Jump to content

मनतरंग/समाज 'मना'चे खरे स्वातंत्र्य

विकिस्रोत कडून



 रामशास्त्रींच्या नावाने एक गोष्ट सांगितली जाते. ती रामशास्त्रीच्या नावाला शोभेशी आहे. त्या काळात पुण्यातील एक लाल लुगड्यातील बाई अप्रतिम प्रवचन करीत असे. तिच्या प्रवचनांची ख्याती त्या परिसरात पसरली होती. शास्त्रीजींना हे प्रवचन ऐकण्याची इच्छा झाली आणि ते आवर्जून तेथे गेले. त्या प्रवचनकार महिलेने शास्त्रीजींसमोर एक प्रश्न टाकला.
 "शास्त्रीजी, परमेश्वराने तुम्हाला आणि मला, एकाच रीतीने जन्म दिला. स्त्री-पुरुषांना होणारे रोग सारखेच. भावभावना सारख्या, मग माझे पती वयाच्या आठव्या वर्षी मरण पावले म्हणून, वयात येताच मला विद्रूप केले. जीवनाचे, आनंदाचे सारे दरवाजे बंद करून टाकले. पण पुरुषाची पत्नी म्हातारपणी मरण पावली तरी त्याचा दुसरा विवाह मात्र १४ व्या दिवशीही होऊ शकतो. हे असे का ? निसर्गाने... परमेश्वराने आम्हाला न्याय दिला; पण समाजाने, धर्माने दिला का नाही ?"
 शास्त्रीजी क्षणभर चक्रावले चकितही झाले. ते उत्तरले-
 "बाई गं, तुझा प्रश्न योग्य आहे. आजवरचे कायदे पुरुषांनी केले. त्यात तुमच्या अडचणींचा आम्ही विचार केला नाही. पण एक दिवस असा येईल त्यावेळी ज्ञानाच्या बळावर महिलांत कायदे करण्याची क्षमता येईल, ताकद येईल. त्यावेळी स्त्रियांना न्याय देणारा कायदा अस्तित्वात येईल."
 जे पुरुष ज्ञानी होते. ज्ञानाइतकीच ज्यांची संवेदनशक्ती तरल होती त्यांना स्त्रीचे... विधवा बालिकेचे तरुणीचे दुःख कळले होते. भास्कराचार्यांची कन्या लीलावती वयाच्या आठव्या वर्षी वैधव्याचा शाप घेऊन माघारी वडिलांकडे आली. ते दु:ख विसरण्यासाठी भास्कराचार्यांनी गणित शास्त्राचा ग्रंथ लिहिला. लीलावतीला ज्ञान दिले. ग्रंथाला लीलावतीचे नाव दिले.
 चौदा वर्षाच्या भावजयीला तिच्या पतीच्या शवाबरोबर 'सतित्वा'च्या नावाखाली सर्वांदेखत कोडकौतुकाने जाळण्यात येत असल्याचे पाहून राजा राममोहन राय याचा आत्मा तळमळला. त्या आगीत भाजून निघाला आणि एका संवेदनशील धाडसी दिराने लक्षावधी भावजयींची लादलेल्या सतित्वातून सुटका केली.
 तेल्यातांबोळ्यांचे पुढारी म्हणून गौरविलेल्या लोकमान्यांनी आगरकरांच्या सामाजिक न्यायाच्या भूमिकेला कडाडून विरोध केला. कारण पारंपरिक विचारांवर पोसलेल्या गतानुगतिक समाजात इंग्रजांच्या सत्तेविरुद्ध लढण्याची आग पेटवणे हे लोकान्यांच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचे आणि पहिले ध्येय होते. त्यांना आगरकरांच्या विचाराबंद्दल कृतज्ञता नव्हती असे थोडेच आहे ?
 महात्मा फुल्यांनी तर ब्राह्मण विधवेच्या पोटी जन्मलेल्या अनौरस बाळाला औरस पितृत्व दिले. सावित्रीसारखी आई दिली. शाहू महाराजांनी मुलींच्या शिक्षणाची सोय केली. डॉ. बाबासाहेबांनी दलित समाजातील स्त्रियांना लुगडे पायाच्या टाचेपर्यंत येईल असे नेसावे हे आवर्जून सांगितले. सवर्णाच्या स्त्रियांनी अंगभरून लुगडे नेसायचे आणि इतर स्त्रियांनी मात्र पोटऱ्या उघड्या ठेवणारे लुगडे का नेसायचे. असा सवाल त्यांनी केला. 'शील गहाण टाकून कुठे स्वातंत्र्य मिळते का ?' असा जळजळीत सवाल त्यांनी बहिष्कृत भारताचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रासमोर टाकला. आणि असा सवाल टाकणाऱ्या महात्म्याने भारताची घटना रचली. म्हणूनच आम्हां भारतीय स्त्रियांना १५ ऑगस्ट १९४७ ला सर्वांबरोबर स्वातंत्र्य मिळाले. इंग्लंड, अमेरिका आदी पाश्चात्त्य देशांतील महिलांसारखे मुक्तीसाठी लढे द्यावे लागले नाहीत.
 कागदोपत्री स्वातंत्र्य मिळाले हे खरेच, पण हे स्वातंत्र्य समाजाच्या 'मना' ने मान्य केले आहे का ?

■ ■ ■