Jump to content

मनतरंग/२१ व्या शतकात

विकिस्रोत कडून


 रिंकू, अमृता, संगीता या 'टीन एजर्स'...अठरा-वीस वर्षाच्या तरुणींच्या यादीत पस्तिशी ओलांडलेल्या विद्याची भर पडली आहे.'तू हां कर या ना कर, तूही मेरी (ही)...किरण, रिंकू, विद्या वगैरे वगैरे...' ही मालकी हक्काची जाणीव, पुरुषांच्या मनात 'आदिबंधा'सारखी जन्मत:च घट्ट रुजून बसली आहे. भारतीय महाकाव्यांवर एक नजर टाकली तरी 'स्त्री' एका पुरुषाची मालमत्ता असते ही जाणीव मूल्य म्हणून जोपासलेली आढळते. अर्थात, एका पुरुषाच्या मालकीच्या अनेक स्त्रिया असू शकतात. त्यांचा मालक मात्र एकच. याला अपवाद द्रौपदीचा. आणि म्हणूनच दुर्योधनाने तिला एकटीला गाठून, अत्यंत कुटिल प्रश्न विचारला होता की, 'आज पाळी कोणाची' ? द्रौपदी या प्रश्नाने आरपार विंधून गेली. पण पाच पतींच्या पतिव्रतेचे हे दुःख सांगायचे कोणाजवळ? शेवटी जिवाभावाचा सखा कृष्णच, कृष्णाने तिला उत्तर देण्यास सांगितले, ते असे - 'आज शेषाची नाही...' यातून सूचित केले गेले की, दुर्योधन-भार्या भानुमती आणि शेषनाग यांचे अवैध संबंध असावेत.
 ही सारी महाकाव्ये सत्य आणि स्वप्नप्रतिमा यांच्या धुकेरी पायावर उभी असतात. पण त्यातून मानवी स्वभावाचे अत्यंत तरल पदर हाती येतात. मानवी जीवनाच्या विकासोन्मुख वाटचालीत स्त्री-पुरुष नात्याची बांधणी झाली. एकेकाळी पशूप्रमाणे निसर्ग…ऋतू यावर आधारित मुक्त लैगिक संबंध मानवात…स्त्री-पुरुषांत होते. मानवाने बुद्धी, भावना, कार्यकारण संबंध यांच्या निकषावर घासूनपुसून त्यांना नवे परिमाण दिले. एक स्त्री आणि एक पुरुष यांच्यातच ते नाते असावे. असा संकेत निर्माण झाला. तसेच हे स्त्री-पुरुष एकाच मातेच्या उदरातून आलेले नसावेत, असा 'नियम'... नकारात्मक सकार निर्माण झाला. पण काळाच्या ओघात 'स्त्री' चे माणूसपण… माणूस म्हणून असलेल्या नैसर्गिक भावभावना यांना चौकटीत बांधले गेले. ज्याच्या मालकीची जमीन, त्याचा जमिनीवर आणि त्यातून उगवणाऱ्या पिकांवर अधिकार प्रस्थापित झाला आणि भूमी व स्त्री या दोन्हीतील निर्मिती वा सर्जन करण्याच्या शक्तीला असलेली समाजमान्यता, त्यांच्या सामर्थ्याविषयी असणारा आदर लोप पावून त्या मालकीच्या वस्तू' झाल्या. बीज पेरणारा मालक झाला. जमीन, पेरणाऱ्याला भाड्याने देता येते; तसाच स्त्रीचा गर्भाशयही 'पुरुष निर्मिती' साठी भाड्याने देण्याची प्रथा पडली. 'नियोग' म्हणजे दुसरे काय…?
 मानवी विकासाच्या एका टप्प्यावर स्त्री ही अंभृणी… शाकंभरी… लक्ष्मी… सरस्वती… अन्नदा… सकलगुणसंपन्न होती. पण त्या काळाची स्मृती आज फक्त इतिहासाच्या पुस्तकातल्या एका पानापुरती मर्यादित राहिली आहे. आपल्या विशाल आणि समृद्ध संस्कृतीची साक्ष वानगीदाखल श्रोत्यांच्या तोंडावर फेकण्यासाठी 'गार्गी… मैत्रेयी… उत्पला' आदी शक्तीपीठांची नावे आम्ही वापरतो. पण इतिहासात जमा झालेल्या 'संपन्न सत्या' ची जीर्णशीर्ण देखणी गोधडी, वर्तमानकालीन विदारक प्रत्यक्षावर घालून आम्ही किती दिवस 'नागडे सत्य' झाकणार आहोत ?
 स्त्री म्हणजे एक मन… संवेदना… आत्मा नसलेला देह. रक्तामांसाने लडबडलेला केर. त्यातूनच 'स्त्री भणिजे मत्त पापांचा राओ गा, चित्रीचीही स्त्री न पहावी' हा संस्कार देणारी परंपरा गेल्या अडीच-तीन हजार वर्षांपासून समाजाच्या स्त्री-पुरुषांच्या मनात खोलवर गोंदवली गेली. त्यातूनच मग सोळा वर्षांची रिंकू… संगीता, अमृता किंवा पस्तिशी पार केलेली प्रौढा विद्या यांचे बळी नोंदवले गेले. दुर्दैवाने या कुसंस्कारांची पेरणी-चित्रपट, दूरदर्शन मालिका, गाणी यांतूनच भरभरून होत आहे. त्या विरुद्ध संघटित लढा देण्याची ऊर्जा स्त्रीसंघटनांतही नाही. पतीदेखत पत्नीवर बलात्कार करण्याचा आसुरी आंनद घेण्याच्या, स्वत:च्या लेकीवर बळजबरी करणाऱ्या बापाच्या वृत्तीला कोणती 'विकृती' म्हणायचे…?
 भारतीय संस्कृतीच्या सर्वांगीण सुंदतेचे…निखळ सत्याचे ऊर्जस्वल पदर साने गुरुजींनी शब्दा-शब्दांतून वाचकांसमोर साक्षात केले. पण हे ग्रंथ 'दूरदर्शन' च्या प्रभावाने चक्रावलेल्या कुमारवयातील मुला-मुलींनी कधी वाचायचे ?
 द्रौपदीस तिची व्यथा… संताप… घुसमट समजून घेणारा श्रीकृष्णसखा पाठीशी होता. ज्या समाजात संवेदनशील पुरुषांची परंपरा असते तेथील स्त्रिया किमान सुरक्षित जीवन तरी जगू शकतात.
 रावणाचे मन सीतेवर भाळले होते. परंतु तिच्या संमतीशिवाय त्याने तिला स्पर्शाने दुखावले नाही.

 स्त्री ही शिर (मन…भावनांचे प्रतीक) नसलेले 'कबंध'...चालते बोलते बिनडोक शरीर, अशी समजूत समाजाची नव्हती. त्या सांस्कृतिक बंधातून अनेक थोर पुरुष निर्माण झाले, अगदी कालपर्यंत. महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, गोपाळ गणेश आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, साने गुरुजी, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वा. विवेकानंद आदी नररत्ने…पण पुढे काय ?
 ही परंपरा पुढे चालू ठेवण्याचे आव्हान २१ व्या शतकात आमचा समाज स्वीकारणार की नाही ?

■ ■ ■