Jump to content

मनतरंग/राहतील मागे का भारतीय नारी ?

विकिस्रोत कडून

  भारतीय सैन्याच्या विमानदलात आता मुलीही प्रवेश घेऊ लागल्या आहेत भारतीय विमानदलाचे प्रमुख, टिपणीस यांच्या हातून लेफ्टनंटचा हुद्दा स्वीकारणारी अनिता आपटे अत्यंत धीटपणाने दूरदर्शनच्या प्रतिनिधीशी बोलताना पाहिली आणि मन गर्वाने ताठ झाले.
 गेल्या तीन-चार हजार वर्षांच्या काळात स्त्रियांना जीवनातील कोणत्याच क्षेत्रात संधी दिली नाही. किंबहुना त्या शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दुर्बळ असतात ही ठाम समजूत आमच्या भारतीय समाजमनात घट्ट रुजली आहे. खरे तर प्राचीन काळीही युद्धात स्त्रिया सहभागी होत असत. कैकयी राजा दशरथाबरोबर युद्धावर जात असे. राजघराण्यातील स्त्रियांना शस्त्राचे शास्त्र अवगत करून दिले जाई. परंतु नंतरच्या काळात स्त्रियांच्या सौंदर्याचा,देहाचा उपयोग युद्धात करून घेतला गेला. 'विषकन्ये' ची कथा सर्वश्रुत आहे बालपणापासून एखाद्या कन्येला विषाची मात्रा दिली जाई. तरुणपणात प्रवेश करीपर्यंत ती परिपूर्ण 'विषकन्या' होत असे, तिच्या सौंदर्याचा विषारीपणाचा उपयोग शत्रूराष्ट्राचे अधिकारी फोडण्यासाठी, त्यांची गुपिते हस्तगत करण्यासाठी केला जाई. परंतु अशा पद्धतीच्या उपयोगात स्त्रीच्या केवळ देहाला महत्त्व दिले जाई. युद्धशास्त्रातील ज्ञान, जाण त्यात नसे. दुसऱ्या महायुद्धात अनेक स्त्रियांनी राष्ट्ररक्षणासाठी आपली बुद्धी, कला, सौंदर्य यांचा उपयोग, शत्रूपक्षाला नामोहरम करण्यासाठी केला होता. गुप्तहेर खात्यातील स्त्रियांचे महत्त्व आर्य चाणक्यापासून मान्य होते.
 २१ व्या शतकात प्रवेश करणारी स्त्री युद्धशास्त्रात प्रावीण्य मिळवू लागली आहे. नौदलात, विमानदलात स्त्रियांना प्रवेश दिला जातो. पोलिस विभागातील त्यांची कामगिरी अभिमानास्पद आहे. किरण बेदी, मीरा बोरवणकर, श्रीदेवी गोएल यांच्या जोडीला आता नव्या तरुणी आत्मविश्वासाने या क्षेत्रात येत आहेत.
 चारएक वर्षांपूर्वीचा अनुभव. आम्ही पुणे-बेंगलोर प्रवास अवकाशमार्गाने... विमानाने करणार होतो विमानचालक आणि दिशानिर्देक या दोघी महिला आहेत हे पाहून भोवताली कुजबूज सुरू झाली.
 "आज काही आपलं खरं नाही. नॅव्हिगेटर आणि वैमानिक दोघी स्त्रिया दिसताहेत." दोन पुरुष प्रवाशांतला संवाद.
 "अरे बाबा, बायकांचं राज्य खऱ्या अर्थाने आलंय हं."
 "बघा हो, आज तुमचे जीव आमच्या ताब्यात आहेत." एका पत्नीचा गोड टोमणा !
 "कलियुग है बाबा. आँखे बंद करके जीना..."
 कॅप्टन सौदामिनी देशमुख यांनी आम्हाला सुखरूपणे आणि अलगदपणे बंगलोरच्या धावपट्टीवर उतरवले.
 मी न राहवून त्या प्रवाशांना विचारलेच, "सुखरूप उतरवलं ना विमान महिलांनी ? पुरुष वैमानिकांपेक्षा कुठे कमी पडल्या नाहीत ना त्या ?"
 दूरदर्शनवरील फ्लाईट लेफ्टनंट अनिता आपटेला पाहताना बंगलोर प्रवासाची याद आली.
 कारगिलच्या परिसरातले बर्फाचे उत्तुंग डोंगर आज पेटले आहेत या खंडप्राय देशाचे स्वातंत्र्य अखंड. अक्षय. अभंग राखण्यासाठी, सीमेवर वळवळणाऱ्या पाकी बांडगुळांना चिरडून टाकण्यासाठी, हजारो भारतीय तरुण सैनिक कारगिल, द्रास, बटालिक या पंधरा-सोळा हजार फूट उंचावरील भागात डोळ्याचे सूर्य करून. प्राण तळहातावर घेऊन लढत आहेत, त्यांना आमच्याकडून कसलीच अपेक्षा नाही. पण आमच्या अत्यंत संपृक्त भावनांचे... शुभेच्छामय भावनांचे नैतिक बळ त्यांच्या पाठीशी राहिले तर त्यांचा उत्साह नक्कीच वाढणार आहे.
 आम्ही स्त्रियांनी आमच्या मुलींना युद्धशास्त्राचा अभ्यास करण्यास प्रवृत्त केले पाहिजे. एन.सी.सी.त मुली जातात. बंदूक चालवायलाही शिकतात. पण त्यातून निर्माण होणारा आत्मविश्वास पुढे संसार करताना, भाजी-आमटी फोडणीला टाकताना किंवा दहा ते पाच 'चाकरमानी' करताना गळून जातो. असे का व्हावे? संसार करणे ही बाब दुय्यम नाही. संसार नेटका करायचा असेल तर डोळ्यांचे सूर्य करावेच लागतात. स्त्रीचे डोळे तर जन्मत:च चंद्राप्रमाणे शीतल, स्नेहल असतात पण ही शीतलता प्रसंगी अग्नीचे तेज धारण करणारी असावी लागते.
 स्त्री ही मुळातच भाविनी आहे, अग्निकन्या आहे आणि मनस्विनी आहे. परंतु काळाच्या ओघात तिच्या 'भाविनी' या रूपालाच महत्त्व दिले गेले. त्या रूपाला त्याग, सहनशीलता यांचे लेप चढवले गेले. तिच्या व्यक्तिमत्त्वातील मनस, अग्नी यांच्यावर, अविद्या... अंधश्रद्धा... आत्मघृणा... आत्मसंभ्रम यांची राख साठली आहे. राजाराम मोहन राय, महर्षी दयानंद, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्यासारख्या अनेक महामानवांनी स्त्रीचे माणूसपण जाणले. तिच्यातील माणूसपण जगावे, यासाठी शिक्षणाची दिशा मोकळी करून दिली. दीडशे वर्षांच्या वाटचालीतून आज स्त्रीला आत्मभान आले आहे. तिने जाणले आहे की, हे जग स्त्री-पुरुष दोघांचे आहे.
 समाजाचे प्रश्न, राष्ट्राचे प्रश्न सोडविण्यासाठी दोघांनी पुढे यायला हवे. भविष्यात वेळच आली तर भारतीय स्त्रिया रणांगणातही मागे राहणार नाहीत. त्या एकमुखाने सांगतील,

"कोटी कोटी वीर पुरुष
समरवेश धारी
राहतील मागे का भारतीय नारी ?
समय बिकट येता
मानसात दिवस रात्र एक हा विचार हो
राहतील मागे का भारतीय नारी ?"


■ ■ ■