिकतात. ही नदी मोठी पवित्र मानली असून इचे कांठीं पुण्यक्षेत्रे पुष्कळ असून मुक्ति देणारी आहेत. वेण्या नदी नहरानजीकच्या सरोवराचे वरील अंगास उगम पावून वेण्या तलावांतून लिंगमळ्यावरून खालीं केडंब खोऱ्यांत पडते; आणि मेढें वगैरे गांवावरून वाहत जाऊन साता-यानजीक माहुली गांवी कृष्णा नदीस मिळते. कोयना नदी येथून सुमारें एक मैलावर प्रगट होऊन एलफिन्स्टन व लाडविकपाईंंटच्या चोळांतून दऱ्याखोऱ्यांत पडून दक्षिणेस वाहूं लागते. ही पुढें प्रतापगड, पार वगैरे गांवावरून वाहत जाऊन सातार जिल्ह्यांतील क-हाड गांवी कृष्णेस मिळाली 

आहे. तेथें तें ठिकाण फार पाहण्यासारखे आहे. या संगमास प्रीतिसंगम असें नांव पडलें आहे. सावित्री नदी कृष्णाबाईचे देवळापासून पश्चिमेस ब्रह्मारण्यांतील कडयांत प्रगट होऊन ती पश्चिमवाहिनी झाली आहे आणि वाहत वाहत महाड दासगांव वगैरे गांवावरून जाऊन बाणकोटाजवळ समुद्रास मिळाली आहे. गायित्री नदीचा मात्र येथे कोठेही प्रवाह वाहत असल्याचें दिसत नाही. ती येथें गुप्त होऊन कोंकणांत हरिहरक्षेत्रीं प्रगट झाली आहे आणि लागलींच समुद्रास मिळाली आहे, अशी आख्यायिका आहे. याशिवाय आणखी एक वेदगंगा नांवाची नदी आहे. ती महाबळेश्वर गांवचे उत्तर बाजूस म्हणजे सावित्री व कृष्णा या दोन नद्यांच्यामधील खोऱ्यांत उत्पन्न होऊन पुढें दक्षिणवाहिनी होऊन पूर्वेस जोर गांवानजिक कृष्णेस मिळते. ती ब्रह्मारण्यांतील ब्रह्मंदेवाचे यज्ञाचे वेळीं वेदास शाप झाल्यामुळे उत्पन्न झाली आहे. या नदीचे उगमस्थानाचे ठिकाणी कोरीव गुहा आहेत. त्यांत चार पांच मनुष्यें बसण्याजागी जागा आहे. हें ठिकाण अगदीं निबिड अरण्यांत असल्यामुळे तपस्वी  ऋषीनां राहण्यास अगदीं योग्य आहे. यावरून पूर्वी येथे कोणी तरी तप करणारा ईश्वरी अंश येऊन राहिला असावा असें अनुमान करण्यास हरकत दिसत नाही. उगमस्थान पाहण्यायोग्य आहे.

---------------