मनतरंग/सवाल रूखसानाचा

विकिस्रोत कडून



 त्या दोघींचे नवरे सरकारी नोकरीतले. एकीचा नवरा चक्रधर ड्राईव्हर. तर दुसरीचा कंडक्टर. दोघीही तीन-तीन लेकरांच्या आया. आणि दोघींनाही नवऱ्याने टाकले म्हणून माहेरी राहणाऱ्या दोघींची प्रकरणे आमच्या कुटुंब सल्ला आणि कायदा मदतकेंद्रात नोंदवलेली होती. एकीचे प्रकरण वर्षभर कोर्टात चालले. सततच्या पाठपुराव्यानंतर पोटगी मंजूर झाली. मुलांना प्रत्येकी शंभर आणि तिला दोनशे रुपये. असे दरमहा पाचशे रुपये तिला पोटगीदाखल मिळू लागले. चार माणासांच्या अन्न-वस्त्र-निवाऱ्यासाठी दरमहा पाचशे रुपये म्हणजे दिवसाकाठी माणशी चार रुपये नि बारा पैसे. त्यात दोन वेळचे जेवण तरी होते का? पण तरीही ती समाधानी होती.
 "पदमिन को पाचसो रूपया महिना सुरू हो गया. मेरेकोच क्यू नही ? उसका मरद डाइवर होये तो मेरा भी कंडक्टर हाये. मेरा काम नही कऱ्या तो मै यहीचं बैठनेवाली हू बच्चो को लेके हॉ... बोल देती हूं परतिभाताई, मेरा भी तुमीच करना." रूखसाना बुबू प्रतिभाशी भांडत होती. आणि मी केंद्रात प्रवेश केला. 'देखो ना भाभी, ऐसा कैसा तुम्हारा कायदा? पदमिन को पोटगी, मेरेकू क्यो नही? तिने माझ्याही समोर सवाल फेकला. काय उत्तर होते माझ्याकडे ?
 रूखसानाचा नवरा कंडक्टर होता. सुरुवातीची सहा वर्षे सुखात गेली. दोन मुली आणि एक मुलगा यांना जन्म दिला. शहाण्यासारखी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केली. अर्थात तीन मुलांची देखभाल करण्यात, घरकामात ती एवढी बुडून गेली की नवऱ्याला खूष करण्यासाठी छानछोकीने राहणे तिला जमेना. पूर्वीची देखणी रूखसाना, पिठात नि लेकरांच्या शी..शूत बुडालेली, गबाळी रूखसाना बनली. ती नवऱ्याला आवडेना. त्याने दुसरी मैत्रीण शोधली. त्याचा सारा पैसा या नव्या मैत्रिणीवर आणि दारूतच खर्च होई. पोटगीसाठी कोर्टातून केस करण्याचे ठरले. पण तिच्याच भावाने थोडे दिवस थांबायला सांगितले. कोर्टात गेलो तर तिचा नवरा तलाक घेण्यासाठी धर्मगुरूकडे जाईल. जवळच्या नातलगांना रूखसाना कशी त्रास देते, ते पटवून सांगील. आणि तलाक मिळाला तर सारेच दरवाजे बंद होतील, असे त्याला वाटत होते. 'ताई मैने भी रूखसाना आपा को समझाया. दुसरी शादी करेगा तो करने दो. दोनोको सम्हालेगा, तलाग देगा तो सबको कौन सम्हालेगा? तो मला पटवून देत होता. मी तिला परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होते. पण तिचे समाधान होत नव्हते.
 आयरिन ही अत्यंत सेवाभावी वृत्तीची परिचारिका, दवाखान्यातील रोग्यांना नैतिक बळ देणारी, मानसिक आधार देणारी. सर्वांची लाडकी 'सिस्टर'. ती प्रोटेस्टेट पंथाची तर तिचा नवरा डॅनिल कॅथलिक होता. अत्यंत गोडबोल्या, पण मनाने विकृत. आणि दुष्ट. छळवाद सुरू झाला. सिगारेटचे चटके देण्यापासून ते पट्ट्याने मारण्यापर्यंत सर्व प्रकार तो हाताळी. ती कामावर असताना घरातील सर्व सामान विकून टाकण्यापर्यंत त्याची मजल गेली. तिच्या मैत्रिणींनी तिला आमच्या केंद्राचा पत्ता दिला. कोर्टात केस सुरू झाली. कॅथलिक धर्मरुढीनुसार घटस्फोट घेता येत नाही. परंतु त्यांचा 'पर्सनल लॉ...धर्माधारित व्यक्तिगत कायदा' वेगळा नसल्याने तिला न्याय मिळाला. अर्थात गावातील कॅथलिक ज्येष्ठांनी घटस्फोट घेणे कसे अयोग्य आहे, कुटुंबसंस्थाच अशाने कोसळेल वगैरे वगैरे सांगून आमच्या कार्यकर्त्यांना, वकिलांना पटवायचा प्रयत्न केला ती बात वेगळीच. आज आयरिन मनावरची दडपणे झटकून दवाखान्यातील रोग्यांची सेवा करण्यात मग्न आहे.
 अशावेळी आठवतात बीजिंगच्या कुंभा मैदानावर आमच्यात झालेल्या गप्पा. पाकिस्तान, भारत, बांगला देशाच्या महिला मोकळेपणाने हिंदीतून गप्पा मारीत होत्या.
 प्रत्येक देशात एक 'कुटुंब कायदा' असायला हवा. धर्म कोणताही असला तरी कुटुंबाची रचना एकाच तऱ्हेची असते. पती-पत्नी, त्यांची मुले, त्यांच्यावर अवलंबून असलेले पालक आणि भावंडे. त्यांचे एकमेकांशी असलेले नाते, कर्तव्ये, यावर आधारित हा कायदा असावा. तो देशातील सर्वधर्मीय नागरिकांना समान असायला हवा, असे मत सर्वजणी मनापासून व आवेशाने व्यक्त करीत होत्या.
 आज बीजिंगची महिला परिषद होऊन तीन वर्षे उलटून गेली आहेत. मोहिनी गिरी, वसुधा धागमवार, इंदिरा जयसिंग फ्लेविया, रझिया यांच्यासारख्या हजारोजणी आपापल्या परीने समान कुटुंब कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहेत. कायदे करून तरी उपयोग काय ? पुस्तकातले कायदे मनात...कृतीत कधी लिहिले जाणार ?
 रूखसाना अजूनही बाहेर बसून माझ्या उत्तराची वाट पाहतेय, उत्तर देण्याची शक्ती कधी येणार आहे ?

■ ■ ■