Jump to content

मनतरंग/ते नाते संपून गेले तर

विकिस्रोत कडून



 त्या विलक्षण देखण्या रुंद-बंद रस्त्यावरून आमची बस वेगाने पुढे चालली होती. आज भारतात...महाराष्ट्र, गुजराथ, आंध्र, म्हणजे प्रत्येक प्रांतात ढाबा-संस्कृती दिवसागणिक वाढते आहे. मोटेल उर्फ ढाबा संस्कृती रुजल्याची झलक रस्त्यावर जागोजागी झळकत होती. नाश्ता होण्यापूर्वीच बँकॉकच्या त्या अलिशान हॉटेलातून आम्ही पटायाच्या रस्त्याला लागलो होतो. त्यामुळे नाश्ता घेण्यासाठी एका मोटेलच्या आवारात बस थांबली. बटाट्याच्या फिंगर चिप्स, बटाट्यांचे... केळ्याचे वेफर्स, तऱ्हेतऱ्हेचे पॅकेटबंद पदार्थ काचेरी कपाटातून डोळे घालीत होते. आपल्या इथल्या सारखी 'गर्रम्म भज्जी' नाही तर 'झणझणीत सांबरवडा' ही बात तिथे नव्हतीच. पेप्सीच्या प्रचंड जाहिराती मात्र खुणावीत होत्या.
 हवाबंद प्लास्टिक पुड्यातल्या बटाट्याच्या उभ्या चकल्या-छोट्या पॅकमधले टोमॅटो सॉस, मिर्चीसॉस खाऊन बिसलेरी पाणी-तेही प्लास्टिक पुड्यातले प्यालो आणि पेप्सीकोला पिऊन त्या 'सजधजके' बसलेल्या मोटेलचा निरोप घेतला आणि पटायाच्या रस्त्याला लागलो, थायलंडलाच आपण सयाम या नावाने ओळखतो.
 पूर्वी चेन्नईपासून अगदी जवळ असलेल्या महाबलीपुरमचे समुद्रात बुडालेल्या मंदिरांचे अवशेष पाहायला गेलो तेव्हा तेथील खूप बुढ्या ख्रिश्चन गाईडने माहिती दिली होती की, पूर्वी ज्यांना देहदंडाची शिक्षा दिली जाई अशांना एक पर्याय खुला असे. बोटीत पाणी, धान्य भरून परिवारासह त्यांना समुद्रात सोडून देत. अनेक बोटी समुद्रात बुडाल्या तर काही वेगवेगळ्या किनाऱ्यांना लागल्या. संस्कृती...वेशभूषा, अन्न, रीतिरिवाज, महाकाव्ये, आराध्य दैवते, कला त्या त्या भूभागात नेली. थायलंडची बुद्ध मंदिरे आणि संस्कृत शब्दांचा प्रभाव पाहून ते आठवले. मसाल्याचे पदार्थ, अननस, नारळ, लिंबू, केळी, आंबे आदी रसदार फळे यंची रेलचेल असलेला हा समुद्ध प्रदेश पाश्चात्त्यांच्या मनात भरला. इथेही त्यांनी आपल्या भोगवादी संस्कृतीचे इंजेक्शन टोचलेले आहे. शेती हा व्यवसाय नाहीसा होत चालला असून 'टुरिझम' हा व्यवसाय तेजीत आहे. एकेकाळी स्त्रिया अन्ननिर्मितीचे आणि वस्त्र विणण्याचे काम करीत, घरातील मुलांना आणि वयस्कांना सांभाळणाऱ्या स्त्रियांना आज अन्नासाठी, मुलांच्या पोटापाण्यासाठी व शिक्षणासाठी घराबाहेर पडावे लागले आहे. पटायात शिरताना विद्यापीठाची भव्य इमारत दिसली. 'विद्यापीठ' कसले ? तर अंगमर्दन...मसाज करण्याची कला शिकविणारे !!
 पटायात पोचतातच मी, सीमा साखरे, चंद्रकला भार्गव अशा दहाबाराजणी आमच्या हॉटेल शेजारच्या 'मसाज केंद्रात' गेलो. तर खालच्या खोलीत दाटीवाटीत पन्नास बायका बसलेल्या. त्या दुपारच्या पाळीच्या. तीन पाळ्यांमध्ये हा व्यवसाय चालतो. ३० मिनिटांच्या मसाजसाठी तीनशे रुपये मोजायचे. एका निरुंद पण लांबट खोलीत तीन-तीन फुटांवर पडदे बांधून दहा आडोसे केलेले. एका आडोशाआड एकाचे अंगमर्दन करणारी एक कुशल स्त्री. मसाज तेलाशिवाय. एकतर आम्हां पन्नाशी नि चाळीशी पल्ल्याडच्या बायका पाहून त्या धास्तावल्या. कारण मसाज करून घ्यायला येणार परदेशी पुरुष. आम्ही खोलीत जाताच ते पडदे बाजूला सारून टाकले आणि त्यांच्याशी दोस्ती करून गप्पांना सुरुवात केली. आम्ही त्यांच्याशी बोलण्यासाठीच आलो होतो. भाषा खाणाखुणांची. दोघींना थोडेसे इंग्रजी कळत होते. त्या आठपैकी दोघी हुंडा जमवण्यासाठी, चौघी मुलांचे शिक्षण आणि पोटासाठी आणि एक दुसरे कामच उपलब्ध नसल्याने ही नोकरी करीत होत्या. पुरुषांना मसाज करण्यात आनंद तर नाहीच पण घृणा वाटते. अनेकदा गिऱ्हाईक अंगचटीला येते. तेही सहन करावे लागते. परंतु आठ तास ड्यूटी केल्यावर किमान दोनशे रुपये हाती येतात. चारजणींचे नवरे त्यांच्या खेड्यात राहतात. दोघी नवऱ्यापासून वेगळ्या राहतात. दोघींचे नवरे दुसऱ्याच्या शेतात काम करतात.
 पंचवीस - तीस वर्षांपूर्वी शेतात कामे होती. पण आज शेतीची जमीनही कमी झाली आहे. आज सयाममध्ये बहुतेक माल आयात केला जातो. अशा वेळी फारसे न शिकलेल्या स्त्रियांच्या समोर महत्त्वाचे व्यवसाय असतात दोनच. एक म्हणजे वेश्यावृत्ती आणि दुसरा अंगमर्दनाचा. सायंकाळच्या अंधूक उजेडात पटाया चौदा वर्षांच्या नटरंगीसोबत जाणारे सत्तरीपुढचे गोरे तरुण पाहिले आणि मनात आले. आमच्या भारतातील भूमिकन्यांनी आपली शेती, अन्न तयार करण्याचे च्या समुद्रतीरावर कौशल्य, वस्त्र विकण्याची कला, निसर्गाने निर्माण केलेल्या पदार्थांतून नवनवीन वस्तू तयार करण्याची कामगिरी जपली नाही, तर आमचे या भूमीशी, भवतालच्या पाण्याशी, झाडांशी असलेले नाते संपून जाईल आणि एक दिवस पटायाचा बेधुंद... बेशरम किनारा आमच्या सुनहरी किनाऱ्यांवर आपले बस्तान मांडेल. नाते स्वदेशीशीच का ? हे पटायाने मनात गोंदवून ठेवले.

■ ■ ■