मनतरंग/वृक्ष आणि स्त्री : आदिम नाते

विकिस्रोत कडून

  गेली हजारो वर्षे आम्ही भारतीय स्त्रिया वटसावित्री, मंगळागौर, हरितालिका यासारखी व्रते, पति परमेश्वराच्या निरोगी आणि सुदीर्घ आयुष्याची कामना परिपूर्ण व्हावी यासाठी अत्यंत निष्ठेने... श्रद्धेने करीत आहोत. ती व्रते आता पाऊस आणि वादळी वाऱ्यांसोबत अगदी अंगणात येऊन उभी आहेत. एकविसाव्या शतकात आम्हां स्त्रियांच्या व्रतवैकल्यांकडे आम्ही सांस्कृतिक, वैज्ञानिक आणि चिकित्सक भूमिकेतून पाहणार की नाही ?
 'स्त्री' ने शेतीचा, कंदमुळे... फळे... शाकभाज्या यांचा अन्न शिजविण्याचा शोध लावला हे सत्य जगमान्य आहे. मुदगलानी या स्त्रीला नांगरण्याची कला माहिती होती. बैलाऐवजी स्वत:ला नांगराला जोडून ती जमीन भुसभुशीत करीत असे. झाडे सावली देतात. फळे देतात. पानांनाही चव असते, त्यांच्या फांद्यांचा लाकूडफाटा अन्न शिजविण्यासाठी उपयोगी पडतो. तर फांद्यांना, पानांना एकमेकांत गुंतवून सुरेखशी झोपडी बांधता येते.
 आपल्याला कुशीत घेऊन ऊन, थंडी, पाऊस, विंचू-काटा यांपासून रक्षण करणारी झोपडी. ही झाडे मुळाशी पाणी धरून ठेवतात याचेही स्त्रियांना भान होते. भारतातील लोककथातून झाडाला पाणी घालून त्यांच्यावर चढलेली कीड… आळ्या काढून, वाळलेली पाने वा फांद्या काढून त्या झाडांची निगा राखणाऱ्या 'नावडत्या राण्या' भेटतात. मग ती झाडेही त्यांना फळांचा भरभरून आशीर्वाद देतात. तात्पर्य एकच, झाड आणि स्त्रिया यांच्यातील पुरातन अनुबंध! मग ते झाड आवळीचे वा आंब्याचे असो वा महाकाय वटवृक्षाचे. मंगळागौरीसाठी लागणारी विविधप्रकारची पत्री असो, रंगबावरी फुले असोत वा हिरव्याकंच रेशमी तरीही धारदार दुर्वा असोत. हा अनुबंध… हे अतूट नाते हजारोवर्षापासूनचे आहे. स्त्रीने कंदमुळे… शाकभाज्या, शेतीतंत्र यांचा शोध घेतल्यापासूनचे आहे. आजही पेरणी करणारी स्त्री असेल तर बीज लवकर निसवून अंकुरते, अशी समजूत ग्रामीण भागात रूढ आहे.
 निसर्ग, स्त्री आणि भूमी यांच्या परस्पर साधर्म्यातून, मनोमय सायुज्यातून निर्माण झालेल्या विधी, व्रते, सणांतील स्त्रीचे प्रधानत्व… महत्त्व; समाजाच्या सांस्कृतिक विकासक्रमात कागदी...आणि वरवरचे होत गेले. ती व्रते पतीच्या दीर्घायुष्याच्या मागणीभोवती गुंतवली आणि गुंगवली गेली. ज्येष्ठात पाऊस अगदी क्षितिजावर येऊन उभा राहतो. मृगापूर्वीचा सैराटा सारखा कोसळणारा पाऊस वादळासह झलक दाखवून जातो. कर्नाटकात ज्येष्ठी पौर्णिमेला शेतात विधिपूर्वक नांगर घालून पेरणीपूर्वीची मशागत केली जाते.
 ज्येष्ठापासून पाऊसकाळ सुरू होतो. वैशाखात तापलेली जमीन पाऊसधारा झेलायला आसुरलेली असते. ज्येष्ठ पौर्णिमेची वटवृक्षपूजा ही मूलतः कृषिसमृद्धीचा यातुविधी असावा. वटवृक्षाच्या पारंब्या जमिनीत घुसतात आणि तेथून नवे झाड उगवते. वटवृक्षाची मुळे पावसाचे पाणी साठवून धरतात. वटवृक्ष पुरातनतेचे, विशालतेचे, सुरक्षिततेचे प्रतीक आहे. हा महाकाय वृक्ष वावटळींनाही अडवू शकतो. अशा वृक्षाची सामूहिकरितीने पूजा बांधून कृषिसमृद्धीची कामना या यातुविधीद्वारे केली जात असावी.
 भूमी ही जणू विश्वाचा गर्भाशय आहे. बीज पेरणारा सूर्य वैशाखात जमिनीला 'भगवती' करून जातो. तिच्या भेगांतून उष्णता…ऊर्जा पेरून जातो. पण त्याला 'वर्षा' ची साथ मिळाली नाही तर बीज कोरडे राहते. भूमीचा गर्भाशय वांझ राहतो. भूमी; वर्पन आणि सूर्य यांच्या समागमतून वनस्पतीसृष्टी निर्माण होते. मानवाचे अवघे जीवन अन्नावर अवलंबून असते. ते अधिकाधिक कसे निर्माण होईल यासाठी अदिमानवाने या तिहींतील नाते समजावून घेण्याचा प्रयत्न केला. जमिनीची सुफलनशक्ती वाढावी यासाठी पाऊसकाळात विविध प्रकारचे यातुविधी कल्पनेनुसार निर्माण केले. भूमी आणि स्त्री या 'निर्मिती' करणाऱ्या, त्यामुळे यातुविधित स्त्रीप्रधानता असावी.

 आपल्या अतिविशाल संस्कृतीची मुळे लोकव्रते, सण, विधी यांत खोलवर पसरलेली आहेत. आज निरर्थक वाटणाऱ्या विधिव्रतांमधील अवैज्ञानिक, सामाजिक न्यायाशी विसंगत बाबी फेकून द्यायलाच हव्यात. पण त्यांच्या निर्मितीमागील कल्पनाबंध, लोकभाव शोधून त्याला नवे रूप देणेही अत्यावश्यक आहे. फलोत्पत्ती करणारे वृक्ष आणि मानववंश निर्माण करणारी स्त्री यांच्यातले आदिम नाते कागदी, कचकडी होत गेले तर येणाऱ्या पिढ्यांना तिसरे सहस्त्रक पाहायला मिळेल का?

■ ■ ■