मनतरंग/बहरता सारांश !

विकिस्रोत कडून

 'माँ, पंजिमाँ अंगणात फुललीय. चल ना पाहायला... चल गंऽऽ' माझा हात ओढत माझी नातवंडे मला सांगत होती. खरे तर मे महिन्याचे पाऊल अंगणात पडण्यापूर्वीच मला त्या लालचुटूक नि शुभ्र स्वप्निल रेषांच्या उत्फुल्ल गेंदेदार भुईफुलोऱ्याचे स्वप्न पडू लागले होते. नऊ वर्षांपूर्वी आई माझ्या घरी आली होती. १० मे हा तिचा जन्मदिवस आणि विवाहाचा दिवस. ही तारीख जवळ आली की, ती काहीशी अस्वस्थ होई. मला माझ्या एका परदेशी मैत्रिणीने त्या गेंदांचे कंद दिले होते. आईची अस्वस्थता जावी नि त्या खास दिवसाची आठवण म्हणून भिंतीला टेकून मी ते कंद मातीत रोवायला लावले तिला.
 दिवस मावळतीला आला नि तिच्या छातीत दुखू लागले भोवंड आल्यागत झाले. नंतरचे पंधरा - वीस दिवस नुसत्या काळजीचे नि भरून आलेले. पण त्यातून ती छान सावरली. हातीपायी धडधाकटपणे घरी गेली. ते कंद आमच्या डोक्यातून तर कधीच निसटून पार झाले होते. नंतरच्या वर्षी भर मे मध्ये तिचे आजारपण आणि जुलैत सर्वांचा निरोप घेऊन पल्याड जाणे...
 त्र्याण्णवचा मे उजाडला नि एक दिवस लक्षात आले. भिंतीच्या लगत खोवलेल्या त्या कंदातून हिरवी ठसठसीत उभार कळी थेट जमिनीतून डोकं वर काढून आभाळ न्याहाळत होती. दुसऱ्या दिवशी त्यातून लाल - पांढऱ्या धारांचे लालचुटूक कारंजे उडू लागलेले नि जाग आली.
 गेल्या वर्षी आम्हाला सोडून गेलेली आई… त्या कंदातून जणू अंगणात उगवली होती. एखाद्या उडत्या कारंज्याच्या चेंडूसारखे ते विलक्षण देखणे फूल. पाहाता पाहता चार फुले भुईकमळासारखी ताठ्यात उभी राहिली. मी धावत जाऊन मुलांना अंगणात घेऊन आले 'अरे व्वा, आजी…चक्क अंगणात उभीय' मोठा खाली बसून ते फूल कुरवाळत बोलला… आणि आज माझी नातवंडेही या अंगणातल्या पंजीमाँची वाट पाहतात नि त्या फुलाच्या रेशमी रेषांचा स्पर्श बोटात हळुवारपणे साठवून घेतात. गेली सात वर्षे मे ची वाट अवघे घर पाहते.
 मला माहीत आहे की, ती गोंडेदार फुले 'मे फ्लॉवर' म्हणून ओळखली जातात. पण झाडे…फुले…वेली यांचे नाते ती ज्यांनी जमिनीत लावली त्यांच्याशी कायमचे जोडले जाते. ती झाडे जणू त्या व्यक्तीच्या अस्तित्वाची…स्मृतींची खूण बनतात. आमच्या शेतातली…म्हणजे तुमच्या, त्यांच्या कोणाच्याही शेतातली आंब्याची वा जांभळीची झाडे आमच्या पूर्वजांची नावे पांघरून उभी असतात.
 "भाऊसाहेबी आंबा यंदा भलताच मोहरलाय…मंगूताईची जांभूळ वाळत चाललीय…काकीण चिंच यंदा दहा हजाराला गेली…" असे संदर्भ शेतकरी घरांतून नेहमीच ऐकू येतात.
 माणूस, झाडे आणि ऋतू यांच्यातील नाते निसर्गाच्या सान्निध्यात उमलत गेले आणि ते नेहमीच ताजे राहणार आहे. सोळा वर्षापूर्वी घराच्या अंगणात अमलताशाचे रोप लावले. मे-जूनमध्ये रेशमी-पिवळ्या फुलांच्या झुंबरांनी लखडून जाणारे ते झाड, शेजारीच लालजर्द झुबक्यांनी आभाळाला खुणावणारा गुलमोहर आणि काहीसे दूर उभे असलेले पांढऱ्याशुभ्र सुगंधी फुलांचे व्रतस्थ अनंताचे झुडूप. वैशाख वणव्याच्या उन्हाळ्यात या रंगबिलोरी झाडांमध्ये पाहात उभे राहणे हा सुद्धा थंडावा देणारा अनुभव.
 मुंबई-पुण्यासारख्या गर्दीच्या गोंधळ-गोंगाटातही खिडकीतून डोकावणारी, भिंतीला लगटून वर-वर चढणारी पैशाची हिरवीपोपटी वेल त्या गर्दीचा शीण हलका करते.
 जर्मनीतल्या मुक्कामात एल्के तिला आवडणाऱ्या एकाकी स्मशानभूमीत घेऊन गेली होती. खरे तर ती जागा तिला एवढी का प्रिय असावी ? असा प्रश्न मनात होताच आणि चकचुकती पालही. पण प्रत्यक्षात वसंतबहरांनी लखलखलेली देखणी झाडे. पायाशी विसावलेल्या व्यक्तींच्या फक्त मधुर आठवणींचीच याद देत होती. तऱ्हेतऱ्हेच्या फुलांचे झुलते वाफे त्या कबरींच्या भवताली हिंदोळत होते.
 …हे सारे पाहून आठवतो अनुपम खेर या विलक्षण बुद्धिमान आणि भावविभोर नटाचा चित्रपट, 'सारांश'

 …शेवटी आपल्या 'असण्या'चा अक्षय, अभंग 'सारांश' किती अनंत आणि अपार ना?

■ ■ ■