मनतरंग/हे झाड कुणाचे ? मातीचे की आभाळाचे ?

विकिस्रोत कडून

  रात्रीची वेळ. बारा वाजून गेले असावेत. नेहमीप्रमाणे चहा पिण्यासाठी एका हॉटेलपाशी आम्ही गाडी थांबवली. आश्विनातली बोचरी थंडी आता चांगलीच टचटचायला लागली होती. डोक्यावर झापड झुकू लागली होती आणि कोल्हापूर यायला किमान पाच तास लागणार होते. तोपर्यंत चक्रधराला ताजेतवाने ठेवणे भाग होते. अशावेळी सुंठ घातलेला कडक चहा अंगांगात ताजी लहर चेतवतो. कडक चहाची वाट पाहात असतानाच एक बुटकासा, तजेलदार डोळ्यांचा मुलगा पाण्याचे ग्लास हातात घेऊन आला, ग्लास धरताना बोटं पाण्यात बुडालेली. अंगावर बनियनवजा कळकट्ट शर्ट, गळ्यात ताईत,
 "पाणी होना मॅडम ?" त्याने विचारले,
 "अरे, तुझी बोटं त्या पाण्यात बुडवलीस, तेच पाणी पाजणार का आम्हांला ? ग्लास बाहेरून धरावा. आमच्याजवळ पाणी आहे. नको आम्हाला हे पाणी " मी उपदेश करायला गेले.
 "मॅडम, हितलं पानी नकाच पिऊ. कुनीबी चबाढबा गिलास बुडिवतात रांजनात. हजारो येनार जानार. कशी ऱ्हावी स्वच्छता ? मास्तर म्हणतात की, आपल्या देसात शंभरपैकी ऐंशी रोग घाणेरड्या पान्यामुळे होतात," तो समजदारीने बोलत होता.
 आत जाऊन त्याने खळाखळा कप विसळले. गरम चहा काळजीपूर्वक कपात भरून आणून दिला.
 "कशी झाली चा ? उलिसी लौंग नि दालचिनी बी टाकलीय. लई कडक थंडी पडलीया. देऊ का आजूक ?"
 त्याने आग्रहाने विचारले. माझे मन त्याच्या चकचकीत डोळ्यांत नि तल्लख आवाजात गुंतले होते.
 "हॉटेल कुणाचे रे ? तुझ्या बाबाचं का ? शाळेत जातोस ?"
 मी प्रश्न विचारताच तो हसला आणि उत्तरला
 "हॉटेल नि माझ्या बाचं ? माज्या बानं टाकलंच तर दारूचं दुकान टाकील. म्हंजी उधारीचं काम नाय.."
 "शाळेत जातो ना मी. आठवीत शिकतो. हित रात्री आठ ते दोन ड्यूटी करतो. धा रुपये रोज मिळतो. आणि दोन चा, नि एक मिसळ रोज. माजी माय याच हॉटेलीत स्वैपाक करती. मोठ्या भैणीचं लगीन झालया. धाकटा हेमू लई हुषार आहे. सहावीत आहे. त्याला मातर मी काम नाय करू देत."
 "किती शिकणार? काय करणार पुढे?" मी
 "मॅडम्, मॅट्रिक झालो तरी बस ! रात्रभर जागरन. वर्गात डोळे मिटाया लागतात. छोटूला मातर सायब करनार. मी ठरवलया की, पैशे साठवून चायचा गाडा टाकायचा..." त्याने लगेच उत्तर दिले.
 सुंठ दालचिनी घातलेला कडक चहा पिऊन आम्ही त्याच्याशी बोलताना माझ्या डोळ्यासमोर आली अपऱ्या नाकाची नबू. रोजगार हमीवर काम करणाऱ्या आईची लेकरं सांभाळणारी. वयाच्या सहाव्या वर्षापासून चुलीवर भाकऱ्या भाजणारी. शाळेत जाणाऱ्या मैत्रिणीकडे हावऱ्या, रसभऱ्या नजरेनं पाहणारी. रात्रीच्या शाळेत न चुकता हजर राहणारी. मोसम सुरू झाला की, डोंगरातली सीताफळं निगुतीने तोडून पिकवून चार कोस डोंगर तुडवीत खाली उतरून येऊन, पाटोद्याच्या बाजारात विकणारी. त्या पैशातले. थोडे पैसे पुस्तकांसाठी मागे टाकणारी, दोन-चार वर्षांनी तीही आपल्या आईसोबत बराशी खंदायला जाईल. नबूला सदासारखा भाऊ मिळाला असता तर ?...
 सदा आता नववीत आहे. तोही हॉटेलात रात्रपाळी करतो. शहागड हे हायवेवरचे गाव लहान असले तरी रात्रभर गाड्यांची... ट्रक्सची जा-ये सुरू असते. चहाचा धंदा खूप तेजीत चालतो. अशाच एका हॉटेलात सदा काम करतो. खूप चौकस आहे. चहा पितापिता गप्पा मारायची, प्रश्न विचारण्याची आपली सवय. बहिणी किती ? भाऊ किती ?? बहिणी शाळेत जातात का ? शेती आहे का ?.. असले ठरीव प्रश्न आपण विचारणार. आणि उत्तरही त्याच वाणाची मिळतात.
 बहिणी तीन किंवा चार किंवा सहा. बहिणी शाळेत न जाणाऱ्याच. शेत असले तरी काही गुंठे नाहीतर एखादा एकर. आई-बाप ब्रासवर खोदकाम करणारे. नाही तर सहसा उसाच्या कामासाठी सहा महिने भटकंती करणारे. साखर कारखान्याला किंवा गंगथडीला सुगीसाठी जाणारे.
 पण सदाची उत्तरे मात्र वेगळी होती. त्याचा ताजा आवाज, काहीतरी नवे शोधणारे डोळे, मनाला प्रसन्नता देणारे होते.
 "ताई, मोठ्या बहिणीचं लगीन मी लहान असताना झालं. तिला नांदवत नाही नवरा. आमच्या घरीच राहते ती. पण धाकटीला मात्र हट्टाने शाळेत घातलंय मी. आमचा बा तयारच नव्हता. मग मी सांगितलं की, आता नोकऱ्या, बँकेचं कर्ज फक्त बायांना मिळणार आहे. तवा तयार झाला. आता तिसरीत आहे ती. आमचे संजीव गुरुजी म्हणतात की बाया पण माणसंच आहेत. त्या काय गाई म्हशी नाहीत. त्या शिकल्या तर घर शिकतं. लेकरं शहाणी होतात. मग देशपण पुढे जातो. पोरींनी जलमल्यापासून भाकऱ्या न गवऱ्याच थापायच्या? त्यांना पण खेळावं वाटतं, नाचावं वाटतं, शिकावं वाटतं..."
 सदासारखे भाऊ मुलींना मिळाले तर?
 एरवी खेड्यातल्या, सर्वसामान्य घरातल्या, गरिबाच्या घरच्या लेकींचे जिणे कसे ?

"हे हात कोवळे, ओझ्याखाली दबले...
हे श्वास उद्याचे, फुलण्याआधी खुडले
माथ्यावरचे ऊन बाभळी, क्षणभर उतरून यावे...
हे झाड कुणाचे ? मातीचे की आभाळाचे ?
हे झाड उद्याचे !! पालवत्या पान फुलाचे...
हसण्यासाठी... फुलण्यासाठी
चार क्षणांचे, अंगण कधी मिळावे...?"

■ ■ ■