मनतरंग/न इति, न इति... नेता

विकिस्रोत कडून

  अगदी महत्त्वाच्या रस्त्यावरचा मोठा पूल, बांधणी धडाक्याने झाली. पाहता पाहता पूल बांधून पूर्ण झाला. यंदाचा पाऊसही तडाखेबंद. थोडासा पाऊस आला तरी उंचावरून धावत येणाऱ्या खळाळ ओढ्यांनी तिचे पात्र दोहो अंगांनी भरून जाते. एरवी बार्शी लाईट रेल्वेसारखी धावणारी बोरीमाय, पूर आला की दख्खनराणीच्या कैफात फुफाटत... धडाडत धावू लागते आणि पूर्वीच्या ठेंगू पुलावरून पाणी धावू लागले की तेवीस किलोमीटरवरची अंबाजोगाई गाठण्यासाठी बहात्तर किलोमीटरचा फेरा मारावा लागतो. या नदीवर मोठा पूल बांधला जातोय याची खुशी परिसरातील सर्वांनाच होती. तो वेगाने बांधलाही गेला पण...
 पूल बांधून झाला तरी रस्ता बंद. दोहोबाजूंनी दगडकाट्यांचे कुंपण लावलेले. मग पुन्हा बहात्तर किलोमीटरची परिक्रमा. चौकशी केल्यावर कळले की पुलाचे विधीपूर्वक, साग्रसंगीत उद्घाटन व्हायचेय. मंत्रीमहोदयांना सध्या वेळ नाही वगैरे.
 मी अगदी छोटी असेन तेव्हाची गोष्ट. पहिलीत होते मी. एक दिवस शाळा सुटण्याआधीच मुलांचे पालक शाळेत आले आणि मुलांना घरी घेऊन गेले. आम्ही दोनतीनजणच असे की ज्यांचे पालक आले नाहीत. चंदनबाईंना मी विचारले तेव्हा नेहमीसारख्या गालाला खळी पाडून हसल्या. गालावरचे हिरवे गोंदण खळीत... हौदात पडलेल्या चांदोबासारखे दिसे. त्यांनी सांगितले की तापी नदीवर भलामोठा पूल बांधत आहेत. नदीवरचा पूल पक्का, कधीच न कोसळणारा व्हावा म्हणून लहान मुलांना त्यात चिणतात अशी लोकांची समजूत आहे आणि अशी टोळी धुळ्यात हिंडतेय अशी अफवा आहे. तुमच्या आई-बाबांना माहीत आहे की चंदनबाई घरपोच बाळं आणून सोडील. म्हणून आले नाहीत ते. आम्हांला त्यांनी घरी पोचवले त्यास आज पन्नास वर्षे उलटून गेली आहेत. आपले मन विज्ञानाची जादू जाणू लागले आहे. पूल बांधण्याबद्दलचे गूढ कमी झाले आहे. मनातल्या अंधश्रद्धा कमी झाल्या तरी 'मंत्रीश्रद्धा' मात्र दिवसागणिक वाढत वाढत चालल्या आहेत. त्यातून निवडणुका जवळ आल्या की पाहायचे काम नाही !
 आपल्या एकूणच जीवनात राजकारण अगदी इथून तिथून आणि नको तितके झिरपले आहे. चहाची टपरी असो वा केस कापायचे दुकान असो, त्यांच्या उद्घाटनासाठी आम्हाला 'नेता'च लागतो. नेत्यांनाही गरज असते, मागे येणाऱ्या फौजेची. नेत्यांची सेना दिवसेंदिवस वाढत चाललीय. ग्रामपंचायत, तालुका पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका यांत निवडून जाणारे, त्यांना निवडून आणण्यासाठी मदत करणारे, सगळे नेतेच की ! पूर्वी उद्घाटनासाठी कलाकार, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते यांना आमंत्रित करण्यात धन्यता मानली जाई. आज साहित्यसंमेलनेच राजकारणाची सुपर माध्यमे बनत चालली आहेत. पण बा. भ. बोरकरांसारख्या कवीराजाला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले नाही म्हणून त्यांची कविता थोडीच थिटी आणि बेचव होणार आहे ?

सरीवर सरी आल्या गंss
जळात गोपी न्हाल्या गंss

 किंचित सानुनासिक स्वरात, मस्त लयीत झुलणाऱ्या काव्यातील शब्दांची धुंदी, काळाचे प्रवाह अंगावरून वाहत राहिले तरी ढिली थोडीच होणार आहे ?
 मध्यंतरी मुलींना सडकसख्याहरींकडून होणाऱ्या त्रासाच्या संदर्भात पोलीस स्टेशनवर फोन करण्याचा प्रसंग आला. रस्त्यावर साध्या वेशातले पोलीस ठेवणे आवश्यक होते. पण केंद्रात पोलिसांची संख्या अपुरी होती. थोडेफार जे होते ते जवळच असलेल्या मंत्रीमहोदयांच्या गावी पाठवलेले. मंत्रीमहोदयांचा मुक्काम गावी असला की सगळा फौजफाटा तिथे जाई. त्यांच्या संरक्षणापुढे सामान्यांच्या रक्षणाची तमा कोणाला ?
 पाच वर्षांपूर्वी झालेल्या किल्लारी भूकंपाच्या काळातील गोष्ट. दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे नेते किल्लारीच्या दिशेनं धावत होते. शिवाय शहरातली मोटरगाडीवाली माणसे, खेड्यातली बैलगाडीवाली माणसे लेकरंबाळं घेऊन भूकंप पाहायला किल्लारीकडे झेपावली होती. कहर म्हणजे सहलीच्या गाड्याही त्याच दिशेने पळत होत्या. अशी ही गर्दी कधी कधी एकाच जागी चार चार, पाच पाच तास गोठवली जाई. कारण काय ? तर कधी आजीमाजी राष्ट्रपती, आजीमाजी पंतप्रधान, वा आजीमाजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा महान नट वा नटी रस्त्यावरून जात आहेत म्हणून सिक्युरिटी (झेड की काय) संरक्षण व्यवस्था एकदम कडक (चहासारखी !) ठेवलीय असे उत्तर मिळे.
 परवा ह्यांचा एक मित्र खास गप्पा मारायला आला होता. त्याच्या बरोबरच स्टेनगनधारी. मलाच घाम फुटला. त्याचं राजकारण तसं तालुका-जिल्हा पातळीवरचं. पण त्यालाही सिक्युरिटी गार्ड लागतो. किंबहुना त्यावरून राजकारणी नेत्याचे मोठेपण ओळखायचे ! बड्या नेत्यांचे खास हेलिकॉप्टर उतरण्याआधीचे नि नंतरचे काही तास आकाशाकडे डोळे लावण्यात जाणार. बड्या नेत्यांच्या सुरक्षिततेसाठी हेलिकॉप्टर नाहीतर स्पेशल विमान हवेच... अशावेळी आठवतो कॅनडातला प्रसंग. १९९४ चा मे महिना. आम्ही सेंटजॉन्सहून मॉन्ट्रियलला निघालो होतो. आहे त्या वेळात खूप बोलून घ्यावे म्हणून रंगात आलेल्या गप्पा. विमान उडायला पंधरावीस मिनिटे होती. दोनच दिवसातल्या घट्ट ओळखी. पुन्हा कधी भेटू याची शाश्वती नाही. म्हणून मनात हुरहुर. एवढ्यात एका मित्राने, एका मध्यमवयीन गृहस्थाकडे निर्देश करून सांगितले,
 'अरे व्वा, आमच्या न्यूफाऊंडलंडचे मुख्यमंत्री आज तुमच्या विमानातून ओटावाला. आमच्या कॅनडाच्या राजधानीला निघालेले दिसताहेत... 'न्यू फाऊंडलंड हा कॅनडाचा एक प्रान्त. आपल्या महाराष्ट्रासारखा. त्याचे मुख्यमंत्री स्वत:ची बॅग हातात घेऊन सर्वांसाठीच्या विमानाच्या विशेष वर्गाच्या रांगेत उभे होते. त्यांच्याही हातात बोर्डिंग पास-विमानात बसण्याचा परवाना होता. त्यांच्यामागे त्यांचा खास मदतनीस. म्हणजे पी.ए. साब...'खास मदतनीस हातात फाईल्स व स्वत:ची बॅग घेऊन उभे. हे सारे पाहताना डोळे... मन... बुद्धी... अक्षरश: थक्क. आपल्या भारतात शक्य आहे हे ?...?

■ ■ ■