मनतरंग/लेकुरवाळा काळा विठू
वरून आभाळ कोसळतंय, रस्त्याच्या कडेने पिवळी रानफुलं रुमझुमत्या धारांत तरारून उठली आहेत. त्या पावसात आकंठ भिजत हजारो माणसांची रांग धुंदीत पुढे पुढे पळते आहे. काहीजणींच्या माथ्यावर चिमुकले तुळशीवृंदावन तर काहींच्या माथ्यावर कळशी. चारदोन जणांनी माथ्यावरच्या पटक्याने गळ्यातला मृदंग नीटसपणे झाकून घेतलाय. अनेकांच्या गळ्यात पितळी झांजांची जोडी. काहींच्या हातात चिपळ्या तर काहींनी गळ्यातली एकतारी उपरण्याने झाकून घेतलीय. हा थवा...जत्था एका लयीत पुढे पुढे धावतोय. आणि हे दृश्य महाराष्ट्राच्या अवघ्या रस्त्यांवर सारखेच. जरादेखील फरक नाही, इथे मात्र तीस टक्के राखीवची अट नाही. काही जथ्यात तर साठ टक्क्याहून अधिक भरती स्त्रियांचीच. वयाचेही बंधन नाही. अगदी दहा वर्षांच्या लेकरापासून ते तरुण... प्रौढ...वयस्क...थेट ऐंशीचा पल्ला गाठलेले स्त्री-पुरुष एका लयीत, एका धुंदीत पंढरीच्या वाटेने धावताहेत.
एक इंग्रजी म्हण आहे. तिचे मराठीतील भाषांतर असे - श्रद्धेने जगी चालतो, न बहुधा दृष्टीमुळे मानव...
अशी कोणती श्रद्धा असेल, गेल्या हजारो वर्षांपासून अव्याहतपणे चालणाऱ्या या 'वारी' मागे ? कोणता विश्वास असेल ? कोणती जादू असेल ? या वारीतली एक वारकरी जनी सांगून गेली, 'विठूमाझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा ।' लेकुरवाळ्या विठूचे 'लेकुरवाळेपण' आषाढाच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्राच्या रस्त्यांवरून अक्षरशः रांगत असते. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला...शेतात कष्ट करणाऱ्या, गाई-गुरांमागे हिंडणाऱ्या श्रमिकाला, घरीदारी मानसिक, शारीरिक दडपणाखाली पिचणाऱ्या स्त्रीला नीरव शांतीची 'स्वप्नभूमी' देणारा 'जादूगार' हा विठू असेल का? धर्माने माणसामाणसांतील तेढ जातीयतेच्या माध्यमातून सतत जळती ठेवली.
"उस डोंगा परी रस नोहे डोंगा ।
काय भुललासी वरलीया रंगा ॥"
'गाडी लागनी मले गाडी लागनी'
'बरे झाले कुणबी झालो ।
ना तरी असतो दंभे मेलो ॥
ज्ञानोबा तर चारही वर्णांपेक्षा कनिष्ठ अशा पाचव्या वर्णाचा. त्याला तरी 'ज्ञाना'चा प्रचंड मद असणाऱ्यांनी ज्ञानाचा अधिकार दिला का ? आज भलेही समाजाला ज्ञानेश्वरांचे 'कुलकर्णी'पण आठवत असेल. पण खरा बंडखोर तोच ! ज्ञानाचे लेणे या भावंडांना समाजात 'अधिकार' देणारे ठरावे यासाठी ज्ञानदान करुन, मातापित्यांनी आपले श्वास भागीरथीच्या… गोदावरीच्या पाण्यात मिसळले. ही भावंडे स्मशानात वाढली. सामाजिक बहिष्काराची आग ज्यांनी पचवली त्यांनाच सामन्यांची आत्मव्यथा आकळली !! त्यातूनच मातीशी नाते सांगणाऱ्या, माउलीच्या निरामय मायेची प्रगाढ खोली जाणवून देणाऱ्या वारकरी संप्रदायाचा पाया 'ज्ञानेश्वर माउली'ने रचला. त्यानंतर खऱ्या अर्थाने 'माउली'पण जगले निजागवले ते साने गुरुजींनीच. विठोबा दक्षिणेतून आला की उत्तरेतून? तो विष्णूचे रूप की त्यात शंकराचाही अंश ? वगैरे… वगैरे प्रश्नांचा वेध अभ्यासक घेत आहेत. आणि घ्यावाही. परंतु कशाचीही अपेक्षा न करणारा आणि म्हणूनच नवससायासांचे अवडंबर न माजवणारा हा काळाभोर 'विठोबा' शेकडो वर्षे कष्टकरी सामन्यांची… साध्यासुध्या महिलांची 'आधारशिळा' बनून राहिला आहे, आणि पुढेही बनून राहील…!
■ ■ ■