मनतरंग/'वृक्ष पूजा..' पाऊसकाळाचे स्वागत

विकिस्रोत कडून


 मानवी संस्कृतीच्या विकासात 'माणूस आणि निसर्ग' यांच्यातील अनुबंध सर्वात पुरातन...सनातन आहे. निसर्गाच्या विविध विभ्रमांनी त्याला भय आणि आनंद या दोन्ही परस्परविरोधी संवेदनांचा अनुभव दिला. प्रचंड वेगाने सुसाट धावणारी वादळे, मुसळधार पाऊस, अंग अंग भाजून टाकणारे ऊन यांचा अनुभव भयचकित करणारा. तर, ऊनाच्या कहारानंतर रिमझिमणाऱ्या सुगंधी सरी, ऐन उन्हाळ्यात दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्याच्या गंधगार लहरी आणि कडाडत्या थंडीत अंगभरून पांघरावीशी वाटणारी उबदार उन्हे, यांचा अनुभव मनात आंनदाच्या लहरी उठवणारा.
 निसर्ग आणि माणूस यांच्यातील अतूट नात्याच्या विविधरंगी विकासाच्या खुणा आजही आमच्या सण, उत्सव, व्रते यांतून दिसतात. भारतीय संस्कृतीत भूमीला विश्वाचा गर्भाशय मानले आहे. बीज पेरणारा सूर्य असतो. परंतु पाऊस कोसळला नाही तर बीज कोरडे राहते. ते रुजत नाही. भूमीचा गर्भाशय वांझ राहतो. म्हणून वर्षा, सूर्याची ऊर्जा आणि भूमी या तिहींच्या समागमातून वनस्पतीसृष्टी विकसित होते याची जाण आदिमानवाला निसर्गाच्या निरीक्षणातून आली आणि त्यातूनच मानवाने 'अन्नसमृद्धी' शी जोडलेली व्रते, विधी, आचार, मंत्र यांची रचना केली. आजही 'आसेतुहिमाचल' आणि 'द्वारका ते जगन्नाथपुरी' यांच्या दरम्यान पसरलेल्या, विविध भाषा…वेशभूषा यांनी विनटलेल्या भारतातील लोकपरंपरा व लोकजीवनांचा शोध घेतल्यास लक्षात येते की, आमची व्रते, सण, विधी, उत्सव यांत विलक्षण एकात्मता आहे.
 ज्येष्ठाच्या उत्तरार्धात आभाळाचा निळा रंग कधी झाकोळून जातो ते कळत नाही. आकाश काळ्याभोर उद्दाम ढगांच्या खिल्लारांनी भरून जाते. झुंडीच्या झुंडी दक्षिणेकडून उत्तरेच्या दिशेने पळत असतात. भर दुपारी अंधारून येते. सूर्यालाही ग्लानी येते. मग विजांचा चमचमाट आणि एकापाठी एक कोसळणाऱ्या पावसाच्या धटिंगण सरी. अशावेळी अगदी नवे घरसुद्धा ठिबकायला लागते. मग चंद्रमोळी घरात रहाणाऱ्यांचे हाल तर विचारायलाच नकोत! आपल्याही ओठांवर इंदिरा संतांच्या ओळी बरसू लागतात -

नकोस नाचू तडातडा
असा कौलारावरून
तांबे, सतेली, पातेली,
आणू भांडी मी कोठून…?
नको नको रे पावसा
असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली…"

 असा हा पाऊस भारतात भर उन्हाळ्यानंतर येतो. तो सर्वांनाच हवाहवासा असतो. त्यातूनच अवघ्या जगाची भूक शमवणारी अन्नदा-कृषिलक्ष्मी शेताभातातून बहरणार असते. झाडे हिरवीगार होऊन फुलाफळांनी लखडून जाणार असतात. या ऋतुमुळे धरणी सुफला… संपन्न… परिपूर्णा होणार असते.
 मनातील भावना, कृतज्ञता व्यक्त करण्याची सुंदर रीत म्हणजे ऋतूंशी जोडलेली सणव्रते, विधी…आदी परंपरा.
 ज्येष्ठात वटवृक्षाची पूजा भारतभर केली जाते. तर आषाढात रानात उगवलेल्या बाभळींची, झाडांची पूजा लेकरंबाळं घेऊन जाऊन करण्याची प्रथा सर्वत्र आहे. झाडाखालील दगडालाच हळदीकुंकू वाहून लक्ष्मी करतात. कणकेत गूळ घालून त्याचे मुटके करून ते शिजवतात. त्या मुटक्यांचा नैवेद्य…या मुटक्यांना 'फळ' म्हणतात…लक्ष्मीला वाहतात वृक्षवल्ली आणि घरातील मुले हे समाजाचे धन आहे. हे धन सुरक्षित राहावे, दीर्घायुषी व्हावे, या धनाची वृद्धी व्हावी, हा हेतू पूजेमागे असतो. काश्मीर, केरळ, राजस्थान, बंगाल, आंध्र, गुजरात…आदी सर्व प्रदेशांत वृक्षपूजा केली जाते. झाडांच्या बुंध्याच्या भोवताली विविध धान्यांचा वापर करून, रंगसंगती साधून सजावट करतात. ही सजावट करताना झाडांची स्तुती…महती गाणारी लोकगीते स्त्रिया म्हणतात. झाडांची पूजा करून त्यांच्यापुढे दिवा लावतात.

 पावसाळा सुरू झाला की साथीचे रोग येतात. विशेषतः लहान मुलांना होणाऱ्या त्रासदायक रोगांची लागण वाढते. पूर्वी घरोघर आजीबाईचा बटवा असला तरी शुभमय भविष्याची कामना या व्रतांच्या माध्यमातून केली जात असावी. आज विज्ञानाचा सर्वांगीण विकास झाला आहे. तो सतत पुढे धावतो आहे. जगणे पूर्वीइतके सुरक्षित राहिलेले नाही. तरीही जीवनाच्या वस्त्रात एक कलाबुती धागा 'नशीब', 'दैवयोग' यांचा असतो. आपण कितीही पूर्णत्वाने प्रयत्न केले तरी, 'यश' मिळेल की नाही हा संभ्रम मानवी मनात ऊन-सावलीचा खेळ मांडत असतो. आणि म्हणूनच भविष्यासाठी शुभमय कामना व्यक्त करणारी व्रते…सण…उत्सव यांचे महत्त्व २१ व्याशतकात कमी झाले नाही… होणारही नाही. वृक्षपूजा जणू पाऊसकाळाचे समाजाने केलेले स्वागतच आहे.

■ ■ ■