मनतरंग/मुकं आभाळ

विकिस्रोत कडून



 उदास आभाळ. दिवसरात्र गळणारे ओठ दाबून मुक्यानं रडणारं...
 श्रावणातले ऊन-पावसाचे बिलोरी खेळ आता थांबले आहेत. सुरुवातीच्या रुसव्याफुगव्यातलं रडणं आणि मन भरून हसणं वा रुसणं, श्रावणासारखं प्रसन्न असतं. मनाला ताजवा आणि उभारी देणारं असतं. सदाबहार हरितस्वप्नांचे मोर डोळ्यांत कसे उमलून नाचत असतात. पण, पंचमीची लालम् मेंदी, रोजन् रोज फिकी होत जाते तसेच, हे झुलते मोर पंख मिटवून कधी उडून जातात ते कळत नाही...
 मग मनभर... तनभर पसरून जातं, ऊनं नसलेलं, सुन्न राखाडी... कोनफळी आभाळ ओठ दाबून मुक्यानं गळणार...
 ही पार्वती. जेमतेम चार फूट दहा इंच उंचीची, गोरा रंग, घारे डोळे, दाट काळेभोर गुडघ्याखाली येणारे केस. ओठ असे, जणू त्यांना खूप खूप काहीतरी बोलायचंय, सांगायचंय पण शब्दच हरवलेले, म्हणून घट्ट मिटलेले. आकंठ भरलेल्या धरणाचे दरवाजे गच्च मिटलेले असावेत तसे..
 खेड्यात जन्मलेली ही मुलगी, चारसहा भावाबहिणींतील एक. भवतालच्या घरातील मुली जातात तशी हीपण शाळेत गेली. फुटकी पाटी, वडीलभावांनी दिलेल्या किंवा इकडे तिकडे सापडलेल्या फुटक्या-तुटक्या पेन्सिली आणि मोठ्यापासून चालत आलेली फाटकी पुस्तके, या भांडवलावर सातवीपर्यंत पोचली. कळायला लागलं तेव्हापासून चुलीवरचा स्वयंपाक, पाणी आणणे, लाकूडफाटा रानातून गोळा करणे, खुरपायला नाहीतर कपाशी वेचायला जाणे, आई रानात गेली तर लहानग्याला सांभाळणे ही कामे नेहमीचीच झालेली. त्यातून थोडा वेळ मिळाला तर उरात नवी ओढ घेऊन शाळेत जायचे. झालेला अभ्यास मैत्रिणींच्या मदतीने भरून काढायचा. एवढी धावाधाव करताना प्रगतीपुस्तकावर कुठे ना कुठे लाल रेघ यायचीच. एक दिवस जीवनातही लालरेषा उमटल्या. 'मुलगी श्यानी झाली आता लिवनं बंद' अशी तंबी घरातून मिळाली, मग शाळा बंद !! आणि दोन वर्षांत भरल्या चुड्याचे मेंदीरंगले हात घेऊन, नाजूक जोडव्याची टक्-टक् उमटवीत, हळदकुंकवाच्या पावलांनी पतिदेवांच्या मागे ती नव्या घरात आली, नव्या माणसांत आली. नव्या नवलाईचे चार दिवस छान गेले.
 "ताई, तीनचार महिने लई चांगले गेले वो. ते गोड बोलायचे. मोठ्यांची नजर चुकवून चॉकलेट, बिस्किटाचा पुडा, पेढे आनायचे. डोक्याला लावायच्या झालरी, पिना... काय काय आनायचे. पण पिंकी पोटात ऱ्हाईली. मळमळ, उलट्यांचा तरास सुरू झाला, भूक बी लई लागायची. घरात कामाचा रेटा भरपूर. आता घर म्हटलं की काम आलंच. त्यात शेतकऱ्याचं घर. खानारी मानसं धा.
 "अन् खरं सागू का ? पिंकीच्या पप्पांचे वेडेवाकडे हट्ट पुरवताना जीव लई तरसायचा, त्यातून सारंच उलटून पालटून गेलं... मंग मार सुरू झाला. आमच्या बापूंनी हुंड्यातले सात हजार नंतर देऊ सांगितलं होतं. ते व्याजासंगट द्या असा हेका सासऱ्यानं... मामाजींनी धरला, पोरगी लईच नाजूक हाय. कामात कच्ची हाय असा कांगावा सुरू केला. सहाव्या महिन्यातच माहेरला आणून घातलं. त्यात पिंकी जलमली; पोरगा झाला असता तर नेल्यं बी असतं.
 "चार वरसापासून माहेरलाच रहाते मी. पिंकीच्या पप्पांनी दोन वरसाखाली दुसरं लगीन केलं. पोरगा बी झालाय म्हनं. आमचे बापू लई थकलेत. माय गेल्या साली खरचली... सुटील. भाऊ मला सांभाळाया तयार न्हाईत. दोन एकरात कुनाकुनाचं भागवावं त्यांनी. मोठे दोघं ममईला असतात.
 "तुमी मदत करता असं अैकलं म्हणून बापूंनी हितं आनलय मला.
 "...पण ताई हितंच व्हावं लागेला का वो मला ? त्या परिस महिन्याला दोनतीनशे रुपये द्या ना. एक येळंला जेवू. पन बापूंना घेऊन हाईन मी. म्हाताऱ्याला घरात काईच किंमत न्हाई. लई तुटतो जीव, त्यांना पाहून."
 अर्धमुर्धं शिकलेल्या पार्वतीची स्वत:च्या जीवनाबद्दल फारशी तक्रार नव्हती. स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी नवे शिकण्याची जिद्द नव्हती. उभारी नव्हती. ती यावी कुठून ?
 पण बापासाठी तिळतिळ तुटणारं मन होतं.
 पार्वतीबरोबरच्या काही जणी पुढे शिकत असतील, काहीजणींना पार्वतीच्या वाटेने किंवा थोड्याफार वेगळ्या वळणाने पुढे जावे लागले असेल. लाटेत सापडल्यासारखे शाळेत जायचे. ७ वी...१०वी...बारावी नाहीतर बी.ए. च्या काही वर्षापर्यंत घरच्यांच्या मतानुसार शिकायचे आणि नंतर पाहण्याचा कार्यक्रम, हुंडा, मानपान, देणीघेणी या तालावर झिम्मा खेळत...स्वप्नातल्या नव्हे तर अंतरपाटा पल्याडच्या राजासोबत खेळ मांडायचा.

रांधा-वाढा-उष्टी काढा.
पैशांचे नि संसाराचे हिशेब मांडित
गिरवायचा नोकरीचा पाढा.
तर कुठे
लाकूड फाटा..पाणी..आणि रोजगार शोधित
ओढायचा
संसाराचा गाडा
या गाड्यात बुडले तरी, आत जागी असते एक आई, बाळाला जन्म देतानाच्या कळा आठवीत नि बाळाचे पहिले ट्यॅहा ऐकताना सुखावणारी.
एक कन्या, वृद्ध... एकाकी बापाकडे भरल्या डोळ्यांनी पहाणारी, त्यांची व्यथा हृदयात साठवणारी...
एक बहीण, भावाच्या नुसत्या शब्दांनी भरून पावणारी
आणि
एक प्रेयस पत्नी.
सजणाच्या श्वासांच्या गंधासाठी आसुसणारी... जीवनाचे सारे रंग त्याच्यावर समर्पित करणारी.

तिला सापडते का तिला हवे असणारे आभाळ ?
आम्ही २१ व्या शतकात आहोत.

"...पिता रक्षति कौमारे, भर्ता रक्षति यौवने
स्थविरे रक्षान्ति पुत्रा; न स्त्री स्वातंत्र्यमर्हति..."

 हा पाठ किती दिवस गिरवणार आम्ही ?
 अशा हजारो पार्वती, सलमा, ग्रेस, पंचशीला, अशा वगैरेवगैरे जणी. त्यांचे पुढे काय ? त्यांनी घेतलेले शिक्षण फक्त कागदावरचे ? शिक्षण म्हणजे परिवर्तन; शिक्षण म्हणजे जाणिवांचे जागरण. शिक्षण म्हणजे आत्मभान; शिक्षण म्हणजे वगैरे...वगैरे की उत्तरांच्या शोधात फिरणारे त्रिशंकू प्रश्न ?...?

■ ■ ■