मनतरंग/नागपूजा : एक शोधचिन्ह

विकिस्रोत कडून

 धरतीचे देखणे रूप पाहण्याची घाई सूर्यकिरणांना झालेली असते. ऊन-पावसाचा झिम्मा सुरू होतो नि याद येते की श्रावण चक्क अंगणातल्या पारिजातकावर, जुईवर, तगरीवर आपली रुमझुमती किमया पसरून दारात उभा आहे. आणि हिरव्या झाडांच्या रुंदबंद फांद्या हात हलवून, उंच उंच झुलणारा झोका बांधा म्हणून खुणावत आहेत.
 श्रावण अंगणात आला की सण, व्रते, उत्सव यांची धांदल सुरू होते. स्त्रियांच्या उत्साहाला भरते येते. प्रत्येक सासुरवाशीण श्रावणाची वाट अत्यंत आतुरतेने पाहत असते. ती मनोमन भावाला विनवीत असते

"बारा सणाला नेऊ नको
पंचमीला ठेवू नको..."

 महाराष्ट्रात नागपंचमीचा भावबंध माहेरपण आणि बहीणभावातील अवीट आणि अतूट प्रेम यांच्याशी जोडलेला आहे. नागपंचमीला माहेरी जाण्याची, बांगड्या भरण्याची ओढ प्रत्येक स्त्रीला असते.

"पंचमीचा सण, नागोबा वेगीला
मुऱ्हाळी यावा मला,
पाठी भाऊ मागितला..
वेडाबागडा भाऊ, बहिणीला असावा
चार आण्याची चोळी,
एका रात्रीचा विसावा…"

 नागपंचमीचे नाते रोज रात्री अंगणात गायल्या जाणाऱ्या भुलईच्या गीतांशी, आकाशाला भिडणाऱ्या उंचउंच झोक्याशी, बारा घरच्या… बारा जातीच्या लेकीबाळींनी रानात जाऊन पूजलेल्या नागोबाच्या वारूळाशी, ज्वारीच्या लाह्या आणि नागपूजेशी जोडलेले आहे.

 नागपूजा ही अत्यंत प्राचीन आहे. ऋग्वेदात नागपूजेचा उल्लेख नाही मात्र तैत्तिरीय संहितेत तो आहे. पुराणात विष्णू शेषशाई आहे. तर शिवाच्या गळ्यात नाग आहे. बुद्धाच्या जन्मानंतर नंदउपनंद या नागांनी त्याला स्नान घातले असा उल्लेख आहे. जैन धर्मातही नागाचा उल्लेख आहे. बौद्धकाळात ब्राह्मण नागपूजा करीत; असे चिनी प्रवाशाने लिहून ठेवले आहे. सिंधू नदीच्या परिसरातील प्रत्येक गावात नागाची मंदिरे वा मूर्ती असतात अशी ह्युअेनत्संगने नोंद केली आहे. तक्षशिलाचे राजे नागपूजक होते. त्यांनी आपल्या चिन्हावर नागप्रतिमा मुद्रित केल्या होत्या. सौराष्ट्रातील प्रत्येक गावाच्या सीमेवर…वेशीवर सर्पमंदिर सापडते. 'राजतरंगिणी' हा काश्मीरच्या इतिहासाची प्रत्यक्ष नोंद असलेला ग्रंथ असे दाखवितो की, काश्मीरचे राजे कर्कोटकाच्या वंशातले होते. शेषनाग, संतनाग, इंद्रनाग अशी अनेक देवळे प्रसिद्ध असून चिनाब नदीच्या तीरावर वासुकीचे मंदिर आहे. बंगालमधील वैद्य जातीचे लोक 'शुभराय' या नागावताराची पूजा नागमंडल या नृत्याने करतात. केरळ प्रांतातील प्रत्येक नायर हिंदूच्या घरी काऊस नावाचे छोटेसे सर्पमंदिर असतेच. त्याची पूजा केल्याने घरात लक्ष्मी वास करते, अशी समजूत आहे. पंजाबातील सफदोन या गावी नागपूजा विशेषत्वाने होते. या गावातच जनमेजयाचे सर्पसत्र झाले असे मानतात.
 नागाला क्षेत्ररक्षक मानले जाते. तो भूमीचे रक्षण करतो. शेतात वारूळ असणे शुभ मानतात. वारूळाची माती सुफला असते. वारूळ हे भूमीच्या सर्जनेन्द्रियाचे प्रतीक मानतात. नाग ही संतानदेवता मानली जाते. नाग सुफलीकरणाचे प्रतीक...जणू धरित्रीला सुफलित करणारे पुरुषतत्व. म्हणूनच नागपूजा...सर्पबंध ही संकल्पना केवळ भारतातच नाही तर इरत्रही होती. बॅबिलोनियातील अस्वार्ती नावाच्या कामदेवतेचे वाहन सर्प. सर्पदंश हे वासनादंशाचे प्रतिरूप आहे असा उल्लेख सर्व धर्मवाङ्मयातून आढळतो. ॲडम आणि ईव्ह यांच्या कहाणीत सर्प कामविकाराचे प्रतीक म्हणून येतो असे दैवतविषयक अभ्यास करणाऱ्या विद्वानांचे मत आहे. सर्प संपत्तीचे रक्षण करतो, जादूटोणा करतो असेही मानले जाते. युफरेट्स मधल्या तोरोनियम लोकांत सर्पपूजा प्रथम सुरू झाली. तेथून ती जगभर पसरली असे मत काही अभ्यासक मांडतात.
 अनेकविध वनस्पतीचा गर्भ वाहणारी भूमी आणि नाना विचार-विकार, संकल्प-विकल्प यांनी भारलेल्या मानवाचा गर्भ वाहणारी स्त्री यांच्यातील एकरूपत्व मानवाने आदिम काळापासून, विकासाच्या पहिल्या टप्प्यात स्वीकारले. स्त्रीचे देहधर्म, तसेच धरणीचेही असलेच पाहिजेत ही श्रद्धा त्याचवेळी त्यांच्या मनात गोंदली गेली. रजोदर्शन, पुष्पितावस्था, फलशोभन, ऋतू इत्यादी संज्ञा स्त्रीच्या सुफलन प्रक्रियेत येतात; तशाच धरणीच्याही असाव्यात. ती रजःस्वला झाल्याशिवाय पुष्पित कशी होणार ? फलशोभन कसे होणार ? यातूनच अंबुवाची सारखे विधी निर्माण झाले.

“वृष्टिमूलं कृषिःसर्वा,
वृष्टिमूलं व जीवनम्"

ही जाणीव कृषिग्रंथात जोपासली आहे. स्त्री रजस्व:ला असताना पुरुष-समागम टाळावा; तो निषिद्ध आहे असे मानले जाते. भूमीच्या रजस्व:ला काळात तिचा नांगराशी...म्हणजेच लांगलाशी संबंध येऊ नये असे मानतात. त्या काळात बीज पेरू नये. कृषिपराशरात हा काळ मृगनक्षत्राची अखेर आणि आर्द्रा नक्षत्राची सुरुवात हा आहे. या काळालाच 'अंबुवाची' असे म्हणतात.

 नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावासाठी उपवास, नागपंचमीला चुलीवर तवा ठेवू नये... विळीवर चिरू नये अशी समजूत; आणि नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी कर. हे तीन दिवस महाराष्ट्रातही जमीन उकरीत नाहीत, औत हाकीत नाहीत. ओरिसा, आसाम, केरळ येथेही 'अंबुवाची' काळ साजरा होतो. महाराष्ट्रातील नागपंचमीचा सण...व्रत हेही अभ्यासकांपुढील एक शोधचिन्ह आहे.

■ ■ ■