मनतरंग/शनिमाहात्म्य

विकिस्रोत कडून



"स्त्रीयः पवित्रमतुलम्
नैनंदुष्यन्तिकर्हिचित्
मासिं मासि रजोह्यासां
दुष्कृतान्यपकर्षति"

स्त्रिया मूलत:च पवित्र आहेत. त्या कशानेही अपवित्र होत नाहीत. दर महिन्याला त्यांच्यातील 'रज'...बाहेरून आलेली मलिनता नाहीशी करण्याची शक्ती निसर्गानेच त्यांना दिली आहे. अशी स्त्रियांच्या पावित्र्याची ग्वाही देणारा पंडित वराह मिहीर सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी 'स्त्रीशक्ती' ची अतुलनीय महती सांगून गेला.

 महात्मा चक्रधरांचे शिष्य गोविंदप्रभू रजःस्वला स्त्रीस भोजन तयार करण्यास सांगत आणि अन्नातील एक घास खाऊन इतर अन्न प्रसाद म्हणून इतरांना... शिष्यांना देत.
 स्त्रीची मासिक पाळी म्हणजेच तिच्यातील निर्मितीची शक्ती. तिच्या स्त्रीत्वाची खूण. 'स्त्री' त ही शक्ती आहे. म्हणून जगाचा रहाटपाळणा लाखो वर्षांपासून अव्याहतपणे फिरतो आहे. या सत्याची जाण आणि भान अदिमानवाला होते. म्हणूनच त्याने स्त्रीच्या या शरीरधर्माचा उपहास केला नाही.
 पण निसर्गाशी संवाद साधण्याऐवजी निसर्गाला मी एका डबीत कोंडू शकतो असा गर्व करणाऱ्यांनी 'धर्म' या समाजाची योग्य मांडणी करणाऱ्या व्यवस्थेला आपल्या मुठीत ठेवले.
 धर्म हा माणसांसाठी, त्यांच्यातील कृतिशीलतेला 'ऊर्जा' देणारा न राहता काहींच्या 'अर्था' शी बांधला गेला आणि त्यातील 'विश्वात्मक देव' ही हरवून गेला. परमेश्वराची सर्वात्मकता संपली. त्यालाही विटाळ होऊ लागला.
 दक्षिणेतील एका देवस्थानाला भेट देण्यासाठी आम्ही गेलो होतो. गाभाऱ्यात प्रवेश करताना पुरुषांनी पँट घालण्याऐवजी लुंगी व धोतर घालून यावे अशी सूचना होती. बरोबरच्या कन्यांनी घातलेल्या पंजाबी ड्रेसबद्दलही नाराजी व्यक्त केली गेली. बरोबरची मंडळी बाहेर थांबली. आम्ही तिघी साडीवाल्या आत जाऊन आलो. शेकडो वर्षांपूर्वी, काळ्याकभिन्न पाषाणातून अगदी नेमकेपणानी कोरलेली विलक्षण देखणी मूर्ती.
 दगडाचे रेशमीपण वर्षानुवर्षे सळसळत राहणारे. समोर समईच्या लवलवत्या वाती. त्या प्रकाशात परमेश्वराच्या… त्या पाथरवटाने घडवलेल्या माणसांच्या मनातल्या परमेश्वराच्या डोळ्यात नजर घालून पाहण्याचा प्रयत्न मी केला.
 तिथे तर होती नीरव शांतता. कसलीही अपेक्षा न करणारे, फक्त मंदपणे तृप्त हास्य करणारे डोळे. ही नीरव शांतता… ते तृप्त हास्य पँटवाल्यांना दिसलं नसतं ? की ती तृप्ती आणि नीरवता पँटमुळे डहुळली असती?
 स्त्रियांनी कार्तिकस्वामीच्या देवळात जाऊ नये अशी रीत. पण आम्ही ती कधीच पाळली नाही आणि आम्ही सुरक्षित आहोत. नि कार्तिकस्वामीही सुरक्षित आहेत. शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावर स्त्रियांनी चढू नये हा नियम करणारी माणसेच. स्वतः शनिमहाराज तर सांगण्यासाठी आलेले नाहीत. परंतु स्त्री ही दुय्यम आहे, ती अपवित्र आहे, रक्तमांसाच्या घाणीने लडबडलेली आहे. ती सभ्य पुरुषालाही स्खलित करते… इत्यादी तत्त्वज्ञान सांगणारीही माणसेच. दुर्दैव हे की समाजाने वा धर्माने स्त्रीतील 'माणूसपण' कधी समजून घेतले नाही. तिला मन आहे. मनात निर्माण होणारे विविध भाव आहेत. ते व्यक्त करण्याची उर्मी स्त्रीच्या हृदयात आहे. भावना व्यक्त करणारे अत्यंत सक्षम असे स्वरयंत्र… वाचा आहे. विचार करुन निर्णय घेण्याची, संकटांना समोर जाण्याची मनःशक्ती तिच्याकडे आहे, याची नोंद आजवर घेतलीच गेली नव्हती. पण शिक्षणाचा आणि तर्काचा तिसरा डोळा ज्यांना लाभला अशा थोर पितृतुल्य महर्षीनी एकोणीसाव्या शतकाच्या मध्यापासून हजारो वर्षे शिळा होऊन पडलेल्या 'अहिल्ये'तील माणूसपणाचा रुणझुणता जिवंत झरा समाजासमोर आणण्यासाठी परिश्रम घेतले. गेल्या दीडशे वर्षात स्त्रियांनीही स्वत:चे बौद्धिक, शारीरिक, मानसिक कर्तृत्व जगासमोर सिद्ध केले. तरीही शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावर जायला स्त्रीला मनाई ? केवळ परंपरा म्हणून ? रूढी म्हणून ? असे धरून चालूया की शनीचा कोप होईल. त्या चौथऱ्यावर चढणाऱ्या स्त्रिया जर कोप सहन करायला तयार असतील तर ? मग कोणाचा अडसर ? 'काही' माणसांचाच ना ?
 'शनी' जर परम ईश्वर आहे तर तो स्त्रीच्या स्पर्शाने अपवित्र होईलच कसा ?... की इथेही राजकीय शनीमाहात्म्य ?....

■ ■ ■