Jump to content

मनतरंग/पिंपळपान

विकिस्रोत कडून



 नजर पोचावी तिथवर नुसत्या हिरव्या रंगाच्या घनघोर लाटा. दाट गवताचा लुसलुशीत पोपटी रंग, तर उंचउंच वाढलेल्या हरळीचा गर्द हिरवा रंग. गुलमोहोर आता हिरव्यागार पानांनी बहारून गेले आहेत. वाट चुकलेलं एखादं लालजर्द फूल. पानाच्या हिरव्या रंगाची गहिराई आणखीनच गर्द करतं. बुचाच्या ज्याला अजरणी किंवा आकाशमोगरी म्हणतात, तर या झाडांना अश्विनात फुलणाऱ्या पांढऱ्या फुलतुऱ्यांची स्वप्नं पडू लागली आहेत. स्वत:त बुडून गेलेल्या या झाडांच्या पानांचा रंग दाट शेवाळी. आंब्याच्या पानांवर आता अंजिरी छटा चढली आहे आणि मेंदी ? मेंदीची काटेरी झुडपं आता गर्दजर्द रुमझुमत्या पानांनी नुसती झुलताहेत.
 मेंदीची झाडं पाहिली की लहानपण आठवते. पन्नास वर्षांपूर्वीचे दिवस. रेडिओसुद्धा हजारांतून एखाद्या घरात असायचा. लहान मुलांची स्वप्ने साने गुरुजींच्या गोड गोष्टींनी, वा.गो.मायदेव, ग.ह.पाटील यांच्या कवितांच्या रंगखुळ्या स्वप्नांनी गजबजलेली असायची. ज्येष्ठ सरू घातला की, घरातील पोरीसोरींच्या मनात श्रावणभादव्यातील सणांच्या आठवणी रुणझुणू लागत. आषाढात झाडे पूजण्यासाठी घराघरांतील बायका मुलाबाळांना घेऊन रानात जात. बाभळीची पूजा करीत. पिवळ्या गोड फुलांनी सजलेली काटेरी बाभूळ पाहाताना श्रावण अगदी शिवेवर आल्याची जाणीव होई. कांदेनवमी सामूहिकपणे साजरी होई. त्यात चटकदार उत्साह आयांपेक्षा पोरींचाच. कुणानाकुणाच्या घरी नव्याने लग्न झालेली मावशी... काकू वा आत्या असायचीच. मग सोमवारी शिवामुठीची घाई. मंगळागौर एकीची पण त्या निमित्ताने घरदार, भवतालचा परिसर डुलत राही. १६ पत्री, तऱ्हेतऱ्हेची फुले गोळा करण्यासाठी पोरापोरींचे जत्थे भल्या पहाटे आंघोळ करून उत्फुल्लपणे हिंडत. ज्यांची मंगळागौरीची वर्षे, त्या नवविवाहितांचे डोळे रात्री ११ वाजताच मिटायला लागत. मात्र, जाग्रणासाठी जमलेल्या मुली, प्रौढा, अगदी साठीसत्तरीला पोचलेल्या आज्या उत्साहाने रात्र जागवीत. अंगण दणाणून जाई. सूप नाचवण्यापासून ते लाटण्याचा झिम्मा, तव्यावरची फुगडी... स्वयंपाक घरातील आयुधंही खेळण्यासाठी बाहेत येत. वर्षभर त्याच त्या पाढ्यात फिरणारे, आंबलेले, कंटाळलेले शरीर जणू मोकळे होई, नव्या उत्साहाने उद्याचे स्वागत करण्याठी. दर शुक्रवारी पुरणावरणाचा नैवेद्य दाखवून जिवतीच्या कागदाची पूजा केली जाई. घरातील मुलाबाळांना जगन्मातेचा आशीर्वाद मिळावा. आधार मिळावा म्हणूनच व्रते, देवदेव न करणाऱ्यांच्या घरातही शुक्रवार साजरा होई. नागपंचमीचे झोके आभाळावर मात करीत. रात्री गल्लीतल्या बायका आणि मुली चौकात वा मोठ्या अंगणात जमून फेरावरची गाणी गात. ह्या गाण्यांतला करुण सूर मनाला स्पर्शेून जाई पण त्यामागचे अस्वस्थ मन कळत नसे. पंचमीला माहेरी आलेली नववधू लेक. ती भावजयीजवळ तिची कासई नेसायला मागते. पंचमीचे फेर खेळताना कासईला चिखल लागतो. भावजय संतापते आणि नवऱ्याला अट घालते, की 'तुमच्या बहिणीच्या रक्तात माझी खराब झालेली कासई रंगवून आणून द्या. आणि नवरा बहिणीला सासरी पोचविताना वाटेत दगा देऊन मारतो. पत्नीची कासई बहिणीच्या रक्तात रंगवून हट्ट पुरा करतो... हे गाणे गाताना बायकाचा स्वर जडावत असे आणि आमच्या मनासमोर अनेक प्रश्न उभे राहात. नणंद-भावजय, सासू-सूना जावा-जावा यांचं नातं भांडणाचंच असतं ? समजा आम्ही मैत्रिणी उद्या नणदा, भावजया वा जावा झालो तर आम्हीपण एकमेकींचा द्वेष करणार ? हे असं का ? सगळ्या बायकाच मग तरीही ?...?
 राखी पौर्णिमा... नारळी पौर्णिमा, गोकुळ अष्टमी, बुधवारी बृहस्पतीच्या कागदाची पूजा आणि शेवटी वाजतगाजत दारावरून जाणारा पोळा. रंगीबेरंगी बिलोरी झुलींनी सजलेले बैल, त्यांच्या माथ्यावर सुरेख आरसेदार बाशिंगे, रंगवलेली... बेगड चिटकवलेली शिंगे, त्यावर बांधलेले निळे; गुलबक्षी गोंडे. सायंकाळी बैलाचं लगीन अगदी भटजींनी म्हटलेल मंगलाष्टकसुद्धा.
 श्रावणापाठोपाठ भादवा येई. गणपतीच्या सजावटीत गल्लीतली मुलं बुडून जात तर लक्ष्म्यांचा...गौरीच्या मांडणीत घरातल्या लेकीबाळी दंग होत. घराघरांतून लाडू, करंज्या, अनारसे, चकल्या, शंकरपाळे यांचा घमघमाट एकामेकांत मिसळून जाई. प्रत्येक पदार्थ थोडेथोडे करायचे. दिवाळीत मात्र डबे भरायचे. लक्ष्म्या वा गौरी सर्व जातीजमातीच्या घरातून मांडतात. या काळात खरिपाची पिके दुधात येतात. घरात येणाऱ्या धान्यलक्ष्मीच्या स्वागताचा हा सण. लक्ष्म्या सायंकाळी घरी येतात तिचा सन्मान...स्वागत रानातल्या पालेभाजीने व भाकरीने होते. दुसऱ्या दिवशी मात्र पंचपक्वानांचा थाट. पण पक्वान्नापेक्षा भाज्यांना महत्त्व. सोळा भाज्या, पाच खिरी, डाळीचे वडे, तऱ्हेतऱ्हेच्या चटण्या, अन्नब्रह्माची निर्मिती करणाऱ्या गौरीरूप भूमीची ही पूजा घराघरांतून मनोभावे केली जाई.
 घरातल्या लेकीबाळी तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ आपोआप शिकत. श्रावणभादव्याचे दिवस भरारा उडून जात.
 हे महिने आले की आजही मन मागे धावते. पुन्हा एकदा शिडीच्या पायऱ्या उतरत थेट आठ-नऊ वर्षाचे होते. मनाचे अंगण रांगोळीने भरून जाते. दिव्याच्या ज्योती नजरेसमोर तेवू लागतात.
 ...मग खूप काही हरवल्याची बोच टोचू लागते. मन गुदमरून टाकणारा 'आज ? ! संध्याकाळ झाली की घरातली मुलं खाणंपिणं सोडून दूरदर्शनच्या काचेरी पडद्यापुढे बसतात. अभ्यासही तिथेच. कुकर लावीत, भाजीला फोडणी घालीत आई...नव्हे मम्मीपण तिथेच रेंगाळणार. पप्पा नाही तर डॅडी घरात आल्या आल्या, झी नाहीतर एस् किंवा वीस-पंचवीसांपैकी त्यांना आवडणारे चॅनल लावणार. मग त्यावरून घरात वादावादीही रंगणार. श्रावणभाद्रपदातली धांदल आता 'स्वीट होम्स' नी थांबवली आहे. या साऱ्या गोंधळात 'शुभंकरोति' हरवून गेलेय जमेल तेव्हा म्हटलं जाणार, एवढेच. साने गुरुजींची जन्मशताब्दी साजरी होतेय. तेही मुलांच्या मनातून हरवलेले.

"...पिवळे तांबुस ऊन कोवळे पसरे चौफेर
ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर"


"हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवरती कुणीतरी ती डोलत होती..."

 या चित्रमयी कवितांच्या ओळी मुलांच्या ओठावर गोंदल्या कशा जाणार? आज चिमुरड्याच्या ओठांवर असते -

"दिल तो पागल है, दिल दिवाना है"
किंवा
"आती क्या खंडाला ?... पिती क्या कोका कोला?"

काळाबरोबर ज्ञानाचे, अनुभवाचे आणि अभिव्यक्तीचे क्षितिज रुंदावत जाते. जीवन जगण्याच्या रीती बदलत जातात आणि तसे व्हायलाच हवे. परंतु, वर्षाचे प्रवाह धावत राहिले तरी, एखादे पिंपळपान असे असते की, ते कालप्रवाहाच्या वर तरंगत राहाते. ताजेपणाने तरंगत राहाते. काळाच्या पल्याडचे चैतन्य त्यात नेहमीच रसरसलेले असते.
 ...पण त्या पिंपळपानावरच्या रेषा वाचायच्या कोणी ?

■ ■ ■