मनतरंग/आठवणींचे रंग सावनी
Appearance
< मनतरंग
शाळेत असताना श्रावणाची आणि ऑगस्ट महिन्याची आम्ही मनभरून वाट पाहायचो. श्रावण आणि ऑगस्ट यांची आगून-मागून जोडी असतेच. यंदा अधिकाचा ज्येष्ठ होता तरीही बारा ऑगस्टपासून श्रावण सुरू झाला. श्रावण आला की बालकवी आठवणारच !
"श्रावणामासी हर्ष मानसी -
हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सर सर शिरवे -
क्षणात फिरूनि ऊन पडे ॥"
श्रावण आला की, आम्ही मैत्रिणी कुणाकुणाच्या घरी बहीण नाहीतर वहिनीची मंगळागौर आहे, याची यादी करीत असू. किमान दोन मंगळवारी तरी जागरणे हवीतच. मग तऱ्हेतऱ्हेच्या खेळांचा दंगा. त्यावरून भांडणे, तव्यावरची फुगडी, बसफुगडी अशी फुगड्यांची चढाओढ. सूप नाचवतानाची धांदल. फक्त मजा... मजा... आणि मज्जाच. उखाण्यांतून एकमेकीवर केलेल्या चढाया. ही सारी धमाल म्हणजे श्रावण.
मंगळागौरीची सजावट हा तर खास अमचा प्रांत. मंगळागौर कुणाची का असेना, पण वेगवेगळ्या आकाराची...रंगाची फुले आणि पाने गोळा करण्यासाठी अख्खे गाव पालथे घालायचे. पानाफुलांच्या विविध आकारांनी मंगळागौरीच्या चौरंगाभोवती गालिचा विणण्यातला आनंद आगळाच असे. श्रावण आला की, कोपऱ्यावरच्या दुकानात श्रावणाचे रंगीत कागद विकायला येत त्यातला छान रंगाचा कागद आणून भिंतीवर उत्साहाने चिकटविण्यात येई. त्यावर बुधबृहस्पती, जिवती, शिवपार्वती, नागनरसोबा, नृसिंह यांची चित्रे असत. बुधवारी बृहस्पतीची पूजा, शुक्रवारी जिवतीची पूजा होईच. श्रावण म्हटला की मेंदी आलीच. मेंदीची झुडपं आषाढ अंगावर झेलून अक्षरश: पिसारून जात. मेंदीचे काटे श्रावणात रेशमी होतात. झग्याचे खिसे...परकराचे ओचे भरभरून मेंदीची पाने आम्ही घरी घेऊन यायचो. मग ती वाटण्याचा घाट, त्यात घालायला चिमणीचा गू गुपचूप आणून त्यात टाकायचा. मेंदी लालचुटुक रंगते म्हणे त्याने. घराच्या मधल्या चौकात भलामोठा धुण्याचा दगड असे. त्यावर मेंदी जोर लावून बारीक वाटीत असू आणि ती वाटतानाच हात लालचुटूक होऊन जात. मग कष्टाने वाटलेला हिरवा गोळा शेजारच्या मैत्रिणीला देताना जीव कासावीस होत असे. श्रावणभर मुलींचे हात मेंदीने रंगलेले आणि केस फुलांनी बहरून गेलेले, आज ते दिवस आठवले की पुन्हा आठवतात बालकवी. "सुंदर बाला या फुलमाला, रम्य फुले पत्री खुडती..." फुलं गोळा करणाऱ्या पोरीसोरी जणू फुलमाळाच !!
पाहता पाहता नववीत कधी आलो ते कळलेच नाही. डोळ्यातली कोवळी झळाळी जाऊन तिथे एक वेगळीच चमक आली. तरुणाईच्या उंबरठ्याची ती चाहूल असावी. राजाराणीच्या आणि पऱ्यांच्या राज्यात रमणारे मन. फडके, खांडेकर, विभावरी शिरूरकर, गोनिदांच्या कादंबऱ्या; बापट, विंदा, पाडगावकर, इंदिरा, पद्मा यांच्या कवितांत रमू लागले. गंगाधर गाडगीळांची बिन चेहऱ्याची संध्याकाळ स्वप्नात येऊ लागली आणि ऑगस्टचे आगळेवेगळेपण मनाला वेढू लागले. 'स्वराज्य' हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच. असे ब्रिटिश शासनाला ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक आणि ऑगस्ट यांचे नाते कळू लागले. 'चले जाव' चळवळीचा उठाव, 'भारत छोडो' चा महात्माजींनी दिलेला नारा, बाबू गेनू...शिरीषकुमार यांसारख्या हजारो वीर वीरांगनांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी केलेले बलिदान आणि सोसलेल्या यातना या सर्वांचा नऊ ऑगस्टशी असलेला अनुबंध लक्षात येऊ लागला आणि कवितातल्या शब्दांचे अन्वयार्थ मनासमोर उलगडू लागले. शेकडो कविता जीवनाला नवे संदर्भ देऊ लागल्या 'ने मजसी ने परत मातृभूमीला' असे आर्तपणे आळवणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तळमळणारा आत्मा आणि सागराच्या जिथल्या तिथे रिचणाऱ्या उत्तुंग... अस्वस्थ लाटांचे एकात्म पण त्याच काळात उमगले. साठीच्या उंबरठ्यावरचा श्रावण जेव्हा दारात येतो, तेव्हा असे अनेक श्रावण मनात तरंग उठवीत जातात. त्या श्रावणांपेक्षा हा श्रावण काही वेगळा आहे का ? छे, मुळीच नाही. श्रावण नेहमीच हिरवा... गंधगारवा देणारा असतो. मग आपोआप ओठावर ओळी येतात.
"आठवणींचे रंग ताजे
साठीच्या उंबऱ्यात ओठी
श्रावण गीत बिराजे..."
■ ■ ■