महाबळेश्वर/झाडी

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
झाडी.
---------------

 येथील जंगलांत पुष्कळ प्रकारचीं झाडें आहेत त्यांतील उपयुक्त झाडांची माहिती ' वनस्पति ' या सदराखाली देण्यांत येईल. परंतु येथें फक्त येथील झाडझाडोऱ्याचें सामान्यपणें वर्णन करूं.

 मालकमपेठची हवा फार थंड आहे यावरून कोणी असा तर्क करूं नये की, गगनचुंबित प्रचंड वृक्षांच्या राईवर राई येथें लागून गेल्या असल्यामुळेच हा थंडपणा तींत आला असेल. वस्तुतः तसें नाही. ह्या ठिकाणच्या झाडांइतकीं भिकार झाडें कोठेही नसतील. आंबा, वड, चिंच, कंवठ पिंपळ, लिंब वगैरे आकाशास भेदून जाणारीं कमजास्त दाट छायेची झाडे येथें बिलकूल नाहीत. येथें जांभळीचें मात्र पीक फार मोठें आहे. पण या जांभळी आणि त्यांची फळे, यांचे त्यांच्या देशावरील जातभाईंशीं कुलनामसमतेशिवाय दुस-या कोणत्याही प्रकारचें साम्य नाही. पानें लहान, फळे लहान, आणि झाडें लहान. येथें या झाडाच्या 

दोन जाती आहेत. त्यांपैकीं लहान जातीचीं फळे शेळीच्या लेंडयांसारखीं उन्हाळ्यांत जंगलांतून पसरलेली असतात, व दुसऱ्या मोठे जातीचीं गांवांत घरापुढें लाविलेली आहेत, त्यांची मात्र फळे देशी जांभळाच्या निदान गोतांतली असावी असें वाटतें. चविणी उर्फ रानकेळी आणि गांवकेळी यांत जेवढा फरक आहे तेवढाच येथील जांभळींत आणि मैदानांतील जांभळींत आहे. कोणत्याही वाटेनें हिंडावयास निघाले तरी, थोडयाशा पोरकटपणाच्या वृत्तीचें अवलंबन केलें असतां पाहिजे त्याला एकसारखें तोंड हालवीत जाण्यास व घोसावर घोस शोधून काढण्याच्या नादांत लागून करमणूक करून घेण्यास या जांभळीपासून अवश्य मदत होते. झाडांखालून तर या फळांचा अगदीं सडा पडलेला असतो.

 जांभळीसारखेच ' पिसा ’ या नांवाचें दुसरें एक भिकार झाड आहे. याची पानें अतिशय वीर्यवर्धक आणि वीर्यस्तंभक आहेत. याचे ओले पाल्याच्या रसाची भेंडीचे रसासारखी तार निघते. याकरितां याची ताजीं पानें खाल्ली असतां शरीर चांगलें बनतें. याचीं 

छाया दाट नसून लांकूडही इमारतींच्या उपयोगी पडण्यासारखे मोठे होत नाहीं.

 जांभूळ, शहाजिरें, हिरडा, भोमा, गेळा, रामेठा, आसना, केंजळ, ऐन, नाना, बिलवा, अंजन, फणस, आंबा वगैरे इमारतीचीं झाडे या डोंगरावर व खालीं पांच मैलाचे हद्दीत जिकडे तिकडे जंगलभर आहेत, यामुळे जातां येतां ही दृष्टीस पडतात. शहाजिरीचे लांकडाचे विशेषत: घोडयाच्या गाडीस पोल चांगले संगिन होतात. येथील जंगलांत बाभळीचें झाड नांवालासुद्धां कोठेही आढळत नाहीं. देशांवर जंगली लांकडांत ह्या जातीच्या झाडाचें लांकूड पहिले प्रतीचें मजबूत आहे. परंतु याची उणीव परमेश्वरानें या जंगलांत अंजनच्या लांकडानें भरून काढली आहे. हें अंजनचें लांकूड बाभळीच्याही लांकडास मागे टाकणारें आहे. या लांकडाचीं मुसळे फार उत्तम होतात. हें लांकूड आपटलें असतां लोखंडासारखा आवाज निघतो. पाण्यांत विहीरीचें बांधकाम करतांना धर नसला ह्मणजे हें तळांत घालून काम करतात. परंतु तें कुजण्याचे बिलकूल भय नाहीं.

 भोमा नांवाचें झाड आहे त्याच्या मोहोराचा बेलेियाप्रमाणें रस्त्यावर मधुर वास येतो. धुराच्या जागीं इमारतींत याचें लाकूड घातलें असल्यास त्याला कीड लागण्याचें मुळींच भय नाही.

 वाळूंज, कारवी, डिंगळा, रामाठा, ही झाडे व चिमुट, कुसर या वेली, आणि चवर, नेचे वगैरे कांदे ही या जंगलांत बरीच आहेत.

 उंबराच्या झाडास फळे लागतात ती खाऊन गरीब लोक कसाबसा उपासमार होऊंं देत नाहीत.

 कारवीचीं बोंडें रानांतून गुरे चारीत फिरणारीं गुराख्यांचीं पोरें कात, चुना, घालून खाऊन विडा खाल्यासारखीं तोंडें रंगवितात.

 रामाठा या झाडाची साल जाळून पूड केलेली दांतास लाविली असतां बत्तिशी पार पडून जाते असा इकडील लोकांस अनुभव आला आहे. याचे सालीपासून वाख निघतो व याचे सालीचीं ओझीं बांधण्यास दोर करितात.

 चिमुट याच्या वेलीला कांटे असून ती बहुतेक झाडांवरून पसरलेली असते. ती बागेतील कमानी वगैरे 

करण्यास ओलेपणीं वाटेल तशी वळणारी असल्यामुळे उपयोगी आहे. ही सुमारे २५ फूट लांबीची सारखी जाडी असलेली मिळूंं शकेल. हिच्या हातांत धरण्याच्या काठया काढून लोक बाजारांत विकावयास आणतात. छत्र्याच्या दांडया करण्यास या वेलीचा चांगला उपयोग होण्यासारखा आहे.

 कुसर- ही वेल आहे. या वेलीला चैत्र व वैशाखमासीं फुलें येतात, त्यांत चमेली, मोगरा, निशिगंध वगैरे फुलांच्या वासासारखा सुंदर वास येतो. या वेलीचीं फळे गरीब लोक निर्वाहाकरितां नेतात. सन १८९७ सालचे दुष्काळांत तर हीं फळे खंडोगणतीं काढून घेऊन त्यांवर पुष्कळ लोकांनीं प्राण रक्षण केलें होतें. हीं फळे दिसण्यांत पावटयासारखीं असून फार कडू असतात. म्हणून यांचा कडूपणा काढून मग ती खावींं लागतात. तो काढण्याची रित अशी:- ओलेपणींंच त्यांचेवरची साल काढून तों आधणाच्या पाण्यांत सुमारें ७|८ वेळ शिजवावींं व प्रत्येक वेळीं तें शिजवून राहिलेलें पाणी टाकून द्यावें, ह्मणजे त्यांचा कडूपणा नाहींसा होते. नंतर त्यांत तिखटमीठ वगैरे घालून तीं उसळीं सारखीं खाण्यालायक होतात. 

चवीणी ऊर्फ रानकेळी- हीं येथून सुमारें दोन मैलांवर फेिटझरल्ल घाटाजवळ व मालकंपेठच्या आसपास सर्व ठिकाणं पुष्कळच आहेत. यांचीं पानें केळीचे पानाप्रमाणें मोठीं असतात; व त्यांवर जेवणाचें पदार्थ वाढून भोजन करितात. पाऊस पडला म्हणजे हीं आपोआप उगवतात. मे महिन्यांत देखील हीं बाजारांत विकायास येतात. गांवकेळीप्रमाणेंच यांस केळफुलेही येतात. त्यांची भाजी चांगली होते. पुढें पाऊसकाळ संपलेवर याचा कोंब गरीब लोक तसाच खातात; व जमिनींतील त्याचा गड्डा शिजवून त्याचा सुग्रास आहार करितात. दुष्काळसालीं लोकांस खाण्यास या कांद्यांचा फार पुरवठा झाला होता. याच्या वाळलेल्या सालीचे दोर ओझी बांधण्यास उपयोगी पडतात. हे कंद वाळवून दळले असतां पीठ सपिठीप्रमाणें पांढरें होतें व ते तवकिराप्रमाणें उपोषणास खाण्याचें उपयोगी पडण्याजोगें होते.

 कर्दळी किंवा हळदीच्या पानाप्रमाणें पानें असलेर्लीं चवराचीं झाडें पाऊस पडतांच रानोमाळ आपोआप डोकीं वर काढतात. यांचीं पानें काढून पावसाळ्यांत  गुरांखालीं घालतात. त्यांस इकडील गांवठी लोक " सोपल ” असें म्हणतात. त्यांचे योगानें गुरांस जमिनींतील ओलसरपणा न बाधतां चांगली ऊब येते. पावसाळ्यांत या झाडांस कोबीसारखा उंच दांडा येऊन शेवटास एक कणीस येतें, त्यास सर्व बाजूस पाकळ्या प्रमाणे टेंगळे दिसतात. त्यांतून फुलें बाहेर पडतात. तीं एकास सुमारें १ पासून १२ पर्यंत असतात. त्यांपैकीं कांहीं पिवळी व कांहीं पांढऱ्या रंगाची असून सुवासिक असतात. हें झाड फुलण्याच्या वेळीं सुमारें २ / फूट उंच होते. याचे कांद्यापासून अरारोट काढतात. त्याचा पुष्कळ खप आहे.

 इकडे डोंगराखालीं पांच मैलाचे हद्दीत कळकाचीं बेटें फार. या कळकांच्या चार जाती आहेत. त्या कळक, मेस, मानगा आणि चाकी; यांपैकीं ज्यांस मेस किंवा रानचिवे अगर उडे असें ह्मणतात, त्यांच्या कांठ्या कापून सुरेख तयार करून बाजारांत धावडलोक पुप्कळ विकावयास आणितात. या शिवाय या जंगलांतील गेळा, चिमुट, पांढरी, मेडशिंंगी, वगैरे झाडांच्याही कांठया येथें विकत मिळतात. यामुळे येथें कांठया 

स्वस्त व विपुल मिळत असले कारणानें बाहेरून येणारे लोक येथून त्या नेहमीं हव्या तेवढया आपले बरोबर विकत घेऊन जातात. बाकीचे प्रकारचे कळक इमारतीचे उपयोगीं आहेत.

नेचे व आर्चिड

 येथील जंगलांत पांच मैलाचे त्रिज्येचे वर्तुळामध्यें सुमारें २३ प्रकारचे नेचे सांपडतात.

 या नेच्यांचीं झाडें रानांतून काढून आणून तीं साहेब लोक कमानीला वगैरे मोठ्या हैोसेनें लावून, एखाद्या समारंभाचे व थाटाचे वेळीं स्थळ सुशोभित करितात. याची फांदी हातांत घेऊन पाहिली तर त्याचे मधील दांडयाच्या दोही अंगांस लहान लहान पानांच्या बारीक काडीचे सरळ फांटे असून ते खालून शेंडयाकडे निमूळते होत जाऊन अगदीं शेवटीं त्यांस, आंकड्यासारखे वळण आलेलें असतें. अशा प्रकारचे नेचे मुंबईस मलबारहिलकडून हँगिंग गार्डनला जातांना लागणाऱ्या बागेजवळच्या रस्त्यावर बरेच दृष्टीस पडतात व ते मोठे शोभिवंत दिसतात. त्यांचें बेणें बहुतकरून महाबळेश्वराकडूनच गेलें असेल असें अनुमान 

आहे. येथील राहणारे लोक या नेच्याच्या झाडांचा उपयोग येथून बटाटे, विलायती वाटाणा व दुसरीं कांहीं फळे मुंबई वगैरे बाहेर गांवींं पाठविण्याकडे पार्सलांत रिती जागा भरून काढण्यास करितात; व खळ्या खणणा-या पावसाच्या संततधारीपासून घरांच्या भिंतींस धक्का पोहचू नये ह्मणून ह्यांचे जणूं काय पांघरूण बनवून त्यांत पावसाळ्याचे पूर्वी घरें गुरफटून टाकण्यासही यांचा फार उपयोग आहे!

 येथील पावसाच्या पराकाष्ठमुळे येथील झाडांवर व दगडांवर किती शेवाळ जमतें याची कल्पनासुद्धां मैदानांत राहणा-या लोकांस करितां येणार नाहीं. कोणत्या पाहिजे त्या झाडापाशीं जा, आणि त्याला बोट लावा, कीं, तें इंचअर्धइंच तरी शेवाळीच्या लेपांतून आंत जाईलच. एखाद्या भांडयावर ज्याप्रमाणें मातीचा जाड लेप चढवावा, त्याप्रमाणें झाडांच्या सर्व खोडभर या शेवाळीचा लेप झालेला असतो व कित्येक फांद्यांवरून हे शेवाळीचे लोंबणारे पुंजके, तपाचरणांत फार दिवस गढून गेल्यामुळे स्मश्रु करण्यास संधि न सांपडलेल्या तापसांच्या रांठ दाढ्यांंप्रमाणें किंवा एखाद्या 

केसाळ वनचराच्या अंगावरील लोंकरीप्रमाणें दिसत असतात. तसेंच घरच्या कंपौंडाकरितां घातलेले सुक्या दगडाचे गडगडे अगदीं बुरसून गेल्यामुळे चोहीकडे गारेगार झालेले दिसतात. ही शेवाळ गोगलगाईच्या अंगाप्रमाणें अगदीं गुलगुलित असते. साहेबलोक इचे फार भोक्ते आहेत. ते उशागिर्द्यांच्या खोळींतूनही ही भरून हिचा सुरेख उपयोग करतात. झाडावर शेवाळाच्या योगाने जीं लहान लहान फुलझाडें उगवतात तीं गोळा करण्याचा या लोकांस फार नाद आहे. या झाडांस हे लोक " ऑरकिड ” असें ह्मणतात. हीं कोयना खोऱ्यांंत पुष्कळच सांपडतात. तेथून आणून महाबळेश्वरचे कुणबी त्यांच्यावरही चार दोन आणे मिळवितात. अलीकडे तर हें बहुतेक बडे लोकांस आपले बागेत असावींंतसें वाटू लागलें आहे. हीं घेऊन जाणारे लोक बहुतेक मुंबईकडील राहणारे असतात. झाडांस किंवा पिकांस शेवाळाचा उपयोग खताप्रमाणें केला असतां फार चांगला होईल. साहेबलोक वगैरे हीं नेऊन पदार्थ संग्रहालयांतील भिंतीवर टांगून ठेवितात. तेव्हां याची फार शोभा दिसते. 

परदेशांतील झाडें

 इंग्लंडाहून ओकच्या झाडाचीं फळे परलोकवासी रेव्हरंड वुइल्सनसाहेब यांनीं सुमारें ५०|६० वर्षांपूर्वी आणून येथील घरवाले मालकांस ओकचीं झाडे तयार करण्याकरितां मोफत वाटलीं होती. त्या बेण्याचीं तयार झालेलों ओकाचीं झाडें सिंडोला पार्क बंगल्यांत, व देि आक बंगल्यांत आहेत; आणि ओल्ड डोले नांवाच्या ह्मणजे मुरारजी क्यासल बंगल्याच्या खालील बागेंत पूर्वी दृष्टीस पडत असत परंतु ती हल्लीं नाहींत. या हवेत तीं बरीच मोठीं झालीं आहेत; परंतु विलायतेंत जेवढीं मोठी व उंच होतात असें सांगतात, तेवढीं मोठीं येथें झालीं नाहींत. यांपैकीं पाहण्यासारखीं दोन मोठाली झाडें सिंडोला बंगल्यामध्यें दर्शनी बाजूस आहेत. श्रीमंत मिरजकर संस्थानिक यांनीं त्या झाडास दगडी पार बांधून त्यांची व्यवस्था चांगली ठेवली आहे.

 या शिवाय ग्रेव्हिलिया, रोपस्टा, क्याशरिना, व युक्यालिप्टस या परदेशी झाडांच्या रोपांची लागवड पांच मैलांच्या आंतील लिंगमळा आणि गुरेंघर या ठिकाणी तयार करण्याकरितां यत्न चालला आहे. 

हीं रोपें एकंदर पांच हजार आहेत. हीं झाडें सुरूच्या झाडांप्रमाणें उंच असून शोभिवंत दिसतात. हल्लींं हीं पांच फूट उंच झालीं आहेत. आणखी तीन फूट उंच होऊन मालकमपेठच्या मुसळ धारांचा पावसाळा त्यांस सहन होईशीं झाली ह्मणजे नर्सरींतून काढून फॉरेष्टांत यांची लागण करतात. हीं झाडें चांगलीं दिखाऊ आहेत. हल्लींं या झाडांची लागण फॉरेस्ट खात्याकडून बंदीचे जागेंत करण्याचें काम सुरू आहे.

 येथें कोणतेंही फळझाड पावसाळ्यांत मुळींच लागत नाहीं. विलायती फळझाडांपैकी राजबेरी, स्ट्राबेरी, व गुजबेरी हीं झाडें येथें लावितात पण तीं पावसाळा खलास झाल्यापासून पुन: पावसाळा लागेपर्यंतच लावलीं जातात. पावसाळाभर हीं झाडें कशीं तरी राखून बेण्याकरितां ठेवावीं लागतात. त्याचप्रमाणें हिंवाळ्यांत विलायती वाटाणा, फ्रेंचबीन हींंही येथें उत्पन्न करितात. 

वनस्पति.

 औषधी पदार्थ तीन प्रकारच्या कोटींंत सांपडतात खनिज, उद्विज्ज व प्राणिज. त्यांपैकीं प्राचीनकाळापासून खनिज द्रव्यांच्या उपयोगापेक्षां वनस्पतींचाच उपयोग पृथ्वीच्या अनेक द्वीपांतील वैद्य ज्यास्त करीत आले आहेत असें दिसतें. कारण, खनिज द्रव्यांपैकीं जे धातू व उपधातू आजपावेतों प्रसिद्धीस आले आहेत, त्यांतील वीर्य अनेक योगांनीं व प्रकारांनीं रोग हा जो कोणीएक अदृश्य शत्रु आहे त्याच्या उपशमाकरितां योजितां येतें, व त्यांजपासून वनस्पतींच्या रसांसारखे असंख्य कल्प अथवा रससंयोग उत्पन्न करितां येतात असा थोडा अनुभव आहे. परंतु त्यांच्या नानाविध संयोगाची माहिती जशी पाहिजे तशी अजून लागली नसल्यामुळे आजपर्यंत त्यांचे प्रयोग रोग्यांवर कित्येक वैद्य निवळ साहसानें करीत आले व तसें केल्यानें त्यांजकडून अनेकवेळां प्रमाद घडल्याचेंही ऐकिवांत आहे. तशा प्रमादापासून कधीं कधीं बलनाश अथवा प्राणनाशही घडला असावा. वनस्पतींची तशी गोष्ट नाहों, औषधी रसांचीं कार्यें

बहुधां नियमित आहेत, असा सुप्रकृति व स्वस्थ प्रकृतीच्या माणसांवर तत्ववेत्यांनीं प्रयोग करून अनुभव घेतला आहे. कधीं कधीं चुकून अथवा वैद्यांच्या प्रमादानें अन्नेतर (अन्न अथवा पौष्टिक आहाराबाहेरचे) पदार्थाचें मनुष्यानें सेवन केल्यामुळे जीं अस्वस्थतेचीं अथवा इंद्रियव्यापार बिघडल्याचीं लक्षणें होतात त्यांचाही क्रम नियमित आहे, असें सिद्ध होतें. त्याचप्रमाणें विवक्षित वनस्पतींची शरीरावर विवक्षित कार्यें होतात व त्यांतील सत्वांची अशनमात्रा अथवा भक्ष्यप्रमाण कमजास्त झालें असतां रोगांचीं लक्षणें बदलतात असेंही आढळून आलें आहे. अशा वनस्पतींच्या क्रियेंत आपल्या चुकीनें सत्वनाश व कुसंयोग जरी उत्पन्न होतात तरी ते सृष्ट कार्यात स्वाभाविक क्रमानें क्वचित् होतात, ह्मणून ती क्रिया बिनचूक साधल्यास अनेक नवे नवे रोग हटविण्याचे सामर्थ्य वैद्यांस अथवा कल्पकांस येतें, असें असल्यानें वनस्पतींचा उपयोग औषधि करण्यास फार होतो. परंतू त्यांची माहिती व ओळख फारच थोडया वैद्यलोकांस असते. यामुळे वरचेवर ताज्या वनस्पति बिनचूक मिळणे कठिण पडतें.

 वनस्पतींचीं बहुतेक नांवें या देशांत पानांच्या रचनेवरून, फळांवरून व त्यांच्या स्कधाची रचना अथवा सालीची जाडी जशी असेल त्यावरून बहुधां पडली आहेत; व यांची ओळख बहुधां याच लक्षणांवरून परीक्षा करणारे करीत आले आहेत. हिंदुस्थानांतील अनेक प्रदेशांत एकाच वनस्पतीस निरनिराळ्या भाषेत जीं नांवें पडलीं आहेत, तीं कांहीं स्वेच्छेनें, कांहीं फक्त रुढीमुळे, कित्येक प्रभाव दाखविण्याच्या उद्देशानें, कित्येक त्यांचे अंगचे वीर्यावरून व कित्येक संस्कृताचा अपभ्रंश होऊन पडलीं आहेत. परंतु या नांवांनीं शेकडों वर्षेपर्यंत जरी लोकव्यवहार होऊन, वैद्यांचा निर्वाह आजपर्यंत होत आला तरी विवक्षित व खऱ्या गुणाच्या वनस्पति कोणत्या आहेत याचा या अनेक नांवांमुळे आजपर्यंत बराच घोटाळा झाला आहे. कित्येक वनस्पति स्वरूपानें भिन्न असून गुणानें समान आहेत. अशामुळे कित्येकांची ओळख झालेली नाहीं. अर्वाचीन परीक्षकांनीं आजपर्यंत ज्या वनस्पात पृथ्वीच्या निरनिराळ्या भागांवर पाहिल्या त्यांचें वर्गीकरण-स्तंभाची रचना, 

बीजांची रचना, पानांतील शिरांची रचना, व पुष्पांतील केसरांची रचना या एकंदर लक्षणांवरून केलें आहे. या वनस्पतेि ओळखण्याच्या सोईकरितां राक्सबर्ग साहेबानें दिलेलीं लाटिन नांवें कोंकणी नांवाच्या पुढें देऊन त्या वनस्पतींचें सचित्र वर्णनाचें व सर्व रोगावरील त्यांच्या होणा-या कोंकण्या औषधीच्या माहितीचें आम्ही निराळे पुस्तक करणार आहों. त्यावरून वनस्पति ओळखण्यास फार सुलभ जाईल. हल्लींं या पुस्तकाचा हेतु फक्त महाबळेश्वरचें वर्णन देण्याचा असल्यामुळे वनस्पतींची तशी सविस्तर माहिती येथें देणें अप्रासंगिक होईल, असें जाणून यांत त्यांची प्राकृत, कोंकणी, व संस्कृत नांवाची यादी मात्र आह्मी आपले माहितीप्रमाणें दिली आहे.

 रानवट लोकांस अकस्मातू ज्या ज्या वनस्पतीचा अनुभव आला, त्या त्या वनस्पतींचा पुरातनकाळीं व अद्यापि कित्येक जंगली लोकांत प्रसंगानुसार उपयोगही करण्यांत येत असतो. परंतु ही सर्व माहिती त्या लोकांच्या केवळ अंतर्यार्मी असल्यामुळे त्यांच्या हयातींत त्या माहितीचा उपयोग करण्याला योग्य असा एखादा रोगी त्यांना जर मिळाला नाही, तर ती त्यांची माहिती 

त्यांच्या मरणानंतर त्यांच्या बरोबर परलोकास जाते, अशीं उदाहरणें इकडील कोंकणे लोकांत पुष्कळ सांपडतात. यामुळे वनस्पतींच्या कोणत्याही भागांत, परंतु बहुधा पंचांगांत (साल, मूळ, पान, फलाची पेशी व बीं, या भागांत ) जीं उपयुक्त औषधिद्रव्यें आहेत तीं दिवसेंदिवस कमी कमी उपलब्ध होत चाललीं आहेत. फार तर काय पण वनस्पतींच्या झाडपाल्याची ओळखसुद्धां नाहींशी होत चालली आहे असें होऊं देऊं नये, ह्मणून ही माहितीं जमवून प्रसिद्ध करावी असें आह्मांस वाटलें आणि आह्मी हें लोकसेवेचें काम हातीं घेतलें.

 या कोंकणे लोकांबरोबर शेतकीसंबंधानें निकटसंबंध झाल्यामुळे त्यांचे आजार व त्या आजारांचें फुकटच्या औषधानें झालेलें निरसन पाहून आमचे मनांत आलें कीं आपण त्यांच्यापासून, वनस्पतींची ओळख करून घेण्याची खूण, त्या वनस्पतींचे धर्म आणि त्यांचीं औषधिक्रिया समजून घ्यावी आणि ती यथामति लोकांत उघडकीस आणावी. परंतु या गेष्टीचा जेव्हां आह्मी पिच्छाच धरला; तेंव्हां हें ( ९४ ) कोंकणे लोक सुधेपणानें बरोबर मन मोकळे करून माहिती सांगेनात. पुष्कळांस असें ठाऊकच असेल कीं कोंकण्यालोकांस झाडपाल्याचें कांहीं औषध माहित असलें आणि तें त्यांजपाशीं मागितलें असतां ते दुसऱ्यास कळू न देतां स्वतःच तयार करून देतात. असा यांचा स्वभाव फार खोल असतो. त्यामुळे म्हाताऱ्याकोताऱ्या अनुभवशीर कोंकण्या लोकांस फूल नाहीं फुलाची पाकळी देऊन किंवा त्यांची पुष्कळ खुशामत करून आम्ही वनस्पतींची माहिती मिळविली आहे. त्यांची नांवनिशी पुढें दिल्याप्रमाणें:-

महाबळेश्वर पांच मैलाच्या वर्तुळभागांत मिळणाच्या ओषधी वनस्पतींचीं नांवें.
नंबर प्राकृत किंवा कोंकणी नावे. संस्कृत नांवे.
आवळे. प्राचीबल.
आनव
आटिंगी
आडळीचें झाड.
आंबोळकी
नंबर प्राकृत किंवा कोंकणी नावे. संस्कृत नांवे.
आसाना. जीवक
आपटा. अस.
आसिट, किंवा आष्टा
किंवा पायर
आडुळसा. वासक.
इ.
१० इटाळी.
उ.
११ उतरण.
१२ उटकट्यारी.
१३. उंबर. औदुंबर.
ए, ऐ
१४ ऐरण. अग्निमंथ.
१५ एरंड. हस्तिकर्ण.
१६ एडलिंबूं.
१७ ओंब.
अं
१८ अंजन.
नंबर प्राकृत किंवा कोंकणी नावे. संस्कृत नांवे.
१९ किंजळ. कैडर्य.
२० कढिलिंब उर्फ (थि-
 रळ. )
२१ कांगोणी.
२२ कोरांटी.
२३ केनी.
२४ काटे धोतरा.
२५ कुसर.
२६ करवंद.
२७ कोलती.
२८ केळझाड.
२९ कुर्डु.
३० कावळी.
३१ कळलावी (खडयानाग) इंद्रपुष्पी (कांगलिका)
३२ कुडा ( पांढरा व कूटज
 काळा )
३३ कोळीसरा.
३४ कुडये.

नंबर प्राकृत किंवा कोंकणी नावे. संस्कृत नांवे.
३५ कवडी.
३६ कानवला.
३७ कण्हेर. अश्वमार.
३८ करंज. नक्तमाल.
३९ कडुलिंब. परिभद्र.
४० काटवेल, वांझ काटवेल करटोली किंवा कर्को-
 टकी.
४१ कवला.
४२ कोकंब. अमसुल.
४३ कुंभा.
४४ करंबळ. प्रपौंडरिक.
४५ कळक.
४६ कळंब. कदंब.
४७ काकडशिंगी. अजशृंगी किंवा कर्कट-
 शृंगी.
४८ कंवडळ. गवाक्षी.
४९ कोरफड. कुमारी.
नंबर प्राकृत किंवा कोंकणी नावे. संस्कृत नांवे.
५० खरशिंगल.
५१ खारोता.
५२ खाजुरळी.
५३ खरतुडी.
५४ खाजकुबली. जंतुफला.
५५ खरवेल.
५६ खैर. खदिर.
५७ गंगुत्र.
५८ गारदुडी.
५९ गवेल.
६० गोमाटी. गोमटू.
६१ गवरघुग्री.
६२ गुळूंब.
६३ गुळवेळ, गुडुछी.
६४ गेळ. मदनफळ.
६५ गवती चहा. गंधतृण.
नंबर प्राकृत किंवा कोंकणी नावे. संस्कृत नांवे.
६६ घोळी.
६७ घोटवेल.
६८ चिंचुर्टी.
६९ चुनझाड.
७० चांभारवेल.
७१ चिकणा. अतिबला
७२ चांदाडा.
७३ चाकी.
७४ चित्रक. चित्रक
७५ चवर.
७६ चवक.
७७ जांभळ जंबुद्वय.
७८ जांब.
नंबर प्राकृत किंवा कोंकणी नावे. संस्कृत नांवे.
७९ टेटव ( टेंटु) कुटनट (टुण्टुक)
८० टाकळा. रविपत्र.
८१ डिंगळा.
८२ डाका.
८३ ढवळ.
८४ ढाण.
८५ तिसळ.
८६ तांबोळी.
८७ तिपन.
८८ तवस.
८९ तमालपत्र( म्हारुक)
९० तेटलाचे झाड.
९१ तोरण.
नंबर प्राकृत किंवा कोंकणी नावे. संस्कृत नांवे.
९२ तेली.
९३ तोडली.
९४ थरमेर.
९५ दवणी ( तेलदवणी व
ढोरदवणी)
९६ दातेरा.
९७ दुधी ( उतरण)
९८ धायटी. धातकी.
९९ नेप्ति.
१०० नेचुर्डी.
१०१ निवडुंग. सिहुंड
१०२ नीव.
१०३ नेर्डी.
१०४ निळुंगी.
नंबर प्राकृत किंवा कोंकणी नावे. संस्कृत नांवे.
१०५ नाई.
१०६ निसण.
१०७ नांदुर्की.
१०८ नांदेणा.
१०९ नाना.
११० निर्गुडी. निर्गुडी.
१११ नागरमोथा.
११२ पांगळी.
११३ पांगारा. कर्णिकार.
११४ पांढरा धोत्रा.
११५ पिठाणा.
११६ पोलरा.
११७ पाचाव्याचे झाड.
११८ पांढरा घेवडा.
११९ पांढरा चांफा.
१२० पोशिरी.
१२१ पाडळ. पाटला.
नंबर प्राकृत किंवा कोंकणी नावे. संस्कृत नांवे.
१२२ पळस. किंशुक.
१२३ पांढरी.
१२४ पात्री. गोजिव्हा.
१२५ पंधी.
१२६ पुदीना. पुदिनस्तु.
१२७ फापटी. तकारी.
१२८ फणस. पनस.
१२९ बिलवा.
१३० बुरुंची.
१३१ बेंद्री.
१३२ बाफळी. बहुफळी.
१३३ बुरबुला.
१३४ बरका.
१३५ बोखाडा.
१३६ ब्राह्मी.
नंबर प्राकृत किंवा कोंकणी नावे. संस्कृत नांवे.
१३७ भारंगमुळी.
१३८ भोरंब.
१३९ भावा. अरग्वध.
१४० भुसरंगळ.
१४१ भोमा.
१४२ भोक्री.
१४३ मेडशिंगी.
१४४ मुगली एरंड.
१४५ मोरवेल. मोरट.
१४६ मिरवेल.
१४७ मानगा.
१४८ मेस.
१४९ माकड.
१५० माड.
१५१ माचुत्रा.
१५२ माका.

नंबर प्राकृत किंवा कोंकणी नावे. संस्कृत नांवे.
१५३ मुरडशेंग.
१५४ यळसाचे झाड.
१५५ रानसालगा. पृथकपर्णी.
१५६ रानतुळस. वैजयंति.
१५७ रानतूर.
१५८ रानघेवडा.
१५९ रानशेवगा.
१६० रुखाळू.
१६१ रानजिरे.
१६२ रातंबा.
१६३ रानओंवा.
१६४ रानभेंडी.

नंबर प्राकृत किंवा कोंकणी नावे. संस्कृत नांवे.
१६५ रामेठा.
१६६ रुळाचे झाड.
१६७ रवि (रुई.) अर्क ( श्वेतमांदार )
१६८ रानआळु.
१६९ लांबथानी.
१७० विखारी.
१७१ वाकचवडा.
१७२ वावडिंग. चित्रफला.
१७३ वाघांटी.
१७४ वायवर्णा. वरुणा.
१७५ वरुलावेल.
१७६ वजीरमूठ.
१७७ वाळा.
नंबर प्राकृत किंवा कोंकणी नावे. संस्कृत नांवे.
१७८ शेंडवेल.
१७९ शतावरी (आस्वलीच्या
 मुळ्या )
१८० शिकेकाई.
१८१ शिरटी.
१८२ शेंबारटी.
१८३ शिवणी. काश्मर्य.
१८४ सात्वीण.
१८५ सेंगाडा.
१८६ सापडवेल.
१८७ सापकांदा.
१८८ सालममिश्री.
१८९ सावरी ( पांढरी व कुशाल्मली.
 तांबडी.)
नंबर प्राकृत किंवा कोंकणी नावे. संस्कृत नांवे.
१९० सताप. सर्पदंष्ट्रा.
१९१ हरळी. दर्भा
१९२ हेदु.
१९३ हेळा, ( बेहेडा)
१९४ हालुंडा.
१९५ हाडसांद्रुक.
१९६ हामोन.
१९७ हिरडा. हरितकि.
------------

 टीप-वनस्पतीप्रमाणेच आम्ही मिळविलेल्या कोंकणी झाडपाल्याच्या औषधांच्या माहितीचे (पृष्ठ ९२ यांत लिहिल्याप्रमाणे) होणारे पुस्तकांतील प्रत्येक रोगांवरील औषधाची माहिती कोणी आज मागविल्यास ती त्यास देऊं, व त्या औषधाची ऋतुमानाप्रमाणे मिळणारी ताजी वनस्पत्यौषधि द्रव्येंंही मागविल्यास ती आणविण्याचा वाजवी खर्च लागेल तो घेऊन चांगली पारखून काळजीपूर्वक पाठविण्यांत येतील.

-------------