मनतरंग/दूर....दूर गेलेले अंगण
Appearance
< मनतरंग
पहाटेच्या अर्धुक्या उजेडात अंगण झाडताना... सडा टाकताना अंगातून उत्साहाचा पूर ओसंडून जाई. आमचे घर आग्रारोडवर. त्यामुळे घराला ऐसपैस अंगण नव्हते. पण आहे तेवढे अंगण, शेणाचा सडा घालून, रांगोळीने आकंठ सजवण्यात वेगळा आंनद असे. उद्या कोणती रांगोळी काढायची, यावर डोक्यात काहूर असे... उषीच्या नाहीतर मंगलीच्या अंगणापेक्षा आमचेच अंगण किती नटलेले याची स्पर्धा अधिक. रांगोळीने सजलेले देखणे अंगण आज हरवत चालले आहे, दूर... दूर चालले आहे.
रंगवल्ली... रंगबावरी वेल. चौसष्ट कलांत जिचा समावेश केला ती, एक महत्त्वाची कला. ही चित्रकला वा शिल्पकलेच्याही आधीची आहे, असे मानले जाते. कोणत्याही धार्मिक वा मंगल कार्यात रांगोळी हवीच, संगीत, नृत्य, शिल्प, आदी कलांचा विकास धर्माच्या अनुबंधातून झाला. 'रंगावली' ही त्यातूनच बहरत गेली. ही कला केव्हा आणि कशी निर्माण झाली असेल ? निसर्गात जागोजागी जाणवणारी, रंगांची चित्रमयी किमया निरखताना बोटातून झरलेले गाणे म्हणजे रांगोळी ! निसर्ग आणि मन यांचे नाते व्यक्त करणारी सांकेतिक भाषाच ! आम्हां स्त्रियांना... भारतीय स्त्रियांना सौंदर्यासक्तीचे हे वरदान आईच्या गर्भातच मिळते.
सौंदर्याचा साक्षात्कार, मांगल्याची सिद्धी ही भूमिका रांगोळी रेखाटण्यामागे असावी. भारतभर विविध प्रांतांतून, आपापल्या सांस्कृतिक वेगळेपणासह ही कला विकसित झाली आहे. बंगाल, आसामातील 'अल्पना' राजस्थानातले शेणाने सारवलेले सपोत अंगण अंगणात आणि घराच्या भिंती 'मांडणा'ने सजलेल्या. गुजरातेत 'साथिया', महाराष्ट्रात ठिपक्यांची भूमितीबद्ध रांगोळी, आंध्रात फुलांनी बहरलेली 'मुग्गू' तामिळनाडूतील 'कोलम' आणि कर्नाटकातील 'रंगोली' च्या वळणदार रेषांच्या जाळीत नजर अडकून जावी ! मध्य प्रदेशात 'चौकपूरना' म्हणतात. आमच्या गंगामावशी उर्फ मम्मी, साठीच्या पुढच्या. 'मला बी लिवायला शिकवा.' असा त्यांचा हट्ट होता. त्यांना पेन्सिल धरायला शिकवताना आमच्या मुली थकल्या पण मग मी त्यांना कानगोष्ट सांगितली नि काय आश्चर्य! एका तासात... रांगोळीच्या माध्यमातून मम्मी सही करायला शिकली.
वात्सायनाच्या कामसूत्रात या कलेचा उल्लेख आहे. सरस्वती, कामदेव यांच्या पूजेसाठी फुलांच्या आकृती काढीत. ७ व्या शतकातील 'बरांग चरित्रात' पंचरंगीचूर्ण, धान्य, फुले यांच्या रांगोळ्यांचा उल्लेख आहे. १० व्या शतकातील 'नलचंपू' ग्रंथात उत्सवप्रसंगी घरापुढे रांगोळ्या काढीत असे लिहिले आहे. १२ व्या शतकातील 'देशीनाममाले' त हेमचंद्राने तांदळाच्या पिठाची रांगोळी काढल्याचे लिहिले आहे. 'मानसोल्लासात' कवी सोमेश्वर रांगोळीचा उल्लेख 'धूलिचित्र' असा करतो तर, श्रीकुमारने 'शिल्परत्ना' त 'क्षणिकचित्र' या नावाने उल्लेख केला आहे. जैन, पारशी धर्मांतही रांगोळी अशुभनिवारक मानली जाते.
आंतरविद्यापीठ युवक महोत्सवाच्या निमित्ताने तामिळनाडू, तेलंगण, कर्नाटकात हिंडता आले. तिथे मात्र अजूनही घराचे अंगण रांगोळीने लखलखलेले असते. जणू अतिथींच्या स्वागतासाठी ओठांवर हासू गोंदवून उभे असते. म्हाताऱ्या आजीपासून ते थेट चार वर्षाच्या चिमुरडीपर्यंत सगळ्यांचे केस जुई नि अबोलीच्या गुंफणगजऱ्यांनी माळलेले !
अंगण कुणाचेही असो, त्यावर रांगोळी रेखलेली असेच. रांगोळीला जाती भेदाची कुंपणे नव्हती. किंबहुना कलेला जाती-धर्माची बंधने आडवी येत नाहीत. आमच्या वर्गात ओल्गा डिसिल्वा होती. तिचे घर खिस्ती स्मशानाला खेटून होते. स्मशानाच्या कुंपणभिंतीला लगटून प्राजक्ताचे झाड नि कृष्णकमळीचा वेल होता. तिला रांगोळी एवढी आवडे की रोज तिचे अंगण रांगोळीने नटलेले असे. पण आम्ही मराठी माणसे, ही पारंपरिक लोककला विसरत तर चाललो नाही ना ? आता बघावे तर, अवतीभवतीच्या अंगणात रीत म्हणून चार फुल्या रेघाटलेल्या असतात. दसरा-दिवाळीला अंगणात दिमाखाने सजणारा गालिचाही आता विरळ होत चाललाय. माझी एक ज्येष्ठ मैत्रीण, स्त्रीवादी कार्यकर्ती, कर्नाटकात वाढली आहे. तिच्या घराचे अंगण तऱ्हेतऱ्हेच्या पारंपरिक रांगोळ्यांनी कायम फुलारलेले असते. तिच्या घरात शिरताना माझे डोळे प्रथम अंगणात स्थिरावतात. पांढऱ्याशुभ्र रेखीव वळणदार, नियमबद्ध रेषा. त्यावर लाल-पिवळे हळदकुंकवाचे नाजूक गोंदण.
...अंगण रेखायचे तर पहाटे उठणे आले. शिवाय घराला अंगण हवे. पूर्वी घराला अंगण असे, मागे पडवी असे. आता तालुक्याच्या गावापर्यंत 'ब्लॉक सिस्टीम' पोचलीय. घराचे रंगरूप बदलतेय. घर म्हटले की टी.व्ही. आला की जागरणे आलीच. मग उशिरा उठणे वगैरे, डोळ्यांचा वा नजरेचा उपयोग वाचनासाठी, काही आगळे वेगळे दिसले तर ते निरखण्यासाठी करणे, हे विझत चाललेय. रंग, शब्द, स्वर यांचे क्षणोक्षणी धिंगाणा घालणारे धसमुसळे रूप आणि अधूनमधून वाट्याला येणारे प्रत्यक्ष कार्यक्रमाचे काही क्षण, हा टीव्हीचा बाज. त्यात जीवनातल्या सुंदर परंपरा हरवत चालल्या आहेत. खरे तर रांगोळीचे विविध प्रकार आम्ही दूरदर्शनवरून शिकू शकतो आणि शिकवू शकतो. विविध प्रांतांतले सांस्कृतिक वैशिष्ट्यांसोबतचे रांगोळीचे वेगळेपण सर्वांपर्यंत पोचवता येते. पण अशा कार्यक्रमाची आवड तरुण पिढीत उरलीय का? मुलांना 'बुगी बुगी सारखे कार्यक्रम 'देखणे' वाटतात कारण,
"जगणे असावे असे,
जे ना मनात प्रश्न पेरते,
ना विचारांना गदगदा हलवून
अंकुरण्याची प्रेरणा देते...
जगणे कसे ? सोप्पे सोप्पे !!!
'फास्टफूड' च जसे
तिथे चर्वणेची गरजच नसे."
■ ■ ■