महाबळेश्वर/महाबळेश्वर( सामान्य वर्णन ).

विकिस्रोत कडून

महाबळेश्वर,
---------------

जेथील सुखकारक थंडीमुळे व आरोग्यकारक हवेमुळे ज्यास हवा खाण्याचे ठिकाण असे लोकांनी ठरविले आहे ते महाबळेश्वर गांव उत्तर अक्षांश १८' व पूर्वरेखांश ७३ ४१' यांचे दरम्यान, सह्याद्रि पर्वताच्या साठ मैल लांबीच्या पृथ्वीच्या मानदंडास ज्या पांच शाखा आहेत त्यांपैकी एका शाखेवर आहे. सातारा जिल्ह्यांतील जावली तालुक्यांत अगदी पश्चिम बाजूस सह्याद्रीच्या अतिशय उंच असलेल्या शिखरावर याची वस्ती झालेली आहे. समुद्राच्या पृष्ठभागापासून या शिखराची उंची ४७१० फूट आहे. महाबळेश्वर डोंगराची रांग ३० मैल लांबीची आहे व वरच्या पठाराचें क्षेत्र ३०० एकरच्या वर आहे. मांढरदेव डोंगराच्या माथ्याच्याच सपाटीचा भाग याच्या तोडीचा आहे. इतका विस्तृत डोंगरमाथा इतर कोणत्याही स्थळी नाही. या गांवाचे महाबळेश्वर हें नांव फार पुरातनचें असून यांतील मुख्य पेठ प्रथम ज्या साहेबांचे नांवें वसली, त्यांचेही नांव साहेब लोकांनीं यास दिलें आहे. मालकमपेठ हीच गांव वसते वेळची पहिली पेठ. तिचे नांवानें हा हवा खाण्याचा गांव प्रसिद्ध आहे.

 या मालकम पेठेचें पहिलें लोकांचें तोंडी बसलेलें नांव नहर असें होते व येथील जवळपासच्या खेड्यांतून राहणा-या धनगर व कोळी लोकांच्या तोंडांतही “नहर “ हेंच नांव बसलें आहे. नहर ह्मणजे थंड प्रदेश या अर्थास अनुसरूनच येथील हवापाण्यावरून हें नांव दिले गेलें असावेंसें वाटते. हें गांव पूर्वी लहान खेडें असून यांत धनगर व कोळी वगैरे जंगली लोकांच्या वस्तीचीं दहावीस झोंपडीं होती. वाघ, तरस, सांबर वगेरे हिंसक  प्राणी तर येथें दिवसा ढवळ्या 'आ' करून खाण्यास येण्यास अनमान करीत नव्हते. येथील झाडी इतकी किर्र होती कीं कियेक ठिकाणी तर बारा बारा महिने सूर्यदर्शनसुद्धां होणें कठीण असे. अशा ठिकाणाला येत येत ७५ वर्षांनीं आजची उन्नत स्थिति प्राप्त झाली आणि मधलें नहर हें नांव लयास जाऊन अगदीं पुरातनचे महाबळेश्वर हें नांव पुन: स्थापित झालें.

-------------