मनतरंग/एक देश : एक कुटुंब कायदा
Appearance
< मनतरंग
"मॅडम पहचाना नाही ? मै सकिना. आपकी विद्यार्थिनी और...
"अब आया यादमे"
विद्यापीठातून एम.एस्सी. ची पदवी प्रथम वर्गासह मिळवली होती आणि या पदवीच्या दागिन्यावर तिला अमेरिकेत नोकरी करणारा भारतीय मुस्लिम इंजिनिअर पती मिळाला. सकिना आपल्या पतीवर खूष होती. अमेरिकेतील मनमोकळ्या वातावरणात ती मनापासून समरस झाली. अमेरिकेत नोकरी मिळण्याच्या दृष्टीने तिने अभ्यास सुरू केला आणि लक्षात आले की, ती 'आई' होणार आहे. पहिले बाळंतपण माहेरी व्हावे हां सकिनाचा आग्रह. तिच्या पतीला ही मागणी फारशी पसंत नव्हती. पण त्याने मान्य केले आणि सकिना भारतात आली.
अमेरिकेतील पती-पत्नीच्या संसारातील मोकळेपणा आणि भारतातील सासरचे पारंपरिक वातावरण यात जमीनअस्मानाचा फरक होता. गरोदर स्त्रियांचा आहार, नि घ्यावयाची काळजी याबाबतच्या तिच्या नव्या कल्पना आणि घरातील वातावरण यांचा मेळ बसेना. बुरखा पद्धत घरात कडक होती. माहेरी ती नव्हती. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांत अमेरिकेत गेल्याने, ती पद्धत विवाहानंतर सासरच्या मुक्कामात फारशी जाचक वाटली नाही. पण ती आता जाचू लागली. सासरच्या वडीलधाऱ्या माणसांना वाटे, गावातच माहेर आहे. लेकरू झालं की माहेरी पाठवू. तोवर बहूने सासरी राहावे. अखेरीस अम्मीअब्बांना सांगून ती माहेरी गेली. योग्य वेळी मुलगा झाला. पण सासरकडून मुलगा पाहायलाही कोणी आले नाही आणि बाळ जेमतेम महिन्याचे असताना सकिनाची चुलतसासू काहीही कल्पना न देता आली आणि पाळण्यातले बाळ घेऊन निघून गेली. पाळण्यातले बाळ दिसेना आणि शोधाशोध सुरू झाली तेव्हा बाजूच्या लोकांनी सांगितले की बाळाची दादी बाळाला घेऊन गेली. तात्काळ सकिनाला घेऊन अम्मी अब्बा तिच्या सासरी गेले. त्यांना कोणीही बोलेना की, बसा म्हणेना. स्पेशल जीप करून बाळ मालेगावला घेऊन गेल्याचे कळले नि सकिनाचा धीर खचला. ती सल्ला घेण्यासाठी आमच्याकडे आली. आम्ही गावातील सुजाण, प्रतिष्ठित, ज्यांचा तिच्या सासरच्या मंडळींशी संपर्क आहे असे पाच-सहा जण घरी जाऊन भेटलो. त्यांच्या समाजातील सुशिक्षित अशा प्रौढ महिलेस घेऊन बाळाला आणण्यासाठी सकिना, तिचे आई-वडील, समाजातील प्रतिष्ठित दोघेजण जीप करून मालेगावला गेले. बाळाला घेऊन परत आले.
अमेरिकेतून बाळाच्या वडिलांना पाठविलेल्या पत्राचे उत्तर आले नव्हते. पुढे काय करायचे ? भारतातच नोकरी पाह्यची की परत अमेरिकेत जायचे याबाबत निर्णय घेता येत नव्हता. तिच्या सासरची माणसे मुलाने... नवाजने सकिनाला तलाक द्यावा अशा प्रयत्नात होते. नवाझ सकिनाला पत्र पाठवीत नव्हता. शेवटी सकिनाच्या माहेरची मंडळी व आम्ही एकत्र बसून निर्णय घेतला. परदेशात स्थायिक झालेल्या भारतीय मुस्लिम कुटुंबाशी संपर्क साधला. सकिनाच्या मनात नवाज़ला भेटण्याची, अमेरिकेतील मनमोकळे जीवन जगण्याची उत्सुकता होती पण तरीही नवाज़ने स्वीकारले नाही तर पुढे काय ? पुढे काय ? हा प्रश्नही असुरक्षितता दाखविणारा होता आणि तो प्रश्नच तिला हैराण करी. सकिना अमेरिकेत गेली. दोन वर्षे अमेरिकेत राहत असल्याने व्हिसाचा प्रश्न आला नाही. सकिनाची पाठवणी काहीशी तिच्या मनाविरुद्ध केली गेली.
अमेरिका, कॅनडा, जर्मनी आदी युरोपीय देशात 'एक देश : एक कायदा' हा नियम आहे. धर्मानुसार कायदे बदलत नाहीत अमेरिकेत जाताच तिथेही सकिनाची नोंद नवाज़ची पत्नी म्हणून झाली होती. नवाझने तेथील नागरिकत्व स्वीकारले होते. तेथील कायद्यानुसार प्रथम पत्नीशी घटस्फोट झाल्याशिवाय दुसरा विवाह करता येत नाही. सकिना अमरिकेत परतल्याने 'तलाक'चा धोका पूर्णपणे टळला होता.
तीच सकिना रुबाबदार साकीबला घेऊन माझ्यासमोर उभी होती. "दीदी, परसोही बंबईमे आयी. आज सुबह यहाँ पहुंची तो पहले आपको ही याद किया" सकिना उत्साहाने बोलत होती.
"मी न्यूयॉर्कला पोहोचेपर्यंत खात्री नव्हती की नवाज़ घ्यायला येईल की नाही ते ! पण नवाज़ सुरेखशी बेबी कॅरिअर घेऊन स्वागताला आला होता. दीदी, वर्षानुवर्षे झालेले संस्कार काही दिवसात नाहीसे होत नाहीत. नवाजच्या अम्मी-अब्बांपेक्षाही बाकीच्यांचेच दडपण होते. नवाजने भारतात येऊन तलाक घ्यावा म्हणून. नवाजने भारतात येण्याचे, कोणालाही पत्र पाठवण्याचे टाळले. दीदी मी एवढी एम.एस्सी. झाले, पण कायद्याचे ज्ञान म्हणावे तर शून्य. नवाजचे म्हणणे की मी ओळखायला हवे होते की, युरोपीय राष्ट्रांत त्या देशात राहणाऱ्यांसाठी कायदा एकच असतो.
जाताना नवाज़च्या अम्मींना घेऊन जाणारेय. त्या खूप प्रेमळ आहेत. त्यांनासुद्धा काहीही दोष नसताना, भांडण नसताना शिकलेल्या सुनेला तलाक देणे मान्य नव्हते. सकिनाचा प्रश्न ती अमेरिकेत होती म्हणून सुटला. पण आज भारतात हजारो सकिना आहेत. कॅथॉलिक प्रवाहात अडकलेल्या आयरिन वा ओल्गा आहेत, कायद्याला हरताळ फासून पहिली पत्नी असूनही दुसरा वा तिसरा... चौथा विवाह करणारे 'हिंदू' भारतीय आहेत. या सर्व असहाय भारतीय महिलांची कौटुंबिक अत्याचार, अन्यायातून सुटका करण्याचा एकच मार्ग आहे. 'समान कुटुंब कायदा !' पण तो करण्याची राजकीय हिंमत, सामाजिक जाण कोण दाखवणार ? शेवटी आमची नजर मतांच्या गठ्यांवर !!
■ ■ ■