मनतरंग/कदाचित् हे तुम्हाला पटणार नाही
Appearance
< मनतरंग
तो गेल्यावेळी भेटला तेव्हाच त्याच्या डोळ्यात अखेरच्या प्रवासाची चमक जाणवली होती. समोर बघण्याचेही तो टाळत होता. नजरेत हताश असहायता, पुढ्यातल्या काळोखाची पापण्यांवर गर्द सावली. त्याला पाहून जीव आतल्या आत गलबलला. अत्यंत सधन, उच्चशिक्षित आईवडिलांचा... उच्चशिक्षित कुटुंबातला, सुसंस्कृत मानल्या जाणाऱ्या घरातला हा एकुलता एक मुलगा. पस्तिशी ओलांडायच्या आत याला मृत्यूच्या कड्यावर कोणी आणून उभे केले ?विविध व्यसने, प्रचंड उद्दाम स्वभाव, पैशाची चढेली हे दोष त्याच्यात कसे निर्माण झाले ? का निर्माण झाले ? कुणी निर्माण केले ? भवतालच्या परिसरातील सामाजिक बदलामुळे ? हा मला माहीत असलेला एक. पण असे अनेक आणि असंख्य केवळ भारतात नाही तर जगभर...
आमचा एक मित्र पस्तीस वर्षापूर्वी कॅनडात जाऊन स्थायिक झालाय. त्याने वीस वर्षांपूर्वी सांगितलेला अनुभव. त्याची कन्या एका बोर्डिंग स्कूलमध्ये... छात्रालय असलेल्या शाळेत होती. तिने तिची अडचण आपल्या बाबांना लिहून कळवली होती. तिच्या मैत्रिणीला दोन डॅडी होते आणि दोन मम्मी होत्या. ती आधी तिच्या खऱ्या मम्मीकडे नि 'त्या' डडीकडे जाणार होती. नंतर खऱ्या डॅडीकडे नि 'त्या' मम्मीकडे जाणार होती. एकूण तिची मज्जाच होती. कारण दोन-दोन ठिकाणी सुट्टी घालवायला मिळणार. शिवाय दोन - दोन भेटवस्तू... आणि ही मज्जा आमच्या मित्राच्या कन्येला मिळणार नव्हती. कारण खरी मम्मी नि खरे डॅडी एकाच घरात राहत होते.
आमचा मित्र नेहमी सांगत असे. आपल्या कुटुंब संस्थेचे नेमकेपण; तिचा जीवनात मिळणारा आधार इकडे आल्यावर कळतो. पण ही बात वीस वर्षांपूर्वीची.
आमची पिढी स्वातंत्र्योत्तर काळात, एकोणीसशे साठ नंतर तरुणाईत आली. प्रगतीची विविध क्षितिजे आमच्यासमोर रोजन् रोज उजळत होती. मध्यमवर्गातील स्त्रिया शिकू लागल्या होत्या. आपण स्वत: नोकरी वा व्यवसाय करून मिळणारा पैसा खर्च करताना आपण निर्णय घेऊ शकतो. आपले मत अधिकाराने मांडू शकतो आणि त्या मताला घरातील वडीलधारी माणसे किंमत देतात याचा सुखद अनुभव त्यांना येऊ लागला होता. दिवसेंदिवस गरजा वाढत होत्या. पैसा मोकळेपणाने येऊ लागला की गरजा वाढतातच. पण विवाहसंस्था, कुटुंबसंस्था यांच्या चौकटी मात्र परंपरागत राहिल्या, त्यात फारसे बदल झाले नाहीत. पूर्वी घरात संपूर्ण तनमन केंद्रित करणाऱ्या बाईला आज अर्थार्जनासाठी आठ दहा तास घराबाहेर गुंतावे लागते. पण घरातल्या जबाबदाऱ्या... विशेषतः मातृत्व आणि मुलांचे संगोपन ह्या नैसर्गिक जबाबदाऱ्या यांतून तिला मुक्ती नसते. या धावपळीत खूपदा मुलांना 'अगदी हवीच' असलेली आई सापडत नाही; कुटुंबाच्या अवकाशात मुले एकटी, एकाकी होतात. पूर्वी आजोबा-आजी घरात असत. त्यांच्याशी मुलांची दोस्ती असे. गेल्या दहा-पंधरा वर्षांत ही संस्थाही मिटत चालली आहे. पालकांना मुलांशी संवाद साधायला वेळ नाही. मग जो थोडाफार वेळ मिळेल, त्यात मुलांवर वस्तू... खाऊ यांची उधळण करून त्यांचे नको ते हट्ट पुरवून आपल्या प्रेमाची, जवळिकतेची जाहिरात मुलांच्या मनावर कोरण्याचा प्रयत्न पालक करतात. पण त्यातून त्यांच्या मनातले उदास रिकामेपण भरून निघेल का ?
एक आजी कौतुकाने सांगत होत्या की, आईपासून दूर त्याच्याकडे राहणाऱ्या नातवाने रात्री एक वाजता पुरण पोळीचा हट्ट धरला आणि स्वयंपाक करणाऱ्या बाईला रात्री उठवून, तिला वेठीस धरून त्यांनी तो पुरवलासुद्धा !!
एका विशिष्ट उच्चभ्रू वर्गातील स्त्री-पुरुष रात्री गप्पा मारीत, पत्ते खेळत, खास पेयाचे घुटके घेत, दिवसभराचा बौद्धिक... शारीरिक ताण घालवतात. आणि त्यांच्या गप्पा, त्यांचे सैल विनोद अधमुऱ्या वयाच्या मुलांच्या कानांवर पडतात. डोळ्यात झोप असते, कुशीत घ्यायला आई नसते... डोक्यावरून हात फिरवीत गमतीजमतीच्या गोष्टी सांगायला जवळ बाबा नसतात. अशावेळी कान असतात आई-बाबांच्या गप्पांकडे. बंद खोलीच्या फटीतून दिसणारा पलीकडचा रंगलेला खेळ. अशावेळी मुलांचे एकटेपण त्यांना अधिक बोचू लागते.
माझी एक मैत्रीण तक्रार करीत असे. ती जे सांगेल त्याच्या नेमके उलट तिची मुलगी वागे. मुलगी वाढत्या वयातली. आणि ही दिवसभर कामावर. तिला काम करताना धस्स होई. वाटे, मुलीला काही अडचण तर नसेल ना आली? तिला कोणी फसवणार तर नाही ना ? खरं तर, एका विशिष्ट वयात आई लेकीची अगदी जीवश्चकंठश्च मैत्रिण असायला हवी. तसा खास प्रयत्न आईकडूनच व्हायला हवा. आणि तोही लेकीला जाणवणार नाही अशा सहजपणे. त्या अधमुऱ्या वयात मुलांना शरीराबद्दल, बाहेरच्या जगाबद्दल तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न पडत असतात. अशावेळी हळुवारपणे उत्तरे देणारी, निसर्गाच्या रीती समजावून सांगणारी, आत्मविश्वासाने जवळ घेणारी आई 'मैत्रीण' म्हणून हवी असते. तर मुलांना बाबा 'मित्र' म्हणूनच हवे असतात.
'प्राप्तेतु षोडशे वर्षे पुत्रं मित्र वदाचरेत् ।' असे पूर्वीपासून म्हटले आहे. पण 'फास्टफूड'च्या काळात हे सगळेच हरवून चालले आहे.
वयाच्या पाचव्या वर्षी रात्री दीड वाजता पुरणपोळीचा हट्ट पुरा केला जातो. मग वयाच्या विशीत कुणाला अमृता तर कुणाला शबाना हवी असते. इथे हट्ट घरापुरता मर्यादित राहात नाही. दिसेल ते माझेच. आणि माझे झाले नाही तर हातात कायदा ; शस्त्र घेण्याचा उद्दामपणा! तऱ्हेतऱ्हेची व्यसने, सवयी आधीच जडलेल्या.आणि हे सारे आईवडिलांच्या लक्षात येते तेव्हा प्रेमाचे... वात्सल्याचे, नीतीचे दोर कापून घरचे 'लेकरू' कड्याच्या दिशेने बेफाम धावत सुटलेले असते.
आता कुटुंबासंबंधीच्या संकल्पना अधिक नेटक्या आणि नेमक्या करणे आवश्यक आहे. आज ज्योत्स्नाताई नाहीत. त्या म्हणत की, 'स्त्रीच्या जीवनात काही काळ 'हायबरनेशन'चा असतो. त्या काळात स्त्रीला कुटुंबात स्थिर राहावे लागते. आपण निर्माण केलेल्या मुलांना जगाची ओळख करून देण्याची, त्यांना चांगल्या रीतीने जगण्याचे रस्ते दाखवण्याची जबाबदारी आई आणि वडील या दोघांचीही असते. अशा काळात व्यावसायिक प्रगती... सहजपणे मिळवता येणारा पैसा... यश या सर्वांना काही काळ दूर सारावे लागते. ही जबाबदारी 'बापा'ची असतेच. त्याने पत्नीला पूर्णत्वाने सहयोग द्यायचा असतो. परंतु तरीही निसर्गाने सोपवलेली जबाबदारी 'बांधीलकी' मानून स्त्रीने, आईने स्वीकारायची असते. त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही आणि तसे झाले तर...?
ऐन उमेदीत नकळत वाट चुकून कड्यावरून कोसळणाऱ्या लेकरांची संख्या वाढत जाणार... !!
■ ■ ■