मनतरंग/मोहोराचे दिवस
Appearance
< मनतरंग
मोहोर हा शब्दच किती चित्रमय, न मोजता येणान्या लक्षावधी चिटुकल्या टिंबकटू कळ्यांचा हा झुलता मनोरा. मंद तरीही मादक गंधाने घमघमणारा. हा गंध अवघ्या आसमंताला कवेत घेतो.
संध्याकाळची वेळ, घरी परतताना नाक एकदम जागे झाले. नकळत दहादिशांनी श्वास घेऊन काही शोधू लागले आणि नजरेने वेधले. आंब्याचे आकंठ मोहरलेले झाड. मनाशी खूणगाठ बांधली की थंडी आता साईसुट्यो म्हणणार आणि क्षितिजापल्याड पळून जाणार. माझ्या डोळ्यासमोर हिरव्यागार कैऱ्यांचे घुंगरू केसांत बांधून झुलणारी बंजारन उभी राहिली.
हे मोहोराचे दिवस तसे क्षणजीवीच ! मोहाराचे देखणेपण डोळाभर अनुभवण्याआधीच बाळकैऱ्यांचे डूल पानापानातून डुलू लागतात आणि कैरीच्या खमंग लोणच्याची चव जिभेलाच नव्हे तर जिवाला चटक लावून जाते.
आंब्याचा मोहोर झडू लागतोय तोवर कडुलिंबाच्या झाडांवरून गंधकिन्नरींचा मेळा दहादिशांनी धावू लागतो. कडुलिंबाला 'कडू' का म्हणावे असा प्रश्न पडावा इतका गोड वास या फुलांना... नव्हे मोहराला असतो. ज्वारीच्या दाण्याइतकी चिमुकली, पण पूर्णफुलाचा आकार असलेली ही विलक्षण नाजूक फुलं, पानांची हिरवाइ झाकून टाकतात. चैत्रातली कडुलिंबाची मोहरलेली डौलदार पेढेघाटी झाडं पाहिली की वाटतं चादणं चार दिवसाच्या सुट्टीसाठी जणू या 'माथेरान'ला आलंय.
मी पुसदला निघाले होते. शिवरात्र मावळली की, उन्हाचे फुलोर चटचटायला लागतात, त्यातून पंचवीस वर्षापूर्वीचा 'यष्टी' तला प्रवास! तेव्हाच्या 'एस्टी'चा निळा रंगही म्हातारीच्या तव्यासारखा तापायचा. तर अशा या भर दुपारच्या प्रवासाला वैतागून मी खिडकीबाहेर नजर टाकली नि काय ? भवतालचे डोंगर...नव्हे टेकड्या लालचुटूक फुलांनी अगदी आकंठ लखडल्या होत्या. पानांचा कुठेच पत्ता नाही. फक्त लालड्या पोवळ्यांनी रुमझुमणारी झाडं. न राहवून मी शेजारच्या माणसाला विचारलंच की ही झाडं कोणती आणि तो माझ्याकडे चकित नजरेने पाहू लागला, नि विचारले "बहिन येवढं बी म्हाईत न्हाई तुले ? काहूनची हाईस ?"
ती पळसाची झाडं होती. तेव्हा कुठे लक्षात आलं की 'पळसाला पाने तीनच' असे का म्हणतात ते ?
घर आणि कॉलेजच्या वाटेवर एक कुठलंसं झाड आहे. वर्षभर ते कधीच नजरेला साद घालत नाही. पण एक दिवस अचानक लक्षात येते की शेलाट्या बांध्याची नववयसा नृत्यांगना पोपटी अंजिरी रंगाची रेशमी ओढणी सावरीत कुणाची तरी वाट पाहत उभी आहे... चार-दोन पावलं पुढे यावे तर जाणवते की गेला महिनाभर पिवळ्या रंगाच्या खुळखुळ पहाड्या शेंगा अंगभर वागवीत बसलेल्या ध्यानस्थ शिशिराचेही डोळे उघडू लागले आहेत. विलक्षण मदिर गंधाने भारून टाकणारी फिक्कट हिरव्या पांढऱ्या रंगाची फुलं आता वसंताच्या स्वागतासाठी चवऱ्या ढाळू लागली आहेत. अशावेळी 'कालनिर्णया' वर नजर न टाकताच कळते की, होळी उंबरठ्यावर उभी आहे नि पाडवा पल्याड उभा राहून साखर बत्ताशाच्या माळांनी सजलेल्या रेशमी गुढ्यांची वाट पाहतोय.
हे मोहरलेले दिवस आणि मोहराचे दिवस झोपाळ्यावाचून झुलायचे दिवस. प्रत्येक क्षण ओंजळीत भरभरून झेलायचे दिवस. हे दिवस अचानक अंगणात येतात नि त्यांचा मृदुमुलायम स्पर्श अनुभवण्याच्या आत उडूनही जातात.
...पण त्या मोहरलेल्या आठवणी ? त्या मात्र हृदयाच्या गाभाऱ्यात अगदी जपून ठेवायच्या. या वसंतमोहोराच्या आठवणी जे जीवाभावाने आठवीत राहातात त्यांना साठींची दृष्ट लागत नाही म्हणे !!
■ ■ ■