Jump to content

मनतरंग/प्रवास, नात्यागोत्याचा

विकिस्रोत कडून



 "अमन, जंबोआपला काका नाही. तो मामा आहे. त्याला मामा म्हण."
  "का? मी चाचूच म्हणणारेय त्याला जा...जा...!'
 'अरे तो अतुलमामाचा मित्र आहे. आईच्या भावाचा मित्र. म्हणजे मामाच नि बाबांचा मित्र म्हणजे काका, हो की नाही ग आजी ?' अनुष्का वय वर्षे चार आणि अमन वय वर्षे तीन. यांच्यातला हा संवाद.
 मुले वाढायला लागली की कुटुंबातल्या व्यक्तींच्या वागण्याबोलण्यातून, दैनंदिन व्यवहारातून, नातीगोती आपोआप शिकू लागतात. नाती गोती, गणगोत हे शब्द महाराष्ट्राच्या लोकजीवनात ओतप्रोत मुरले आहेत. गोत हा शब्द गोत्र या संस्कृत शब्दापासून मराठीत आला. भारतात सुरुवातीस 'गणराज्य' म्हणजे लोकांचे राज्य होते. एका विचाराने, एकदिलाने आणि एकमेकांच्या व्यथावेदना जाणून सुखाच्या दिशेने जाणारा जनसमूह म्हणजे 'गण'. शब्दांच्या मागे हजारो वर्षांचा इतिहास असतो. सामाजिक वाटचालीचे चलच्चित्र त्यात रेखाटलेले असते.
 माणूस हा एक प्राणीच. कुत्रे, मांजर, वानर, सिंह यांसारखा. निसर्गाने प्रत्येक प्राण्याला स्वत:ची जीवनवृत्ती चालविण्यासाठी व संरक्षण करण्यासाठी विशिष्ट शक्ती दिली आहे. वेगळेपण दिले आहे. माणूस हरणाच्या वा वाघाच्या वेगाने पळू शकत नाही, ना त्याचे दात वा जबडा समोरच्या संकटाचा घास घेऊ शकणारे, मात्र माणसाला निसर्गाने दोन शक्ती अशा दिल्या आहेत की, त्यांच्या बळावर तो अवघ्या विश्वावर, निसर्गावर वर्चस्व गाजविणारा शक्तिमान होऊ शकतो. पहिली शक्ती म्हणजे विचार करण्याची, घटनेमागील कार्यकारणभाव शोधण्याची जिषा, बुद्धिमत्ता आणि तो विचार वाचेद्वारे प्रकट करण्यासाठी लाभलेले आगळेवेगळे स्वरयंत्र. ज्याच्याद्वारे त्याने भाषा तयार केली आणि स्वतःला व्यक्त करण्याचा मार्ग निर्माण केला. काळाच्या प्रवाहात गरजेनुरूप माणसाला स्वत:च्या या शक्तींचा शोध लागला.
 आदी काळात माणूस इतर प्राणिमात्रांप्रमाणे समोर येईल ते खात होता. गुहा, झाडांच्या कोटरात राहात होता. इतर प्राणिमात्रांत आई आणि नवजातप्राणी यांच्यात विशिष्टकाळच माताबालकाचे नाते असते. पिल्लू वयात आल्यावर जिने जन्म दिला त्या मातेशी ही कधी मादी म्हणून रत होते. त्यांना पिल्ले होतात. ही अवस्था एकेकाळी मानवी जीवनातही होती. याची साक्ष इडिपसची कथा देते. जन्म देणारी स्त्री राणी ही संपत्तीची, राज्याची मालकीण आहे. राजाचा मृत्यू झाला आणि राणी वृद्ध नसेल तर विशिष्ट पणावर तिचा विवाह त्या पुरुषाशी लावला जाई. इडिपस आणि त्याची पत्नी यांच्या नवजात बालकाचे भविष्य भयानक होते. आई आणि पुत्र यांना संतती होण्याचा योग त्यात होता. हे विधिलिखित टाळण्यासाठी नवजात बालकास ठार मारण्याचा आदेश सेवकांना दिला. परंतु मानवी मनातल्या संवेदनेने त्यांना तसे करू दिले नाही. अठरा वर्षानंतर राजा मरण पावला. हत्ती ज्याला हार घालील त्याच्याशी राणीचा विवाह करण्याचा 'पण' जनसमूहाने ठरवला. ज्याच्या गळ्यात हार घातला तो युवक राणीचाच मारण्यास दिलेला पुत्र होता. त्यांना मुले झाली. योगायोगाने हे सत्य लक्षात आले. हा आघात सहन न झाल्याने आई, मुलगा-पत्नी...पती यांनी आत्मघात करून घेतला. मुलांना आपली आई तीच आपली आजी आपला बाप तोच आपला भाऊ...हे नात्याचे सत्य उद्ध्वस्त करून गेले. त्यांनीही स्वत:चे डोळे फोडून हे सत्य नाकारून, विजनाकडे पाय वळवले. नात्याचा सांस्कृतिक प्रवास उजेडाच्या दिशेने सुरू झाला.
 अशीच प्रतिकात्मक कथा यम आणि यमीची आहे. एकेकाळी सख्या बहीणभावाचा विवाह निषिद्ध नव्हता. बौद्ध रामायणात राम-सीता हे बहीणभाऊ असल्याचा उल्लेख आहे. यमाने हा विवाह निषिद्ध ठरवला. मानवाने स्वत:चे वेगळेपण, स्वयंभूअस्तित्व विचार करण्याच्या बळावर सिद्ध केले. यमाने यमीच्या इच्छेचा स्वीकार केला नाही. यमी अत्यंत दु:खी झाली. यमाने तिला विरह सहन व्हावा म्हणून दिवस आणि रात्र निर्माण केली. आजही भाऊबीजेचा दिवस- कार्तिक शुक्ल द्वितीयेचा दिवस-यमद्वितीया म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रात भाऊबीज अत्यंत महत्त्वाची. भाऊ-बहीण यांच्यातील रक्ताच्या नात्याला भावनेचा, संवेदनेचा रेशमी धागा जोडला गेला.
 रक्ताच्या नात्याइतकेच भावनिक नातेही अत्यंत बळकट असते. आधार देणारे असते. याची साक्ष राखीपौर्णिमा... रक्षाबंधनाचा सण देतो. या सांस्कृतिक जडणघडणीच्या प्रवासात नातीगोती निर्माण झाली. कुटुंबसंस्थेचा आधार बनली. मानवी बुद्धीच्या विविध पैलूंपैकी एक पैलू म्हणजे 'संवेदना' संवेदनेच्या बळावर कुटुंबसंस्था अर्थपूर्ण, नियमबद्ध आणि बळकट झाली.
 नाती रक्ताची असतात तशी धर्माची असतात. रक्ताची नाती भाऊबहीण, मुलगा-मुलगी, काका, मामा, आत्या, मावशी, सासू-सासरे, दीर-नणंद वगैरे सर्वच पती-पत्नी या धर्मसंबंधावर वा सामाजिक संबंधावर आधारित दैहिक बंधाशी जोडलेली असतात आणि या नात्याचा पाया केवळ देह नसतो तर देहात सळसळणारी संवेदना, भावना असते. हे नाते धर्माचे असले तरी ते इतके जवळचे, मनस्वी असते की त्याच्या बळकटीवर, चैतन्यावर इतर नात्यांचे जिवंतपण अवलंबून असते. पती-पत्नींच्या एकरूपतेचे वर्णन करताना कवी कालिदास लिहितो,

"वागर्थाविव संपृक्तौ वागर्थप्रतिपत्तये ।
जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ ॥"

 वाणी आणि अर्थ यांची जशी एकरूपता तशीच पार्वती-परमेश्वराची एकरूपता. त्यांना वेगळे कसे करावे ? पती-पत्नी या नात्याची एकरूपता अशी असेल तर...? तर असा हा प्रवास नात्यागोत्याचा...भारतीय संस्कृतीच्या आगळेपणाचा.

■ ■ ■